कमा आणि कमळू
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अनेक दिवसांपासून बाळगून ठेवलेली उत्सुकता दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ ला रात्री शिगेला पोहोचली होती. सर्वांनीच उराशी जपून ठेवलेलं एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. आम्ही साक्षात अलंग-मदन-कुलंग ट्रेक करायला जात होतो. अंगात उत्साह सळसळत होताच. अनेक दिवस (?) पूर्वीपासून एकमेकांना प्रोत्साहन देत शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न झाला होता आणि त्या तंदुरुस्तीच्या, उत्साहाच्या आणि एकमेकांवर असलेल्या विश्वासाच्या आणि तितक्याच श्रद्धेच्या जोरावर आपण सर्व जण आपलं 'लक्ष्य' गाठणार हा विश्वास प्रत्येकाला वाटत होता. हा विश्वास नि:संशय रास्त होताच. पण या विश्वासात भर घालणारी एक अतिशय महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे आमच्या सोबत असणारी आणि आमचा ट्रेक घडवून आणणारी 'कमा आणि त्याची टीम'.
१८ फेब्रुवारी २०१६ च्या रात्री साधारण दीड वाजता आंबेवाडीत पोहोचलो आणि कमा व त्याचा लहान भाऊ कमळू यांनी डोळे चोळत आमचे स्वागत केले. चला! आम्हाला अलंग-मदन-कुलंग फिरवणारी मंडळी वेळेवर हजर आहेत, हे पाहून बरं वाटलं. आमच्याबरोबर असताना पूर्ण तीन दिवसांत कमा आणि मंडळींची वेळ कधीही चुकली नाही. बेलपाड्यात राहणारे कमा, कमळू, अशोक आणि राम हे चौघेही आमच्याही आधी काही तासांपूर्वी या आंबेवाडीत येऊन पोहोचले होते. आमच्या घरापासून आमचा प्रवास साडे नऊ ला सुरु झालेला, पण यांचा प्रवास मात्र दुपारीच सुरु झाला होता. कोकणकड्याच्या पायथ्याशी असलेल्या 'बेलपाडा' या छोट्याश्या गावात या 'खाकर' कुटुंबाचं घर. चौघेही जण दुपारीच दोर, माउंटेनिअरिंग चं साहित्य, वेगवेगळ्या आकाराची अल्युमिनिअम ची पातेली, ४-५ किलो घरच्या शेतात पिकवलेले 'रुपाली' जातीचे तांदूळ, आंथरुण- पांघरूण आणि कमीत कमी कपडे इ. घेऊन निघाले. वाहनाने नाही, तर चालत. मोरोशीच्या दिशेने नाही, तर चक्क साधले घाटाच्या दिशेने! ३ आठवड्यांपूर्वी हरिश्चंद्रगडावरून उतरताना ज्या साधले घाटाने आमचा सर्वांचा अंत पहिला तोच हा घाट. जो घाट उतरताना आमच्या तोंडचे पाणी पळून डोळ्यात आले होते तो घाट हे लोक भर उन्हात चढून जाणार होते. पुढे तिथून पायी पाचनई गाठून जीप ने राजूर ला जाऊन तिथून भाजी घेऊन येणार होते. हे सगळं ऐकताना अवाक व्हायला होत होतं. पण हे सगळं त्यांच्यासाठी अगदीच नॉर्मल. सकाळी उठून पुन्हा यांचे दर्शन झाले. चेहरे टवटवीत. हसरे. तयारी झाली आणि पोहे खाऊन शिवरायांचा जयजयकार करून शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी २०१६ ला निघालो. पुढे एका ठिकाणी एक शेंदुर फासलेला नेहमीचा दगड लागला. श्रद्धाळू कमा ने पिशवीतून नारळ काढला आणि त्या दगडासमोर फोडण्यासाठी कार्तिक कडे दिला. आपला ट्रेक सुरक्षितरित्या पार पडावा म्हणून थोडीशी उघडपणे बोलून आणि बरीचशी हात जोडून मनातल्या मनात प्रार्थना केली आणि पुन्हा किल्ल्याच्या वाटेला लागला.
