✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शोध उत्तरांचा : आपण सारे गुलाम आहोत का?

स
सतिश गावडे यांनी
Mon, 02/22/2016 - 00:44  ·  लेख
लेख
आपण सारे गुलाम आहोत का? हा धागा वाचला आणि लक्षात आलं की यातील काही प्रश्न मलाही सतावत असतात. गेले काही वर्ष मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. ही उत्तरे शोधताना मी जमेल तितके वाचले. त्यावर विचार केला. आणि आपल्याला थोडं फार कळत आहे असं वाटू लागले. त्याआधारे मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे माझे आकलन चुकीचे असेल तिथे नक्की सुधारणा सुचवा.
आपण सारे गुलाम आहोत का?
आपण या प्रश्नाला मुख्य प्रश्न समजू या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय मानता यावर अवलंबून आहे. तुम्ही काय मानता हे तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला तुमच्या आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच (ज्याला आपण नेहमीच्या भाषेत पिंड म्हणू शकतो) आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती यावर अवलंबून आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे देता येत नाही. ते हो, नाही, काही प्रमाणात हो आणि काही प्रमाणात नाही यापैकी काहीही असू शकते. शिवाय हे प्रमाणही व्यक्तीगणिक वेगळे असू शकते.
1. "All men are created equal" has been called an "immortal declaration," and "perhaps [the] single phrase" of the American Revolutionary period with the greatest "continuing importance". अमेरिकन राज्यघटना हे उच्चरवाने सांगते ...
असं अमेरीकेच्या घटनाकारांचं मानणं आहे. हे एक प्रकारचे तत्वज्ञान आहे. मानवी मन (खरं तर मानवी मेंदू) उत्क्रांत होत असताना ज्या नैतिकतेच्या कल्पना तयार होत गेल्या त्या कल्पना अंमलात आणण्यासाठी, समाज गुण्यागोविंदाने नांदावा म्हणून हे असं "मानण्यात" आलं. हेच कुठल्याही लोकशाही देशाच्या घटनेला लागू होईल. किंबहूना हुकुमशाही असलेल्या देशांमध्ये नागरीकांसाठी जी काही नियमावली असेल त्यातही असे काही तरी "मानलेले" असेल आणि त्या देशाच्या नागरीकांना ते बंधनकारक असेल.
2. असे असताना आज जगात जे चित्र दिसते त्यानुसार आपण सर्वजण पैशाचे व पर्यायाने पैसेवाल्यांचे गुलाम आहोत .
"आपण सारे गुलाम आहोत का?" या मुख्य प्रश्नाचे उत्तर इथेही लागू होते. "नाही" या उत्तराचा विचार करता पैशाची गुलामगिरी झिडकारून जंगलात झोपडी बांधून नैसर्गिक अन्नावर जिवंत राहण्याचा पर्याय आपल्या प्रत्येकाकडे आहे. मात्र ते आदिमानवाचं जगणं होईल. किंबहूना आपला उत्क्रांत मेंदू आपल्याला ते पाऊल उचलूच देणार नाही. तसे नसते तर कुंभमेळ्याला आलेल्या साधूंकडे मोबाईल आणि लॅपटॉप दिसले नसते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर खुपच कमी लोक "नाही" असे देतील. हो आणि नाही च्या मधले बरेच जण असतील. पुण्यात पाच खोल्याच्या घराच्या कर्जाचे हप्ते भरणारी मंडळी या प्रश्नाचे उत्तर "हो" असे देतील.
3. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला या पृथ्वीतलावर जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते .
ही काळाच्या ओघात उत्क्रांत झालेल्या मानवी मेंदूची करामत आहे. एका प्रतिसादात डॉ. सुहास म्हात्रे म्हणाले होते की "उत्क्रांत मेंदू" हा माणूस या प्राण्याचा आजार आहे. ते तंतोतंत पटते. प्राण्यांचा मेंदू तीन टप्प्यात प्रगत होत गेला. १. रेप्टीलियन ब्रेन - सरपटणार्‍या प्राण्यांचा मेंदू २. लिम्बिक ब्रेन - निसर्गाने सस्तन प्राण्यांच्या मेंदूला रेप्टीलियन ब्रेनच्या वर अजून एक थर दिला तो हा लिम्बिक ब्रेन. या भागामुळे सस्तन प्राणि सरपटणार्‍या प्राण्यांपेक्षा "प्रगत" झाले. ३. निओ कॉर्टेक्स - हा मेंदुच्या सर्वात वरचा थर जो फक्त माणसाकडे आहे. आपलं माणूसपण ही या निओ कॉर्टेक्सची करामत आहे. त्याचबरोबर आपले माणूस म्हणून असलेले प्रश्नही याच निओ कॉर्टेक्समुळे आहेत. अन्नासाठी दाही दिशा भटकणार्‍या मानवाला योगायोगाने शेतीचा शोध लागला. मुबलक पीक येऊ लागल्याने अन्नाची ददात मिटली. स्वतःची अन्नाची गरज भागवून झाल्यानंतर धान्य उरू लागल्याने हे धान्य इतरांना देता येऊ लागले. त्यामुळे काही लोक शेती न करता ईतर गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. यातून उद्योगधंदे विकसित झाले. एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी बलुतेदारी पद्धत अस्तित्वात आली. पुढे काळाच्या ओघात "श्रमाच्या बदल्यात श्रम" ही संकल्पना नष्ट होऊन "पैसे" नावाच्या गोष्टीचा माणसाने शोध लावला. आणि ओघानेच पैसा असेल तरच माणसाला सेवा "विकत" मिळू लागल्या. अन्नासाठी दाही दिशा भटकणार्‍या माणसाला तंत्रज्ञानाच्या एकविसाव्या शतकात आणून सोडले ते त्याच्या मेंदूच्या सर्वात वरच्या थराने. अर्थात निओ कॉर्टेक्सने. इतर प्राण्यांमध्ये ही निओ कॉर्टेक्सची भानगड नाही. नाही म्हणायला कपी वर्गाच्या ईतर प्राण्यांमध्ये अतिशय प्राथमिक स्वरूपाचा निओ कॉर्टेक्स असतो. तो मानवाईतका प्रगत नसल्याने ते माणसांच्या भानगडीतून सुटले.
