मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोकम माहिती

अनन्न्या · · रूची विशेषांक
कोकण प्रदेश निसर्गाने समृध्द आहे. प्रत्येक ऋतूत विविध फळे, भाज्या, फुले मुबलक प्रमाणात होतात. परंतु सुरवातीला शिक्षणाच्या अभावामुळे किंवा आहे त्यात समाधान मानण्याच्या वृत्तीमुळे कोकणी माणसाने स्वत:च्या उपजिविकेसाठी निसर्गाचा फार वापर केला नाही. आता मात्र परिस्थिती बदलते आहे. उन्हाळ्यात येणार्‍या करवंद, जांभुळ, फणस, आंबा, काजू, कोकम यासारख्या विविध फळांपासून अनेक टिकाऊ पदार्थ मोठया प्रमाणावर बनवले जाऊ लागले आहेत. आधीच्या पिढीतील शेतकरी नैसर्गिकपणे उगवणार्‍या झाडांवरच अवलंबून होता. परंतु आता व्यावसायिकदृष्ट्या या फळ्झाडांची लागवड करून त्यापासून जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी कोकम या फळाची माहिती देताना कोकण कृषी विद्यापिठाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या माहितीचे संकलन केले आहे. हे कोकमचे झाड. kokam कोकमाची फुले kokam लागवडः कोकम फळासाठी उष्ण दमट हवामान व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागते. कोकमाची लागवड पावसाच्या सुरवातीला करावी लागते. कोकमामध्ये रोपापसून लागवड केल्यास ५०% नर आणि ५०% मादी झाडे येतात. मादी झाडे जास्त येण्यासाठी त्याची कलमे लावणे आवश्यक आहे. लागवडीमध्ये ९०% मादी झाडे आणि १०% नर झाडे असावीत. कोकण कृषी विद्यापिठाने काही चांगल्या उत्पन्न देणार्‍या जाती विकसित केल्या आहेत. लागवड केल्यावर पहिली दोन वर्षे उन्हाळा व हिवाळयात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते. कोकमची फळे: फोटो आंतरजालावरून साभार kokam कोकमाच्या फळापासून विविध प्रकारे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. कोकमाच्या फळाची आतून रचना अशी असते. लेख लिहायला घेतला तेव्हा सिझन संपल्याने हे फोटो मिळू शकले नाहीत. फोटो आंतरजालावरून साभार. kokam कोकम सोलं किंवा आमसुलं: आमसुलांसाठी ताजी, लाल तयार कोकम फळे घ्यावीत. फळांच्या साली आणि आतील गर वेगवेगळे करावे. गराचे वजन करून एक किलो गरासाठी १०० ग्रॅम मीठ घ्यावे. गरात हे मीठ पूर्ण विरघळवून गाळून घ्यावे. सालींचे तुकडे गाळलेल्या रसात रात्रभर बुडवून ठेवतात. सकाळी बाहेर काढून परडीवर निथळत ठेवतात. निथळून आलेला रस झाकून ठेवावा. रस निथळला की साली उन्हात वाळवाव्यात. ही प्रक्रिया सात दिवस केली जाते. यालाच कोकणात फुट देणे असे म्हणतात. सात फुटांची काळीभोर आमसुले कडक उन्हात वाळवून प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये भरली जातात. आमसुलाचे सार, चटणी केली जाते. भाजी आमटीतही त्यांचा वापर केला जातो. आमसुले दोन दोन वर्षे चांगली टिकतात. kokam कोकम तेलः विविध पदार्थ तयार करण्यासाठी गर वापरून झाल्यावर कोकमच्या बिया स्वच्छ केल्या जातात. कडक उन्हात वाळवल्या जातात. वाळवल्यानंतर त्यावरचे जाड आवरण काढून टाकतात. त्यानंतर या बिया दळणीयंत्रातून बारीक करून आणतात. उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ उकळवतात. पाणी चांगले उकळून गार झाले की तेल वर येऊन घट्ट होते. यातेलाचे गोळे बनवतात, वाळवतात. कोकम तेल सौंदर्य प्रसाधने, औषधे, साबण यासाठी वापरतात. थंडीत पायाला भेगा पडणे, ओठ फुटणे यावर कोकम तेल रामबाण उपाय आहे. कोकम तेल खाण्यासाठीही वापरतात. kokam कोकम सरबत(अमृत कोकम): कोकम सरबतासाठी तयार टणक कोकम फळे झाडावरून उतरवून काढली जातात. ही फळे स्वच्छ करून त्यातील गर, बिया बाजूला करून सालाचे ४/६ तुकडे केले जातात. एक किलो सालांसाठी दोन किलो साखर आणि ५० ग्रॅम मीठ असे प्रमाण घेतले जाते. सालांमध्ये साखर, मीठ एकत्र करून प्लॅस्टीकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ८ ते १० दिवस ठेवतात. अधुनमधुन हे मिश्रण हलवावे लागते. पूर्ण साखर विरघळल्यावर तयार झालेले अमृत कोकम प्लॅस्टीकच्या बाटलीत किंवा कॅनमध्ये पॅक केले जाते. सरबत करताना १:५ या प्रमाणात पाणी, थोडी जीरे पावडर आणि लागल्यास मीठ मिसळून ताजे सरबत कोणत्याही मोसमात तयार करता येते. कोकम सरबत पित्तशामक आहे. kokam कोकम आगळः कोकम आगळ तयार करण्यासाठीही पक्व टणक फळे झाडावरून उतरवून काढली जातात. फळे स्वच्छ धुवून गर, बिया वेगळ्या कराव्या लागतात. सालींचे तुकडे करावेत, साली आणि गर यांचे एकत्रीत वजन करून एक किलोसाठी १५० ते २०० ग्रॅम मीठ घ्यावे. साली आणि गराच्या मिश्रणात मीठ मिसळून चार दिवस झाकून ठेवावे. चार दिवसांनी मिश्रणातील रस गाळून बाटल्यामध्ये भरावा. कोकम आगळची सोलकढी बनवली जाते. kokam अशा अनेक गोष्टींसाठी उपयोगी असे हे गुणी फळ मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास नक्कीच फायदेशीर आहे. आपणही आपल्या घरासमोर अशोकाची झाडे लावून शोभा वाढवतो, त्याऐवजी कोकमची झाडे लावल्यास तीही सरळ वाढतात, आकर्षक दिसतात आणि उत्पन्नही देतात, बघा विचार करून!

