Skip to main content

डाब चिंगडी (शहाळ्यात शिजवलेली कोळंबी)

लेखक Mrunalini यांनी मंगळवार, 01/03/2016 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण डाब चिंगडी बघणार आहोत. ही एक बंगाली पाकृ आहे. 'डाब'म्हणजे शहाळे आणि 'चिंगडी'म्हणजे कोळंबी. शहाळ्यात शिजवलेली कोळंबी. साहित्यः शहाळे - २ कोळंबी - ५०० ग्रॅम कांदा - २ लांब चिरुन काजु - ७ - ८ खसखस - २ चमचे मोहरी - २ चमचे हिरवी मिरची - ३ लसुण - ३-४ पाकळ्या आल्याचा छोटा तुकडा मोहरीचे तेल - २ चमचे पंचफोराण - २ चमचे कणिक - १ वाटी मिठ चवीनुसार कृती: १. दोन्ही शहाळ्यांमधील पाणी ग्लासात काढुन घ्यावे व दोन्ही शहाळ्यांची मलई काढुन घ्यावी. शहाळे कापुन घेताना नारळवाल्याकडुन त्याचे वरचे झाकण सुद्धा मागुन घ्यावे. p1 २. एका पॅनमधे तेल गरम करुन त्यात चिरलेले आले, लसुण व कांदा टाकुन ३-४ मिनिटे परतुन घ्यावे. ३. कांदा परतल्यावर त्यात काजु, भिजवलेली मोहरी व खसखस टाकुन परतावे. p2 ४. ह्या मिश्रणात थोडी मलई टाकुन मिक्सरवर मऊसर वाटुन घ्यावे. वाटताना पाण्याची गरज वाटल्यास शहाळ्याचे पाणी वापरावे. p3 ५. एका बाऊलमधे कोळंबीला थोडी हळद व हिंग चोळुन घ्यावे. ६. पॅनमधे मोहरीचे तेल गरम करावे व कोळंबी टाकुन २ मिनिटे परतुन लगेच बाऊल मधे काढुन घ्यावी. p4 ७. ह्या बाऊलमधे वाटलेले मिश्रण, उरलेली मलई, हिरवी मिरची, मिठ व एक चमचा मोहरीचे तेल टाकुन निट मिक्स करुन घ्यावे. p5 p6 ८. हे तयार झालेले मिश्रण दोन्ही नारळामधे भरुन त्याला वरुन झाकण लावावे. p7 ९. ह्यामधुन वाफ बाहेर पडु नये म्हणुन कणकेने सील करावे. त्यास वरती पंचफोरण लावावे. p8 p9 १०. ओव्हन २०० degree Celsius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा. ११. ह्या ओव्हनमधे दोन्ही नारळ ठेवुन ३० मिनिटे शिजवुन घ्यावेत. p10 १२. जेवायला बसतानाच नारळ उघडुन दाब चिंगरी गरम भात किंवा तांदुळाच्या भाकरी सोबत serve करावे. p11 p12 p13

वाचने 29770
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

अरे वा! हे काहीतरी नवीच बघितलं. नाव वाचून जरा इचित्र गोंधळ झाला, पण जाऊ दे- असं पण कोणीतरी म्हटलंय ना नावात काय आहे? ;) बाकी ते नारियल स्पेशल रेशीपी खुप आवडली, अगदी तोंडाला पाणी सुटून मनात जळजळ होईपर्यंत! म्हणून आत्ताच वाचनखुणच साठवून ठेवतो. ;) ;)

वा वा.. पहिल्यांदाच समजली वेगळी पाककृती. उत्तम. पंचफोरण म्हणजे काय आणि ते बाहेरच्या कणकेच्या सीलच्याही वर लावून काय साध्य होतं? ते सील तर नारळाच्या बाहेरुन आहे आणि नंतर काढूनच टाकायचंय.

