विज्ञानदिनाच्या निमित्ताने
विज्ञानदिनाच्या निमित्ताने
.....
विज्ञान हे माणसाने संशोधित केलेल्या निसर्गनियमांचे, सत्यज्ञानाचे भांडार आहे. त्यात आपल्याला अचंबित करणार्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विषयावर, निरीक्षणांवर, सुसंगत विचार करून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची आणि ते शक्यतो प्रयोगाने सिद्ध करण्याची ती एक विचारसरणी आहे. वैज्ञानिकांनी ती विकसित केली आहे. या पद्धतीत कोणत्याही पूर्वग्रहाला थारा नाही. भावनेच्या गुंतवणुकीला स्थान नाही. कुणाच्याही अधिकारवाणीला मान्यता नाही. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, यांची स्वीकृती नाही. शंका घ्यायच्या, त्यांची उत्तरे शोधायची, जे पटेल तेच तत्त्वत: सत्य मानायचे. तर्कशुद्ध निष्कर्ष काढायचे. मग ते आपल्याला आवडोत वा न आवडोत. कदाचित् ते आपल्या पूर्वानुभवांशी विसंगतही असतील. अशा परिस्थितीत आपल्या अनुभवांचे पुनरावलोकन करायचे. चिकित्सा करायची. आपण दोन उदाहरणे पाहू:-
१)एकदा गॅलीलिओ आपल्या शिष्यांना म्हणाला,
" झुकत्या मनोर्याच्या (टॉवर ऑफ पिसा) माथ्यावरून १किलो वस्तुमानाची वीट खाली सोडली तर पायथ्याशी यायला तिला जितका वेळ लागेल तितकाच वेळ २ किलोच्या विटेला लागेल."
" ते कसे? अधिक जड वीट अधिक वेगाने कमी वेळात खाली येईल असे वाटते." शिष्य म्हणाले.
" समजा मी मनोर्यावर उभा आहे. माझ्या डाव्या हातात १ किलोची वीट आहे.उजव्या हातातही १ किलोचीच वीट आहे. प्रथम ही वीट मी सोडली. ती तीन सेकंदांत खाली आली. आता डाव्या हातातील सोडली. तिला किती वेळ लागेल? "
"तीन सेकंदच. ती १ किलोचीच आहे ना? "
"ठीक. आता दोन हात जवळ आणतो. दोन विटांत चार बोटें अंतर ठेवून दोन्ही एकाच वेळी अशा उभ्या खाली सोडतो. आता काय होईल?"
"दोन्ही विटा एकाच वेळी खाली येतील. त्यांच्यात चार बोटे अंतर ठेवा की अर्धे बोट ठेवा, वेळ बदलणार नाही."
" छान! आता दोन विटा एकमेकींना चिकटूनच एकदम खाली सोडतो. काय होईल?"
"दोन्ही एकाच वेळीं म्हणजे ३ सेकंदांतच खाली येतील." सगळे शिष्य एका सुरात म्हणाले.
"हो ना? अरे एकमेकींना चिकटून ठेवलेल्या एक-एक किलोच्या दोन विटा म्हणजे म्हणजे २ किलोची एक वीट नव्हे काय? म्हणजे २ किलोची वीटसुद्धा तीन सेकंदांतच खाली येईल हे सिद्ध होत नाही का? विचार करा. "
"अरेच्चा! खरेच की! ! पण तसे बुद्धीला पटत नाही."
" तर आता मनोर्यावर जा आणि दक्षतापूर्वक प्रयोग करा.मी सांगितलेले तत्त्व खरे आहे की नाही ते ठरवा. माझी तर्कबुद्धी सांगते की ते खरे आहे. पण ते चुकीचे असूं शकेल." आपण जाणतो की गॅलीलिओचे तत्त्व अबाधित आहे. तर्कसुसंगत विचार करण्याची वैज्ञानिक पद्धती अशी असते. विज्ञानाचे अभूतपूर्व यश आणि अल्पकाळातील आश्चर्यजनक प्रगती यांच्या मुळाशी ही वैज्ञानिक पद्धत आहे.
