Skip to main content

इंपॉसिबल मेलडी : ओपी !

लेखक विवेक ठाकूर यांनी बुधवार, 20/01/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओपींचा वाढदिवस. लता मंगेशकरसारख्या स्वरसाम्राज्ञीच्या उपेक्षेवर बेदिक्कत मात करत स्वतःची संपूर्ण कारकिर्द घडवणारा हा एकमेव संगीतकार. `आय एम म्युझिक इल्लीटरेट' असं मनमोकळेपणानं कबूल करून, शास्त्रीय संगीताचं कोणतंही शिक्षण नसतांना केवळ स्वतःच्या स्वरसौंदर्याच्या आकलनावर, एकसोएक बंदिशी बांधणारा हा अवलीया रसिकांना कायम मोहवत आला आहे. कोणत्याही चांगल्या स्वर रचनेचे केवळ तीन घटक असतात, क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी. क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी हे सारखेच वाटणारे घटक दोन प्रकारे व्यक्त होतात, एक म्हणजे, दोन स्वरांमधलं अंतर आणि दुसरं, त्या अंतरामुळे ऐकू येण्यातली सुस्पष्टता. जर दोन स्वरातलं अंतर वाढलं तर ऑडिबिलीटी आणि क्लॅरिटी वाढते पण मेलडी बिघडते. दोन स्वरातलं अंतर कमी झालं तर मेलडी वाढू शकते पण क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी कमी होते. त्यामुळे स्वरसंयोजनात पहिल्या स्वरानंतर नेमका दुसरा स्वर कोणता घ्यावा आणि मग त्यापुढचा कोणता घ्यावा...अशा सांगितिक चिंतनातून संपूर्ण गाणं तयार होतं. सगळं गाणं म्हणजे क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी या तीन पैलूंवर काम करत निर्माण झालेली एक धून असते. या धूनेवर मग शब्द आणि वाद्य यांची गुंफण होऊन आपण ऐकतो ते गाणं तयार होतं. ओपींची खासियत म्हणजे त्यांची शब्दांवरची हुकूमत. एखादी सुरेख धून बांधल्यावर ओपी लिरीस्टला घेऊन एकेक शब्द तोलायचे, त्यामुळे ओपींची गाणी हृदयाला स्पर्शून जातात. ओपीचं गाणं लागलं की नकळतपणे आपलं लक्ष गाण्याकडे वेधलं जातंच. आप यूं ही अगर हमसे मिलते रहे... असं नुसतं रफीनी म्हणायचा आवकाश की आपण गाण्याकडे ओढले जातो. आशानी, बलमा खुली हवामें...म्हटलं की आपल्याला मोकळ्या आकाशाखाली आल्यासारखं वाटतं. ओपींच्या गाण्यांची कडवी म्हणजे एकेसोएक शेर असल्यासारखी आहेत. त्यामुळे ओपीचं संगीत म्हणजे साध्या सोप्या शायरीलाच जणू स्वरसाज चढवलेला आहे. इंटरल्यूड (म्हणजे गाण्यामधल्या म्युझिकसाठी) वाद्य निवडण्याचं ओपींचं कौशल्य हा तर क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी या तीन्ही पैलूंचा अप्रतिम आविष्कार आहे. मग ती बहुत शुक्रीया बडी मेहेरबानी मधली हार्मोनीयम असो, दिवाना हुवा बादल मधली सतार असो की एक परदेसी मेरा दिल ले गया मधली बीन असो; ओपींचं वाद्य निवडण्याचं कौशल्य अद्वितीय होतं. ओपींचा रिदमसेन्स हा तितकाच कौतुकाचा विषय आहे. माझ्या मते ओपींनी अत्यंत साधे, पण एकदम उठावदार रिदमस वापरले. साध्या रिदमची खासियत अशीये की तो ऐकणार्‍याच्या हृदय-लयीशी समरुप होतो त्यामुळे ऐकणार्‍याला ते गाणं आपल्यालाही सहज गाता येईल असं वाटतं. उस्ताद आमीर खां हे ओपींचे खास दोस्त, एकदा त्यांच्यावर नाराज झाले. ओपींना त्यांच्या नाराजगीचं कारण कळेना तेंव्हा ते आमीर खांना भेटायला गेले. उस्तादजी म्हणाले की तू शास्त्रीय संगीत शिकलायंस हे इतके दिवस माझ्यापासून लपवून का ठेवलंस? त्यावर ओपी म्हणाले, मला माझ्या गाण्यांची शपथ, मी खरंच शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही. पण तुम्हाला असं का वाटतंय? त्यावर खांसाहेब म्हणाले की शात्रीय संगीत शिकल्याशिवाय असं गाणं करता येणंच शक्य नाही. ओपींंनी विचारलं कोणत्या गाण्याबद्दल म्हणतायं तुम्ही? तर खांसाहेब म्हणाले तुझं हे गाणं, देखो बिजली डोले बीन बादल की! मधे मी आनंदजींची मुलाखत पाहात होतो तेंव्हा ते म्हणाले इस तालमें तो हमेभी गाना बांधना मुश्कील है, इसे आडा चौताल कहेते है. आशा पारेखनी ओपींच्या घेतलेल्या मुलाखतीत विचारलं होतं की `आखिर आपकी दिलकश मौसिकी का राज क्या है?' त्यावर ओपी हसून म्हणाले "बस एक ही चिज है, रोमान्स! मेरे गाने जबभी आप सुनेंगे तो आपका दिलभी उसी मोहोब्बतके रंगमे रंग जाएगा".
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14220
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

आज कोई प्यारसे दिलकी बाते कहे गया, मै तो आगे बढ गयी, पिछे जमाना रह गया केवळ आणि केवळ आशासाठी केल्यासारखं हे गाणं.... पाण्याचा अवखळपणा संतुरच्या दिलखेचक सुरावटींनी टिपलेला, मदहोशी आणायला सतार आणि समेवर यायला वापरलेली सारंगी यांचा अनोखा मेळ साधणारं ओपींचं हे सुरेख गाणं. त्यावर तारुण्यानं बहरलेल्या मुमताजची बेहेतरीन अदाकारी म्हणजे भन्नाट संगीताच केलेलं तितकच भन्नाट पिक्चरायजेशन. एस एच बिहारींची शायरी, तारुण्याच्या भावना स्त्री देहात उमटतांना होणार्‍या बदलांचं किती यथार्थ वर्णन करते : चिरकर पत्थर का सीना झूमकर झरना बहा जिसमे एक तूफान था, सौ करवटे लेता हुआ आज मौजों की रवानी में किनारा बह गया, इक किनारा बह गया..... मै तो आगे बढ गयी, पिछे जमाना रह गया. दुसर्‍या कडव्यापूर्वीच्या इंटरल्यूडला ओपींनी सतारीचा जो कमाल पीस दिलायं तो पुन्हापुन्हा ऐकावासा आहे. आणि संपूर्ण गाण्याला असा काही ठेका लावलायं की, जलप्रपातात विहार करणार्‍या ललनांना तो अनाहूतपणे देहांची लयबद्ध हालचाल करायला भाग पाडतो. आज सुद्धा एखादी गौरांगना पहिल्यांदा प्रेमात पडेल, तर तिच्याही ओठात याच ओळी येतील : आज कोई प्यारसे दिलकी बाते कहे गया, मै तो आगे बढ गयी, पिछे जमाना रह गया

In reply to by विवेक ठाकूर

अशाबाईंच्या करियर मधील पहिल्या दहात मी याची गणना करीन . एस पी कॉलेज समोरील दीपक म्युझिक सेन्टर मधे बंद काचेत बसून हे गीत त्याला परत परत लावायला लावणे हा एक स्मरणीय अनुभव. एका पुस्तकात शिवकुमार शर्मा म्हणतात "या एका बाजूला २५ वायलिन्स व एका बाजूला मी सन्तुर घेऊन असा त्याचा इन्ट्रो चालू होतो. एका ठिकाणी तबल्यावर ठाक असा आवाज होऊन व्होकल चालू होते. दरम्यान ती वायलिन्स व मी जणु एकमेकाशी संवाद करतो आहोत असा तो इन्ट्रो." बाकी रईस खान साहेब विलायतखानी घराण्यातले . त्यांचे व ओपी साहेबांचे जणू गेल्या जन्माचे ऋणानुबंध. या गीताचे चित्रिकरण पाण्यात चिंब भिजताना झालेय हे रईस खान सतारीतून व्यक्त कसे करतात ते सगळ्च स्वर्गीय ! अवांतर - या गीतातील एक्ट्रा मधे एक ओळखीचा मराठी चेहरा दिसतो का पहा ! ती पुढे एक यशस्वी निर्माती तर झालीच व इम्पाची अध्यक्ष सुद्धा !

In reply to by चौकटराजा

पहिल्यांदाच ऐकले. सारखे सारखे ऐकुन झाले दोन दिवस. आता तो मुखडा गुणगुणून लगेच दुसरा मुखडा आठवतो.... हो .... नभ उतरु आलं. दोन्ही आशाचीच गाणी , पहाडी राग. दोन्ही सलग म्हणायला मजा येते.

In reply to by चौकटराजा

खरंच मनात रुंजी घालतंय हे गाणं गेले दोन दिवस... पहिल्यांदाच ऐकलं इथे शेअर केले तेव्हा. धन्यवाद ठाकूरसाहेब!

मस्ती चॅनेलवर ९० मिनिटे ब्रेक फ्री मधे ओ पी नैय्यरची गाणी लागली आहेत.

दिल चाहता है मेरा बहकना इधर उधर... पुन्हा एकदा एस. एच. बिहारींची शायरी आणि आशाचा आवाज आपल्याला मोकळ्या आकाशाखाली आणतो. एखाद्या प्रेयसीनं आपल्या प्रियकराला बेधुंद होऊन दिलेलं निमंत्रण म्हणजे हे गाणं. नुसती शायरी वाचली तरी आपण मदहोश होतो. पग पग चलू बलखाती, खुद भी न जानू कहाँ कहता है ये दिल मतवाला, आज अपना है सारा जहाँ. गाण्याला ओपींनी लावलेला रिदम, त्यात इंटरल्यूडला वाजवलेली सतार आणि कडव्यात आशाच्या आवाजाशी जुगलबंदी करणारी सारंगी केवळ लाजवाब आहेत. गाण्याच्या शेवटच्या, या ओळीत ..... छुन छुन बोले मेरी पायल, आजा कहे सजना आजा के ये सारे नजारें, सैय्या फिके हैं तेरे बिना आशानं जो काय रंग जमवलायं आणि `ओहो हो हो' असा चढता आलाप घेत, ती जे काय समेवर येते त्याला तोड नाही. प्रत्येक प्रियकराला, एकदा तरी आपल्या प्रेयसीनं अशी साद घालावी असं आयुष्यात वाटलं नसेल तर नवल!