Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जव्हेरगंज on Sat, 10/24/2015 - 22:56
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ. आय कायच बुलली नाय. मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब थेंब पाणी म्या हातात धरलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, माज्या पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू. पाटी पिन्शील वायरीच्या पिशवीत टाकुन दिली. मग वाकळंवरं उगच पडुन ऱ्हायलु. छपरातनं पाणी गळायला लागलं. वाकळंवरच. म्या वाकळं एका बाजुला वढुन घीतली. ऊठुन दिवळीतलं भगुणं घेतलं, आन टपकणाऱ्या पाण्याखाली आदानाला ठिवलं. मग ऊखळापाशी बी टपकाय लागलं, तिथं फुलपात्र ठिवलं, शिक्क्याच्या खाली पाटी ठिवली, चुलीम्होरं तांब्या ठिवला. सगळं घरबार फिरुन म्या भांडीच भांडी केली. पर आयशी कायच बुलली न्हाय, नुसत्याच भाकऱ्या थापत ऱ्हायली. कोपऱ्यात बसून म्या ठिबकणाऱ्या पाण्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ. माझा बा तालुक्याला गेलता. कोर्ट कचेरीच्या कामात त्येला यायला उशीर व्हायचा. कदीकदी तिकडचं मुक्काम टाकायचा. तवा मला त्येजा राग यायचा. "आयं, आण्णा कदी येत्यालं गं?" म्या पाय हालवत रडकुंडीला यीवुन ईचारलं. पर आय कायच बुलली नाय. नुसत्याच भाकऱ्या थापत ऱ्हायली, भगुणं जसं भरलं तसं म्या पाणी भाईर टाकुन दिलं. कावदान जोरात सुटलं व्हतं. कवाडाच्या आत बी पाणी याय लागलं. म्या कडी घालुन पुना भगुणं जाग्यावर ठिवलं.चुलीम्होरं जाऊन आयशीपशी बसलु. कितीतरी येळ. आयशी कायच बुलली नाय. मग म्या तिथचं मटकुळं करुन झोपुन गीलू. भाकऱ्याचा आवाज माज्या कानात घुमत राहीला. रातभर. सकाळी जवा मी जागा झालू तवा आयशी घरी नव्हती. घराबारात पसरलेली भांडीकुंडी तुडुंब भरून वाहिली व्हती. जिकडं तिकडं सारवानाचे पोपाडं ऊपडलं हुतं. ऊनाचं कवुडसं छपराच्या आत झिरपलं व्हतं. सकाळच्या पारी आमचं घर मला उदास वाटलं. वट्यावर जाऊन म्या आयशीला हाका मारल्या. कितीतरी येळ. आयशीनं कुठुनं बी वव दिली न्हाय. शेजारची जिजाकाकू मला म्हणली "कशाला हाका मारतुय रं पोरा, बाप न्हाय का आजुन तुजा आला?". आज मला आंघुळ घालाय बी कुणी न्हवतं. हापश्यावरनं दोन कळश्या आणुन म्या आंघुळ किली. मग डोक्यावर तेल थापुन म्या कापडं घातली. वायरीची पिशवी घीऊन मी उपाशीच शाळेत गीलू. संध्याकाळी जवा म्या घरी आलू तवा आण्णा जरशीची धार काढत हुता. "राती जेवला का न्हाय रं?, टोपल्यात काय आसलं तर खाऊन घी" धार काढत आण्णा बोलला. आल्या आल्या म्या दुरडी ऊघडली. त्यात दोन भाकरी व्हत्या. कालवण नव्हतचं. घरातली भांडीकुंडी आवरुन ठिवलेली. आर्धी भाकर म्या कुरडीच खाल्ली. पाणी पिऊन म्या खेळाय गीलू. लौपाट खीळुन घामाघुम हुन म्या परत घरी आलू. आण्णा सायकलवर किटली ठिवुन दुध घालाय चाल्लं हुतं. "सोन्या, आरं आयशीला जाऊन आता वरीस व्हत आलं, सकाळपारी तिला कशाला हाका मारत हुता, म्या गावातनं भाकऱ्या करुन आणल्यात. दुधाबर खाऊन आभ्यास करत बस. आलुच मी डिरीवरनं." आण्णा माज्या खांद्यावर हात ठिवुन काळजीनं बोललं. मी गप घरात जाऊन गुरजीनं दिल्याली गणितं पाटीवर सोडवत बसलु. पण भाईर आजपण कावदान सुटलं. छपरातनं पाणी आजपण टिपकाय लागलं. येवढ्या कावदानात आण्णा आज ऊशीराच येणार. मग घराबारात भांडीकुडी पसरवून चुलीम्होरं मी उपाशीच झुपी गीलू. भाकऱ्यांचे आवाज माज्या कानात घुमत ऱ्हायले. रातभर.
  • Log in or register to post comments
  • 6621 views