२) गंगाजल आणि यमुनाजल
" हे पाहा इथे ठेवले आहे काचपात्र "अ", धारकता ३०० मिली. यात २५० मिली शुद्ध गंगाजल आहे."
" कळले. ते दुसरे तसेच दिसणारे काचपात्र "ब" का? "
" हो. त्यात २५० मिली शुद्ध यमुनाजल आहे."
"ठीक. आता पुढे ?"
" एका मोजपात्रात "ब" तील २० मिली य.ज. घेतले. ते "अ" तील गं.ज.मधे मिसळले. नंतर "अ" मधून नेमके २० मिली मिश्रण मोजपात्रात घेऊन "ब" मध्ये मिसळले."
" समजले सगळे. आता दोन्ही पात्रांत मिश्रणे आहेत."
" छान ! पण "अ" भांड्यात थोडे यमुनाजल आले आहे. तर "ब" त कांही गंगाजल गेले आहे. प्रश्न असा आहे की "अ" मधील य.ज. अधिक की "ब" मधील गं.ज. अधिक? की दोन्ही समान?"
"समान नसावीत. कारण "अ" मध्ये २० मिली. शुद्ध यमुनाजल घातले, तर "ब" त २० मिली मिश्रण टाकले. या दोन कृती एकरूप नाहीत. त्यामुळे "अ" पात्रात आलेले यमुना जल हे "ब" पात्रात गेलेल्या गंगाजलाहून अधिक असावे असे मला वाटते. तरीपण निश्चितीसाठी काही अंकमोड करावी हे बरे."
" असे म्हणता ? आता माझ्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे द्या. प्रारंभी आणि आता "अ" मधील द्रवाची पातळी तीच आहे ना? "
"निश्चितच . २० मिली पाणी आले. २० मिली पाणी गेले."
" प्रथम अ मध्ये य.ज. नव्हते. आता आहे. पातळी न बदलता ते "अ" पात्रात कसे मावले?"
"अहो, अ पात्रातील काही गं.ज. गेले नाही का? त्यामुळे जागा झाली. त्यात य.ज. बसले."
" वा ! छान. गेलेल्या गं.ज.पेक्षा आलेले य.ज. कमी किंवा अधिक असते तर द्रवाची पातळी बदलली असती ना? ती बदलली नाही. यावरून काय निष्कर्ष निघतो?"
" जेवढे यमुनाजल आले तेवढेच गंगाजल गेले."
" ते कुठे गेले? "ब" पात्रात ना? म्हणजे आता "अ" पात्रात जेवढे यमुनाजल आहे तेवढेच गंगाजल "ब" पात्रात आहे असे सिद्ध झाले. हो ना? "
"हो. तसे पटते. पण ..."
" अजून पण? बरे, बरे. अधिक सोपे करूया. ’अ" पात्रात २५० मिली शुद्ध गंगाजल,"ब" त तेवढेच यमुनाजल इथून परत विचार करू. समजा "अ" मधील पाण्याचे बिंदू गोठले. त्यांचे निळ्या रंगाचे छोटे छोटे एकाच आकाराचे १०,००० गं.ज.मणी झाले. तसेच "ब" मधील पाण्याचे पांढर्या रंगाचे १०,हजार य.ज. मणी झाले."
" आता ही काय भानगड ? "
" काही नाही. समजण्यासाठी केवळ कल्पना करायची."
" हं ! कल्पना केली."
" आता "ब" मधील २०० शुभ्र मणी काढून ते "अ" मधील मण्यांत मिसळले.पात्र हालवले. मग "अ" तील २००मिश्रमणी काढून ते "ब" पात्रात टाकले. आता दोन्ही पात्रांत प्रत्येकी १०,००० मणी आहेत."
