नाखऱ्या
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नाखऱ्या आमच्यासाठी हिरो होता. होताच तो देखणा . गोरा, उंच, धारदार नाक, डोळे , कुरळे केस.. आणि आम्ही एकजात बावळट. आधी आपल्या थोबड्याबद्दल काय वाटायचं नाही पण सातवी आठवीपासून ते खूपच टोचायला लागलं . आपले केस भलतेच बारीक आहेत, तेल लावलं की एकदम चम्या दिसतो असे अनेक शोध लागू लागले. आणि या सर्व शोधांचा मापदंड होता नाखऱ्या.
नाखऱ्या आमच्या जवळच राहत असे . त्याचे वडील बँकेत होते आणि आई प्राथमिक शाळेत शिक्षिका. सुशिक्षित कुटुंब. आमच्या घरी सकाळच्या वेळी भाजीवाल्या येत असत. त्या आधी घरोघर जाऊन भाज्या विकीत आणि नंतर बाजारात विकायला बसत. पण त्या नाखऱ्याच्या घरासमोरून कधी जात नसत. एकदा आईने त्यांना कारण विचारलं, "ती नाखरीण आसा ना खूपच भाव पाडून मागता. माका देवचा लागता कारण झीलगो तिच्या शाळयेत आसा. पास होउक व्हयो ना . म्हणूनशान मी टाळताय तेंका. "त्यावेळपासून आईचं नाखऱ्याच्या आईबद्दल मत तितकसं चांगलं राहिलं नाही. दोन दोन कमावणारे असूनही दानत चांगली नाही असं ती म्हणे. आईला माझं नाखऱ्याबरोबर रहाणं खटकू लागलं. पण मी तिचं ऐकत नसे..
नाखऱ्या शीळ वाजवत शाळेत एन्ट्री घेई, तेव्हा कितीतरी मुलींच्या पाठच्या वेण्या पुढे किंवा पुढच्या वेण्या मागे जात. कुणाचं ना कुणाचं दप्तर वह्या हमखास खाली पडे. कुठूनतरी नाजूक हसण्याचा गुछ्छ फुलत असे. आणि आम्ही आतल्या आत चरफडत असू. कितीही प्रयत्न केला तरी तो बेफिकीरपणा, ती ऐट काही केल्या आम्हाला जमत नसे. पुढं पुढं लक्षात आलं की नुसतं नाखऱ्याबरोबर राहिल्यानं देखील पोरींच्यात भाव मिळतो. मग आम्ही त्याचे शिष्य बनलो. पण नाखऱ्याला या कशाची काहीही पडली नव्हती. त्याचं मन धक धक वाल्या माधुरी वर बसलं होतं. त्यानं कुठच्यातरी मासिकातून मिळालेल्या तिच्या पत्त्यावर लव्ह लेटर्स वगैरे लिहिली होती. आणि त्याला उत्तर म्हणून माधुरीची सही असलेले काही फोटो त्याला मिळाले होते. तो त्या फोटोत बुडालेला असे. त्याचं दप्तर, वह्या पुस्तकांपेक्षा माधुरीच्या फोटोनेच भरलेलं होतं . गळ्यात m अक्षर वाली एक चेन पण होती. नाखऱ्या माधुरीमधून कधीच बाहेर येणार नाही असं आम्हाला वाटत असताना एक दिवस त्याची विकेट पडली.
पल्लवी आठवीत कशी आली याचं आम्हाला कोडं होतं. कारण बाहुला बाहुलीच्या खेळातून ती कधी बाहेरच पडली नव्हती. अतिशय भाबडी मुलगी होती. तिचं आणि नाखऱ्याचं जमल्याचं कळलं तेव्हा आम्ही तीन ताड उडालोच. हळूहळू शाळेच्या भिंतीवर, मुतारीत, बेंचवर सगळीकडे त्यांच्या प्रेमाची हार्टस दिसू लागली. पल्लवी एकदम आमची वहिनी झाली. तेव्हा शाळेत अशी प्रकरण फार म्हणजे फारच दुर्मिळ होती. नाखऱ्या एका वेगळ्या, वरच्या लीग मध्ये गेल्याने त्याला अजूनच जास्त भाव मिळू लागला. आम्ही त्याच्याकडून मुली पटवायच्या टिप्स घेऊ लागलो. एकदा तो म्हणाला, "आपण ना जांभई द्यायची जर मुलीचं आपल्याकडे लक्ष असेल तर तिलाही जांभई येणार. नक्की. " मग काय आम्ही आपले दिवसभर जांभया देतोय पण आमच्या आवडत्या पोरींना काही जांभया येईनात. मग जिला जांभई येईल ती आपली असा उलट विचार करून झाला पण छे! नाखऱ्याच्या टीपचा आम्हाला काडीचाही फायदा झाला नाही. वर्गात झोप काढतो अशी तक्रार मात्र घरी पोचली .
