Skip to main content

सुबोध भावे की कट्यार

लेखक सुज्ञ यांनी सोमवार, 16/11/2015 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
जुनं ते सोनं ही म्हण आपल्याकडे फार जुनी आहे. पण जुन्यात बदल करून केलेलं काहीही असेल तरी ते सोनंच अशी नवी पद्धत काही लोक अस्तितवात आणू पाहत आहेत. . जुन्या लोकप्रिय कलाकृती निवडून त्यात आपल्याला हवे तसे बदल घडवून तेच सोनं असे म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारण्याचे प्रकार म्हणूनच आजकाल सतत घडताना दिसतात. उदा. दुनियादारी हा चित्रपट . ते एक असो. आता आमच्या काळजा मधे “घुसवलेली” कट्यार पाहिल्यावर याचा पुनःप्रत्यय आम्हास आला. संगीत कट्यार काळजात घुसली हे दार्व्हेकारांचे व पंडित वसंत देशपांडे यांनी खांसाहेब या भूमिकेमुळे अजरामर केलेले , अत्यंत विचारपूर्वक लिहिलेले नाटक. आजपर्यंत अनेक संस्था व लोकांनी या नाटकाचे प्रयोग केले . हे नाटक अजरामर होण्याचे एक कारण म्हणजे त्यातील संगीत आणि दुसरे कारण जे या नाटकाची गोष्ट लोकांच्या मनात कट्यारीसारखी रुतते की , आमच्या मते या नाटकातीलं प्रत्येक पत्राबद्दल प्रेक्षकांच्या मनात आदर आहे. कोणत्याही मंचावर संघर्ष निर्माण करण्यासाठी, व त्यातून नाट्य निर्मितीसाठी अनेकदा दोन बाजू दाखवाव्या लागतात. अगदी ढोबळमानाने आपण त्यांना आपण चांगली बाजू व वाईट बाजू असे समजू.रूढार्थाने मग प्रेक्षक चांगल्या बाजूकडून असतात . मनाप्रमाणे शेवट झ्हाला तर तो सुखांत नाहीतर मग दुक्खांत. येथे कट्यार मध्ये खांसाहेब पंडितजिंचे स्पर्धक खरे पण तरीही त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात खांसाहेब या पत्राबद्दल कोणताही द्वेष तयार होत नाही अथवा सदाशिव जो पंडितजिंचा शिष्य त्याने खांसाहेबना हरवून राजगायकपद मिळवून त्यांचा बदला घ्यावा असेही वाटत नाही. हे नाटक आपोआप घडत जाते ते संगीतकलेला मध्यानी ठेऊन.. आणि त्यामुळेच या नाटकात कोणीही एकमेकांचे शत्रू अथवा स्पर्धक नसतानाही केवळ लेखन आणि संगीताच्या जोरावर संघर्ष निर्माण करण्यात दर्व्हेकार कमालीचे यशस्वी ठरले. पंडितजी व त्यांच्या गायकीबद्दल कमालीचा आदर असूनही पंडितजींकडे लहानपणीच संगीत शिक्षण अर्धवट सोडलेल्या व पंडितजी आता शिकवू शकत नसल्यामुळे स्वरांसाठी अधीर सदाशिवला केवळ आपल्या घराण्याच्या गायकीत सरमिसळ नको म्हणून खांसाहेब शिक्षण नाकारतात तो आपल्या स्पर्धकाचा शिष्य असल्यामुळे नाही. त्याना पंडितजींच्या गायाकीबद्दल व त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. खांसाहेबांची, स्वताच्या पत्नीने पंडितजींवर कपट केले म्हणून मला राजगायकपद मिळाले ही खंतही कायम आहे. सगळ्यात शेवटी, स्वरांची माधुकरी मागणारा सदाशिव आपली गायकी चोरून ऐकून, ती पंडितजींच्या गायन घराण्याच्या पद्धतीने गातो हे माहित झ्हाल्यामुळे खांसाहेब रागाने त्याच्यावर एक खून माफ असलेली कट्यार उगारतात पण नंतर त्याचे गाणे ऐकल्यावर मात्र “जिते राहो बेटा गाते रहो “असे म्हणतच त्यांच्या हातातील ती कट्यार अचानक गळून पडते. त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी त्या कट्यारीचा नकळत वार झ्हालेला असतो. मग तो खान्साहेबाबांच्या गाण्याचा असतो , त्यांनी स्वत्याच्या संगीत घराण्यापुढे केलेल्या कठोर निग्रहाचा व त्यामुळे नाकारलेल्या स्वताच्या मुलीच्या प्रियकराचा असतो , पंडितजी का हरले याचा असतो , सदाशिव राजगायक बनेल का याचा असतो आणि कलाकार मनस्वी असतो अथवा कलाकार इतका का मनस्वी असतो या प्रश्नाचा देखील असतो . करात उरली केवळ मुरली ... या भैरवीतील गाण्याने सुरवात.. आणि लागी कलेजवा कटार.. हा शेवट . . अभिषेकिंच्या अद्भुत स्वरांनी तृप्त झ्हालेला तो कितीही तास चालावासा वाटणारा स्वरनाट्ययोग.. सदाशिव च्या गाण्यावरील निष्ठेवर आदर असणारे आणि “ऐसा शागीर्द मेरे घराने में क्यो नही पैदा किया” असे चिडून बोलणारे खांसाहेब .. मुळात अत्यंत उत्तम संहिता व त्याला शास्त्रीय संगीताची जोड यामुळे हे नाटक आजही एक अजरामर कलाकृती बनून राहिले आहे . आधुनिक शिणिमा मधील महागुरुंनी वठवलेले खांसाहेब आणि मुळ नाटकाच्या संहितेत लेखक उर्फ स्क्रिप्ट रायटरानी मनमुराद केलेले बदल बघितले आणि आम्ही थेटरात खरच कुठे कट्यार सापडते का हे शोधायला लागलो. नाटकात सोडलेले संदर्भ सिनेमात दृश्य रुपात दाखवून जुने नाटक सिनेमास्वरूपात पडद्यावर आले हे कौतुकास्पद .. पण सदाशिव कडे डोळे गरगर फिरवत तो आपला शत्रू असल्यासारखे बघणारे खांसाहेब व “जे हात तानपुरा चालवू शकतात ते गळाही दाबू शकतात’ असे फिल्मी डवाइलोग बोलणारा सदाशिव पाहिला त्याक्षणी डोक्यातले ते गुणीजणांची कदर करणारे खांसाहेब व स्वरांची भिक मागणारा तो सदाशिव खाडकन बाजूला फेकले गेले आणि डोक्यात ‘ओ गुरुराजन रेहेम करो ‘ चालू झ्हाले. दिल और दिमाग के बिचोबीच आदमी का गला क्यो असा एक संवाद नाटकात आहे त्याच धर्तीवार नाटक और शिनिमा के बिचोबीच इतना फिल्मी मसाला क्यो असे राहून राहून या सर्व शिनिमाकराना विचारावेसे वाटते. मूळ कलाकृतीत हे असले घाणेरडे बदल करण्याचे स्वातंत्र्य यांना कोणी दिले ?? जुन्या व चांगल्या कलाकृती बाटवणे हेच मराठीतील नवीन कलावंत उगीचच नवीन विचार करतात ( किंवा ते उगीचच नवीन विचार का करतात किंवा नवीन विचार उगीचच का करतात यातील काहीही ) याचे व्यवछेदक लक्षण मानावे काय .. जी थेट स्पर्धा व दुष्मनी पुरषोत्तमजी ना नाटकात अभिप्रेतच न्हवती तीच शिणीमा मध्ये प्रेक्षकांच्या माथी मारून व एक जुनी चांगली कलाकृती विस्कटून यांना खान्साहेबंच्याच भाषेत नक्की काय हासील करायचे होते हे ती शिनिमात बोलणारी कट्यार व आमचे खाणसाहेब महागुरू पंडितजिंच्या ज्या रेकॉर्ड्स तोडतात त्या रेकॉर्डसच जाणे. त्या तुटलेल्या रेकॉर्ड्सच्या पायघड्यांवरून वरून खाणसाहेब महागुरू एखाद्या विजयी वीरासारखे चालत येतात हे दृश्य म्हणजे लेखक दिग्दर्शकाला मुळ संहिता न कळणे अथवा ती कळून देखील आता असेच मसालेदार काहीही खपते अशी मानसिकता बाळगून असल्याचे उत्तम उदाहरण होय. पंडितजी ना शेंदूर खाऊ घालण्याची कल्पना खांसाहेबांच्या पत्नीला दरबारातील एक अंग्रेज सांगतो म्हणे.. या अल्लाह .. बिगडी को इनके कौन बनावे.. असो.. बाकी ते पुष्कर श्रोत्री नामे अभिनय सम्राटांनी वठवलेले कविराज , महागुरुंचा गायक असल्याचा उसना आणलेला अविर्भाव , गाण्याचा अभिनय करताना आणि ताना घेताना त्यांनी केलेले विचित्र चाळे व हावभाव याबद्दल न बोललेलेच बरे. त्यातल्या त्यात शंकरजी महादेवन यांच्या वाट्याला आलेले काम त्यांनी निभावून नेले आहे. ”बेटा कट्यार तो तुने चलायी आज हमपर” असे आर्त शब्दात खांसाहेब सदाशिवला म्हणतात तसे अरे भावे ये शिनिमा की कट्यार तो तुने चलायी आज हमपार असे म्हणून तौबा तौबा करत बाहेर पाडण्याची वेळ आमच्यावर आली हेच या सुबोध भावे की कट्यार चे यश म्हणायला हरकत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28559
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

>> नाही आवडला, तर राहुल देशपांडे आणि महेश काळेने काम केलेल्या नाटकाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहेच! हे कुठे मिळेल? मी शोधतोय.

चित्रपट पहिला नाहीये पण आधीच्या बालगंधर्व आणि लोकमान्य टिळकांच्या चित्रपटावरून मला फार काही पहायची इच्छा नाहीये. फक्त एकाच स्तुत्य गोष्ट सुबोधची आहे कि त्याच्या कलाकृती इथल्या मातीतल्या आहेत. पण भरजरी करण्याच्या नादात तो कोणालाच न्याय देत नाही. मुळातच आपल्याकडे खूप विचार करून बारीक सारीक गोष्टी प्रभावी पणे मांडणे हे नाहीये. जे काही आहे ते प्रचंड इमोशनल आहे. त्यामुळे लोकांना आवडते पण कलाकृती एक प्रकारची उंची गाठू शकत नाही असे माझे मत आहे. जे काही आहे ते भूतकाळातच रममाण झाल्यासारखे वाटते आहे.

माझे मित्र श्री. श्रीहर्ष जोगळेकर यांनी मूळ नाटकाविषयी खालील रोचक माहिती मला पाठवली आहे -------- : कट्यार काळजात घुसली हा चित्रपट सध्या सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. तो ज्या मूळ नाटकावर आधारीत आहे त्या नाटकाबद्दलची माहिती संकलित केली आहे. " कट्यार काळजात घुसली! " या नाटकाची जन्मकथा खुप छान आहे. 'बैजूबावरा' हा चित्रपट पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी पाहिला ! आणि ते अस्वस्थ झाले. संगीत या विषयावर एखाद नाटक मराठी रंगभूमीवर याव अस त्याना वाटल ! दारव्हेकरमास्तर नाट्यशास्त्रातले मोठे अभ्यासक ! लेखकही आणि दिग्दर्शकही ! खुप विचार केल्यावर 'कट्यार'च कथानक त्यांच्या मनात तयार झाल! जो भेटेल त्याला ते सांगत ! शेवटी एका सोनेरी क्षणावर लेखनाचा प्रारंभ झाला आणि नाटकाची संहिता तयार झाली! या नाटकाचा नायक हा सदाशिव आहे. पंडितजी आणि खॉसाहेब यांच्या गायकीतला फरक हा नाटकातला संघर्ष आहे. एक गायकी जिंकते आणि दुसरी पराभूत होते. नाटकाला संगीत देताना 'घेई छंद मकरंद' या नाट्यगीताला अभिषेकीबुवांनी ७ चाली (काही ठिकाणी २७ चाली लावल्याचा संदर्भ आढळतो) लावल्या आहेत. नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकरांनी त्यातल्या दोन चाली स्विकारल्या आहेत. ज्या नाट्यप्रयोगात आपण ऐकू शकतो. पंडितजींसाठी निवडलेली चाल थोडी प्रासादिक, श्रोत्यांना रिझवून जिंकून घेणारी आहे, तर खॉसाहेबांसाठी निवडलेली चाल आक्रमक, श्रोत्यांना हावी करुन कब्जात घेणारी आहे. "कट्यार......." या नाटकाचा पहिला प्रयोग २६ डिसेंबर १९६७ यादिवशी गिरगाव येथे साहित्य संघाच्या नाट्यगृहात पार पडला ! नाट्यगीताला आलेला प्रत्येक वन्समोअर कलाकारांनी स्वीकारला ! परिणामी नाटक संपायला पहाटेचे पाच वाजले ! "प्रयोग संपल्यावर शेवटची लोकल पकडून घरी जाऊ!" असा विचार करुन आलेले प्रेक्षक, दुस-या दिवशीच्या पहिल्या लोकलने घरी गेले ! जवळ जवळ आठ तास नाटकाचा प्रयोग चालू होता ! या प्रयोगाला आचार्य अत्रे उपस्थित होते. त्यांनी 'कट्यार'च्या या पहिल्या प्रयोगावर 'मराठा'त अग्रलेख लिहिला ! त्याच शीर्षक होत - "कट्यार घड्याळात घुसली !" "कट्यार......"नाटकाची मोहिनी किती होती, याचा एक किस्सा म्हणजे पंडित रविशंकर यांनी एकदा हे नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा 'नाट्यसंपदा'चे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी एका दिवसांत प्रयोग ठरवून, त्याची जमवाजमव करून पंडित रविशंकरांसाठी प्रयोग सादर केला. तोही हाऊसफुल्ल‼️ प्रभाकरपंत पणशीकरांनी या नाटकाचे कोडकौतुक केले. त्याचे प्रत्येक शतक थाटात साजरे केले. पहिले शतक आचार्य अत्रे तर पुढची शतके पुलं, गदिमा, रणजित देसाई यांच्या उपस्थितीत साजरी झाली. सृष्टीच्या रचनाकाराने गाता गळा हा बरोब्बर मेंदू आणि हृदयाच्या मधोमध का ठेवलाय? कारण संगीत हे भावना आणि हुशारी ह्यांचं अलौकिक असं मिश्रण आहे..संगीत हाच आत्मा, संगीत हेच तत्त्व! चराचरात भरून राहिलंय ते फक्त संगीत. त्याला कोणत्याही सीमा बांधून ठेवू शकत नाहीत.. घराण्याच्या, शिष्टाचाराच्या, अहंकाराच्या, प्रतिष्ठेच्या, रीतीरिवाजांच्या- कोणत्याही बंधनात हे बद्ध नाही. संगीतकला ही अशी विद्या आहे जी जितकी द्याल तितकी वाढेलच.. तिच्यात अपार समाधान, सुख आणि शांतता देण्याची शक्ती आहे.. तिच्यात घराणेशाहीच्या क्षूद्र भिंती उभारून तिची वंचना करू नका, तिच्या साधकांचा अपमान करू नका.. आनंद घ्या, आनंद द्या हा संदेश हे संगीत नाटक अत्यंत प्रभावी पद्धतीने आपल्याला देतं.. नाटकाचा शेवट म्हणजे एक शोकांतिका आहे- घराणेशाहीची शोकांतिका, जी आपल्या हृदयाला चटका लावून जाते!

कालच हा चित्रपट पाहिला. मुद्दमच तुमचा लेख वाचला नव्हता पण प्रतिक्रिया चाळल्या होत्या. शिवाय वॉट्सअ‍ॅप्वर गाणीही मिळाली होती म्हणुन ऐकलेली होती. पण असं करायला नको होतं. त्यामुळे कथा, संगीत, जमेच्या बाजु, चुका सगळंच आधीच माहिती असल्याने फक्त पडद्यावरचे सादरीकरण काय ते बघायचे राहिले होते. म्हणुन की काय, एक क्लास अपार्ट कलाकृती वगैरे वाटली नाही. पण आवडली हे निश्चित. १. चित्रपटात खां साहेब पंडितजींचा आत्यंतिक द्वेष करताना दिसतात. दुष्मन म्हणताना दिसतात. हे जरा खटकले. कारण पंडितजींमुळेच त्यांना ही संधी मिळालेली असते. त्यांना हरवता येत नाही हा एक भाग झाला. त्याने मनात असुया निर्माण होणे समजु शकते. पण इतका द्वेष? तरीही कथेचे स्वतःचे इंट्रप्रिटिशन म्हणुन हा मुद्दा सोडुन दिला. २. मला तरी गाण्यांची लांबी हा मुद्दा महत्वाचा वाटला नाही. किंचित आटोपली आहेत गाणी असे वाटते. पण आपण संगीत नाटक बघायला गेलेलो नाही आहोत. माध्यम बदलल्यावर आवश्यक बदल केले आहेत असंच वाटलं. गाणीही चांगली जमली आहेत. ३. म्हाग्रुंनी चांगला अभिनय केला असला तरीही त्या जागी नसरुद्दिन शाह वगैरे विभुतींनी जास्त मजा आणली असती. मला तरी म्हाग्रुंची उर्दु मराठी बाजाचीच वाटली. अमृता खानविलकरही मजेशीर उच्चार करते अनेकदा. (हीन ह्या श्ब्दात "न" वर जोर देणे.. "धुंदला" हा शब्द थोडा धुंद्ला असा असतो , तर तो "धुं द ला" असा खणखणीत मराठी धुंद शब्दाला "ला" चा डब्बा जोडणे टाईप केलाय.) ४. शंकर महादेवननी बरंच चांगलं काम केलंय. म्हणजे मराठीतर छानच बोलला आहे तो. पण काही प्रसंगात जिथे अभिनेत्याने बराच भावनाकल्लोळ दाखवणे अपेक्षित होते, तिथे कमी पडलाय. पण अर्थात तो अभिनेता नसल्याने तशी अपेक्षाही नव्हती. फक्त काही प्रसंगात ते ठळकपणे जाणवतं. एकंदरीत चित्रपट उत्तम आहे, पण मी तरी भारावुन वगैरे गेले नाही. कदाचित खुपच चर्चा झाल्याने अपेक्षा अतिच वाढल्या असतील.

गायक-नट म्हणुन शंकर महादेवन ला घेतले असेल तर तोच निकष सदाशीव च्या रोल साठी का नाही लावला. महेश काळे ने नाटकात अतिशय छान काम केले आहे. गाणे शिकण्याची आस त्याने चांगली दाखवली आहे. सुबोध भावेने गाण्याच्या तळमळी ऐवजी खुन्नसच जास्त दाखवली आहे. सुबोध भावेने नाटकात कवीराजची भुमीका मात्र फारच छान रंगवली होती.

शंकर महादेव्न हा श्रीनिवास खळेंचा शिष्य आहे

चित्रपट पाहीला. आवडला.गाणी अजून लांबली असती तर अजून मजा आला असता.नाटक पाहीले नाही.पण पिक्चर आवडला.

ग्वाल्हेरचा राजा दौलतराव शिंदे याच्या कारकिर्दित त्याच्या पदरी कबीर बक्ष अन महंमद खाँ हे दोन (चुलत भाऊ) गायक होते. राजगायक होण्याची दोघांत चुरस असायची. महंमदाने कबीरवर विषप्रयोग करून त्यास ठार मारले. निवाडा होण्यापुर्वीच दौलतरावांचा मृत्यु होऊन जानकोजी शिंदे गादीवर आले. पीर बक्षने आपला मुलगा कबीर बक्ष यास न्याय मिळावा म्हणुन जानकोजींना गार्‍हाणे घातले, पण सबळ पुरव्यांअभावी महंमद खाँ सुटला. महंमद खाँ त्याच्या तानांसाठी पंचक्रोशीत सुप्रसिद्ध होता. त्याचा बदला/पराभव करण्यासाठी पीर बक्षने त्याच्या दोन्ही नातवांना (हदू खाँ , हसु खाँ (ही कबीर बक्षची मुले)) महंमदाच्या महाली लपवून रहाण्याची परवानगी जनकोजींकडून मिळवली. यथावकाश दोन्ही भावांनी चुलत्याची कला आत्मसात केली व त्याचा पराभव केला. 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट जरी नाटकावर बेतलेला असला तरी त्यास या सत्यकथेचा आधारही असावा. आजमितीस हे नाटक काही ठरावीक दर्दी लोकांपर्यंतच पोहोचलेलं आहे, पण चित्रपटाचा आवाका नक्कीच मोठा आहे. या माध्यमातुन जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. आज माझ्या शेजारची यत्ता चवथीतली मुलं या चित्रपटांतली गाणी गुणगुणतायत हे मी या चित्रपटाचं यश मानतो.

In reply to by बॅटमॅन

बहुतेक अल्लादियाखाँसाहेबांच्या गोंविंदराव टेंब्यांनी लिहिलेल्या चरित्रात हा उल्लेख आहे. कोणत्याशा सरकारी साईटवर ते चरित्र डाऊनलोडायलाही होतं. या हद्दू - हस्सूखाँचा आणि अल्लादियाखाँचा काहीतरी संबंध होता असं अंधुक आठवतं आहे.

In reply to by आदूबाळ

हद्दू - हस्सू खां हे ग्वाल्हेर घराण्याचे तर अल्लादियाखांसाहेब हे जयपूर - अत्रौली घराण्याचे गायक होते. शिवाय माझ्या माहितीनुसार हद्दू - हस्सू खां यांनी ध्रुपदगायकीमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. ही एक वेगळीच गायनशैली आहे. सध्या डागरबंधू हे एकमेव ख्यातनाम ध्रुपदिये उरलेले आहेत. अल्लादियाखांसाहेबांनी ख्यालगायकी प्रचलित केली. चूभूद्याघ्या.

In reply to by बोका-ए-आझम

ग्वालियर घराणे ख्याल गायकीत ही अव्वल मानले जाते. आपल्याकडील काही प्रसिद्ध नावे म्हणजे कुमार गंधर्व,मालिनी राजूरकर , लक्ष्मण शंकर पंडीत अगैरे. आल्लादिया खान हे जयपूर अत्रौली घराण्याचे . ते कोल्हापूर ला स्थाईक झाले. त्यांच्या कडून आणि त्यांचे बंधू भूर्जीखान यांच्या कडून केसरबाई केरकर , निवृत्तीबुवा सरनाईक , मोघुबाइ कुर्डीकर, मल्लिकार्जुन मन्सूर वगैरे गायकांनी ख्याल गायकी शिकून घेतली. डग्गर बन्धुन्च्या ध्रुपद गायकीतले सध्याचे प्रसिद्ध नाव म्हणजे उदय भवाळकर .

In reply to by बॅटमॅन

लेकीच्या शास्त्रीय संगीताच्या मध्यमा प्रथम (चौथी) परीक्षेच्या अभ्यासक्रमातील हिदुस्थानी गायकांच्या चरीत्रात ही कथा दिली आहे.

शंकर महादेवनः अभिनय नैसर्गिक आणि पहिल्या प्रयत्नांत बर्‍यापैकी जमून आलाय असे वाटते. सुबोध भावे: मूळ नाटकातील सदाशिव पात्राच्या आणि चित्रपटातील सदाशिवाच्या कॅरॅक्टरमध्ये फरक घडवून आणला असला तरीही अभिनय चांगला केला आहे. गायन करतानाचे बरेचसे हावभाव राहुल देशपांडेंशी मिळतेजुळते आहेत. महागुरु: प्रशस्त हातवारे आणि डोळे भिरभिरवले म्हणजे शास्त्रीय गायकाचा अभिनय झाला बुवा असे नाही. तसेच उर्दू भाषेचे "ज्ञान असणे" आणि उर्दू भाषा "बोलता येणे" यातील फरक दिग्दर्शक सुबोध भावेच्या लक्षात का नाही आला, याचे नवल वाटते. पुष्कर श्रोत्री: अभिनयाला वाव नाही. चौदा वर्षांपूर्वीचे राजकवि आणि चौदा वर्षांनंतरचे राजकवि यामध्ये काहीच फरक नाही.

संजय लीला भन्साळी ची लिबर्टी चुकीची आणि ही लिबर्टी बरोबर काय ??

In reply to by सुज्ञ

कट्यारची कथा ही सत्यकथा असल्याचे जाहीर झाले असले, त्याचे लिखित पुरावे उपलब्ध असले व सत्यकथेवर चित्रपट बनवत असल्याची घोषणा असली तर ही लिबर्टी घेणे चुकच! निदान माझ्या ऐकण्यात तरी हा सत्यकथेवर बेतलेला चित्रपट असे आलेले नाही. आता गणपाने एक वेगळीच इंटरेस्टींग गोष्ट सांगितली आहे. त्यावर आधारित कथा असेल तर लिबर्टी घेता येऊ शकेल असे वाटते.

In reply to by रेवती

नाटक बनवताना हि ते सत्याघटनेवार आधारित आहे असे कोठेही उल्लेख नाही. मुळात ह्या घटनेचे काही पुरावे उपलबद्ध असतील तर त्याला आपण सत्याघात्ना म्हणू शकु. सत्याघटना म्हणू शकु. असो. दिलेली घटना मनोरंजक (इंटरेस्टिंग) आहे.

इतिहास आणि कविकल्पना यात फरक असतो तसेच संबंध असतो . वास्तव इतिहासाशी किती प्रतारणा करायची तसेच वास्तव कलाकृतीशी किती प्रतारणा करायची याचाही संबंध असतो .

In reply to by सुज्ञ

शिवाजींना लुटारू, डाकू, दरवडेखोर असे नामकरण ऐतिहासिक कागदपत्रांमधे आहे. ते तसेच चित्रण केले तर चालेल काय? ही इतिहासाशी अजिबात प्रतारणा नाही कारण इंग्रज व मुगलांना ते तसेच वाटत होते. पण ते सत्य आहे का? रामायण, महाभारत ह्या कविकल्पना आहेत म्हणून सीतेला लक्ष्मणासोबत कामक्रिडा करतांना दाखवलेले चालेल काय? माझ्यामते चालेलही. कारण सादरकर्ता त्याच्या डोक्यात आलेली कल्पना, एक धक्कातंत्र म्हणून कथा मांडण्यासाठी वापरेलही. की सुवर्णमृगाची शिकार करतांना, कावलेल्या, फसवल्या गेलेल्या रामाच्या मनात सीतेविषयी संदेह आला आणि त्याने स्वप्नात पाहिले की सीता लक्ष्मणासोबत रममाण होत आहे. (या कल्पनेला सीतेच्या अग्निपरिक्षेचा संदर्भ मूळ रामायणातूनच घेता येईल, की रामाला सीतेबद्दल सतत संशय यायचा) मग तो झटपट पर्णकुटीकडे निघाला. कोणी आक्षेप घेणार नाही या प्रसंगाला. काल्पनिक कथेचे सादरीकरणाचे पूर्ण स्वातंत्र्य कलाकारास आहे.

सिनेमा पाहिला आणी आवडला ! पैसा वसूल ! बाकी चर्चा चालू द्या

आजच सिनेमा पाहिला. उगाच बहिर्गोल भिंग लावून नाटक आणि सिनेमाची तुलना करत न बसता बघितल्याने आवडला. शिवाय, खांसाहेब टाईपच्या बर्‍याचश्या लोकांना नखरे असतात असे मनात ठेवून पाहिल्याने म्हाग्रूंचे अंगविक्षेप डोक्यात गेले नाही किंवा डोके दुखायलाही कारण ठरले नाही. एकंदरीत सिनेमा आवडला. लोकांनाही आवडला असे दिसते, कारण आज गुरुवार असूनही दुपारी १:३० च्या शोला ४०-५० टक्के थिएटर भरलेले होते. कुंपणावर बसलेल्या लोकांनी बघायला हरकत नाही असेच वाटते.

सिनेमा खराब आहे असे मला म्हणायचे असल्याचा अनेक लोकांचा गैरसमज झ्हालेला दिसतो . सिनेमा त्याच्या जागी ठीक आहे पण जी तुलना सिनेमा बनवतानाच केली गेली ( कट्यार नाटकाचा सिनेमा ) त्यामुळे नाटकाचा मुळ गाभा ( नाटककारला जे अभिप्रेत आहे ते ) जसा आहे तसा सिनेमात ठेवणे अनिवार्य होते ते सिनेमात झ्हाले नाही. फक्त एक नवीन प्रकारचा सिनेमा म्हणून याकडे आपण बघू शकतो . त्यापलीकडे कट्यार एक नाटक म्हनूण या सिनेमापेक्षा बरेच वेगळे आहे एवढेच फक्त .

सिनेमा पाहिला, स्वतंत्र कलाकृती म्हणून आवडला. गाणी खूप सुंदर आहेत. पण अर्धवट तोडल्यासारखी झाली आहेत. शंकर महादेवनचा मुलगा शिवम म्हणजे बापसे बेटा सवाई आहे. बर्‍याच काळाने काहीतरी वेगळे, सुंदर ऐकल्याचे समाधान मिळाले. खरेतर पूर्ण लांबीची गाणी घेऊन बाहुबली सारखा पार्ट वन पार्ट २ काढता आला असता तर अजून मजा आली असती. कारण कथेची जान व प्राण फक्त आणि फक्त गायकी आहे. प्रत्यक्ष नाटकात ती प्रचंड खुललेली भाग्यवंतांनी बघितली असेल. गाणी पूर्ण लांबीची असती तर नेमकी दुष्मनी, वा चढाओढ ही कशासाठी आहे हे कळले असते. खानसाहेबांची खुंखार मानसिकता घराण्याची गायकी हरल्यामुळे झाली की सततच्या गरीबी/अपमानामुळे झाली ह्यात थोडा गोंधळ वाटला. सचिन चे महत्त्वाच्या प्रसंगांमधे बेअरींग सुटल्यासारखे वाटले, संवादांमधे कंटीन्यूटीचे तुकडे पडलेत पण कारकिर्दीतली एकमेव चांगली भूमिका म्हणुन त्याकडे बघू शकतो. म्हणजे बाकीच्यांनी सोन्याची जरतारी लावली आणि हयांनी नायलॉनचे ठिगळ लावले असे झाले नाही, सर्वच परस्परपूरक आहे. काही दृष्ये घेतांना भावेंचा नवखेपणा उघडकीस येतो. कॅमेरामनवर नको इतका विश्वास टाकलेला दिसला. विश्रामपूरनगरीचे डोंगरावरून घेतलेले दृष्य एकाच पद्धतीने सुमारे चार-पाच वेळा येते तेव्हा नगरी दिसण्याऐवजी मोठमोठे दगड दिसतात ते खटकते. चित्रपट नुसता कपडेपट होऊ दिला नाही ही एक जमेची बाजू. कविराज गंभीर पात्र असणे आवश्यक होते, पुष्करला गाभा कळला नाही असे वाटते. गप्प, ठप्प, वैगेरे संवादातून मिस्किल स्वभाव दिसण्याऐवजी विदूषकछाप वाटले. कारण जेव्हा गौप्यस्फोट करण्याचा प्रसंग येतो तेव्हा हे पात्र आधीच लंगडे झाले असल्याने दरबारात वजन पडत नाही. त्या प्रसंगाची अपेक्षित परिणामकता साधून येता येता निसटते. अवांतरः दोन भागात चित्रपट असता तर, बाहुबलीसारखे 'पंडीतजी की आवाज को किसने मारा?' वैगेरे मस्त जमले असते. मूळ नाटक पाहिले नाही तरी ते नाटक सिनेमापेक्षा कैक पटीने चांगलेच असेल असे वाटते. तोही योग येवो ही प्रार्थना.

सचिन ला झोडपणे हि एक fashion झाली आहे सध्या. त्याची कामेच तसली आहेत. महा गुरु काय आणि इतर सर्व प्रकार . पण म्हणून त्याचे इथे श्रेय काढून घेऊ नका. त्याने खरेच सुंदर काम केले आहे.

थोडे विषयांतर. कट्यार नाटकामध्ये पंडितजी मिरज येथे एका डॉक्टरांकडे उपचारासाठी आलेले असतात . बालगंधर्व या चित्रपटातही बालगंधर्वांना मिरज येथे डॉ. वानलेस यांच्याकडे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला जातो . तेव्हा कट्यार नाटकामधील डॉक्टरांचा उल्लेख हासुद्धा डॉ. वानलेस यांचाच असावा .