आपण गाणी का म्हणतो?
इकॉनॉमिस्टच्या या महिन्याच्या अंकात एक " व्हाय म्युझिक" म्हणून एक लेख होता, त्याने लक्ष वेधले. लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे, म्हणून इथे दुवा देते. पण थोडक्यात लेखाच्या विषयाबद्दल सांगायचे तर आपल्या (माणसांच्या) आयुष्यात गायन/वादन यांचे एवढे महत्त्व का असावे यावरून मांडलेल्या विचारधारांचा हा एक मनोरंजक माहिती असलेला लेख आहे.
लेखात म्हटल्याप्रमाणे माणसांचे मनोरंजन करणारे अनेक उद्योग आहेत, पण ते माणसाच्या सहज दिसून येणार्या भुका सहसा पुरवतात असे दिसते- जसे कामुक साहित्य, किंवा चित्रपट, हे कामवासनेला काही प्रमाणात शमवतात. कामवासना ही नैसर्गिकरित्या मनुष्यप्राण्यात असतेच त्यामुळे ह्या उद्योगांची वाढ होत राहिली तर फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण गाण्याच्या बाबतीत हल्लीच्या तरूण मुलामुलींना त्यांच्या जागृतावस्थेतील १/८ वेळ गाणी ऐकण्यात घालवावासा वाटावा अशी कोणती भूक यामुळे भागते आहे, असा एक प्रश्न या लेखातून पुढे आला आहे.
लेखातील काही विचारधारा थोडक्यात सांगायच्या तर अशा सांगता येतील -
१. गायन हे पुनरुत्पादन क्रियेसाठी सहाय्यभूत ठरते. - एक शास्त्रज्ञ डॉ. मिलर यांचे म्हणणे साधारण असे आहे की गायन हे माणसाच्या गरजेचे आहे. गायन हे माणसाच्या जगण्याच्या धडपडीला (सर्व्हायवल) किंवा पुनरुत्पादनाच्या क्रियेला मदत म्हणून असावे, त्यातही मिलर यांना गायनाचा पुनरुत्पादनाच्या प्रेरणेशी संबंध आहे असे वाटते. पक्ष्यांमधील माद्या मिलनाआधी नरांची निवड करण्याआधी त्यांच्या गायनकलेची पारख करतात असे आढळते!
२. गायनाने कामपूर्तीसाठी जोडीदाराच्या निवडीसाठी मदत होण्यापेक्षा व्यक्तीसमूह एकत्र येण्याची क्रिया होते असे मत आहे ते यासंबंधी संशोधन करणारे एक शास्त्रज्ञ डॉ. डनबार यांचे. ह्या मताला पुष्टि मिळावी अशी उदाहरणे आपण अनेकदा पाहतो. धार्मिक बाबतीत तर गायनाचे महत्त्व वेगळे सांगायला नको. देवळांतील भजने, चर्चमधील धीरगंभीर संगीत, सूफी संगीत, ही धार्मिक उदाहरणे आपल्यासमोर असतातच. चित्रपट संगीत, नाटकांमधील संगीत यातून मानवांच्या तात्कालिक भावभावना किंवा प्रेरणा तयार होत असतात असेही दिसते. या सर्वाचे परिणाम म्हणून ते ते व्यक्तीसमूह एकत्र येताना ( आणि एक समूह म्हणून विकसित होताना) दिसतात.
३. याहून वेगळे मत आहे ते म्हणजे डॉ. पिंकर यांचे. त्यांना असे वाटते की गायनप्रक्रिया हा एक अपघात आहे - शब्द (भाषा) आधी तयार झाले, आणि त्यातून गाणे तयार झाले. त्यामुळे गाणे कामप्रेरणा किंवा व्यक्तीसमूहांना एकत्र ठेवण्याच्या "गरजे"साठी तयार झालेले नसून जणू एखाद्या कॅथीड्रलला आकार देणार्या कमानींच्या मधली जागा कलाकार जशी सुंदर पण निरर्थक (बांधकामाची गरज नसलेल्या) अशा चित्रांनी किंवा कारागिरीने भरून काढतात, तसेच गाण्याचे आहे असे हे काहीसे मत आहे. गाणे हे मेंदूला शब्द मिळाले की त्याला अर्थ देण्यासाठी सूरतालात बसवण्याचा प्रयत्न तो मेंदू करतो.
४. अमेरिकेतील सॅन डिएगो येथील डॉ. पटेल यांच्या म्हणण्याप्रमाणे, शब्द "लिहीणे" जसे शिकावे लागते, काहीजण लिहीण्याची कला काही प्रश्नांमुळे जशी कधीच शिकू शकत नाहीत किंवा काहींना लिहीणे वाचणे शिकण्यासाठी त्रास होतो, तसेच गाण्याचेही आहे. गाणे हे काही एक प्रयत्न करून शिकावे लागते, ते "बदल घडवून" आणू शकणारे एक "तंत्र" ( transformative technology) आहे असे हे काही मत आहे.
ही सर्व मतमतांतरे वाचली तेव्हा हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट आठवली. जसे हत्ती नक्की काय आहे हे नुसते त्याच्या एका भागाला स्पर्श करून समजत नाही, तसे वाटले. पण याचा अर्थ असा नाही, की आंधळ्यांनी आपापली निरीक्षणेच नोंदवू नयेत, नाही का? कदाचित सात आंधळ्यांनी निरीक्षणाची देवाणघेवाण केली तर हत्ती खरा कसा आहे कळू शकेलही कदाचित. भारतीय संगिताची परंपरा पुरातन आहे, संगिताला आपल्या आयुष्यात अतुलनीय महत्त्वही आहे. तुम्हाला काय वाटते? गायनकलेचा विचार करण्याची ही पद्धत योग्य आहे का? ज्यांना भारतीय संगितकलेचे थोडेफार ज्ञान आहे, अशांचे मत याबाबतीत काय आहे? हा सर्व वेडेपणा वाटतो, का, असा विचार आपण (एक व्यक्तीसमूह म्हणून) करीत नाही याचे वैषम्य?
क्र. २ चे मत (डॉ. डनबार यांचे) जर खरे असले, आणि भविष्यकाळात गायनाचे असे शास्त्रीय विश्लेषण करीत गायनाचा वापर स्वतःचे समूह विकसित आणि प्रभावशाली करण्यासाठी एखाद्या व्यक्तीसमूहाने (जाणीवपूर्वक) करून घेतला तर जे समाज असे करणार नाहीत त्यांचा प्रभाव कमी होत जाईल का? का हा सर्व कल्पनेचा खेळ आहे?
वाचने
5099
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
>>आपण गाणी
चित्रावैन
In reply to चित्रावैन by विसोबा खेचर
रहावत नाही
डर
या
ह्म्म....
पूर्वी
वा ! फार
हर दिल जो - - - - -
बर्याच पद्धतीने
In reply to बर्याच पद्धतीने by विकास
Our sweetest songs are those that tell of saddest thought.
In reply to Our sweetest songs are those that tell of saddest thought. by रामदास
खरचं की!
धन्यवाद,
वेगळाच विषय
चांगला लेख
छान विषय आणि वेगळा लेख.
संगीत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लै भारी विषय....
सर्वांना धन्यवाद