नाखऱ्याने खूप गोष्टी शिकवल्या. गावातल्या विठ्ठल मंदिराच्या मागे निर्मनुष्य झाडी होती. निर्मनुष्य म्हणजे तिथं सभ्य माणसं सहसा फिरकत नसत. आम्ही सगळे तिथं जमायचो. पहिल्यांदा सिगरेट तिथच ओढली. नाखऱ्यानं अख्खी एक आणि त्याच्याकडून शिकत आम्हा पाच सहा जणांनी मिळून एक. पहिल्या झुराक्याला आय माय आठवली. ज्याम ठसका लागला. नाका तोंडात धूर जाऊन घुसमटून गेलो. डोळे पाण्याने भरले. पण सगळ्यासमोर इम्प्रेशन मारायचं होतं. म्हणून डोळ्यातलं पाणी लपवत दुसरा झुरका ओढला. नंतर तयार झालो . प्लेबॉयची ओळख पण इकडेच झाली. नाखऱ्याचा कुणी चुलत की आत्ते भाउ एअर इंडियात होता त्याच्याकडून नाखऱ्यानं ते ढापलं होतं. मंदिरामागे आम्ही बऱ्याचदा जमू लागलो. असाच एक दिवस तिथे सिगारेट फुंकत असताना कुणीतरी मागं खाकरल्याचा आवाज आला . बघतो तर शंकर काका लाकडाची मोळी घेऊन येत होते. मी घाबरलो, यांनी आता घरी सांगितलं तर? पण शंकर काकांचं वय झालं होतं, त्यांना नीट दिसत नसे . त्यामुळे त्यांनी मला ओळखण्याचे चान्सेस खूप कमी होते.
दुसऱ्या दिवशी मी शाळेत निघालो आणि शंकर काका गेट उघडून आत येताना दिसले. पायाखालची जमीन निसटणे वगैरे जे जे वाक्यप्रचार आहेत ते सर्व झालं. वाटलं आता मेलो. आईने शेवटचं फटकवलं त्याला दोन तीन वर्षं होऊन गेली होती. पण हीराच्या पेंडीची आठवण आणि भीती अजून होती. मी पळ काढला. त्या दिवशी शाळेत मुळीच लक्ष लागलं नाही. संध्याकाळी भीत भीतच घरी आलो. घरी शांतता होती. दोन तीन दिवस वादळाची वाट पाहिली पण काहीच घडले नाही. पण त्यानंतर मंदिराच्या मागे जायची हिम्मत झाली नाही.
नाखऱ्या आणि पल्लवीचं प्रकरण चालू होतंच. दहावीचा सेंड ऑफ ही तशी आमची शेवटची भेट. तेव्हाही दोघच कुठंतरी गेले होते. आमच्यासाठी ते फारच रोम्यांटिक होतं. दहावी झाली आणि मी शहरात आलो. त्यामुळे नाखऱ्या, बतक्या, पिंट्या या सगळ्यांशीच फार संपर्क राहिला नाही. नाखऱ्या आणि पल्लवीनं कसंबसं बी ए पूर्ण केलं आणि लगेच लग्नही केलं. पोटापाण्याचं काय हा प्रश्न होताच पण त्याच सुमारास गावात राजकारणाचं नवीन वारं वाहत होतं. गावातल्या नवीन नेत्यानं त्याच्या विरोधकाचा भर दिवसा बाजारपेठेत खून केला. त्याची इतकी दहशत बसली की कोणीही साक्ष द्यायला तयार होईना. काही दिवसात लोकांना देखील "बघा काय पॉवर फुल नेता आहे" सांगण्यात धन्यता वाटू लागली. वर्षानुवर्षे निवडून येणारा प्रामाणिक स्वच्छ चारित्र्याचा नेता पडला आणि हा गुंड निवडून आला. मग तर दहशतीचच राज्य झालं. मोक्याच्या जमिनी पडेल भावात विकत घेणं, बेकायदेशीर धंदे चालू करणं अशा अनेक गोष्टीना उत आला. जो विरोध करेल त्याला समज दिली जाऊ लागली. नेत्याचे सपोर्टर म्हणून तरुण दणकट पोरांची गरज होती. मग ते मिळवण्यासाठी गावागावात क्रिकेट म्याचेस चालू झाल्या, त्याचा सराव महिनोन्महिने चाले. जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या दोन्ही टीम्सना घसघशीत बक्षिसे मिळत शिवाय सरावाच्या वेळेपासून जेवायखायची सोय होई ते वेगळेच. मग सभा मिटिंग्स यात या मुलांना घेऊन जात. खायचं प्यायचं, दादागिरी करायची, शिवाय वर हातात पैसा मिळायचा त्यामुळं पोरं खुश. गल्लोगल्लीत नेत्याचे अनुयायी तयार झाले. इकडे नेत्याची पॉवर वाढत होती. आणि तिकडे घरोघरची शेती बागायती ओस पडत होती. नारळ फणस आंबे काढायला घरच्या तरुण पोरांना वेळ मिळत नव्हता पण नाक्या नाक्यावर हेच घोळक्यानं तासंतास उभे असत. नाखऱ्या देखील या राजकारणात पडला. दोन तीन वेळा तुरुंगाची हवा पण खाऊन आला. आणि लवकरच नेते साहेबांचा खंदा अनुयायी बनला.
