मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मार्टिन क्रो यांना श्रध्दांजली

गॅरी ट्रुमन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
न्यू झीलंडचे माजी क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे आज वयाच्या ५३ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!! Martin Crowe मार्टिन क्रो हे नाव माझ्यासाठी माझ्या लहानपणाच्या क्रिकेटवेडाने भारलेल्या दिवसांच्या अनेक आठवणी जागृत करते. १९८७ च्या विश्वचषकातील भारताचा साखळीतला शेवटचा सामना होता न्यू झीलंड विरूध्द नागपुरात.या सामन्यात न्यू झीलंडला मोठ्या फरकाने मात देऊन 'अ' गटात पहिले स्थान पटकावणे भारतासाठी अगत्याचे होते.त्याचे कारण काय्?तर भारताचे दुसरे स्थान आले असते तर उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तानविरूध्द लाहोरमध्ये खेळावा लागला असता. आणि अर्थातच हे भारतीय संघाला नको होते.या सामन्याच्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात वाचले होते की भारताविरूध्दचा हा सामना जिंकून न्यू झीलंडचा संघ साखळीतले ६ पैकी ३ सामने जिंकेल असे कर्णधार मार्टिन क्रो ने म्हटले होते.आणि अर्थातच माझ्यासारख्या कट्टर क्रिकेटवेड्याला ते पटले नव्हते. आणि झालेही तसेच. हा सामना एका अर्थी अगदीच ऐतिहासिक ठरला.या सामन्यात चेतन शर्माने विश्वचषकातील पहिली हॅट-ट्रीक घेतली.आणि सुनील गावसकर यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये जे एकमेव शतक झळकावले ते याच सामन्यात.न्यू झीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच पिसे गावसकरांनी काढली होती.त्यात इव्हान चॅटफील्डच्या एकाच षटकात २१ धावा गावसकरांनी पिटल्या होत्या.त्याकाळी ५० षटकात २५० ही सुध्दा खूप मोठी धावसंख्या वाटे. अशा परिस्थितीत एका षटकात २१ धावा पिटणे म्हणजे किती महत्वाचे होते हे समजून येईल.त्याकाळी नवज्योत सिध्दू हा बराच फॉर्मात होता.श्रीकांत बाद झाल्यानंतर वन डाऊन सिध्दू फलंदाजीला येईल आणि प्रेक्षकांना चौकार-षटकारांची आतषबाजी बघायला मिळेल असे वाटले होते.पण गावसकरांना शतक करायला संधी द्यायची या उद्देशाने म्हणा की अन्य काही कारणाने सिध्दू ऐवजी महंमद अझरूद्दिन फलंदाजीसाठी वन-डाऊन आला होता.हे सगळे लिहायचा उद्देश म्हणजे भारताने हा सामना दणदणीत जिंकल्यानंतर आम्ही मित्रमंडळींनी मार्टिन क्रोंच्या वक्त्यव्याची चांगलीच टर उडवली होती. बहुदा २ नोव्हेंबर १९८७ हा दिवस होता तो. १९९२ च्या विश्वचषकामधील मार्टिन क्रो यांची कामगिरी म्हणजे अगदीच अफलातून.ख्राईस्टचर्चच्या शेवटच्या साखळी लढतीत मार्टिन क्रो यांना पाकिस्तानविरूध्द फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती.साखळीतला तो एकच सामना न्यू झीलंडने गमावला. भारताविरूध्दच्या साखळी लढतीत किरण मोरे अचूक चेंडू टाकून आपल्याला धावबाद करू शकेल ही अपेक्षा नसल्यामुळे क्रो आरामात क्रीझबाहेरच उभे होते आणि चेंडूने यष्टी भेदल्यावर थोडेसे अवाकही झाले होते.ऑकलंडला पाकिस्तानविरूध्द उपांत्य फेरीच्या लढतीत मार्टिन क्रो यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना यथेच्छ धुतले.पण हा सामना गाजवला इंझमाम-उल-हकने.त्याने हा सामना अगदी एकहाती जिंकून दिला. पुढे नोव्हेंबर १९९५ मध्ये जमशेदपूर येथील एकदिवसीय लढतीत भारताविरूध्द झळकावलेले शतक अगदीच लाजबाब. जंगजंग पछाडूनही मार्टिन क्रो यांना भारतीय गोलंदाजांना शेवटपर्यंत बाद करता आले नाही.याच दौर्‍यादरम्यान नागपूर येथील लढतीत नॅथन अ‍ॅस्टल आणि स्टिफन फ्लेमिंगबरोबरच मार्टिन क्रो यांनीही भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेऊन ५० षटकात ३४८ धावांचा डोंगर उभारला!! नंतरच्या काळात क्रिकेटमधील रस बराच कमी झाला.आणि मार्टिन क्रो हे नावही तसे विस्मृतीतच गेले.मी २०१५ च्या विश्वचषकातही अजिबात रस घेतला नव्हता.तरीही त्या दरम्यान एक बातमी आली आणि त्या बातमीने लक्ष वेधलेच. ती बातमी होती मार्टिन क्रो यांना कर्करोग झाला असून काही महिन्यातच वाईट बातमी येणार!! ही बातमी वाचून खरोखरच वाईट वाटले.पण काय करणार. ईश्वरेच्छा बलियसि. आपला काही इलाज नाही. आजही मार्टिन क्रो म्हटले की १९९२ च्या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार म्हणून मिळालेल्या गाडीची चावी खुशीने स्विकारणारा पण त्याचवेळी न्यू झीलंड तो विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला याचा सल मनात असलेला एक उमदा क्रिकेटपटूच आठवतो. मार्टिन क्रो यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

