Skip to main content

जयविजय

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 02/02/2013 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ दादा येऊ का आतमदे" अगदी टिपिकल बार्शी टोनमध्ये आवाज आला. आधी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटणारा चेहरा, साधे कपडे आणि हातात एक पिशवी. "जरा काम होतं फ्लेक्सचं. जास्त नाय ३० फुटाच हाय पन आरजंट पायजे" मला अजूनही आठवत नाहीये याला कुठं पाह्यलय मी. "जय्विजय पायजेत छापून ७ फूटाचे दोन" "दुपारी जेवायला गेलेले डीटीपी ऑपरेटर अजून आले नाहीत. बसा जरा." ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जयविजय डोळ्यासमोर उभे राहिले बार्शीतले वाडे, मोठमोठे दरवाजे, दारावर लग्नप्रसंगी रंगवले जाणारे भालदार चोपदार म्हणजेच बार्शीच्या भाषेत जयविजय. चार पाच रंगाने भरलेल्या वाट्या आन तीनच ब्रश घेऊन तासाभरात घ्रराचे लग्नघर करणारा पेंटर. तो तास आणायसाठी मात्र पत्रिका छापायला देतानाच त्याला आमंत्रण द्यावे लागे. लग्न अगदी तोंडावर आले की आम्ही बच्चे कंपनी त्याच्या मागावर सुटायची. दुकानी, त्याच्या घरी आणि तो काम करत असलेल्या घरी अशा सगळीकडे चकरा झाल्यावर हा कलाकार सापडायचा तानाजी चौकात देशीच्या गुत्त्यावर. "सकाळी येतो म्हणून सांग काकांना" एवढाच निरोप घेऊन आम्ही घरी परतायचो. "येईल रे, कुठे जातोय पळून, बँकेचा थकबाकीदार आहे तो", वडीलांचा दांडगा विश्वास. त्यामुळेच कदाचित दुसर्‍या दिवशी दारात बघावे तर त्याने रंग कालवायला सुरुवात केलेली असायची. पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेज असायचे. सुरुवातीला फिकट गुलाबी रंगात थोडीशी पिवळी छटा असणारा त्वचेचा रंग, लगेच पिवळ्या शेंदरी रंगात पितांबर आणि दागिने, जांभळ्या रंगाचा शेला आणि लाल कटीवस्त्र. सुरुवातीला नुसतेच रंग दिसत. काळा रंग निषिध्द असे म्हणून गडद तपकिरी रंगाचा लहान ब्रश एकदा फिरायला लागला की पाहता पाहता चित्र सजीव होई. एक पाय गुडघ्यात वाकवून हाती तिरपा दंड घेतलेले, अगदी देवासारखे देखणे मुकुटधारी जयविजय. बार्शीत श्री भगवंताचे मंदिर असल्याने पहिल्यापासूनच दरवाजावर भालदार चोपदार नव्हेत तर जयविजयच. खाली लफ्फेदार सही ठोकेस्तोवर घरातून चहा आलेला असायचा. चहा आणि बिदागी घेऊन तो जायचा पण माझे निरिक्षण काही संपायचे नाही. चाटे गल्लीतल्या त्याच्या दुकानासमोर उभारणे म्हणजे सुध्दा मौज असायची. शेजारी महाराष्ट्र ब्रास बँडवाल्यांची प्रॅक्टीस चालू आणि त्या तालावर इकडे दुकानाचे बोर्ड रंगवणे मी तासनतास बघत राहायचो. लस्सीचा ग्लास हातात घेतलेला अर्नोल्ड पासून चहा पिणार्‍या अमिताभ पर्यंत सगळे हुबेहुब उतरलेले असायचे. चित्रकलेच्या वहीत बर्‍याच प्रयत्नानंतर जमलेले जयविजय घेऊन एकदा त्याला दाखवावे वाटे पण त्याच्या तिरसटपणाची भितीही वाटायची एक रविवारी मात्र सकाळी सकाळी तो दारात उभा होता, चेहर्‍यावर अत्यंत अजिजी आणि आपली रंगीबेरंगी सायकल घेऊन. तासभर माझ्या वडीलांचे हप्ते न चुकवण्याचे आणि दारु न पिण्याचे उपदेश ऐकून तो निघणार इतक्यात मी माझे जयविजय त्याला दाखवले. "चांगलं काढताव पण मोठं झाल्यावर सायब व्हा बँकेतलं, तुमच्या वडलासारखं." एवढेच बोलून गेला. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आज पट्कन तेच जयविजय एका कागदावर काढून स्कॅन करुन पीसीवर त्यात रंग भरायला १५ मिनिटे खूप होती. "आमचे वडील पण शेम आस्लंच जयविजय काढायचे बघा. बार्शीत पेंटर होते, गेले १० वर्शाखाली" "आणि तुम्हाला नाही का येत मग पेंटींग?" बँकेतल्या साहेबाच्या मुलाचा निरर्थक प्रश्न "नाही जमत, वडीलानी पतसंस्थेत लावलय नोकरीला. आता घरात आरजंट लग्न ठरलय. मोकळं दार कसं ठेवायचं म्हणून तर हे फ्लेक्स लावतो दारावर"
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24455
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

लेखन आवडलं. पिडांकाकांनी म्हटल्याप्रमाणे कामांची झालेली 'मिरर इमेज' अदलाबदल आणि पिढ्यानपिढ्या हे बदल तटस्थपणे पाहणारे जय-विजय हे नेमक्या शब्दांत उतरले आहे.

छान झालाय लेख आणि जयविजय हि आवडले.

फार उत्कृष्ट लिहीलं आहेस रे. आणि गुंडाळल्यासारखं काही नाही. या लिखाणाच्या काँपॅक्टनेसमधेच सगळी ताकद आहे.. आता खफ आणि प्रतिक्रियांसोबत असेच उत्तम धागेही लिहायला लागावे ही विनंती..

गविराज, आपण विनंती करुन लाजवू नये. तुमच्या प्रतिसादाची वाट बघत तर हा धागा १०० वेळा उघडला असेल. कौतुलाबद्दल अत्यंत आभार. :) गेलं वर्षभर खफ खरडून हा एक धागा लिहिला आहे, हेच प्रमाण कायम ठेवण्यात येईल असे मी वचन देतो. ;) . तरीही सर्व जेष्ठश्रेष्ठ मिपाकरांनी कौतुक केले, प्रतिसाद दिले, नवीन माहिती शेअर केली याबद्दल सर्वांनाच खूप खूप धन्यवाद. :)

In reply to by अभ्या..

अभ्या, मला वाटलं मात्र हं शेवट थोडासा गुंडाळल्यासारखा. एकदम वाचता वाचता अचानक संपल्यासारखं वाटलं मला. :) तुझी लिहिण्याची पद्धत एकदम सुरेख आहे, समोर बसून गप्पा केल्यासारखी, लिहित रहा म्हणजे अजून खुलत जाईल लिखाण. लिखाण मस्त वाटलं म्हणून आवडलेलं आणि थोडं फार खटकलेलंही म्हणून मुद्दाम सांगितलं, टीका नव्हे ती. तसे घेऊ नयेस, ही विनंती :)

In reply to by यशोधरा

अर्थात यशोतै, तुम्ही सांगितलेले अर्थातच खटकलेले नाही मला. उलट इथल्या प्रत्येक प्रतिसादातून मला आपुलकीच जाणवलेली आहे. अनुभव, सराव आणि शब्दसंग्रह कमी पडतो माझा हे मला पण कबूल आहे. अजून बरेच लिहायची गरज आहे तेंव्हा कुठे संपवायचं आणि कसं संपवायचं हे कळत जाईल. अशा प्रतिसादाचा तोच तर फायदा होइल. एखादी गोष्ट लवकर संपू नये असे वाटणे ही सुध्दा छानच प्रतिक्रिया आहे माझ्यासाठी. तेंव्हा थँक्स अ लॉट्ट :)

In reply to by अभ्या..

गुड, छान वाटलं तुझी पोस्ट वाचून :) उगाच हस्ते परहस्ते (की पोस्टी, परपोस्टी? :P ) गैरसमज नको म्हणून सांगितले :) पुढील लिखाणाची वाट बघते.

आयला...अभ्या एका रात्रीत स्टार झाला की...सगळ्या मान्यवरानी कौतुक केलय.लिखाण आवडले हे वेगळे सान्गणे न लगे. बाकी जय्-विजय ची एक कथा ऐकण्यात आली की.. हे विष्णुचे द्वारपाल ..कधीकाळि कोण्या एक रुषीला ह्यानी विष्णुकडे जाउन दिले नाही म्हणुन त्याने ह्याना शाप दीला की तुम्हाला विष्णुचा सहवास मिळ्णार नाही...त्यानी क्षमा याचना केल्याव्र उशाप दिला कि तुम्हि तीन युगे विष्णुचे शत्रु व्हाल व सदैव त्यच्या जवळ जायचा प्रयत्न कराल.. म्हणुन ते रावण्-कुम्भकर्ण, कन्स्-शिशुपाल आणि हिरण्यकश्यपु- ? म्हणून जन्माला आले आणि विष्णुला भेटण्यासाठी निरनिराळ्या कारवाया करत राहिले... म्हणजे हे सगळे आधीच ठरले होते...पुर्वनियोजित होते..

कालौघात नाहीसे होऊ पाहणारे, मुलतानी मातीच्या पार्श्वभूमी वरचे जयविजय हुबेहुब उभे केलेत. पेंटर चुटपूट लावून गेला.

कालौघात नाहीसे होऊ पाहणारे, मुलतानी मातीच्या पार्श्वभूमी वरचे जयविजय हुबेहुब उभे केलेत. पेंटर चुटपूट लावून गेला.

मस्तच रे अभ्या. हाताने काढलेले स्केचेसचा धागा काढ. आम्हाला तुझ्यातला चित्रकार कळेल.