4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल 5. म्हणजेच पुरुष अथवा मनुष्यप्राणी आपल्या हार्मोनिक (लैंगिक )गरजा भागवण्यासाठी देखील अनावधानाने विरुद्धलिंगी व्यक्तीचे म्हणजेच पर्यायाने पैशाचे लांगूलचालन अथवा गुलामी करतो .
अशी काही उदाहरणे आपल्या पाहण्यात येत असली तरीही हे सरसकट म्हणता येत नाही. प्रेमापोटी आपल्या सधन, उच्च सामाजिक स्तर असलेल्या आई वडीलांच्या विरोधाला न जुमानता आपल्यापेक्षा कनिष्ठ आर्थिक आणि सामाजिक स्तर असलेल्या तरूणाबरोबर लग्न करणार्‍या मुली आपण आजूबाजूला पाहतो. सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. आपण बालपन - पौगंडावस्था - तारुण्य अशा अवस्थांमधून जात असताना आपल्या मनात आपल्या जोडीदाराची प्रतिमा हळूहळू आकार घेत असते. इथेही पुन्हा आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती हे प्रभावी घटक ठरतात. या प्रतिमेशी थोडी फार मिळती जुळती व्यक्ती संपर्कात आली की माणूस "प्रेमात पडतो". मेंदूतील डोपॅमाईन आपले काम सुरु करतो. दिवस रात्र तिच्याशिवाय/त्याच्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे पैसा हा एकमेव घटक जोडीदार निवडताना नक्कीच नसतो.
6. ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे .
अध्यात्म कळायला खुप सोपं आहे. आचरणात आणणे महाकठीण. वेदकाळापासून ते आजतागायत प्रत्येक चौकस व्यक्ती आपल्या अस्तित्वाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. "मी कोण आहे?" "मी कशासाठी जन्माला आलो?" हे आणि असेच ईतर प्रश्न भुंग्याप्रमाणे माणसाचा मेंदू पोखरत आहेत. काही जण "मी कोण आहे?" या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचले. माणूस आपल्या शरीराबद्दल, त्याच्या अवयवांबद्दल उल्लेख करताना "माझे शरीर, माझे हात, माझे पाय" असा करतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराहून वेगळे आहोत ही जाणिव माणसाला झाली. मी म्हणजे माझे शरीर नाही तर मग मी कोण? शारीरीक वेदनांच्या पलीकडेही दु:ख म्हणून काहीतरी आहे. माझ्या शरीराला वेदना होतात आणि मी दु:खी होतो. म्हणजेच मी माझ्या शरीराहून वेगळा आहे. हा जो मी आहे तो "स्व". तेच "अस्तित्व". दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत माणसाचे एकंदरीत निसर्गनियमांचे आकलन मर्यादीत होते. त्याला कळत नव्हते हा सभोवतालचा निसर्ग, पशू, पक्षी आणि तो स्वतः कसा तयार झाला. दिवसा प्रकाश देणारा सूर्य नामक आगीचा गोळा, रात्री शीतल प्रकाश देणारा चंद्र, ढगांचा गडगडाट, विजांचे चमकणे, पाऊस पडणे हे सारे त्याच्या डोक्याच्या वर असणार्‍या "आकाशात" घडत होते. त्यामुळे त्या विशाल आकाशात हे सर्व घडवणारी कुणीतरी शक्ती राहत असावी असा त्याचा ग्रह झाला. आपल्या अस्तित्वाला माणसाने "आत्मा" असे नाव देऊन आकाशातील शक्तीला "परमात्मा" असे नाव दिले. आत्म्याची परमात्म्याशी सांगड घातली. आता आपण विसाव्या शतकात येऊ या. माणसाने मेंदूत कोणत्याही प्रकारचे उपकरण किंवा हत्यार न खुपसता मेंदूत घडणार्‍या हालचाली पाहण्याचे तंत्र (noninvasive imaging techniques) विकसित केले. माणसाचे मन हा त्याच्या मेंदूने शरीरांतर्गत तसेच बाह्य उत्तेजक संवेदनांना (stimuli) दिलेला प्रतिसाद आहे हे त्याच्या लक्षात आले. किंबहूना माणसाची सारी सुख दु:खं हा त्याच्या मेंदूतील चेताप्रक्षेपकांचा कल्लोळ आहे हे कळू लागले. अगदी कालपरवापर्यंत माणूस ज्याला "स्व" किंवा "अस्तित्व" म्हणत होता तीसुद्धा मेंदूचीच करामत असावी असा कयास त्याने बांधला. आजही या जाणीवेचे मेंदूतील स्थान किंवा जाणीव (consciousness) मेंदूत कशी तयार होते यावर संशोधन चालू आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. जियुलिओ टोनोनी (Giulio Tononi) यांनी जाणीवेसंदर्भात "एकत्रित माहिती सिद्धांत" (Integrated Information Theory) मांडला. मेंदूच्या विविध भागातून माहिती एकत्र येऊन त्याची सलग अशी जाणिव तयार होते अशा अर्थाचा तो सिद्धांत आहे. यात "स्व" ची जाणीवही आलीच. अर्थात हा सिद्धांत विज्ञान जगताने स्विकारलेला नसून यावर अधिक संशोधन चालू आहे. ही सारी माहिती घेतल्यानंतर आपण पुन्हा आपल्या "ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे" या मुळ मुद्दयाकडे वळू या. आज होमो सेपियन्स हा प्राणी काळाच्या अशा टप्प्यावर उभा आहे की जिथे पैसा नसेल तर त्याचे आयुष्य भयावह बनेल. जगण्यासाठी माफक प्रमाणात का होईना, पण पैसा हवाच. पैशाची सर्वथा गुलामगिरी नको असेल तर माणसाला पुन्हा एकदा आदि मानवाची जीवनशैली अंगिकारावी लागेल. Materialistic problems need materialistic solutions. नुसती "स्व"ची जाणीव झाल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी माफक प्रमाणात का होईना पैशाची गुलामगिरी स्विकारावी लागेल किंवा आदिमानवासारखे जंगलात जाऊन कंदमुळं, फळं खावी लागतील. पशू मारावे लागतील. (अर्थात हे ही स्वातंत्र्य नाहीच. जंगल कुणाच्या तरी मालकीचे असू शकते. पशू हत्येस कायद्याने बंदी असू शकते) थोडक्यात, तुमच्या-माझ्यासारख्याला पैशाची गुलामगिरी चुकणार नाही. मात्र आपण "स्व"ची जाणीव तेवत ठेवून ती गुलामगिरी कितपत पत्करायची यावर नियंत्रण ठेवू शकतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
12272 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

विचारप्रवर्तक उत्तरे.

प्रचेतस
Mon, 02/22/2016 - 07:45 नवीन
विचारप्रवर्तक उत्तरे.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/23/2016 - 05:46 नवीन
असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लेख आवडला.

जेपी
Mon, 02/22/2016 - 08:17 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

किती रे जड लेख तो! वाचताना

कंजूस
Mon, 02/22/2016 - 08:33 नवीन
किती रे जड लेख तो! वाचताना डोक्याला मुंग्या आल्या ना. भारीच विचार करता शनिवर रविवारी.
  • Log in or register to post comments

सहमत

राही
Mon, 02/22/2016 - 09:11 नवीन
विचारांशी सहमत. मूळ लेख वाचल्यावर आणखी एक मुद्दा सुचला होता. तो असा की आपण स्वतःला कितीही स्वतंत्र, मोकळे समजत असलो तरी तसे नसतो. आपण सभोवतालाशी, परिसराशी, जडशिळाशी, प्राणी, वनस्पती, मानव, नातेवाईक, या सर्वांशी सूक्ष्म रूपाने जोडलेले असतो. या बंधांचा ताण जेव्हा सर्व बाजूंनी सारखा असतो तेव्हा आपण स्थिर असतो. कुठेही अतिरिक्त झुकलेले किंवा कललेले नसतो, पण मोकळेही नसतो. स्वातंत्र्याची आणि गुलामीची व्याख्या करताना हा घटक विचारात घेतला पाहिजे. आपली गुलामी किंवा स्वातंत्र्य हे आधीच अस्तित्वात असलेल्या या चौकटीच्या संदर्भातच मोजले पाहिजे; मोजावे लागते.
  • Log in or register to post comments

आत्ता

नाखु
Mon, 02/22/2016 - 09:39 नवीन
मला कळलं त्या (घेतलेल्या)जाडजूड पुस्तकांचं पुढ काय होतं ते !!! भुस्काट पाडणारा लेख, अता आम्ही आम्ची कळण्याची पातळी उंच करायला बाकड्यावर उभे रहावे काय? पण खरं सांगतो असा अभ्यासू प्रतिसाद येण्यासाठी ज्यानी कारणीभूत लेख लिहिला त्या उडन खटोलाम्चे बी आभार.
सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. आपण बालपन - पौगंडावस्था - तारुण्य अशा अवस्थांमधून जात असताना आपल्या मनात आपल्या जोडीदाराची प्रतिमा हळूहळू आकार घेत असते. इथेही पुन्हा आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती हे प्रभावी घटक ठरतात. या प्रतिमेशी थोडी फार मिळती जुळती व्यक्ती संपर्कात आली की माणूस "प्रेमात पडतो". मेंदूतील डोपॅमाईन आपले काम सुरु करतो. दिवस रात्र तिच्याशिवाय/त्याच्याशिवाय चैन पडत नाही.

हा सगळ्यात आवडलेला भाग आणि इथल्या तमाम ईच्छुक्/लाभार्थी/होतकरू वर्गासाठी बोधप्रद !

जियो गावडे मास्तर
  • Log in or register to post comments

bingo !!