"कळले. कळले. "अ" पात्रात जितके य.ज.मणी आहेत तितकेच गं.ज. मणी "ब" भांड्यात आहेत. म्हणजे असलेच पाहिजेत."
"समजले ना ?"
"न समजायला काय झाले? सोपे तर आहे. पण ते भांडे हालवणे आवश्यक आहे का?"
"शाबास ! कळलेच म्हणायचे सगळे."
**
हे जग आहे तसे समजून घेणे , निसर्गाचे नियम शोधणे, निसर्गाच्या शक्तींचे आकलन करून घेणे, नैसर्गिक आपत्तींचे संभाव्य धोके ओळखून त्यांपासून मानवी जीवनाला सुरक्षित ठेवणे असा विज्ञानाचा प्रयत्न असतो. हे वैज्ञानिकांचे निसर्गाशी युद्ध नाही. निसर्गाला जाणून त्याच्याशी जुळवून घेत जीवन सुरक्षित ठेवण्याची धडपड आहे. अशा संकटातून आपल्याला वाचवणारा कोणी परमेश्वर असित्वात नाही. कितीही आळवणी करा, "धाव रे धाव आता" ! असे म्हणत कितीही काकुळतीला या, काहीही उपयोग होत नाही. संकटात धावून येणारा देव केवळ धर्मग्रंथातील काल्पनिक कथेत असतो. वास्तवात नसतो. माणसाने संशोधित केलेले विज्ञानच कामी येते. हे स्पष्ट झाले आहे. या प्रयत्नांत विज्ञान बर्याच अंशी यशस्वी ठरत आहे. आंध्रप्रदेशात आलेल्या पायलीन महावादळाच्या वेळी याची प्रचीती आली. संभाव्य वादळाचा अभ्यास, निरीक्षणे आणि गणिते करून वैज्ञानिकांनी तीन दिवस आधी शासनाला वादळाची पूर्वकल्पना दिली. त्यामुळे सहस्रावधी माणसांचे आणि गाई-गुरांचे प्राण वाचू शकले हा (२०१३)चा अनुभव आहे.
ज्ञानप्राप्तीचा सध्या ज्ञात असलेला एकमेव विश्वासार्ह मार्ग म्हणजे ही वैज्ञानिक पद्धत. अन्य कोणत्याही मार्गाने सत्यज्ञान प्राप्त होत नाही. साक्षात्कार, आत्मानुभूती, समाधी, सद्गुरूने साधकाच्या डोक्यावर हात ठेवून तोंडाने मंत्र पुटपुटल्याने होणारे ज्ञानसंक्रमण (शक्तिपात) या सर्व भ्रामक गोष्टी आहेत. ज्याचा-त्याचा व्यक्तिनिष्ठ अनुभव म्हणजे सत्यज्ञान नव्हे. ते वस्तुनिष्ठ,सार्वत्रिक आणि स्थल-काल-व्यक्ति निरपेक्ष असावे लागते. वैज्ञानिक पद्धती परिपूर्ण नसेल पण गेल्या कांही शतकांत ती अधिकाधिक विकसित होत गेली आहे.
विज्ञानाने अनेक सत्ये शोधून काढली आहेत. त्यांमुळे माणसाचे जीवन सुखी, सुविधापूर्ण आणि सुरक्षित झाले आहे. पण विज्ञानाने "अंतिम सत्य" शोधले आहे असा दावा कोणी करीत नाही. " माणूस परिपूर्ण नाही. म्हणून त्याचे संशोधन परिपूर्ण नाही. अंतिम नाही. त्यात सतत सुधारणा होत राहील. " असे वैज्ञानिक सांगतात. तर आमच्या धर्माला अंतिम सत्य गवसले आहे. (काय बरे असते हे अंतिम सत्य?) तो आकाशातील प्रभूचा संदेश आहे. तो अल्लाचा पैगाम आहे. तो प्रत्यक्ष भगवंताचा शब्द आहे. असे आध्यात्मिक लोक म्हणतात.
