अल्केमिस्ट
लेखनविषय (Tags)
सकाळची नेहमीसारखी गर्दीची वेळ. तो चढला त्याच्यानंतर काही स्टॉप सोडून ती. खच्चून गर्दी होती बसला. सगळे लोंबकळत होते. काहीशी त्रस्त होऊन ती उभी होती. इतक्या गर्दीतही तिचा चेहरा त्याच्या बरोबर लक्षात राहिला होता. संध्याकाळीही दिसली पुन्हा. यावेळेस तिला खिडकीशेजारी जागा मिळाली होती. वार्याने उडणारे केस ती वैतागून मागे सारत होती. एका सीटवर जागा असूनही तो बसला नाही. त्या सीटवरून त्याला ती व्यवस्थित दिसणार नव्हती. त्याची नजर आपोआपच पुन्हा पुन्हा तिला न्याहाळत होती. खिडकीतून बराच वेळ बाहेर पहात होती ती. आपल्याला कुणीतरी बघतंय याच्याशी पूर्ण अनभिज्ञ. कंटाळल्यावर मग तिनं पुस्तक काढलं. तिनं काढलेलं पुस्तक पाहून तो मनातल्या मनात हसला. "अल्केमिस्ट" त्याचंही आवडतं पुस्तक. काही वर्षांपूर्वी वाचलं होतं तेव्हा त्यालाही खूप आवडल होतं ते. त्यातली काही खास वाक्य तो मित्रांशी गपा मारताना उगीच फेकायचा शायनिंग मारायला. ते सर्व आठवून त्याला तेवढ्या गर्दीतही मोठ्याने हसू आलं. आजूबाजूचे काय विचित्र माणूस आहे अशा नजरेने त्याला पाहू लागले. पण तो स्वत:च्याच धुंदीत. "when you really want something all the universe conspires in helping you to achieve it" आपल्या स्मरणशक्तीच कौतुक वाटलं त्याला.
त्यानंतर पुन्हा पुन्हा दिसत राहिली ती त्याच बसमध्ये. त्याला मग छंदच लागला तिला पहात राहण्याचा. दोघांच्या येण्याजाण्याच्या वेळाही जुळत असायच्या. कधी ती दिसली नाही की हा उदास व्हायचा. का बरं आली नसेल आज हाच विचार करत बसायचा दिवसभर. त्याचं हे पाहणं हळू हळू तिच्याही लक्षात येऊ लागलं होतं. पहिल्या पहिल्यांदा तो बघतोय म्हणल्यावर ती नजर चोरायची. उगीच इकडे तिकडे पहायची. पण आता तिचीही नजर धीट होऊ लागली होती. त्यानं पाहिल्यावर तीच रोखून पहायची त्याच्याकडे. ओशाळून मग तो पहायचा दुसरीकडे. तिच्याशी बोलायचं धाडस काही त्याला करता येत नव्हतं. आपल्या बोलण्याचा काय अर्थ लावेल ती असा विचार करायचा. तिलाही वाटायचं एकदा बोलाव त्याच्याशी. नक्की मनात काय आहे तुझ्या विचारावं चांगल खडसावून. पण मग वाटायचं दुर्लक्ष केलेलंच बरं. कशाला नसता व्याप मागे लावून घ्या.
मध्यंतरी काही दिवस दिसलीच नाही ती. पुन्हा दिसली तेव्हा खूप आनंदात होती. मस्त तयार होऊन आली होती. कंडक्टरला पास दाखवताना गोर्यापान हातावरची मेंदी आणि लांबसडक बोटांमध्ये चमचमणारी अंगठी पाहून तो समजायचं ते समजला. तो पहातोय हे लक्षात आल तिच्या. त्याच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकून ती पुन्हा तिच्या विश्वात गुंग झाली. आता तिचं बसनी येण जाणं जरा अनियमित झालं होतं. एकदोनदा स्टॉपवर दिसली पण चढली नाही. त्याला आश्चर्य वाटलं. काही वेळाने बाईकवर बसून गेलेली दिसली बसच्यापुढे. अगदी बिलगून बसली होती कुणालातरी. त्यानं एक नि:श्वास टाकला. आता नुसते असे उसासे टाकण्याशिवाय आणखी काय करू शकणार होता तो. तिच्याशिवाय बसमध्ये येण्याजाण्याची आता सवय होत होती त्याला.
नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असाव मात्र. एक दिवस त्याच्या ऑफिसच्या बिल्डींगमध्ये दिसली. दोन तीन वेळा लक्ष ठेवल्यावर त्याला कळलं ती तिथल्याच एका अकाउंटिंग फर्म मध्ये प्रोजेक्ट करायला येत होती. संध्याकाळी तिचा बॉयफ्रेंड यायचा बरेचदा घ्यायला. तो येणार नसेल तर ती बसने यायची. तिनं आपल्याविषयी काही सांगितलं असावं बॉयफ्रेंडला अशी उगीच शंका आली त्याला. आता ती चुकुनही त्याच्याकडे पहायची नाही. जरी कधी चुकून लक्ष गेलेच तर बघून न बघितल्यासारख करायची. तिच्या अशा नजरेनी तो भलताच अस्वस्थ व्हायचा. विचित्र अवघडल्यासारखं व्हायचं त्याला. मनाचा निर्धार करून तो शेवटी कारने ऑफिसला येऊ लागला. तिनं या गोष्टीची नोंद घेतलीच.
असेच काही महिने गेले असतील. आता काही ती ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये दिसायची नाही. बसने जात असली तर त्याला ते कळणार नव्हतं. ती नाही दिसली तर कधीतरी तिचा बॉयफ्रेंड तरी दिसला असता तिची वाट पहात. तेही नाही. त्याच्याच ऑफिसमधल्या दोन मुली तिच्याशी येता जाता बोलायच्या. त्यांनाच विचाराव सरळ असं त्याला वाटायचं. पण नंतर विचार केला उगीच अर्थाचा अनर्थ व्हायचा. असेल नशिबात तर भेटेल पुन्हा असं म्हणून त्यानं तो विषय मिटवून टाकला. त्याला एकच शंका होती मागे या दोन मुली अगदी कानगोष्टी करत काहीतरी बोलत होत्या. एकीने काहीतरी सांगितल्यावर मग दुसरीनं अगदी एक लाडू तोंडात बसेल एवढा मोठा आ केला होता. नंतर दोन्ही हाताने तोंड झाकून "ओह माय गॉड" असं काहीतरी बोलली होती. काय झाल असेल नक्की? ब्रेक अप तर नसेल झालं? पण आजकाल ब्रेकप तर सहज होत असतात. एवढं कुणी मनाला लावून घेत नाही ते. तिचं काही बरंवाइट तर? क्षणभर चर्र झाल त्याच्या काळजात. नुसत्या कल्पनेनच त्याचा थरकाप उडाला. त्याचं स्वत:च आयुष्यही काही सुरळीत चालू नव्हतं. आता ती येत नसेल बसने तर त्याच्या कारने जाण्यात काहीच अर्थ नव्हता. मग त्याने पुन्हा आपल्या बसच्या वार्या सुरु केल्या. ऑफिसमध्ये सगळ्यांनी चिडवलं त्याला, लागून लागून कसलं रे तुला बसचं व्यसन लागलं म्हणून. पण त्यानं ते सगळं हसण्यावारी नेलं. खरं कारण तो कुणालाच सांगू शकत नव्हता.
अशात एक दिवस ती त्याला पुन्हा दिसली स्टॉपवर. धक्काच बसला त्याला तिची अवस्था पाहून. चेहरा भकास. काळवंडलेला. डोळे तर इतके खोल गेलेले जणू महिनाभर उपाशी. ती तिथे उभी आहे हे तिचं तिला तरी कळत होतं की नाही काय माहितं? जाणीवा बधीर झाल्यासारखी दिसत होती. त्यादिवशी का कुणास ठाऊक त्याला तिच्याशी बोलावसं वाटलं. बस आली तरी तिचं लक्ष नव्हतं. तो जिथं बसला होता तिथून अगदी हाताच्या अंतरावर ती उभी होती. त्यानं हात हलवून तिचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
"ओ हेलो, येताय ना?" त्यानं विचारलं तशी ती काहीतरी आठवल्यासारखं बसमध्ये चढली. वर येउन त्याला थैंक्स म्हणाली. तो नुसताच हसला. आता पुन्हा ती नियमित दिसायची बसमध्ये. आधीचा अनोळखीपणा आता हळू हळू गळून पडत होता. दोघं एकमेकांकडे बघून हसायचे. हाय हेलो ओघाने सुरु झालंच. आता त्याचं तिच्यासाठी जागा पकडणही सुरु झालं होतं. कधी कुणी यावरून बसमध्ये भांडू लागलं की तो उठून त्याची जागा तिला देऊ लागला.
