✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पहिल्या नजरेतलं प्रेम.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 10/16/2015 - 08:15  ·  लेख
लेख
"ज्यामुळे क्षणार्धात कुणाच्या तरी आपण प्रेमात पडावं,एखाद्याला ओळखत नसतानाही त्याच्या जवळ आपलं मन उघडं करून टाकावं, आणि आपली मनोभावना पाहून त्याने ती स्विकारावी वा स्विकारू नये,आपल्यात अश्या प्रकारची, प्रेमात पडण्याची क्षमता, असणं त्या क्षमतेला काय म्हणावं.?" सुशा,उषा आणि निशा अशा ह्या तीन बहीणी.प्रत्येकाची वागण्याची तर्‍हा आणि विचार निरनीराळे.सुशा योग्य वयात लग्न करून संसाराला लागली. आपल्या संसारात ती सुखी होती.उषा तशी दिसायला चांगली.बॉलीवूडमधे नाचाच्या कोरसमधे मिळणार्‍या कामात समाधान रहायची. एखाद्या सिनेमात हिरोईनबरोबर जादा एक्सपोझर मिळाला तर तिला धन्य वाटायचं.कदाचीत मागे पुढे स्वतःला हिरोईनचा लग्गा लागला तर लागला अशा प्रयत्नात असायची.आता आता तिला टी.व्ही.सीरियलमधे थोडी कामं मिळायला लागल्याने चेहर्‍याला जरा एक्सपोझर जास्त मिळतो म्हणून समाधान होती. तिचं टी.व्ही. वरच्या एका कॅमेरामन बरोबर लग्न ठरलंय म्हणून त्यावेळी एकदा मला निशा भेटली होती तेव्हा तिने मला उषाबद्दल,आपल्या बहीणीबद्दल, सांगीतलं होतं ते आठवलं. निशा पण उषापेक्षा दिसायला एक पायरी उत्तम वाटायची.पण निशाचं फॅड म्हणजे तिला लग्न करायचंच नव्हतं.लग्न करून आपलं स्वातंत्र्य आपण हिरावून बसतो असा तिचा समज होता.निशाला मागण्या बर्‍याच यायच्या.आता पर्यंत किती मुलगे सांगून आले त्याची ती गणती ठेवायची. मी एकदा तिने न-विचारलेला उपदेश तिला दिला-म्हणजे ज्याला अनसॉलिसीटेड ऍडव्हाईझ म्हणतात-तो. मी निशाला म्हणालो होतो, "तरूण वयात काही व्यक्तींची जरा खास मतं असतात.जसं लग्न न करण्याच्या तुझ्या मतासारखं. अर्थात हा प्रत्येक व्यक्तिचा खासगी प्रश्न असतो यात वाद नाही.पण वडीलधार्‍या मंडळीच्या अनुभवावरून म्हण किंवा आणखी काही म्हण,वय निघून गेल्यावर मग लग्न होणं जरा कठीण होतं आणि लग्न वेळेवर न केल्याने त्यातून येणार्‍या काही समस्यांना तोंड द्यावं लागतं.आणि विशेष करून आपल्या समाजात स्त्रीवर्गाला तो दाह जास्त सहन करावा लागतो.तू बहुश्रूत आहेस तुला, "जास्त सांगणे न लगे."" त्यावेळी मला निशा म्हणाल्याचं आठवतं, "काका,मी तुमच्या मताशी सहमत आहे.पण आता परिस्थिती बदलली आहे.स्त्रीया सुशिक्षीत झाल्या आहेत. आपल्या पायावर उभ्या राहू शकतात. स्वतःची देखभाल स्वतः करू शकतात.लग्न झाल्यावर,मग मुलं होणं ओघाने आलं.त्या मुलांचं संगोपन.त्यांच्या जबाबदार्‍या.अर्ध आयुष्य त्यात निघून जातं.तुम्ही कदाचीत म्हणाल "त्यातच मजा असते,तेच तर जीवन असतं वगैरे वगैरे." पण खरं सांगू मला लग्नात स्वारस्य नाही." निशाच्या बोलण्याचा कल पाहून माझं बोलणं आवरतं घेत मी तिला एव्हडंच म्हणालो होतो, "पसंत अपनी अपनी और ख्याल अपना अपना." पुढे मी तिला म्हणालो, "पण निशा, ह्या वयात कधी कधी, "पहिल्या नजरेतलं प्रेम होतं." आणि मग, आपल्यात अश्या प्रकारची क्षमता असणं, की ज्यामुळे क्षणार्धात कुणाच्या तरी आपण प्रेमात पडावं, एखाद्याला ओळखत नसतानाही त्याच्या जवळ आपलं मन उघडं करून टाकावं,आणि आपली मनोभावना पाहून त्याने ती स्विकारावी वा स्विकारू नये,आपल्यात अश्या प्रकारची क्षमता असणं, अशा त्या क्षमतेला काय म्हणावं?. पहिल्या नजरा-नजरेतल्या प्रेमाबद्दल जरा उपहास केला जातो.आणि नंतर सुखी संसार करणारी जोडपी अगदी हंसून सांगायला धजतात की ते आमचं "पहिल्या नजरेतलं प्रेम होतं." पण खरं सांगायचं तर निशाच्या मनात जे विचार आले ते विचार त्यावेळी माझ्या मनात नव्हते. जीवनाच्या नंतर नंतरच्या टप्प्यात एक वेळ अशी येते की कुणी तरी आपल्याबरोबर असावं ज्याला हिंदीत "हमसफर" म्हणतात,तसं वाटायला लागतं.अशावेळी एखादीचा नवरा किंवा एखाद्याची बायको "हमसफर" असते.ते नाहीच झालं तर आपलीच मुलं आपल्याबरोबर असूं शकतात किंवा नातवंड आपल्याबरोबर असूं शकतात.म्हणूनच लग्न करणं हे अनेक कारणामधे हे एक कारण असू शकतं. आणि म्हणूनच हा सगळा व्याप पुढच्या दृष्टीने फायद्याचा असतो. आता हे सगळ्यांच्या बाबतीत खरं होईल असं नाही.पण त्या आशेवर माणूस जगतो. हे सगळं सांगण्याचं कारण,ह्यावेळी खूप वर्षानी मी निशाला तिच्या घरी भेटायला गेलो होतो.त्यावेळी मला जरा धक्काच बसला.निशा त्याच घरात रहाते जिथे तिचे आईवडील राहायचे ते मला माहित होतं. कारण आपल्या मुलीने -निशाने-लग्न केलेलं नाही तेव्हा पुढे मागे त्यांच्या पश्चात त्यांच्या जागेत तिने रहावं अशी त्या दोघांची इच्छा होती तसं एकदा मला दोघानीही बोलून दाखवलं होतं. ह्यावेळी मी तिच्या दरवाज्याची बेल दाबली त्यावेळी एका दहा-बारा वर्षाच्या मुलीने दरवाजा उघडला.सूंदर हंसली.आणि का कुणास ठाऊक, "कोण हवंय तुम्हाला?" असा प्रश्न मला विचारण्या ऐवजी, "आई कुणीतरी तुला भेटायला आलंय." असं मोठ्याने ओरडून सांगून, "मी जाते गं!.रात्री उशीर होईल. माझी काळजी करूं नको" असं म्हणून, दरवाज्यात माझ्या मागे दोन तिच्याच वयाच्या मुली उभ्या होत्या, त्यांच्याबरोबर ती गेली. "माधुरी,कोण गं आलंय?" असा प्रश्न करीत ते पहाण्यासाठी निशा दरवाज्याजवळ आली तेव्हा मला ओळखायला तिला वेळ लागला नाही.मी आत शिरता शिरताच तिला प्रश्न केला, "आई! म्हणून तुला हांक मारली त्या मुलीने,तुझं लग्न केव्हा झालं?,तू तर लग्न करण्याच्या विरोधात होतीस.मग विचार कसा बदललास? आणि तुझी मुलगी हंसली तेव्हा मला ती तुझ्यासारखीच खूप सुंदर दिसली, विशेषकरून तिच्या उजव्या गालावरची खळी पाहून,हंसताना मला ती जास्त मोहक वाटली." गप्प सगळं ऐकून घेत निशाने मला हाताने खूणावीत बसायला सांगीतलं.आणि म्हणाली, "हे सर्व प्रश्न तुमच्याकडून मला अपेक्षीत होते.आणि बर्‍याच वर्षापूर्वीचं तुमचं आणि माझं ह्या लग्नाच्या विषयावर बोलणं झालं होतं त्याची आठवण येऊन ते दिवस आठवले." खरं सांगू का त्यावेळी तुम्ही म्हणालेल्या ह्या पहिल्या नजरेतल्या प्रेमावर माझा नंतर विश्वास बसला. मला वाटायचं की मी नुकत्याच भेटलेल्या कुणालाही माझं सर्वस्व द्यायला प्रवृत्त व्हावं.मला वाटतं हे प्रेम वास्तवीक प्रेम असतं,खरं प्रेम असतं. असल्याच प्रकारच्या प्रेमाने त्यावेळी माझ्या जीवनात चांगला बदल आणला." माझं कुतूहल वाढवीत निशा कोड्यात बोलत होती. मी निशाला म्हणालो, “ तू केलंस ते बरंच केलंस.मला फक्त एव्हडाच प्रश्न पडला की तुझ्या विचारात एव्हडा बदल व्हायचं कारण काय असावं?” "मी तुम्हाला सर्व हकीकत सांगते.त्यावेळी माझा लग्न करण्यात विरोध होता हे नक्कीच.त्यावेळची ती माझी वचनबद्धताच तुम्हाला वाटली असेल.पण मधल्या काळात पुलाखालून खूप पाणी वहालं.तुम्हीपण सातासमुद्रापलीकडे रहायला गेला.सहाजीकच तुम्हाला झालेल्या घटना कशा कळणार.?” अजूनही निशा कोड्यातच बोलत होती.आणि माझं कुतूहल पराकाष्टेला गेलं होतं. मी तिला म्हणालो, “तुझं कुणाशी लग्न झालं.? इंजीनीयर का डॉक्टर का वकीलाशी.?” “ह्यापैकी कुणाशीही माझं लग्न झालं नाही.” थोडा विचार करीत निशा मला म्हणाली.आणि पुढे म्हणाली, “खरं सांगु का?शब्द देणं,वचनबद्ध असणं असले प्रकार आपल्या मध्यम वर्गीयांत जास्त असतात.नव्हेतर मध्यम वर्गीय असण्याचीच ही एक ओळख आहे.तसं बघितलंत तर,गरीब वर्गात वचनबद्धता हा प्रकारच नसतो.कारण बिचार्‍यांना प्राप्त परिस्थितीला सतत तोंड द्यायचं असतं.जीवनातल्या येणार्‍या वाकड्या वळणाच्या वाटेवरून दिवस काढताना जीव मेटाकुटीला आलेला असतो.तो बिचारा वचनबद्धता कुठे संभाळत बसणार.आणि हां!श्रीमंत वर्गात वचनबद्धता कधीच बाळगली जात नाही.नव्हेतर तसं केल्यास श्रीमंत होणंच जमणार नाही.असं माझं मत आहे.तुम्हाला काय वाटतं?” निशाच्या ह्या सरळ प्रश्नावर उत्तर देताना मला एक कोकणातली गोष्ट आठवली. मी तिला म्हणालो, “निशा,तू म्हणतेस ते मला पटतं.मध्यम वर्गात वचनबद्धता पाळणं हा शिष्टाचार समजला जातो हे नक्कीच.आणि म्हणूनच आपण मध्यम वर्गात रहातो.बाकी गरीब वर्गात आणि श्रीमंत वर्गात होतं ते तू म्हणालीस ते तंतोतंत खरं आहे. अंत्या अंतरकराची ह्यावेळी मला आठवण आली, तो म्हणायचा, “बाकी,आमचो दाजी अगदी वचनाक जागणारो.एकदा वचन दिल्यान की दिल्यान.मग फांदी मोडो किंवा पारंब्यो तुटो, दाजी वचनापासून हलूचो नाय.” पण ते जाऊं दे.तू जी ही मला उदाहरणं देतेस त्यावरून मी समजूं का तुझं कुणातरी साहित्यिकाशी लग्न झालंय.एखादा पिएचडी,प्रोफेसर. डॉ.प्रो.अमूक अमूक. कारण अशा माणसाच्या लेक्चरचे परिणाम तुझावर झाले असावेत असं आपलं मला वाटतं.” माझं हे ऐकल्यावर निशाला आता मला जास्त काळ ताटकळत ठेवायला जरूरीचं भासलं नसावं. जास्त आढेवेढे न घेता ती मला म्हणाली, "काही वर्षापूर्वी मी पहिल्या नजरेत एकाच्या प्रेमात पडले. माधुरीच्या. एका तिन वर्षाच्या मुलीच्या. तिने केलेलं एकच स्मित-हास्य तुमच्या चेहर्‍यावर हसूं आणील असं होतं.तिच्या एका मधूर हास्याने एखाद्याचं रिक्त मन भरून येईल असं मला त्यावेळी वाटलं. मी ज्या दिवशी माधूरीला भेटले त्यादिवशी मला आठवतं हवेत कमालीचा उष्मा होत होता.जवळ जवळ चाळीस डीग्री तपमान असावं.आणि बाहेर हवा पण कमालीची चीडचीडी होती.नुकतीच मी माझ्या कामावरून घराकडे आली होती. अगदी आमच्या घराच्या पायर्‍या समोर कुरकुर आवाज करणार्‍या झोपाळ्यावर बसून एक मुलगी आपले नाजूक पाय जमीनीवरच्या मातीत खूपसून मागे पुढे झोका घेत बसली होती. संध्याकाळची वेळ असली तरी उकाडा होत होता.