पहिल्यापासूनच ही मंडळी चालण्यात आम्हाला केव्हाच मागे टाकून जात होती. आमच्या पायात अक्शन ट्रेकिंग किंवा केशुआ चे बूट तर यांच्या पायात साध्या चपला. आमच्याकडे मोठमोठाल्या sacks तर यांच्याकडे तर काही चक्क हातात धरायच्या कापडी पिशव्या. आमच्याकडे टोप्या, गोगल्स तर त्यांच्याकडे अर्थातच यातलं विशेष काही नाही. कमीत कमी आकाराच्या पिशव्यांमध्ये जास्तीत जास्त आणि वजनदार सामान न्यायची त्यांची पद्धत अनुकरणीय होती. दोघे जण स्वयंपाकाचं बघतील तर दोघे जण आम्हाला मदन गड फिरवून आणतील अशी त्यांची कामाची वाटणी झाली होती. मदन चा अंदाजे ३० फुटांचा rock patch. दोरीच्या आधाराशिवाय चढून जाणं म्हणजे धैर्याचंच काम. कमळू कमरेला दोर बांधून सज्ज झाला. हा दोर अर्थातच त्याला वर घेऊन जायचा होता. तो दुसरीकडे कुठेही बांधलेला नव्हता. (छायाचित्रात बघू शकता.)
हा आता चढतो कसा? हेच आमच्यासाठी कुतूहल होतं. साधारण साडेपाच फुटाच्या, पस्तीशीच्या, सडपातळ बांध्याच्या पण कमालीच्या काटक आणि लवचिक शरीराच्या कमळूने चढाईसाठी प्रथम डावा पाय उचलला आणि दगडाच्या पहिल्या खोबणीत रुतवला. वरच्या कपारींमध्ये बोटे रुतवून आपले शरीर लीलया वर ओढले आणि पुढच्या खोबणीत उजवा पाय रुतवला. कमळू दगडाचा, खोबणींचा, कपारींचा अंदाज घेत घेत वर चालला होता. एक एक आधार शोधत शरीर वर खेचत होता. त्याच्या चढाईत एक प्रकारची सहजता होती. कुठलेही कष्ट दिसून येत नव्हते. तांत्रिक दृष्ट्या अगदी योग्य रीतीने चढाई चालू होती. जराशी सुद्धा चूक त्याला खाली खोल दरीत घेऊन जाणार होती. पण या गोष्टीची भीती तर सोडाच पण साधा ताण ही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. अगदी सराईतपणे आणि मिनिट पूर्ण व्हायच्या आतच कमळू वर जाऊन पोहोचला सुद्धा. आम्ही टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं आणि त्याने त्याचा वरून अगदी हसतमुखाने हात हलवून स्वीकार सुद्धा केला. वर नेलेला दोर त्याने तिथल्या हुकात अडकवून खाली सोडला आणि त्याच्या सहाय्याने हार्नेस वगैरे बांधून कमा ने आम्हाला आळीपाळीने वर सोडले. मदनगड फिरून आल्यावर तसेच rappeling करवत पद्धतशीरपणे खालीही उतरवले. पुढे त्याच दिवशी अलंग सर करायचा होता. इथेही कमळू कुठल्याही सहाय्याशिवाय अलंग चा साधारण ५० फुटांचा rock patch चढून गेला. त्याची ही चढाई बघणं मात्र आमच्या नशिबात नव्हतं. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत कमळू वर पोहोचला सुद्धा होता. आळीपाळीने आम्ही सर्व जण वर चढून गेलो. दुसऱ्या दिवशी तिथूनच rappelling ची मजा घेत उतरलो. कुलंगगडावर गेलो आणि तिथला मुक्काम पूर्ण करून तिसऱ्या दिवशी पुन्हा आंबेवाडीत उतरलो.
