Skip to main content

उर्वरीत समाजसेवकां विषयी

लेखक मारवा यांनी शुक्रवार, 13/11/2015 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
समाजसेवकांच्या बाबतीत सरळसरळ दोन प्रकारांमध्ये विभागणी करता येते. एक जेन्युइन चांगले समाजसेवक दुसरे उर्वरीत सर्व समाजसेवक. महाराष्ट्रीयन उदाहरणं घेतली तर या समाजसेवेच्या क्षेत्रात काही अतीशय आदरणीय सकारात्मक कार्य करणारे असे महान समाजसेवक लोकं आहेत. उदा. बंग दाम्पत्य , डॉ. कोल्हे , नाडकर्णी, इ. या सर्व अत्यंत संवेदनशील तळमळीने काम करणार्‍या व्यक्ती आहेत ज्यांचे कार्य खरोखर अजोड आहे.अर्थातच अशी माणसं संख्येने फ़ारच कमी आहेत. आता बाकी लेख इतर उर्वरीत समाजसेवकांच्या संदर्भात आहे त्यामुळे जे वरील प्रमाणे जेन्युइन चांगली लोकं आहेत त्यांचा अर्थातच या लेखात व्यक्त झालेल्या विचारांशी दुरान्वयानेही संबध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आता सर्वसाधारण उर्वरीत जे समाजसेवक दिसतात यापुढे त्यांचा उल्लेख उर्वरीत समाजसेवक (उस) असा संक्षिप्त करतो उस चा वापर यासाठी की त्याने जेन्युइन समाजसेवक हे वेगळे आहेत /असतात याची जाणीव कायम राहावी. कृपया खालील चर्चेत वरच्या चांगल्या प्रकारातल्या जेन्युइन समाजसेवकांना विनाकारण ओढु नये ही नम्र विनंती. तर उस हे एक रोचक प्रकरण आहे. सर्वप्रथम पात्रता य़ा क्षेत्रात काम करणारे अनेक जण पात्रता या निकषावर खरे उतरत नाहीत. म्हणजे सोशल वर्क चे स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत प्रशिक्षण आहेत पण ते केलेलेच लोक यात काम करतात अस काही फ़ारस आढळून येत नाही. सर्वसाधारण निरीक्षण असे दाखवते की जे सध्याच्या युगाच्या कठोर स्पर्धेत कुठेतरी मागे पडलेले असतात, त्यांच्या अपुर्ण शिक्षणामुळे, वा त्याच्या अभावामुळे अथवा व्यक्तीगत क्षमता /कॅलीबर नसलेले वा गुणवत्तेच्या अभावाने जे कुठेतरी मुळ प्रवाहातुन बाहेर फ़ेकले गेलेले असतात वा मुळातच कमकुवत असल्याने शिरण्यात असमर्थ असतात अशांचाच सर्वाधिक ओढा समाजसेवेकडे असतो. अशा बहुतांश अपात्रांचा च या क्षेत्रात भरणा दिसुन येतो. यामुळे या क्षेत्रात आढळणारा सर्वात मोठा स्वभावविशेष म्हणजे न्युनगंड व या न्युनगंडातुन येणारा एक विशिष्ट उद्धटपणा जो तुम्हाला अगदी गोलापांगरी बुद्रुक ते दिल्ली मेट्रो पर्यंतच्या उस मध्ये सहसा आढळुन येतो. इथे काम करायला मुळात पात्रता प्रशिक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटतच नाही. माझी तळमळ वा मळमळ हीच माझी पात्रता आहे अशा भ्रमात उस वावरतात. त्यासाठी ज्या समस्येवर आपण काम करतो आहे त्याचा आपला काही अभ्यास आहे की नाही तीच्या सोडवणूकीची पातत्रा आहे की नाही याचा विचारही त्यांना शिवत नाही. यांची बोलण्याची शैली ही कायम शिक्षकासारखी असते. उस कायम तुम्हाला साध्या बोलण्यातुनही काहीना काही शिकवणार सकळ जन शहाणे करुन सोडतोच आता असा एक टीपीकल पवित्रा उस मध्ये असतो. आणि दुसरा म्हणजे इतरांना गिल्टी फ़िल करुन देणं सातत्याने. हा उस यांचा आवडता उपक्रम असतो. तुम्ही दिवाळीचा आनंद घेत आहात फ़टाके फ़ोडत आहात उस तुमचा गळा धरेल तुम्ही कसे आत्ममग्न आहात पाड्यावर दिवाळी नाही यंदा , तुम्हाला काही कस वाटत नाही तुमच्या संवेदना बधिर कशा झालेल्या आहेत इ. इ. ह्रेटॉरीक्स उस कडे ह्रेटॉरीक्स ची कमतरता नसते. ते तुम्हाला तुमच्या कोणत्याही नैसर्गिक आनंदापासुन कृत्यापासुन वंचित करुन तुम्ही कसे चुकीचे संवेदनाशुन्य व पापी आहात व तुमच्यावर कुठल्या तरी पाड्यातल्या आदिवासींची जबाबदारी बांधिलकी इ. कशी आहेच व ती निभवण्यात तुम्ही कसे कमी पडलात इ.इ.पटवुन देण्यात ते तरबेज असतात. उस यांची व्यक्तीगत नैतिकता हा तर अत्यंत कळीचा विषय आहे. अण्णा हजारेंचा राळेगण सिद्धी मध्ये एक अत्यंत संवेदनशील असा उपक्रम होता. त्यांच्या गावात जी व्यक्ती दारु पिते म्हणजेच पाप करते त्या व्यक्तीला अण्णा आणि कार्यकर्ते खांबाला बांधुन फ़टके मारीत असत. यावर पत्रकारांनी छेडल असता गांधीवादी अहिंसावादी अण्णा यांनी उस यांच प्रातिनीधीक ठराव अस उत्तर दिलेल आहे. ते म्हणतात हे मी त्यांच्या च (अल्कोहोलीक्स ) च्या भल्यासाठीच हे करत आहे. त्यांना माहीत नाही की ते काय करत आहेत (जीझस स्टाइल ) म्हणून त्यांना याची जाणीव करुन देण्यासाठीच त्यांच्याच कल्याणासाठी हे आहे. हा युक्तिवाद स्वयमेव अतिशय बोलका आहे. प्रत्येक उस यांचा पवित्रा साधारण थोड्याफ़ार फ़रकाने असाच असतो. ( आठवा नुकतचं चार हजार महावीद्यालयीन युवा शिथीलांग रसिकांसमोर असाच एक काव्यगत न्याय केलेला.. जाहीररीतीने करण्या/बघण्यातला आनंद काही वेगळाच असतो नाही ?) एकदा विदर्भातल्या एका तालुक्याच्या गावातल्या मुलींच्या अनाथश्रमात काही कारणाने गेलो होतो. तिथे त्या मुलींना बघितल्यावर एक विसंगती ठळक लक्षात आली ती म्हणजे हेअरस्टाइल मुली अत्यंत गरीब अगदी एका बाजुच्या गावात आणि हेअरस्टाइल अगदी डोळ्यात खुपावी अशी भिन्न विचीत्र म्हणजे त्यांच्या बाकी अवताराला कुठेच न जुळणारी. थोडी विचारणा केल्यावर उत्तर मिळालं की एक शहरातल्या पार्लरवाल्या बाई त्यांच्या नवशिक्या विद्यार्थ्यांना घेऊन येत असतात व या मुलींची मोफ़त कट करुन देतात, नवशिक्यांचा विचीत्र प्रभाव दर्शनीय होता..मग तुम्ही प्रॉपर न्हावी का बोलवत नाही ? आ? यांना कशाला पाहीजे प्रॉपर न्हावी त्यांना काय हिरोइन बनवायचयं अहो इतकं बिचार्‍या त्या बाई मदत करतात सोशल वर्क म्हणुन हेच कीत्ती कौतुकास्पद. गिनीपिग असतात जी बिचारी लोकं अशा आश्रमांमध्ये जेल मध्ये राहतात ती सर्व एक प्रकारची गिनीपीग म्हणून वागवली जातात. जेल मध्ये प्रत्येक स्पीरीच्युअल क्लब चे सभासद नेहमी जात असतात. त्यांना मंत्रोच्चार पासुन ते ध्यान प्रवचन सर्व अगदी सर्व गोष्टींचा एकतर्फ़ी मारा केला जातो. त्यांना ते मुळात हवं की नको हा प्रश्न तर दुरच. मुळात तुम्ही अध:पतित आहात आम्ही विसाव्या मजल्यावर आहोत आम्ही स्वार्थत्याग करुन पदरमोड करुन तुमचं कल्याण च करत आहोत जे कळण्याची तुमची पात्रताच नाही. आणि हा सर्व ढवळाढवळ करण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहेच. त्यात प्रश्नच नाही. मागे एक छोटीशी बातमी होती इंडियन एक्सप्रेस मध्ये एकेठीकाणी एका कैद्याने एका अशाच शिबीराला फ़ार जोरदार विरोध केलेला. मात्र अशा बातम्या व अस काही क्वचितच बाहेर येत असत. पडद्यामागे अजुन काय होत असेल माहीत नाही. मुळात चोर जेल मध्ये येतो मोजके जातिवंत गुन्हेगार सोडुन द्या बाकी सहसा तो एका चुकीच्या सामाजिक व्यवस्थेचा परीणामच असतो ना . जिथे साधनांची कमतरता विषमता अन्याय आहे जगणं वैध मार्गाने मुष्कील झालेलं त्यानेच तर माणुस गुन्हेगारीकडे वळतो त्या मुळ व्यवस्थेच्या विरोधात काहीच मुलगामी बदल न करता ही वरवरची मलमपट्टी जी मुळात त्या विषम व्यवस्थेलाच पुरक असे काम करते.. जेल ही उस यांची एक आवडती प्रयोगशाळाच असते. स्टाइल वर अण्णाहजारेइश उद्दाम "वुइ ओन्ली नो व्हॉट इज बेटर फ़ॉर हीम ". अशा अपात्र उस कडुन जे समाजकार्य होते ते अतिउत्साहात नवशिक्या पोहोणारा कसेही हातपाय मारतो त्यासारखे होते. त्यात संबंधितांचे नुकसानही अनेकदा होत असते.एकदा परुळेकरांच्य्या मुलाखतीत एका चांगल्या समाजसेवकाने उस विषयी एक सांगितलेल आठवतय. ते म्हणाले जिथे पुरासारखी आपत्ती येते तिथे सर्वात महत्वाची प्रथम क्रमांकाची गरज असते प्लास्टीकच्या ताडपत्री ची ( त्यांचा अनुभव /अभ्यास आधारीत मत ) पण उस भलत्याच काहीच्या काही वस्तु आणुन टाकतात. हे अपात्रता, अपुरी समज, अपुरे प्रशिक्षण इ. मुळे होत असत. परत आम्ही मदत करतोय म्हणजे मुळात एका वरच्या पातळीला आपसुकच पोहोचतो असा भाव असतो. उस कमालीचे अहंकारी आणि प्रसिद्धीलोलुप असतात मागे एकदा बाबा आमटे यांच्या संदर्भात एका लहान मुलाचा हात त्यांनी जोपर्यंत फ़ोटो काढला गेला नाही तोपर्यंत घट्ट धरुन ठेवलेला अस एक वाचलेल आठवतय. उस तुमच्या ग्रुप मध्ये बसलेला आहे आणि तुम्ही अगदी कुठलाही अगदी तुम्ही क्रॉकरी या विषयावरही बोलत आहात तरी तो तुम्हाला हळुहळु त्याच्या समाजसेवेच्या विषयाकडे वळवणारचं. तुम्ही कुठुनही चर्चेला सुरुवात केली तरी ते तुम्हाला सोशल वर्कच्या ते करत असलेल्या कार्यापर्यंत आणुन सोडतात. अ‍ॅमवे ,चेन मार्केटींग ,विमाएजंट नंतरची ही अत्यंत बोरींग अशी लोक असतात. त्यांच्यात एक तरल अहंकार असतो. ते कायम विसाव्या मजल्यावरुन खाली तुच्छतेने बघत असल्यासारखी बोलतात. सी सॉ च्या खेळामध्ये आपण वरती असतो दुसरा खाली तेव्हा कसा आनंद होतो तसा समाजसेवक कायम वरचढ वरती असहाय पिडीत कायम खालीच या खेळात अहंकाराची फ़ार मोठी तृप्ती होत असते. या ओढीने अनेक इगोइस्टीक्स याकडे मोठ्या उत्साहात वळतात. लोकांनी उदारतेने दिलेल्या निधी चा गैरवापर करणारे तर समाजसेवेच्या सर्वच पातळीवर काम करणार्‍यात आढळुन येतात.अगदी प्रख्यात नावे, शहरात काम करणार्‍या संस्था त्यातलेही गैरवापर करण्यात मागे नसतात. एक स्वानुभवपण आहे सांगण्यासारखा आमच्या कंपनीने एक सीएसआर च्या संबंधित एक फ़ंड समाजकार्य करणार्‍या संस्थेला द्यायची एक योजना होती. त्याच्या समितीवर माझी नेमणूक इतर काही जणांबरोबर केलेली होती. मी सर्वात अपात्र व्यक्ती कंपनीने बहुधा संख्यापुर्तीसाठी मला निवडलेल होत. तर मी नुसताच बसायचो मला आर्थिक व्यवहारात फ़ारशी गती नाही. आमचे इतर दिग्गज मित्र हाताळायचे आणी मी नुसता एक सोबतीला होतो. एक पर्यावरणसंबंधित उस आमच्याकडे आला. त्याने मला संबोधुन अगोदर त्याची योजना मांडली. तो इतका प्रभावी वक्ता होता मी गुंग होऊन त्याच बोलणं ऐकतच राहीलो.भारावुन गेलो.. त्याच्या प्रत्येक वाक्यावर मी सहमत उत्तेजीत...... मग आमच्या सी.ए. मित्राचा टर्न त्याने अत्यंत कोरडेपणाने उस ला काही कागदपत्रांची विचारणा केली ते त्याच्याकडे नव्हते मग ते घेउन या पुढच्या वेळेस या म्हणुन सी.ए. ने कोरडेपणाने त्याला कटवला. मी चकीत मी त्याला दोस्ताने मे जाब विचारला काय खडुस रे तु किती चांगला माणुस काय सुंदर काम करतोय आपण मदत केली पाहीजे इ.इ. त्यावर तो शांतपणे म्हणाला बघ गंमत आता पुढच्या मीटींग मध्ये. पुन्हा पुढच्यावेळेस तो कागदपत्रांसहीत हजर आणि मग आमच्या व्यावहारीक चतुर मित्राने जी उलटतपासणी सुरु केली तर त्या उस ला एकही उत्तर धड देण मुष्कील. ... आर्थिक व्यवहारात अत्यंत संशयास्पद काही अनियमीतता होत्या. पुढच्या वेळेस कागदपत्रं आणतो म्हणाला अन काहीसा नाराजीनेच तो निघुन गेला . आता काही दिवसांनी परत मीटींग तर उस ने एकदम पवित्रा बदललेला..... यावेळेस त्याने ज्या व्हाइट कॉलर अतिशय सोफ़ेस्टीकेटेड शैलीत जशी धमकी आम्हाला दिली ती म्हणजे एक शैलीचा अभ्यासच होता,,,, जर मला डोनेशन नाही मिळालं तर तुमच्या कंपनीच्या पोल्युशन संबंधित अमुक अमुक अनियमितता मी बाहेर काढेन तुम्हाला महागात पडेल वगैरे... तो अनुभव भारीच होता. तो अनुभव मग दुनियादारी च्या फ़ोल्डर मध्ये सेव्ह करुन ठेवला. मुळात समाजसेवक अस्तित्वात असणं हेच समाजाच्या अधोगतीचं निदर्शक आहे. समाजात काही ना काही न्युन विकृती वाईट आहे ज्याच्या उपायासाठी वा पुर्ति साठी समाजसेवका ची गरज आहे. एक विचार येतो जर समाज खरोखर आदर्श अवस्थेत यदाकदाचित पोहोचलाच तर सर्वात अगोदर बेकारीची कुर्‍हाड कोणावर कोसळेल ? अर्थातच समाजसेवकावर हे कामच एक मुळात अ-सर्जनशील आहे. चांगल्या आदर्श समाजात जिथे सर्व लोक स्वयंपुर्ण स्वतंत्र सक्षम आहेत तिथे तर माणुस काहीतरी चांगल्या क्रीएटीव्ह कामात वेळ व्यतीत करेल. समाजकार्याची प्रेरणाच कशी एका नकारात्मकतेतुन सुरु होते कुठेतरी कोणी आजारी आहे पतित आहे उपाशी आहे पिडीत कुठेतरी काही घाण आहे न्युन आहे चला आता स्वच्छतेस निघु या. तर तुमचे काय मत आहे ? याकडे तुम्ही कसे बघता ?

वाचने 14343
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by मारवा

अण्णा हजारेंच्या बाबतीत त्यांच्यावर गांधीवाद लादला जातोय आणि ते लागून घेण्यात स्वतःही सहभागी होत राहतात असे कुठेतरी वाटत राहते; त्याचे कारण बहुधा बेसीकली अण्णा हजारे तत्वज्ञानी व्यक्ती नाहीत, हातातून काही एक चांगले व्हावे हि सदिच्छा बाळगणारा एक साधा कार्यकर्ता माणूस आहे, त्यामुळे त्यांच्याकडून गांधीवादाची तत्वज्ञानीय बैठकीची अपेक्षा मला व्यक्तीशः अवास्तव वाटत आली आहे. बलात्कार होणार्‍या स्त्रीने सुद्धा हिंसाकरू नये ह्या स्तराचा महात्मा गांधींचा अहिंसावाद प्रत्येक गांधीवादीस जमेल असे नाही तो स्तर अण्णा हजारेंनाही जमलाच पाहीजे असे नाही, महात्मा गांधींचा खून झाल्यावर त्यांच्या भक्तांनी हिंसाचार केला हे एक टोकाचे उदाहरण झाले तरीही हातात सत्याचा आग्रह म्हणून भगवद गीता घेऊन फिरणार्‍या अहिंसावादाची मर्यादा प्रत्येक वेळी त्यांच्या हातातल्या गीतेने सांगितली आहे. एक समाज सेवक म्हणून माझ्यासमोर मारवा असोत अथवा माहितगार त्यांच्या झोपडीत अन्न औषधावाचून तडफडणारी चार कच्चीबच्ची आणि नवर्‍याच्या दारुच्या आणि जुगाराच्या व्यसनाने गांजलेली मारवां/माहितगार/किंवा अजून कुणाची बायकोच्या दयेपेक्षा मारवांचे माहितगारांचे किंवा अजून कुणाचे व्यक्तिस्वातंत्र्य मोठे आहे हे पटणारे नाही. समजा यातले मारवा घरात एकटेच आहेत पण त्यांच्या सोबतीने पिणारेचार त्यांचा पैसा मारवांच्या सोबत बसून उडवत आहेत आणि अख्खी आदीवासी/ग्रामीण वस्ती रचनात्मक कामात सहभाग न नोंदवता आपले दारिद्र्य आपल्या पुढच्या पिढ्यांवरही लादत असतील तर त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काया पुजा अर्चना करावयाची ? एखादा समाज बदलताना तो अंतर्बाह्य बदलण्याची एखाद्या समाज सेवकास गरज असू शकते. अल्कोहोलीक अनॉनीमस सारख्या गोष्टी आहेत- कदाचित अण्णा हजारेंना त्याची कल्पनाही नसेल त्यांना तशी कल्पना नसेल तर त्या कल्पना अण्णापर्यंत नेणे ज्यांना त्याची कल्पना आहे त्यांची जबाबदारी आहे- अण्णांना माहित नाही तर माहित नाही एक एक व्यक्ती बदलण्याची जबाबदारी त्या त्या कुटूंबाची, अख्खा संपूर्ण समाज बदलताना समाज सेवकापुढची आव्हाने वेगळी असतात त्यांना आपण त्याच परिपेक्षातून समजून घेतले पाहीजे. तुमच्या व्यक्तीगत मर्यादांमुळे तुम्ही तुमच्या चार आजूबाजूच्या लोकांना वाईट सवईत बुडवून ठेवू इच्छिता आणि त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संरक्षण करु इच्छिता ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य चार कच्च्या बच्च्यांच्या अन्नाच्या आणि कौटूंबिक स्वास्थ्यापेक्षा मोठे असू शकत नाही. तुम्ही वरून कायदा काय लादू इच्छिता हे मला एक समाजसेवक म्हणून मी काळजी करणार नाही मी कायदा मला हवा तसा घडेल हेच बघेन. वेळ प्रसंगी त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरीही.

In reply to by माहितगार

तुम्ही वरून कायदा काय लादू इच्छिता हे मला एक समाजसेवक म्हणून मी काळजी करणार नाही मी कायदा मला हवा तसा घडेल हेच बघेन. वेळ प्रसंगी त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरीही. वरील मत आश्चर्यजनक वाटले म्हणुन काही चुकत तर नाही ना यासाठी परत एकदा विचारतो तुमच्या वरील मतावर तुम्ही पुर्णपणे नक्कीच ठाम आहात का ? तुम्हाला जो ध्वनित होत आहे तोच अर्थ अपेक्षीत आहे का ?

http://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/8723270/Fear-and-i… Several senior disciples of Mr Hazare told The Daily Telegraph the ban on alcohol and the use of violence to achieve it was central to the village's transformation. Thakaram Raut, a retired secondary schoolteacher and trustee of Anna Hazare's Hind Swaraj Trust, said Mr Hazare used a gang of young men in their twenties to attack and destroy the distilleries of those who ignored his order for them to close. "Drunkards" who broke the ban on alcohol were brought to the village square, tied to a telegraph pole covered with barbed wire and personally whipped by Mr Hazare with his canvas army belt. "There were 40 liquor units working. Some stopped on advice and some did not listen to him. So the youths went and destroyed the units. They were tied against the pole and were beaten by Anna Hazare personally. It happened to about ten to 15 people," he said. He told aides only he could administer the beatings because only those who, like him, had served the people "like a mother" had the right to punish them. Those thrashed by Mr Hazare eventually came to worship him, said Mr Raut. "When they went to the temple, they prayed first to Annaji and then to God," he said. Mr Hazare has admitted the punishments in earlier interviews.

माझा मागचा प्रश्न आपण सायनेडाय ला टाकलेला दिसतोय..म्हणून पुन्हा विचारतोय. १. एका गोष्टीवरून (जी खरी/खोटी काहीच नक्की नाही) त्यांनी जे कामाचे डोंगर उभारलेत त्यातली सच्चाई नष्ट होते असं आपलं प्रामाणिक मत आहे का? २. बाबा आमटेंच्याबद्दल जे जाहीर फोरमवर लिहिलंयत त्याला आधार काय? तुम्ही त्यांचा सच्चेपणा नाकारला आहे ज्या आधारावर तो आधार कमजोर/निरर्थक कसाही असू दे, किमान खरा तरी आहे का?

वरील लेख व त्यावरील प्रतिसाद वाचले. बाबांनी अत्यंत उत्तुंग असे काम करुन ठेवले आहे. पण मोठ्या माणसाने कधी चूक केली तर ती उच्चारायची पण नाही का ? माझ्या वडिलांच्या एका मित्राचा मी स्वतः ऐकलेला अनुभव. ते टाटा मधे उच्चपदावर नोकरीत होते. परन्तु, वैयक्तिक संसाराची शोककथा झाल्यामुळे त्यांचे नोकरीतले स्वारस्य गेले. म्ह्णून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सामाजिक कार्य करायचे ठरवले. बाबांच्या आश्रमांत ते रुजू झाले. तिथे काम करत असताना, त्यांना एकदा असे वाटले की आश्रमाला विनामुल्य मीठ मिळवून दिले तर आपल्याला बाबांची शाबासकी मिळेल. म्हणून त्यांनी 'टाटा सॉल्टस' चा मिठापूर इथल्या कारखान्यांत ओळख लावून दोन ट्रक मीठ मागवले. ही गोष्ट बाबांच्या कानावर गेली. त्यांनी यांना बोलावून घेतले आणि माझ्या परवानगी शिवाय हे उद्योग करायला कोणी सांगितले, असे म्हणून फैलावर घेतले. झाल्या प्रकरणाने दुखावून माझ्या वडिलांचे मित्र, ८-१० महिन्यांतच आश्रमाचे काम सोडून परत आले. पुढे, त्यांनी अनेक संस्थांमधे, मरेपर्यंत काम केले. ही घटना, त्यांनी ज्या उद्विग्न मनस्थितीत आम्हाला सांगितली त्याचा मी साक्षीदार आहे. ही घटना सांगून मला बाबांवर टीका करायची नाही. पण मोठी माणसे सुद्धा कधीकधी गर्वाच्या आहारी जाऊ शकतात. तरीही त्यांचे मोठेपण वादातीतच असते.

In reply to by तिमा

एक लक्षात घेतले पाहिजे की एखाद्या संस्थेत असा मनमानी कारभार करुन चालतच नाही. भले मग तो संस्थेच्या हिताचा असो. अगदी असाच एक प्रसंग विकास आमट्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. एका परदेशी समाजसेवी संस्थेने आपणहुन बाबा आमट्यंना मोठ्या प्रमाणावर गहू देउ केला. बाबांनी तो नम्रपणे नाकारला आणि संस्थेला लिहुन पाठवले की तेवढ्या खर्चात उलट त्यांनी आनंदवनातल्या लोकांना अन्न पिकवण्याचे आधुनिक तंत्रज्ञान द्यावे, ज्ञान द्यावे ज्यायोगे ते स्वावलंबी होतील, स्वतःची गरज स्वतः भागवु शकतील. गरजेपुरते अन्न आनंदवनात पुर्वीही तयार होते आणी अजुनही होते (आता तर ते बाहेर विकतात सुद्ध). त्यामुळे अन्नधान्याची मदत बाहेरुन घेणे बाबांना तत्वतः मान्य नव्हतेच. तुमच्या स्नेह्यांनी बाबांना विचारले असते तरी ते असेच म्हणाले असते की मीठ नको तितक्या पैशाचे अन्न पिकवायचे तंत्रज्ञान द्या. मला वाटते त्या घटनेच्या केंद्रस्थानी गर्व नव्हता तर संस्थेच्या मूलभूत विचारसरणीला धक्का लावणारे कृत्य परस्पर केल्याचा उद्वेग होता,

In reply to by मृत्युन्जय

अत्यंत संयत आणि तर्कसंगत प्रतीवाद !!! जो गेल्या १ वर्षांत अगदी दुर्मीळ झालाय मिपावर. ___/\____

In reply to by मृत्युन्जय

एक व्यक्ती जिचा स्वतःचा या प्रसंगात अजिबात समावेश नाही त्या व्यक्तीचे मत एक व्यक्ती जिचा स्वतःचा या प्रसंगात पुर्णपणे समावेश आहे प्रथम अनुभवकर्ता आहे त्या व्यक्तीचे मत कोणते अधिक ग्राह्य असावे बरे ? मुळात मी म्हणतो तिमाजींचे स्नेही इतक्या उद्विगनतेने का बोलले असावेत ? त्यांना बाबांचा जवळुन सहवास लाभुनही, अनुभव घेऊनही, सर्व कार्य यंत्रणा सर्वांचा अनुभव प्रत्यक्ष काही निश्चीत काळ सलग घेऊनही जी साधी बाब मृत्युंजय यांच्या लक्षात आली तीच साधी बाब तिमाजींच्या स्नेहींच्या लक्षात कशी आली नाही ? बाबांचा जो उद्वेग मृत्युंजया च्या थेट ह्र्दया पर्यंत पोहोचला प्रसंगात नसतांनाही साक्षीदार नसतांनाही तो बाबांचा उद्वेग समजुन घेणे सोडाच तिमाजींचे स्नेहींच्या ह्रदयापर्यंत पोहोचणे तर सोडाच तो तर ते उद्वेगाने मांडतात ? असे कसे ? तिमाजींचे स्नेही नेमके कुठे कमी पडले असावे बरे ? आणि मृत्युंजय नेमके कुठे भारी पडले असावे बरे ?

In reply to by मारवा

मारवा साहेब बाबा आमटे यांच्यात काही दोष नक्कीच असतील. (ते काही देव नव्हते तुमच्या आमच्या सारखे हाडा मासाचे मानव होते) म्हणून त्यांचे डोंगरा एवढे कार्य काही खुजे होत नाही. एखादी संस्था ज्यांनी स्वतःच्या हाताने मूळापासून निर्माण केली वाढवली जोपासली आणी मोठी केली ती कशी चालवावी याच्या बद्दल त्यांचे नक्की विचार असतील मग त्यांना अजिबात न विचारता दोन ट्रक मीठ आणणे हे कसे स्वीकारावे? तुमच्या मुलाला तुम्हाला न विचारता एखाद्या माणसाने जर केवळ शिक्षणा साठी TABLET दिला तर तो आपण स्वीकाराल का? मग हेतू कितीही स्तुत्य असेल. हे गृहस्थ टाटा मध्ये उच्च पदस्थ होते तेंव्हा स्वतः च्या अधिकारात (कोणालाही न विचारता) गोष्टी करायची त्यांना सवय असू शकेल. येथे बाबा आमटे यांची बाजू न ऐकता आपण निवाडा देणे कितपत बरोबर आहे ?मृत्युंजय यांनी दुसरी बाजू मांडली इतकेच. यात मूळ मुद्दा हा आहे कि आपण बाबा आमटे हे खरे समाजसेवक आहेत कि "उर्वरित". आपण तर त्यांची "उर्वरित".समाजसेवकात गणना करून मोकळे झालात हे माझ्या सारख्या अनेकांना मान्य नाही.

In reply to by सुबोध खरे

सुबोध जी एक लक्षात घ्या मी या लेखात एक काळजीपुर्वक या लेखाचे शीर्षक + संबोधन + पहीला परीच्छेद + दोन गटात वर्गवारी काही चांगल्या उदाहरणांसहीत + अपील की चांगल्याना यात ओढु नका एकुण ५ विवीध मार्ग अवलंबले. आता यात एक गोष्ट सुस्पष्ट आहे की माझ्या मते काही चांगलेच आहेत ( फार कमी मात्र आहेत ) व मी त्यांचा नितांत आदर करतो. व त्यांना कसोशीने या धागा परीघा बाहेर ठेवु इच्छितो. आता अण्णा हजारे तर सुस्पष्ट मी उर्वरीतांमध्येच गणतो यात कुठलीही शंका असु नये. आता कळीचा मुद्दा खदखदणारा बाबा आमटे बरोबर यावर स्पष्टीकरण देतोच थोड थांबा एकेक मुद्दा घ्यायचाय मला. केवळ एकच प्रसिद्धिलोलुपतेचं उदाहरण संदर्भात एकच कीस्सा मी बाबा आमटे यांचा नोंदवलेला आहे बरोबर इथपर्यंत तुम्हाला सर्व क्लीअर आहे का ? आपण सावकाश सरकु या मी जरा घाईगडबडीच्या विरोधी विचारांचा आहे. म्हणुन इथपर्यंत काही शंका असेल तर अवश्य विचारा व एक महत्वाचं समजा काळजी करु नका मी फक्त समजा म्हणतोय यात बाबा आमटे हा उल्लेख नाही आता अगोदर मला या समजा खोट्या गृहीतकावर आधारीत तुमची प्रतिक्रीया सांगा

In reply to by मारवा

जाऊ द्या हो मारवा साहेब मला जे म्हणायचं आहे ते मी म्हटलं आहे. अण्णा हजारे आपल्याला उर्वरित वाटतात ठीक आहे. आपली विचारसरणी बदलेल अशी माझी अपेक्षा नाहीच. काथ्याकुट करण्यात मला रस नाही. आपल्याला शुभेच्छा.

In reply to by सुबोध खरे

खिक्क! सुबोधजी चांगली लगावलीत! पण अजून शहाणे होणार नाहीत हे लोक्स. ते करतच राहणार निरर्थक आत्मभंजन!!!

In reply to by मांत्रिक

श्री. मांत्रिक यांचा या धाग्याला दिलेला प्रथम प्रतिसाद असा होता. मस्त लेख. एका वेगळ्या विषयाची मांडणी झाली आहे. मस्त लेख. एका वेगळ्या विषयाची मांडणी झाली आहे. अर्थात समाजसेवा म्हणून आपणच जेव्हा आपल्या कुवतीनुसार थोडे काही काम प्रामाणिकपणे करु तेव्हाच खरी समाजसेवा साध्य होऊ शकते. कारण या क्षेत्रातदेखील अनेक अपप्रवृत्ती पाहिल्या आहेत. त्यामुळे दुसर्यावर चटकन विश्वास बसत नाही. त्यानंतर इतरांचे काही प्रतिसाद आले मांत्रिक जीं चा सध्याचा प्रतिसाद असा आहे खिक्क! सुबोधजी चांगली लगावलीत! खिक्क! सुबोधजी चांगली लगावलीत! पण अजून शहाणे होणार नाहीत हे लोक्स. ते करतच राहणार निरर्थक आत्मभंजन!!!

In reply to by मारवा

मला वाटतं, तुमच्या प्रतिसादांवरून तुमचा हेतु कळला असेल मांत्रिक ना. म्हणुन मतपरिवर्तन झालं असेल त्यांचं. ;)

In reply to by मारवा

मारवा साहेब, वाचकांचे प्रतिसाद कुठले कुठले शोधून परत इथे डकवून तुम्ही काय सिद्ध करू इच्छिता? वाचक असं म्हणतात अन तसं म्हणतात हे लिहिण्यासाठी धागा काढलाय की समाजसेवकांच्या आक्षेपार्ह वागण्याबद्दल विवेचन करण्यासाठी? तुमचं सगळं लक्ष कुठला वाचक कधी काय म्हणला त्यात कशी चूक आहे यातच का आहे? जरा विषयामध्ये रस का घेत नाही? तुम्हीच मांडलाय ना हा विषय इथे? स्वतःच्याच धाग्यावर अवांतर कशाला करता? विषयाच्या अनुषंगाने बोला. दरवेळी नवीन प्रतिसाद दिसला की मी आशेने येतो आणि तुम्ही माझ्या गैरसोयीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळ्लेले बघ्तो. त्याचवेळी ज्या प्रश्नांना उत्तरं देणं सोयीचं आहे, त्यावर मात्र आपण कितीही मोठमोठी उत्तरं देत आहात.

In reply to by असंका

हा लेख प्रकाशित करायची घाईगडबड कुणी केली होती? वाचकांनी? तुम्हीच गडबडीने लेख प्रकाशित केलात वर आता तुम्हीच वाचकांना सांगताय की मी घाईगडबडीच्या विरोधात आहे? अकौटंट जी मी सुबोधजींना केवळ जो प्रतिसाद दिलाय नीट वाचा पुन्हा एकदा त्यात मी वाचकांना काहीही सांगितलेल नाही. तुम्ही वरील प्रतिसाद नीट वाचा परत एकदा शांतपणे. तो घाइगडबडीचा उल्लेख कशा संदर्भात आहे समजुन घ्या. सुबोधजींना माझी आर्ग्युमेंट ची जी शैली आहे त्यावीषयी केवळ ते विधान आहे. हा मी त्यांच्याशी संवाद साधत होतो. त्यात क्रमाने मुद्दे मांडत होतो त्या संदर्भात आपण ( मी व सुबोध जी ) एक एक करुन पुढे सरकु या यात आपल्या चर्चेत ( मी व सुबोध जी ) घाइगडबड नको इ.

In reply to by मारवा

तुमचं वाक्य विचारांच्या संदर्भात होतं. ते एक जनरल स्वभावनिदर्शक वाक्य होतं. आपलं वाक्य आता आठवणीतनं लिहितोय - "मी घाई गडबडीच्या विचारांच्या विरोधात आहे". मग काय फक्त डॉ. साहेबांशी चर्चा करताना आपण घाईगडबडीने विचार करण्याच्या विरोधात आहात का? एरवी (लेख प्रकाशित करणे इ. संदर्भात) घाईगडबडीने विचार करण्यास आपला विरोध नाही?

In reply to by मारवा

एक व्यक्ती जिचा स्वतःचा या प्रसंगात अजिबात समावेश नाही त्या व्यक्तीचे मत एक व्यक्ती जिचा स्वतःचा या प्रसंगात पुर्णपणे समावेश आहे प्रथम अनुभवकर्ता आहे त्या व्यक्तीचे मत कोणते अधिक ग्राह्य असावे बरे ?
रोशेमोन प्रिन्सिपल... सिम्पल.

या उस चा त्रास डॉक्टर लोकाना खुप होतो . नुकतेच आमच्या मित्त्राने एका स्वयमघोशित पत्राकाराला अशिच नाइलजास्ताव खंडणि दिलि.

समाजसेवकांच्या यादीत 'अण्णा हजारे' हे नाव पाहून गहिवरलो.... आलो डोळे पुसून.