वाचने 38612 वाचनखूण प्रतिक्रिया 36

पैसा 16/10/2015 - 11:15
पार लहानपणात नेऊन पोचवलंस! झाडावरून रातांबे पाडून खाणे हा आवडता टैमपास असायचा! त्यातून शिल्लक राहिले तर आईला पन्हं करायला मिळायचे!

उत्तम माहिती दिलीस कोकमांबद्दल अनन्न्या !! फोटो ही सुरेख आहेत. कोकम तेल वापरून किती किती वर्ष झाली काय सांगू, लहानपणी दर हिवाळ्यात आई हे आम्हाला चोपडून शाळेत पाठवत असे, त्याचा सुवास ही वेगळाच. छान लिहिले आहेस, लेख आवडला :)

रेवती 16/10/2015 - 23:33
माहितीपूर्ण लेखन. कोकमाची फुले सुंदर दिसतायत. कोकम सरबत पाहून लगेच पिण्याची इच्छा होतीये पण माझ्याकडे अमृत कोकम नाहीये आत्ता. घरापुढे कोकमाची झाडे लावण्याची कल्पना आवडली.

प्रीत-मोहर 17/10/2015 - 10:59
कोकमला इथे भिंड म्हणतात.आणि त्याच्या बियांच्या तेलाला भिंडेल. हे भिंडेल काजुबियांच्या टरफलाच्या तेलासारखच बोटीच्या लाकडाला पावसाळ्यात आधी लावुन ठेवतात. बोटीच लाकूड खराब होउ नये म्हणुन.