विज्ञानाचा निसर्गाशी सतत संबंध येतो. निसर्गाच्या आश्चर्यकारक वैविध्याविषयीं विज्ञान आदर व्यक्त करते. निसर्गाच्या अभ्यासातून एखाद्या तत्त्वाचे, निसर्गनियमाचे आकलन झाले की वैज्ञानिकांना, निसर्गाच्या विराट रूपाशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो. आणि ते आनंद व्यक्त करतात. या संदर्भात "हीरो राजाचा सुवर्ण मुकुट आणि आर्किमेडीज " ही सुपरिचित गोष्ट आठवते. पाण्याच्या टबात स्नान करताना आर्किमेडीजला एका निसर्गनियमचा साक्षात्कार झाला. त्यासरशी तो, "युरेका ! युरेका ! !" असे आनंदोद्गार काढीत निसर्गाला भेटण्यासाठी नैसर्गिक अवस्थेत बाहेर पडला. एका वैज्ञानिकाचा हा आनंदसोहळा होता. आपण ही गोष्ट शालेय पुस्तकात वाचतो. वर्गात शिकतो. पण आर्किमिडीजपुढे नेमकी कोणती समस्या होती ? त्याने ती कशी सोडविली? सुवर्णकाराने मुकुटातील सोन्यात हिणकस धातू मिसळला आहे हे राजदरबारातील विद्वानांना सप्रयोग कसे पटवून दिले ? या प्रश्नांचा विचार क्वचितच कोणी केला असेल. प्रत्येकाने स्वत:च्या मनाशी विचार करावा. आपल्याला तेव्हा समजले होते का? शिक्षकांनी कधी समजावून सांगितले होते का?
तर्ककठोर विचार करणारे वैज्ञानिक भावनाशून्य असतात, असे काही जणांना वाटते. पण तसे नसते. किंबहुना प्रत्येक वैज्ञानिक हा संवदनशील असतोच. मात्र आपल्या भावनांवर तो बुद्धीचे नियंत्रण ठेवतो. भावनांच्या आहारी जात नाही. त्या अस्थानीं प्रकट करीत नाही.
विज्ञान समजून घेणे अवघड असेल. अनेक वर्षे मनात जोपासलेल्या आपल्या आवडीच्या संकल्पना वैज्ञानिक शोधांमुळे खोट्या ठरल्या असतील .विज्ञानातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या वस्तू राज्यकर्त्यांना आणि उद्योजकांना उपलब्ध झाल्यावर त्या वस्तूंचा समाजविघातक असा दुरुपयोग होत असेल. पण विज्ञान जे सांगते ते करून दाखविते . प्रत्यक्षात आणते. हे कोणालाही मान्य करावेच लागेल.
धर्ममार्तंड, योगगुरू, आध्यात्मिक गुरू असे लोक अनेक दावे करत असतात. अग्निहोत्र केल्याने वातावरण शुद्ध होते, हठयोगाने अष्टसिद्धी प्राप्त होतात, सूक्ष्म देह धारण करून अदृश्य होता येते. मंत्रजपाने अतींद्रिय शक्ती प्राप्त होते. दुसर्याच्या मनातील विचार जाणता येतात. मनसामर्थ्याने आपले विचार दूरस्थ व्यक्तीच्या मनात प्रकट करता येतात. ॐ काराच्या गुंजनाने प्रचंड ऊर्जा निर्माण होते. गायत्री मंत्राच्या जपाने अलौकिक शक्ती प्राप्त होते. अशा अनेक गोष्टी सांगतात. पण प्रत्यक्ष प्रयोग करून यांतील एकाची तरी प्रचीती दाखवा असे आव्हान दिल्यावर ,"हे धर्मग्रंथात लिहिले आहे, भगवंतांनी स्वमुखे वर्णिले आहे, त्रिकालज्ञ ऋषिमुनींनी सांगितले आहे," असे म्हणून गप्प बसतात. धर्ममार्तंड जे सांगतात , ग्रंथांत जे काही लिहिले आहे त्याचा कोणाला कधी अनुभव आल्याची विश्वासार्ह अशी एकही ऐतिहासिक नोंद नाही. आपल्या देशावर अनेक इस्लामी आक्रमणे झाली. त्यावेळी मंदिरांतील कैक मूर्ती आक्रमकांनी फोडल्या. पण कोण्या धर्माभिमान्याने योगसिद्धीचा, मंत्रजपाचा अथवा अन्य कोणत्या कर्मकांडाचा प्रयोग करून मूर्ती वाचविल्याचे अथवा भंग झालेली मूर्ती पुन: जोडल्याचे एकही उदाहरण नाही. विज्ञान आपला प्रत्येक नियम, प्रत्येक तत्त्व सिद्ध करून दाखविते. किंबहुना जे सिद्ध होऊ शकत नाही त्याला विज्ञानात स्थानच नसते.