In reply to by गवि

हाच प्रश्न पडला होता. अर्थात स्वतः करून पाहण्याची शक्यताच नाही म्हणा.

In reply to by गवि

पाँचफोरोन दाल (Panch Phoron) पाँचफोरोन म्हणजे पाच प्रकारचे जिन्नस ह्यात वापरले आहेत मोहरी, जीरे, बडीशेप, मेथी-दाणे व कांद्याचे बी (कलौंजी). हे मसाले अख्खेच फोडणीत वापरले जातात.

आणखी एक. दाब म्हणजे नारळ हे ऐकून दाबके पोहे या शब्दाचाही उगम बंगालीच आहे काय अशी शंका आली. त्यात नारळासोबत पोहे असतात.

In reply to by गवि

दाब, दबणे, दबाव या शब्दांचा उगम दम् दमन या संस्कृत शब्दापासून असावा. आणखी म्हणजे कोलंबीसाठी चिंगरी या शब्दाशी साधर्म्य दाखवणारे अनेक शब्द कोंकणपट्टीत वापरले जातात. चिंगळें(चिंगळां), जिंगे, झिंगे, जिंगरे वगैरे. कोवळ्या किंवा मध्यम जून शहाळ्याची भाजी, कोशिंबीर आणि कोवळ्या शहाळ्याचे पुडिंग खाल्ले आहे. पा.कृ. छानच दिसतेय. थोडी खटाटोपाची, पण नावीन्यपूर्ण.

In reply to by पिलीयन रायडर

प्रॉनऐवजी पनीर.. हे राम. त्या पनीरने कोणाचं काय वाईट चिंतलं होतं??! ;-)

In reply to by गवि

मग आमच्या सारख्या घासपुस वाल्यांनी काय करावं??? नुसतं जळतं रहावं फोटु पाहुन??? पनीर ऐवजी काजु टाकु.. मग तर झालं!

In reply to by पिलीयन रायडर

मग आमच्या सारख्या घासपुस वाल्यांनी काय करावं???
एखाददुसरा तुकडा चाखून पहावा. पाण्यातली फळेच ती. काय फार वेगळी नव्हेत.

In reply to by बॅटमॅन

शिव शिव शिव.. संस्कृती तर बुडालीच.. आता आमचा धर्मही बुडवायला निघालेत... कुठं फेडाल ही पापं!! पण टाकलं पणीर तर प्रॉब्लेम काय??!!

In reply to by पिलीयन रायडर

संस्कृती आणि धर्म दोघांनाही लाईफ ज्याकेट द्या. बाकी टाका की पणीर, मी तर म्हण्टो कारलेही टाका. आम्हांला काय प्राब्ळम असणारे? पण टेस्ट भी कुछ बात होती है.

एक नंबर पाकृ. एकदाच खाल्लीय आजवर, वेगळीच आहे एकदम. रच्याकने ते 'दाब' नसून 'डाब' आहे. बंगाली भाषेत नारळाच्या वेगवेगळ्या अवस्थांना मिळून तीन शब्द आहेतः डाब- शहाळे. दोमाला- शहाळे आणि नारळाच्या मधली अवस्था. नारकोल- नारळ.

In reply to by बॅटमॅन

आणि ते चिंग'डी' असे पाहिजे. चिंगडी = कोळंबी. यालाच 'चिंगडी माछेर मोलाई कारी' अर्थात कोळंबी मलई करी असेही म्हटल्या जाते.

In reply to by बॅटमॅन

पाकृ मस्त दिसतीए वेगळ्या पाकृसाठी धागा लेखिकेचे आभार. परंतु प्रांजळपणे सांगायचेतर ते पाकृचे /धागा लेखाचे नाव वाचताना कम्फर्टेबल वाटले नाही ते बरोबर असले तरी आणि ब्याटमनराव म्हणतात तसे बरोबर नसले तर आवर्जून बदलण्याचा विचार करावा.

