माझी धावपळ
लेखनप्रकार
हा लेख ईतर संस्थळावर आधी प्रकाशित केलेला आहे. तसेच लेखात काही ईतर संस्थळांचे आणी सदस्यांचे काही संदर्भ आहेत. सं.मं. ला विनंती की जर हा लेख येथे अयोग्य वाटल्यास उडवुन टाकावा.
---------------------------------------------------------------------------------
ह्या शनिवारी (२० फेब्रुवारी २०१६) मी मरिना रन २०१६ ही हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. त्या अनुभवाबद्दल आणी गेल्या अडीच तीन वर्षातील एकूण धावपळीबद्दल हा छोटेखानी(?) लेख ! पहिलाच प्रयत्न आहे माझा लिहिण्याचा, तेव्हा काही चुका असतील तर माफ करा, आणी काही सूचना असतील तर जरूर सांगा.
पाप्याचं पितर हे नाव मला फार लहानपणापासूनच चिकटलं होतं. माझी अंगकाठी पण होती तशीच, अतिशय कमी उंची आणी काडीपैलवानास साजेशी अंगयष्टी. शाळा कॉलेजात अभ्यास सोडून इतर सर्व (वायफळ) गोष्टीत सहभाग असायचा. आमची शाळा ज्या कुठल्या आंतरशालेय स्पर्धांत भाग घेत असे, त्या सर्व संघात मी असायचोच असायचो. कॉलेजमध्ये असतानाही वॉटरपोलो टीमचा मेंबर होतो. लग्न झालं तेव्हा माझं वजन निव्वळ ६० किलो होतं!!
लग्नानंतर मात्र या सगळ्यात आमूलाग्र बदल होत गेले. मुंबईत बैठा जॉब आणी अनियमित जेवणाच्या वेळा, यामुळे माझं वजन वाढतच जायला लागलं. त्यातच सोबतीला चैतन्यकांडी वगैरे सवयीपण चालू झाल्या. आपण मनात येईल तेव्हा सोडू शकतो या भ्रमात राहून, त्याच कधी व्यसन लागले ते कळले पण नाही. एकूणच तब्येतीकडे करता येईल तितके दुर्लक्ष करायला लागलो होतो. त्यात मुंबईत फार धावपळ असते, व्यायामाला वेळच मिळत नाही वगैरे सबबी स्वतःच स्वतःला पटवून देऊ लागलो होतो. बाकी पण बरेच बदल झाले - आधी पट्टा घेताना मला अॅडिशनल होल्स करून घ्यावे लागायचे, त्याची काहीच गरज उरली नाही. लग्नात घातलेला सूट कपाटात जागा अडवून बसला होता, शेवटी तो देऊन टाकला, आता मी त्याला आणि तो मला कधीच सूट होणार नाही ह्याची खात्रीच पटली होती.
होता होता वजन ६० चे ८२ च्या वर पोचलं. तरीपण मनात उगाच एक खोटा आत्मविश्वास होता की जिम लावलं किंवा पोहणं चालू केलं की २ महिन्यात वजन कमी करू शकेन मी. जिम बर्याच वेळा लावलाही, पण सर्व पैसे बहुतेक पहिल्या दिवशीच जिम करताना आलेल्या कंटाळ्यामुळे वाया गेले. पोहायलाही पैसे भरले, पण ते ५० मीटरचे ४-५ लॅप झाल्यावर गप्पा मारण्यासाठी टँकला देणगी म्हणून दिले होते. मध्ये जी.एम. डायट वगैरे प्रकारही करून पाहिले, त्याचा उपयोग माझ्यापेक्षा सब-वे दुकानवाल्यांनाच जास्ती झाला ! असो, थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्व तर्हेने शक्य असेल तेवढी हेळसांड आणी त्यांहून महत्त्वाचे म्हणजे स्वतःची फसवणूक करत अनेक वर्ष काढली.
माझ्या अनेक मित्रांना कंबरेचे आणी पाठीचे दुखणे चालू झाले होते, पण मला सतत असे वाटत असे की मी एवढे सगळे खेळ खेळणारा आहे (खरं तर तो आता फारच भूतकाळ होता) मग मला असलं काही होणे शक्यच नाही. ज्या कोणाला त्रास होत असे, तो कंबरेला पट्टा वापर, गाडीत सीटच्या पाठीला काही मणी लाव आणि दर दोन तीन महिन्याने उपचार पद्धतच बदल असे प्रकार करत असे. एकूणच वजन कमी केलंच पाहिजे आणी जीवनशैली आमूलाग्र बदलली पाहिजे असले विचारही (आचारात आणणं तर सोडाच हो) करणं सोडून, खर्चिक जे जे असेल ते सर्व करत प्रत्येक जण आपल्या मनाची समजूत घालत होता.
आधी मुंबईत घर ते स्टेशन, मग लोकलची धावपळ वगैरे हालचाल तरी होत होती. नंतर थोडी आर्थिक स्थिरस्थावर झाल्यावर स्वतःचे वाहन आले. मग काही दिवस खरंच असे असत की जेव्हा मी फक्त चैतन्यकांडीसाठी १००-२०० मीटर चालत असे ! !! बाकी व्यायाम काहीच नाही !
साधारण तीन वर्षापूर्वी नोकरी बदलून परदेशी आलो. इथली सुरुवातीची नोकरी तर फारच हेक्टीक होती. दिवसाचे कमीत कमी १३ तास ऑफिस आणी २ तास प्रवास असे काही दिवस काढले. इथेही तेच हाल, चैतन्यकांडीसाठी आता तर चालावेही लागायचे नाही. इथे पाकीट ठेवावे लागते ! त्यामुळे खिशातच पाकीट, सो चालायचे नो टेन्शन.
अखेर एक दिवस उजाडला ज्याने मी एकदम भानावर आलो. ऑफिसमध्ये काम करताना माझ्या कंबरेत भयंकर वेदना सुरू झाल्या. मला धड खुर्चीतून उठताही येईना आणी खुर्चीत नीट टेकून बसताही येईना. बरेच खेळ खेळल्याने आणी अनेक वेळा धडपडल्याने मला शारीरिक वेदना काय असते ह्याची कल्पना होती, पण हा प्रकार काही वेगळाच होता. तेव्हा पहिल्यांदी मला लक्षात आलं की आता वजन कमी करण्याशिवाय पर्याय नाही.
जिम वगैरेचा मला मनापासून तिटकारा आहे, झेपत नाहीत ती वजन उगाच आह ऊह आवाज काढत कशाला उचलायची अस मला सतत वाटत राहत. पोहणंही जमण्यासारखं नव्हत कारण इथले तलाव सकाळी ८ ला उघडतात.
तेव्हा आपण पळूया असा विचार केला. त्याच सुमारास माबो वरील मॅरॅथॉन धागा वाचत असे. मला तेव्हा खरंच असं वाटायचं की उगाच कशाला लोक ४०-४२ किमी पळत असतात ! त्यात काय असं थ्रिल असत, एक वीकांत मिळणार ५ दिवस काम करून, त्यात कशाला एवढा जीवाला त्रास करून घ्या !! पण म्हणलं , आपण वजन करण्यापुरती सुरुवात तर करू. कंबरदुखी साठी पेन किलर घेतच होतो, मग एक आठवड्याने तो शुभमुहूर्त आला.
माझ्या (जुन्या) घराखालीच एक जॉगिंग ट्रॅक होता. पहिल्या दिवशी कसा बसा सकाळी उठून गेलो, पण जोष फार टिकला नाही. साधारण ५०० मीटर (म्हणजे सलग ४.५ ते ५ मिन असेल) पळाल्यावर मला एवढा दम लागला की मी मटकन जमिनीवर बसलोच. मला असं वाटायला लागलं की कोणीतरी इथून उचलून मला घरी सोडावं, आता आपल्या पायांनी मी काही जाऊ शकणार नाही ! माझ्या अधोगतीने खरंच मलाच धक्का बसला, स्वतःची लाज वाटली मला !! पण मनाशी निश्चय केला की काही झालं तरी दररोजचे पळणे बुडवायचे नाही, फोकस फक्त नियमितपणावर ठेवायचा. पहिला एक आठवडा अगदीच जुजबी पळत असे, रोज साधारण २००-३०० मीटर्स फक्त. मग साधारण दोन तीन आठवड्याने ठरवले की आपण दर २ दिवसांनी आधीपेक्षा १ मिनटं जास्ती पळायचा प्रयत्न करूया. असे करत करत मी १.५ ते २ किमी पोचलो. माबोवरील मॅरॅथॉन हा धागा आणी हर्पेनचे धागे माझ्यासाठी गाईडिंग स्टारचे काम करत होते. त्या धाग्यावर दिग्गजांच्या प्रतिसाद वाचून बरंच शिकायला मिळत होतं.
हळू हळू २ चे ३ किमी झाले रोजचे. ३ वर बरेच महिने नियमित होतो, मग हळू हळू हुरूप वाढत गेला. शनिवारी मी जरा लांब पळायला लागलो (साधारण ६-८किमी वगैरे). रोज ३ चे मग ५ केले, आता मिनिट न वाढवता सरळ अर्धा किमी वाढवत गेलो, आणी शनिवारच्या पळण्यात पण अंतर खूप वाढवलं. ह्यात साधारण वर्ष दीड वर्ष सहज गेलं असेल. नियमितपणा ही एक साधी सवय अंगी बाणवली तर काय फायदा होऊ शकतो हे अनुभवत होतो स्वतः.
आता मी जॉगिंग ट्रॅक सोडून इथे पार्क्स मध्ये असलेल्या रनिंग ट्रॅक्स वर पळायला सुरुवात केली. पार्क्स मध्ये पळण्याचा फायदा म्हणजे सरळ रस्ता असतो आणि त्यावर अंतरे स्पष्ट अक्षरात लिहिलेली असतात.
