Skip to main content

शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार.

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 30/03/2016 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार. कोकणपट्ट्यातल्या बायका सुगरणी खऱ्याच.एकाच भाजीचे वेगवेगळे प्रकार करून संसार चालवणे यांना उपजतच जमते. प्रत्येक दारात शेवग्याचे झाड असतेच. आणि नसलेच तरी एका घरी शेंगा काढल्या की त्याचा वानवळा वाडीवरच्या बाकीच्या घरातून चार चार शेंगा दिल्याशिवाय झाडाच्या मालकिणीलाही काही त्या घशाखाली उतरायच्या नाहीत. शेवग्याची शेंग कशातही रमते बटाट्यासारखीच,पण बटाटा कसा?आपली चव बदलून ज्यासोबत आहे त्याची चव घेणारा.”जिसमे मिला दो लागे उस जैसा”आणि शेवग्याची शेंग मात्र कोणतीही भाजी असो,कोलंबी,तिसऱ्या सारखे मासे असोत,त्यांना 'मी प' म्हणत स्वत:ची चव देणार.ज्यांना या शेंगा नुसत्या चोखून न खाता चावून खायला आवडतात,त्यांना ही भजी फारच आवडतात. ही भजी माझ्या एका मावसासासूबाईंनी शिकवली होती.जेव्हा पाहिल्यांदा खाल्ली तेव्हाच मला ती आवडली होती.पण त्यासाठी लागतात त्या जून,जाड शेंगा आणि त्या मिळण्यासाठी ज्यांच्याकडे झाड आहे अशी व्यक्ती तुमच्या ओळखीत असायला हवी.त्यामुळे बऱ्याच वर्षांनी एका सुहृदाच्या घरी गेले असताना हव्या तशा शेंगा मिळाल्या आणि ही भजी केली.त्याची पाककृती मिपाकरांसाठी. साहित्य:- १. दोन/तीन शेवग्याच्या शेंगा. २. एक वाटी डाळीचे पीठ. ३. एक चहाचा चमचा मिरचीपूड. ४. अर्धा चहाचा चमचा हळदपूड. ५. अर्धा चमचा चमचा हिंगपूड. ६. अर्धा चमचा चहाचा साखर. ७. चवीनुसार मीठ. ८. तळण्यासाठी तेल. कृती:- १. शेंगा तासून त्यांचे नेहमीप्रमाणे तुकडे करावेत. . २. पाण्यात थोडेसे मीठ घालून हे तुकडे उकडावे. . ३. पाणी वेळून तुकडे थंड झाल्यावर मधल्या बिया काढून त्या एका तुकड्याचे तीन तुकडे करावे. . ४. अनुक्रमांक दोन ते सात एकत्र करून त्यात पाणी घालून भज्यांचे सरसरीत पीठ तयार करावे. ५. तेल गरम करून त्यात हे तुकडे पिठात बुडवून मंद आचेवर तळावेत. ६. ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत वाढावेत. . दुसरा प्रकार:- हा मात्र माझा शोध आहे. असे जाहीर करून मीच मला सुगरण म्हणवून घेतेय.असो. वरच्या कृतीतील एक ते तीन पर्यंतच्या कृतीनंतर मिरचीपूड,हळदपूड,हिंगपूड,मीठ सरळ तुकड्यांना चोळून घ्यावे,आणि मंद आचेवर शॅलो फ्राय करावेत.मस्त कुरकुरीत होतात.हवे हसेल तर बेसनात किंवा तांदुळाच्या पिठात घोळवून तळल्यासही छान लागतात. मला नुसतेच आवडतात.पसंद अपनी अपनी,खयाल अपना अपना.चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सुरेख लागतात.

वाचने 11495
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

भारी! बाकी ते पाणी वेळून बर्‍याच दिवसांनी पुन्हा ऐकलं.

In reply to by उगा काहितरीच

माशांचे काटे दोन प्रकारे सहन करतात. एकतर चावून खाऊन टाकणे, नाहीतर (तोंडातून) काळजीपूर्वक काढून टाकणे. आता हा उद्योग कोकण्यांना पक्का जमतो. तर शेवग्याच्या शेंगा किस झाड की पत्ती हय?

In reply to by आनंदी गोपाळ

तेच तर नाही ना जमत मला :-( . मासे एक-दोनदा खाऊन बघितले होते. जाम टेस्टी होते. पण ते काटे प्रकार काही झेपला नाही बुवा! कुणी शिकवेल का ? ;-)

In reply to by उगा काहितरीच

बोणलेस खा मग! रावस, सुरमई, पापलेट, जिताडा हे मासे चंगले त्यासाठी. कमी काटे असतात. बाकी त्या चवीपुढे ते मधले काटे फार टोचत नाहीतच कधी.

एक अनवट पा.कृ. दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद....

अरे वा ! पाकृ तर छान च पण तुझी वर्णन शैली म्ह्णजे.. अगदी छान सारवलेल्या अंगणात झाडाखाली बसुन भजी समोर आल्याचा फील आला..

In reply to by स्रुजा

सृजा, मी पहिल्यांदा खाल्ली तेव्हा सफाळ्याला,असंच सारवलेल्या अंगणात शेंगानी बहरलेल्या झाडाखाली बसून ,लहानपणच्या (म्हणजे इतरांना न देता,स्वत: न खाणाऱ्या झाड मालकिणीच्या म्हणजे आईच्या) आठवणीत रमून,खाल्ली आहेत.

छान

क्या बात है ! खमंग वाटतात. एक बाळबोध प्रश्न - खायची शेंगेसारखीच ना दातात धरून? की चावून मग शेंगेचं साल काढून टाकायचं?

In reply to by अत्रन्गि पाउस

उत्तर का मिळेना शेवगा शेंगा प्रेमी (आणि शेवग्याच्या शेंगेसारखे होण्याची स्वप्ने पाहणारा) नाखु पालक

In reply to by नाखु

उगा काहीतरीच,वेल्लाभट,अत्रंगी पाऊस, आणि नाखुजी, यासाठी वापरण्याच्या शेंगा जून असल्यामुळे नेहमीपेक्षा थोड्या जास्त तासून घ्यायच्या आणि मंद आचेवर तळायचे.मस्त कुरकुरीत होतात.सहसा चावून खाता येतात.अगदीच एखादी हटवादी असली तर तिचा नाद सोडून दुसरी फोड अथवा भजी तोंडात टाकायची.हाकानाका.

सुरेख सादरीकरण ! शेवग्याच्या शेंगा चोखूनच खायला आवडतात. त्यामुळे क्र. २ करण्यात येईल.

पाकृ आणि आठवणी आवडल्या. माहेरी व सासरी दोन्हीकडे शेवग्याचे झाड आहे. शेवग्याच्या शेंगाची आमटी, सांबारात शेंगा, पिठले असे अनेक प्रकार केले जातात पण ही शेवग्याची भजी माहित नव्हती. आता भारतवारीत ही भजी नक्की. स्वाती

भारी प्रकार दिसतोय. मी ऐक्ल पण नाहीये कधी. आता नक्की करून पाहीन गं सुरंगीताई