या ट्रेक पूर्वीही कमा आणि कमळू चा थोडासा सहवास आम्हाला लाभला होता. आम्ही सर्व प्रथम जेव्हा नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड केलेला तेव्हा कमा आमचा वाटाड्या म्हणून आला होता. त्या नंतर पुन्हा २ महिन्यांनी नळीच्याच वाटेने हरिश्चंद्रगड करायला गेलो तेव्हा कमळू आम्हाला मोरोशीला घ्यायला आला होता. दोन्ही वेळी रात्रीचा मुक्काम यांच्याच घरी केलेला. पण त्या दोन्ही वेळी झालेली ओळख जेमतेम तोंडओळख म्हणावी इतकीच होती. अगदी त्यांचा चेहरा ही नंतर आठवू नये अशी. या ट्रेक च्या सुरुवातीला या मंडळींबद्दल 'माणशी रोख रक्कम देऊन ट्रेक ची व्यवस्था करण्यासाठी बोलावलेली माणसे' इतकीच भावना माझ्या मनात होती हे मी अगदी प्रामाणिकपणे कबुल करतो. पण ट्रेक जसजसा पुढे पुढे सरकत गेला तसतशी ही भावना बदलत गेली. कमा आणि कमळू च्या वागणुकीमधलं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कामात एक प्रकारचं अगत्य आहे. ज्या अगत्याने आम्हाला २ महिन्यांपूर्वी साधले घाट उतरून आल्यावर संध्याकाळी ६ वाजता 'दुपारचे जेवण' मिळाले होते त्याच अगत्याने आम्हाला या ट्रेक मध्येही जेवण मिळत होते. आणि तेवढेच चविष्ट सुद्धा. आम्हाला rock patches वरून चढवताना, उतरवताना, हार्नेस बांधताना-सोडवताना कुठल्याही प्रकारची कृत्रिमता त्यांच्या वागण्यात दिसून येत नव्हती. कामे भरभर उरकवण्याची पद्धत नव्हती. सर्व कामे पद्धतशीरपणे आणि हसतमुखाने होत होती. जेवणाची वेळ जर कधी लांबलीच असेल तर ती आमच्यामुळे. चुकूनही त्यांच्यामुळे नाही. जसजसा वेळ जात होता तसतसा आम्हाला त्यांचा आणि त्यांना आमचा लळा लागत होता. आमच्या धिंगाण्याने त्यांचे चांगलेच मनोरंजन होत होते. पहिल्याच दिवसात कमा आणि कमळू आमच्यात रमून गेले होते, पण कमाचा मुलगा अशोक आणि पुतण्या राम ही १७-१८ वर्षांनी मुलं मात्र अजूनही शांत शांत च होती. त्यांच्या त्यांच्यातच बोलायचे, कुजबुजायचे आणि हसायचे. आम्ही केलेल्या कमेंट्स, जोक्स यांवर त्यांना हसायला जरून यायचे पण आमच्यासमोर हसायला मात्र बुजायचे. मागाहून आमचीच वाक्य बोलून आमच्यावर हसायचे. पण कुलंग ला पोहोचल्यानंतर मात्र त्यांची ही बुजरी दरी सुद्धा दूर झाली. आमच्या जोक्स ना खळखळून हसायला लागले. आमच्या कमेंट्स वर स्वतः सुद्धा हसून कमेंट्स करायला लागले. कुलंग उतरेपर्यंत आमच्यात चौघेही जण मिसळून गेले होते.