वाचने 4044 वाचनखूण प्रतिक्रिया 23

मार्टिन क्रो यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या खेळाबद्दलच्या आठवणी थोडक्यात उत्तमपणे मांडल्या आहेत. एक दिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या १५ षटकांत गोलंदाजांवर आक्रमण करून भरपूर धावा काढण्याचे धोरण यशस्वीपणे मोठ्या प्रमाणात प्रथम राबवण्यासाठी मार्टिन क्रो ओळखले जातात.

मार्टिन क्रो यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या खेळाबद्दलच्या आठवणी थोडक्यात उत्तमपणे मांडल्या आहेत. एक दिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या १५ षटकांत गोलंदाजांवर आक्रमण करून भरपूर धावा काढण्याचे धोरण यशस्वीपणे मोठ्या प्रमाणात प्रथम राबवण्यासाठी मार्टिन क्रो ओळखले जातात.

बोका-ए-आझम 03/03/2016 - 11:46
विश्वचषकांपेक्षाही भारत, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तिरंगी लढतींमधली त्याची कामगिरी आठवते. टिच्चून खेळणारा बॅट्समन होता. याला आऊट केल्याशिवाय काय खरं नाही असं प्रतिस्पर्धी संघाला वाटायला लावणारा बॅट्समन होता. विनम्र श्रद्धांजली!

अतिशय वाईट बातमी ... आपल्या लाडक्या खेळाडू, कलाकार अशांना आदरार्थी संबोधायची वेळ येणे हेच फार चटका लावणारे असते ... अशा प्रसंगात तर आणखीनच .... तो ब्राडमन किशोर तो रफी हे असते तेव्हाच बरे वाटते .... असो

In reply to by अत्रन्गि पाउस

नाखु 03/03/2016 - 12:02
सच्या म्हणले की आपलेपणा आपसूक येतो. लेख अर्थात "सुरेख संकलन्+ सुबक ललीत लेखन" मिलाफ असलेला आहे

बेकार तरुण 03/03/2016 - 12:03
पूर्ण ९२ वर्ल्ड कप त्याच्या बॅटिंग आणी कॅप्टन्सीने गाजवला होता त्यानी. ग्रॅडबॅच कडुन बॅटिंग ओपन करणे आणि दीपक पटेलकडुन बॉलिंग ओपन करणे. मधे १५ ते ४० ओव्हर्स लार्सन, हॅरिस आणी लॅथम सारखे धड स्लो हि नाही आणी धड फास्टहि नाही असे बॉलर्स ! काळाच्या फार पुढे होता मार्टिन क्रो. रच्याकने - १९९२ च्या वर्ल्ड कपमधे पाकी विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करण्यास (इंझी झंझावात वेळी) क्रो जखमी असल्याने येउ शकला नव्हता. त्याच्या जागी कर्णधारपद दुसरे कोणी (बहुतेक जॉन राईट, पण नक्की माहित नाही) सांभाळत होते आणि त्याने बॉलिंग ऑर्डरमधे चुक केली आणि फील्ड प्लेसमेंट्सहि चुकीची केली. टी-२० चा बर्‍यापैकी जनक मार्टिन क्रोच होता. त्याने अनेक वर्षापुर्वी न्यु झीलंड्मधे क्रिकेट मॅक्स खेळ चालु केला होता, ज्यात समोरील साईट स्क्रीनच्या दिशेने सिक्स मारल्यास २ रन्स बोनस मिळत (टोटल ८ रन्स) वगैरे एकदम वेगळे आणी नवे रुल्स होते. आर आय पी मार्टिन

In reply to by बेकार तरुण

स्पार्टाकस 03/03/2016 - 21:07
१९९२ च्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये फिल्डींगला येऊ न शकल्याची रुखरुख मार्टीनला जन्मभर राहिली. त्याच्याऐवजी मैदानावर कॅप्टन असलेल्या जॉन राईटने मार्टीनच्या प्लॅनप्रमाणे बॉलिंग आणि फिल्डींग चेंजेस न करता अनेक क्षुल्लक चुका केल्या आणि अर्थातच इंझमामने त्याचा फायदा घेतला!

चौकटराजा 03/03/2016 - 17:10
मार्टिन क्रो एक जबरदस्त खेळाडू होता. जेफ बरोबर चोरट्या धावांचे तंत्र त्यावेळी फार गाजले. असं ५३ व्या वर्षी जाणे फार धक्का दायक आहे. क्रिकेट प्रेमी मनाला क्लेश होतील असा हा प्रसंग. क्रो ला श्राध्हान्जली.

