Skip to main content

समानता

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 06/11/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
समानता आम्ही(सह कुटुंब आणि सह परिवार) मागच्या वर्षी आमचे पासपोर्ट काढायला पासपोर्ट सेवा केंद्र मालाडला गेलो होतो. आम्हाला वेळ सकाळी ११ ची दिली होती. त्यासाठी आम्ही त्यांच्या फाटकाच्या बाहेर १०.५० ला रांगेत उभे राहिलो.आमच्या मागे रांगेत पासपोर्ट काढायला एक मुसलमान माणूस उभा होता. त्याच्या बरोबर त्याची बुरखाधारी बायको, दोन मुली वय वर्षे पाच आणि साडेतीन आणि एक मुलगा वय वर्षे दोन असे उभे होते. त्या माणसाने एक कॅड्बरी( मिल्क चॉकलेट) आणली आणि त्या मुलाला दिली. त्या दोन्ही मुलीनी थोडा वेळ ते मुल कॅडबरी खात होते तेथे पहिले आणि नंतर पाहणे सोडून दिले. त्या दोन निरागस आणि निष्पाप मुलींकडे पाहून माझ्या पोटात कुठेतरी तुटत होते. एक क्षण आपण दोन कॅडबरी आणून त्या मुलीना द्याव्या असेही वाटले परंतु त्या माणसाचा अहं दुखावला गेला असता म्हणून गप्प बसलो. जो माणूस पासपोर्ट काढायला उभा होता त्याला दहा रुपयाच्या दोन कॅडबरी दोन मुलीना देण्यासाठी नव्हते हे तर शक्यच नाही. आश्चर्य म्हणजे त्याच्या बायकोनेही एक चकार शब्द काढला नाही. मी माझ्या बायको आणि दोन्ही मुलांना( मुलगा आणि मुलगी) ते दाखवले आणि सांगितले कि केवळ मुलगा म्हणून त्याला कसे वेगळे वागवले जाते ते पहा. असे करणे किती चुकीचे आहे तेही सांगितले. दुर्दैवाने मी तेथे काहीच करू शकत नव्हतो. तीन दिवसांपूर्वी माझ्याकडे एक उत्तर भारतीय स्त्री तिच्या गरोदरपणाची सोनोग्राफी करायला आली होती. तिच्या बरोबर तिची बहिण, त्या बहिणीची ३-४ वर्षाची गोड मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा सुद्धा आले होते. त्या सर्वाना मी आतल्या खोलीत( जेथे सोनोग्राफी यंत्र आहे) तेथे घेतले. माझ्याकडे आलेल्या सर्व लहान मुलांना मी एक चॉकलेट देतो. ती माझ्या ड्रोवरमध्ये एका बरणीत भरलेली असतात. त्या दोन्ही मुलांना मी एक एक चॉकलेट दिले आणि सोनोग्राफी चालू केली. त्या मुलाने आपले चॉकलेट खाल्ले आणि अजून हवे म्हणून तो रडू लागला. त्यावर त्या रुग्णाच्या बहिणीने(मुलीच्या आईने)त्या मुलीला तिचे चॉकलेट त्या मुलाला द्यायला सांगितले. त्या इतक्या निरागस मुलीने ते त्याला दिले सुद्धा. मला जरा धक्काच बसला. तो "मुलगा" म्हणून लाडावलेलाच वाटत होता. दुसरे चॉकलेट खाल्ल्यावर थोड्या वेळाने त्या मुलाने परत चॉकलेट हवे म्हणून मागणी केली. मी "अजून" चॉकलेट देणार नाही म्हणून स्पष्ट सांगितले. त्या मुलाने रडायला सुरुवात केली. मी वैतागून त्याच्या आईला सांगितले कि त्याला बाहेर घेऊन जा. त्याच्या रडण्याने मला डिस्टर्ब होतोय आणि माझी काही चूक झाली तर तुमच्या बहिणीला ते महाग पडेल. त्यावर ती बहिण मुलाला घेऊन बाहेर गेली. मी सोनोग्राफी सुरु केली . मग माझ्या मनात एक विचार आला. मी त्या छोट्याशा मुलीला विचारले, "आपका चॉकलेट तो आपका भाई खा गया ना? आपको चॉकलेट चाहिये?" त्यावर ती घुटमळली. मी तिला एक चॉकलेट काढून दिले. ते ती खिशात टाकणार होती. मी तिला म्हणालो आप अभी ये खा लो. नाही तो आपका भाई फिरसे मांग लेगा. तिला ते पटले आणि तिने ते खाल्ले आणि माझ्याकडे बघून गोड असे स्मित केले. मला पण छान वाटले. मला राहून राहून एक गोष्ट डाचत राहिली कि इतक्या लहान निष्पाप आणि निरागस मुलींवर त्यांचे आईबाप इतक्या सहजतेने अन्याय का करतात. केवळ त्या मुली आहेत म्हणून? आपल्याला समान हक्क मिळाला पाहिजे हि जाणीव त्या बिचार्या मुलींची कलीकावस्थेतच अशी का खुडून टाकली जाते? लहानपणी असेच वागवले गेले असल्याने त्यांच्या आया सुद्धा कदाचित मुलाला मुलीपेक्षा जास्त झुकते पारडे देत असाव्यात. कदाचित यामुळेच मुलीसुद्धा मोठ्या झाल्या कि त्यांच्या मनात खोल रुजलेली पुरुष श्रेष्ठत्वाची भावना काढून टाकणे अशक्य होते. स्त्री पुरुष समानता हि लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवली पाहिजे तरच पुढच्या पिढीत समानते साठी लढ्याची गरज पडणार नाही.

वाचने 13226
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

डॉक्टरसाहेब, हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद! हे असमानता प्रकरण जळीस्थळी काष्ठीपाषाणी आढळत असतं. जरा वेळाने माझे पण अनुभव नोंदवतो.

स्वतःच्या अपत्यांमध्ये मुलग्यांना मुलींपेक्षा झुकते माप देण्याची उदाहरणे लक्षणीय प्रमाणात दिसतात. परंतु समानतेने वागवण्याची उदाहरणेही अगदीच क्षुल्लक म्हणता येणार नाही. याबाबतीत सुधारणेचा वेग मात्र नक्कीच पुरेसा नाही.

In reply to by एस

हो हो, बर्‍याचदा बायकाच याला खत पाणी घालतात. आपल्या घरातला कर्ता पुरुष जितका असा तथाकथित निकषांवर यशस्वी असेल तितकं त्यांना "सेफ" वाटत असेल. पण हे पुन्हा मागे जातं, लहानपणी नकळत पणे वर डॉक च्या किश्यांमध्ये आहे तसं सतत जर बिंबवलं की तुला संरक्षण हवंय आणि कर्तृत्ववान भाऊ , पिता मग नवरा , मग मुलगा ही तुझ्या प्रतिष्ठेची नीव आहे तर हेच होणार. शिवाय यात अजुन एक गोष्ट आहे, बरेच पुरुष सोयिस्कर रित्या अशा रितीभाती मानायला लागतात मग. कारण काम करावं लागत नाही. सन्माननीय अपवाद आहेत जे म्हणतात की मी माझ्या हाताने करतो, आणि हे प्रमाण वाढतं आहे पण अजुन ही पुरेसं नाहीये.

In reply to by एस

सहमत आहे. बायकांनीच रडारड थांबवून आपल्याला हवं ते करून घ्यायला हवं. जे जमणार नाही तिथे स्पष्ट्पणे नाही म्हणायला शिकावं. जे आगावूपणा करतील त्यांना फाट्यावरच मारावं! उग्गीच घरोघरी टीव्हीवरच्या शिरियला हव्यात कश्याल!

काय अचरटपणा आहे! हे करवतं तरी कसं ते एक त्यांनाच ठाऊक? कडीशनिंग म्हणे! अरे (निदान) आपल्याच बाळांच्या बाबतीत कसलं आलय कंडिशनिंग? ठोकून काढायला पाहिजे एकेकाला. सगळ्यांकडेच भरपूर उदाहरणे असतील सांगायला आणि हे नुसतं भारतातच आहे असं नाही.

आमच्या घरात मुलगा मुलगी भेदभाव कधीच केला गेला नाही . आम्ही सगळे कायम एकत्रच जेवायला बसतो ,घरी काही कार्यक्रम असतो तेव्हाही जेवायला सगळे एकत्रच बसतो मी लहान असताना आई ,बाबा दोघ सकाळी नऊ वाजता सगळा स्वयंपाक करून बाहेर पडायचे आई नाश्ता बनवेपर्यंत बाबा कपडे वाळत घालायचे , बाबा कणीक मळून , कुकर लावायचे ,भाज्या चिरून ठेवायचे आमचे आजोबा (आईचे वडील )सुद्धा घरात सगळी काम करायचे आणि दुसरे आजोबा सुद्धा घरी धान्य निवडणे ,झाडून घेणे अशी काम करायचे तिसरीत असल्यापासून रोजचा चहा माझा भाऊ करतो , दुध आणून तापवायचं आणि विरजण लावून ताक करण्याच काम त्याच्याकडे आहे सातवीत असल्यापासून तो पोहे,शिरा बनवतो दर शनिवारी रात्री मुगाची खिचडी बनवतो जेवणासाठी मी लहानपणापासून घरातल्या पुरुषांना घरात काम करताना पाहिलंय आणि आमच्याकडे यात कुणालाही काही विशेष वाटत नाही

आमच्या जवळ रहाणार्‍या एका हरियाणवी कुटुंबातील मुलगी चांगली शिकली, आणि ७०-८० हजार महिन्याची नोकरी करू लागली. लग्नानंतर सासरी नोकर वगैरे असूनही सासू - सासर्‍यांना वाटायचे की सुनेने सकाळचा चहा स्वतः करावा आणि एकत्र बसून सर्वांनी चहा घेऊन मग नोकरीवर जावे. यावरून त्या मुलीची आई मोबाईलवरून मुलीला सारखी निर्देश द्यायची की तू त्यांचे ऐकू नकोस, तू नोकरी करून कमावतेस, मग तू का चहा बनवतेस... वगैरे. शेवटी तिने मुलीला ( तिच्या पगारासाठी ?) कायमचे माहेरी बोलावून घेतले.

हे पूर्वी म्हणजे ३० वर्षापूर्वी वगरे बघीतलेल आहे. पण २०१५ मध्ये सुध आहे होते? माझे अनुभव ( मी बहुदा मंगळावर राहतो) प्रसंग १ ( २००२ सुमाराचा) मित्राचे लग्न (दाखवून ) ठरले होते.दोघेही घराबाहे पण भारतात एका शहरात नोकरी करत होते. मित्र :( होणार्या बायकोला ) पुढे जेवणाचे काय करायचे? तिचे उत्तर ( प्रश्न ) तू सध्या कुठल्या मेस मध्ये जातोस? मित्र :-- अबक मेस मध्ये. वाहिनी :- फारच चांगले. उद्यापासून मी पण तिकडेच. प्रसंग 2 ( २०१५) बहिण भावाला घेऊन तिच्या घरी येते. ( भाऊ तिचा गावात काही कामासाठी आलेला आहे) बहिणीचा नवरा रविवारी आरामात टीवी बघत बसला आहे. बहिण तिचा नवर्याला , :- अरे तू सगळ्यांसाठी चहा करतोस का? तिचा नवरा :- ( Sherlock Pause करून) करतो की. खरच उठतो आणि चहा करतो.

In reply to by बिहाग

पहिला प्रसंग बहुधा पुणे नामक शहरातील असावा ! असा अंदाज व्यक्त करतो.