कमा हा या कुटुंबातला मोठा आणि कर्ता पुरुष. अशोक हा त्याचा १७-१८ वर्षांचा मुलगा. म्हणजे हा कमा नक्कीच चाळीशीचा. पण त्याच्याकडे बघून अर्थातच हे जाणवत नाही. सडपातळ बांधा, रापलेला वर्ण, जेमतेम साडेपाच फुटापर्यंत पोहोचेल अशी उंची. पण मेहनतीची सवय. बेलपाडा हे साक्षात कोकणकड्याच्या कुशीत वसलेलं गाव ह्याला लाभलं. हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग साठी नित्य नेमाने येणाऱ्या ट्रेकर्सशी कमाने ओळख वाढवली आणि climbing-rappeling चं तंत्र शिकून घेतलं. आता शेतीला जोडून शहरी गृप्स ना ट्रेकिंग करवून आणणे हा जोड-धंदा म्हणून त्याने चालू केला आहे. जर आपण असं म्हंटलं की नशिबाने ह्याला बेलापाड्यासारखं मोक्याचं गाव मिळालं, पण त्याच गाव्यातल्या किती लोकांनी या गोष्टीचा कमा सारखा फायदा करून घेतला? हा प्रश्न येतोच. त्यामुळे ह्या व्यवसायात टिकण्यासाठी त्याने भरपूर मेहनत केली यात काही संशय नाही. कमळू ही आपल्या भावाच्या बरोबरीने ह्यात उतरला. भरपूर सराव झाला असेल म्हणून ही कदाचित, पण अलंग आणि मदन च्या rock patches वर अगदी खडे चढ कमळू कुठल्याही आधाराशिवाय अगदी लीलया चढतो. चढता-चढता एखादं बोट सुद्धा निसटणं प्रचंड धोक्याचं. खाली पडून परिणामी कमीत कमी हात पाय तर नक्कीच मोडणार. पण आता त्याला या पडण्याची भीती वाटत नाही. आपण जसे निर्विकारपणे आपल्या इमारतीचे जिने चढतो-उतरतो तसे तो हे डोंगर चढतो-उतरतो. कुठल्याही कामात कमळू अगदी पुढे राहून उडी घेतो. त्याच्या वागण्या-बोलण्यातून जितका आत्मविश्वास दिसून येतो तितकीच नम्रता, भोळेपणा आणि थोडीशी मिश्कीलता ही दिसून येते. चिरक्या आणि बारीक आवाजातून त्याची ही मिश्कीलता कायम डोकावत राहते.
अशोक आणि राम ही तरणी ताठी, कॉलेज शिकणारी मुलं. जन्मच मुळात डोंगरातला. त्यामुळे अर्थातच त्यांना डोंगर-दऱ्या यांबद्दल विशेष कुतूहल शिल्लक असलेलं फार दिसलं नाही. कदाचित त्यांच्या बुजऱ्या स्वभावामुळे ही असेल. या डोंगरांच्याही पलीकडचं जग पाहण्याची आणि त्या जगात वावरण्याची प्रत्येक तरुणाची असते तशी मनीषा ह्यांच्याही मनात असणारच. मध्येच चालता चालता एका ठिकाणी थांबून, बाप पुढे गेल्याचा अंदाज घेऊन अशोक ने खिशातला मोबाईल काढला आणि नंबर डायल करून कानाला लावला, आणि हळूच म्हणाला, "काय गं, मी लांब गेलो तर माझी आठवण येते की न्हाय तुला ?" आम्हा शहरात वावरणाऱ्या मुलांना मुक्त पाखराप्रमाणे फिरण्यासाठी या जंगलांची आणि डोंगरांची ओढ लागली आहे आणि सदैव जंगलात आणि खडका-दगडात फिरणाऱ्या या पोराला मात्र शहरातल्या वा गावातल्या एका पाखराची ओढ लागली आहे!
आज कमा आणि कमळू कडे बघून ते लौकिक दृष्ट्या किती शिकले असतील याबाबत शंकाच आहे, पण ते अनुभवाच्या जोरावर मात्र आपलं घर आणि कुटुंब चालवण्यात सक्षम आहेत हे नक्की. आज ते स्वतः या क्षेत्रात आल्याबद्दल समाधानी सुद्धा आहेत पण बापाच्या वाट्याला येणारी काळजी मात्र त्यांनाही चुकत नाही. अलंग चढताना कमा एकेकाची तयारी करून त्याला rock patch वर पाठवत होता आणि कमळू वरती बसून बिले कंट्रोल करत होता. अशोक आणि राम बाजूला बसले होते. मी कमाशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो. सहज मी त्याला विचारलं, "आता तुम्ही नसता तेव्हा ही दोघं जातात का गृप्स सोबत?" त्यावर कमा कसनुसं हसून म्हणाला, "नाही नाही. त्यांना नाही हे काम देत !" इथे इतर वेळी बिनधास्तपणे खडकांना भिडणारा कमा, त्याच्या मुलांसाठी मात्र काळजीत पडलेला मला दिसला. जे काम तो आज करतोय तेच काम त्याच्या मुलांना करावा लागू नये अशी त्याची इच्छा मला जाणवली. 'मुलांनी कॉलेज ला जावं आणि काहीतरी 'सुरक्षित' काम करावं; हे असं खडकांवर चढणं- उतरणं काही खरं नाही!' असा तर विचार त्याच्या मनात नसेल?
तीन दिवस आम्ही या मंडळींबरोबर काढले. कमा आणि कमळू तर अतिशय जीव लावून गेले. राम आणि अशोक आमच्यात मिसळायला दोन दिवस लागले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा लांब व्हायची वेळ आली. खाली उतरल्यावर पुन्हा सर्वांच्या गळाभेटी झाल्या आणि निरोप घेतले गेले. घरी आल्यावर दोन दिवसांनी आमचा कप्तान कार्तिक ला कमा चा फोन आला. म्हणाला "तुमची सर्वांची खूप आठवण येते!" काळीज अक्षरश: गलबलून गेलं. या मंडळींमधलं आणि आमचं नातं आता आम्ही दिलेल्या रोख रकमेच्या फार फार पलीकडे गेलं होतं!
आज कमा आणि कमळू कडे बघून ते लौकिक दृष्ट्या किती शिकले असतील याबाबत शंकाच आहे, पण ते अनुभवाच्या जोरावर मात्र आपलं घर आणि कुटुंब चालवण्यात सक्षम आहेत हे नक्की. आज ते स्वतः या क्षेत्रात आल्याबद्दल समाधानी सुद्धा आहेत पण बापाच्या वाट्याला येणारी काळजी मात्र त्यांनाही चुकत नाही. अलंग चढताना कमा एकेकाची तयारी करून त्याला rock patch वर पाठवत होता आणि कमळू वरती बसून बिले कंट्रोल करत होता. अशोक आणि राम बाजूला बसले होते. मी कमाशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो. सहज मी त्याला विचारलं, "आता तुम्ही नसता तेव्हा ही दोघं जातात का गृप्स सोबत?" त्यावर कमा कसनुसं हसून म्हणाला, "नाही नाही. त्यांना नाही हे काम देत !" इथे इतर वेळी बिनधास्तपणे खडकांना भिडणारा कमा, त्याच्या मुलांसाठी मात्र काळजीत पडलेला मला दिसला. जे काम तो आज करतोय तेच काम त्याच्या मुलांना करावा लागू नये अशी त्याची इच्छा मला जाणवली. 'मुलांनी कॉलेज ला जावं आणि काहीतरी 'सुरक्षित' काम करावं; हे असं खडकांवर चढणं- उतरणं काही खरं नाही!' असा तर विचार त्याच्या मनात नसेल?
तीन दिवस आम्ही या मंडळींबरोबर काढले. कमा आणि कमळू तर अतिशय जीव लावून गेले. राम आणि अशोक आमच्यात मिसळायला दोन दिवस लागले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा लांब व्हायची वेळ आली. खाली उतरल्यावर पुन्हा सर्वांच्या गळाभेटी झाल्या आणि निरोप घेतले गेले. घरी आल्यावर दोन दिवसांनी आमचा कप्तान कार्तिक ला कमा चा फोन आला. म्हणाला "तुमची सर्वांची खूप आठवण येते!" काळीज अक्षरश: गलबलून गेलं. या मंडळींमधलं आणि आमचं नातं आता आम्ही दिलेल्या रोख रकमेच्या फार फार पलीकडे गेलं होतं!
प्रतिक्रिया
हे
वा हकु!!
नक्कीच
छान लिहील आहे
नक्कीच लिहीन
सलाम
खरंय
अनुभव वाचायला आवडतील.
नक्की
धन्यवाद
सह्यपुत्रांना सलाम!
लेख खुप आवडला.
+1
छान लिहिलं आहे, पूर्ण
हकु साहेब मिपावर स्वागत आणि
उन्हाळ्यात हा तिन्ही
लेख फारच सुंदर.
मस्त.
लेख आणी प्रतिक्रिया
कमळू चे काही विडीओज
चित्रदर्शी लेखन
छान ओळख करुन दिली आहे
चौघांचीही ओळख आवडली. लेखन व
जबरी
मस्तच. काही मोबाईल नंबर असेल
नक्कीच!