Skip to main content

रस्ते, नियम आणि पोलिस

रस्ते, नियम आणि पोलिस

Published on गुरुवार, 16/07/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
रस्ते, नियम आणि पोलिस कोपर खैरणे नवी मुंबई ते ठाणे घोडबंदर हा माझा रोजचा ऑफिस ला जाण्या येण्याचा रस्ता. तसा मी नेहमीच वाहतुकीचे सर्व नियम पाळत ठाणे बेलापूर रस्त्यावर माझी दुचाकी चालवत असतो. त्या दिवशी ऑफिस मधून घरी येताना समोर सिग्नलवर आकडे पाहिले ९,८,७,६, आणि हिरवा दिवा लाल व्हायच्या आत तो पिवळा असतानाच मी सिग्नल पार केला, सिग्नलच्या पुढे साधारण १०० फूट अंतरावर एक वाहतूक पोलिस उभा होता, आणि मी माझी गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूने दामटत होतो, आणि काही कळायच्या आताच तो पोलिस हवालदार मक्याच्या शेतात बुजगावणे उभे करतात त्या पोज मध्ये माझ्या गाडीसमोर प्रकट झाला आणि मी करकचून ब्रेक हाणला.... सुरवातीचे ४-५ सेकंद काहीच कळेना हृदयाची धडधड वाढलेली, आणि हा पोलिस हाताचा कोपरा चोळत माझ्याकडे पाहत होता, माझ्या गाडीचा आरसा कदाचित त्याच्या हाताला लागला होता. " लायसेन्स दाखवा " तो बोलला, आणि मी भानावर आलो. गाडीवर बसूनच मग त्याचा उद्धार सुरु केला. ज्याप्रकारे त्याने माझी गाडी अडवली ते पाहून मी थक्कच झालो. गाडी तिथेच रस्त्यात लावून सुरु झाले भांडण. पोलिस- तू सिग्नल तोड्लास आणि वरून दादागिरी करतोस? मी- तुम्ही सिग्नल च्या उलट्या बाजूला उभे आहात तुम्हाला सिग्नल दिसत नसताना तुम्ही कशाच्या आधारावर सांगता कि मी सिग्नल तोडला? मी सिग्नल तर तोडला नाहीच आणि तुमची हि कुठली पद्धत आहे गाडी अडवण्याची? अतिरेकी वाटलो का काय तुम्हाला, का पाकिस्तान ची सीमा पार करत होतो जे एवेढे जीवावर उदार होऊन गाडी अडवता तुम्ही? धडकलो असतो आणि मला काही लागले असते तर तुम्ही जबाबदारी घेतली असती का? आणि तुम्हाला कुठे लागले असते तर तुम्ही मला सोडले असते का? एखादी ४ चाकी किंवा ट्रक च्या समोर तुम्ही अशी हिम्मत करू शकता का? तो मात्र तुम्ही १०० रुपयाची पावती फाडा सिग्नल तोडला म्हणून चा जयघोष करत होता. शेवटी भांडण वाढले, आणि इतर २ पोलिस आणि बरेच लोक जे आधी प्रेक्षकाच्या भूमिकेत होते ते, ते भांडण सोडवण्यासाठी पंचांच्या भूमिकेत शिरले. मग मी सुद्धा हट्टाला पेटलो, म्हटले चला तुम्हाला दंडाची रक्कम मी पोलिस ठाण्यात देतो. हे ऐकून दुसरे पोलिस मला तिथून जाण्यास खुणावू लागले, मी माझी गाडी उलट्या दिशेला फिरवून त्या पोलिसाला मागे बसण्यास सांगितले, तर त्याने नकार दिला आन तो त्याच्या गाडीवर बसून यायला तयार झाला. ऐरोली पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर एका अधिकार्याच्या पुढ्यात जावून बसलो. आणि त्या अधिकार्याने चौकशी चालू केली. झालेली संपूर्ण गोष्ट मी त्यांना सांगितली. ते शांतपणे ऐकून घेत होते. आणि इकडे हवालदाराचा आवाज कमालीचा वाढला, साहेब याची नंबर प्लेट सुद्धा मराठीत आहे, आणि मी कसा गुन्हेगार आहे हे तो त्या साहेबाला पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होता. शेवटी अतिशय थंड डोक्याने मी त्या हवालदाराकडे पाहून म्हटले, " साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी १०० रुपये देऊन कधीच तिथून निघून गेलो असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला नाही, तर मी तुम्हाला इथे घेऊन आलोय.राहिली गोष्ट नंबर प्लेट ची तर त्यासाठी मी दंड भरायला तयार आहे, पण नंबर प्लेट बदलणार नाही, शिवसैनिक आहे मी, उगाच आवाज चढवू नका, अशी दबंगागिरी तुम्ही कुठल्या ४ चाकी पुढे दाखवू नका,तुम्ही पोलिस आहात म्हणून आम्हाला फारच सहानुभूती आहे आपल्याबद्दल, काळजी वाटते आपली. नंतर तो हवालदार शांत झाला. साहेबांनी मग स्पष्टीकरण दिले- दिवसभर फारच ताणावात काम करतो आम्ही, फारच त्रासलेले असतात हो हे वाहतूक कर्मचारी , तेव्हा तुम्हीच जर दुर्लक्ष करा आणि जाऊद्या. प्रकरण मिटले त्यानंतर ४-५ दिवस नेमका त्याच स्पॉट ला आलो कि मी माझी दुचाकी त्या पोलिसासमोर उभी करून त्याला एक मंद स्मित करून विचारायचो- साहेब जाऊ का पुढे, तुम्ही अचानक समोर आलात गाडीच्या कि भीती वाटते.परवानगी द्या न पुढे जायची. तोही हसला काहीच बोलला नाही. ४-५ दिवस हेच चालू होते, एके दिवशी त्याचा सहकारी पोलिस विचारू लागला " रोज तुम्ही असे का विचारता?" त्याला काहीच उत्तर न देता आम्ही दोघेही हसलो. आणि तो मात्र आमच्याकडे निरागसपणे पाहत होता. नंतर मात्र तो मला दिसला नाही, एके दिवशी तिथे उभ्या असलेल्या दुसर्या हवालदाराला विचारले असता तो म्हणाला आमची ड्यूटी fix नसते, ते दुसर्या सिग्नल ला गेले. ऑफिस सुटल्यावर गाड्यांच्या गोंगाटात थकून भागून येताना विनाकारण रोज एकच प्रश्न विचारून उगाच दोघनी हसण्याचे एक निमित्त आजपासून नसणार याच विचारात मी पुढचा सिग्नल कधी तोडला कळलेच नाही.

याद्या 17436
प्रतिक्रिया 73

आवडले. तुमचा धीट्पणा आणि समंजसपणा पण

काही कळायच्या आताच तो पोलिस हवालदार मक्याच्या शेतात बुजगावणे उभे करतात त्या पोज मध्ये माझ्या गाडीसमोर प्रकट झाला
अल्टिमेट ! लोल !!

पण...चूक तुमची होती.

पण नंबर प्लेट बदलणार नाही, शिवसैनिक आहे मी, उगाच आवाज चढवू नका
चूक तुमची आहे. १. पिवळा दिवा दिसला की गाडी थांबवायची असते. २. नंबर प्लेट इंग्लिश मध्येच हवी. आणि उगीच Maharashtra वगैरे लिहायची नसते. तो नंबर आहे. MH XX XX XXXX अशीच लिहायची असते. योग्य फाँट आणि साईझ मध्ये.

राहिली गोष्ट नंबर प्लेट ची तर त्यासाठी मी दंड भरायला तयार आहे, पण नंबर प्लेट बदलणार नाही, शिवसैनिक आहे मी, उगाच आवाज चढवू नका,
याबद्दल, आणि
याच विचारात मी पुढचा सिग्नल कधी तोडला कळलेच नाही.
याबद्दल काय ? नियम पाळणे याच्या भ्रामक कल्पना आपल्याला आत्मरंजनास उपयोगी पडत असतील पण इथे नमूद केलेल्या दोन्ही गोष्टींवरुन तरी तुम्ही "तसा मी नेहमीच वाहतुकीचे सर्व नियम पाळत ठाणे बेलापूर रस्त्यावर माझी दुचाकी चालवत असतो." असा दावा करु नये..
राहिली गोष्ट नंबर प्लेट ची तर त्यासाठी मी दंड भरायला तयार आहे, पण नंबर प्लेट बदलणार नाही, शिवसैनिक आहे मी, उगाच आवाज चढवू नका,
मध्यंतरी एक मेसेज फिरत होता की शिवरायांचा फोटो लावला होता नंबर प्लेट वर आणि "राजांसाठी कायपण" म्हणत हजाराची नोट फेकली पोलिसावर वगैरे वगैरे. अहो नियम आपल्यासाठी असतात ना. जर मराठीत हवी नंबर प्लेट तर शिवसेनेने करावी कोर्ट केस, आंदोलने. आत्ता जे आहे ते आहे. शिवसैनिक आहात म्हणून नियम पाळण्यास टाळाटाळ आणि वरुन आवाज चढवू नका वगैरे डोक्यात जाणार्‍या गोष्टी आहेत.

In reply to by अस्वस्थामा

मध्यंतरी एक मेसेज फिरत होता की शिवरायांचा फोटो लावला होता नंबर प्लेट वर आणि "राजांसाठी कायपण" म्हणत हजाराची नोट फेकली पोलिसावर वगैरे वगैरे.
त्या मेसेजचा पुढचा भाग तितकासा फेमस नसावा बहुधा. त्यात असे होते की ती नोट फेकणार्‍याच्या स्वप्नात महाराज येतात, हातात एक प्याकेज असते. त्याला लै आणंद होतो. त्याला वाटते महाराज खूष होतील, शाबासकी देतील. तो मुजरा करून ते प्याकेज हातात घेतो, उघडून पाहतो तर त्यात इंग्लिशमध्ये लिहिलेली नंबरप्लेट असते. तो गोंधळून बघतो तर महाराज त्याला चार शिव्या घालून म्हणतात, "माझेच नाव घेणारे लोक नियम मोडू लागले तर त्याला कै अर्थ आहे का?" इ.इ.

In reply to by बॅटमॅन

पु ल आठवले, असामी असामी मधला डायलॉग आपल्या लोकांच्या .... वर हंटर हवा हंटर. एक जात सगळे नियम तोडणार. पोलीस किती ठिकाणी पुरेसे पडणार. पुन्हा ते आपल्याच समाजातुन येतात. जे आपण करतो तेच ते पण करणार. ते पण सोकावणार. मग बसा बोंबलत.

अभिनंदन . त्याला आपली चूक दाखवून दिल्या बद्दल. रेगुलर पोलिस हा वाहतूक पोलिसाचे काम करू शकतो ? officially ? सफेद कपड्यातील RTO पोलिस आंणी खाकी कपड्यातील पोलिस . फरक नाही ? खरेच माहित नाही. बाकी इथे दुसर्याला अक्कल शिकवणारे लोक बरेच असतात. Holier than thou attitude . स्वत काय करतात ?

In reply to by अभिजित - १

अभिनंदन . त्याला आपली चूक दाखवून दिल्या बद्दल.
काय चूक केली त्यानं?
रेगुलर पोलिस हा वाहतूक पोलिसाचे काम करू शकतो ? officially ?
हो. नवीन नियमांनुसार. बाकी माझ्या मते हे काम ते जेव्हा त्यांचे वरिष्ठ त्यांना आदेश देतील तेव्हाच करू शकतात.
बाकी इथे दुसर्याला अक्कल शिकवणारे लोक बरेच असतात. Holier than thou attitude . स्वत काय करतात ?
गेट वेल सून अभिजित - १.

magachyach आठवड्यात mazahi एका ट्रैफिक पुलिस बरोबर प्रेमळ सवांद zhala. एक चार्चाकी वाला brt लेन मधून आला आणि त्याला सरळ जायचे होते तरी राईट लेन मधून पुढे येत होता आणि मी आमचा राईट चा सिग्नल होता म्हणून वळत होते टा तर तो charchaki वाला साइड ने येवून धड़कला मला. ट्राफ्फिक पुलिस ला मला सांगावे लागले की brt लेन मधून २ आणि चर्चकी अललौड़ नाही तरी तुमच्या समोर हे लोक्स् कसे काय येतात आणि तुम्ही कशा साठी इथे उभे आहात आणि अजुन बरच काही बोलले.

मस्त कीस्सा !! काळजी घ्या स्वतःची. या रोडवर आजकाल खूप ट्रॅफीक वाढले आहे. तुमची दुचाकी चांगला मायलेज देणारी असेल आणि तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही घोडबंदरवरुन येताना नाशीकरोडला डावीकडे वळा, टोलनाक्यावरुन उजवीकडे वळून मुंब्रा,शीळफाटामार्गे कोपर खैराणे गाठा. (थोडा लांबचा पल्ल आहे पण रहदारी कमी आहे)

In reply to by भुमन्यु

मी रोज याच रस्त्याने येतो जातो, ट्रक असतात पण वाहतुक कुठेही थांबलेली नसते. बेलापूर रोड्पेक्षा रहदारी कमी असते. शीळ्फाटा ते कोपरखैराणे रस्ता खूपच रुंद आहे. मी या रस्त्याने दुचाकी आणि चारचाकीने जाउन पाहीले आहे. तुलना केल्यास या मार्गाने कमी वेळ लागला. रस्त्याचे काम कुठेही चालू नाही. एक दोन ठीकाणी पावसामुळे मोठे खड्डे आहेत एवढेच.. वाहतुक नियम पाळून कुठेही गाडी चालवल्यास प्रवास सुखकरच होतो.

तुमची चूक असताना उगाच पोलिस स्टेशनम्ध्ये जाऊन शिवसेनेचे नाव वगैरे सांगणे आणि दवाब आणायचा प्रयत्न करणे वगैरे काहीच पटले नाही. त्यापेक्षा तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा.

In reply to by यशोधरा

इथे वाहतुकीचे कोणतेही नियम तोडले गेलेले नाहिये (एक ती मराठी पाटी सोडली तर...पण जर गाडी महाराष्ट्रातच फिरणार असेल तर मराठी पाटी का नको?)

In reply to by टवाळ कार्टा

कर्नाटकात फिरत असताना समजा तुमच्या गाडीला एखाद्या अशा गाडीची धडक बसली ज्याचा बोर्ड कन्नड आहे आणि त्यानंतर तो गाडीवाला पळून गेला. तुम्हाला पाटी वाचता आली असती पण ती कन्नड मध्ये होती. चालेल?

आणि काही कळायच्या आताच तो पोलिस हवालदार मक्याच्या शेतात बुजगावणे उभे करतात त्या पोज मध्ये माझ्या गाडीसमोर प्रकट झाला
मग नक्की कसे अडवणे अपेक्षित आहे.. बाकिचे वर्णन पाहाता नुसती शिट्टी वाजवून तुम्ही नक्की थांबला नसतात याची खात्री वाटते.. बाकी १०० फुटाच्या आत तुम्हाला करकचून ब्रेक मारुन धोकादायकरीत्या थांबावे लागते.. उजव्या बाजूने गाडी दामटणे वगैरे पाहाता तुम्हालाच गाडी इतरांना धोकादायक न ठरता चालवण्याचे धडे देणे गरजेचे वाटत आहे. पोलिस जरी तुमच्या सिग्नलच्या नंतर उभा असला तरी इतर सिग्नल पाहून तुमचा सिग्नल हिरवा नव्हता हे त्याच्या जागेवरून दिसत असू शकते. बाकी शिवसेना वगैरे गुर्मी एखाद्या सच्च्या पोलिसाने भविष्यात नक्की उतरवावी असे मनोमन वाटते..

In reply to by बाळ सप्रे

अगदी अगदी, धागाकर्त्याचे इथे कित्येक अपराध सरळ सरळ दिसत आहेत तरी पोलिसावर चिडण्याची मनोवृत्ती म्हणजे बस.. लाजवाब! गुन्हा क्रमांक १: सिग्नल पिवळा असतांना गाडी रस्ता क्रॉस करणे, गुन्हा क्रमांक २: सिग्नल च्या ठिकाणी गाडी हळू करत थांबणे अपेक्षित असतांना सुसाट क्रॉस करणे गुन्हा क्रमांक ३: हिरव्या सिग्नलचा वेळ ५ सेकंद राहिला असता भरधाव गाडी चालवणे गुन्हा क्रमांक ४: पोलिसाने थांबवल्यावर हुज्जत घालणे. गुन्हा क्रमांक ५: आरटीओ नियमानुसार नंबरप्लेट नसणे. गुन्हा क्रमांक ६: नंबरप्लेट चुकीची असूनही पक्षाचा माज दाखवत आणि दंडाच्या रकमेची भीक घालण्याची गुर्मी दाखवत नियम सतत मोडतच राहिन असा आविर्भाव असणे. गुन्हा क्रमांक ७: प्रामाणिकपणे काम करत असलेल्या पोलिसास मानहानीकारक रितीने वागवणे. आणि पोलिसाचा गुन्हा एकचः धागाकर्त्यास कानफटात न लगावणे. धागाकर्त्यास राग आला असल्यास फक्त एकदा खालील सीन डोळ्यापुढे उभा करणे: 'दोन सेकंदात चौक पार करू' अशा विचारात तुम्ही ९, ८, ७ ला गाडी चौकात घालताय ..... दुसर्‍या बाजूने 'फक्त ४, ३, २ च तर राहिलेत' म्हणून वेगाने येणारी कार सुसाट येऊन सिग्नल हिरवा होण्याच्या क्षणाला आपण चौकाच्या एन्ट्रीला घुसू असा विचार करत आली आहे. पुढच्या तिसर्‍या सेकंदाला तुम्ही कधीच तो चौक पार करू शकणार नाही अशा अवस्थेला असता. तुम्हाला घर, आई, बाप, बायको, मुलं कुणीच कधीच दिसणार नसतं. ऑनस्पॉट मेला नाही तर मेडीकलचे भयंकर खर्च आणि वेदना तुम्हाला आणि घरच्यांना. कमाईवर परिणाम त्यामुळे घराचे तिनतेरा वाजणार. पुढचं सगळं आयुष्य अपंग व दुसर्‍यावर अवलंबून काढतांना आपण त्या क्षणी दाखवलेला माज आठवत कुढत बसणार. असं आयुष्य स्वतःच्या चुकीने भोगायला लागतंय याचा त्रास सर्वात जास्त असतो असं सगळ्या जगाला सांगत बसलेले असणार. सिग्नल हिरवा असतांनाही भरधाव पार करणे धोकादायक आहे. पिवळा असतांना तसे करणे म्हणजे सरळ आत्महत्येचा प्रयत्न आहे. मी स्वतः चारचाकी चालवतो तेव्हा हे सगळे नियम मला पाळावेच लागतात. कारण चारचाकीत मी सुरक्षीत असलो तरी तुमच्या सारख्या मूर्खांचे जीव वाचवणं माझं कर्तव्य समजतो. कारण त्या दोन क्षणांसाठी तुम्ही आपलं आयुष्य काय म्हणून पणाला लावत असता ते मला माहित नाही. पण स्टेअरींग हाती घेतल्या क्षणापासून मी वर उल्लेखलेलं दृष्य सतत डोळ्यापुढे ठेवत असतो.

In reply to by संदीप डांगे

मी स्वतः चारचाकी चालवतो तेव्हा हे सगळे नियम मला पाळावेच लागतात. कारण चारचाकीत मी सुरक्षीत असलो तरी तुमच्या सारख्या मूर्खांचे जीव वाचवणं माझं कर्तव्य समजतो
सदर धागाकर्ता ज्या रस्त्याने जातो अगदी त्याच रस्त्याने, पण उलट दिशेने, मी रोज जात असतो. चारचाकी चालवताना कुणापासून सर्वात जास्त धोका असेल तर तो दुचाकीस्वारांकडूनच!! कुठूनही, कसेही, वेगात चालवताना काय फुशारकी वाटते ते कळत नाही.

In reply to by सुनील

हीरो असल्या सारखं वाटतं. बाकी ही हीरोगिरी मनगटाखाली असलेला अ‍ॅक्सिलरेटरच करत असतो हे विसरलं जातं. त्याला पिळलं की झालं.

In reply to by संदीप डांगे

खरोखर अश्या गल्लीहीरोंनी मुंबईच्या ट्रॅफिकची वाट लावलेली आहे. मुंबई आणि परिसरात धनुष्यबाण आणि पश्चिम महाराष्ट्रात घड्याळवाल्या लोकांची प्रचंड दादागिरी माफियागिरी आता अगदी असह्य होत चालली आहे.

In reply to by संदीप डांगे

अगदी नेमके लिहिले आहे. मुळात आपण स्वतः नियम पाळायचे नाही आणि पकडल्यावर अरेरावी करायची हे विचित्र आहे हेच ह्या लोकांना पटत नाही. बर आपण नियम तोडला आहे तर रीतसर पावती फाडावी का तर ते नाही. लगेच चिरीमिर देवून पुढचा नियम तोडायला तयार.

In reply to by संदीप डांगे

आणि पोलिसाचा गुन्हा एकचः धागाकर्त्यास कानफटात न लगावणे. ++१ प्रचंड सहमत

In reply to by संदीप डांगे

मी दुचाकी आणि चारचाकी दोन्ही चालवतो. क्र. १ ते ४ गुन्हे का आहेत ते कळले नाही. सिग्नल पिवळा असताना रस्ता क्रॉस करण्याचा निर्णय तुम्ही विवेकाने घ्यवा असे अपेक्षित आहे. जर येणारा माणूस थांबू शकत नसेल तर त्याने जाणे अपेक्षित आहे. एव्हढेच नव्हे, तर त्याने तो निर्णय घेताना स्वतःचा स्पीड, सिग्नलचे अंतर, आणि मागच्या गाड्या यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. सिग्नल पिवळा असताना रस्ता क्रॉस केला म्हणून सरसकट झोडपणे पटले नाही. आणि आवडले तर मुळीच नाही. एव्हढेच नव्हे, तर आदर्श सिग्नल सिस्टममध्ये रेड झाल्यावर पण २-३ सेकंदांची ग्रेस ठेवलेली असते, पिवळा असताना रस्त्यावर उतरलेल्यांसाठी. बाकी पोलिसांच्या बाबतीत जास्त न बोलणेच योग्य. इतर मुद्द्यांबद्दल पास. त्यातले मला काही कळत नाही.

In reply to by संदीप डांगे

अगदी हेच म्हणायचे होते.. ते शिवसेना प्रकरण तर कायचा डोक्यावरुन गेले.. साहेबांनी तरी यांना टायरमध्ये टाकायचा होता.. असो.. :)

वाहतूक पोलीसाला थोडे 'काका वगैरे' म्हटले आणि हसत शांत आवाजात बोलले तर ते ही हुज्जत घालत बसत नाहीत असा माझा अनुभव आहे. ते ही उन्हातान्हात उभे राहून वैतागलेले असतात. थोडे गोडीचे चार शब्द त्यांनाही शरण आणण्यास पुरेसे आहेत. त्याला हळूच साईडला घेऊन थंडा पाजा. २०रू.त काम तमाम. मग पैसेही घेत नाही तो.

In reply to by अकिलिज

सिग्नल कुणासाठी असतो आणि कशासाठी असतो हे समजल्यास इतर काही करण्याची गरज न पडावी. सिग्नल न तोडता चहा, थंड, घरी जाताना गरम काही हवं रे पाजा. प्रतिसाद खाली अकिलिज् साठी नाहीये!

In reply to by अकिलिज

असे कही वाचले की, इतका सगळा विचार करायची हुशारी (?!) आहे; पण नियम पाळल्यास... (अ) वर सांगितलेल्या गैरकायदेशीर कोलांट्या मारायची गरज नाही, (आ) स्वतःचा आणि इतरांचा प्रवास निर्धोक होतो आणि (इ) आपण एक सुबुद्ध नागरीक बनतो (जी अपेक्षा आपण इतरांकडून नेहमीच करत असतो, आणि ते तसे करत नाहीत म्हणून "भारत कधीच सुधारणार नाही" अशी मुक्ताफळे तोडत असतो.) ... हे न कळण्याएवढी हुशारी लोकांत का बरे नाही ? असा प्रश्न नेहमी पडतो ! :(

तुम्ही योग्य केलंत, पण चुकलातही. नंबरप्लेटचा नियम आहे. जर बाकी नियम पाळता तर तोही पाळायला हवा. तिथे निरर्थक युक्तिवाद योग्य नाही. आणि मग तुम्ही नेहमीच नियम पाळता तर त्या शेवटच्या वाक्यावरून त्यावर शंका घ्यावीशी वाटते. पोलिसाला अद्दल बाकी जबराट घडवलीत ! क्या बात है.

आज-काल बर्‍याच ठिकाणच्या वाहतूक नियंत्रक दिव्यांमधे वेळ लावलेली असते. ज्याला आपण उलटगणती म्हणू. जर तुम्ही तुमच्या गतीने जाताना स्टॉप लाईन पार केली असेल, तत्क्षणी पिवळा दिवा लागला तर तुम्ही पुढे निघून जाणे अपेक्षित आहे. हेही अपेक्षित आहे की जो सिग्नल सुटणार आहे, ती वाहने त्यांच्यासाठी असणारा दिवा हिरवा झाल्यावर निघतील. साहजिकच आहे, वर उल्लेख केलेला हा नियम आहे आणि त्याला अपवाद मु़ख्यत्वे पुणे व भारत देशातील वाहतूक आहे. बाकी, सर्व नियम पाळून पुण्यात व इतरत्र वाहन हाकणार्‍यांना, त्रिवार सलाम.

१) गाडी उजव्या बाजूने दामटली कारण - ओवरटेक करताना गाडी उजव्या बाजूनेच करावी असा नियम आहे. म्हणजे माझ्या डाव्या बाजूला वाहने होती. आता तो हवालदार आपला जीव धोक्यात घालून बाकीच्या गाड्या चुकवीत डावीकडच्या फुठपाथपासून उजवीकडच्या डीवायडर पर्यंत येतो आणि समोर हात आडवे करून उभा राहतो याला आपण काय म्हणणार ? आपण समजता तसे, अगर मी सिग्नल तोडला असेल असे मानू, तर मी केलेली चूक एवढी गंभीर होती कि त्याने आपला आणि दुसर्याचा जीव धोक्यात घालून बाकीच्या ४ चाकी वाहनांना सोडून नेमका माझ्याच समोर कुठलीही पूर्वकल्पना नसताना उभे राहावे? का त्याने बाकीच्या ४ चाकी वाहनाला नाही अडवले? ते फार वेगात आहेत आणि कदाचित आपला अपघात होईल अशी भीती नक्कीच वाटली असणार त्याला. एवढा गंभीर गुन्हा होता का मी केलेला, जर मी सिग्नल तोडला असे मानले तर ? २) मराठी नंबरप्लेट- तो फिरणारा शिवरायांचा मेसेज आम्ही सुद्धा वाचलाय .शिवरायांचे राज्य असते तर अशी घटना घडलीच नसती असे मला वाटते. shasanacha हा नियम मी मोडला पण शासन घेते ते सगळेच निर्णय योग्यआहेत असे आपण म्हणू शकत नाही.ते शिवरायांचे शासन होते आणि हे राजकारणी पक्षाचे शासन आहे, तेव्हा हि तुलना होऊ शकत नाही. आणि मी याबद्दल दंड भरायला तयार आहे त्यात कुठलीही मुजोरी नाही. आणि मी माझी गाडी महाराष्ट्रात चालवत असताना MH 43 या कोड ऐवजी महाराष्ट्र ४३ असे मराठीत किंवा देवनागरी लिपीत किंवा आपण मानता तसे हिंदी राष्ट्रभाषेत लिहिले आणि बाहेरून इथे उपकार करण्यासाठी आलेल्या भैय्ये , बिहारी, बंगाली, मद्रासी, गुजराती, राजस्थानी,नेपाळी, पाकिस्तानी,बांगलादेशी, आणि निग्रोंना कळत नसेल तर त्यात माझी चूक नाही. आणि कर्नाटक राज्यात कोणी मला धडकून गेला आणि त्याच्या गाडीचा नंबर मला वाचता नाही आला तर मी दुर्दैवी आणि त्याचे नशीब बलवत्तर असेच मी मानेन. आणि राहिला प्रश्न शिवसेनेनी आंदोलन करण्याचा, तर त्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. आम्ही असे बरेच शिवसैनिक नंबर प्लेट मराठीत लावून फिरतो, कोणीतरी सुरुवात करेल मग आम्ही त्याला पाठींबा देऊ याची वाट पाहण्यापेक्षा आम्ही आमच्यापासून सुरुवात केली आहे, तुम्ही त्याला आंदोलनच समजू शकता. ३) पोलिस स्टेशन मध्ये जाऊन मी कोणावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही. जो १०० रुपयाची दंड मी रस्त्यावर देऊ शकलो असतो, तोच दंड मला मोठ्या साहेबांसमोर द्यायचा होता इतकेच. आणि पुन्हा अधोर्रेखीत करतो- हवालदार ने मला नाही तर मीच त्याला पोलिस स्टेशन मध्ये येण्यासाठी आग्रह केला होता. जेणेकरून मोठा साहेबांना आपल्या आत्मघातकी कर्मचाऱ्यांची कल्पना येईल. ४) @-श्रीमान बाळ सप्रे- शिवसेना वगैरे गुर्मी एखाद्या सच्च्या पोलिसाने भविष्यात नक्की उतरवावी असे मनोमन वाटते.. हे वाक्य तुम्ही मनातच ठेवा. एक सच्चा पोलिस एका कट्टर शिवसैनीकाशी आणि एक कट्टर शिवसैनिक एका सच्च्या पोलिसाशी कधीच गुर्मीत वागत नाहीत. या दोघांमध्ये असलेली भावनिक नाते आणि mutual understanding तुम्हाला समजायला वेळ लागेल. ५) @- श्रीमान संदीप डांगे - आपण वापरलेला " चोर तो तो चोर आणि वरून शिरजोर हा वाक्यप्रचार मुळीच आवडलेला नाही. उगाच निखिल वागळे प्रमाणे सरन्यायाधीशाच्या भूमिकेत शिरून " हो हो तुम्ही गुन्हेगार आहात तुम्ही उत्तर द्या," असे करू नका. तुम्ही सरसकट कुणालाही मूर्ख संबोधून बेताल वक्तव्ये करू नका. तुम्हा ४ चाकी वाल्यांना एखाद्या दुचाकी वाल्याचा आलेला वाईट अनुभव घेऊन सर्व दुचाकीस्वारांना त्याच पंक्तीत बसवणे चुकीचे आहे. पोलिसाची एक चूक- धागकार्त्याच्या कानफटात न लागावणे- अहो डांगे, ४ चाकीवाल्यांच्या कानाखाली आवाज काढण्यासाठी आधी काच खाली करावी लागते आणि त्या काचेच बटण त्याच गाडीत बसलेल्याच्या हातात असते, जे पोलिसाला लगेच जमत नाही, म्हणून २ चाकीवाल्यांच्या कानाखाली आवाज काढणे एवढे सोप्पे वाटतेय का तुम्हाला.? आणि पोलिस तुम्हाला वाटते तसे लगेच कोणाच्याही कानाखाली जाळ काढत नसतात. तुमच्या मनात पोलिसांबद्दल चुकीचा ग्रह झालेला दिसतोय. आम्हा दुचाकीवाल्यांना देखील असेच भले बुरे अनुभव ४ चाकी वाल्यांकडून आले आहेत. जसे सायडिंग ला दाबणे. कट मारणे, थंडगार एसीत बसून कुत्सित पणे आमच्याकडे पाहणे. मुद्दाम चिखल उडवणे, गाडीच्या काचा काळ्या असतील तर आत बसून दुचाकीच्या मागे बसलेल्या स्त्री ला टकामका पाहणे. म्हातार्या बापाला, किंवा लहान मुलाला, एखाद्या आईला मागे बसवून नेणारा, रस्त्याच्या अगदी काठावरून चाललेल्या , भेदरलेल्या दुचाकीस्वराकडे कधी लक्ष गेलाय का आपले? म्हणे या ४ चाकीवाल्यांना दुचाकीस्वारांची भीती वाटते. अश्या गल्ली हिरोंनी मुंबईच्या ट्राफिक ची वाट लावली- आपल्या या नवीन संशोधनाला २१ तोफांची सलामी. शेवटच्या वाक्याबद्दल - पुन्हा कधीच आता त्याची भेट होणार नाही आणि आता कुठ असतील ते याच विचारात मी झेब्रा क्रोसिंग च्या पुढे येउन थांबलो आणि अर्धा सिग्नल तोडला असता, पोलिसाने " अरे आता मध्ये नको थांबू जा पुढे लवकर" असे दरडावल्याने मी उरलेला अर्धा सिग्नल तोडला. याआधी मी कधीच सिग्नल तोडल्याचे मला आठवत नाही. असो... मुळात मी १००% बरोबर आणि यात माझी काहीच चूक न्हवती असा म्हणण्याचा कोणताही उद्देश माझ्या प्रस्तुत लेखात न्हवता.वादावादीने का होईना परंतु त्या पोलिसाशी माझी नकळत मैत्री झाली होती.४ दिवस रोज मी त्याला येउन साहेब जाऊ का हो पुढे असे चिमटा काढल्यागत विचारायचो, आणि तोही दिलखुलासपणे हसून "जा " म्हणायचा , ऑफिस सुटल्यावर माझ्या डोक्यात त्याचेच विचार यायचे आणि तोही माझी जणू वाटच पहायचा, ती भेट आता होणार नाही हीच रुखरुख मनात होती आणि तिला मी इथे या मिसळपाव च्या माध्यमाद्वारे तुमच्यासमोर मांडत होतो. परंतु काहीसा पराचा कावळा झाल्यामुळे थोडस उद्दास झाल्यासारखे वाटू लागलेय.

In reply to by सतिश पाटील

तुमच्या दिव्य विचारांबद्दल तुम्हाला साष्टांग दंडवत. सविस्तर उत्तर देण्याची इच्छा आहे पण आत्ता वेळ नाही. सोमवारी भेटू...

In reply to by संदीप डांगे

मगाशी तुम्हाला उगीच झोडपले असे वाटू लागले आहे. पण टेक्निकली नंबरप्लेट वगळता धागाकर्त्याची काही चूक नाही हे पण खरेच. आणि वरती उधळलेल्या विचारमौक्तिकांबद्दल धागाकर्त्याचा राजभवनासमोर सत्कार करावा असे वाटत आहे.

In reply to by सतिश पाटील

एवढा गंभीर गुन्हा होता का मी केलेला, जर मी सिग्नल तोडला असे मानले तर ?
अजिबात नाही. ट्रॅफिक चा अपराध हा इंडियन पीनल कोड मध्ये येत नाही (नसावा!) त्यामुळे तो गुन्हा नाही, फक्त नियम तोडण्याचा प्रकार आहे. त्यामुळेच ट्रॅफिक तोडणार्‍याला दंड घेवून जावू देण्यात येतं. तो तुम्ही द्यायला हवा होता आणि तिथेच द्यायला हवा होता.
शिवरायांचे राज्य असते तर अशी घटना घडलीच नसती असे मला वाटते. [...] ते शिवरायांचे शासन होते आणि हे राजकारणी पक्षाचे शासन आहे, तेव्हा हि तुलना होऊ शकत नाही.
शिवरायांनी ट्रॅफिक सिग्नल तोडणार्‍याला शिक्षा केली नसती असं म्हणायचंय का? शिवरायांना ही गोष्ट मुळीच रुचली नसती. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर त्यांना सुद्धा आत न जावू देण्यार्‍या पहारेकर्‍याची गोष्ट तुम्हाला माहीत असायला हवी.
hasanacha हा नियम मी मोडला पण शासन घेते ते सगळेच निर्णय योग्यआहेत असे आपण म्हणू शकत नाही.
आपल्याला हवे तसे नियम पाळायचे असतात काय? मला सुद्धा शासनाचा टॅक्स भरण्याचा निर्णय योग्य वाटत नाही. मी तो नाही भरला तर चालेल?
ते शिवरायांचे शासन होते आणि हे राजकारणी पक्षाचे शासन आहे, तेव्हा हि तुलना होऊ शकत नाही.
अहो, तुमच्याच शिवसेनेचं शासन आहे सध्या. राजकारणी पक्षांबद्दल राग असेल (जसा माझा आहे) तर कशाला त्यांचे कार्यकर्ते म्हणून वावरता?
आणि मी माझी गाडी महाराष्ट्रात चालवत असताना MH 43 या कोड ऐवजी महाराष्ट्र ४३ असे मराठीत किंवा देवनागरी लिपीत किंवा आपण मानता तसे हिंदी राष्ट्रभाषेत लिहिले आणि बाहेरून इथे उपकार करण्यासाठी आलेल्या भैय्ये , बिहारी, बंगाली, मद्रासी, गुजराती, राजस्थानी,नेपाळी, पाकिस्तानी,बांगलादेशी, आणि निग्रोंना कळत नसेल तर त्यात माझी चूक नाही.
ही असली वाक्यं लिहून शिवसेनेबद्दल लोकांचा आदर वाढत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा विचार करा. त्यांनी इथं वस्ती करून नये इतपत ठीक आहे. पण त्यांनी इथे पर्यटनासाठी, बिझनेस साठी, शिक्षणासाठी येवू नये असं मत आहे का? तुम्ही जर सरकारी अधिकारी असता आणि तुम्हाला जर बंगाल मध्ये बदली वर पाठवलं असतं तर तुमची काय भूमिका असती? बाकी ही फक्त शिवसेनेची भूमिका असेल तर बाकीच्या महाराष्ट्राची अशी बिनडोक भूमिका नाही हे लक्षात ठेवा. लोंढ्याला आमचाही विरोध आहे पण त्यांच्या मुजोरी ऐवजी तुमची मुजोरी एवढाच फरक असेल तर तसं चालणार नाही.
निग्रोंना
निग्रो? हर हर. अवघड आहे.
आणि कर्नाटक राज्यात कोणी मला धडकून गेला आणि त्याच्या गाडीचा नंबर मला वाचता नाही आला तर मी दुर्दैवी आणि त्याचे नशीब बलवत्तर असेच मी मानेन.
तुम्ही तसं मानू शकता आणि त्यामुळेच महाराष्ट्र सरकारचे सध्या धिंडवडे निघाले आहेत. तुम्हाला कायदा, सोसायटी, सुव्यवस्था वगैरे गोष्टी माहीत असत्या तर ना! बाकीच्या सुजाण लोकांना असं चालत नाही आणि म्हणून ते शिवसेनेला मतदान करत नाहीत. असली जंगली मनोव्यवस्था असणार्‍या लोकांसाठी ही लोकशाही बनलेली नाहीये. नशीब तुम्हाला कायदा करायच्या कामावर नेमलेलं नाही.
आम्ही असे बरेच शिवसैनिक नंबर प्लेट मराठीत लावून फिरतो, कोणीतरी सुरुवात करेल मग आम्ही त्याला पाठींबा देऊ याची वाट पाहण्यापेक्षा आम्ही आमच्यापासून सुरुवात केली आहे, तुम्ही त्याला आंदोलनच समजू शकता.
जरा शिका आणि शहाणे व्हा. हे सगळं करायला अक्कल लागत नाही. त्या आंदोलनाचा कुठलंही कोर्ट एका सेकंदात निकाल लावू शकेल. तुमचा मराठीचा अभिमान वगैरे ठीक आहे पण गाडीची पाटी तो दाखवण्याची जागा नाही.
जो १०० रुपयाची दंड मी रस्त्यावर देऊ शकलो असतो, तोच दंड मला मोठ्या साहेबांसमोर द्यायचा होता इतकेच. आणि पुन्हा अधोर्रेखीत करतो- हवालदार ने मला नाही तर मीच त्याला पोलिस स्टेशन मध्ये येण्यासाठी आग्रह केला होता. जेणेकरून मोठा साहेबांना आपल्या आत्मघातकी कर्मचाऱ्यांची कल्पना येईल.
पुन्हा सांगतो. तुम्ही दंड तिथेच द्यायला हवा होता. ट्रॅफिक पोलिसांना तो अधिकार कायद्यानं दिलेला आहे. सगळ्यांना असे पकडून पोलिस स्टेशन मध्ये न्यायला लागले तर मग झाली ट्रॅफिक व्यवस्थित. तुम्ही जे केलं ते रेम्याडोक्याचं किंबहुना गुढघा-वालं काम म्हणतात. त्या ट्रॅफिक पोलिसानं तुमच्यावर केस दाखल केली नाही ते नशीब समजा कारण दंड न घेता ते करण्याचा त्यांना अधिकार आहे.

माझा आरटीओ ह्या संस्थेवरील विश्वास संपुर्णपणे उडाला आहे ... तुमची चुक असो नसो , जर त्यांन्नी ठरवलेच असेल की पावती फाडायची तर ते फाडणारच !! तस्मात , आरटीओशी वाद घालत बसुनये , सरळ १०० रुपयाची लाच द्यावी आणि स्वतःचा वेळ वाचवावा , वाचलेल्या वेळात अभ्यास करुन शेयर मार्केट मधे पसे लावावेत आणि १३० रुपये येक्स्ट्रा नफा कमवावा आणि ३० रुपये रीतसर इनकमटॅक्स भरावा . :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमची चुक असो नसो , जर त्यांन्नी ठरवलेच असेल की पावती फाडायची तर ते फाडणारच !!
या वाक्याशी १०००% सहमत !

In reply to by उगा काहितरीच

"गिर्‍हाईक" शोधलं जातं हे कटू पण सत्य आहे !!!!! इथे पावती मध्ये त्या दिसाचे लक्ष आणि लक्ष्य असते. रोज पाहून अनुभवी झालेला मुर्दाड नजरेचा नाखु

आजकाल दिल्लीत रामराज्य आलेले आहे, गेल्या २ महिन्यात कित्येक ट्राफिकपोलीस वाले हॉस्पिटल मध्ये पोहचले आहे. मुंबईत फक्त वादावादीच होते, या अर्थी अजून तिथे रामराज्य पोहचले नाही आहे.

दादा, सुदैवी आहात व तसेच रहा, हीच आई एकविरेचरणी तुम्हासाठी व समस्त मिपाकरांसाठी मनापासून प्रार्थना. आमेन.

आम्हीही आज साठीच्या पुढचे मराठी आणि जन्मापासून मुंबईत रहाणारे आहोत. तरीही केवळ मराठी म्हणून कधीही माज केला नाही. या राज्यात कायद्याचे राज्य मानायचे की नाही, हा ज्याच्या त्याच्या मानसिक वकूबाचा प्रश्न आहे. पण नियम मोडूनही, स्वत:ची बाजू बरोबर आहे असे प्रामाणिकपणे वाटणे, या अजब तर्काने विचारात पडलो आहे. महाराष्ट्रातले पोलिस मराठी असल्यानेच, अशा मराठीत पाट्या लिहिणार्यांना जाऊ देतात. म्हणून तसे करणे बरोबर, हा चुकीचा तर्क आहे. पाट्या मराठीत रंगवण्याचा कायदा विधीमंडळात पास करू घ्या आणि मग वागा तसे. तोपर्यंत जो कायदा आहे तो पाळायलाच हवा. आणि ठोकशाही वरच विश्वास असेल तर त्याचे परिणाम भोगण्यास तयार व्हा. खरा कायदा, हिरवा सिग्नल चालू झाल्यावर गाडी चालू करणे, असाच आहे.

"राहिली गोष्ट नंबर प्लेट ची तर त्यासाठी मी दंड भरायला तयार आहे, पण नंबर प्लेट बदलणार नाही, शिवसैनिक आहे मी" याचा आणि नंबर प्लेट न बदलण्याचा काय संबंध ?? उगा नको तिथे फालतूपणा . आणि हो, कर्नाटकातही कन्नड मध्ये लिहिलेली नंबर प्लेट असतेच . पण त्याखाली इंग्रजीत हि लिहिलेलं असावं असाही नियम आहे . आणि गेल्या काही दिवसात तो हि बदललाय, आरटीओ ने दिलेला एक स्पेसिफिक होलोग्राम आणि स्पेसिफिक फोन्टमधेच प्लेट तयार करून घेतात. तो हि इंग्रजीत . आणि तसं नसेल त्या सगळ्यांना ३०० रुपयाचा दणका बसतो . वर डांगे साहेबांनी म्हटलं तसं . चोर तो चोर वर शिरजोर

In reply to by अद्द्या

जर आर्टीओ चा नियम असेल तर नंबरप्लेट त्याप्रमाणेच असली पाहिजे. माझे तर मत आहे की एकदा नंबरप्लेट शुद्धीकरण मोहीम राबवावी. सुरुवात वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकार्यापांसुनच करवी. त्यांना जाहीरपणे बोलावुन नंबरप्लेट बदलण्यास भाग पाडावे. एकदा हे ईतरांनी बघीतले की सगळे झक मारत बदलतील. प्रश्नं असा आहे की ही धमक कोणात आहे ?

तर्राट ? जोकर साहेब ... र्शिवसेना आणि शिवसैनिकांबद्दल तुमच्या मनात फारच आकस दिसतोय, नै तुम्ही पार सैनिकांनी लिहिलेले लेख हुडकून, वाचून त्यावर टिपण्णी करताय...

In reply to by पिलीयन रायडर

आणि हो.. अजुन एक.. "मी महाराष्ट्रात रहातो. मी मराठीच नंबरप्लेट लावणार" अशी काही तुमची (चुकीची का होईना पण) भुमिका असली तरी एकवेळ ठिक. पण "मी शिवसैनिक आहे" हे सांगुन तुम्ही पोलिस अधिकार्‍यावर दबाव तयार करत आहात, जे चुकीचे आहे.

१०० रुपये कश्याला घालवावे म्हणतो मी! निवांत आपण नियम पालन करावे, अन ते सेना कार्ड काय पटले नाही बघा (इलेक्शन मधेही उधारी न देणारा) नाना

In reply to by सुबोध खरे

आणि ती सध्या त्याला रट्टे सुद्धा देते. वाघोबा बिचारा चवताळून डरकाळ्या फोडतो हे खरं, पण त्यात हिंस्त्रपणापेक्षा लाचारीचा भावच जास्त दिसतो. संध्याकाळी कोणी बघत नसताना पोळीभाजी पण चुपचाप खातो म्हणतात.

In reply to by काळा पहाड

तुमचा पत्ता वगैरे शोधून घरी येतील ते वाघ! तेव्हा तुमच्या शेळ्या होऊ देवू नका म्हणजे मिळवलं. . . . . . . . मज्जा केली रे मित्रांनो जस्ट चिल

In reply to by काळा पहाड

माऊंटनराव तुमच्या बर्‍याच प्रतिसादाशी सहमत असतो राव. अगदी पटतात तुमचे विचार कधी कधी. पण आमच्या श्रध्दास्थानाची अशी टींगल उडवू नका हो. सध्या बिचारा हाय पण वाघ आहे.

In reply to by अभ्या..

वाघाचं असं व्हावं हे आम्हाला सुद्धा बघवत नाही. कारण वाघ-कमळाबाई युती असताना वाघ की कमळाबाई हा प्रश्नच पडत नव्हता. वाघपण आपलाच आणि कमळाबाई पण आपलीच. युती तोडायची सुरवात वाघानंच केली हे सुद्धा पटलं नाही. वाघानंच कमळाबाईवर टीका करायला सुरवात केली. आणि मग कमळाबाईनं वाघाला दूर सारलं. नंतर सुद्धा वाघानं वाघासारखं रहायला हवं होतं. वाघानं कमळाबाईची मनधरणी करायला सुरवात केली आणि कमळाबाईनं वाघाला खुंटीला टांगला.

In reply to by काळा पहाड

वाघाची शेळी का झाली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अंतर्गत लाथाळी कमी आहे का? कि पेटी आणि खोक्याचा हिशेब नाहीये. सर्व सामान्य माणसे आंधळी नाहीत. मराठी अस्मितेला गोंजारताना त्यांचे प्रश्न सोडवण्यात ते कुठेतरी कमी पडले( किती कमी पडले हा वादाचा मुद्दा आहे) हि वस्तुस्थिती नजरेआड करता येणार नाही. लिहिता बरेच येईल पण हा धागा त्याचा नव्हे आणी माझा तेवढा अभ्यासही नाही.

शीव सैनिकंची अपत्य कुठल्या माध्यमाच्या शाळातून शिकतात याचं संशोधन व्हावं प्रश्न पोलिसाचा , ट्रैफ़िक चीं शिस्त पाहणं ,हे यांच मुख्य काम पण त्या ऐवजी ,कोणाला न दिसेल असं उभं राहून दंड स्वतासाठी पहिल्यांदा मग जमलंच तर शासनासाठी उपटणे यातच हे मश्गुल असतात, येखाद्या दुचाक्या बरोबर तासभर हुज्जत घालण्यासाठी त्याना नेमलेलं नसतं हे त्याना कोण सांगणार,त्या दरम्यान ट्रैफ़िक चा बोजवारा उड़ालेला चालतो पण खंडणी हातची जाऊ द्यायची नाही, अैंटी करप्शन च्या माणसाकडून सुद्धा हे वरकमाई मागायला कमी करणार नाहीत(त्या व्यक्तिने स्वताची ओळख न दिल्यास) वास्तविक अैंटी करप्शनवाले याना आपणहून एखाद्याला तरी कां पकड़त नाहीत कोण जाणे,

पण नंबर प्लेट बदलणार नाही, शिवसैनिक आहे मी, हे नंबर प्लेट बदलण्याचे हे कारण खरंच नाही पटले, मराठीचा अभिमान नक्कीच असावा पण जे शिवसैनिक नाहीत त्यांना मराठीचा अभिमान नाही असे आहे का? दिवाकर कुलकर्णी यांच्या प्रतिसादातलं पहीलं वाक्य एकदम रास्त वाटतं.

लक्ष ठेउुन वागले तर वागळेसारखे सर्व सगळे वावगे वाटू शकते. त्यापरिस पुढील पिढीसमोर आपला काय आदर्श राहिल का याचा विचार करावा, आपल्या विभागातील सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करावे हे ठोस कार्य होईल कारण भावनेचा भर ओसरला की उरते समोर भयाण वास्तव. बाकी निव्वळ प्रसंगाला आम्हीही तोंड दिलेले आहे काही फरक पडत नसतो 'टारगेट' असते अन् त्यासाठी टारगट लोकांना सोडून सरळमार्गी लोकांना 'टॅार्चर' केले जाते. बाकी सेनेचं पानिपत न पहावणारा ठाणेकर.