धुक्यात हरपले कुंचले
लेखनविषय:
खारीचं शेपूट अलगद
फिरावं तसा
तो कुंचला फिरवायचा
दरीत कोसळल्या संध्येचे
रंग चोरून
कागदावर उतरवायचा
त्यात थोडसं
धुकं भरून.
मी मात्र अनामिष
डोळ्यांनी न्याहाळायचो
फिरत्या रंगांचे गूढ
अन त्याच्या
,ओठात , बोटात
अडकलेला कुंचला.
मनाला आर्त साद
घालणारी त्याची ती
रंगसंगती बेभान करायची
डोळ्यातल्या आसवांची
कासवे
डोळ्यातच मरायची,
मात्र
एक अनामिक हूरहूर
आसमंत भारून टाकायची.
विलक्षण सहवासाचा
साहसवीर
मृगयेवर गारुड घालतो
अन
नकळत सुटला तीर
हृदयाचा वेध घेतो
अश्या अवस्थेत सारी
रात्र सरायची,
कधीतरी पहाटे
साचल्या दवांची टपटप
डोळ्यांना कुरवाळायची,
मूर्तीमंत समाधानात
झोपलेला तो
अन त्याचे
पूर्णत्वास येणारे चित्र
जीवघेणी साद घालायचे.
ग्रेपवाईनमधल्या तिस-या
पेगला तो म्हणाला होता
मी सात आकाशापलीकडले
चित्र मांडतो,
इथे रंगबिरंगी पाखरे
बागडतात
सुवासात नटली फुले
उमलतात
मग सा-या विश्वाची
बासरी त्याच्या
मुखातून वाजायची,
डोंगरावरची माती
धुके पांघरून निजायची.
चित्र पूर्ण झाल्यावर
तो
लहान मुलाच्या हाती
सप्तरंगी फुलपाखरू गवसावं
तसा नाचला होता
त्या आनंदकारंज्याचा स्पर्श
मलाही जाणवला होता,
कधीतरी प्राचीन नशेत
पांघरून सोडून शरीर कुडकुडत
असताना
त्याने मारलेली
उबदार मिठी -----
तीच भावना सतार व्हायची.
ती घातवेळ
अजूनही आठवते
त्याच्याबरोबर सुर्यास्तापर्यंत
चालण्याची,
अचानक
गलोलीतून सुटलेल्या
गोट्यातून
रक्तबंबाळ झालेला परवा
समोर पडला
अन नको त्या वेळी
माझ्या डोळ्यात घृणा
दाटली
सारेच करुण डोळ्यांनी त्याने
पाहिले
.
.
दुखाची अगतिकता
अन घृणा
.
.
.
तेव्हाच त्याने
धुक्यात प्रवेश केला.
आता तोही आठवत नाही
पण
तडफडणारा पारवा
अजूनही मनात तडफडतो
आहे
तेव्हा मात्र
त्याच्या कारुण्याची
अन माझ्या दाटल्या
घृणेची सारी समीकरणे
कोसळून पडतात...
.
.
.
.
.
तरीही
मी त्याच्या शोधात
धुक्यात दडल्या वाटा
शोधत आहे .......
विजयकुमार.........
२६ / १२ / २०१०, मुंबई
वाचने
1728
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
दम हाय भाऊ लेखणीत. पात्रे अन
In reply to दम हाय भाऊ लेखणीत. पात्रे अन by अभ्या..
:)
In reply to दम हाय भाऊ लेखणीत. पात्रे अन by अभ्या..
दम हाय भाऊ लेखणीत.
अप्रतिम
भारी वाटली ही पण!!
मला
भारी!
आता तोही आठवत नाही
आता तोही आठवत नाही पण तडफडणारा पारवा अजूनही मनात तडफडतो आहे तेव्हा मात्र त्याच्या कारुण्याची अन माझ्या दाटल्या घृणेची सारी समीकरणे कोसळून पडतात...हे विलक्षण जीवघेणं आहे. ख़ास आहे. आवडलंचआकलनाच्या धुसर रेषांवर