प्रतिक्रिया

Submitted by आनंद कांबीकर on Sun, 10/25/2015 - 00:36

Permalink

झक्कास

... दोन येळा वाचली.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Sun, 10/25/2015 - 01:23

Permalink

जव्हेर भौ

_____/\_____
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sun, 10/25/2015 - 01:56

Permalink

छान लिहिलंय, जव्हेरभाऊ.

छान लिहिलंय, जव्हेरभाऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sun, 10/25/2015 - 07:25

Permalink

जबरदस्त

मी पहीली कथा ही वाचली होती. ती थोडी गडबडलेली. पण तुम्ही आता बदललेली कथा म्हणजे अप्रतिम. ह्याला म्हणतात क्लास....... जियो "जव्हेरगंज" पुढिल लिखाणास मनपुर्वक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sun, 10/25/2015 - 10:37

Permalink

वा!दंडवत स्विकारा!!!

वा!दंडवत स्विकारा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 10/25/2015 - 12:19

Permalink

सुंदर !

सुंदर !
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Sun, 10/25/2015 - 12:45

Permalink

जबरदस्त लिहिता भाऊ!

जबरदस्त लिहिता भाऊ!
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Sun, 10/25/2015 - 12:47

Permalink

सॉरी!

मला पहिली वरिजिनलच जास्त आवडली होती. बांधावरच्या भांडणातून सदाकडे गेलेला आणि रात्रभर परत न आलेला बाप.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/25/2015 - 15:09

Permalink

भारी

भारी
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on Sun, 10/25/2015 - 15:16

Permalink

जबरदस्त लिहीले आहे

छान लिहिलंय, जव्हेरभाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 10/26/2015 - 08:17

Permalink

अप्रतिम!

क्या बात है जव्हेरगंज! शिंदळ पेक्षाही भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Mon, 10/26/2015 - 08:52

Permalink

छान

कथा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Mon, 10/26/2015 - 09:37

Permalink

.

.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 10/26/2015 - 09:45

Permalink

आवडली.

लहान मुलाचं भावविश्व आणि कठोर वास्तव ह्यांची हृदयस्पर्शी सांगड कथेत यशस्वीरित्या घातली आहे. कथेला दु:खाची किनार असली तरी आवडली कथा.
  • Log in or register to post comments

Submitted by शित्रेउमेश on Mon, 10/26/2015 - 11:08

Permalink

दोन्ही ही कथा मस्त जमल्यात...

दोन्ही ही कथा मस्त जमल्यात...
  • Log in or register to post comments

Submitted by माधुरी विनायक on Mon, 10/26/2015 - 12:13

Permalink

नि:शब्द...

तुमचे लेखन आवडते. कथा आवडली, असे म्हणवत नाही. दुखावून गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Mon, 10/26/2015 - 13:00

In reply to नि:शब्द... by माधुरी विनायक

Permalink

+१

असेच म्हणतो. जोरदार लिहीलंय
  • Log in or register to post comments

Submitted by मास्टरमाईन्ड on Mon, 10/26/2015 - 13:53

Permalink

..

अप्रतिम लिहिलंय पण..
सोन्या, आरं आयशीला जाऊन आता वरीस व्हत आलं
दुखावलं आत कुठेतरी
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Mon, 10/26/2015 - 20:42

Permalink

जबर्दस्त.......

जबर्दस्त.......
  • Log in or register to post comments

Submitted by धोणी on Tue, 10/27/2015 - 20:02

Permalink

क्लास

क्लास
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com