Skip to main content

कोवळ्या वयातलं व्यसन

लेखक जातवेद यांनी रविवार, 01/11/2015 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती? माझ्या घरापासून शाळा ४-५ किलोमीटर अंतरावर होती. शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणजे ८ वी, ९ वी आणि १० वी मी सायकलने ये जा केली. रोज जाता येता बरेच मित्र सोबत असायचे आणि गप्पा मारत जायला यायला मजा यायची. विषय पण १४-१५ वर्षाच्या मुलांच्या नेहमीच्या विषयांसारखेच असायचे; म्हणजे अभ्यास, शाळा, सर, मॅडम, सायन्स ईतर शाखांपेक्षा किती भारी आहे, कॉम्पुटर गेम्स, मुली वगैरे. या वयात आपण श्रीमंत व हुषार मुलांना रोल मॉडेल समजत असतो आणि त्यांचं अनुकरण करायला बघत असतो. असाच एक हुशार मुलगा माझ्याबरोबर होता; अगदी इतर पालकांना हेवा वाटवा असा. तो रोज नवनविन आणि रोमांचकारी माहिती सांगायचा. यात काय नसायचं? जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्स सर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ. एके दिवशी मला त्याने भलतीच गोष्ट सांगितली. त्याने नुकतीच बीअर टेस्ट कशी केली याची कहाणी तो सांगू लागला. बीअर कुठल्या दादाने आणली होती, ते सगळे त्याच्या गच्चीत बसून कसे प्यायले, त्याला दरदरून घाम कसा फुटला, रात्री गार वारा कसा वहात होता, एकदम भारी कसं वाटलं वगैरे. मला थोडा धक्काच बसला. घरचे संस्कार तर दारू ही नेहमी वाईट कशी असते असेच होते. त्यावेळी दारूचे दुष्परिणाम माहिती नव्हते पण दारू पिणार्‍यांचा तिरस्कार कसा केला जातो हे माहित होते. आणि ईथे मी ज्याचे अनुकरण करायचो, ज्याच्या प्रत्येक गोष्टीचे अप्रुप वाटायचे तोच दारू प्यायची तारीफ करतोय! अमुक प्रकारची पुस्तके किंवा सीडी त्याने कशी मिळवली, ती कशी कुठे वाचली, पाहिली हे त्याने आधिही सांगितले होते. पण एक म्हणजे ह्या गोष्टी वाईट आहेत हेच माहित नव्हते कारण ह्यावर मोठ्यांकडून कधिच काही ऐकले नव्हते आणि दुसरे म्हणजे अशा गोष्टींचे कुतूहल. त्यामुळे त्याचे काही विषेश वाटले नव्हते. तेव्हा ऐकावं ते नवलच असं वय आणि एवढा भारी पोरगा दारूची तारिफ करतोय म्हणल्यावर दारू पिणे कदाचित चांगलेच असेल असे वाटणे साहजिक आहे. पण एक मन हे सर्व वाईट आहे असे ठणकावून सांगत होते. हा दारू पितो म्हणल्यावर याचा आदर्श ठेवावा कि ठेवू नये आणि याच्याबरोबर रोज शाळेत ये जा करावी का या विचारात मी पडलो. शेवटी असे ठरवले कि, काही असले तरी तो माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्यामुळेच माझे ज्ञानवर्धन भरपूर होते आहे तेव्हा आता याचे अनुकरण करण्याची काही गरज नाही पण हे वगळून त्याची संगत करायला काही हरकत नाही. त्यानंतरही त्याने त्याच्या पहिल्या सिगरेटचा किस्सा सांगितला, पहिल्यांदा तंबाखू खाल्याचा किस्सा सांगितला. मी त्याच्या ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि दिनक्रम चालू ठेवला. त्याने हे किस्से बर्‍याच मित्रांना सांगितले असणार कारण त्यांचा एक चांगला ग्रुप जमला जे हे प्रकार सर्रास करू लागले. त्यालाही त्याच्या कुठल्याश्या मित्राने स्वतःचा अनुभव सांगितला असणार आणि माझा मित्र त्याला बळी पडला असणार. हि साखळी अशी किती लांब चालत आलेली आणि अशी किती लांब जाईल कोणास ठाऊक. त्या ग्रुपमधले काहीजण पुढे जाऊन मुलींची छेडही काढू लागले. त्याचीही एक साखळी तयार होतच असणार. आजचा विचार करता, तो मुलगा स्वतः व्यसनांच्या आहारी गेला का? तर मला तसं वाटत नाही; यापुढे कधी जाईल का? सांगता येत नाही. या साखळीत त्याला ज्यांनी गोवले, त्याने ज्यांना गोवले असेल तर त्यातली कोणी व्यसनांच्या आहारी गेली असतिल का? निश्चितच. 'रेगे' हा या विषयावरचाच चित्रपट आला होता पण त्यामधे वाईट गोष्टींच्या आहारी जाण्यात मित्र-मैत्रिणींच्या संगतीचा जो सहभाग आहे तो फारसा दाखवण्यात आला नाही. तर नायक हा स्वतःहूनच गुन्हेगारी विश्वाकडे कसा आकर्षित होतो हे दाखवले होते. 'बालक-पालक' मधे मात्र हे अतिशय योग्य पद्धतीने दाखवले आहे. जिज्ञासा म्हणलं तर चांगली, म्हणलं तर वाईट गोष्ट. ती चांगल्या गोष्टीत दाखवली तर तुम्हाला मोठा संशोधक करू शकते तसच वाईट गोष्टीत दाखवली तर तुम्हाला व्यसनाधिन किंवा गुन्हेगारही बनवू शकते. दारू, स्मोकिंग अशा समाजात वाईट समजल्या जाणार्‍या गोष्टींचे समर्थन करणारे सुद्धा असतील. पुढे महाविद्यालयात शिक्षण घेताना बरेचजण केवळ गंमत म्हणून हे सर्व चालू करताना पाहिलय (त्यातले कित्येक हातात पैसा खेळूलागल्यानंतर दर आठवड्याला बसू लागले). कोणतही व्यसन हे तसं वाईटच पण ८ वी-१० वी एवढ्या कोवळ्या वयात जेव्हा यांच्या दुष्परिणामांची माहितीदेखिल नसते तेव्हा यात ओढल्या जाण्याचं कोणीच समर्थन करू करणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21821
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

मी ए एफ एम सी मध्ये असताना एका साध्या गावच्या मित्राला सिगारेट ओढताना पाहिले आणि विचारले का रे बाबा, सिगारेट का ओढतोस? त्यावर तो म्हणाला लोक मला स्मार्ट समजत नाहीत. मी त्याला म्हणालो कि जर एक रुपयाच्या सिगारेतने माणूस स्मार्ट होत असेल तर पुणे स्टेशन वरचा भिकारी पण एक रुपयात स्मार्ट होउ शकेल. तो चमकला. पण त्याला त्यातील गम्य कळले आणि त्याने "असले" प्रयत्न सोडले. आज तो एक प्रथितयश कान नाक घसा याचा तज्ञ आणि प्राध्यापक आहे. माझ्या मुलाने मला हाच प्रश्न ९ वीत असताना विचारला होता आणि मी त्याला हेच उत्तर दिले होते. शिवाय हेही सांगितले कि स्मार्ट दिसण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टींची आवश्यकता असणे हे तुमच्या न्युनगंडाचे लक्षण आहे. स्मार्टनेस हा आतूनच असायला पाहिजे. ते त्याला इतके पटले कि या गोष्टी त्याने त्याच्या ग्रुप वर टाकल्या आणि सर्व मुलांना हि ते पटले. सुदैवाने त्याच्या मित्रांपैकी जवळ जवळ कोणीच सिगारेट ओढत नाही( नसावा). हीच गोष्ट दारू पिण्याबद्दल आहे. मॉडर्न होण्यासाठी विचारसरणी बदलणे कठीण आहे. पण हातात दारूचा ग्लास/ सिगारेट पकडणे सोपे आहे.

In reply to by सुबोध खरे

स्मार्ट असे नाही पण सिगारेट पिणारा माणुस आत्मविश्वासी जरुर वाटतो. बर्याच हिंदी मराठी मसाला चित्रपटामध्ये हिरोच्या टाळ्याखाऊ एंट्रीला बहुतांश वेळेला त्याच्या हातात सिगारेट असते आणी नाकातोंडातुन रेल्वेचय इंजिनाप्रमाणे धूर सोडत ते ध्यान पडद्यावर अवतरते ह्याच्यामागे हेच कारण तर नसावे.!

In reply to by कानडाऊ योगेशु

हातात सिगारेट असलेला भिकारी पण आत्मविश्वासाने मुसमुसलेला दिसतो? नाही. मूळ जो नायक म्हणून असतो तो देखणं आणि तरुण असतो आणि तो "अभिनय " करत असतो. हेच नव तरुणाला समजत नाही आणि आपण हि सिगरेट हातात धरून स्मार्ट दिसू असे त्याला वाटत असते आणि तो व्यसनात अडकतो.

आमच्या घराजवळ राहाणारा माझा एक सिनियर स्कूलमेट आहे. त्याचे वडील चेन स्मोकर. बरेचदा दारूही पीत. अगदी घरीदेखिल. त्याच्या १८व्या वाढदिवशी वडीलांनी बाटली आणली. त्याला समोर बसवले. आणि सांगितले, 'तू अजून प्यायला आहेस की नाही माहित नाही. पण नसशील प्यायला, तर पहिली बाटली माझ्याकडून. आणि यापुढे दोन गोष्टी लक्षात ठेव. कधीही एकट्याने प्यायची नाही. आणि दुसरे म्हणजे, कोणी कंपनी नसेल तर मला सांग, मी बसेन तुझ्याबरोबर.' त्याला त्याच वेळेस सिगरेटही ऑफर केली, मात्र हे सांगून, 'शक्यतो ओढू नकोस. पण तुझं तू ठरव.' तो मित्र आजतागायत दोन्ही गोष्टींपासून दूर आहे. तो म्हणतो, 'त्या वयात या गोष्टी थ्रिल म्हणून केल्या जातात. आमच्या बापसाने हवाच काढून घेतली त्या थ्रिलमधली. मित्र जेव्हा हे सगळे थ्रिल म्हणून करत त्यावेळी मला त्यांची कीव यायची.' माझ्यापुढे तो बाप आदर्श म्हणून आहे.

In reply to by टवाळ कार्टा

तो मित्र आजतागायत दोन्ही गोष्टींपासून दूर आहे. तो म्हणतो, 'त्या वयात या गोष्टी थ्रिल म्हणून केल्या जातात. आमच्या बापसाने हवाच काढून घेतली त्या थ्रिलमधली. मित्र जेव्हा हे सगळे थ्रिल म्हणून करत त्यावेळी मला त्यांची कीव यायची.'
बिकासर नेमके. दारू-आदी व्यसन करण्यात (आणि त्यात धन्यता मानणे) आणि वल्लीदांसारखी गड-लेणी आडवाटांमार्गे फिरण्यात (यापैकी) नक्की कशात थ्रील आहे हे माहीती पाहिजे. असं वयाच्या ११ व्या वर्षीच माहीती पडलेला (कमावता बालक ) नाखु

व्यसने करणारी माणसे यशस्वी होत नाहीत असा दावा नाहीच यात. व्यसनांमुळे त्या माणसाचे आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांचे नुकसान होते. हे किती होते आणि त्याचे काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त जे लोक व्यसनान्चे उदात्तीकरण करतात त्यांनी आपल्यामुळे दुसर्या माणसाचे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. वर दिलेल्या दुव्यातील दोन वाक्ये परत उद्धृत करीत आहे. Of 1000 teenagers who smoke today, 500 will eventually die of tobacco related diseases-250 in their middle age and 250 in their old age(5). Tobacco is the single largest preventable cause of death and disability worldwide.

In reply to by सुबोध खरे

अर्थातच डॉक. व्यसने आणि यशस्वी होणे यांचा संबंध नाही, व्यसने आणि वाया जाणे यांचाही संबंध नाही. नुकसानीचा मुद्दा जनरली बरोबर आहे. अर्थातच त्यालाही वैयक्तिक पदर आहेतच. व्यसनांचे उदात्तीकरण नकोच,

म्हणजे दुग्धशर्करा योग, व्वा काय तरतरीत होतं डोकं . . . . पण कधीतरीच हं,दररोज नव्हे (सूचना-धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे)

In reply to by याॅर्कर

रकाच्याने, कोणि धुम्रपान बंद केले तर फुफ्फुसामधे जमा झालेला टार कमी व्ह्यायला किती वेळ लागू शकतो? कि तो नेहमी तसाच राहतो?

In reply to by बॅटमॅन

म्हणजे दिवसरात्र काहिही न खाता पिता नुस्ता चहा घेत राहिले हि तो सर्प बाहेर येतो म्हणायचे?

In reply to by जातवेद

=)) ते काही माहिती नाय बा. हा सापगारुड्याचा खेळ आम्ही कधी खेळलो नाही, सबब कुठली पुंगी अन कशी वाजवायची ते माहिती नाय.

सिग्रेट मी चोरली. पेटवून बघितली. घाबरत घाबरत एकच झुरका मारला आणि जे काय झालंय डोक्यात ते अजूनही आठवतं. अर्धा तास तरी ठसकत उसकत बसलो होतो. डोकं गरगरत होतं. ही असली गोष्ट बाबा का ओढतात ते समजलं नाही आणि आणखीन गोंधळलो. :( परंतु आपण हे कधी करायचे नाही हे ठरवले तेव्हाच. बाबांचे एक मित्र होते खलील म्हणून. उर्दू शेरोशायरीमधला उस्ताद माणूस. बोटांच्या चिमटीत सदैव धुनी पेटलेली. आमच्या घरी आले तेव्हा मला म्हणाले "बेटा, इस शौक पे मैंने जितना पैसा बरबाद किया है उसमें मैं एक अँबेसिडर कार खरीद सकता था! और मेरी तबिय्त का हाल तो पूछो मत! बेटा जिंदगीमें कभीभी स्मोकिंग मत करना!!" बस तेवढे शब्द माझ्या मनावर कोरले गेले आणि मी पुन्हा हातात कधीही सिग्रेट धरली नाही. मित्रांसोबर बिअर प्यायलोय परंतु त्यापेक्षा पुढे कधी गेलो नाही आतातर मी चहा कॉफीही क्वचितच घेतो! :) इथे अम्रिकेत तर मुलांना अगदी लहान वयातच अल्कोहोल, सिग्रेट, ड्र्ग्जबद्दल व्यवस्थित माहिती देतात. त्यातले धोके समजावून देतात. बहुतांश मुले यापासून दूर राहू शकतात. आपण त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवायलाच लागतं परंतु त्यातलं थ्रिल करुन बघण्याआधी त्यातले धोके माहीत असल्यामुळे मुलं सहसा त्यावाटेने जायची शक्यता कमी असते. माझा मुलगा लहान असताना आम्ही ज्या अपार्टमेंट मध्ये रहात होतो तिथे एका अमेरिकन स्नेह्याची पत्नी स्मोकिंग करत होती. वयाने मोठे होते ते. ती बाई पन्नाशीची तरी असेल. हा लगेच तिच्याजवळ पळत पळत गेला आणि म्हणाला "यू आर गोइंग टु डाय इफ यू स्मोक!" :) -मुक्तरंग

In reply to by चतुरंग

मित्रांसोबर बिअर प्यायलोय परंतु त्यापेक्षा पुढे कधी गेलो नाही आतातर मी चहा कॉफीही क्वचितच घेतो! :)
हे आपले उगा रेवतीकाकुंना खुश करायला....

In reply to by चतुरंग

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

माहितीपुर्ण लेख आणी प्रतिक्रिया . यांवरुन एक आठवले - शाळा , कॉलेजमध्ये अशीही मुले असतात कि ती बाहेर वागताना आपण खुप दंगेखोर , वाया गेलेले आहोत असे दाखवतात . आणी घरी गेल्यावर मात्र दाबुन अभ्यास करतात .

In reply to by सिरुसेरि

व्यसनाचा आणि शैक्षणिक पात्रतेचा संबंध नाही. अतिशय हुशार मुले एकदाच वाचून किंवा अतिशय कमी अभ्यास करून गुण मिळवतात. त्यांच्या सारखा अभ्यास सामान्य मुलाने केला तर त्याला तेवढे गुण मिळणार नाहीत. आपण कूल आहोत हे दाखवण्यासाठी हुशार मुलांनी सिगारेट हातात धरली तर त्याचे अनुकरण सामान्य मुलाने केले तरी त्याची बुद्धी याला कशी येणार? थोडक्यात आपली पट्टी काळी दोन पांढरी पाच मध्ये गायचा प्रयत्न करू नये. हुशार मुलगा सिगारेट ओढतो स्मार्ट दिसतो मुलगी पटवतो म्हणून सामान्य मुलगा तसे करायला गेला तर तोंडावर आपटतो.

In reply to by सुबोध खरे

आपण सामान्य आहोत हे कबूल करायची कुणाचीच तयारी नसते. असामान्य म्हणून ज्यांचे कवतिक सदोदित केले जाते. तसेच कवतिक आपल्यालाही मिळावे म्हणून त्यांचे अनुकरण छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच करत असतात. पण स्वतःकडे असामान्य लोकांच्या अमूर्त गोष्टी नसल्यामुळे (बुद्धी, समज, आकलन) त्यांच्या मूर्त गोष्टींची नक्कल मारुन (वागणे, बोलणे, वेषभूषा, केशभूषा, व्यसनं) आपणही त्यांच्या समकक्ष आहोत हे दाखवण्याची खुमखुमी सामान्य जनांत असतेच.

तुम्ही "Thank you for smoking " नावाचा चित्रपट बघा आणि ठरवा खरे काय ते.

In reply to by लालगरूड

हे सगळे एखादा पेग मारल्यावर सांगणारे काका लोक्स तर लैच रोचक वगैरे वाटतात. (हे तुम्हांला उद्देशून नाही.)