Skip to main content

वेटोळे (लघुकथा)

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 25/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
तर मी एकदा असाच चालत होतो, भटकत होतो, दगडधोंडे तुडवत, पायवाट मळवत, तहानभुक भागवत, ऊन्हा-पावसाला भिजवत, अंधाराला कवटाळत, जगत होतो. माझ्या कपाळी अपयशाचा टिळा लावला होता. प्रश्न जगण्याचा होता. जगुन जगुन थकण्याचा होता. गुडघे घासून मरण्याचा होता. तो प्रश्न घेऊन मी आत जंगलात खोलवर गेलो. उंच टेकाडं चढून पाहीली. दलदलीत चिखल माखून घेतला. काटेरी गवतात झोपुन गेलो. झऱ्याच्या पाण्यात गारठून गेलो. हे असह्य झालं. तुडुंब भरलेली माझी धोपटी रिकामी होत गेली, दुनिया भणंग झाली, मन ऊदास झाले, झाडाझाडांच्या सावलीत, डोंगर दऱ्यांच्या कपारीत, नदीकिनारच्या मातीत, स्वप्ने मरुन गेली. एके दिवशी सपाट मैदानावर , हिरव्या कुरणावर एक छप्पर माझ्याकडे बघत होतं, खुदकन हसत होतं, वाऱ्याच्या झोतांवर आपला पाचोळा ऊडवत होतं. मी पाहीलं, जवळ जाऊन बघितलं, एका तपानंतर मी माणूस पाहीला. ती एक बाई होती. घर सारवत होती. मला पाहून दचकली. जराशी घाबरली. तिच्या माथ्यावर मला काळजी दिसत होती. एक आशा दिसत होती. माझ्यासारख्या कफल्लक माणसाकडून तिला कोणताच धोका नव्हता. मला पाणी दिले. जेवू दिले. ऊबदार घोंगड्यात झोपुही दिले. तिने माझ्यावर ऊपकारच केले. या छपरात ही बाई राहते. एकटीच? मला युगांताची झोप लागली. मी शून्य होऊन गेलो. माझं अचेतन शरीर जराही हालचाल करत नाही. जेव्हा मी ऊठून बसलो, भान हरपून नुसताच बघत राहिलो. एक धिप्पाड माणूस माझ्या समोरच बसलाय. त्याच्या चेहेऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. याच्याकडे बहुदा कोणी पाहुणे येतंच नसावेत. त्याच्या हास्यातलं निरागस कुतुहल मला भेडसावत चाललं. मी किती दिवस झोपुन होतो, काहीच अंदाज़ लागत नाही. त्याने एक हरीण पकडून आणलं होतं. बोटाने इशारा करत मला त्याने दाखवले. सोनेरी केसांच मखमली हरीण. रात्री जेवणात तेच होतं. खरपुस भाजलेलं. मीठ मसाला टाकलेलं. कांदा लिंबू असलेलं, एवढं सुग्रास भोजन मी कित्येक महिन्यांनी, वर्षांनी केलं. मला हायसं वाटलं, त्याचे आभार मानले. यातला प्रत्येक घास चराचराचा आहे, वनदेवीचा आहे, सावलीत बसलेल्या गिधाडांचा आहे. माझ्या कपाळाच्या भेगाभेगांतुन वाहणाऱ्या रक्ताचा आहे. अखंड झिरपणाऱ्या तृप्तीचा आहे. मग रोज तो धिप्पाड मनुष्य काही ना काही आणतच गेला. ससे , तितर , घोरपड, आणि एकदा तर वाघही. वाघ, हरीण चार सहा दिवस आरामात पुरायचे. बारीकसारीक प्राणी एका दिवसात फस्त व्हायचे. खंगलेलं माझं शरीर आता धष्टपुष्ट होत चाललं. त्या स्त्रीच्या हाताला सुंदर चव होती. तिच्या डोळ्यांतील मादक भाव मला वाचता येत होते. ती एक रापलेली स्त्री होती. अवाढव्य जंगलात जगणं शिकली होती. पण हे लोक माझी एवढी का सेवा करतायत? काहिही न मागता भरभरुन देतायत. यांचा काही छुपा अजेंडा तर नाही? नरबळी देण्याअगोदर त्याला धष्टपुष्ट करतात म्हणे. ईथे मनुष्यवस्तीही कुठे जवळपास नाही. त्यांचा देवसुद्धा मला कोठे दिसला नाही. दु:ख यांच्याकडे नव्हतचं. प्रश्न सुरक्षेचा होता. भविष्याचा होता. भविष्यात येणाऱ्या संकटांचा होता. या धिप्पाड मनुष्याने मला शिकार शिकवली, डावपेच शिकवले. आत्मसंरक्षणाचा धडा दिला. त्याने माझ्यावर ऊपकारच केले. मी उगाच याच्यावर संशय घेतला. त्याने माणुसकी जपली होती. माझ्यावर विश्वासाचा डोंगर ठेवला होता. त्याला तडा जाईल असे मला काहिही करायचे नव्हते. पण... माझा जगण्याचा प्रश्न सुटलेला होता. एका दुपारी काळवीट टिपताना माझा बाण त्या धिप्पाड पुरुषाकडे वळतो. आणि सरळ त्याच्या मस्तकाचा वेध घेतो. डरजुली ऊन्हात रडत बसली, मी खोऱ्यानं माती सारत गेलो, भर दुपारी कावळा ऊडून गेला, खेंगाट रस्त्यात मरुन पडलं, जळकट धूर तुराट्यात घुसला. नराची मादी किवंडी, हा मृत्यूसुद्धा बुळबुळीत. त्या रापलेल्या स्रीच्या कपाळी वैधव्य आलं. तिच्या डोळ्यांतील मादक भावांना मी शोधत गेलो. प्रश्न भविष्याचा होता, सुरक्षित राहण्याचा होता, वंशाच्या वृद्धीचा होता. माझ्या राज्यात आगंतुक पाहुण्याला प्रवेश नाही हे मी आता ठरवून टाकलयं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8858
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

वा ! जव्हेरगंज साष्टांग दंडवत. अगदी जिएंची आठवण आली. जsssssरा लहान वाटतेय . अजून फुलवता आली असती. पण जे आहे तेही उत्कृष्ट . परत एकदा दंडवत स्विकारा मालक.

In reply to by उगा काहितरीच

हुश्श्य..! जीव भांड्यात पडला होता हो ऊगाजी. लय धन्यवाद _/\_ (पहिली प्रतिक्रिया एवढी छान आल्यावर मस्तच वाटते.अजून वाढवायला चान्स होता , मिसला आम्ही असो :) )

मस्त. तुमच्या नेहमीच्या कथांपेक्षा वेगळ्या बाजाची ही कथा खुपच सुंदर. एकदम आदिम भावना दर्शवणारी.

आता वाचतो! Sandy

सुंदर्, नेमकी आणि मोठी असावी असे वाटायला लावणारी! ती लहान आहे म्हणून जास्ती चरका लावणारी आहे असेही वाटते आहेच!

माझ्या राज्यात आगंतुक पाहुण्याला प्रवेश नाही हे मी आता ठरवून टाकलयं. लोक स्वतःच्या चुकांमधून शिकतात म्हणे, 'तो' स्वतःच्या यशामधून शिकला!

मस्त लिहिलंय भौ... नेमक्या शब्दांत आशय पार भिडवलाय...

ही कथा अशीच आणि एवढीच पाहिजे. नेमकी. अशी गोळीसारखी वाक्यं पाहिजेत. शेवटचं वाक्य तर माडगूळकरांच्या सत्तांतर ची आठवण करुन देत. मस्तच.

कथानक जितक्या वेगाने पुढे जाते तितक्या वेगाने वाचत गेलो, शेवटी लेख संपल्यावर श्वास घेतला. अप्रतिम लेख

सुरूवातीचे मनोगत वाचता मला एखाद्या सापाचे वा अजगराचे वाटले होते शीर्षकाच्या अनुषंगाने...पण तसं काहीच निघालं नाही याचे समाधान आहे. रच्याकने कथाशैली जबरदस्त!!

कथा आवडली. किवंडी म्हणजे बहिरी - बरोबर ना?

सुरूवात खूपच आवडली.. डरजुली, खेंगाट, किवंडी हे शब्द पहिल्यांदा ऐकले, त्यांचा अर्थ काय आणि कुठे वापरले जातात ते..

जबरदस्त. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे मानवातील आदिम शिकार्‍याचे थरारक वर्णन मोजक्या शब्दांत केलेले आहे.

कथा आवडलीच... खूप दिवसानंतर मिपा वर आले. किती छान गोष्टी वाचायच्या राहून गेल्यात, हे प्रकर्षाने जाणवले.

प्रश्न जगण्याचा होता. जगुन जगुन थकण्याचा होता. गुडघे घासून मरण्याचा होता. हि ओळ लैच आवडली बाकी कथा भारीच सारे काही जगण्यासाठी मरून-मरून त्यांना जगायचंय पुन:पुन्हा मरण्यासाठी