नूतन सावंत 17/10/2015 - 21:38
लहानपणच्या सुरेख आठवणीत नेऊन पोचवलंस.माझी आजी सात पुटीची कोकमे बनवायची.त्यासाठी लागणारी कोकमे आणणे हे महत्वाचे काम असे.आम्ही सगळी मामे, मावस,भावंडं गाड्यांसोबत जात असू.किती मज्जा.ते रातांबे फोडून खाणं,आणि दातांवर ते पिवळं किटण चढवणं,हाहाहा. सुरेख लेख.

तुझ्यामुळे अशा कित्त्येक नवीन गोष्टी कळताहेत, म्हणजे मी फक्त फायनल प्रोडक्ट पाहिलाय पुर्वी, यातुन सगळी प्रोसेस कळतेय, तिही सोप्या भाषेत आणि फोटोसहित. कोकम सरबत, सोलकढी फार आवडते प्रकार.

प्रचेतस 18/10/2015 - 09:21
सुरेख लेख. आंबा घाटातल्या देवराईत भटकताना कोकमाची आंबटचिंबट पक्व फ़ळे भरपूर खाल्ली होती.

के.पी. 18/10/2015 - 14:43
आमच्याकडे नेहमी आमच्या घरच्या कोकमांचं आमसुल केलं जातं. तसंच कोकम तेलही विकत आणतो, ते मात्र कधी घरी केलेलं नाही. पूर्ण लेख वाचताना तोंड आंबट-आंबट झालेलं ;)

मांत्रिक 18/10/2015 - 16:03
कोकम विषयी अगदी नवी माहिती वाचायला मिळाली. पण माझ्या मते कोकम आगळ जर एखाद्या कोकणातील ओळखीच्या व्यक्तीकडून घरचं मिळालं तरच एकदम चांगलं दाटसर मिळतं. बाहेर बाजारात मिळणारं आगळ मला तर दोन तीन वेळच्या अनुभवानं इतकं खास वाटलं नाही. बाकी सोलकढी अतिशय आवडीची. नॉनव्हेज जेवण केलं तर हमखास केली जातेच.

गिरकी 19/10/2015 - 11:51
आईग्ग … आता परत असं शुध्द कोकम हवं झालंय … अलिकडे विकतच्या आगळ चे सरबत पिउन कोकम नकोसं झालेलं … आता शुध्द कोकमाची वाट पाहत बसायला लागणार !

Mrunalini 21/10/2015 - 15:45
छान झालाय लेख. कोकम सरबत माझे फेवरेट आहे. लहानपणी आई रोज रात्री झोपताना हे कोकमचे तेल चेहर्‍याला लावायला सांगायची. तेव्हा वैताग यायचा पण आता तेच खुप miss करतेय. त्या कोकम सरबताच्या फोटोमधली सोनचाफ्याची फुले बघुन मन प्रसन्न झाले. खुप खुप खुप खुप आवडतात मला ही फुले. फक्त फोटो बघुन दिल खुश हो जाता है.

अगदी कोकणात नेलेस ह्या लेखाने.. वाडीतली नारळीपोफळीबरोबरची रातांब्याची झाडं नजरेसमोर आली. माहितीपूर्ण! स्वाती

जुइ 26/10/2015 - 02:40
कोकमाचे झाड आणि फुले प्रथमच पाहिली. तसेच कोकमापासून तयार करण्यात येत असलेल्या पदार्थही खास आहेत. कोकम सरबत आवडते.

हेम 06/12/2015 - 00:52
प्रितमोहोर.. भिंड नव्हे भिरंड म्हणतात बियांना. तेलाला भिरंडेल (भिरंड्+ऑईल)= भिरंडेल.. आणि त्या बिया वाळवतांना राख लावून वाळवतात. लेखात रातांबा शब्द येयास हवा होता. कोकम सरबत गुळ घालूनही छान लागते