सतिश गावडे
Mon, 02/22/2016 - 23:30 नवीन
काल खरेदी केलेल्या पुस्तकातील एक पुस्तक आहे मलिका अमर शेख यांचं आत्मचरीत्र, "मला उध्वस्त व्हायचंय". मलिका अमर शेख या समाजवादी शाहीर अमर शेख यांची कन्या तर दलित पँथरचे संस्थापक आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या पत्नी. पुस्तक छोटेखानी असल्याने अडीच तीन तासांत वाचून संपवलं. आपण नामदेव ढसाळांच्या प्रेमात कसे पडलो हे सांगताना मलिका लिहितातः "... जागिरदारकाकांच्या लक्षात आलं होतं आमचं जवळ येणं... अनिल-भैयांच्याही... त्या काव्यमय, हळव्या वातावरणात आम्ही दोघं कविमनाचे जवळ येत चाललो; पण मला त्याची काहीही माहिती नव्हती. त्याचं पूर्वायुष्य किंवा त्याच्या घरी कोण कोण आहे, तेही ठाऊक नव्हतं. फक्त त्याची कविता ठाऊक होती. कवी, संवेदनाशील, शिवाय राजकारणात थोडी (बरीच) डावी विचारसरणी मानणारा. पुन्हा माझ्या प्रतिमेत फिट बसणारा... मर्दानी, कलंदर, तरी हळवा... माझ्यावर प्रेम करणारा कवी..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मस्त पुस्तक आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/23/2016 - 06:02 नवीन
खुप वर्ष झालीत पुस्तक वाचून म्हणजे मी बी. ए.च्या शेवटच्या वर्षाला वाचलेलं. एक आठवण पुस्तकातील अशी की, नामदेव ढसाळाचा मित्र म्हणतो 'मी तुझ्या बायकोबरोबर झोपू का, तेव्हा ती जर हो म्हणत असेल तर माझी काही हरकत नाही' असं काही तरी होतं, तेव्हा एक वाचक म्हणून मी हादरून गेलो होतो. जिच्याबरोबर प्रेम विवाह केला तो माणूस व्यक्ती स्वातंत्र्याचा इतका आदर करतो की मला काहीच घेणं नाही अशी ती वृत्ती ? आत्मचरित्रात मी हे वाचून चक्रावून गेलो होतो. आणि माझं त्या पूस्त्कातील अजुन एक वाक्य माझं कायम पाठ आहे. मलिका म्हणते ''माझं तारुण्याचं रेषमी वस्त्र चोचीत घेऊन माझा प्रियकर केव्हाच उडून गेला'' मालक, या पुस्तकावर लिहा अजून. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तो परिच्छेद वाचताना मी हबकून

सतिश गावडे
Tue, 02/23/2016 - 09:44 नवीन
तो परिच्छेद वाचताना मी हबकून गेलो होतो. मग लक्षात आले की काही माणसं रुढी, चाकोरींच्या पलिकडची असतात. इतरांनी अंगिकारलेली नीती-मुल्य त्यांना गुलामगिरीचे पाश वाटतात. ढसाळही त्यातलेच होते हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतं.
मालक, या पुस्तकावर लिहा अजून.
आपका हुक्म सर आंखोपर ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"ते" आत्मचरित्र पूर्ण वाचून

सुबोध खरे
Tue, 02/23/2016 - 09:54 नवीन
"ते" आत्मचरित्र पूर्ण वाचून नामदेव ढसाळ मात्र मनातून पार उतरले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

असेच माझे बंध-अनुबंध वाचून

यशोधरा
Tue, 02/23/2016 - 10:02 नवीन
असेच माझे बंध-अनुबंध वाचून झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उत्तम लिहिलं आहेस धन्या.

यशोधरा
Mon, 02/22/2016 - 09:44 नवीन
उत्तम लिहिलं आहेस धन्या. आवडलं. तुला माझ्याकडून एक पुस्तक भेट लागू.
  • Log in or register to post comments

आवडलं!

मन१
Mon, 02/22/2016 - 10:25 नवीन
विचार करण्यासारखं .
  • Log in or register to post comments

खूप काही वाचलेलं समजलं आणि

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/22/2016 - 10:53 नवीन
खूप काही वाचलेलं समजलं आणि मगच त्यावर चिंतन केलं की हे असं काही प्रसवतं ! भन्नाट लिहीलं आहे !! असंच सतत लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

+१०० लिहित रहा सगा सर.

अजया
Tue, 02/23/2016 - 11:23 नवीन
+१०० लिहित रहा सगा सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सगा साहेब लेख आवडला. वाखु

विजय पुरोहित
Mon, 02/22/2016 - 11:09 नवीन
सगा साहेब लेख आवडला. वाखु साठवली आहे. सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. हा संपूर्ण पॅरा विशेष आवडला...
  • Log in or register to post comments

लेख वरवर चाळला....