श्रीगुरुजी 03/03/2016 - 20:45
मार्टिन क्रो जबरदस्त फलंदाज व नाविन्यपूर्ण कल्पना राबविणारा कर्णधार होता. गुडघेदुखीमुळे त्याला अकाली निवृत्ती घ्यावी लागली. तो सध्याच्या संघातील रॉस टेलर आणि गप्टिल यांचा मेंटॉरही होता. मार्टिन क्रो ला श्रद्धांजली!

स्पार्टाकस 03/03/2016 - 21:02
प्रचंड व्यस्ततेमुळे सध्या मार्टीन क्रोवर काही लिहीता येणार नाही ही रुखरुख या लेखामुळे दूर झाली! न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातला सर्वोत्कृष्ट बॅट्समन आणि कॅप्टन आणि तितकाच सज्जन माणूसही! मृत्यूपुढे कोणाचं काही चालत नाही हे खरं असलं तरी क्रिकेटच्या इतिहासात ज्यांच्या नशिबी अकाली मृत्यू आला आर्ची जॅक्सन, हॅडली व्हॅरेटी, कॉली स्मिथ, माल्कम मार्शल, बेन होलिओक, फिल ह्यूज आणि इतर अनेकांच्या यादीत मार्टीन क्रोचा समावेश व्हावा हा नियतीचा अघोरी खेळच म्हणावा लागेल! १९८७ च्या वर्ल्डकपमध्ये डेव्ह हौटनचा त्याने घेतलेला कॅच आणि १९९१-९२ च्या वर्ल्डकपमधली त्याची अफलातून कॅप्टनशीप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमधल्या सेंच्युरीपासून अफाट बॅटींग कधीही विसरणं शक्यं नाही! मार्टीन क्रोला श्रद्धांजली!

In reply to by स्पार्टाकस

गॅरी ट्रुमन 04/03/2016 - 10:43
१९८७ च्या वर्ल्डकपमध्ये डेव्ह हौटनचा त्याने घेतलेला कॅच
अरे हो. हा उल्लेख राहिलाच की. खरं सांगायचं तर डेव्ह हॉटनने त्या सामन्यात न्यू झीलंडच्या तोंडचे पाणी पळवले होते.त्या एका कॅचमुळे न्यू झीलंडने सामना कसाबसा ३ धावांनी जिंकला. किवींनी सामना जिंकला असला तरी प्रेक्षकांचे मन जिंकले ते डेव्ह हॉटननेच.त्या १४१ धावांच्या जिगरबाज खेळीनंतर डेव्ह हॉटन परत त्या अत्युच्च पातळीवर कधीच जाऊ शकला नाही. मार्टिन क्रो ने डेव्ह हॉटनचा घेतलेला कॅच खरोखरच जबरदस्त होता. तो खालील व्हिडिओमध्ये बघता येईल. (डेव्ह हॉटनची ती अविस्मरणीय खेळी बघितलेला) ट्रुमन

In reply to by रॉजरमूर

स्पार्टाकस 05/03/2016 - 21:04
थोडंसं असहमत मूर! डेव्ह हौटनने रिव्हर्स स्वीपचा मुक्तहस्ते वापर केला असला तरी रिव्हर्स स्वीपचा जनक म्हणजे पाकिस्तानचा कॅप्टन मुश्ताक महंमद! मुश्ताकने १९६५-७० च्या दशकातच हा शॉट नियमितपणे खेळण्यास सुरवात केली असली तरी हौटनच्याही आधी रिव्हर्स स्वीपला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती मूळचा दक्षिण आफ्रीकन असून इंग्लंडकडून खेळणार्‍या बॉब वूल्मरने! फसलेल्या रिव्हर्स स्वीपचं उदाहरण म्हणजे याच १९८७ च्या वर्ल्डकप फायनलमधला गॅटींगचा रिव्हर्स स्वीप!

In reply to by अभिदेश

गॅरी ट्रुमन 04/03/2016 - 10:48
हो त्यावेळी जेफ क्रो कप्तान होता.कदाचित मी पेपरात वाचलेले वाक्य जेफ क्रोचे असावे.त्या घटनेला २८ वर्षे आणि ४ महिने उलटले आहेत त्यामुळे 'गलतीसे मिश्टेक हो गया' :) त्रुटी दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

पैसा 04/03/2016 - 10:46
वाईट वाटले. इतक्या कमी वयाच्या खेळाडूला श्रद्धांजलि वहाताना कसे तरीच वाटते.

श्रीगुरुजी 04/03/2016 - 20:51
मार्टिन क्रो च्या गोलंदाजीबद्दल कोठेच उल्लेख नाही. तो एक बर्‍यापैकी मध्यमगती गोलंदाज होता. त्याने ७७ कसोटीत १४ बळी व १४३ एक दिवसीय सामन्यात २९ बळी घेतलेले आहेत. त्याच्या सर्वोत्कृष्ट ५ डावांची माहिती खालील संकेतस्थळावर आहे. http://cricket.about.com/od/famousplayers/tp/Martin-Crowe-Five-Best-Innings.htm