Skip to main content

शेवग्याचे सार

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 24/01/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
शेवग्याच्या शेंगाना डांबेही म्हणतात. शेवग्याच्या पानांची, फुलांचीही भाजी करतात. शेवग्याच्या शेंगा पिठलं, आमटी यात वापरतात पण आज मी तुम्हाला खास थंडीत करण्यासारख्या साराची कृती सांगतेय. shevga फोटो आंतर्जालावरून साभार साहित्यः १० शेवग्याच्या शेंगा, अर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे, एक चमचा आमचुर, मीठ, साखर, दोन चमचे तूप, जीरे, हिंग चिमुटभर, ओल्या मिरच्या दोन तीन, कढीलिंबाची ७/८ पाने. कृती: शेंगांचे बोटभर लांबीचे तुकडे करून त्यात थोडे पाणी घालून शिजवून घ्यावेत. गार झाल्यावर चमच्याने त्यातील गर, बीया काढून घ्याव्या. शेवग्याच्या बिया टणक असतील तर त्या घेऊ नयेत. काढलेल्या गरात शिजवताना घातलेले पाणी आणि एक चमचा आमचूर घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. ओल्या खोबय्रात एक वाटीभर पाणी घालून दूध काढून घ्यावे, दोन तीन वेळा खोबरे पाणी घालून फिरवून सर्व दूध गाळून शेवग्याच्या गरात मिसळावे. त्यात कढीलिंबाची पाने घालावीत. कढीइतपत पातळ करावे, लागल्यास थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ, साखर घालावे. तूपाची हिंग, जीरे आणि मिरच्या तुकडे घालून फोडणी करावी आणि साराला द्यावी. हे सार उकळले तरीही फुटत नाही. शेवग्याचा वास आवडणाय्राना नक्की आवडेल. थंडीत गरमागरम प्यायला मस्त वाटते. साधारणपणे एक वाटी गरासाठी अर्ध्या नारळाचे दूध लागते. आवडत असल्यास वरून कोथिंबीर घालावी. shevga

वाचने 26118
प्रतिक्रिया 58

प्रतिक्रिया

तोंपासु दिसतेय. गर काढून सार करायची आयडीया मस्त आहे. जरुर करीन. आमचूर एवजी कोकम चालेल का? फक्त वाट्णार नाही नाहितर रंगच बदलेल.

In reply to by अनन्न्या

हो अनारदाणा मिळतो ना.. खुप सुरेख दिसतंय सार. नक्की नक्की करणार, आज आठवणीने शेंगा पण आणल्या त्यासाठी :)

करणार! फक्त शेवग्याच्या शेंगा ओरपून खायचे राहाडे करायची मजा रेडिमेड गर असलेल्या सारात मिळणार नाही. त्यामुळे काहीतरी आयडिया करायला हवी.

In reply to by गवि

करुन पाहिलं. फार म्हणजे फार टेस्टी प्रकार आहे. गर काढणं वेळखाऊ पडलं. पण शेवटी बनलेलं सार, वर्थ आॅल एफर्ट. अनेकोत्तम धन्यवाद.

In reply to by गवि

गर काढण्याची आयडीया :- छोटे तुकडे करण्यापेक्षा मोठे तुकडे करा (साधारणतः एका शेंगेचे दोन) आणी कुकर मधे शिजवा .आणी मग चमचाने काढा . सोपं जाईल. हाकानाका !

पाकृ मस्त दिसतेय.फोटोतला साराचा वाडगा तोंडाला लावून पिऊन टाकावासा वाटतो आहे. स्वाती

धन्यवाद!!!! घरच्या वस्तू फुकट जाऊ नयेत पण चवदार पदार्थ झाला पाहिजे यातून केलेला प्रयोग! खरच खूप मस्त लागते.

मस्त ग एकदम. मागे मी आणि मितान ने कोकणतून आम्बोशी आणले होते.ते कशात वापरू.एकदा डालीत वापरले होते पण कुणास ठावुक काय चुकले? या साराचा थोडा वेगळा प्रकार कमलिनी कुटीर ला खाल्ला होता.

In reply to by त्रिवेणी

किंवा ती चांगली वाळवून आमचूर पावडर करून ठेव. ती चटणीतही वापरता येते. आंबिशी थोडावेळ भिजवून वापरता येईल आंबे डाळ करता येईल. आमचूर कांदे पोह्यातही आंबटपणासाठी छान लागते.

In reply to by स्रुजा

अगं, आंबे काढताना काहीवेळा आंबे पडतात. हे आंबे पिकण्यासाठी ठेवता येत नाहीत.म्हणून त्याच्या फोडी करून उन्हात वाळवतात.अशा फोडींचे पीठ म्हणजे आमचूर

In reply to by अनन्न्या

ओह्ह... आमचूर चा हा कार्यकारण भाव माहिती नव्हता. एकुणात कोकणातले लोकं काही वाया घालवत नाहीत हे खरं.

छान. तीन लोकाना पाउण लिटर तरी लागेल. किती मटेरियल लागेल?

फाकडू पाकृ ! शेवगा + नारळाचं दूध म्हणजे चव स्वर्गीयच असणार !

जबराट दिसतंय सार! जेव्हा शेंगा मिळतील तेव्हा लगोलग करुन बघायलाच हवं. :) आमटी, पिठले यातला शेवगा प्रचंड आवडतो पण इथे ताज्या शेंगा मिळत नाहीत त्यामुळे वाट बघावी लागणार! :( (शेंगा वरपून खाण्यात जामच मज्जा येते! लहानपणी मी ताटाच्या भोवती खल्लेल्या शेंगांच्या चोयट्यांचा ढीग लावायचो आणि आई चिडायची! :) )

वर्णन फारच चविष्ट आहे. नक्कीच लवकरच करून पाहण्यात (आणि चाखण्यात) येईल.

करून पाहणार नक्कीच. नारळाच्या दुधाऐवजी ताक घेतले तर अशीच कढी बनू शकेल का?

ही रेसिपी विष्णू मनोहरना सांगितली होती, एका स्पर्धेला ते जज होते तेव्हा!

खरच अप्रतिम झालं होतं सार. आवडलंच. भन्नाट. तूफान..

रेशिपी तर एकच नंबर.... आंध्रा साईडला शेवग्याच्या पानांची चटणी/भाजी करतात असे तेलुगु मित्रांकडून ऐकले त्याची आठवण झाली. हे प्रकर्ण लैच जबराट दिसतेय!!!!

In reply to by बॅटमॅन

शेवग्याच्या पानांची भाजी आमच्या घरी होत असे. तेव्हा सोसायटीच्या कंपाऊंडमध्येच एक शेवग्याचं झाड होतं.

असं काही तरी साधं सोपं आलं पाहिजे करायला. पाहतो ट्राय करुन कितपत जमतं कै माहिती. आवडलं. मस्त. भारी. खास. लै भारी. म्हण्जे लैच आवडलं. -दिलीप बिरुटे

आज हे सार करुन पाहिले...फक्त कर्नाटकी टिव्स्ट दिला. १) शेवगा उकदुन त्याचा गर काढुन घेतला.. २)फोडणीत तेल जिरे-मोहरी.कडीपत्ता,हिंग याची फोडणी केली. ३)यात शेवग्याचा गर, चिंचेचा कोळ( अर्धा वाटी) चविपुरता गुळ आणी वरुन ओले नारळ खिसुन टाकले. 1 हे सार वरणाला पर्याय ठरल्यामुळे याला आमच्या किचनच्या टॉप टेन रेसिपीत जागा मिळाली.;) 1

अनन्या, तु वर दिलेले सार (ओरिजीनल) करून पाहिले. फक्त उन्हाळा असल्याने थंड करून प्यायले. फारच सुन्दर! फोटो मात्र राहिला.