एकदा सुट्टीत गावी गेलो असताना नाखऱ्या भेटला. मी पटकन ओळखलंच नाही. पांढरा शुभ्र शर्ट, वरची चार पाच बटणं उघडी गळ्यात दोन तीन चेन्स, हातात अंगठ्या. सुटलेलं पोट, सुजलेला चेहरा. तारवटलेले डोळे, तोंडात गुटखा. बाइकवर त्याच्या मागे पल्लवी बसली होती. शाळेतल्या दोन वेण्या घालणाऱ्या मुली लग्नानंतर भेटतात तेव्हा इतक्या वेगळ्या दिसतात. शाळेत बालीशपणे वागणारी ती, आज खूप मोठी दिसत होती. अकाली प्रौढ झाल्यासारखी. "अरे नाखऱ्या, तू? काय करतोस सध्या ?" मी विचारायचं म्हणून विचारलं . "आपला पेट्रोल पंप आहे .कधीही ये गाडी घेऊन. पैसे वगैरे नाय द्यायचे. माझा मित्र म्हणून सां . " त्याच्या बोलण्यात गुटख्याचा, दारूचा आणि सत्तेचा इतका दर्प होता की फार काळ तिथं थांबवेना ."हो हो म्हणत मी सटकलो.
आई म्हणाली, "नाखऱ्याचं पिणं खूप वाढलं . पिऊन बायकोला मारहाणही करतो. मध्ये कुणीतरी पोलिसात तक्रार केली तर पल्लवीनं हा आमचा व्यक्तिगत प्रश्न आहे म्हणून त्या तक्रार करणाऱ्यालाच तोंडघशी पाडलं. आता कुणी मध्ये पडत नाही. तसंही नाखऱ्याविरुद्ध बोलायची कुणाचीच टाप नाही" . पल्लवीचे आई वडील खरंतर गावातच राहत होते. पण मुलीला यातून बाहेर काढण काही त्यांना जमत नव्हतं किंवा तिचीच इच्छा नसावी. खरं खोट कोण जाणे. त्यानंतर तीन चार वर्षात नाखऱ्या गेल्याचं कळलं. दारूमुळे लिव्हर कामातून गेली होती. शेवटचा आठवडाभर सरकारी हॉस्पिटल मध्ये होता. खूप हाल झाले त्याचे पण पल्लवीनं अगदी प्रेमानं सगळं केलं. नवरा गेल्यावर धाय मोकलून रडली .
नाखऱ्या गेल्याला आता काही वर्षं उलटून गेलीत. पल्लवी आता नोकरी करते. एका शाळेत शिकवते. आणि दोन मुलांना वाढवते. नुकताच दहावीच्या ब्याचचा कसकाय ग्रुप तयार झाला. त्यात पुन्हा एकदा जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. सगळ्यांनी आपापले, आत्ताचे फोटो वगैरे शेअर केले. पल्लवीनं सुद्धा मुलांचा, स्वत:चा फोटो टाकला होता. नाखऱ्याचा मुलगा थेट बापासारखा दिसतो. गोरा, उंच, कुरळे केस अगदी हिरोसारखा. आईला हे सांगितल्यावर आई म्हणाली , "हो गुण पण बापाचेच घेतलेत. नाक्यावर मित्रांसोबत सिगारेट फुंकत उभा असतो …… "
प्रतिक्रिया
क्लासच लिहिलंत!
लिखाण शैली खुप छान आहे.
छान लिखाण
छान .वाचताना सग् ळ समोर घडतय
+१ आवडलं
अर्र..!
चुकलामाकला बर्याच दिवसांनी
खुपच छान :)
पहिल्या ओळीपासून कथेत रमले .
लिहाय्ची शैली आवडली. मुलगाही
ओघवती शैली आहे तुमची. पोचली
कथा आवडली!
ओघवत्या शैलीत लिहीलेय.
ओह!
लेखनशैली आवडली. नाखरे म्हणजे
खूप मस्तं लिहिलंय.
मस्त ! खूप दिवसांनी काहीतरी
एकजात सगळे मित्र आठवले....
आवडलं. असाच एक नाखऱ्या आठवला.
सुंदर. वाचनीय. अशाच पुढील
लेखनशैली आणि लेख....
मस्त जमलाय लेख.
नेमके व्यक्तिचित्र आणि सुरेख
+ १११११
छान जमलंय व्यक्तीचित्रण .
अर्रर ..
एक नंबर लिहिलंय राव.
सही लिहिलंय
मस्त गोष्ट
तंतोतत वास्तव चित्रण.
भारी लिहिलयं!
नॅास्टॅल्जिक!
क्लास!
छान लिहिलयं!
जबराट
व्य.चि. आवडले.
चांगले लिहिलेय.
कथा आवडली..
मस्त लिहिलय !!! आवडेश !!
मस्त लिहिलय आवडलं
आवडेश
सर्वांना धन्यवाद!
सुरेख लेखन !