जबरदस्त पाकृ! शहाळ्याची आयडिया तर फारच भारी आहे. करून बघेनच, पण शहाळं-ओवन वापरून इतरही प्रयोग करून बघता येईल. धन्यवाद!

सगळ्यांना थँक्स. ते पंचफोरण मी फक्त सजावटीसाठी लावले आहेत. serve करताना, नारळ छान दिसतो. तुम्ही कोळंबीच्या ऐवजी पनीर किंवा मिक्स व्हेज वापरुन हे बनवु शकता. बॅटमॅन, चुक लक्षात आणल्याबद्दल धन्यवाद, पण धागा संपादन नाहि करु शकते. मला संपादनचा optionch येत नाहिये.

हे इतके देखणे पदार्थ फक्त उच्चभ्रु हॉटेलात, टीव्हीवरच्या कुकरी शोजमध्येच असू शकतात असं वाटायचं. प्रत्यक्षात घरीही करता येतात हे आता कळले. _/\_

वेगळाच पदार्थ. कोलंबी जीव की प्राण असल्याने आणि फोटू कातील असल्याने खायची इच्छा झाली !

In reply to by नंदन

अगदी अगदी. शिवाय इथे नारळाचं पाणी ताजंताजं वापरलंय, अन्यथा चिंगाडीमाडी असा व्हेरियंटही ट्राय करता येईल. ;-)

In reply to by रायनची आई

नाहि हो.. मला नाही वाटत असे काहि होईल. ही एक पारंपारिक पाकृ आहे.

In reply to by अनंत छंदी

ओव्हन नसेल तर नारळ कुकर मधे ठेवुन ३ शिट्ट्या करायच्या.. ते हि नसेल तर नारळ डायरेक्ट निखार्‍यावर ठेवुन शिजवु शकता.

निखार्यावर ठेवून छान चव येत असेल बहुधा.....एक्दा करून बघायला पाहिजे.

मस्तच आयड्या आहे. रक्षाबंधनचा नारळीभात शाळ्यात शिजेल का? म्हणजे शाळे अवनमध्ये ठेवून? तसे केले तर भारी लागेल असे वाटते? शाळ्याची मलई, गूळ, तूप, लौंगइलायची, शाळे फोडले की गरम गरम नारळी भात. अहाहाहाहाहाहा.

मृ,फ्लॅशब्याक मध्ये नेलंस.माझी आजी,वडिलांची आई ही डिश बनवत असे. पण हिरव्या मसाल्यात.शहाळ्यात मसाला लावून कोलंबी झाकण कणकेने लिंपून झाल्यानंतर ते शहाळं तूप लावलेल्या केळीच्या पानात गुंडाळून त्यावर ओल्या मातीचे लिंपण करत असे.जमिनीत आधीच खड्डा करुन निखारे झळझळीत केलेले असत.त्यातले अर्धे बाहेर काढून ते शहाळं खड्ड्यात ठेवून बाहेर काढलेले निखारे त्याच्या आजूबाजूला आणि वर पसरून खड्ड्यावर लोखंडी तवा ठेवत असे.आणि मग त्या खड्ड्यातून येणारा दरवळच सांगत असे की,पदार्थ खायला तयार आहे. आठवणींनीच तोंडात पूर आलाय.

In reply to by नूतन सावंत

मला तर निव्वळ वर्णनानेच मोक्ष प्राप्त झाला आहे!!!!

तोंडाला पाणी सुटले राव. बायको शुद्ध शाकाहारी आहे. घरी करता येत नाही.

पाकृ तर आवडलीच पण सादरीकरण, फोटो आणि पाकृचं नाच हेच जास्त आवडल्या गेल्या आहे.....शेवट्चा फोटो फारच कातील आलाय ब्वॉ....

इपीक चॅनेलवर "Lost recipes" नावाचा कार्यक्रम असतो. हि पाककृती सुध्दा अगदी तश्याच धाटणीतली वाटते आहे. बाकी फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले :)