✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कमा आणि कमळू

ह
हकु यांनी
Mon, 03/21/2016 - 16:27  ·  लेख
लेख
अनेक दिवसांपासून बाळगून ठेवलेली उत्सुकता दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ ला रात्री शिगेला पोहोचली होती. सर्वांनीच उराशी जपून ठेवलेलं एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. आम्ही साक्षात अलंग-मदन-कुलंग ट्रेक करायला जात होतो. अंगात उत्साह सळसळत होताच. अनेक दिवस (?) पूर्वीपासून एकमेकांना प्रोत्साहन देत शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न झाला होता आणि त्या तंदुरुस्तीच्या, उत्साहाच्या आणि एकमेकांवर असलेल्या विश्वासाच्या आणि तितक्याच श्रद्धेच्या जोरावर आपण सर्व जण आपलं 'लक्ष्य' गाठणार हा विश्वास प्रत्येकाला वाटत होता. हा विश्वास नि:संशय रास्त होताच. पण या विश्वासात भर घालणारी एक अतिशय महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे आमच्या सोबत असणारी आणि आमचा ट्रेक घडवून आणणारी 'कमा आणि त्याची टीम'. १८ फेब्रुवारी २०१६ च्या रात्री साधारण दीड वाजता आंबेवाडीत पोहोचलो आणि कमा व त्याचा लहान भाऊ कमळू यांनी डोळे चोळत आमचे स्वागत केले. चला! आम्हाला अलंग-मदन-कुलंग फिरवणारी मंडळी वेळेवर हजर आहेत, हे पाहून बरं वाटलं. आमच्याबरोबर असताना पूर्ण तीन दिवसांत कमा आणि मंडळींची वेळ कधीही चुकली नाही. बेलपाड्यात राहणारे कमा, कमळू, अशोक आणि राम हे चौघेही आमच्याही आधी काही तासांपूर्वी या आंबेवाडीत येऊन पोहोचले होते. आमच्या घरापासून आमचा प्रवास साडे नऊ ला सुरु झालेला, पण यांचा प्रवास मात्र दुपारीच सुरु झाला होता. कोकणकड्याच्या पायथ्याशी असलेल्या 'बेलपाडा' या छोट्याश्या गावात या 'खाकर' कुटुंबाचं घर. चौघेही जण दुपारीच दोर, माउंटेनिअरिंग चं साहित्य, वेगवेगळ्या आकाराची अल्युमिनिअम ची पातेली, ४-५ किलो घरच्या शेतात पिकवलेले 'रुपाली' जातीचे तांदूळ, आंथरुण- पांघरूण आणि कमीत कमी कपडे इ. घेऊन निघाले. वाहनाने नाही, तर चालत. मोरोशीच्या दिशेने नाही, तर चक्क साधले घाटाच्या दिशेने! ३ आठवड्यांपूर्वी हरिश्चंद्रगडावरून उतरताना ज्या साधले घाटाने आमचा सर्वांचा अंत पहिला तोच हा घाट. जो घाट उतरताना आमच्या तोंडचे पाणी पळून डोळ्यात आले होते तो घाट हे लोक भर उन्हात चढून जाणार होते. पुढे तिथून पायी पाचनई गाठून जीप ने राजूर ला जाऊन तिथून भाजी घेऊन येणार होते. हे सगळं ऐकताना अवाक व्हायला होत होतं. पण हे सगळं त्यांच्यासाठी अगदीच नॉर्मल. सकाळी उठून पुन्हा यांचे दर्शन झाले. चेहरे टवटवीत. हसरे. तयारी झाली आणि पोहे खाऊन शिवरायांचा जयजयकार करून शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी २०१६ ला निघालो. पुढे एका ठिकाणी एक शेंदुर फासलेला नेहमीचा दगड लागला. श्रद्धाळू कमा ने पिशवीतून नारळ काढला आणि त्या दगडासमोर फोडण्यासाठी कार्तिक कडे दिला. आपला ट्रेक सुरक्षितरित्या पार पडावा म्हणून थोडीशी उघडपणे बोलून आणि बरीचशी हात जोडून मनातल्या मनात प्रार्थना केली आणि पुन्हा किल्ल्याच्या वाटेला लागला. राम पहिल्यापासूनच ही मंडळी चालण्यात आम्हाला केव्हाच मागे टाकून जात होती. आमच्या पायात अक्शन ट्रेकिंग किंवा केशुआ चे बूट तर यांच्या पायात साध्या चपला. आमच्याकडे मोठमोठाल्या sacks तर यांच्याकडे तर काही चक्क हातात धरायच्या कापडी पिशव्या. आमच्याकडे टोप्या, गोगल्स तर त्यांच्याकडे अर्थातच यातलं विशेष काही नाही. कमीत कमी आकाराच्या पिशव्यांमध्ये जास्तीत जास्त आणि वजनदार सामान न्यायची त्यांची पद्धत अनुकरणीय होती. दोघे जण स्वयंपाकाचं बघतील तर दोघे जण आम्हाला मदन गड फिरवून आणतील अशी त्यांची कामाची वाटणी झाली होती. मदन चा अंदाजे ३० फुटांचा rock patch. दोरीच्या आधाराशिवाय चढून जाणं म्हणजे धैर्याचंच काम. कमळू कमरेला दोर बांधून सज्ज झाला. हा दोर अर्थातच त्याला वर घेऊन जायचा होता. तो दुसरीकडे कुठेही बांधलेला नव्हता. (छायाचित्रात बघू शकता.)कमळू हा आता चढतो कसा? हेच आमच्यासाठी कुतूहल होतं. साधारण साडेपाच फुटाच्या, पस्तीशीच्या, सडपातळ बांध्याच्या पण कमालीच्या काटक आणि लवचिक शरीराच्या कमळूने चढाईसाठी प्रथम डावा पाय उचलला आणि दगडाच्या पहिल्या खोबणीत रुतवला. वरच्या कपारींमध्ये बोटे रुतवून आपले शरीर लीलया वर ओढले आणि पुढच्या खोबणीत उजवा पाय रुतवला. कमळू दगडाचा, खोबणींचा, कपारींचा अंदाज घेत घेत वर चालला होता. एक एक आधार शोधत शरीर वर खेचत होता. त्याच्या चढाईत एक प्रकारची सहजता होती. कुठलेही कष्ट दिसून येत नव्हते. तांत्रिक दृष्ट्या अगदी योग्य रीतीने चढाई चालू होती. जराशी सुद्धा चूक त्याला खाली खोल दरीत घेऊन जाणार होती. पण या गोष्टीची भीती तर सोडाच पण साधा ताण ही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. अगदी सराईतपणे आणि मिनिट पूर्ण व्हायच्या आतच कमळू वर जाऊन पोहोचला सुद्धा. आम्ही टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं आणि त्याने त्याचा वरून अगदी हसतमुखाने हात हलवून स्वीकार सुद्धा केला. वर नेलेला दोर त्याने तिथल्या हुकात अडकवून खाली सोडला आणि त्याच्या सहाय्याने हार्नेस वगैरे बांधून कमा ने आम्हाला आळीपाळीने वर सोडले. मदनगड फिरून आल्यावर तसेच rappeling करवत पद्धतशीरपणे खालीही उतरवले. पुढे त्याच दिवशी अलंग सर करायचा होता. इथेही कमळू कुठल्याही सहाय्याशिवाय अलंग चा साधारण ५० फुटांचा rock patch चढून गेला. त्याची ही चढाई बघणं मात्र आमच्या नशिबात नव्हतं. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत कमळू वर पोहोचला सुद्धा होता. आळीपाळीने आम्ही सर्व जण वर चढून गेलो. दुसऱ्या दिवशी तिथूनच rappelling ची मजा घेत उतरलो. कुलंगगडावर गेलो आणि तिथला मुक्काम पूर्ण करून तिसऱ्या दिवशी पुन्हा आंबेवाडीत उतरलो. कमळू या ट्रेक पूर्वीही कमा आणि कमळू चा थोडासा सहवास आम्हाला लाभला होता. आम्ही सर्व प्रथम जेव्हा नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड केलेला तेव्हा कमा आमचा वाटाड्या म्हणून आला होता. त्या नंतर पुन्हा २ महिन्यांनी नळीच्याच वाटेने हरिश्चंद्रगड करायला गेलो तेव्हा कमळू आम्हाला मोरोशीला घ्यायला आला होता. दोन्ही वेळी रात्रीचा मुक्काम यांच्याच घरी केलेला. पण त्या दोन्ही वेळी झालेली ओळख जेमतेम तोंडओळख म्हणावी इतकीच होती. अगदी त्यांचा चेहरा ही नंतर आठवू नये अशी. या ट्रेक च्या सुरुवातीला या मंडळींबद्दल 'माणशी रोख रक्कम देऊन ट्रेक ची व्यवस्था करण्यासाठी बोलावलेली माणसे' इतकीच भावना माझ्या मनात होती हे मी अगदी प्रामाणिकपणे कबुल करतो. पण ट्रेक जसजसा पुढे पुढे सरकत गेला तसतशी ही भावना बदलत गेली. कमा आणि कमळू च्या वागणुकीमधलं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कामात एक प्रकारचं अगत्य आहे. ज्या अगत्याने आम्हाला २ महिन्यांपूर्वी साधले घाट उतरून आल्यावर संध्याकाळी ६ वाजता 'दुपारचे जेवण' मिळाले होते त्याच अगत्याने आम्हाला या ट्रेक मध्येही जेवण मिळत होते. आणि तेवढेच चविष्ट सुद्धा. आम्हाला rock patches वरून चढवताना, उतरवताना, हार्नेस बांधताना-सोडवताना कुठल्याही प्रकारची कृत्रिमता त्यांच्या वागण्यात दिसून येत नव्हती. कामे भरभर उरकवण्याची पद्धत नव्हती. सर्व कामे पद्धतशीरपणे आणि हसतमुखाने होत होती. जेवणाची वेळ जर कधी लांबलीच असेल तर ती आमच्यामुळे. चुकूनही त्यांच्यामुळे नाही. जसजसा वेळ जात होता तसतसा आम्हाला त्यांचा आणि त्यांना आमचा लळा लागत होता. आमच्या धिंगाण्याने त्यांचे चांगलेच मनोरंजन होत होते. पहिल्याच दिवसात कमा आणि कमळू आमच्यात रमून गेले होते, पण कमाचा मुलगा अशोक आणि पुतण्या राम ही १७-१८ वर्षांनी मुलं मात्र अजूनही शांत शांत च होती. त्यांच्या त्यांच्यातच बोलायचे, कुजबुजायचे आणि हसायचे. आम्ही केलेल्या कमेंट्स, जोक्स यांवर त्यांना हसायला जरून यायचे पण आमच्यासमोर हसायला मात्र बुजायचे. मागाहून आमचीच वाक्य बोलून आमच्यावर हसायचे. पण कुलंग ला पोहोचल्यानंतर मात्र त्यांची ही बुजरी दरी सुद्धा दूर झाली. आमच्या जोक्स ना खळखळून हसायला लागले. आमच्या कमेंट्स वर स्वतः सुद्धा हसून कमेंट्स करायला लागले. कुलंग उतरेपर्यंत आमच्यात चौघेही जण मिसळून गेले होते. कमा हा या कुटुंबातला मोठा आणि कर्ता पुरुष. अशोक हा त्याचा १७-१८ वर्षांचा मुलगा. म्हणजे हा कमा नक्कीच चाळीशीचा. पण त्याच्याकडे बघून अर्थातच हे जाणवत नाही. सडपातळ बांधा, रापलेला वर्ण, जेमतेम साडेपाच फुटापर्यंत पोहोचेल अशी उंची. पण मेहनतीची सवय. बेलपाडा हे साक्षात कोकणकड्याच्या कुशीत वसलेलं गाव ह्याला लाभलं. हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग साठी नित्य नेमाने येणाऱ्या ट्रेकर्सशी कमाने ओळख वाढवली आणि climbing-rappeling चं तंत्र शिकून घेतलं. आता शेतीला जोडून शहरी गृप्स ना ट्रेकिंग करवून आणणे हा जोड-धंदा म्हणून त्याने चालू केला आहे. जर आपण असं म्हंटलं की नशिबाने ह्याला बेलापाड्यासारखं मोक्याचं गाव मिळालं, पण त्याच गाव्यातल्या किती लोकांनी या गोष्टीचा कमा सारखा फायदा करून घेतला? हा प्रश्न येतोच. त्यामुळे ह्या व्यवसायात टिकण्यासाठी त्याने भरपूर मेहनत केली यात काही संशय नाही. कमळू ही आपल्या भावाच्या बरोबरीने ह्यात उतरला. भरपूर सराव झाला असेल म्हणून ही कदाचित, पण अलंग आणि मदन च्या rock patches वर अगदी खडे चढ कमळू कुठल्याही आधाराशिवाय अगदी लीलया चढतो. चढता-चढता एखादं बोट सुद्धा निसटणं प्रचंड धोक्याचं. खाली पडून परिणामी कमीत कमी हात पाय तर नक्कीच मोडणार. पण आता त्याला या पडण्याची भीती वाटत नाही. आपण जसे निर्विकारपणे आपल्या इमारतीचे जिने चढतो-उतरतो तसे तो हे डोंगर चढतो-उतरतो. कुठल्याही कामात कमळू अगदी पुढे राहून उडी घेतो. त्याच्या वागण्या-बोलण्यातून जितका आत्मविश्वास दिसून येतो तितकीच नम्रता, भोळेपणा आणि थोडीशी मिश्कीलता ही दिसून येते. चिरक्या आणि बारीक आवाजातून त्याची ही मिश्कीलता कायम डोकावत राहते. चौघे अशोक आणि राम ही तरणी ताठी, कॉलेज शिकणारी मुलं. जन्मच मुळात डोंगरातला. त्यामुळे अर्थातच त्यांना डोंगर-दऱ्या यांबद्दल विशेष कुतूहल शिल्लक असलेलं फार दिसलं नाही. कदाचित त्यांच्या बुजऱ्या स्वभावामुळे ही असेल. या डोंगरांच्याही पलीकडचं जग पाहण्याची आणि त्या जगात वावरण्याची प्रत्येक तरुणाची असते तशी मनीषा ह्यांच्याही मनात असणारच. मध्येच चालता चालता एका ठिकाणी थांबून, बाप पुढे गेल्याचा अंदाज घेऊन अशोक ने खिशातला मोबाईल काढला आणि नंबर डायल करून कानाला लावला, आणि हळूच म्हणाला, "काय गं, मी लांब गेलो तर माझी आठवण येते की न्हाय तुला ?" आम्हा शहरात वावरणाऱ्या मुलांना मुक्त पाखराप्रमाणे फिरण्यासाठी या जंगलांची आणि डोंगरांची ओढ लागली आहे आणि सदैव जंगलात आणि खडका-दगडात फिरणाऱ्या या पोराला मात्र शहरातल्या वा गावातल्या एका पाखराची ओढ लागली आहे! चौघे आज कमा आणि कमळू कडे बघून ते लौकिक दृष्ट्या किती शिकले असतील याबाबत शंकाच आहे, पण ते अनुभवाच्या जोरावर मात्र आपलं घर आणि कुटुंब चालवण्यात सक्षम आहेत हे नक्की. आज ते स्वतः या क्षेत्रात आल्याबद्दल समाधानी सुद्धा आहेत पण बापाच्या वाट्याला येणारी काळजी मात्र त्यांनाही चुकत नाही. अलंग चढताना कमा एकेकाची तयारी करून त्याला rock patch वर पाठवत होता आणि कमळू वरती बसून बिले कंट्रोल करत होता. अशोक आणि राम बाजूला बसले होते. मी कमाशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो. सहज मी त्याला विचारलं, "आता तुम्ही नसता तेव्हा ही दोघं जातात का गृप्स सोबत?" त्यावर कमा कसनुसं हसून म्हणाला, "नाही नाही. त्यांना नाही हे काम देत !" इथे इतर वेळी बिनधास्तपणे खडकांना भिडणारा कमा, त्याच्या मुलांसाठी मात्र काळजीत पडलेला मला दिसला. जे काम तो आज करतोय तेच काम त्याच्या मुलांना करावा लागू नये अशी त्याची इच्छा मला जाणवली. 'मुलांनी कॉलेज ला जावं आणि काहीतरी 'सुरक्षित' काम करावं; हे असं खडकांवर चढणं- उतरणं काही खरं नाही!' असा तर विचार त्याच्या मनात नसेल? चौघे तीन दिवस आम्ही या मंडळींबरोबर काढले. कमा आणि कमळू तर अतिशय जीव लावून गेले. राम आणि अशोक आमच्यात मिसळायला दोन दिवस लागले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा लांब व्हायची वेळ आली. खाली उतरल्यावर पुन्हा सर्वांच्या गळाभेटी झाल्या आणि निरोप घेतले गेले. घरी आल्यावर दोन दिवसांनी आमचा कप्तान कार्तिक ला कमा चा फोन आला. म्हणाला "तुमची सर्वांची खूप आठवण येते!" काळीज अक्षरश: गलबलून गेलं. या मंडळींमधलं आणि आमचं नातं आता आम्ही दिलेल्या रोख रकमेच्या फार फार पलीकडे गेलं होतं!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
8419 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

हे

नाखु
Mon, 03/21/2016 - 16:57 नवीन
सह्याद्री पुत्र.. गोनीदांनाही अशीच माणसं (अस्सल आणि निर्मळ ) भेटली होती
  • Log in or register to post comments

वा हकु!!

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 03/21/2016 - 16:59 नवीन
मिपावर स्वागत!! मस्त लिहिलयं! येउ द्या अजुन ट्रेक्स बद्दल.
  • Log in or register to post comments

नक्कीच

हकु
Tue, 03/22/2016 - 11:24 नवीन
हळूहळू आता सुरुवात होईल असे वाटत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

छान लिहील आहे

जगप्रवासी
Mon, 03/21/2016 - 17:57 नवीन
छान लिहील आहे, ट्रेक बद्दल थोडस लिहिलं असत तर अजून मजा आली असती वाचायला
  • Log in or register to post comments

नक्कीच लिहीन

हकु
Tue, 03/22/2016 - 11:17 नवीन
ट्रेक हा तसा बराच मोठा आणि लिहिण्यासारखा ही बरंच काही आहे त्यात. या लेखात आमच्या संपूर्ण ट्रेक च्या केवळ एका पैलू वर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. अजून बरंच काही लिहिण्याचं मनात आहे. पाठवीन लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

सलाम

सह्यमित्र
Mon, 03/21/2016 - 18:08 नवीन
कमळू बरोबर नळीची वाट आणि साधले घाट असा ट्रेक साधारण २ वर्षापूर्वी केला होत. तेवा त्याच्या घरचे अगत्य अनुभवले होते. फारच साधा शांत असा हा कमळू आहे. पण कडे चढून जाण्याचे त्याचे कौशल्य वादातीत आहे. ह्या वर्षी तुम्ही केला त्याच्या बरोबर २ आठवडे आधी AMK चा ट्रेक आम्ही कमळू ला बरोबर घेऊन केला. तिथे अलंग च्या ५० फूटी rockpatch वर त्याचे कुठलाही आधार न घेत कडा चढून जायचे कसब पाहायला मिळाले. खरोखर सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळत मोठी झालेली त्याचीच लेकरे! त्यांना त्याचे मुळीच भय वाटत नाहि. 'घाबरायचं काय पडल तवा पडल' हे ह्याचे उत्तर! त्यांच्या कौशल्य ला खरच सलाम. ह्या कौशल्या बरोबरच त्यांच्या कडे असलेले अगत्य आणि माणुसकी हे तितकेच भावणारे. वास्तविक असे ग्रुप ला घेऊन जाणे हा त्यांचा व्यवसाय. उपजत असलेले कौशल्य आणि पुण्या मुंबईच्या veteran गिर्यारोहाकांकडून मिळालेले काही तांत्रिक ज्ञान ह्याचा व्यावसायिक उपयोग करून हे लोक AMK भैरवगड, नळीची वाट अशा अवघड ठिकाणी ग्रुप्स ना घेऊन जात असतात. पण हा व्यवसाय करत असतानाही त्यांचे माणुसकी, अगत्य हे कायम जाणवते. प्रत्येक सदस्याच्या जीवाची सर्व काळजी हे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालुन घेत असतात. व्यवसाय असला तरी त्यात लुबाडणूक अथवा ओरबाडून घेण्याची वृत्ती मला कधीच दिसली नाहि. एक प्रसंग उदाहरणा दाखल: कमळू आमच्या बरोबर AMK साठी आलेला होता. पहिले २ दिवस अलंग- मदन करून झाल्यावर तिसऱ्या दिवशी आम्ही कुलंग कडे निघालो. लांबचा फेरा टाळण्या साठी श्री. अरुण सावंत सर ह्यांनी शोधलेल्या shortcut ने जात होतो. आम्हाला फोटोग्राफी करायची असल्याने तिसऱ्या दिवशी लगेच खाली न उतरता कुलंग वर मुक्काम करायचा होता. पण त्यामुळे कमळू ला त्यामुळे घरी पोहचायला अजून १ दिवस उशीर झाला असता. तेव्हा आम्ही त्याला shortcut जिथे कुलंग च्या वाटेला मिळतो तिथपर्यंतच बरोबर ये आणि तिथून तू उतरून घरी जा, आम्ही पुढे आरामात जाऊ शकतो, वाट चुकण्या सारखी नाहीये असे सांगितले. ह्याने त्याची सोय झाली असली तरी मनातून त्याला चुकीचे वाटत होते. तुम्हाला असा मधेच टाकून कसा जाऊ असे सारखे म्हणत होता! दुसऱ्या दिवशी परतीच्या वाटेवर असताना आमचे बोलणे चालले होते कि कमळू घरी पोहचला असेल का? फोन करून बघू असे. हे चालू असतांनाच त्याचाच फोन आला 'सर पोहोचलात का तुम्ही घरी? बराच वेळ तुमचा फोन लागत नव्हता म्हणून काळजी वाटत होती. आम्ही सारे अवाकच झालो. वास्तविक त्याने त्याचे काम केले होते. तो स्वतहच तिथून एकटा गड उतरून डोंगर तुडवत,ST ची वात बघत कसातरी घरी पोहचला होता . पण मनातील सरळ साध्या माणुसकीचे दर्शनच ह्या निमित्ताने आम्हाला झाले. त्यांचे कौशल्य आणि साधेपणा दोन्हीला सलाम !
  • Log in or register to post comments

खरंय

हकु
Tue, 03/22/2016 - 11:21 नवीन
मी लेखात म्हंटल्याप्रमाणे आम्हालाही दुसऱ्या दिवशी असाच अनुभव आला. आमच्या कप्तान ला 'तुमची आठवण आली' सांगण्यासाठी कमा चा फोन आला. ऐकल्यावर गळा दाटून आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सह्यमित्र

अनुभव वाचायला आवडतील.

हकु
Tue, 03/22/2016 - 11:23 नवीन
तुमचे अश्या ट्रेक्स चे अनुभव अजून वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

नक्की

सह्यमित्र
Tue, 03/22/2016 - 13:26 नवीन
खाली काही जुन्या लेखान्च्या लिन्क्स देत आहे http://www.misalpav.com/node/30246 http://www.misalpav.com/node/29577 http://www.misalpav.com/node/29602 http://www.misalpav.com/node/27761 http://www.misalpav.com/node/27809
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

धन्यवाद

हकु
Tue, 03/22/2016 - 15:53 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सह्यमित्र

सह्यपुत्रांना सलाम!

एस
Mon, 03/21/2016 - 22:42 नवीन
सह्यपुत्रांना सलाम!
  • Log in or register to post comments

लेख खुप आवडला.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/21/2016 - 23:07 नवीन
लेख खुप आवडला.
  • Log in or register to post comments

+1

रातराणी
Tue, 03/22/2016 - 01:59 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

छान लिहिलं आहे, पूर्ण

बेकार तरुण
Tue, 03/22/2016 - 11:45 नवीन
छान लिहिलं आहे, पूर्ण ट्रेकबद्दलपण लेख वाचायला आवडेल !!!
  • Log in or register to post comments

हकु साहेब मिपावर स्वागत आणि

प्रमोद देर्देकर
Tue, 03/22/2016 - 13:28 नवीन
हकु साहेब मिपावर स्वागत आणि त्या सह्याद्रि पुत्रांना सलाम. हा ट्रेक वार्षिक परिक्षा संपल्यावर म्हणजे एप्रिल / मे मध्ये लहान मुलांना (११/ १२ वर्षे)घेवुन केला तर चालेल काय ? कारण आता उन्हाचा पारा वर चढु लागलाय ?
  • Log in or register to post comments

उन्हाळ्यात हा तिन्ही

हकु
Tue, 03/22/2016 - 14:29 नवीन
उन्हाळ्यात हा तिन्ही किल्ल्यांचा संपूर्ण ट्रेक करणं थोडं त्रासाचं होईल असा मला वाटतं. उन्हाचा त्रास होऊ शकतो आणि कदाचित अलंग आणि मदन वर पाण्याची टंचाई सुद्धा जाणवू शकेल. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा वेळ या ट्रेक साठी उत्तम. फारफार तर मार्च. नुसता कुलंग गड आत्ता ठरवलात तर हरकत नाही. तिथे पाणी मुबलक आहे. पुन्हा इथे दोर लावून चढावे लागत नाही. इतर किल्ल्यांसारखे पायऱ्या चढून जायचे आहे. तुलनेने सोपा किल्ला आहे. उन्हाळ्यात एक रात्र घालवायला ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

लेख फारच सुंदर.

बोका-ए-आझम
Tue, 03/22/2016 - 15:04 नवीन
व्यक्तिचित्रण आणि बारकावे अप्रतिम!पुढील लेखनाची वाट पाहातोय!
  • Log in or register to post comments

मस्त.

अभ्या..
Tue, 03/22/2016 - 16:06 नवीन
मस्त. आमची ८०-८० फूटाची होर्डिंग बसवणारी, पाच पाच मजल्यावर बाहेरुन चढणारी अन दोराने लटकत काम करणारी सागरची टोळी आठवली. कंबरेला टूल्स लावून, दातात अ‍ॅडेसिव्हच्या बाटल्या पकडून फक्त पायाने विळखे घालत एवढी उंचावरची होर्डिंग बसवतात.
  • Log in or register to post comments

लेख आणी प्रतिक्रिया

सिरुसेरि
Tue, 03/22/2016 - 17:34 नवीन
लेख आणी प्रतिक्रिया - सर्वच वाचनीय आणी माहितीपुर्ण .
  • Log in or register to post comments

कमळू चे काही विडीओज

हकु
Sun, 03/27/2016 - 10:40 नवीन
कमळू चे काही विडीओज https://www.youtube.com/watch?v=oWywWkRfSiU https://www.youtube.com/watch?v=0ZT_6qDJg-Y
  • Log in or register to post comments

चित्रदर्शी लेखन

प्रियाजी
Mon, 03/28/2016 - 15:57 नवीन
लेख, फोटो अन वर्णन खूप मस्त.हे असे लेख वाचून आयुष्यात हे असे अनुभव घेता न आल्याने काय काय काय निसटलं त्याची जास्त जाणीव होते. असो. आता असे अनुभव वाचून कल्पना करणे हे तर नक्कीच हातात आहे.
  • Log in or register to post comments

छान ओळख करुन दिली आहे

अजया
Mon, 03/28/2016 - 18:03 नवीन
छान ओळख करुन दिली आहे सह्यपुत्रांची.
  • Log in or register to post comments

चौघांचीही ओळख आवडली. लेखन व

रेवती
Tue, 03/29/2016 - 06:06 नवीन
चौघांचीही ओळख आवडली. लेखन व फोटू आवडले.
  • Log in or register to post comments

जबरी

स्वच्छंदी_मनोज
Tue, 03/29/2016 - 12:34 नवीन
मस्तच. हे खरे गिरिपुत्र. कमळूचा परीचय तसा होताच पण आता त्याची जास्त चांगली ओळख तुम्ही सर्वांना करून दिलीय. मिपाच्या ट्रेकींग विश्वात आपले स्वागत. अजून भरपूर ट्रेक करा आणी आम्हाला अश्याच ट्रेक वृत्तांताचा आनंद द्या.
  • Log in or register to post comments

मस्तच. काही मोबाईल नंबर असेल

अभिजीत अवलिया
Sat, 04/02/2016 - 22:37 नवीन
मस्तच. काही मोबाईल नंबर असेल कमा / कमळू ह्यांचा तर द्या. हा ट्रेक करायचा झाल्यास त्यांच्या बरोबर करता येईल.
  • Log in or register to post comments

नक्कीच!

हकु
Sun, 05/15/2016 - 23:14 नवीन
नक्कीच! कमा - + ९१ ९२०९६१५१३६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा