Skip to main content

अराजक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 27/10/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
अराजक - डॉ. सुधीर रा. देवरे केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय? कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्‍त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्‍खं जग सोडून निघून गेले! खरंच हे जग आज इतके वाईट आहे का? पण साहित्यिकांच्या या कृतीने सरकारवर अजून तरी साधा ओरखडाही उमटलेला दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये आता साहित्यिक- विचारवंतांचा आदर राहिला नाही. आजच्या राजकारणात सुसंस्कृतपणा दिसून येत नाही. एम. एस. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर या तीन विचारवंतांचा खून. या हत्त्यांमागील लोक कोण हे शोधणे फार दूरचे काम असे आपण समजून चाललो तरी ज्या मारेकर्‍यांनी त्यांना रस्त्यात गाठून हत्त्या केली ते भाडोत्री मारेकरी सुध्दा हाती लागू नयेत हे आकलनापलिकडे आहे. एखादा संशयीत मारेकरी पोलिसांच्या हाती लागला तर तो कसा निष्पाप आहे हे न्यायाधिशांच्या आधी मंत्रीमहोदय सांगतात. कोणी काय खावे हे दुसरा कोणी कसा ठरवू शकतो? कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार? मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत? गुजरातमध्ये मुस्लीम युवकांना गरबा नृत्य परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली. देशभरात विविध संघटनांकडून असे अनेक छोटेमोठे स्थानिक फतवे निघताहेत. हा कोणत्या प्रकारचा जमातवाद आहे. यापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे हे देशाच्या दृष्टीने हानीकारक ठरणार आहे का? आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का? हा कोणत्या प्रकारचा विकास आहे? विकासाच्या आरोळ्या मारताना देशातल्या शंभरावर असलेल्या विविध नावांच्या संघटना सुप्तावस्तेत होत्या. सत्ता मिळताच त्या आपल्या खरे रूप दाखवायला लागल्या. रस्त्यांवर नंगानाच होऊ लागला. मत विभाजन होण्यासाठी एखादा नाटकी विरोधकही तसा खमक्या हवा म्हणजे आपला अजेंडा ठोसपणे राबवता येतो. आपल्या समूहावर विषारी टीका केली की आपल्यापासून थोडे दूर गेलेले लोक अजून आपल्या जवळ येतात या सिध्दांताने अगदी ठरवून एका राक्षसालाही जन्म देण्यात आला. तो जितके विषारी बोलेल तितका आपल्याला फायदा. इथे एक कळत नाही की एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तर त्या नेत्याच्या धर्माच्या लोकांचा अपमान कसा होऊ शकतो? इतके सारे होत असूनही सिंहासनावर आरूढ झालेली व्यक्‍ती काही बोलायला तयार नाही. तेव्हाचे मौनीबाबा परवडले. आता सोयीनुसार बोलले जाते आणि सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. प्रचारसभांमध्ये आणि इतर देशांच्या दौर्‍यांवर जे बोलू नये ते बोलले जाते. रेडीओवर मनातले सगळे सोयीस्कर सांगितले जाते. पण देशांतर्गत हिंसेवर तोंडावर बोट... गडीगुप्प. उत आलेले लोक याचा फायदा उठवत आपला कार्यभाग उरकवताहेत. महात्मा गांधींना संपवता येत नाही तर आता महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि होता आले तर दुसरे महात्मा व्हायला काय हरकत आहे. मंदिरे बांधता बांधता पोटातल्या पोट आपलेही एखादे मंदिर का बांधू नये आता? दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्‍छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्‍छता मात्र अजिबात करायची नाही! भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल ! चमकता येईल तिथे चमकायचे मग ते फेसबुक का असेना पण जग फिरताना आपल्याच देशाची निंदा करणे गरजेचे आहे का? काल एका चॅनलवर ऐकले: बिहार मध्ये मुस्लीम मते नितीश आघाडीकडे किती जातील आणि भाजपकडे किती. राजपूत आणि तेल्यांची मते कुठे जातील तेही सांगू... माझी जात ज्या कोणाला मते देईल त्यालाच मी माझे मत देईल का? एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का? अशा जातीयवादी सर्वे करणार्‍या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता! लोकशाहीचा तिसरा स्तंभ विकला गेला आहे का! सावधान! देशाच्या सवोच्च स्थानी असलेल्या नेत्यांची भाषा प्रचार सभांमध्ये पार रसातळाला गेली! आपला देश फक्‍त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय? तसे नसते तर आज प्रचार करताना जातीय धर्मिय समिकरणे जिथक्या उथळपणे वापरली जातात तशी ती वापरली गेली नसती. भारतात अशी अराजकता येणार असेल तर देशाच्या नुकसानासाठी दुसर्‍या शत्रू देशाला काहीच करायची गरज नाही. आपण आपल्याच कृत्यांनी देशाची एकता पोखरून काढू. अथवा शत्रू राष्ट्राला हे निमंत्रण आहे! असे म्हणावे लागेल. आपण खरंच अराजकतेकडे जात आहोत का, याचा सजगपणे विचार करण्याची वेळ आली आहे. (या मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) - डॉ. सुधीर रा. देवरे Email: sudhirdeore29@rediffmail.com इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: Dr sudhir Deore sudhirdeore29.blogspot.com

वाचने 16375
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

In reply to by ट्रेड मार्क

आणि समजा केली असेल नेमणूक, तर त्यात चुकीचं असं काय आहे? भाजपा हा एक अधिकृतरित्या नोंदवला गेलेला राजकीय पक्ष आहे. त्याच्यासाठी किंवा इतर कोणत्याही पक्षासाठी काम करणं आणि त्याचा उचित मोबदला घेणं यात चुकीचं काय आहे? भाजपविरोधक विरोधाने एवढेे आंधळ झालेले आहेत की त्यांना भाजपशी संबंधित असणारे कोणीही हे शत्रूच वाटताहेत.

ज्या सगळ्या घटनांबद्दल एवढा गोंधळ चालू आहे, असहिष्णू वातावरण आहे असं म्हणताहेत, सरकारविरोधात जालावर अथवा वर्तमान पत्रात लिहिण्याची, पुरस्कार परत करण्याची स्पर्धा चालू आहे त्याची सत्यासत्यता तरी बघू - दाभोलकरांची हत्या August 20, 2013 रोजी झाली. केंद्रात आणी राज्यात काँग्रेसचे सरकार होतं. पण या हत्येबद्दल जबाबदार भाजपा आणी मोदी सरकार? गोविंद पानसरे हत्या दिनांक February 20, 2015 कोल्हापूर मध्ये झाली. शिवाजी महाराजांवरील पुस्तक आणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे काम यामुळे कट्टर हिंदुत्ववादी गट जसे सनातन संस्था ई च्या टार्गेट वर होते. या एकाच प्रसंगी भाजपा सरकार केंद्र आणी राज्य दोन्ही कडे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांचे हत्यारे सापडले आहेत. कलबुर्गींची हत्या August 30, 2015 रोजी धारवाड,कर्नाटक मध्ये झाली. स्वतः जातीने लिंगायत असून त्यांनी बसव (बसवेश्वर?) या लिंगायत लोकांतील पूजनीय तत्ववेत्ता, लेखक/कवी यांच्याबद्दल अपमानास्पद विधाने केली होती. ज्यावरून लिंगायत लोकांनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर हिंदू लोकांच्या मूर्तीला पूजण्यावरून पण वादग्रस्त विधाने केली होती, ज्यावर त्यांच्या विरोधात एक केस चालू होती. ज्या व्यक्तीविरोधात त्याच्याच जातीतील लोकं होती आणी ज्या लोकांच (लिंगायत) कर्नाटक राज्य सरकार मध्ये बरंच वजन आहे आणी जिथे राज्य सरकार काँग्रेसचं आहे, त्या व्यक्तीची हत्या झाली तरी भाजप आणी मोदी जबाबदार? यांची हत्या करण्यातला मुख्य आरोपीचे शव सापडले असं म्हणत आहेत. परंतु त्याआधी ६ कन्नड साहित्यकांनी आरोपींच्या अटकेला मुद्दाम उशीर केला जातो आहे असा आरोप करून आपले पुरस्कार परत केले आहेत. चर्च वरील हल्ल्याचे सत्य प.बंगालमध्ये नन वर झालेल्या अत्याचारात बांगलादेशी इसमास पकडण्यात आलं होतं. फरीदाबादमधील दलित हत्याकांडावर फोरेन्सिक तज्ञांचे म्हणणे आहे की आग आतूनच लागली आहे (म्हणजे बाहेरून कोणी लावलेली नाही), बातमी इथे पहा. गुरु ग्रंथसाहिब फाडण्यात आला होता त्यातील मुख्य आरोपीला बाप्तिस्मा देण्यात आला होता. म्हणजे त्याने धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. बाकी गोमांस खाण्यावर, कपडे घालण्यावर याच धाग्यात किंवा इतर काही धाग्यात बरीच चर्चा झाली आहे. एका हिंदू सोडून दुसर्या धर्माच्या व्यक्तीवर काही वाईट प्रसंग ओढवला तर तो हिंदू दहशतवादाचा बळी, पण हिंदू लोक किती का संख्येने बॉम्बस्फोटात, सशस्त्र हल्ल्यात मेले, हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले तर मात्र त्यांच्या कर्माची फळं. कारण हिंदू सोडून इतर धर्मीय कधीच अतिरेकी, दहशतवादी असूच शकत नाहीत. कारण त्यांना प्रेषितानीच सांगितलय ना! धर्म खतरेमे है म्हणालं कि काही पण करायला परवानगी आहे. बाकी देशाचा कायदा काही पण असो… धर्मानी सांगितलं म्हणजे कसला कायदा आणि कसलं काय! सगळ्या अशांततेला, अराजकतेला, असहीष्णुततेला कारणीभूत फक्त हिंदूच? फक्त मे २०१४ नंतरच हे सगळं चालू झालं का? त्या आधी सगळं अगदी आलबेल होतं? प्रत्येक मुद्द्यावर किमान logic ने आणी पुराव्याने उत्तरं दिली जावीत अशी अशा अपेक्षा आहे.