विज्ञानाला इतकी सफलता कशी मिळते? वैज्ञानिक ज्ञान इतके विश्वासार्ह का ठरते ? याचे प्रमुख कारण म्हणजे विज्ञानात अंगभूत असलेली स्वयं दोषनिवारण यंत्रणा. तसेच विज्ञानात सर्व प्रकारच्या शंकांचे, प्रश्नांचे स्वागत होते. विज्ञानात पवित्र ,पूजनीय, अपरिवर्तनीय असे काही नसते. नवनवीन कल्पनांना तिथे मुक्तद्वार असते. त्याच बरोबर प्रत्येक कल्पनेचे कठोर परीक्षणही होते. या सर्वांचा सुपरिणाम म्हणून विज्ञान अधिकाधिक विश्वासार्ह बनते.
बहुसंख्य माणसांनी पवित्र मानलेल्या पिढ्यानुपिढ्या उराशी बाळगलेल्या श्रद्धा जेव्हा विज्ञाननिष्ठ विचारसरणीपुढे खोट्या ठरतात, माणसाच्या ऐहिक प्रगतीला बाधक ठरतात तेव्हा विज्ञानप्रेमी व्यक्ती त्या श्रद्धांवर टीका करतात. त्या अज्ञानातून जन्माला आलेल्या आहेत, माणसाने त्या सोडून द्यायला हव्या असे सांगतात. त्याने श्रद्धावंतांच्या भावना दुखावतात. खरे तर त्यांच्या श्रद्धा जर दृढ असतील,अतूट असतील तर त्यांना वैज्ञानिकांची टीका हास्यास्पद वाटायला हवी. त्यांनी त्या टीकेकडे दुर्लक्ष करायला हवे अथवा तिचा प्रतिवाद करायला हवा. पण तसे न होता त्यांच्या भावना दुखावतात. कारण वैज्ञानिकांचे तर्कशुद्ध म्हणणे त्यांच्या बुद्धीला पटते. पण पूर्वसंस्कारांमुळे त्यांची भावना ते मानत नाही. परिणामी हे खरे की ते खरे अशा द्विविधेत ते पडतात. त्यामुळे विज्ञान अहंकारी आहे, उद्दाम आहे आमच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवीत नाही असे म्हणतात. खरे तर विज्ञान हे मानवतेचा एक अविभाज्य भाग आहे. आजचे तसेच भावी पिढ्यांचे जीवन अधिकाधिक सुविधापूर्ण , सुखी, समाधानी, आनंदी आणि सुरक्षित व्हावे, संस्कृती समृद्ध व्हावी, सर्वांची ऐहिक प्रगती व्हावी, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या अत्यावश्यक प्राथमिक सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये, निसर्गाचे संवर्धन करावे, पर्यावरणाचे संतुलन राखावे, ही विज्ञानाची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. मात्र त्यासाठी भ्रामक, अज्ञानमूलक, गोष्टींच्या मागे न लागता विज्ञानसिद्ध, व्यावहारिक, उपयुक्त मार्गांचा अवलंब करावा असे विज्ञानाचे सांगणे असते. त्यांत अहंकार, उद्दामपणा नसतो. विज्ञान सांगते ते सत्यकथन असते. स्वातंत्र्य-समता-बंधुता-प्रेम या मूलभूत मानवी मूल्यांचा विज्ञान आदर करते. आपले विचार दुसर्यांवर लादावे असे विज्ञानाला कधीही वाटत नाही. मात्र इतरांना वैज्ञानिक विचार पटावे, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा असे वैज्ञानिकांना अवश्य वाटते. माणूस परिपूर्ण नाही, त्याच्या हातून चुका होण्याचा संभव असतो याची जाणीव विज्ञानाला सदैव असते. प्रत्येक निसर्ग नियम माणसानेच शोधून काढला आहे. तो अंतिम नाही. अपरिवर्तनीय नाही. त्यात सुधारणा संभवतात. असेच विज्ञान मानते. प्रस्थापित विज्ञान नियमातील त्रुटी, मर्यादा निदर्शनाला आणणार्या, त्यांत सुधारणा घडवून आणणार्या वैज्ञानिकाचा विज्ञान स्वागत करते. सत्कार करते. याचे एक उदाहरण असे:
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे मानवी प्रजातीच्या प्रज्ञेची उत्तुंग झेप, अपूर्व उपलब्धी होय असे सार्थपणे मानले जाते. सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. याच नियमाच्या आधारे प्रक्षेपित केलेली आपली अंतराळयाने कित्येक महिने लक्षावधी किलोमिटरचा प्रवास करून ठराविक दिवशी, अवकाशातील नियोजित जागी पूर्व नियोजित कक्षेत , नेमक्या स्थानी पोहोचतात. यातील अचूकता आश्चर्यकारक, अचंबित करणारी आहे. आपण कोणता सिद्धांत मांडतो आहोत याची न्यूटनला पूर्ण कल्पना होती असेच म्हणावे लागते. न्यूटनची महानता शब्दातीत आहे.
न्यूटनच्या या नियमापुढे वैज्ञानिक नतमस्तक झाले. पण त्यांनी त्याला तसे सोडले नाही. या नियमात कुठेतरी बारीक फट असेल का? त्रुटी असेल का? हा वैश्विक नियम सर्वकाळी, सर्वस्थळी, कोणत्याही परिस्थितीत अबाधित राहील का? याविषयी ते विचार करू लागले. वस्तूचा वेग अति प्रचंड असेल, गुरुत्वाकर्षण बल कित्येक पटीनी अधिक असेल तर न्यूटनचा नियम पूर्णांशाने खरा ठरणार नाही असे गणिते करून लक्षात आले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांत आणि विशेष सापेक्षता सिद्धांत यांचा जन्म या संशोधनातून झाला. प्रत्यक्ष खगोलीय निरीक्षणांतून या दोन नवीन सिद्धांतांना पुष्टी मिळाली.
अंतराळ संशोधनाच्या गणितात न्यूटनचा नियम आजही उपयोगी पडतो. तोच वापरतात. पण असामान्य वेग आणि अतिबलवान गुरुत्वाकर्षण अशा क्वचित् आढळणार्या परिस्थितीत तो अपुरा पडतो. आईन्स्टाइनच्या सिद्धांतानुसार न्यूटनच्या गणितात सुधारणा करावी लागते. न्यूटनच्या महान सिद्धांतातील त्रुटी आणि त्याच्या मर्यादा आईन्स्टाइनने स्पष्ट केल्या. विज्ञान क्षेत्रात त्याचे केवढे तरी मोठे स्वागत झाले. आईनस्टाइनचे नाव अजरामर झाले. पण त्याचे हे सापेक्षतेचे सिद्धांत तरी त्रिकालाबाधित असतील का? वैज्ञानिक तसे मानत नाहीत. संशोधन चालू आहे. आता पुंज यामिकीच्या (क्वांटम मेकॅनिक्स) गणिताने पुढे काय नवीन आढळेल न कळे. "आमच्या धर्मग्रंथात काही चुका असू शकतील. त्रुटी आढळू शकतील." असे जगातील एकतरी धर्मगुरू कधी म्हणेल काय? कुठल्याही धार्मिकाला असे कधी वाटेल काय?
"आम्ही अज्ञ बालके आहोत. हीन-दीन-पतित आहोत. दुर्बळ आहोत." असे देवापुढे म्हणायचे. जे श्रुति-स्मृति-पुराणोक्त आहे ते सगळे त्रिकालाबाधित सत्य मानायचे. आपण चिकित्सा करायचीच नाही. कोणी केली आणि श्रद्धेतील निरर्थकता सप्रमाण दाखवून दिली की आमच्या भावना दुखावल्या म्हणून चवताळून उठायचे आणि सत्य सांगणार्याचा जीव घ्यायला धावायचे. अशाने धर्मात सुधारणा होऊ शकेल काय? आजवर ज्या धार्मिक सुधारणा झाल्या त्या धर्म न मानणार्या समाजसुधारकांनी राज्यकर्त्यांकडून करवून घेतल्या. त्या सुधारणांना धर्मिकांनी कायम विरोध केला. अगदी सतीबंदी कायद्याला सुद्धा.
आज विज्ञान हेच माणसाचे आशास्थान आहे. विकसनशील देशांना अंधश्रद्धा, दारिद्र्य, अज्ञान, मागासलेपणा, यांच्या विळख्यातून बाहेर बाहेर पडण्यासाठी विज्ञानाचा प्रसार,वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार , हाच एक विश्वसनीय मार्ग आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि नागरीकरणाला चालना मिळू शकेल. ज्या देशांत विज्ञानाचा अव्हेर करून देव-धर्माचे ,अंधश्रद्धांचे स्तोम माजते ते देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले राहातात. भारतात हा धोका आज वाढत आहे.
................................................................................................................................
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपला मान ठेऊन!!!!
बहुसंख्य माणसांनी पवित्र
आपण म्हणता त्यानुसार ईतका
इथे तडजोड करता येईल.
म्हणजे पुराणातील वांगी
अवघड आहे राव
यनावाला,
म्हणूनच नरेंद्र दाभोलकर
लेख वाचला
स्वत: आर्थिक अफरातफर करणारे
हीन विधान
+१
आपण सोयी साठी दाभोलकरांचे
सहमत.
फॅसिझम म्हणजे...
याच न्यायाने उद्या मग
हो.
म्हणजे बाबरी पाडणारे, देवळे
अवांतर : बाबरी मशीद म्हणजे काय?
मुसलमानांच्या धार्मिक स्थळाची
अवांतर : तिथे किबला नव्हता
अचुक....
छान लेख. आवडला.
आजचे तसेच भावी पिढ्यांचे जीवन
विज्ञानाचं लेखन धर्मावर टिका
ॐ 卐 ✝ (*
मला वाटले नास्तिकाच
=))
ओ काका
सर
"ज्या देशांत विज्ञानाचा अव्हेर करून देव-धर्माचे.....
उपदेशपर आज्ञा
या लेखनात उपदेश नसतो. कसला
लेख आवडला
आपला मान ठेवुन.......... मला
दाभोलकर फड्डेखोर होते
हिंदुजनजागृतीचे नाव पाहूनच
धर्मादाय आयुक्तांकडील नोंदी
आरोप तुम्ही केलाय.
हिंदुजनजागृतीचे नाव पाहूनच
आता तुम्ही हिंदुजागृत्ती चा
काल च्या झी २४ तास मधे मुक्ता
प्रघा,
मान्य. पण बहुतांश लोकं तसं
पुढचा मुद्दा
सचोटी हवीच
सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना
वरील प्रतिसाद फक्त गापै
अवांतर : नैतिक जबाबदारी म्हणजे काय ?
हे हे हे हे. =))