श्री गुरू...एक कोडे (भाग-१)
( भाग १. भारतात गुरूभक्ती का रुजली असावी ? थोडा इतिहास.
भागे २.. मला वाटते.)
गुरू ही भारतीय संस्कृतीतली एक महत्वाची संकल्पना आहे. अध्यात्म तर सोडाच पण संगीत, नृत्य अशा ललित कलांमध्येही ही गुरूभक्ती म्हणजे टोकाची, अंतीम श्रद्धेची, भावना आहे/ होती असे आढळून येते. भावूक, श्रद्धाळू शिष्याचे सोडा, तुम्ही त्याच्याकडे कणवेने, गरीब बिचारा, त्याला अक्कल नाही, अशा विविध दृष्टीकोनातून पाहू शकता. विषेशत: त्या विषयातले खोल ज्ञान आपणास नसेल तर अशी भुमिका घेणे सोपे जाते. पण ज्याने शास्त्रीय नृत्य शिकण्याकरिता १० वर्षे खर्च केली आहेत तो बिर्जू महाराजांवर त्यांच्या शिष्य वर्गाची असीम भक्ती का असते यावर उथळ टीका करण्याचे नकीच टाळेल. पण प्रखर बुद्धिमत्तेचे, प्रकांड पंडित, ज्यांच्या पायापाशी बसावयाचे भाग्य लाभावे असे वाटते, असेही जेव्हा असीम लीनतेने गुरूमहिमा आळवतात तेव्हा खरा प्रश्न उभा रहातो. यांच्या गुरूने यांना नक्की काय दिले की जे यांना स्वत: मिळवता आले नसते ? इथेच एक गोष्ट स्पष्ट केलेली बरी इतिहास-भुगोल, गणित शिकवतात ते शिक्षक व ज्या विद्येत-विषयात तुमच्या आंतर्मनाचा संबंध येतो, जेथे आंतर्ज्ञान मिळवावयाचे असते, त्यात मार्गदर्शन करतात ते गुरू. ही स्वैर व्याख्या पटली नाही तर सोडून द्या. ही विभागणी करतांना मला शाळेतील शिक्षकांबद्दल अनादर दाखवावयाचा नाही. मी माझ्या साठाव्या वर्षीही दसर्याला माझ्या॒ शिक्षकांच्या घरी त्यांच्या पायावर डोके टेकावयास जात होतो. गैरसमज नको. पण तरीही दोहोंत भेद आहेच.
संकल्पनेच्या जवळ जाण्याचा माझा प्रयत्न समजा. उदाहरणे येतील ती या संदर्भातच.
जेव्हा संत वाङ्मय, उपनिषदे, संगीत नृत्य आदींवरची पुस्तके वाचावयास सुरवात केली तेव्हा प्रथम लक्षातच येईना की ज्ञानीयांचा राजा, महाविष्णूचा अवतार असलेला ज्ञानेश्वर आपले सर्व कर्तुत्व केवळ दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या भावावर ओवाळून मोकळा कसा काय होतो ? एकनाथ म्हणजे संस्कृत पंडित, असाधारण लेखक, कळकळीचा समाजसेवक,अनन्य ईश्वरभक्त, थोडक्यात एक परिपूर्ण महामानव. तो का आपल्या गुरूला " ॐकारस्वरुपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा, तुज नमो,तुज नमो, तुज नमो " असे त्रिवार वंदन करतो ? एकनाथ अनाथ तर नाथ तरी कोण ?
उपनिषदांमध्ये तर ज्ञान मिळवावयाचा एकच मार्ग दाखवला आहे. हातात समिधा घेऊन नम्रपणे गुरूजींकडे जावयाचे व आपल्याला पडलेला प्रश्न विचारावयाचा. या मार्गालाच तर उपनिषद म्हणावयाचे ! वेदांना "फुटक्या नौका " म्हणणारी व लाभाचे श्रेय व प्रेय असे दोन भाग पाडून ऐहिक संपत्तीला प्रेय-श्रेय नव्हे- म्हणून झिडकारणारी, केवळ ज्ञानलालसी, निधडी माणसे जर गुरूला एवढे महत्व देत असतील, "अप्राप्य मनसा सह "असे "जे" काही, "ते" फक्त गुरूच देऊ शकतो असे म्हणत असतील तर एक नक्कीच की गुरू म्हणजे चालता बोलता माणुस नव्हे. म्हटले चला, सद्गुरू काही भेटण्याची शक्यता नाही, निदान त्या संबंधी माहिती काय मिळते ते तरी पाहू. प्रथम "गुरूगीता " पैदा केली व मग जेथे जेथे गुरू बद्दल उल्लेख असेल तो टिपून ठेवावयाचे असे ठरविले. हे अशक्य आहे हे लगेचच लक्षात आले. अहो, ज्ञानेश्वरी व
अनुभवामृत या दोन ग्रंथांतील जवळजवळ १० % भाग गुरूवंदना आहे. काय काय लिहून ठेवणार ? तरीही आज या शोधयात्रेतला काही भाग देत आहे. पहिल्या भागात अनेकांनी काय काय लिहले त्याची (त्यातल्या अतिअल्प भागाची) ओळख करून घेऊ व दुसर्या भागात या संकल्पनेबद्दल माझे मत काय ते पाहू.
प्राचीन भारतात विद्या शिकावयाची म्हणजे गुरूघरी जाणे भाग होते. २४ तास त्याच्या सान्निध्यात राहून, तो सांगेल ती सेवा करून,तो देईल ती विद्या प्राप्त करून घावी लागे. बारा एक वर्षे ही तपस्या केली की गुरू शिष्याला सांगे की " आता घरी जाऊन, गृहस्थाश्रम स्विकारून मी दिलेली विद्या तू तुझ्या विद्यार्थ्यांना दे." या प्रदीर्घ संगतीने विद्यार्थ्याला गुरूबद्दल आदर निर्माण होत असणारच. पण हे ही पुरेसे नव्हते.
छांदोग्यउपनिषदात वडील आपल्या शिक्षण घेऊन आलेल्या मुलाला विचारतात " तूला ह्याबद्दल महिती गुरूजींनी दिली का?' मुलगा म्हणतो "नाही.आता तुम्ही द्या." म्हणजे वडील हे दुसरे गुरू. तुम्ही आचार्य पदवीला पोचलात तरीही ज्ञान मिळवावयाचे असेल तर तुम्हाला तुमच्यापेक्षा श्रेष्ट माणसाकडे जावेच लागे. प्रश्नोपनिषदात पाच आचार्य गुरूकडे आपापले प्रश्न घेऊन गेले व गुरूजींनी त्यांना आपल्या आश्रमात एक वर्ष ठेऊन घेतले व मगच प्रश्न विचारावयास सांगितले ! अशा खडतर तपश्चर्येने मिळणार्या ज्ञानाची किंमत व ते देणार्या गुरूबद्दलची भक्ती शिष्याला अमोलिक वाटणारच. गुरूदक्षिणा द्यावी ही आंस त्यामुळेच. या काळातील, एक गंमत म्हणून, काही गुरू-शिष्यांच्या जोड्या बघा.
आचार्य-आचार्य , -आचार्य. पिप्पलाद, शिष्य -- कबंधिन, कात्यायन, वैदर्भी, कौसात्व, सौर्यायणी, ( हे पाच आचार्य आपल्याला न सुटलेले प्रश्न घेऊन पिप्पलादांकडे आले.)
आचार्य- देव, शिष्य-माणुस.... यम - नचिकेत. (कठोपनिषद) वरुण-भृगु (तैतरीय उपनिषद)
आचार्य-ऋषी , शिष्य-राजा ...याज्ञवल्क्य-जनक ( बृहदारण्यकोपनिषद)
आचार्य-प्रजापती, शिष्य-देव (व असूर) आचार्य-प्रजापती, शिष्य -इंद्र व बली.
आचार्य-राजा(क्षत्रीय), शिष्य-आचार्य(ब्राह्मण) आचार्य-प्रवाहण, शिष्य-आरुणि
मित्र-मित्र आचार्य--श्रीकृष्ण..शिष्य..अर्जुन
ही यादी द्यावयाचे कारण हे की ज्ञान देणारा गुरू हा श्रेष्ट; तेथे वर्ण वय, देव-मानव
- योनी यांचा संबंध नाही, हे सर्वांना मान्य होते.
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ! द्वंदातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् !!
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् ! भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामी !!
असे गुरूचे वर्णन करणारी "गुरूगीता" ही गुरूचे महत्व सांगणारी रचना. बहुदा संग्रह असावा. काल अंदाजे उपनिषदांनंतर. स्कंदप्रुराणांत आहे ही सांगावयाची पद्धत.( सर्वसाधारणपणे कुठलाही धार्मीक संस्कृत ग्रंथ पूरातन आहे असे भासवावयाचे असेल तर तो स्कंदपुराणात आहे असे ठोकून दिले जाते!) भगवान शंकरांनी माता पार्वतीला गुरूचे महात्म्य सांगितले, ती ही गुरूगीता.
गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वर: !
गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नम:!!
या सर्वांनी शाळेत शिकलेल्या श्लोकात गुरूला ब्रह्मा-विष्णू-महेश म्हटले असले तरी शिष्याची भुमिका ती नाही. पहिले उदाहरण कबीराचे घेऊ. कबीरच का ? तर तो इतर भक्तांसारखा श्रद्धाळू वगैरे दिसत नाही. आपले विचार तपासून घेऊन, तर्काला पटणारे खणखणीत नाणेच बाजारात आणणारा . "ना मै मसजिद, ना मै काबा" हे परमेश्वराचे बोल असे म्हणतांना तो कोणाची भीड बाळगत नाही. तर असा हा कबीर काय म्हणतो ?
गुरू गोविंद दोनो खडे, किसके लागो पांय !
बलिहारी गुरू आपने,गोविंद दिया बताय !!
गुरू आणि परमेश्वर समोर आले तर प्रथम वंदन कोणाला ? कबीर निस्संदिग्धपणे सांगतो "प्रथम गुरूला" आणि त्याचे कारणही देतो.
कबीरा हरिके रुठते, गुरूके शरने जाय !
कहै कबीर गुरू रुठते, हरि नही होत सहाय !!
कबीराचे सद्गुरू, त्याची पारख, त्याचे शिष्याशी असलेले संबंध यावरचे अनेक मनोहर दोहे आहेत.
आता संस्कृत, हिंदी सोडून थोडे महाराष्ट्रात डोकावू. सद्गुरूची दीर्घ संगत लाभलेले भाग्यवान दोघेच. ज्ञानेश्वर व एकनाथ.पहिला गुरूगृहीच रहात होता व जीवनाच्या अंतीम क्षणीही गुरूच्या हातात हात घालून चालण्याचे भाग्य त्याला लाभले. दुसरा लहानपणापासून गुरूकडेच वाढला, गृहस्थाश्रम स्विकारेपर्यंत गुरूचे प्रेमळ मार्गदर्शन त्याला मिळाले. इतर तेवढे नशिबवान नव्हते. तुकारामां गुरू स्वप्नात भेटले. वामनपंडितांना विजनवासात अल्पकाळ तर निळोबारायांना .. त्यांचे गुरू, तुकाराममहाराज, तर निळोबांच्या जन्माआधीच वारले होते !
तर या दोघांनी गुरूमहिमा गातांना कुठलेही बंधन पाळले नाही. सर्वारंभी गणपतीनमन ही परंपरासुद्धा मोडीत काढली. अनुभवामृताची पहिली ओवी आहे
यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् !
श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये !!
अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, अव्यय ही सर्व "ब्रह्मा"ची विशेषणे निवृत्तिनाथांना लावून त्यांनी गुरू व ब्रह्म यांची एकरुपता वर्णन केली व या अशा देवतेचा मी आश्रय घेतो हे मोठ्या अभिमानाने सांगितले. नाथपंथाचा आदीदेव श्रीशिव हाही दुसर्या ओवीत ! ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाची सुरवात गुरूवंदनेने होते व इतरत्र वाव मिळेल तेथे (व नसला तर ओढून ताणून आणून) श्रीनिवृत्तिनाथांना नमस्कार केला जातो.
हा ग्रंथ लिहून झाल्यावर कोणीही कृतार्थ होईल पण तेथेही ही गुरूकृपा व श्रोत्यांचे आशिर्वाद असे म्हणून ते नामानिराळे होतात.
चांगदेवपासष्टी सारख्या एका मित्राला लिहलेल्या पत्रातही
चांगदेवा तुझेनि व्याजे ! माउलिया श्रीनिवृत्तिराजे !
स्वानुभाव रसाळ खाजे ! दिधले लोभे !!
या शब्दात, "मी बापडा तुला काय नवीन सांगणार ? हा तर निवृत्तिमाऊलीने दिलेला गोड खाऊ आहे", असे म्हणत त्यांनी सर्व श्रेय गुरूला दिले.
" ॐ कार स्वरुपा सद्गुरू समर्था " सारखा एकनाथांचा आणखी एक अभंग पाहू.
गुरू परमात्मा परेशु ! ऐसा ज्याचा धृढ विश्वासु !
देव तयाचा अंकिला ! स्वये संचला त्याचे घरा !
एकाजनार्दनी गुरूदेव ! येथे नाही बा संशय !!
एकनाथ म्हणतात, "गुरूवर धृढ विश्वास ठेवा, देव तुमच्या घरी काम करावयास येईल. गुरूभक्ती असेल तर देवाच्या भक्तीची गरज नाही "
मराठी संतांनी, नव्हे, सर्व भारतीय संतांनी, आपल्याला जे काही मिळाले ते सर्व केवळ गुरूकृपेने असेच म्हटले आहे. अगदी मनापासून, निष्टेने, वरवरचे नव्हे. तर ही भक्ती कशापासून उपजली ? उत्तर शोधावयाचा एक प्रयत्न पुढील भागात.
शरद
Book traversal links for श्री गुरू...एक कोडे (भाग-१)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक छोटासा प्रश्न - तुम्ही
तुम्ही आता ज्या पायरीवरुन हा
नाही हो.. लेखक यापैकी कोणत्या
तुमच्या भावना नेमक्या पोचल्या
बरं ते आस्तिक आहेत असे समजून लिहा.
आस्तिकांच्या बाजूने मी!
मला चर्चा करायची आहे.. बॅटिंग
बरं आस्तिक मंडळीच्या बाजूने
नाही हो.. लेखक यापैकी कोणत्या
शरदकाकांचे लेख नेहमीच आवडतात.
असेच
लेख आवडला.
गुरूपरंपरेचा शोध आवडला.
+१
ज्ञानीयांचा राजा, महाविष्णूचा
क्या बात सगा. भारी.
लेख आवडला
जे कृष्णमुर्तीं ची या विषयावरील एक उत्तम चर्चा
सर्व गुरूंना व गुरुभक्तांना सादर प्रणाम
??????????????????????????