पाहिल्या ५०० मीटरच्या दयनीय अनुभवानंतर साधारण २.५ वर्षाने मी इथे हाफ मॅरॅथॉनला रजिस्टर केलं. रात्रीची रेस होती, पण दिवसभर पाऊस झाल्याने आणि संध्याकाळी पाऊस थांबून सूर्य दिसू लागला आणी भयंकर दमट हवा असल्याने विचित्र वातावरण तयार झाले होते. तसेही आमच्या गावात दोनच ऋतू असता - उन्हाळा आणि अती उन्हाळा !! पण नियमित सराव असल्याने मी कुठेही न दमता आणी न थांबता हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. तसेच वाचलेल्या टिप्स प्रमाणे दर थोड्या वेळाने घोट घोट पाणी पीत आणि वेग अती न वाढवता तसेच कमीही न करता पळत राहिलो. माझी २१ किमी ची वेळ २ तास २५ मिन होती.
मला स्वतःला २.५-३ वर्षात माझ्यात झालेला बदल खूपच जाणवतो. मी पाहिल्यापासून बाहेरच कमीच खातो. घरीही जरी मी कधीच अती खात नसलो तरी मला खाण्यावर निर्बंध घातले की जास्ती भूक लागते. म्हणून जेव्हा व्यायाम चालू केला तेव्हाच ठरवले होते, की पाहिजे तर २ राउंड्स जास्ती मारू पण हे खाणार नाही, ते खाणार नाही असलं अजिबात करणार नाही, आणी ते पाळतही आहे. आधी मी सकाळी जर व्यायाम केला तर दमल्याने ऑफिसमध्ये झोप येते वगैरे कारणं स्वतःलाच पटवून व्यायाम टाळत असे. पण आता जर सकाळी जमले नाही तर संध्याकाळी कधीही घरी पोचलो तरी पळायला जातोच जातो. पाऊस असला तरी पळणे चुकवत नाहीच नाही. पूर्वी मला दिवसभर, खास करून दुपारी जेवल्यावर ऑफिसमध्ये प्रचंड झोप यायची, तसंच दिवसभर आळसटल्यासारखेहि वाटत असे. पण पळायला लागल्यापासून मला अजिबात (ऑफिसमध्ये) झोप येत नाही. सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि तत्सम तब्येतीच्या तक्रारी पूर्णपणे बंद झाल्या आणी माझं वजन ८२ वरून आता ६९.५ वर आलं आहे. आणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वजन हळूहळू कमी होत आल्याने कंबरदुखीने परत मान वर काढलेली नाहीये. आता २ टार्गेट आहेत, वजन ६५ वर आणणे आणि पूर्ण मॅरॅथॉन पळणे, बघू कधी जमते ते.
असो, मला माहीत आहे की २१ किमी पळणे काही एव्हरेस्ट चढण्यासारखी आणी ढोल बडवून सांगण्याइतकीही कामगिरी नाही, पण मला लिहावेसे वाटले म्हणून लिहिले आहे. होप सो तुम्हाला आवडेल. नाही आवडले तर तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल क्षमस्व.
वाचने
6715
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
अभिनंदन...!!!!
ग्रेट!
In reply to ग्रेट! by पैसा
प्रेरक धागा..संपूर्ण अनुमोदन.
वा! अभिनंदन!
अभिनंदन!!
अभिनंदन...
मस्तच अनुभव असेच पळत रहा :)
आत्मपरिक्शणात्मक छान लेख.
अभिनंदन!
तुमची ऊंची किती? त्यावर तुमचे
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.
अभिननदन!!!
बेकार तरुण -
In reply to बेकार तरुण - by सुबोध खरे
कशाला एवढी मेहनत करताय डॉक
ज्जेब्बात, लढ बाप्पू. अशी
जबरदस्त
छान लिहीलय! अभिनंदन!
प्रेरणादायी
प्रेरणादायी लेख.सध्या
जादू वगैरे खरेच असते , फक्त
खूप मस्त प्रेरणादायी लेख
छान लिहिलं आहे. आयडीनाम बदललं
खुप मस्त लेख...
नियमितपणे व्यायाम करणे यासाठी
प्रेरणादायी अनुभवकथन
फार च कौतुकास्पद !
In reply to फार च कौतुकास्पद ! by स्रुजा
स्रुजा ताई,
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
प्रेरणात्मक स्वानुभव आवडला....
भले शाब्बास! आवडली तुमची
सही...
माबो वरील मॅरॅथॉन धागा वाचत असे
सुरेख लेख
आत्ता वाचला
शाब्बास..
वा वा! प्रेरक लेखन.
In reply to वा वा! प्रेरक लेखन. by चतुरंग
नवीन प्रतिसाद देणार्यांचा