एक दिवस असेच दोघं संध्याकाळी घरी जाताना भेटले. नेमकी सीटही एकच मिळाली. बराच वेळ शांतता होती. काहीवेळाने तिनं पुस्तक काढलं वाचायला. त्यानं पाहिलं आणि त्याला हसूच आलं. काय झालं अशा प्रश्नार्थक चेहऱ्याने तिनं त्याच्याकडे पाहिलं.
"अजून हेच?"
"अजून म्हणजे?" तिनं गोंधळून विचारलं.
झालेली चूक त्याच्या लक्षात आली पण अजून सारवासारव करण्यात अर्थ नव्हता.
"अजून म्हणजे मागेही एकदा हेच पुस्तक पाहिलं होतं तुझ्याकडे."
"आवडतं मला. सध्या गरज आहे याची."
"खरं सांगू, मलाही. मी घरी जाउन वाचतोच एक पान न चुकता."
"हं कुणाला या पुस्तकात काय मिळेल सांगता येत नाही. मला उद्याचा दिवस वेगळा असेल ही आशा मिळते, तुला?"
"मी सहसा ही गोष्ट बोलत नाही कुणाजवळ पण काही दिवसांपूर्वी एक्सीडेंट झाला माझा. मरता मरता वाचलो. तेव्हापासून आपल्याला जी आवडते ती गोष्ट दिवसातून काही वेळ काढून करतोच. वाचायला आवडत मला."
ती पुन्हा शांत बसली. खिडकीतून बाहेर बघत त्याला कंटाळा आला. त्यानंच मग विचारलं,
"राग येणार नसेल तर एक विचारू?"
"शुअर"
"तू पुन्हा बसने...?ब्रे..क अ...प?"
"गेला तो. एक्सीडेंट"
"ओह आय अम सो सॉरी.. मला खरच कल्पना नव्हती असं काही झालं असेल अशी… शीट!"
"इटस ओके. आय अम ओके नाउ" असं म्हणून ती पुन्हा पुस्तक वाचू लागली.
तोही मग खिडकीतून बाहेर बघत बसून राहिला. अधून मधून त्याच लक्ष आपोआप तिच्याकडे जात होतं.वार्याने उडणारे केस ती वैतागून मागे करत होती. पुस्तकाच ती वाचत असलेलं पान खूप फडफडत होतं. त्या पानावरची ती अक्षरं त्याच्यापुढे फेर धरून नाचत होती.
"and when you really want something all the universe conspires in helping you to achieve it."
प्रतिक्रिया
+१
जशीच्या तशी आधीच वाचली आहे.
नाय बा. कालच टाकली पहिल्यांदा
मस्तच
अच्छा तो सारी कायनात वाला
चांगली आहे कथा!
and when you really want
पॉलोचं आवडलेलं एकमेवं पुस्तक!
वा !
कथा आवडली
छान लिहिलेय.
आवडली कथा
:) ओपन एंडेड ठेवायचा प्रयत्न
सर्वांचे खूप आभार!
+१
सुंदर लिहिलंय!!! मनाच्या अगदी
सुंदर लिहिलंय :)
वा!
सुंदर
उत्तम जमलंय...
अल्केमिस्ट आवडत पुस्तक आहे.
लेख आवडला , रच्याकने
लेखनशैली आवडली.
मी या पुर्वीचे हि आपले लेखन
जबरदस्त ट्विस्ट. कथा फारच