Skip to main content

कच्च्या पपईचे लोणचे

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 26/10/2015 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
papai असे लगडलेले झाड पाहून लोणचे करायचा मोह आवरेना! साहित्य: कच्च्या पपईच्या फोडी चार वाट्या, पाऊण वाटी लाल मोहोरी, दोन चमचे लाल तिखट, मीठ, हळद, हिंग, तेल, मेथी दाणे अर्धा चमचा, एक लिंबू. सानिकाची आयडिया चोरलीय, पण माझ्याकडे तसे चमचे नाहीत म्हणून मग साध्या चमच्यांवर समाधान! papai papai कृती: पपईचे दोन भाग करून चीक धुवून घ्या. आता त्याची साले काढून आवडीप्रमाणे फोडी करून घ्या. फोडींना मीठ, हळद लावून ठेवा. अर्धी वाटी तेल तापत ठेवा. मेथी दाणे तळून घ्या. उरलेल्या तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून गार करायला ठेवा. लाल मोहोरी मिक्सरच्या भाड्यात बारीक करा. थोडे पाणी घालून मोहोरी छान फेसून घ्या. तयार फोडींमध्ये लाल तिखट, फेसलेली मोहोरी मिसळा. गार झालेली फोडणी मिसळा. एक लिंबू पिळा. सर्व मिश्रण चमच्याने ढवळा. दुसय्रा दिवशी लोणचे खाण्यास तयार होईल. लोणचे खाताना मात्र जरा जपून, मोहोरी नाकात झणझणते. हे लोणचे लगेच खायचे असेल तर पपई किसून घ्यावा. दह्यात कालवून खाल्यास सौम्य होते. काळी मोहोरी घातल्यास लोणचे कडू होते, म्हणून लाल मोहोरी...असे आईचे मत आहे. आपल्या जबाबदारीवर काळी मोहोरी वापरण्यास हरकत नाही! papai

वाचने 12499
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

पपईचे लोणचे!!! मी तर हात टेकलेत तुम्हा बायकांपुढे.. कशाचं काहीही बनवु शकता राव तुम्ही!

लोणचे छान दिसतेय. तू दिसेल त्या भाजीचे लोणचे करू शकतेस का? ;) मी यावर्षी दोन कैर्‍यांचे लोणचे पहिल्यांदा घातलेय तर धन्य वाटले आहे. तुला तसे काही वाटतच नसेल किंवा नेहमीच धन्य वाटत असेल.

In reply to by रेवती

मी हा धागा बघताना हाच विचार करत होते की लोणचं वगैरे मी अजुन एकदा ही बनवलं नाहीये. २ वेळा एकाच वर्षात लोणचं घालणारी तू सुद्धा माझ्या दृष्टीने सुपर वूमन च आहेस. अनन्या.. झकास.. एकदा तुझ्याकडे याय्लाच हवंय आणि काही तरी प्रेरणा घ्यायलाच हवीये

In reply to by स्रुजा

हीहीही, २ कैर्‍यांचं का होईना लोणचं घातलंस , आधी मी वाचलं वर्षातून दोनदा !! काय तो उत्साह म्हणलं ;)

वाह!! वाह! छान दिसतेय लोणचे :) फोटो पण मस्तं, कच्च्या पपईचा असा ही वापर करता येऊ शकेल हे तुझ्या पाकृमुळे समजले.

मला कच्च्या पपईची फरसाणसोबत येणारी चटणी कम कोशिंबीर फार आवडते.आता तुझे हे लोणचे नक्की करुन पाहीन.मस्त दिसतंय अगदी.

मस्त दिसत आहे.. करून पाहिन एकदा. स्वाती

सुरंगीताई, कोशिंबीर, दुधीसारखी भाजीही मस्त होते! माझा लेक कसलीही भाजी खातो,पिकलेला पपई मात्र नाही. मग त्याला भाजी देते.

मी सुद्धा या वर्षी कैरी आणि करवंदाचे लोणचे केले पण पपईचे लोणचे पहिल्यांदा समजले. एक शंका हे लोणचे किती दिवस टिकत

In reply to by स्नेहल महेश

हे तात्पुरते असते. असेच मोठ्या काकडीचे/तवशाचेही करतात. देईन दोन्हीची क्रुती!

In reply to by अनन्न्या

वाट बघतेय काकडीच्या लोणच्याची

मस्त पाकृ!

ईकडे कच्ची काकडी मीळतेच जमेल तसं करतो.

काकडीच्या लोणच्याची रेशिपी येऊ द्या आता लवकर!! आमच्या ओळखीच्या एक काकू मोहरी फेसून आवळ्याचं लोणचं करतात. असलं भारी लागतं!!

दिसतंय. मेथांबा टाईप कच्च्या पपईचे एका हाॅटेलात खाल्ले होते गोडसर चवीचे त्याची पाकृ माहिती आहे का?