रस्ते, नियम आणि पोलिस
कोपर खैरणे नवी मुंबई ते ठाणे घोडबंदर हा माझा रोजचा ऑफिस ला जाण्या येण्याचा रस्ता. तसा मी नेहमीच वाहतुकीचे सर्व नियम पाळत ठाणे बेलापूर रस्त्यावर माझी दुचाकी चालवत असतो.
त्या दिवशी ऑफिस मधून घरी येताना समोर सिग्नलवर आकडे पाहिले ९,८,७,६, आणि हिरवा दिवा लाल व्हायच्या आत तो पिवळा असतानाच मी सिग्नल पार केला,
सिग्नलच्या पुढे साधारण १०० फूट अंतरावर एक वाहतूक पोलिस उभा होता, आणि मी माझी गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूने दामटत होतो, आणि काही कळायच्या आताच तो पोलिस हवालदार मक्याच्या शेतात बुजगावणे उभे करतात त्या पोज मध्ये माझ्या गाडीसमोर प्रकट झाला आणि मी करकचून ब्रेक हाणला....
सुरवातीचे ४-५ सेकंद काहीच कळेना हृदयाची धडधड वाढलेली, आणि हा पोलिस हाताचा कोपरा चोळत माझ्याकडे पाहत होता, माझ्या गाडीचा आरसा कदाचित त्याच्या हाताला लागला होता.
" लायसेन्स दाखवा " तो बोलला, आणि मी भानावर आलो. गाडीवर बसूनच मग त्याचा उद्धार सुरु केला. ज्याप्रकारे त्याने माझी गाडी अडवली ते पाहून मी थक्कच झालो.
गाडी तिथेच रस्त्यात लावून सुरु झाले भांडण.
पोलिस- तू सिग्नल तोड्लास आणि वरून दादागिरी करतोस?
मी- तुम्ही सिग्नल च्या उलट्या बाजूला उभे आहात तुम्हाला सिग्नल दिसत नसताना तुम्ही कशाच्या आधारावर सांगता कि मी सिग्नल तोडला? मी सिग्नल तर तोडला नाहीच आणि तुमची हि कुठली पद्धत आहे गाडी अडवण्याची? अतिरेकी वाटलो का काय तुम्हाला, का पाकिस्तान ची सीमा पार करत होतो जे एवेढे जीवावर उदार होऊन गाडी अडवता तुम्ही?
धडकलो असतो आणि मला काही लागले असते तर तुम्ही जबाबदारी घेतली असती का? आणि तुम्हाला कुठे लागले असते तर तुम्ही मला सोडले असते का? एखादी ४ चाकी किंवा ट्रक च्या समोर तुम्ही अशी हिम्मत करू शकता का?
तो मात्र तुम्ही १०० रुपयाची पावती फाडा सिग्नल तोडला म्हणून चा जयघोष करत होता. शेवटी भांडण वाढले, आणि इतर २ पोलिस आणि बरेच लोक जे आधी प्रेक्षकाच्या भूमिकेत होते ते, ते भांडण सोडवण्यासाठी पंचांच्या भूमिकेत शिरले.
मग मी सुद्धा हट्टाला पेटलो, म्हटले चला तुम्हाला दंडाची रक्कम मी पोलिस ठाण्यात देतो. हे ऐकून दुसरे पोलिस मला तिथून जाण्यास खुणावू लागले, मी माझी गाडी उलट्या दिशेला फिरवून त्या पोलिसाला मागे बसण्यास सांगितले, तर त्याने नकार दिला आन तो त्याच्या गाडीवर बसून यायला तयार झाला.
ऐरोली पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर एका अधिकार्याच्या पुढ्यात जावून बसलो. आणि त्या अधिकार्याने चौकशी चालू केली. झालेली संपूर्ण गोष्ट मी त्यांना सांगितली. ते शांतपणे ऐकून घेत होते.
आणि इकडे हवालदाराचा आवाज कमालीचा वाढला, साहेब याची नंबर प्लेट सुद्धा मराठीत आहे, आणि मी कसा गुन्हेगार आहे हे तो त्या साहेबाला पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होता.
शेवटी अतिशय थंड डोक्याने मी त्या हवालदाराकडे पाहून म्हटले, " साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी १०० रुपये देऊन कधीच तिथून निघून गेलो असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला नाही, तर मी तुम्हाला इथे घेऊन आलोय.राहिली गोष्ट नंबर प्लेट ची तर त्यासाठी मी दंड भरायला तयार आहे, पण नंबर प्लेट बदलणार नाही, शिवसैनिक आहे मी, उगाच आवाज चढवू नका, अशी दबंगागिरी तुम्ही कुठल्या ४ चाकी पुढे दाखवू नका,तुम्ही पोलिस आहात म्हणून आम्हाला फारच सहानुभूती आहे आपल्याबद्दल, काळजी वाटते आपली.
नंतर तो हवालदार शांत झाला.
साहेबांनी मग स्पष्टीकरण दिले- दिवसभर फारच ताणावात काम करतो आम्ही, फारच त्रासलेले असतात हो हे वाहतूक कर्मचारी , तेव्हा तुम्हीच जर दुर्लक्ष करा आणि जाऊद्या.
प्रकरण मिटले
त्यानंतर ४-५ दिवस नेमका त्याच स्पॉट ला आलो कि मी माझी दुचाकी त्या पोलिसासमोर उभी करून त्याला एक मंद स्मित करून विचारायचो- साहेब जाऊ का पुढे, तुम्ही अचानक समोर आलात गाडीच्या कि भीती वाटते.परवानगी द्या न पुढे जायची. तोही हसला काहीच बोलला नाही.
४-५ दिवस हेच चालू होते, एके दिवशी त्याचा सहकारी पोलिस विचारू लागला " रोज तुम्ही असे का विचारता?"
त्याला काहीच उत्तर न देता आम्ही दोघेही हसलो. आणि तो मात्र आमच्याकडे निरागसपणे पाहत होता.
नंतर मात्र तो मला दिसला नाही, एके दिवशी तिथे उभ्या असलेल्या दुसर्या हवालदाराला विचारले असता तो म्हणाला आमची ड्यूटी fix नसते, ते दुसर्या सिग्नल ला गेले.
ऑफिस सुटल्यावर गाड्यांच्या गोंगाटात थकून भागून येताना विनाकारण रोज एकच प्रश्न विचारून उगाच दोघनी हसण्याचे एक निमित्त आजपासून नसणार याच विचारात मी पुढचा सिग्नल कधी तोडला कळलेच नाही.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
17456
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
शीव सैनिकंची अपत्य कुठल्या
पण नंबर प्लेट बदलणार नाही,
पण नंबर प्लेट बदलणार नाही, शिवसैनिक आहे मी,हे नंबर प्लेट बदलण्याचे हे कारण खरंच नाही पटले, मराठीचा अभिमान नक्कीच असावा पण जे शिवसैनिक नाहीत त्यांना मराठीचा अभिमान नाही असे आहे का? दिवाकर कुलकर्णी यांच्या प्रतिसादातलं पहीलं वाक्य एकदम रास्त वाटतं.दक्ष नागरिक