✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सेकंड ओपिनीयन

स
सतिश गावडे यांनी
Sun, 02/14/2016 - 22:50  ·  लेख
लेख
वाकडेवाडीचा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरचा भुयारी मार्ग दृष्टीपथात येताच मी गाडी डाव्या मार्गिकेत वळवली. वेग कमी करत करत भुयारी मार्गाच्या तोंडाच्या थोडंसं अलिकडे थांबलो. "सर, या सबवेतून पलिकडच्या बाजूला निघा. दोनेक मिनिटे चालत राहिलात की चौकात अ‍ॅग्रिक्ल्चरल कॉलेजचं मागचं गेट लागेल. तिथून डावीकडे वळलात की लगेच बस स्टँड आहे", मी प्रा. डॉ. ना शिवाजीनगर बस स्टँडला कसे जायचे ते हातवारे करून सांगितले. "धन्याशेठ, नक्की खाजगी डॉक्टरला दाखवून घ्या बरं. टाळाटाळ करू नका.", सरांनी गाडीतून उतरत असतानाच पुन्हा एकदा मला कळकळीनं सांगितलं. सरांनी गाडीचा दरवाजा लावताच मी अ‍ॅक्सलरेटरवरचा पाय दाबला आणि संचेतीच्या दिशेने गाडी हाकू लागलो. गाडी चालत असताना दोन अडीच तासांपूर्वी घडलेला प्रसंग नजरेसमोर तरळू लागला. साहित्य संमेलनातील उत्साह ओसंडून वाहत होता. कुठे कवितावाचन चालू होते, कुठे परीसंवाद चालू होता. प्रवेशिकेच्या दोन्ही हातांना असलेल्या पुस्तक प्रदर्शनांमधून गर्दी वाहत होती. प्रा. डॉ. त्यांच्या मित्राचा सहभाग असलेल्या एका परिसंवादाला गेले होते. मी आणि प्रचेतस भल्या मोठया पुस्तक प्रदर्शनात पुस्तकं चाळत फीरत होतो. अचानक वारा घोंघावल्याचा आवाज आला. प्रदर्शनाचा मंडप खुपच उंच होता. आणि त्यावर बहुधा पत्रे नुसतेच टाकून ठेवले असावेत. मंडपाच्या प्रवेशद्वारातून वारा आत शिरला. काही भाग खांबांसकट अचानक वर उचलला गेला. लोकांच्या ते लक्षात येताच एकच पळापळ सुरू झाली. वर उचलला गेलेला मंडप खाली आपल्यावर कोसळणार या भीतीने प्रदर्शनाच्या तेव्हढया भागातील लोक सैरावैरा पळू लागले. त्या लोकांमध्ये मी आणि प्रचेतसही होतो. लोक मागे पुढे न पाहता जीव खाऊन पळत होते. ईतक्यात माझ्या उजव्या पायातील फ्लोटर पुढून निघाला. मागच्या पटटा तसाच राहिल्याने मी अडखळून खाली पडलो. लोक जीवाच्या आकांताने पळत होते. मी दुर्दैवाने अशाच लोकांच्या पायाखाली आलो. मला लोक तुडवून जात असल्याने उठताच येईना. माझी पँट गुडघ्यावर कपडयाच्या चिंध्या फाडाव्या तशी फाटली. दोन्ही गुडघे आणि तळहात सोलवटून निघाले. शेवटी कसाबसा जीवाच्या आकांताने उठलो. आणि उजव्या पायातून अर्धवट निघालेल्या चपलेसह पळत सुटलो. माझ्या पाच सहा फुट पुढे प्रचेतस पळत होता. त्याच्या आणि माझ्या मध्ये अजून एक जण होता. ईतक्यात वरून एक पत्रा दाणकन खाली आदळला. आणि तो पत्रा नेमका मी आणि प्रचेतस यांच्यामध्ये असणार्‍या व्यक्तीच्या डाव्या हातावर कडेने लागला. त्याच्या हाताचे हाड बहूधा मोडले असावे. ती व्यक्ती "आई माझा हात मोडला, आई माझा हात मोडला" असे गुरासारखे ओरडत पळत सुटली. मी थोडक्यात वाचलो. जरा पुढे असतो तर त्या पत्र्याने मलाही प्रसाद दिला असता. मी सुन्न झालो होतो. तोंडातून शब्द निघत नव्हता. प्रचेतसने मला एका चहाच्या स्टॉलवर नेले. एक कप चहा प्यायलो तेव्हा मला हायसे वाटले. आणि आता पहिल्यांदा माझे माझ्या फाटलेल्या पँटकडे आणि सोलवटलेल्या गुडघ्यांकडे आणि तळहाताकडे गेले. उजवा गुडघा बराचसा रक्ताळला होता. जोरात ठणकाही लागला होता. प्रचेतस आणि मी संमेलनाची वैद्यकीय सेवा कुठे आहे हे शोधू लागलो. थोडी शोधाशोध केल्यानंतर उभी असलेली अँब्युलन्स दिसली. त्यांच्याकडे गेलो. पत्रे उडण्याचा प्रकार त्यांच्या कानावर गेला होताच. त्यांनी मला अँब्युलन्समध्ये बसवून प्रथमोपचार केले आणि बाजूलाच असलेल्या डॉक्टरांना दाखवायला सांगितले. मी डॉक्टरांकडे जाताच त्यांनी त्या हात मोडलेल्या मुलाला नुकताच हॉस्पिटलमध्ये हलवल्याचे सांगितले. "तू थोडक्यात वाचलास" असं हसत सांगितलं. मी ही कसंनुसं हसलो. डॉक्टरांनी जखमेवर मलमपट्टी केली आणि काही औषधांच्या गोळ्या दिल्या. मी घाबरून डॉक्टरांना पुन्हा पुन्हा हाड सांध्यावरून सरकले नाही ना, गुडघ्याची वाटी ब्रेक झाली नाही ना असे विचारत होतो. आणि डॉक्टर असं काही झालं नसावं म्हणून सांगत होते. जखम फक्त त्वचेवर झाली असावी असं त्यांचं म्हणणं होतं. प्रा. डॉ. परिसंवाद संपवून येताच प्रचेतसचा निरोप घेऊन मी आणि प्रा. डॉ. शिवाजीनगरला निघालो. इतक्यात प्रचेतसने यशोधरा साहित्य संमेलनाला आली असून तिला प्रा. डॉ. ना भेटायचे आहे असे सांगितले. तिची धावती भेट घेऊन आम्ही निघालो. जरी गुडघे प्रचंड दुखत होते तरी मी गाडी चालवू शकत होतो ही चांगली गोष्ट होती. .. घरी येताच नेटवरून जवळपास कुणी हाडांचे डॉक्टर आहेत का हे शोधले. दोन डॉक्टरांचे क्लिनिक जवळच होते. मात्र तो दिवस रविवार होता हे माझ्या डोक्यातच नव्हते. मी पाच मिनिटांत एक हाडांच्या डॉक्टरांकडे पोहचलो. डॉक्टर एका पेशंटला तपासून बाहेर पडण्याच्या बेतात होते. "अहो, आज रविवार आहे. मी पेशंट घेत नाही रविवारी" डॉक्टरांनी मी क्लिनिकच्या आत पाऊल टाकायच्या आधीच मला दाराबाहेर पाहताच सांगितले. "डॉक्टर प्लिज, मी बाईकवरून पडलोय आणि माझ्या गुडघ्यांना लागलंय" मी डॉक्टरांनी नसत्या चवकशा करू नयेत म्हणून साहित्य संमेलन प्रकरण त्यांना सांगितलेच नाही. "अहो हे आमचे नेहमीचे पेशंट आहेत म्हणून दवाखाना उघडला होता. बरं या आता आलाच आहात तर." माझा केविलवाणा चेहरा पाहून त्यांना माझी दया आली असावी. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. "कुठे राहता?" डॉक्टरांनी विचारले. "इथेच तुमच्या शेजारीच." मी उत्तर दिले. "ठीक आहे. मी रविवारी पेशंट तपासण्याचे पाचशे रुपये घेतो. मात्र तुम्ही शेजारी असल्यामुळे तुमच्याकडून मी तिनशे रुपयेच घेईन. ती माझी रेग्युलर फी आहे." डॉक्टरांनी असे म्हणताच मी मान डोलावली. मी त्यांना माझ्या मनातली गुडघ्याच्या वाटीला काही तडा वगैरे गेला नाही ना ही भीती बोलून दाखवली. "तसं काही झालेलं नाही. तुला एक्सरेचे पैसे वाया घालवायचे असतील तर मी एक्सरे काढून देतो. चालेल का?" डॉक्टरांच्या या प्रश्नावर मी नकारार्थी मान हलवली. "मात्र लिगामेंटला इन्ज्युरी झालेली असण्याची शक्यता आहे. आणि ते एमाराय केल्याशिवाय कळणार नाही." डॉक्टरांनी माझ्यावर बाँबगोळा टाकला. "किती खर्च येईल त्याला?" "साडे पाच सहा हजाराच्या आसपास. किंवा थोडासा जास्त. माझ्या ओळखीचे एक सेंटर आहे स्वारगेटला. त्यांच्याकडे जा. मी त्यांना तुला डिस्काउंट दयायला सांगतो." डॉक्टर एव्हढे बोलून थांबले नाहीत तर चक्क त्यांनी एमाराय सेंटरच्या प्रिस्क्रिप्शनवर "प्लिज गिव्ह टेन पर्सेंट डिस्काउंट टू माय पेशंट" असं स्पष्टपणे लिहिलं होतं. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. साधारण वर्षभरापूर्वी मी डॉ. अरुण गद्रे लिखित कैफियत नावाच्या वैद्यकिय क्षेत्रातील गैरव्यवहारांवर प्रकाश टाकणार्‍या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला गेलो होतो. तिथे तज्ञ डॉक्टरांची या विषयावरची भाषणे ऐकली होती. अगदी डॉ. प्रकाश आमटेही भरभरून बोलले होते. हे दहा टक्के सवलत प्रकरण मला चांगलंच खटकलं होतं. मात्र तिथे त्या डॉक्टरांना काहीच म्हटलं नाही. डॉक्टरांनी दिलेलं ते एमाराय आणि इतर औषधांचं प्रिस्क्रिप्शन घेऊन मी घरी आलो. घरी आल्यावर होमिओपाथ असलेल्या लहान भावाला फोन करून सर्व झाला प्रकार अथपासून इतिपर्यंत सांगितला. त्याने "मी घरी येऊन पाहतो. तोपर्यंत तू काहीही औषधं विकत घेऊ नको किंवा एमाराय करायला जाऊही नको." असे सांगितलं. भावाने संध्याकाळी येऊन माझा पाय तपासला. "गाडी तूच चालवत आला का?" "हो." "काही त्रास जाणवला का?" "तसा त्रास नाही. मात्र उजवा गुडघा ठणकत आहे" "ठीक आहे. मला वाटत नाही काही प्रॉब्लेम असावा. तरीही आजची रात्र जाऊ दे. जर काही गंभीर असेल तर रात्री पाय सुजेल. काही गंभीर नसेल तर सकाळपर्यंत यू विल बी परफेक्टली फाईन. रात्री पाय सुजलाच तर आपण माझ्या ओळखीतल्या दुसर्‍या हाडांच्या डॉक्टरांकडे जाऊ." सकाळ झाली. दोन्ही गुडघ्यावरील जखमांनी खपली धरली होती. ठणका पुर्ण थांबला होता. सूज वगैरे अजिबात आली नव्हती. भावाला फोन करून अपडेट्स दिले. त्याने एमाराय करण्याची मुळीच आवश्यकता नाही असे सांगितले. फक्त अ‍ॅलोपथी डॉक्टरकडे जाऊन प्रिकॉशन म्हणून टीटीचे इन्जेक्शन घे असे सांगितले. या घटनेला आता जवळपास महिना होत आला. मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
19441 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

खरं आहे तुमचं :)

सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 23:52 नवीन
खरं आहे तुमचं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

दारुचे शिंतोडे

कपिलमुनी
Wed, 02/17/2016 - 01:33 नवीन
दारुचे शिंतोडे असतील तर थोडेसे ईकडे पण उडव रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

उत्तम प्रतिसाद..

चिगो
Wed, 02/17/2016 - 16:43 नवीन
उत्तम प्रतिसाद, डॉक्टरसाहेब..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ...

चांदणे संदीप
Tue, 02/16/2016 - 22:27 नवीन
अतिशय व्यवस्थितपणे मुद्दा मांडलात. आपण डॉक्टर आहात असे वाटते. माझीही एक शंका तुम्ही शांतपणे वाचून घ्या आणि डॉक्टर असाल तर तुम्हाला स्वत:ला १००% खात्री असेल तरच उत्तर द्या अन्यथा आपण मिपावरच्या इतर डॉक्टरांची मते पाहूया! तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या डॉक्टरची कातडी बचावत असेल म्हणून एमआरआय करण्याचा सल्ला देणं ही मला गंभीर बाब वाटते. कारण, असेच कातडीबचाव कारण काढून इतर अनेक डॉक्टर असेच सल्ले देतील/देतही असतील. यातून त्यांचा निव्वळ फायदाच होईल कारण करायला सांगितलेल्या टेस्टमध्ये काही निघाल तर पेशंटकडून वाहवा मिळेल किंवा पुढची फी चालू आणि सर्वकाही नॉर्मल आहे अस आल की कातडीबचाव धोरण आहेच! म्हणजेच आला पेशंट की हाण सल्ला! कालच एका मित्राला डॉक्टरकडे घेऊन गेलो तर तिथेही असाच एक सल्ला मिळाला. किती सिरीयस इश्श्यू असतो अस विचारलं तर उत्तर आलं ०००१%, पण टेस्ट करून घ्याच! दुसरा अजून एक प्रश्न मला असा पडतो की अशा पडलेल्या/धडपडलेल्या/अपघातांच्या केसेसमध्ये डॉक्टर्स योग्य ते संशोधन करून माराची/अपघाताची तीव्रता वगैरे आकडेमोडीत मांडून, मोजूनमापून त्यावर अचूक असे भाष्य का करू शकत नाहीत? आजही, इतक्या प्रगत विज्ञानाच्या मदतीनेही? त्यातही कितीतरी सिमिलर केसेस येतच असतील डॉक्टरांच्याकडे! माझ्या शंका आहेत या....मी डॉक्टरांना लगेच अडाणी, मागास किंवा इतर कसल्याही पारड्यात टाकत नाहिये किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातही टाकत नाहिये. जे वाटतं ते लिहिल आहे! योग्य प्रतिसादाच्या प्रतिक्षेत, Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अ‍ॅक्चुअली, मी तुम्हाला उत्तर का द्यावे हेच मला समजलेले नाही.

आनंदी गोपाळ
Wed, 02/17/2016 - 00:55 नवीन
पण,
म्हणजेच आला पेशंट की हाण सल्ला!
हे एक गमतीदार वाक्य सापडले. तर त्याबद्दल. आपण जी फी दवाखान्यात पाय ठेवल्यावर भरता, तिला "कन्सल्टिंग फी" असे म्हणतात. अर्थात, सल्ला देण्याबद्दलची फी. आता आला पेशंट, अन त्याने विकत घेतलेला सल्ला दिला नाही, असे करता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

माझ्या शंका आहेत या

चांदणे संदीप
Wed, 02/17/2016 - 10:17 नवीन
माझ्या शंका आहेत या
असं म्हटलोय की हो डॉक्टरसाहेब! तुम्ही मात्र मला...
अ‍ॅक्चुअली, मी तुम्हाला उत्तर का द्यावे हेच मला समजलेले नाही.
...उडवूनच लावलंत! :( वर हेही सुरुवातीला लिहिलेलंच...
अतिशय व्यवस्थितपणे मुद्दा मांडलात. आपण डॉक्टर आहात असे वाटते. माझीही एक शंका तुम्ही शांतपणे वाचून घ्या आणि डॉक्टर असाल तर तुम्हाला स्वत:ला १००% खात्री असेल तरच उत्तर द्या अन्यथा आपण मिपावरच्या इतर डॉक्टरांची मते पाहूया!
मिपावर असहिष्णुता वाढलीये हेच्च खर! सहिष्णु ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

बापरे! बरच काही होऊन गेलं.

रेवती
Tue, 02/16/2016 - 22:38 नवीन
बापरे! बरच काही होऊन गेलं.
  • Log in or register to post comments

बाप रे ! चांगलाच उद्योग झाला

स्रुजा
Wed, 02/17/2016 - 02:49 नवीन
बाप रे ! चांगलाच उद्योग झाला म्हणायचा. वर तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे आता बरे आहात तेंव्हा विषयाकडे वळते. वर आनंदी गोपाळ यांनी कुठल्याही अभिनिवेशाशिवाय दिलेली उत्तरं मला पटली, आवडली. याच विषयावर सुहास जोशी, मोहन गोखलेंचं एक " डॉ तुम्हीसुद्धा" हे नाटक आलं होतं. मिळालं तर जरुर बघा. मिपा वर अनेकदा हा काकु झालाय. मिपावरचे अनेक डॉ. पोटतिडिकीने दुसरी बाजू पटवुन देतात. तरी ही हा विषय घेऊन काही सांगायची जेनुइन गरज पुनःपुन्हा निर्माण होते हे ही खरं. असं का होत असावं? वर आ-गो म्हणतात त्या प्रमाणे केस करायची किंवा मधे मला वाटतं पुण्याजवळ एका छोट्या गावात लोकांनी डॉ ला मारहाण केली होती , डॉ नी मग संप केला वगैरे अशी अत्यंत सबळ आणि ठोस कारणं असावी, सेफ सल्ले देण्यामागे. फेलो डॉ नी अशा वेळी किती ही सपोर्ट केला तरी अजुन ही भारतात डॉ- पेशंट ही १०० % विश्वासावर चालणारी संस्था आहे. माझ्या आईला ओळखणारे डॉ मला हक्काने काही गायनॅक सल्ले देतात कारण त्यांना माझी आनुवंशिक हिस्टरी माहिती असते, ते नुसते जी पी असले तरी मी तो सीरियसली घेते कारण मी लहानपणापासून डॉ काकांकडुन फोन वर देखील औषधं घेतलेली असतात. त्यांचा अनुभव, माझ्याबाबतचा अनुभव यावर माझा विश्वास असला की मला निम्मं बरं त्यांना फोन करुन च अनेकदा वाटतं. पण जर वर उल्लेख केलेले केसेस किंवा मारहाणीसारखे प्रकार घडले तर पेशंट च्या विश्वासाला तडा जाईल. अशा वेळी पेशंट कडे आपसुक सहानुभुती जाते कारण त्यांचं काहीतरी भरुन न येण्याजोगं नुकसान झालेलं असतं. बाय द बुक न गेल्याने डॉ कडे कदाचित कन्सल्टन्सी चे व्हिडीओज, पेशंट ने जर सांगितलेल्या टेस्ट्स न करण्याचा निर्णय घेतला तर "अगेन्स्ट मेडिकल अ‍ॅडव्हाईस" जातोय असे साईन केलेले फॉर्म्स नसतात. त्यांना आपली बाजू पटवुन सांगण्यासाठी भयंकर डोकेफोड करावी लागत असणार. पेशंट ने नकळत केलेल्या चुकांची भरपाई त्यांना करावी लागत असावी. ते असे बाय द बुक जात नाहीत म्हणुन आपल्याला हवं तेंव्हा दुसर्‍या डॉ कडे जाऊन सेकंड ओपिनियन घेणं सहज शक्य होतं. सेकंड ओपिनियन चं महत्त्व भारताबाहेर राहणार्‍या भारतीयांना सहज कळेल. एक बाजू पेशंट ची पण आहे यात. आपण आपल्या बॉडी पॅटर्न बद्दल पुरेसं जागरुक नसणं, पुरेसं निरिक्षण न करणं, पुरेसे महत्त्वाचे प्रश्न न विचारणे ही आपली उदासीनता ! अमुक एक टेस्ट सांगितल्यावर का, काही पर्याय आहेत का, कधी पर्यंत केलेली चालेल वगैरे कळीचे मुद्दे अनेकदा पेशंटस देखील विचारत नसावेत. मेडिकल कौन्सिलिंग ही देखील पुरेशी महत्व न दिले गेलेली बाब आहे. खुप कमी डॉ. पेशंट ला सल्ल्यामागचं कारण समजावुन सांगतात. त्या कारणा अभावी पेशंट च्या मनात अविश्वास निर्माण होऊ शकतो. कधी काही ज्येष्ठ डॉ खुप कडक असतात. एखाद्या समान सुत्र असलेल्या ट्रीटमेंट मधुन गेलेल्या व मित्र- मैत्रिणीला जर त्यातले तपशील आणि कारणं विचारले तर त्यांना नीट सांगता येत नाही. त्यांच्या ट्रिटमेंट ला यश आलं यावर ते खुश अस्तात. कारण हे सगळं करताना कधी कधी त्यांना नीट विश्वासात घेऊन कारण मीमांसा केलेली नसते. त्यांनी ही काही विचारलेलं नसतं. एक च प्रश्नः "डॉ मी बरा / बरी होईन ना? हा खुप मोठा इशु नाही ना?" हा माझ्या मते बाय द बुक न जाण्याचा तोटा. हे न केल्याने पेशंट ची कल्पना भरारी घेते, आधीच आजारी मनात धसका बसायला कारण लागत नाही. सगळेच डॉ असे नसतात पण असे असणारे डॉ कमी नाहीत. मी पुण्यात ज्या डॉ कडे जायचे त्या मला अनेकदा पेन पेपर घेऊन साध्या साध्या गोष्टी देखील समजावुन सांगायच्या.पुढच्या वेळी माझा अवेअरनेस जास्त असायचा. त्यामुळे हे सरसकटीकरण किंवा मला आलेल्या मर्यादित अनुभवातुन बनवलेलं मत वगैरे नाही. फक्त एक निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद स्रुजा

सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 10:10 नवीन
विचार करण्याजोगा आणि पटण्याजोगा प्रतिसाद. लहान भाऊ होमिओपाथ असल्याने डॉक्टरांच्या बाजूची थोडी फार जाणिव आहे. आनंदी गोपाळ यांचा पहिला प्रतिसाद माहितीपुर्ण होता. मात्र मला कट प्रॅक्टीसचा संशय का आला याची कारणमिमांसा देऊनही पुढील प्रतिसाद देताना त्यांचा तोल ढळला असे खेदाने म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

सोडा हो सतीशभौ!

बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 08:53 नवीन
वरच्या प्रतिक्रिया वाचून कदाचित तुम्ही आनंदी गोपाळ यांचेच (कट प्रॅक्टिसमधून मिळणारे) पैसे बुडवले की काय असं वाटायला लागलं. तुम्हीपण कोणाशी वाद घातलात ? जसे ग्रेटथिंकर, फुलथ्राॅटल जिनियस, दादा दरेकर, नाना नेफळे, काकासाहेब केंजळे तसेच हे आनंदी गोपाळ! दुर्लक्ष करायला हवं होतंत. असो.
  • Log in or register to post comments

तीव्र असहमती.

प्रचेतस
Wed, 02/17/2016 - 09:57 नवीन
तीव्र असहमती. उलट कुठल्याश्या ठिकाणच्या एका मा. डॉक्टरांच्या कट प्र्याक्टिसविषयी एक लहानशी शंका व्यक्त आख्ख्या व्होल इंडियातल्या समस्त डॉक्टर जमातीचा अपमान करून त्यांच्या भावना दुखावून त्यांच्याविरुद्ध आख्ख्या व्होल मिपाकरांचे मत कलुषित करण्याचा कट करणाऱ्या गावडे सरांचाच मी येथे तीव्र निषेध करतो. आनंदी गोपाळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पुढच्या वेळी माझ्या घरी याल

सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 10:15 नवीन
पुढच्या वेळी माझ्या घरी याल तेव्हा निषेधाचे काळे झेंडे घेऊन या. तसंही मला बाईक आणि गाडी पुसायला दरवेळी फडकं शोधावं लागतं. तुमच्या झेंडयांनी काही दिवसांची सोय होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो. अगदी नक्की.

प्रचेतस
Wed, 02/17/2016 - 10:17 नवीन
हो. अगदी नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

झेंड्याची काठी

नाखु
Wed, 02/17/2016 - 11:02 नवीन
वडगाव धायरी परिसरात टाकू नै त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. गाडी पुसण्याइतके मोठे कापड असावे. गाडी पुसुन झाल्यावर झेंडा परत मागू नये. झेंडा काळाच का? त्या वर आगलावी घोषणा का नको याचा काथ्याकुट इथे करू नै . त्यासाठी वेगळा धागा ऊसवावा. आगलावी घोषणा साठी गेलाबाजार एखादी स्पर्धा ठेवायली हरकत नाही. हुश्श इशारावजा सुचना संपल्या (चिमण कुठे गेलाय उरलेले कागद घेऊन तेच कळेना !!!) सचिव मिपा धुराळी धाग्याची धग आणि आग निस्तारण निवारण ,निराकारण (निष्कारण) समीती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

होय...

सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 10:13 नवीन
त्यांचा पहिला प्रतिसाद अतिशय माहितीपुर्ण होता म्हणूनच मी उप-प्रतिसाद दिला. पुढे मात्र त्यांची गाडी रुळावरून घसरली. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा थांबवणे हेच उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मागे हि बर्याच वेळा त्यांना

स्पा
Wed, 02/17/2016 - 10:25 नवीन
मागे हि बर्याच वेळा त्यांना प्यानिक होताना पाहिलेले आहे ,, सो काही नवीन नाही गावडे तुम्हारा चुक्याच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ठो ठो

अत्रन्गि पाउस
Wed, 02/17/2016 - 21:45 नवीन
हसतोय !! बोक्या भाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मला आनंदी गोपाळ ह्यांचा पहिला

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 11:13 नवीन
मला आनंदी गोपाळ ह्यांचा पहिला प्रतिसाद पटला. तुम्हाला लिगामेंट टियर असण्याची दाट शक्यता असेल तर एमआरआय काढायला सांगण्यात काय चुकले? तुम्हाला त्यांच्यावर कट प्रॅक्टिस बद्दल शंका असेल तर तुम्ही दुसर्‍या ठिकाणी हीच टेस्ट करुन घेतली तरी चालले असतेच. पण टेस्टची गरज नव्हतीच असे मात्र मला वाटत नाही. अनेकदा भारंभार टेस्ट करुन घेण्याचा आग्रह अनेक डॉक्टर करतात. त्याची कल्पना आहे. पण तुम्हाला जरी आत्ता बरं वाटत असलं तरीही ही टेस्ट आवश्यक असु शकते हे वर प्रतिसादातुन कळले आहेच. आता मुद्दा सवलत देण्याचा. तर हे क्षेत्रही व्यवसाय म्हणुनच निवडलेले असल्याने डॉक्टरांनी सवलती वगैरे दिल्या तर वावगे काय? मलाही ह्या बाबतीत आनंदी गोपाळ ह्यांच्याशी सहमत व्हावे वाटते. शॉप अ‍ॅक्ट, युनियन, पीएफ वगैरे असताना हा व्यवसाय सेवाभाव ठेवुन का करावा? मग अशी सवलत दिली म्हणुन संशय आला किंवा तुम्हाला ते पटले नाही तरी त्यांच्याकडे त्याची गणिते आहेत. तुम्हाला तसंही ती सवलत न घेण्याचा आणि तरीही दुसरीकडे ही टेस्ट करण्याचा किंवा अगदी डॉक्टरच बदलण्याचा पर्याय आहेच. मला वाटतं तुम्हा दोघांचा संवाद "गंडवणे" ह्या एका शब्दाने गडबडला. तुम्ही संशय व्यकत केलात, त्यांना तो ही मान्य नाही आणि त्यांनी सुद्धा उत्साहाच्या भरात तुमच्या वर "संशय" व्यक्त केला. शब्द / उपमा जहाल असल्याने मुद्दा बाजुला राहुन त्यावर तुम्ही हर्ट झालात. पण तेवढे सोडुन तुम्ही दोघेही व्यवस्थित चर्चा करु शकता. लहानसा मुद्दा सोडुन द्यायला हरकत नाही. बाकी इथे लोक आनंदी गोपाळ ह्यांच्या विरोधात एकत्र येऊन सारकास्टिक प्रतिसाद टाकत आहेत हे कुणाला वावगे वाटत नाही का आता? की मिपावरचे प्रॉब्लेम्स पण सिलेक्टिव्ह आयडी बोलत असले की मगच दिसतात?
  • Log in or register to post comments

बाकी इथे लोक आनंदी गोपाळ

बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 12:05 नवीन
बाकी इथे लोक आनंदी गोपाळ ह्यांच्या विरोधात एकत्र येऊन सारकास्टिक प्रतिसाद टाकत आहेत हे कुणाला वावगे वाटत नाही का आता? की मिपावरचे प्रॉब्लेम्स पण सिलेक्टिव्ह आयडी बोलत असले की मगच दिसतात?
अनुक्रमे नाही आणि हो. यालाच गि-हाईक बघून पुडी बांधणे असं म्हणतात. प्रश्न प्रतिसादात वापरलेल्या भाषेचा आणि त्यातून दिसणाऱ्या वृत्तीचा आहे.
  • Log in or register to post comments

बोलता आलं असतं अजुन.. पण...

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 12:08 नवीन
जौ द्या.. मुळ लेखाशी जे संबंधित आहे तेवढाच प्रतिसाद ग्रुहीत धरा.. उरलेल्या वाक्यावर ह्या जन्मात नीट चर्चा होऊ शकत नाही. एक प्रयत्न झालाय माझा नुकताच. तेव्हा असोच... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मी जिपड्यांना कट देत नाही. ..

मराठी_माणूस
Wed, 02/17/2016 - 13:24 नवीन
मी जिपड्यांना कट देत नाही. .........
स्वत:च्याच व्यवसाय बंधुं बद्दल ही भाषा ? मग इतरानी नुसती शंका व्यक्त केली तर एव्हढा राग का यावा.
  • Log in or register to post comments

+१

चिन्मना
Wed, 02/17/2016 - 15:35 नवीन
+१. हेच लिहिणार होतो. कट देत नाही म्हणणे सोडुन द्या पण "त्यांना माझ्या केबिनमधे बसूही देत नाही, उभे ठेवतो" या वाक्यावरुन त्यांची मनोवृत्ती कळते. GP हा MBBS असतो. त्यांचा असा उल्लेख करणे पटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

कट मागणारा जिपडाच असतो.

आनंदी गोपाळ
Wed, 02/17/2016 - 21:27 नवीन
GP हा MBBS असतो.
नक्की का? मग आयुर्वेदाचार्य, अन होमिओपदी युनानी इलेक्ट्रोपथी सिद्ध वगैरे काय असतात? * कट मागणारा/घेणारा कोणताही "डाक्टर" जिपडाच असतो. अ‍ॅब्सोल्यूट थर्डक्लास मेंट्यालिटी. त्याची डिग्री काय, याच्याशी काहीच संबंध नाही. मग तो अगदी डीएम न्यूरो असला अन एमडी रेडिओवाल्याकडे एमारायसाठी कट मागत असला, तर तो नीच- व जिपडाच. तेव्हा, व्यवसायबंधू असला, अन मालप्रॅक्टिस करीत असला, तर मी त्याच्या विरोधीच बोलतो. त्या दृष्टीने या वरील दोन प्रतिसादांचा अर्थ सूज्ञांनी समजून घ्यावा. अन हो, (चांगल्या) व्यवसायबंधूंची बाजू घेण्यासाठीच वर धागाकर्त्यांना थोडं तुसडेपणे बोललो आहे. * लेखातला ऑर्थोपेडिशियन मला सेन्सिबल वाटला. त्याच्यावर संशय घेणे मला पटले नाही. त्यामुळे धागाकर्त्यांवरही एक गमतीत संशय घेऊन दाखवला, तर धागाकर्ते १५ ठिकाणी माझा तोल ढळल्याचा प्रतिसाद लिवायलेत. ज्या डॉक्टरचे संशयावरून (मुद्दाम्/चुकून) चारित्र्यहनन केले गेले, त्याचं काय? की रामाच्या सीतेसारखे गुपचुप सहन करायचे डॉक्टरांनी? किस खुशी मे? * कटचा संशय घेऊन या लेखात डॉक्टर (जमाती)वर शिंतोडे उडवले गेलेत की नाहीत याबद्दल खुलासा कुणी करेल काय? * एक पॉप्युलरिटी काँटेस्टमधे उतरल्यासारखा प्रतिसाद आमच्या डॉक्टर मित्राचाही आहे वर. त्यांनीही सरळ प्रश्नांना पोलिटिकली करेक्ट बगल दिलेली आहे. * असो. मी काय व का बोलतो आहे हे समजून माझ्या बाजूनेही लिहिणारे अनेक आहेत, यातच मला आनंद आहे. तेव्हा, चूकभूल देणे-घेणे. अधिक उणे माफ करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मना

आज वाचला हा धागा.सगाजी तुम्ही

अजया
Wed, 02/17/2016 - 16:29 नवीन
आज वाचला हा धागा.सगाजी तुम्ही महाण निघालात.डायरेक पत्रे उडवून आलात संमेलनाचे! थोडक्यात निभावले.बरे झाले. आनंदीगोपाळांच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत. त्यांच्या जिपडे वगैरे म्हणण्यामागे कदाचित आलेले कटु अनुभव असू शकतात. - अनेक पॅथींच्या, चोर, कट घेणार्याच,अनेथिकल प्रॅक्टिस करणाऱ्या जिपींच्या गावातली- अजया
  • Log in or register to post comments

पुर्वी या घटनेबद्दल थोडक्यात

जेपी
Wed, 02/17/2016 - 21:42 नवीन
पुर्वी या घटनेबद्दल थोडक्यात वाचले होते.. आता काळजी घ्या.. बाकी,सेंकड ऑपनियनचा काही अनुभव नाही..
  • Log in or register to post comments

आमचा एक धागा

अत्रन्गि पाउस
Wed, 02/17/2016 - 21:50 नवीन
ह्या संदर्भात आठवला
  • Log in or register to post comments

अरे बापरे..

स्वाती दिनेश
Wed, 02/17/2016 - 21:58 नवीन
एवढं सगळं घडलं? काळजी घ्या, स्वाती
  • Log in or register to post comments

गावडे बुवा प्रकॄतीचे काळजी

मदनबाण
गुरुवार, 02/18/2016 - 10:54 नवीन
गावडे बुवा प्रकॄतीचे काळजी घ्या.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

  • Log in or register to post comments

अरे तुझ्या शरिराला झालेल्या

सनईचौघडा
गुरुवार, 02/18/2016 - 11:43 नवीन
अरे तुझ्या शरिराला झालेल्या जखमा बर्या झाल्या असतीलही. पण स्पांड्डूब्बा म्हणतो त्याप्रमाणे गावडे तुम्हारा चुक्याच तु इथे धागा कायाकु डाला, गेली ना ती शांती (मनाची) निघुन.
  • Log in or register to post comments

आमचे गुरु महाराज म्हणतात,

सतिश गावडे
गुरुवार, 02/18/2016 - 12:03 नवीन
आमचे गुरु महाराज म्हणतात, "शांती गेली तर जाऊ दे, पण संयम सोडू नको". बाकीचेहो, आपण जी आस्थेने चौकशी करत आहात त्याने खुप बरे वाटले. डॉ. आनंदी गोपाळ यांनी माझी बाजू ही "पेशंटची बाजू" म्हनून विचारात घेतली नसली तरी त्यांच्या "तुसडया" प्रतिसादांमधून आपल्याला डॉक्टरांची बाजू कळते आहे. त्यामुळे एका अर्थाने ते धाग्याचा हेतू सफल करण्यात हातभार लावत आहेत त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

तुसड्या :-D

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 02/18/2016 - 19:33 नवीन
तरी अजून मी किती हुशार, कुठेही अडमिशन कशी मिळू शकत होती, मी कसा पंचतारांकित, पेशंट कसे मूर्ख वगैरे वगैरे बाकी आहे ... वर बोकोबा म्हणालेत ते बरोबर आहे ... ....असो पण तुम्ही तब्ब्येतीची काळजी घ्या ... आणि लवकर बरे व्हा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धागा आज वाचला. दोन्ही बाजूंची

एस
गुरुवार, 02/18/2016 - 12:32 नवीन
धागा आज वाचला. दोन्ही बाजूंची चर्चा मननीय आहे. सतीशभाऊ, काळजी घ्या. लिगामेंट टिअर हे काही वर्षांनी पुन्हा उद्भवू शकते व तेव्हा शक्यतो योग्य चाचण्या व उपचार करवून घेणे उत्तम.
  • Log in or register to post comments

बापरे ! लिगामेन्ट टियर एकुनच

गौरी लेले
गुरुवार, 02/18/2016 - 20:14 नवीन
बापरे ! लिगामेन्ट टियर एकुनच काळजात धस्स झाले . कसा आहेस आता सतिश ? काळजी घे हां ! आणि हो अ‍ॅलोपॅठेपेक्षा केव्हाही होमिऑपॅठीच बेस्ट हां ! काळजी घे :)
  • Log in or register to post comments

अ‍ॅलोपॅठेपेक्षा केव्हाही होमिऑपॅठीच

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 02/18/2016 - 21:36 नवीन
अहो आता इथे पुन्हा सुरु होईल .... पॅथीत पॅथी अलोची ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले

मिपाकर काड्या ओळखण्यात तरबेज

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/18/2016 - 21:51 नवीन
मिपाकर काड्या ओळखण्यात तरबेज आहेत, त्यामुळे अश्या काड्या फारसा पेट घेत नाहीत असा सद्याचा अनुभव आहे ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

तसे नव्हे

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 02/18/2016 - 23:20 नवीन
इथे आपण किंवा डॉक्टर खर्यांना मिळत असेलेला आदर जास्त खरा .... बाकी सुज्ञास अधिक काय सांगावे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

The best pathy is sympathy

सुबोध खरे
Fri, 02/19/2016 - 09:31 नवीन
The best pathy is sympathy The worst pathy is apathy बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले

अगदी खरे आहे खरे !

गौरी लेले
Fri, 02/19/2016 - 12:59 नवीन
अगदी खरे आहे खरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी धाग्यावर लिहिणार नव्हतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/18/2016 - 22:17 नवीन
सालं धन्याची लैच काळजी वाटत होती. इतकं लागूनही चेहरा नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न, गप्पांचा तोच मुड, पुन्हा मला सोडायला येणं, धन्या दोन दिवस माझ्या सोबतच होता. मी परिसंवादाला काय गेलो हा उपद्याप झाला. बाकी, आता बरा आहेस ही चांगली गोष्ट. बाकी डॉक्टर ती बनवेगीरी काय बोलायचं सालं सर्वच क्षेत्रात काही लोक चांगले तर काही बोगस आहेतच तो काही वाद नाही. -दिलीप बिरुटे (धन्याचा मित्र)
  • Log in or register to post comments

माझ्या पाहण्यातला एक डॉक्टर

Ram ram
Fri, 02/26/2016 - 14:35 नवीन
माझ्या पाहण्यातला एक डॉक्टर डीस्टील वाटर चे इंजेक्शन गरीब लाेकांना द्यायचा कँन्सर हाेऊन मेला डाेळ्यादेखत
  • Log in or register to post comments

आपण सेकंड ओपिनियन पहिल्या

प्रकाश घाटपांडे
Fri, 02/26/2016 - 15:00 नवीन
आपण सेकंड ओपिनियन पहिल्या डॉक्टरच्या नकळत घेतले व त्याला ते नंतर समजले तर तो डूख धरेल अशी भीती काही लोकांना वाटते. डॉक्टर समंजस असेल तर असे होणार नाही. पण एखाद्या डॉक्टरला आपल्या पेशंट ने सेकंड ओपिनियन घेतले तर ते आपल्यावर अविश्वास दाखवल्यासारखे वाटू शकते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा