✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जयविजय

अ
अभ्या.. यांनी
Sat, 02/02/2013 - 15:08  ·  लेख
लेख
"ओ दादा येऊ का आतमदे" अगदी टिपिकल बार्शी टोनमध्ये आवाज आला. आधी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटणारा चेहरा, साधे कपडे आणि हातात एक पिशवी. "जरा काम होतं फ्लेक्सचं. जास्त नाय ३० फुटाच हाय पन आरजंट पायजे" मला अजूनही आठवत नाहीये याला कुठं पाह्यलय मी. "जय्विजय पायजेत छापून ७ फूटाचे दोन" "दुपारी जेवायला गेलेले डीटीपी ऑपरेटर अजून आले नाहीत. बसा जरा." ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जयविजय डोळ्यासमोर उभे राहिले बार्शीतले वाडे, मोठमोठे दरवाजे, दारावर लग्नप्रसंगी रंगवले जाणारे भालदार चोपदार म्हणजेच बार्शीच्या भाषेत जयविजय. चार पाच रंगाने भरलेल्या वाट्या आन तीनच ब्रश घेऊन तासाभरात घ्रराचे लग्नघर करणारा पेंटर. तो तास आणायसाठी मात्र पत्रिका छापायला देतानाच त्याला आमंत्रण द्यावे लागे. लग्न अगदी तोंडावर आले की आम्ही बच्चे कंपनी त्याच्या मागावर सुटायची. दुकानी, त्याच्या घरी आणि तो काम करत असलेल्या घरी अशा सगळीकडे चकरा झाल्यावर हा कलाकार सापडायचा तानाजी चौकात देशीच्या गुत्त्यावर. "सकाळी येतो म्हणून सांग काकांना" एवढाच निरोप घेऊन आम्ही घरी परतायचो. "येईल रे, कुठे जातोय पळून, बँकेचा थकबाकीदार आहे तो", वडीलांचा दांडगा विश्वास. त्यामुळेच कदाचित दुसर्‍या दिवशी दारात बघावे तर त्याने रंग कालवायला सुरुवात केलेली असायची. पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेज असायचे. सुरुवातीला फिकट गुलाबी रंगात थोडीशी पिवळी छटा असणारा त्वचेचा रंग, लगेच पिवळ्या शेंदरी रंगात पितांबर आणि दागिने, जांभळ्या रंगाचा शेला आणि लाल कटीवस्त्र. सुरुवातीला नुसतेच रंग दिसत. काळा रंग निषिध्द असे म्हणून गडद तपकिरी रंगाचा लहान ब्रश एकदा फिरायला लागला की पाहता पाहता चित्र सजीव होई. एक पाय गुडघ्यात वाकवून हाती तिरपा दंड घेतलेले, अगदी देवासारखे देखणे मुकुटधारी जयविजय. बार्शीत श्री भगवंताचे मंदिर असल्याने पहिल्यापासूनच दरवाजावर भालदार चोपदार नव्हेत तर जयविजयच. खाली लफ्फेदार सही ठोकेस्तोवर घरातून चहा आलेला असायचा. चहा आणि बिदागी घेऊन तो जायचा पण माझे निरिक्षण काही संपायचे नाही. चाटे गल्लीतल्या त्याच्या दुकानासमोर उभारणे म्हणजे सुध्दा मौज असायची. शेजारी महाराष्ट्र ब्रास बँडवाल्यांची प्रॅक्टीस चालू आणि त्या तालावर इकडे दुकानाचे बोर्ड रंगवणे मी तासनतास बघत राहायचो. लस्सीचा ग्लास हातात घेतलेला अर्नोल्ड पासून चहा पिणार्‍या अमिताभ पर्यंत सगळे हुबेहुब उतरलेले असायचे. चित्रकलेच्या वहीत बर्‍याच प्रयत्नानंतर जमलेले जयविजय घेऊन एकदा त्याला दाखवावे वाटे पण त्याच्या तिरसटपणाची भितीही वाटायची एक रविवारी मात्र सकाळी सकाळी तो दारात उभा होता, चेहर्‍यावर अत्यंत अजिजी आणि आपली रंगीबेरंगी सायकल घेऊन. तासभर माझ्या वडीलांचे हप्ते न चुकवण्याचे आणि दारु न पिण्याचे उपदेश ऐकून तो निघणार इतक्यात मी माझे जयविजय त्याला दाखवले. "चांगलं काढताव पण मोठं झाल्यावर सायब व्हा बँकेतलं, तुमच्या वडलासारखं." एवढेच बोलून गेला. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आज पट्कन तेच जयविजय एका कागदावर काढून स्कॅन करुन पीसीवर त्यात रंग भरायला १५ मिनिटे खूप होती. "आमचे वडील पण शेम आस्लंच जयविजय काढायचे बघा. बार्शीत पेंटर होते, गेले १० वर्शाखाली" "आणि तुम्हाला नाही का येत मग पेंटींग?" बँकेतल्या साहेबाच्या मुलाचा निरर्थक प्रश्न "नाही जमत, वडीलानी पतसंस्थेत लावलय नोकरीला. आता घरात आरजंट लग्न ठरलय. मोकळं दार कसं ठेवायचं म्हणून तर हे फ्लेक्स लावतो दारावर"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24403 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

मीSSSSSSS

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 15:44 नवीन
बोला कोण कोण येणार ते.?
मी SSSSSSS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अण्णा

नि३सोलपुरकर
Mon, 02/04/2013 - 15:48 नवीन
मला दुसरा किंवा तिसरा शनिवार/रविवार जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मी पण ट्राय करतो

प्रभो
Wed, 02/06/2013 - 10:58 नवीन
मी पण ट्राय करतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पुरेसे आधी न कळवल्याने येऊ

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 02/06/2013 - 11:15 नवीन
पुरेसे आधी न कळवल्याने येऊ नाही. टुल्ली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

एक जयविजयची जोडी पाठवून देण्यात येईल

नक्शत्त्रा
Mon, 02/04/2013 - 11:51 नवीन
एक जयविजयची जोडी पाठवून देण्यात येईल........छान आहेत हो ि च त्र ...आम्हाला पण मिळाली तर आनंदी आनंद!! फार आवडलं लेखनही ,...........
  • Log in or register to post comments

मस्त रे..लहानपण आठवले.

गणामास्तर
Mon, 02/04/2013 - 12:07 नवीन
मस्त रे..लहानपण आठवले. तुझ्याकडे कुठल्या घराच्या भिंतीवर रंगवलेले जयविजय असतील तर फटू टाक ना.
  • Log in or register to post comments

बार्शीचा भगवंत

आनंद घारे
Mon, 02/04/2013 - 14:54 नवीन
पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेज असायचे. संगणकाने हे काम आता अगदी सोपे केले आहे. लेख थोडक्यात पण छान आहे. जय विजय, भगवंताचे दशावतार आणि गजेन्द्रमोक्षाची कथा यांच्यात काही तरी कनेक्शन आहे. कोणी ते सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments

मस्त लेखन .

तर्री
Mon, 02/04/2013 - 15:26 नवीन
जबरी आवडले .
  • Log in or register to post comments

कंडका पाडलेला

विसुनाना
Mon, 02/04/2013 - 16:07 नवीन
लै लांबड लावली न्हाई ते बरं झालं. रोल रिव्हर्सलचा शेवटी असा कंडका पाडल्यानं कथेचा हिसका बसला. कथा आवडली.
  • Log in or register to post comments

आणि हे असे जयविजय

विसुनाना
Mon, 02/04/2013 - 16:17 नवीन
लहानपणी वाड्याच्या दरवाजाच्या बाजूंना हे उभे असत. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

अगदी हेच.

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 16:30 नवीन
विसुनाना धन्यवाद. रोल रिव्हर्सल. अगदी हेच. आणि योगायोग बघा साधन सुध्दा मिळाले मिरर इमेजचेच. जयविजय. तुम्ही खाली दिलेलेच चित्र अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

मस्त लिहिले आहेस रे......

निवेदिता-ताई
Mon, 02/04/2013 - 18:39 नवीन
आम्च्या इथेही राममंदिरात पाषाणाचे जयविजय उभे आहेत.......
  • Log in or register to post comments

मस्त रे अभ्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/04/2013 - 18:44 नवीन
अभ्या, पहिलं वाहिलं लेखन मस्त झालंय. कमी शब्दात पेंटरची आयुष्य डोळ्यासमोर उभं राहीलं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. थोडं लिहायचं पण मस्त लिहायचं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

.

मालोजीराव
Mon, 02/04/2013 - 18:59 नवीन
|| अंबरीश वरद श्री भगवंत ||
  • Log in or register to post comments

व्वा सुंदर!!

सिद्धार्थ ४
Tue, 02/05/2013 - 02:04 नवीन
वाचून एकदम मामाच्या वाड्यात समोर उभा आहे असे वाटत होते. (बार्शी माझे आजोळ, बार्शी मधले एकदम मोठे प्रस्थ) आता मामा हि नाही, आजोबो आणि मोठी आई हि राहिली नाही. माझी आई गेल्या वर तर बार्शी आता २/३ वर्षातून एकदा जातो. बालपणी संपूर्ण एप्रिल आणि मे बार्शीला पडीक असायचो. रात रात भर सायकल भाड्यानी घेऊन फिरवणे, त्राक्टेर, बैलगाडी तून शेतावर जाणे... गेले ते दिन गेले. :(
  • Log in or register to post comments

लेखन आवडलं

पिवळा डांबिस
Tue, 02/05/2013 - 02:36 नवीन
अभ्याभाऊ, तुमचं लेखन आवडलं. तुमच्या लिखाणातला नायक बँकेतल्या साहेबाचा मुलगा झाला जयविजय काढणारा, आणि पेंटरचा मुलगा झाला पतसंस्थेत काम करणारा... नशिबाचा खेळ!!!
  • Log in or register to post comments

मीच तो

अभ्या..
Tue, 02/05/2013 - 02:44 नवीन
पिडाकाका तो नायक मीच. :) फरक इतकाच की अडाणी असून तो रंगाच्या तीन चार वाट्या आन तीन ब्रशात हे सारं उभं करायचा. मला त्यासाठी ५ वर्षाची डीग्री, दोन तीन डिप्लोमा करुन एक फ्लेक्स प्रिटींगचं युनिट टाकावं लागलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ए अब्या ... पिडाकाका नाहित ते

जेनी...
Tue, 02/05/2013 - 02:47 नवीन
ए अब्या ... पिडाकाका नाहित ते .. पिं पिं लिहि ... पि वर अनुस्वार ... पिंडा ... पिंडा काका ....... कैपण लिवतो .... :-/ केस केली मग ???? :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

डां डां लिहि ... डा वर

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 02/06/2013 - 11:20 नवीन
डां डां लिहि ... डा वर अनुस्वार ... पिडां ... कैपण लिवते .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

पिडाकाकाच

अभ्या..
Tue, 02/05/2013 - 02:55 नवीन
पूजा प्राजुतैने काका केलेल्या पिडाकाकांचे एकेक जबरी प्रतिसाद न लेखन वाचूनच तर मी मिपावर आलेलो आहे. त्यांचे नाव चुकायचे नाही माझ्याकडून. चुकले तरी ते केस करणार नाहीत. अजून दोन दिवस त्यांच्याच देशात आहेस. तूच सांभाळून राहा.
  • Log in or register to post comments

अरे हो रे माझच चुकलं

जेनी...
Tue, 02/05/2013 - 03:05 नवीन
अरे हो रे माझच चुकलं :( मी त्यांना पिंडाकाकाच म्हणायची ... :( सॉरी हं काका ... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छान

नंदन
Tue, 02/05/2013 - 02:57 नवीन
लेखन आवडलं. पिडांकाकांनी म्हटल्याप्रमाणे कामांची झालेली 'मिरर इमेज' अदलाबदल आणि पिढ्यानपिढ्या हे बदल तटस्थपणे पाहणारे जय-विजय हे नेमक्या शब्दांत उतरले आहे.
  • Log in or register to post comments

भारी रे!

प्रभो
Wed, 02/06/2013 - 10:58 नवीन
भारी रे!
  • Log in or register to post comments

मस्त

रुमानी
Wed, 02/06/2013 - 11:39 नवीन
छान झालाय लेख आणि जयविजय हि आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन आवडले.

नाना चेंगट
Wed, 02/06/2013 - 11:49 नवीन
लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

फार उत्कृष्ट लिहीलं आहेस रे.

गवि
Wed, 02/06/2013 - 14:08 नवीन
फार उत्कृष्ट लिहीलं आहेस रे. आणि गुंडाळल्यासारखं काही नाही. या लिखाणाच्या काँपॅक्टनेसमधेच सगळी ताकद आहे.. आता खफ आणि प्रतिक्रियांसोबत असेच उत्तम धागेही लिहायला लागावे ही विनंती..
  • Log in or register to post comments

खूप खूप धन्यवाद.

अभ्या..
Wed, 02/06/2013 - 19:35 नवीन
गविराज, आपण विनंती करुन लाजवू नये. तुमच्या प्रतिसादाची वाट बघत तर हा धागा १०० वेळा उघडला असेल. कौतुलाबद्दल अत्यंत आभार. :) गेलं वर्षभर खफ खरडून हा एक धागा लिहिला आहे, हेच प्रमाण कायम ठेवण्यात येईल असे मी वचन देतो. ;) . तरीही सर्व जेष्ठश्रेष्ठ मिपाकरांनी कौतुक केले, प्रतिसाद दिले, नवीन माहिती शेअर केली याबद्दल सर्वांनाच खूप खूप धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

अभ्या, मला वाटलं मात्र हं

यशोधरा
गुरुवार, 02/07/2013 - 17:08 नवीन
अभ्या, मला वाटलं मात्र हं शेवट थोडासा गुंडाळल्यासारखा. एकदम वाचता वाचता अचानक संपल्यासारखं वाटलं मला. :) तुझी लिहिण्याची पद्धत एकदम सुरेख आहे, समोर बसून गप्पा केल्यासारखी, लिहित रहा म्हणजे अजून खुलत जाईल लिखाण. लिखाण मस्त वाटलं म्हणून आवडलेलं आणि थोडं फार खटकलेलंही म्हणून मुद्दाम सांगितलं, टीका नव्हे ती. तसे घेऊ नयेस, ही विनंती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

टिका नाहीच ही

अभ्या..
गुरुवार, 02/07/2013 - 17:24 नवीन
अर्थात यशोतै, तुम्ही सांगितलेले अर्थातच खटकलेले नाही मला. उलट इथल्या प्रत्येक प्रतिसादातून मला आपुलकीच जाणवलेली आहे. अनुभव, सराव आणि शब्दसंग्रह कमी पडतो माझा हे मला पण कबूल आहे. अजून बरेच लिहायची गरज आहे तेंव्हा कुठे संपवायचं आणि कसं संपवायचं हे कळत जाईल. अशा प्रतिसादाचा तोच तर फायदा होइल. एखादी गोष्ट लवकर संपू नये असे वाटणे ही सुध्दा छानच प्रतिक्रिया आहे माझ्यासाठी. तेंव्हा थँक्स अ लॉट्ट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

गुड, छान वाटलं तुझी पोस्ट

यशोधरा
गुरुवार, 02/07/2013 - 17:38 नवीन
गुड, छान वाटलं तुझी पोस्ट वाचून :) उगाच हस्ते परहस्ते (की पोस्टी, परपोस्टी? :P ) गैरसमज नको म्हणून सांगितले :) पुढील लिखाणाची वाट बघते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आटोअपशीर आणि म्हणुनच दिर्घकाळ

ऋषिकेश
गुरुवार, 02/07/2013 - 17:38 नवीन
आटोअपशीर आणि म्हणुनच दिर्घकाळ लक्षात लाहिल असे लेखन. उगाच ड्वायलागबाजी टाळलीत त्ये ब्येस केलेत!
  • Log in or register to post comments

हीरो..

साबु
गुरुवार, 02/07/2013 - 17:50 नवीन
आयला...अभ्या एका रात्रीत स्टार झाला की...सगळ्या मान्यवरानी कौतुक केलय.लिखाण आवडले हे वेगळे सान्गणे न लगे. बाकी जय्-विजय ची एक कथा ऐकण्यात आली की.. हे विष्णुचे द्वारपाल ..कधीकाळि कोण्या एक रुषीला ह्यानी विष्णुकडे जाउन दिले नाही म्हणुन त्याने ह्याना शाप दीला की तुम्हाला विष्णुचा सहवास मिळ्णार नाही...त्यानी क्षमा याचना केल्याव्र उशाप दिला कि तुम्हि तीन युगे विष्णुचे शत्रु व्हाल व सदैव त्यच्या जवळ जायचा प्रयत्न कराल.. म्हणुन ते रावण्-कुम्भकर्ण, कन्स्-शिशुपाल आणि हिरण्यकश्यपु- ? म्हणून जन्माला आले आणि विष्णुला भेटण्यासाठी निरनिराळ्या कारवाया करत राहिले... म्हणजे हे सगळे आधीच ठरले होते...पुर्वनियोजित होते..
  • Log in or register to post comments

काय बोलताय राव?

बोका-ए-आझम
Fri, 10/30/2015 - 00:09 नवीन
हे पहिलं लिखाण आहे? एकदम मातब्बर आहे. मस्तच!
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय! आवडलं!

रातराणी
Fri, 10/30/2015 - 08:12 नवीन
मस्त लिहिलय! आवडलं!
  • Log in or register to post comments

कालौघात नाहीसे होऊ पाहणारे,

शिव कन्या
Sat, 10/31/2015 - 00:28 नवीन
कालौघात नाहीसे होऊ पाहणारे, मुलतानी मातीच्या पार्श्वभूमी वरचे जयविजय हुबेहुब उभे केलेत. पेंटर चुटपूट लावून गेला.
  • Log in or register to post comments

कालौघात नाहीसे होऊ पाहणारे,

शिव कन्या
Sat, 10/31/2015 - 00:29 नवीन
कालौघात नाहीसे होऊ पाहणारे, मुलतानी मातीच्या पार्श्वभूमी वरचे जयविजय हुबेहुब उभे केलेत. पेंटर चुटपूट लावून गेला.
  • Log in or register to post comments

मस्तच रे अभ्या. हाताने

हेमंत लाटकर
Sun, 11/01/2015 - 15:13 नवीन
मस्तच रे अभ्या. हाताने काढलेले स्केचेसचा धागा काढ. आम्हाला तुझ्यातला चित्रकार कळेल.
  • Log in or register to post comments

आज आपल्या एका मिपाकराच्या

अभ्या..
Wed, 12/02/2015 - 13:06 नवीन
आज आपल्या एका मिपाकराच्या लग्नघरावर मी काढलेले जयविजय लागले. Image removed.
  • Log in or register to post comments

कोल्लापूर? त्योच का त्यो?

pacificready
Wed, 12/02/2015 - 13:15 नवीन
कोल्लापूर? त्योच का त्यो? ओळखीचं घर वाटत आहे. अभिनंदन रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा