संपादकीय - सानिकास्वप्निल - अजया

अजया's picture
अजया in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:07 pm

नमस्कार मिपाकरांनो!

अनाहिताच्या पहिल्या अंकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आजच्या जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने हा रुची अंक घेऊन आपल्यासमोर येत आहोत. अनाहिताचा या वर्षातला हा दुसरा अंक! या अंकाबाबत काही सांगण्याआधी अनाहिता अंक वेगळा का काढतो आपण हे मिपाकरांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल! तर याचे मुख्य कारण आहे अनाहितांना लिहिण्याचा आत्मविश्वास येऊन त्यांना या निमित्ताने मिसळपावच्या मुख्य प्रवाहात सामिल होता येते. एरवी घर, मूल, करीअर या सर्वात गुरफटलेल्या असताना, अनेक जवाबदार्‍या एकटीने खांद्यावर झेलत असताना अनाहितांचा मिपावर सहभाग बर्‍याचदा वाचनमात्र असतो. अंकासाठी लिहिताना मात्र भरपूर वेळ घेऊन आवडत्या विषयावर लिहिता येते. त्यामुळे सर्वच अनाहितांना अंकात सहभागी होता येतं. काही जणांना प्रश्न आहे की मग अंक मिपाचा सर्वसमावेशक का नाही? तर अनाहितांचा अंकासाठीचा लेखनाचा उत्साह पाहता ते लवकरच शक्य होईल असं वाटतं. आत्ताच्या अनाहिता अंकाच्या निमित्ताने आम्ही स्वतंत्रपणे काय करू शकतो हे अनाहितांना अजमावता येतंय. याचे परिणाम नजिकच्या भविष्यात मिपावरच्या सर्वसमावेशक अंकातल्या अनाहितांच्या जास्तीतजास्त सहभागाने दिसायला लागेल अशी आशा, इच्छा आणि महत्त्वाकांक्षा नक्कीच या अंकांच्या निमित्ताने आम्ही व्यक्त करू पाहतोय.

आता बोलू रुची विशेषांकाबद्दल! मागच्या महिला दिन विशेष अंकानंतर अनाहितात पुढचा अंक कसा असावा, या अंकातल्या त्रुटी या सर्वांचा आढावा घेण्यात आला. त्यादरम्यान सानिकाने ही रुची विशेषांकाची कल्पना सुचवली आणि अनाहिता उत्साहाने भारल्या गेल्या. विशेष म्हणजे नव्याने अनाहितात सामिल झालेल्या मैत्रिणीही तितक्याच आनंदाने सामील झाल्या. वेगवेगळे विषय सुचवले गेले. या अंकाचं स्वरूप नुसता पाककृती असणारा अंक असा नको होता तर अन्न हे पूर्णब्रम्ह हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य दाखवणारा हवा होता. अन्न ही माणसाची मूलभूत गरज. त्या गरजेचे आपण विविध रुचींमध्ये रुपांतर केले. अगदी आपल्या देशात, राज्यातदेखील विविध प्रांताच्या रुची वेगवेगळ्या आहेत. अशा या पारंपारिक ते आधुनिक असा रुचीचा वैविध्यपूर्ण पट या अंकाच्या निमित्ताने उलगडलाय.

आजच्या ग्लोबल व्हिलेजच्या जमान्यात आपण जगाच्या निरनिराळ्या भागात रहाणारी माणसं, आपोआपच राहत्या ठिकाणाच्या खाद्यसंस्कृतीशी परिचित होतो. अशा विविध देशात राहणार्‍या आपल्या अनाहिता तिथली खाद्यसंस्कृती या अंकाच्या निमित्ताने पेश करत आहेत. तसंच कोकणापासून ते विदर्भ, मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीतल्या अनवट पाककृती खास तिथली चव घेऊन हजर आहेत! आपल्याकडे सणावाराला, लग्नाला पंगतीतल्या जेवणाचे विशेष महत्व! अगदी संत एकनाथांनाही रुक्मिणी स्वयंवरात पंगतीतल्या विविध खाद्यपदार्थांची वर्णने करायचा मोह सुटलेला नाही! या अंकात आपण त्या काळातल्या पंगतीचे सुरेख वर्णन वाचू शकाल. ग्लोबल सरमिसळीमुळे विविध देशांचे पदार्थ आपल्या खाण्यात महत्वाचे स्थान पकडून बसायला लगले आहेत. त्या पदार्थांमागचा रोचक इतिहास काही लेखात जाणून घेता येईल. अजुन एक विभाग आहे तो आपले मराठी पध्दतीच्या मेजवानीचे भरलेले ताट! यात ताटाभोवतीच्या महिरपीपासून ते डावी, उजवी बाजू सांभाळणारे पदार्थ, भात, सार, कढ्या, पोळ्या, गोडाचे पदार्थ ते मुखवास असे सर्व काही वाढून ठेवलेले आहे. सोबत गदिमांचे ताटावरचे सुरेख काव्यदेखील आहे! उन्हाळ्यातली वाळवणं आपल्या मराठमोळ्या ताटातले मानाचे स्थान. बर्‍याच वाळवणाच्या पदार्थांच्या पारंपारिक पाककृती अंकातल्या लेखात मिळतील. आंतरजालाच्या वापरामुळे अनेक सुगरणी आपापले रेसिपी ब्लॉग लिहू लागल्या. त्या वाचून स्वयंपाकातल्या टिप्स मिळवणे सोपे जाते. त्यामुळे हल्ली बरेच हौशी पाककलाकार हे ब्लॉग वापरतात. त्यांचा एक संग्रह अंकात वाचायला मिळेल. लहान बाळ ते वाढत्या वयाचे मूल सर्वांच्या भूकेच्या गरजा वेगवेगळ्या. या विषयावर अनाहितामध्ये धागा काढून चर्चा झालेल्या. अंकाच्या निमित्ताने अनाहितावरचा," आई मला भूक लागली" हा धागा संकलित करून खुला करत आहोत. मास्टर शेफप्रमाणे मिस्टरी बॉक्स, केक आर्टिस्टची मुलाखत ते कँपिंगला जातानाचे खाणे असे अजून बरेच काही रोचक या अंकात वाचायला आहेच! आहार आणि वाढते वजन यासंबधी माहिती देणारा लेख आणि आहारतज्ञांची मुलाखत हे सर्व पाककृती वाचून वाढलेल्या वजनाला दिलासा म्हणून आहेतच! या सर्वांबरोबर तोंडीलावणं म्हणून काही छानसे ललित लेख आहेत. अनाहितांनी केलेल्या खाद्यपदार्थांच्या फोटोंचा कोलाजदेखील आहे!

अंकासाठी इतक्या लोकांचा हातभार लागलाय की आभारप्रदर्शन केल्याशिवाय राहवत नाही हे खरं! या अंकाची कल्पना सुचवल्याबरोबर नीलकांतनी अनुमोदन देऊन उत्साह वाढवला. अभ्याने या अंकासाठी सुरेख बॅनर करुन दिले आहे. त्याचे आणि आपल्या तंत्रज्ञ प्रशांत आणि नीलकांतचे विशेष आभार. या अंकासाठी काही फोटोशॉपचे काम अमिपाकरांनी करून दिले आहे त्यांचेही आभार. आपापली करीअर, संसार, लहान बाळं सगळं सांभाळून अनेक जुन्या-नव्या अनाहितांनी या अंकासाठी साहित्य दिलंय. त्यांचे आभार नाही मानत, आमचा सगळ्यांचाच हा अंक आहे म्हणून!

तर मिपाकरांनो आमचा हा अंक जरूर वाचा, सुधारणा सुचवा, प्रोत्साहनपण द्याच!
कळावे, लोभ आहेच, वाढावा ही विनंती.

_____/\______
सानिकास्वप्निल अजया

प्रतिक्रिया

प्रियाजी's picture

18 Oct 2015 - 4:33 pm | प्रियाजी

अजया, सानिका अंक खूप छान झाला आहे. संपादकीयही फारच आवडले. सावकाशीने लेख वाचून प्रतिक्रिया देईनच. सध्या अंक पाहूनच तुमच्या या मागील मेहेनतीची कल्पना करून्च जीव दडपून गेला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Oct 2015 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व अनाहितांचं सर्वप्रथम अभिनंदन. एक चांगला उपक्रम यशस्वी केला. वेळ दिला आणि वैश्विक मिपाकरांना आनंद मिळाला. आपल्या सर्वांचं कौतुकच आहे.

मला संपादकीय खुप आवडलं. पहिला उतारा ज्यात काही अनाहितांचं लेखन बंद दालनाकडुन मुख्य प्रवाहात यायला हवं हा आशावाद आणि उद्देश मनापासून आवडला. तसं व्हावं आणि तेच व्हावं यासाठी माझ्या तहेदिलसे शुभेच्छा.

सानिका स्वप्निल आणि डॉ. अजयाची ही संपादकीय भूमिका मला खास आणि स्पेशल वाटली. थ्यांक्स अ लॉट. आपल्या दोघींचं एका चांगल्या संपादकीय बद्दल मन:पूर्वक अभिनंदन करतो.

बाकी, सर्व लेखन वाचेनच.

-दिलीप बिरुटे

उत्तम संपादकीय! अजया, सानिका आणि अंकांसाठी योगदान देणार्‍या सर्वाचे मनापासून कौतुक!

श्रीरंग_जोशी's picture

19 Oct 2015 - 2:58 am | श्रीरंग_जोशी

अजून अंकातले लेख वाचणे बाकी आहे. पण शीर्षकांवरून अन संपादकीय वाचून वैविध्याची व हे सर्व एकत्र गुंफण्यासाठी घेतल्या गेलेल्या कष्टांची जाणिव होते.

या विशेषांकासाठी योगदान देणार्‍या सर्वांचे व या उपक्रमाचे सुकाणू हाती धरणार्‍या संपादिकाद्वयींचे मनःपूर्वक अभिनंदन.

स्नेहानिकेत's picture

19 Oct 2015 - 8:21 pm | स्नेहानिकेत

अतिशय सुरेख संपादकीय!!!!! अजया ताई आणि सानिका दोघींचेही अभिनंदन.तुम्ही दोघीनिहि खुप मेहनत घेतलीत या अंकांसाठी.तसेच सर्वच सहभागी अनहितांचे मनापासून आभार की इतकी सुंदर कलाकृति त्यांनी आम्हाला दिली.
अजूनही नुसता चाळलाय अंक आता हळूहळू सगळे लेख वाचते.

पूर्वाविवेक's picture

21 Oct 2015 - 11:44 am | पूर्वाविवेक

अजया आणि सानिका तुमचे अभिनंदन आणि या अंकासाठी तुम्ही घेतलेल्या कष्टासाठी मनापासून कौतुक. अगदी व्यावसायिक वाटावा अस तुमच समाधान झालंय. अंक सावकाशीने वाचते.
आणि खूप खूप धन्यवाद, केवळ तुमच्या प्रोस्त्साहानाने मिपा साठी लिहिण्याचे धैर्य झाले. पैसा ताईचे आणि इतर अनाहीतांचे सुद्धा आभार , तुमचे धीराचे शब्द नेहमी सोबत असतात.

सानि आणि अजया ताई तुमचे खूप अभिनंदन!!

आरोही's picture

21 Oct 2015 - 8:34 pm | आरोही

अगदी मनापासून लिहिलेले संपादकीय आवडले ...अंकासाठी घेतलेली मेहनत माहित आहे ....त्यामुळे खूप शुभेच्छा आणि धन्यवाद सुंदर अंकासाठी ....

भिंगरी's picture

22 Oct 2015 - 12:51 am | भिंगरी

उत्कृष्ठ अंक!
+++१११

मेघना भुस्कुटे's picture

22 Oct 2015 - 1:06 pm | मेघना भुस्कुटे

छान झाला आहे अंक. अभिनंदन.

जेपी's picture

23 Oct 2015 - 9:34 am | जेपी

अंक आवडला.
आज वाचुन पुर्ण झाला,प्रत्येक लेखावर प्रतिसाद देणे शक्य नाही,
या अंकासाठी मेहनत घेणार्‍या सर्वांचे आभार आणी अभिनंदन.

अजो's picture

23 Oct 2015 - 4:38 pm | अजो

सुरेख झाला आहे अंक

आज संपूर्ण अंक वाचून झाला. असेच अनेक अंक इथे वाचायला मिळोत या शुभेच्छांसह हार्दिक अभिनंदन :)

आत्ताच रुची विषेशांक चाळला. (सवडीने सगळी पानं वाचेनच.)
विविध अंगांनी नटलेला हा अंक आवडला.
हा अंक pdf फाईलच्या रुपात उपलब्ध आहे का?
असल्यास ऑफलाईन वाचता येईल.

लवकरच पिडिएफ आवृत्ती देतोय.काम सुरु आहे.

किलमाऊस्की's picture

2 Nov 2015 - 9:14 pm | किलमाऊस्की

अंकासाठी मेहनत घेणार्‍या सर्व अनाहितांचे अभिनंदन ! विशेषतः अजया आणि सानिका हार्दिक अभिनंदन !!

मुक्त विहारि's picture

3 Nov 2015 - 12:07 pm | मुक्त विहारि

छान...