मुक्त विहारि
Mon, 02/22/2016 - 11:21 नवीन
सांसारीक जबाबदारी पुर्ण करेपर्यंत वयाची पन्नाशी उलटून जाते आणि "स्व"चा शोध घेण्याची उर्मी पण त्याच सुमारास निवून जाते. "स्व"च्या शोधाविषयी बरेच बोलता येईल. आम्हाला असल्या विषयांवर लिहिण्यापेक्षा बोलणेच जास्त आवडते.
  • Log in or register to post comments

जेपींच्या धाग्याबरोबर त्यांचा प्रतिसाद वाचायला हवा होता

विवेक ठाकूर
Mon, 02/22/2016 - 12:10 नवीन
माझे विचाराल तर सध्या मी सर्व जबाबदारी अन बंधांनांतुन मुक्त आहे .... एखाद्या चांगल्या आध्यात्मिक मार्गाच्या शोधात ....दत्तप्रभू , शंकराचार्य अन इतर अनेकांना जे सहजसाध्य होते त्या "आध्यात्मिक वैराग्या"च्या धुंदीत बुडवून घ्यायचे आहे ...पण त्याच वेळेस आपला भार इतरांवर पडणार नाही , आपण इतरांवर अवलंबून असणार नाही , तसेच इतरांकडून फसविले देखील जाणार नाही , याची काळजी घ्यायला हवी. पूर्वायुष्यात आध्यात्माच्या बाजारात मोठा फटका बसलेला - उ.ख. त्यामुळे प्रश्न एक आणि उत्तर भलतच असं झालं आहे.
  • Log in or register to post comments

धागा उखंचा आहे

विवेक ठाकूर
Mon, 02/22/2016 - 13:02 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

लेखातल्या ब-याच मुद्द्यांशी

सस्नेह
Mon, 02/22/2016 - 14:14 नवीन
लेखातल्या ब-याच मुद्द्यांशी सहमत. समूहजीवनात जगताना कोणाचीतरी/कशाचीतरी गुलामगिरी अटळ आहे. जंगलात जाऊन राहिलं तरी पोटाची गुलामगिरी कशी चुकेल ?
  • Log in or register to post comments

पोटाची गुलामगिरी ही तर वेगळीच

सतिश गावडे
Mon, 02/22/2016 - 23:15 नवीन
पोटाची गुलामगिरी ही तर वेगळीच गंमत आहे. खायचं कशासाठी तर जिवंत राहण्यासाठी. आणि जिवंत कशासाठी राहायचं तर प्रजननाच्या माध्यमातून आपला वंश पुढे चालू ठेवण्यासाठी. वैज्ञानिक परीभाषेत याला वंशसातत्य (continuation of species) म्हणतात. मागे "कशावरून हे सारं वंशसातत्यासाठीच होतं?" असा प्रश्न पडला होता. उत्तराचा धांडोळा घेताना एक रोचक चर्चा वाचण्यात आली. चर्चेत लोकांनी मांडलेले मुद्दे वंशसातत्याच्या संकल्पनेच्याही वरताण निघाले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आप्ला म्हन्ना

चौकटराजा
Mon, 02/22/2016 - 19:13 नवीन
आपण अनेक घटकांच्या आधीन असतो पण गुलाम एकाचेच ...... आपल्या अहंकाराचे !
  • Log in or register to post comments

थोडक्यात, तुमच्या

अभ्या..
Mon, 02/22/2016 - 19:19 नवीन
थोडक्यात, तुमच्या-माझ्यासारख्याला पैशाची गुलामगिरी चुकणार नाही. मात्र आपण "स्व"ची जाणीव तेवत ठेवून ती गुलामगिरी कितपत पत्करायची यावर नियंत्रण ठेवू शकतो.
बरेचसे पटले गावडे सर. वरील कन्क्लुजन बरेच अंमलात आणायचा प्रयत्न करतो. नाइलाज होतो तेंव्हा चिडचिड होते. हीच चिडचिड म्हणजे आपल्यात थोडे का होइना स्वत्व तेवत असल्याची खात्री पटवितो अन पुढे चलतो.
  • Log in or register to post comments

हीच चिडचिड म्हणजे आपल्यात

गौरी लेले
Mon, 02/22/2016 - 19:39 नवीन
हीच चिडचिड म्हणजे आपल्यात थोडे का होइना स्वत्व तेवत असल्याची खात्री पटवितो अन पुढे चलतो.
अगदी अगदी ! मनातले बोललास अभ्या ! लिमिटेड चिडचिड अन लिमिटेड कॉम्प्रोमाईज = सफिशियंट आनंद :) खुपच सुरेख लेखन सतीश !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

We are all just prisoners

हेमन्त वाघे
Mon, 02/22/2016 - 23:58 नवीन
We are all just prisoners here, of our own device Hotel कॅलिफोर्निया - EAGLES
  • Log in or register to post comments

हसरते हि हसरतें है, और क्या है...

अर्धवटराव
Tue, 02/23/2016 - 03:14 नवीन
जींदगीका नाम येही दुसरा है. असं काहिसं गाणं ऐकलं होतं. लेख छान उतरलाय गावडे शेठ. तुम्ही म्हणतात तसं, माणसाची कुठलिही कृती/विचार दोन घटकांवर अवलंबुन असते. एक, त्याचं जीनपूल जे त्याच्या जन्मदात्यांकडुन त्याला मिळतं. दुसरं, परिस्थिती, जी माणासाच्या अजीबात कंट्रोलमधे नसते. म्हणजे कसं, कि सजीवाची मूलभूत प्रॉपर्टी म्हणजे रिस्पोन्स टु स्तिम्युलस. त्यापैकी ना स्टिम्युलस त्याच्या कंट्रोलमधे आहे ना रिस्पोन्स देणारी सिस्टीम. च्यायला, जर मूळ स्वातंत्र्यच नाहि, तर ही गुलामगिरीची भानगड आलि कुठुन :ड
  • Log in or register to post comments

__/\__

चेक आणि मेट
Tue, 02/23/2016 - 03:43 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

अभ्यासपूर्ण लेखन

श्रीरंग_जोशी
Tue, 02/23/2016 - 03:53 नवीन
अभ्यासपूर्ण लेखन!! __/\__.
  • Log in or register to post comments

लग्न कर रे अता

स्पा
Tue, 02/23/2016 - 09:04 नवीन
लग्न कर रे अता
  • Log in or register to post comments

:)

चांदणे संदीप
Tue, 02/23/2016 - 10:57 नवीन
ह्याला दणकून +१ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

धन्यवाद स्पा सर. तुम्ही

सतिश गावडे
Tue, 02/23/2016 - 11:15 नवीन
धन्यवाद स्पा सर. तुम्ही इतक्या कळकळीने लिहिलं आहे त्यामुळे आता मनावर घ्यायलाच हवे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

स्व गवसणं विकल्प निर्माण करतं !

विवेक ठाकूर
Tue, 02/23/2016 - 11:30 नवीन
लेखकाला स्व (किंवा सत्य) गवसलेलं नाही त्यामुळे सगळा लेख केवळ वैचारिक आणि त्यामुळे निरुपयोगी झाला आहे. लेखाचं कन्क्लूजन असं आहे : मात्र आपण "स्व"ची जाणीव तेवत ठेवून ती गुलामगिरी कितपत पत्करायची यावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि तेच चुकीचं आहे. स्व गवसला की सगळी गुलामगिरी संपते ! अर्थात, नोकरदार व्यक्तीला नोकरी टिकवणं हाच एक कलमी कार्यक्रम असतो, ही उघड वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी, इकडचं तिकडचं वाचून, गुगल सर्च वगैरे मारुन स्व गवसणं शक्य नाही आणि एकदा तो गवसला की त्याची जाणीव तेवत वगैरे ठेवायला लागत नाही. सत्य गवसता क्षणी गुलामगिरी संपते, ती नियंत्रणात ठेवायचा प्रश्नच येत नाही. सगळ्या आयुष्यात `करु किंवा न करु, त्यानं काही फरक पडणार नाही' असा विकल्प उपलब्ध होतो. याचा अर्थ स्व गवसलेला रानात जाऊन कंदमुळं खातो, त्याला पैसा लागत नाही, तो संसारत्याग करुन इतस्ततः भटकायला लागतो.... वगैरे सर्व, स्व न गवसलेल्यांचे भ्रामक कल्पनाविलास आहेत. आणि अश्या भ्रामक कल्पनाच स्व गवसण्यात मोठा अडथळा आहेत. बेसिक चूक इतर चुकांना कशी प्रसवते याचं एक उदाहरण म्हणून खालचा पॅरा पाहा : पैशाची सर्वथा गुलामगिरी नको असेल तर माणसाला पुन्हा एकदा आदि मानवाची जीवनशैली अंगिकारावी लागेल. Materialistic problems need materialistic solutions. नुसती "स्व"ची जाणीव झाल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी माफक प्रमाणात का होईना पैशाची गुलामगिरी स्विकारावी लागेल किंवा आदिमानवासारखे जंगलात जाऊन कंदमुळं, फळं खावी लागतील. पशू मारावे लागतील. (अर्थात हे ही स्वातंत्र्य नाहीच. जंगल कुणाच्या तरी मालकीचे असू शकते. (पशू हत्येस कायद्याने बंदी असू शकते) थोडक्यात, तुमच्या-माझ्यासारख्याला पैशाची गुलामगिरी चुकणार नाही. स्व गवसलेल्या व्यक्तीच्या जीवनात स्व प्राथमिक आणि इतर सर्व गोष्टी, त्यात पैसाही आला, दुय्यम होतात. तस्मात, अशी व्यक्ती पैश्याची गुलाम राहात नाही. पैसा असेल तर तो वापरेल, नसेल तर दुसरा पर्याय शोधेल पण पैसा नाही म्हणून जगणं मुश्किल होत नाही. कारण अस्तित्त्व हा जरी परास्परावलंबित्वाचा खेळ असला तरी स्व हा सर्वथा निरालंब आहे. त्याला कोणत्याही सपोर्ट सिस्टमची गरज नाही. तो सर्वतंत्र स्वतंत्र आहे. म्हणजे संसार असेल तर सत्य गवसलेली व्यक्ती तो सार्थ करेल, त्यापासून पळून जाणार नाही, पण संसारावाचून त्याचं काही अडणार नाही. अर्थात, स्व गवसल्याशिवाय ते स्वच्छंद होणं इतरांच्या दृष्टीनं निव्वळ कल्पनाविलास असतो आणि तो वाचनातून गवसत नाही. त्याला स्वतःचं सर्वस्व पणाला लावावं लागतं. एकीकडे सिक्युरिटी शोधत आणि सांभाळत जगतांना, निरालंब स्व गवसणं असंभव आहे.
  • Log in or register to post comments

जे बात

स्पा
Tue, 02/23/2016 - 11:47 नवीन
जे बात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

नोकरदार व्यक्तीला नोकरी

अभ्या..
Tue, 02/23/2016 - 11:51 नवीन
नोकरदार व्यक्तीला नोकरी टिकवणं हाच एक कलमी कार्यक्रम असतो, ही उघड वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी, इकडचं तिकडचं वाचून, गुगल सर्च वगैरे मारुन स्व गवसणं शक्य नाही आणि एकदा तो गवसला की त्याची जाणीव तेवत वगैरे ठेवायला लागत नाही.
त्यातल्या त्यात हिथे मेजॉरीटी नोकरदारांचीच. त्यामुळे काही बोलणे म्हणजे.........................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

असं कसं, असं कसं ? स्व

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/23/2016 - 11:53 नवीन
असं कसं, असं कसं ? स्व सापडणार्‍या माणसांनाही वित्तवर्षाच्या अखेरीची (फिनानशियल इयर एंडची) गुलामगिरी करायला लागतेच असे स्व सापडलेल्या कोणीतरी फार्फार पूर्वीच स्वतःहून कबूल केले आहे ! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

विकल्प आणि गुलामगिरी यात फरक आहे !

विवेक ठाकूर
Tue, 02/23/2016 - 12:23 नवीन
नोकरदार माणूस कितीही फुशारकी मारत म्हणाला की `मी नोकरीवर केंव्हाही लाथ मारु शकतो' तरी, नोकरी गेल्यावर आपली काय अवस्था होईल ही कल्पनाच त्याला पुरतं अस्वस्थ करुन टाकते. आणि तो झक मारत कामाला जातो. अर्थात, स्वतःचा व्यावसाय असलेलाही, व्यावसायाची गुलामगिरी पत्करत नसतो असं नाही, पण त्याला किमान इतर विकल्प उपलब्ध असतात. स्व गवसलेला व्यावसाय करत नाही, त्याला सगळं आकाशातून प्राप्त होतं हा पुन्हा अज्ञानमूलक गैरसमज आहे. त्यामुळे स्व गवसला की नाही हे `न करण्याचा विकल्प' प्रामाणिकपणे उपलब्ध आहे किंवा नाही यावरनं ठरतं. एक मात्र नक्की, स्वच्या शोधातला माणूस, स्वतःला तो गवसला की नाही याच्या मागे असतो. दुसर्‍याला तो गवसला आहे किंवा नाही याचा उहापोह करुन आपल्याला काहीही मिळणार नाही इतकी किमान समज त्याला असतेच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक मात्र नक्की, स्वच्या

मोदक
Tue, 02/23/2016 - 12:33 नवीन
एक मात्र नक्की, स्वच्या शोधातला माणूस, स्वतःला तो गवसला की नाही याच्या मागे असतो. दुसर्‍याला तो गवसला आहे किंवा नाही याचा उहापोह करुन आपल्याला काहीही मिळणार नाही इतकी किमान समज त्याला असतेच असते. नक्की का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

:)

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/23/2016 - 13:56 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मिसळपावर तुमच्याशिवाय कोण्णी

तर्राट जोकर
Tue, 02/23/2016 - 11:55 नवीन
मिसळपावर तुमच्याशिवाय कोण्णी कोण्णी उपयोगी लिहित नाही सर! कित्त्ती कित्त्त्त्ती उपयोगी प्रतिसाद आहे तुमचा. मी तर तुमचे प्रतिसाद घरभर फ्रेम करुन लावले आहेत. अजून येऊद्या. आता रस्त्यावरही लावीन म्हणतो, आमच्या झोपडपट्टीची पोरं सकाळची कर्म उरकतात तिथे सरकारी भरपूर जागा आहे. बिन्दास लिहा, उपयोगी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

होऊदे खर्च...

चांदणे संदीप
Tue, 02/23/2016 - 11:58 नवीन
होऊदे खर्च...मिपा है घरचं! है..हुर्रर्र...हे..हे..है..हुर्र्र्र्रार्राहा धुरळा...धुरळा... निस्ता धुरळा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

स्व गवसलेल्या व्यक्तीच्या

मोदक
Tue, 02/23/2016 - 12:33 नवीन
स्व गवसलेल्या व्यक्तीच्या जीवनात स्व प्राथमिक आणि इतर सर्व गोष्टी, त्यात पैसाही आला, दुय्यम होतात. सहमत, सध्या येथेच अनुभवतो आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

एपिक!

पैसा
Tue, 02/23/2016 - 12:36 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ए बाबा

पैसा
Tue, 02/23/2016 - 11:57 नवीन
कशाला एवढं वाचतो रे? तो एकजण दगदधोंड्यात भटकत बसतो. तू दुसरा पुस्तकांच्या जंगलात. हे सगळं करायला अजून वीस वर्षे अवकाश आहे. आधी जगून घ्या.
  • Log in or register to post comments

जेव्ह्डा अहंकार मोठा

भाऊंचे भाऊ
गुरुवार, 03/03/2016 - 14:18 नवीन
तितकं भटकणे जास्त. हां अहंकार झिजुनच संपतो तेंव्हा... सल्याचा काही उपयोग होइल असे निरीक्सन नाही बगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपण जन्म का घेतो

गामा पैलवान
Tue, 02/23/2016 - 12:58 नवीन
सतिश गावडे,
>> खायचं कशासाठी तर जिवंत राहण्यासाठी. आणि जिवंत कशासाठी राहायचं तर प्रजननाच्या माध्यमातून >> आपला वंश पुढे चालू ठेवण्यासाठी.
तुम्हाला पडलेल्या जगण्याच्या प्रश्नापेक्षा दुसरा एक प्रश्न मूलभूत स्वरूपाचा आहे. तो म्हणजे आपण जन्म का घेतो. जन्म आपल्या हातात नसतो असं म्हणतात. ते एका अर्थी बरोबरही आहे. पण या जन्माच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर त्याची मदत जगण्याच्या प्रश्नाचा अन्वयार्थ लावण्यात होईल. तर, आपण जन्म का घेतो असा प्रश्न आहे. याचाच दुसरा अवतार म्हणजे मिळालेल्या जन्माचं काय करायचं बुवा, हा आहे. अनेकांनी अनेक आपापल्या परीने उत्तरं शोधली आहेत. माझं उत्तर सांगतो. आपण जन्म घेतो ते अमर होण्यासाठी. अमर होणे म्हणजे काळावर विजय मिळवणे. काळ सर्वभक्षक आहे. त्याच्या पल्याड मी कुठे आहे याचा शोध घ्यायची इच्छा प्रत्येक माणसाला असते. ही भुकेसारखी आहे. भूक सगळ्यांना लागते, पण तिचं शब्दांत वर्णन करून सांगता येत नाही. माणूस जसा अमर होण्यासाठी जन्म घेतो तसं इतर प्राण्यांचं नाही. माणसाकडे क्रियमाण म्हणजे भविष्य घडवण्याची शक्ती आहे. ही सुविधा प्राण्यांना उपलब्ध नाही. म्हणून मनुष्यजन्म प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानला गेला आहे. ( अर्थात, माणूस जर हातचं क्रियमाण सोडून प्राण्यासारखा वागू लागला तर ती अधोगती झाली ! ) आता तुमची विचारप्रक्रिया ज्यातून सुरू झाली त्या प्रश्नाकडे वळूया. तो म्हणजे आपण गुलाम आहोत का! उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. जर हातचं क्रियमाण सोडलं तर आपण आपल्या इंद्रियांचे गुलाम बनतो. अन्यथा नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

चूकीचे विचार आहेत

विवेक ठाकूर
Tue, 02/23/2016 - 13:50 नवीन
आपण जन्म घेतो ते अमर होण्यासाठी. अमर होणे म्हणजे काळावर विजय मिळवणे. काळ सर्वभक्षक आहे. त्याच्या पल्याड मी कुठे आहे याचा शोध घ्यायची इच्छा प्रत्येक माणसाला असते. ही भुकेसारखी आहे. भूक सगळ्यांना लागते, पण तिचं शब्दांत वर्णन करून सांगता येत नाही. स्व अजन्मा आहे, त्यामुळे त्याला जन्म-मृत्यू नाही. `आपण जन्म घेतो' हा गैरसमजच `मी देह' या अज्ञानमूलक कल्पनेला जन्म देतो. आपण देह नसून आपल्याला देहाची जाणीव आहे. तद्वत, देह कालाधिन आहे, स्व नाही. त्यामुळे स्व कालातीत आहे. कालाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. तो अकाल आहे. स्व गवसलेल्या व्यक्तीला, इतरां प्रमाणेच भविष्य घडवण्याची शक्ती असते. पण ती तो सृजनात्मकता म्हणून वापरतो. त्यामुळे : जर हातचं क्रियमाण सोडलं तर आपण आपल्या इंद्रियांचे गुलाम बनतो. अन्यथा नाही. हे देखिल चूक आहे. स्व न गवसलेल्या व्यक्तीला भविष्य घडवण्याची चिंता, ध्येयाचा आणि परिणामी देहाचा, गुलाम बनवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हे देखिल चूक आहे. स्व न

गब्रिएल
Tue, 02/23/2016 - 14:10 नवीन
हे देखिल चूक आहे. स्व न गवसलेल्या व्यक्तीला भविष्य घडवण्याची चिंता, ध्येयाचा आणि परिणामी देहाचा, गुलाम बनवते. यकदम जंक्शन करेट्ट ! आणि या चिंतेमध्ये "इतर सर्व कसे चूक आहेत आणि मी व केवळ मीच्च कसा बरोबर आहे." हे इतरांच्या डोस्क्यावर थाप्ण्याची आल-टाईम परमनंट चिंता बी सामील असते ना, सर ? म्हंजे सर्वज्ञ मान्सासंगट जग्भर्ची समदी मान्सं गुलाम झाली की वो ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

पुन्हा गैरसमज

विवेक ठाकूर
Tue, 02/23/2016 - 17:45 नवीन
स्व गवसलेला निश्चिंत असतो. इतरेजन, ज्यांना तो गवसलेला नाही त्यांना, तो चूक आहे हे दाखवण्याची चिंता असते. कारण एकदा तो चूक ठरला की त्याचा व्यत्यास म्हणून इतरेजन बरोबर आहेत असा दिलासा आपल्याला मिळेल ही वृथा आकांक्षा ते धरुन असतात. पण इतरेजनांच्या लेखातून, प्रतिसादातून आणि विचारातून ते आपोआप चूक ठरतात. स्व गवसलेलेल्या त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

स्व गवसलेला निश्चिंत असतो.

मोदक
Tue, 02/23/2016 - 17:52 नवीन
स्व गवसलेला निश्चिंत असतो. नक्की का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

@नक्की का? >> मग!??? मी

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/23/2016 - 19:11 नवीन
@नक्की का? >> मग!??? मी सांगतो ना, मग तसं आहेच! तोच पेरामीटर ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा