जानेवारी २०१३. स्थळ- १०वीचा वर्ग. उपस्थित मंडळी- मी, माझी मुलगी, वर्ग शिक्षिका व भूमितीचा पेपर. “ इतना सन्नाटा क्यूं है भाई?” म्हणण्यासारखी परिस्थिती. पेपरमध्ये पेन्सीलीने काढलेल्या त्रिकोण, चौकौन ह्यांपेक्षा लाल शाईतील गोल जास्त होते. आधीच आकड्यांशी ३६ चा आकडा असलेल्या माझ्या मुलीला आता भूमितीतील वेगवेगळ्या आकारांनीसुध्दा छळायला सुरुवात केली होती! वेगवेगळ्या आकारातील त्रिकोण, त्रिज्या, कोन व प्रमेय ह्यांनी तिचा जीव मेटाकुटीस आला होता. पण लवकरच हे शत्रुत्व मैत्रीत रुपांतरीत झाले जेव्हा तिने कमर्शियल आर्टसला प्रवेश घेतला. तिथे ह्याच आकारांमध्ये ती अक्षरशः गुंगून गेली. एकेका आकाराचे वैशिष्ठ, त्यातून निघणारा अर्थ आणि त्याचा माणसाच्या शरीरावर व मनावर होणारा परिणाम... ह्या गोष्टी तिच्याबरोबर मलापण शिकायला मिळाल्या.
व्यवहारात किंवा साधे बोलताना देखील आपण कितीतरी वेळेला आकाराचा संदर्भ घेतो. हाताच्या आकारावरून भविष्य वर्तवले जाते. चेहऱ्याच्या आकारावरून एखाद्या माणसाबद्दलची आवड निवड ठरवली जाते. शब्दकोशातील आकाराचा अर्थ आहे बाह्य रूपरेखा, आराखडा. किंवा अगदीच यांत्रिकी भाषेत सांगायचे तर एका बिंदू पासून निघालेली रेघ जेव्हा मूळ बिंदूपाशी फिरून परत येते तेव्हा तयार होतो तो आकार. पण माणसाच्या जीवनात त्याचे आकाराशी असलेले नाते इतके रूक्ष नाही. एखादी गोष्ट जेव्हा अर्थपूर्ण भासते तेव्हाच आपण त्याला आकार म्हणून संबोधतो. ह्या लेखात आकारांचा व माणसांचा एकमेकांशी असलेला संबंध आपण बघणार आहोत.
त्रिकोण, चौकोन किंवा आयत व गोल हे झाले मूळ आकार. आपल्या आजूबाजूच्या जवळपास सर्व गोष्टी ह्या आकारात आपण बसवू शकतो. चित्रकार चित्र काढताना आधी मूळ आकारांचा आधार घेतो. उदाहरणार्थ चेहरा काढताना चेहऱ्याच्या ठेवणी नुसार गोल काढला जातो. नाकाच्या लांबीनुसार त्रिकोण बनतो. तर कानाच्या जागी प्रमाणशीर आयात काढला जातो आणि नंतरच मग त्यामध्ये तपशील भरले जातात. कुठल्याही गोष्टीची उपयुक्तता त्याच्या आकारावर अवलंबून असते. मग ती पिन असो किंवा विमान .....आकार महत्वाचा.
लहानपणापासून माझ्या wish list मध्ये ईजिप्तचे पिरामिड सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. पिरामिडच्या भाव्यतेबरोबरच त्याच्या आकाराचे नेहमीच मला आकर्षण वाटत आले आहे. पुढे रोमन व ग्रीक वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना त्रिकोणाचा सढळ हाताने केलेला वापर प्रकर्षाने जाणवला. मग हळू हळू लक्षात आले कि अरे, कधीही स्वतःची टिमकी न वाजवता हा बापुडा जिथे आधाराची गरज आहे तिथे तिथे हजर आहे. एखाद्या पुलाला आधार देणारी लाकडी किंवा लोखंडी फ्रेम असो किंवा बांधकामाच्या जागी लाकडाच्या फळ्यांनी केलेला सांगाडा असो- त्रिकोण पाहिजेच. वरून चौकोनी दिसणारा आकारसुद्धा तेव्हाच मजबूत होतो जेव्हा तो कमीत कमी दोन त्रिकोणात विभागाला जातो. लहान मोठ्ठे सगळ्यांचा आवडता खेळ म्हणजे पत्त्याचे घर बनवणे! हे घर कसे बनवतो? त्रिकोण जोडूनच ना? मजा म्हणून चौकोनी पत्ते जोडून बघा ... बघा तुमचे घर त्रिकोणा इतकेच मजबूत होते का? एक मात्र आहे फक्त प्रेमाच्या त्रिकोणात ह्याचा पाया डगमगायला लागतो.
त्रिकोण व त्यापासून बनलेला त्रिमितीय पिरॅमिड, ह्याच्या खास आकारामुळे जी उर्जा आतमध्ये तयार होते ती उपासनेसाठी, शांत निद्रेसाठी व सर्व ताण-तणावापासून मुक्त होण्यासाठी अतिशय फायदेशीर असते. ह्या पिरॅमिडच्या मध्यावर ठेवलेले अन्न, इतर ठिकाणी ठेवलेल्या अन्नापेक्षा ३-४ पटीने जास्त दिवस तसेच ताजे राहते. कुजण्याची प्रक्रिया संथ होते. हजारो वर्षापूर्वी बांधलेले पिरॅमिड हेच दर्शवतात की ईजिप्तच्या लोकांना ह्या आकाराच्या वैशिठ्याबद्दल किती ज्ञान होते. ज्यामुळे इतक्या वर्षांनीसुध्दा आपल्याला त्या काळाच्या संस्कृतीचा अभ्यास करता येणे शक्य झाले आहे.
वास्तूतज्ञ गृहसजावटीमध्ये प्रत्यक्ष दिसत नसला तरी आवर्जून एक त्रिकोण पाळतात तो म्हणजे “स्वयंपाकघरातील त्रिकोण”. स्वयंपाकघरात काम करणारी व्यक्ती शेगडी , सिंक व फ्रिज ह्या तीन ठिकाणी सतत फिरत असते. त्यामुळे ह्या तीन जागांना जोडणाऱ्या त्रिकोणाची बेरीज ही कधीही १२-१४फुटापेक्षा जास्त नसावी. स्वयंपाकघर कितीही मोठे असले तरी ह्या तीन गोष्टी एकमेकांच्या जवळ असल्याने कार्यक्षमता कितीतरी पटीने वाढते.
चौकोनी कुटुंब, चौरस आहार, square deal , on the square असे कितीतरी चौकोनासंबंधी वाक्प्रचार आपण रोजच्या बोलीभाषेत वापरतो. कुठल्याही भरीव, नीटनेटक्या ,विश्वासू गोष्टी संबंधी बोलताना बरेच वेळेला चौकोनी आकाराचा संदर्भ घेतला जातो. कारण ह्या आकाराची आपल्या मनातली प्रतिमा एक आदर्श व्यक्तीसारखी आहे. जो कधीच चुकत नाही, स्वतःच्या मार्गापासून ढळत नाही. असा हा दृढ निश्चयी चौकोन /आयत आपल्या आजूबाजूच्या बहुतांश वस्तूंमध्ये दिसतो. एवढेच नाही तर बहुतांश कंपन्यांचे लोगो, कंपनीचे नाव हे मुद्दामून ह्या आकारांमध्ये डिझाईन करतात. उद्देश्य हाच की लोकांना ही कंपनी विश्वासार्ह, प्रामाणिक वाटावी.
चौकोनी आकारात स्थिरता आहे. औपचारीकपणा आहे. बऱ्याच वेळेला त्याला boxy म्हणून हिणवले जाते. काही प्रमाणात ते खरेपण आहे. ईतर वेगवेगळ्या आकर्षक आकारांमध्ये चौकोनी फर्निचर नक्कीच बोजड दिसते. ह्यावर एक उपाय म्हणजे चौकोनाच्या कडा थोड्या गोलाकार कराव्यात. त्याचप्रमाणे चौकोन बनवायची फ्रेम जरा नाजूक घेतल्यास तीच सजावट हलकी व आकर्षक दिसेल आणि कडा लागणारपण नाही. सरळसोट चौकोनी फरशा कोनात फिरवून शंकरपाळ्यांचा आकार दिल्यास खुलून येतात. गृहरचनेत दिवाणखान्यातील बसायची रचना ही नेहमी चौकोनी करावी जेणेकरून एकमेकांचे चेहरे नीट दिसतील व संवाद करताना अडचण येणार नाही. एकमात्र नक्की, जरी चौकोनात नाविन्याचा आभाव असला तरी ह्या no nonsense आकाराची उपयुक्तता व आरामदायीपणा दुसऱ्या आकारात क्वचितच मिळेल. हो, पण त्याला आकर्षक करण्यासाठी तुम्हाला चौकटीबाहेर पडून विचार करावा लागेल.
चेंडू, फुगे, रंगीबेरंगी लिमलेटच्या गोल गोळ्या आणि त्याच्याकडे भान हरपून बघणारे टप्पोरे गोल डोळे!! डोळ्यासमोर लगेच हसरी लहान मुले आली ना? गोल आकार आहेच तसा. सगळ्यांना हवासा वाटणारा. माणसाला बनवायला सर्वात अवघड आकार, पण निसर्गाने काय किमया केली आहे ह्या आकारामध्ये!! ग्रह ताऱ्यांपासून फुलांपर्यंत आणि पावसाच्या थेंबापासून ते शिंपल्यातील मोत्यापर्यंत हा गोल आकार आपल्याला मोहवून टाकतो. गोल हा सुरक्षित कवचासारखा, पूर्णतेकडे नेणारा, सर्वांना एकत्र आणणारा ,अंतरंगात डोकावणारा आकार आहे. इतर वेळी लाजणाऱ्या मुलाला सगळ्यांसोबत गोलात बसवले तर तो आनंदाने सहभागी होताना दिसेल. सर्वांना सामावून घेणाऱ्या, समान पातळीवर आणणाऱ्या ह्या गोलाच्या वैशिठ्यामुळे लहान मुलांचे बरेसचे खेळपण गोलात असतात.
चौकोनी बैठकीच्या रचनेप्रमाणेच गोलाकार रचनापण दिवाणखान्यात संवादासाठी एकदम उत्तम. आजकाल head of the table ही संकल्पना जाणीवपूर्वक मागे सारली जात आहे. पूर्वी आयताकृती टेबलामुळे एकच माणूस भाव खावून जायचा. पण आजकालच्या “हम साथ साथ है” च्या जमान्यात ऑफीसमधील कॉन्फरन्स टेबलांचे आकार आता आयताकृती सोडून गोल, त्रिकोणी किंवा U आकाराचे होऊ लागले आहेत. जेणेकरून बॉसचे दडपण न येता विचारांची उत्तम देवाणघेवाण होते. लोकांना सामावून घेण्याच्या , एकमेकांशी जोडणाऱ्या ह्या गोलाच्या प्रतिमेमुळे बऱ्याचश्या कंपन्यांचे लोगो गोल आकारात दिसतात. जसे बँका, टेलीफोन कंपन्या, ऑलिम्पिक, ट्वीटर, स्टारबक्स ...
जिथे जागा कमी आहे अशा ठिकाणी चौकोनी टेबलापेक्षा गोल टेबल ठेवावे. ते जागा कमी व्यापते व सुटसुटीत दिसते. गृहसजावटीत गोलाकार रचनेमुळे सर्व लक्ष मध्ये केंद्रित होते.
गोल हा कुठे सुरु होतो आणि कुठे संपतो हे आपण सांगू शकत नाही. तो अनंतात पसरलेला वाटतो. असे म्हणतात कि देव असेल तर तो गोलाच्या रूपात आहे. ज्याचा मध्य सगळीकडे आहे , पण ज्याचा परीघ कुठेच दिसत नाही.
बाकी काही असो, प्रसिद्ध कलाकार लेओनार्ड द विन्ची ह्यांच्या म्हणण्या नुसार माणसाच्या शरीराचा आकार ही जगातील सर्वात सुंदर निर्मिती आहे. प्रत्येक भागाची एकमेकांशी असलेली प्रमाणबद्ध रचना हा आपल्या शरीराचा महत्वपूर्ण गाभा. आपल्या शरीरातील प्रत्येक भागाचे एकमेकांशी १:२ किंवा १:३ असलेले गुणोत्तर (ratio) ही अचंबित करणारी गोष्ट आहे. लेओनार्ड द विन्ची ह्यांनी निर्मिलेल्या वास्तुरचनेत हा रेशो प्रमुखाने दिसून येतो. त्यामुळे ह्या वास्तू त्याकाळच्या इतर वास्तूंमध्ये उठून दिसतात. माणसाच्या शरीराचा आकार हा वास्तुशास्त्र आणि गृह्सजावटीचा मूळ पाया आहे. ह्याचा अभ्यास न करता केलेली सजावट फक्त “आरास” ह्या सदरात मोडेल. ती “रचना “ होणार नाही.
असे म्हणतात की गुरु आपल्या जीवनाला आकार देतो. कसा असावा हा आकार? त्रिकोणासारखा स्वतःला व दुसऱ्यांना आधार देणारा, चौकोनासारखा विश्वासू का गोलासारखा सर्वांना सामावून घेणारा? मला वाटते आपल्या जीवनाचा आकार कॅलीडोस्कोपसारखा सगळ्याचे मिश्रण असलेला, रंगीबेरंगी व आनंद देणारा असावा.
वाचने
2989
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला!
सुंदर लेख!
+१
In reply to सुंदर लेख! by अलिप्त
सुंदर लेख. आवडला.
आकाराचा लेख आवडला .छान
वैशाली अर्चिकजी
आकार
अप्रतिम लेख !
लेख आवडला!
आकार
उत्तराबद्दल धन्यवाद
विवेकजी,
In reply to उत्तराबद्दल धन्यवाद by विवेक ठाकूर
आणि एक गोष्ट म्हणजे हा लेख
In reply to विवेकजी, by अभ्या..
अभ्या ,
In reply to विवेकजी, by अभ्या..
आकार
वैशाली
In reply to आकार by वैशाली अर्चिक
वैशाली
In reply to आकार by वैशाली अर्चिक
सुंदर लेख