In reply to by मितभाषी

मग तुमच्या सोसायटीतील काही लोक अथवा तुमचे काही मित्र, एकाच शहरात राहणारे नातेवाईक असे मिळून मार्केट यार्डातून घाऊक खरेदी करू शकता. आम्ही पुण्यात असताना धान्य आणि भाज्या घाऊक खरेदी करून मग वाटून घ्यायचो. फारसं अवघड नाही ते. माझा एक मित्र तर पुण्याजवळच्या गावांमध्ये जाउन एका शेतकऱ्याकडून वर्षभराचे तांदूळ घेवून यायचा. दूध सुद्धा एका भूगाव मधील गवळ्याकडून घ्यायचो, जो रोज सकाळी घरी आणून द्यायचा. थोडी शोधाशोध केली तर पर्याय सामोर येतात, आता एखाद्याला घरात बसून काही प्रयत्न न करता सगळं हवं असेल तर मग ज्या भावात मिळेल त्या भावात घ्यावं लागेल. सरकारनी कुठलं बोलबच्चन दिलं आणी त्यावर कसं काही झालं नाही ते सांगा. तसेच जे केलं ते अजून चांगल्या प्रकारे कसं करता आलं असतं ते ही जमल्यास सांगावं. बारामती ते दिल्ली कशी लिंक आहे त्याचा विदा द्यावा.

साठेबाजी कडे कोणी दुर्लक्ष केले तर फक्त मोदींनी, अंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला जबाबदार मोदी
मोदींचे नाव माझ्या प्रतिसादात तुम्हाला कुठे आढळले? केन्द्रात भाजप पक्षाचे सरकार आहे, मोदींचे नव्हे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला वर्तमान सरकार जबाबदार आहे असे मी म्हणलेले नाही. उलट साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही असे लिहीले आहे.
Openly सांगायचे की एप्रिल महिन्यात साखरेचे भाव रु. ३५ होतील कि बरोब्बर व्हायचं. तेव्हा पण तुम्हाला हा प्रश्न पडला होता का?
म्ह्णूनच त्यांना पाडले व ह्यांना खांद्यावर घेतले, हे तर आता कानात मुतायला लागले.
साठेबाजीला एक ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो याचा कोणी विचार केला आहे का? खूपच भाव वाढले आहेत तर नाही करायची खरेदी थोडे दिवस किंवा अगदी थोडी करायची, फारच आवश्यक असेल तर थोडे शहराबाहेर जाउन परस्पर शेतकऱ्याकडून खरेदी करता येतेय का बघावं.
भयानक सल्ला व एकप्रकारे साठेबाजीचे समर्थन. साखरेची साठेबाजी झाली तर शहराबाहेरच्या कोणत्या शेतकर्‍याकडे साखर मिळेल? मुंबईच्या ग्राहकाने तूरडाळीसाठी लातूरच्या शेतकर्‍याकडे जावे असे आपले म्ह्णणे आहे का? मुख्य म्हणजे व्यावहारीक आहे का? आणि शेतमालाची साठेबाजी ही शेतकर्‍याकडील माल संपल्यावरच होते.
निर्यात न करता ती साखर तशीच पडून ठेवायला पाहिजे होती का? मग शेतकऱ्यांचे उसाचे पैसे कसे दिले असते?
नीट वाचा. "अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाही, साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देऊ शकणार नाही", हा माझा प्रतिसाद. मी निर्यातीला विरोध केलेला नाही हे स्पष्ट दिसतेय. माझा विरोध बिहारच्या निवडणूका संपेपर्यंत सरकारनी साखरेला वाढीव निर्यात अनुदान न देण्याला आहे. दुसरे म्हणजे सध्याच्या निर्यात अनुदानात आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेमुळे आपल्या साखरेला उठाव नसताना फक्त साखरेचा निर्यात कोटा वाढवल्यामुळे जर आपल्याकडील बाजारात साखरेचे भाव अचानक ६-८ रू. वाढत असतील तर सरकार काय करत आहे? ह्या दरवाढीचा फायदा साखर कारखान्यांना होत असेल तर निर्यात कोटा वाढवण्याची गरजच नाही.
घोटाळे तर शेअर मार्केट पासून ते आपल्या स्थानिक मार्केट पर्यंत सगळीकडेच होत आहेत. उपाय सांगा काही असेल तर.
बरोबर आहे.. मागील सरकारच्या काळातही हे प्रकार होत होतेच. सध्याच्या सरकारकने तर ह्यावर आमच्याकडे जालिम इलाज आहे असा प्रचार केल्यामूळे जनतेने त्यावर विश्वास ठेवून त्यांना सत्तेवर आणले, आता लोकांकडून उपाय कशाला मागता?

In reply to by मार्मिक गोडसे

मी ज्या गोष्टीची साठेबाजी होते त्या स्वस्तात कश्या मिळतील यावर मार्ग शोधायचा प्रयत्न करतोय. नेहमीप्रमाणे तुम्ही फक्त दुसरा कसा चुकीचा आहे हे सांगताय. तुम्ही सुचवा कि सर्वसंमत मार्ग. साठेबाजी साखरेची होती का? साठेबाजी वरचा प्रतिसाद तुम्ही साखरेसाठी वापरलात. तसेच बाकी पण प्रतिसादातील काही ठराविक वाक्य घेवून आपल्या पाहिजे तसा अर्थ काढलात. मी कुठे साठेबाजीचे समर्थन केलंय? मुख्य प्रश्न विचारला त्याचं उत्तर मात्र टाळलंत. या व्यापार्यांकडून/ साठेबाजांकडून पैसा सरकारला कसा मिळतो ते सांगा. रच्याकने: ज्या प्रतिसादावर उत्तर देताय त्याच्या खाली तुमचा प्रतिसाद द्या हो. उगाच शोधाशोध करायला लागते.

पुरस्कार परत करणार्‍यांनी पुरस्काराची रक्कम राज्य सरकारच्या कोट्यामधुन मिलालेली घरं वगैरे परत केल्याचं ऐकिवात नाही. ते करुन दाखवलं तर खरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दादुस्ला काय रस्त्यावं आननार काय तुमी लोका आं ? घरा परत करा म्हने. घराबिराचा बोलाचा नाय !!!!!

In reply to by इरसाल

ज्याची आता किंमत नाय तेच वापस करणार घर वापसी कराची बोली नव्हती काय? घरा आम्ही पोरा बाळाम्साठी ठिवणार आणि फक्त पुरस्कार वापस करणार . हा पैश्याचं विचारू नको रे बाबा.
रच्याकाने माझ्या भागात एक पाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि एक गटार तुंबले आहे त्याला मी कुणाला जो जिम्मेदार धरू, नगरसेवक की आमदार की फडणवीस का थेट नरेंद्र मोदी का जागतीक आरोग्य संघटना का आणखी कुणी (इथल्या थोर विचारवंतानी प्रकाश विजेरी झोत टाकावा) आणी हो माझ्याकडे एकही पुरस्कार नाही परत द्यायला मग मी काय करावे.

In reply to by नाखु

रच्याकाने माझ्या भागात एक पाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि एक गटार तुंबले आहे त्याला मी कुणाला जो जिम्मेदार धरू, नगरसेवक की आमदार की फडणवीस का थेट नरेंद्र मोदी का जागतीक आरोग्य संघटना का आणखी कुणी
एवढा सोपा प्रश्न तुम्हाला पडूच कसा शकतो? अर्थातच मोदींना जबाबदार धरायला हवे.

In reply to by नाखु

सगल्यान पयल्यांदा तुमी सोताला एक घर-गुती पुर्स्कार देवुनशिनी टाका. (भले तो पुर्स्कार, पत्नीला भाजी चिराला मदत केली, कपडे सुकाला टाकाला मदत केली, दुद आणुनशिनी दिला, पोरा अब्यास नवती करत पोकल बांबुचे फटके दिले असा अस्ला तरी चालल, कं बोल्ता ?) मंग दुसरे छुट पयपलाइन आनी गटरीसाटी मोदीन्ला जिम्मेवार धरुनशिनी सोताला दिलेला पुर्स्कार परत द्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो ती घरं किमान दोन बीएचके आणि हिरानंदानी किंवा एम आय जी काॅलनी वगैरे ठिकाणी असतात (मुंबईत या दोन ठिकाणी १०% कोटावाल्यांची घरं आहेत.) ती कोण परत करेल? तो विनोद ऐकला असेल तुम्ही - एक मुलगा घरांवर दगड मारत असतो. एक बाई त्याच्या आईकडे तक्रार करते, तेव्हा आई म्हणते - जाऊ दे हो. तो थोडा वेडा आहे. तेव्हा ती बाई म्हणते - मग तो आपल्या स्वतःच्या घरावर का नाही मारत दगड? तेव्हा आई म्हणते - एवढा वेडा नाहीये तो! हे सगळे स्वयंघोषित निर्भीड विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते आताच जागे होणार. रच्याकने अमर्त्य सेनना भारतरत्न पण भाजपच्या सरकारनेच दिलं होतं. अजूनपर्यंत ते कसं नाही परत केलेलं?

In reply to by बोका-ए-आझम

भारतरत्न परत करणं हा गमतीचा विषय होउ शकत नाही. जेव्हा ते होइल तेव्हा अराजक आले असं म्हणायला खरंच हरकत नसेल.

समस्तजनहो, पॉलिटिकल alligence हा राष्ट्रनिर्मिती प्रथम डोळ्यासमोर अंगी बाणवायचा असतो, त्याला तोल लागतो मेंदूत, किती कठीण आहे हे विधान समजणे ? मला मोदींचे काही निर्णय आवडतात काही आवडत नाहीत, मोदी हे सद्धया बेस्ट अवेलेबल ऑप्शन आहे पण शेवटी एक ऑप्शनच आहे बाबांनो लोकशाही मधे ऑप्शन ला मेसायापद दिले की अधोगती होतेच हे आपण इंदिरा अन जवाहर उदाहरण समोर असताना ही शिकणार नाही आहोत का? मोदींचे समर्थन म्हणजे काय? हाताची पाचही बोटे लांब करावी का? ते नैसर्गिक असेल का? विचार करा , मोदींचे काही निर्णय काही वर्तन मला आवडते म्हणून मी भक्त होत नाही अन काही निर्णय न आवडल्या मुळे मी विरोधक ही होत नाही बघा काय मत पड़ते आहे अन या बारमधे आमच्या राष्ट्रिय एकात्मता उरलेली ती बहुतेक एकच जागा आजकाल उरली आहे अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ 'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।। पिऊन ही बौद्धिक तोल न जाऊ देणारा नाना

पुरस्कार परत करणाऱ्यांत सगळ्यात आचरट वल्ली गणेश देवी आहेत. या महाशयांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला, पण पद्म पुरस्कार परत केला नाही. ये हुई ना बात! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पुरस्कार परत करणाऱ्यांत सगळ्यात आचरट वल्ली गणेश देवी आहेत.
छ्या. असं कसं बोलता गामा पैलवान? गणेश देवी म्हणजे चालतेबोलते विद्यापीठच हे माहित नाही का तुम्हाला? फक्त कुठले विद्यापीठ हे विचारू नका-- जगात हावर्ड, प्रिन्स्टन विद्यापीठे आहेत तसेच ज्ञानेश्वर विद्यापीठही आहे :)

हे पुरस्कार पात्र वर्तमान पत्र वाचत नाहीत काय? आजची आणी तात्काळ बातमी चर्चेस तयार पण कदाचीत नवी कारण सांगून (मोदींनीच बे भेटले पाहिजे प्र्त्येक गोष्टीची माफी मागीतली पाहिजे अगदी गुडघे टेकले पाहिजेत यासम बाल बुद्द्धी मागण्या करतील.

या तथाकथित विचारवंतांचे विचार किती पूर्वग्रहदूषित आहेत हे खालील लेखात दिसते. http://www.loksatta.com/navvodattarinataka-news/article-about-satyashod… अतुल पेठ्यांनी लिहिलेल्या या लेखातील खालील परिच्छेद पहा.
या कानाचे त्या कानाला कळणार नाही अशी यंत्रणा असल्याशिवाय आणि ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे साटेलोटे असल्याखेरीज दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गीचा खून होऊ शकेल? या तिघांचा गुन्हा काय? तर ते मुख्यत्वे आताच्या काळात धर्मचिकित्सा करीत होते!!!
या तीनही खुनामागचा हेतू अजून स्पष्ट झालेला नाही. २ प्रकरणातील एकही आरोपी सापडलेला नाही तर एका प्रकरणातील संशयिताविरूद्ध फारसे सबळ पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. तरीसुद्धा या तिघांचा खून त्यांनी केलेल्या धर्मचिकित्सेमुळे झाला हा निष्कर्ष पेठ्यांनी काढलेला आहे.
धर्मचिकित्सा करणाऱ्या सर्वच माणसांना त्यांच्या काळात त्रास सहन करावा लागला. पण आताच्या काळात? थेट गोळ्याच!!! अशा कृत्यांनी आजच्या काळातील खुन्यांना अपेक्षित असलेला धर्म वाढेल? चिकित्सेचा, अभ्यासाचा आणि विचारांचा अवकाश संकुचित करणारी ही माणसे धर्म वाढवतात की बुडवतात? खऱ्या धर्माची मूल्ये कोणती? सहिष्णुता, अहिंसा, करुणा, सहभाव, बंधुत्व, क्षमाशीलता आणि मानवता यांची जोपासना करणे म्हणजेच धर्म ना? आज जे स्वत:ला धर्माचे प्रवक्ते मानतात, ते यातील नेमके कुठले तत्त्व आचरणात आणतात? म्हणजे खरे धर्मप्रेमी कोण आणि खरे धर्मद्रोही कोण? दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी की खुनी?
इथेही तेच. त्या तिघांच्या खुन्यांनी त्यांना त्यांच्या धर्मचिकित्सेमुळेच मारले हे पेठ्यांचे ठाम मत आहे. जरी खुनी सापडले नसले, जरी खुनामागचे हेतू अजूनही स्पष्ट झाले नसले तरी पेठे आपल्या निष्कर्षावर ठाम आहेत.
जोतिबांबाबत महाराष्ट्रात घोषित आणि अघोषित ‘सेन्सॉरशिप’ कायम होती आणि आजही आहे. पण जोतिबा ठामपणे अभेद्य राहिले आहेत.
कसली घोषित आणि अघोषित सेन्सॉरशिप? जोतिबा फुल्यांचा गेली अनेक वर्षे सर्वत्र उदोउदो होत आहे, त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पीएचडी केली आहे. त्यांच्या नावाचे विद्यापीठात अद्यासन आहे. त्यांच्या घराचे स्मारक झाले आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. सावित्रीबाई फुलेंचे नाव विद्यापीठाला दिले आहे. त्यांचे समग्र साहित्य सरकारने प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्यावर लिहिलेल्या नाटकाचे प्रयोग व्यवस्थित सुरू आहेत. मग कोठे आहे सेन्सॉरशिप? उगाच विनाकारण नसलेला बागुलबुवा निर्माण करणे हे असल्या विचारवंतांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आतासुद्धा देशात आणिबाणीसदृश स्थिती आहे, विचारवंतांचा गळा आवळला आहे, मोदींवर टीका केलेली सहन होत नाही असे अनेक बिनबुडाचे आरोप सुरू आहेत.
अजून एक-पुण्यात फुलेवाडय़ाच्या शंभराव्या मराठी प्रयोगाला डॉ. भालचंद्र नेमाडे आले होते. त्यांनी या नाटकाचे कौतुक केले. (नुकतेच त्यांनाही धमकीचे पत्र आले आहे. गुन्हा काय? तर लोकांना विचार करायला भाग पाडणे!!!)
हे वाचून तर हसायला आहे. नेमाडे म्हणे लोकांना विचार करायला भाग पाडतात! आपल्याबद्दल हे असे वाचले तर नेमाडे सुद्धा खदाखदा हसतील. आव्हाड सुद्धा म्हणतो मला धमकीची पत्रे येतात. नेमाड्यांना कोण धमकीचे पत्र पाठविणार? त्याविरूद्ध त्यांनी पोलिसात तक्रार केली होती का?
दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या विचारवंत समाजसेवकांचा निर्घृण खून झाला आहे. आपण वृत्तपत्रांत वाचतो की, या खुन्यांनी अशीच मोठी यादी केली आहे. याला खून म्हणण्यापेक्षा कत्तली म्हणावे का? चिकित्सक विचार करायला लावणाऱ्या आणि विचार करू पाहणाऱ्यांच्या ‘धर्माचे शुद्धीकरण’ या नावाखाली आता कत्तलीच होणार आहेत?
परत तेच आणि परत तेच तेच! खुन्यांनी अशी यादी केली असेल तर खुनी सापडले असे समजायचे का? अजून खुनी कोण हेच सापडलेले नाही, खुनाच्या हेतूबद्दल माहिती नाही, पकडलेल्या संशयिताविरूद्ध सबळ पुरावे नाहीत. परंतु कोण खुनी आहेत आणि खून का झाले याविषयी अतुल पेठ्यांची कोणत्याही पुराव्याविना ठाम मते आहेत. हा पूर्वग्रहदूषित विचार आहे.

आपल्या सर्वांचे मनापासून अाभार. छान चर्चा झाली.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

असं इथे म्हणावं का? धागाकर्ते नुसता धागा टाकून साठमारी बघत (वाचत?) बसले. आणि सगळ्यात शेवटी नुसतं छान चर्चा झाली म्हणून समारोप? कुठल्याच मुद्द्यावर प्रतिवाद नाही किंवा त्यांचा मुद्दा पटवून दिला नाही. याचा निषेध म्हणून मी पण माझा पुरस्कार परत करणार (न मिळालेला कसा परत करावा बरं??) आहे. ह. घेणे…

बिचारे माधवन नायर (पूर्वीचे इस्रो मुख्य) यांनी पुरस्कार परत देणाऱ्यांवर टीका केली. http://www.hindustantimes.com/india/return-of-awards-just-a-show-ex-isr… पण सध्या फक्त पुरस्कार परत करणाऱ्यांना महत्व आहे बहुतेक.

एक कुत्ता हमारे भाईसाहब की काफी खिदमत करता था, रोज़ सुबह वह घर आ जाता और भाईसाहब के तलवे चाटने लगता था, भाई साहब भी खुश हो कर उसे टुकड़े डाल देते थे, ये सिलसिला काफी दिनों तक चलता रहा, दोनों खुश थे, भाई साहब तलवे चटवा कर और कुत्ता टुकड़े पा कर, एक दिन भाई साहब ने अपने टूटे बैग से पट्टी काट कर कुत्ते को पहना दी, मैंने कहा अरे भाईसाहब ये क्या कर रहे हैं आवारा कुत्ता है, भाई साहब बोले देखो ये पट्टी अपने किसी मतलब की नहीं है और इसके गले में बाँध दी तो अब ये इसका पट्टा हो गया, बेशक इसकी कीमत हमारे लिए कुछ् भी नहीं बस एक नायलॉन का टुकड़ा है पर इस कुत्ते के लिए इसकी बहुत कीमत है, ये इस पट्टे को ले जा कर पूरी दुनिया को दिखायेगा और इतरायेगा कि आज से में आवारा नहीं रहा, और आ-जीवन मेरा वफादार भी बना रहेगा । भाईसाहब का ट्रान्सफर हो गया वो चले गए, कुत्ता बदस्तूर रोज़ सुबह आता रहा, मुझे तलवे चटवाना पसंद नहीं है सो मैं उसे अपने पैर नहीं चाटने देता, भाईसाहब के जाने के बाद उसे टुकड़े मिलने भी बंद हो गए । आज अचानक कुत्ता आया और अपना पट्टा वापस कर गया । नोट : इस कहानी को अवार्ड वापसी ं से जोड़ कर देखना घोर पाप की श्रेणी में आएगा ।

७-८ नोव्हेंबर नंतर देशांतर्गत परिस्थिती लगेच सुधारलेली दिसतेय. एकही पुरस्कार परत नाही झाला किंवा देश असहिष्णू झाला म्हणून कोणी आरडाओरडा नाही केला. चला २ दिवसात एकदम परिस्थिती बदलली याचं श्रेय कोणाला बरं द्यायचं? राहुल, केजरीवाल, नितीश, लालू का मेडिया?

In reply to by ट्रेड मार्क

+१ (१) बिहार निवडणुकीचा प्रचार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला आणि लगेच ३० सप्टेंबरला दादरी प्रकरण घडले. (२) ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशात असहिष्णूतेचे वातावरण असल्याचा तथाकथित पुरोगाम्यांना साक्षात्कार झाला व पुरस्कार परत करण्याची मोहीम सुरू झाली. (३) १२ ऑक्टोबरपासून बिहारमध्ये मतदान सुरू झाले. (४) एकदम सर्वांनी पुरस्कार परत करण्याऐवजी रोज ३-४ जणांनी पुरस्कार परत करणे हा प्रकार ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिला. (५) सूझन अरूंधती रॉयने ५ नोव्हेंबरला पुरस्कार परत केला. त्यानंतर ही मोहीम थांबली. (६) ५ नोव्हेंबर हा बिहारमधील मतदानाचा शेवटचा दिवस होता. (७) ६ नोव्हेंबरपासून पुरस्कार परत करणे बंद झाले आहे कारण देशात ६ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा सहिष्णुतेचे वातावरण सुरू झाले आहे. वरील घटनाक्रम हा निव्वळ योगायोग आहे. त्यामागे कोणतेही राजकारण नाही अशी माझी श्रद्धा आहे.

In reply to by ट्रेड मार्क

आता जंगल राज २ ची सुरुवात होणार असल्याने असहिष्णुता -असहिष्णुता असा गवगवा करण्याची आवश्यकता उरली नाही.