मी घामाघूम झाली होती. आणि जीव नकोसा झाला होता.मी त्या मुलीच्या जवळ गेली तेव्हा तिने वर पाहिलं.तिचे ते काळेभोर डोळे सूर्याच्या उन्हाकडे पाहून किलकीले झाले होते.तशातही ती माझ्याकडे बघून खुदकन हंसली.मी तिच्याजवळ त्या झोपाळ्यावर बसले आणि तिला झोका देऊ लागले.झोपाळा हलताना गार हवेची झुळूक येत होती.त्यामुळे अंमळ बरं वाटत होतं.ती मला आणखी चिकटून बसली.नंतर मी तिला माझ्या मांडीवर घेतलं.मोठ्या झोक्याने जरा थंड हवा अंगावरून गेल्याने मला आणखी बरं वाटलं.तिने दिलेलं ते हास्य पाहून मला तिची कीव आली. कारण ते तिचं हंसं मला उपेक्षित वाटलं.तिच्या नकळत ते उपेक्षित हंसं मला बरंच काही सागून गेलं.मी त्यातून एक शिकले की ,कसं का असेना कधी कधी प्रेम आपली जागा शोधून काढतं. मला तिच्याकडून कळलं की तिची आई वर आमच्या घरात काम करीत आहे.आमच्या कामाला येणार्‍या बाईला सहाएक मुलं असावीत. ही सगळ्यात धाकटी असं मला कळलं.हिला, आमची बाई घरी घेऊन आलेली, पूर्वी मी कधी पाहिलं नव्हतं. अगदी गरीब कुटूंबातलं हे शेंडे फळ इतरांबरोबर जगण्याच्या प्रक्रियेत जगत होतं.एका खांद्यावर फाटलेला आणि तिच्या शरीरापेक्षा मोठा असलेला तो झगा तिच्या दुसर्‍या खांद्यावरून खाली घसरत राहायचा आणि तो ती वर करण्याच्या प्रयत्नात असायची.पण काही कारणाने ती माझ्याशी लगट करताना माझ्यावर एव्हडी विश्वासलेली दिसली की पैसा आणि उपभोग्य वस्तूंच्या गराड्यात सांपडलेलं हे जग तिच्या कडून मिळणार्‍या प्रेमाला विसरलं आहे असं मला त्यावेळी भासलं. त्यावेळी मला दिसलेल्या एका साध्या उपेक्षितेकडून मिळालेल्या त्या नाचणार्‍या प्रसन्नेतेचा नादवृंद माझ्या शिवाय आणि कुणीही ऐकू शकलं नसेल. पहिल्या नजरा-नजरेतल्या प्रेमावर माझा भरवंसा त्यावेळी वाढला. त्या प्रेमाबरोबरच माझा तो घामाने डबडबलेला चेहरा आणि ती तिन वर्षाची मला चिकटून बसलेली मुलगी माझ्या नजरेतून निसटली नाही." "मग ही मुलगी तुझ्याकडे कशी राहायला आली.? माझा स्वाभावीक प्रश्न होता. निशा म्हणाली, "थोडे दिवस मी जाऊ दिले.माधुरी तिच्या आई बरोबर वरचेवर आमच्याकडे यायची.आमचं एकमेकावरचं प्रेम लक्षात घेऊन मी तिच्या आईला एकदा सांगायचं धारीष्ट केलं. "राहू देत ह्या मुलीला माझ्याकडे. मी तिला वाढवीन,चांगलं शिकवीन.ती तुझीच मुलगी आहे.फक्त माझ्याकडे राहते असं समज." तिच्या आईला "आंधळा मागतो एक ...." असंच झालं. दहा बारा वर्षं कशी निघून गेली ते कळलंच नाही.ती शिकायला पण हुशार आहे.आता तर ती मला माझ्या मैत्रीणी सारखीच वाटते." हे सगळं ऐकून मी निशाला म्हणालो, "खरंच प्रेमाला उपमा नाही.असं म्हणतात ते खोटं नाही.प्रेम आंधळं असतं हे ही चुकीचं नाही.पण प्रेमाचे अनेक प्रकार आहेत.आणि स्त्री ही खरीच प्रेमपुजारी आहे.आई,बायको,बहीण,मैत्रीण आणि अशा अनेक प्रकारची त्या पुजार्‍याची तिची रुपं आहेत.आणि त्यात श्रेष्टतम रूप म्हणजे, स्त्रीचं आईचं रूप.ते अनकंडीशनल प्रेमाचं रूप आहे.निसर्गाने स्त्री-जन्म देऊन कमाल दाखवली आहे. मघाशी तुला तुझी माधुरी, "आई कुणीतरी तुला भेटायला आलंय." असं म्हणून निघून गेली ते ऐकलेलं आठवून माझा तुझ्याबद्दलचा आदर आता द्विगुणीत झाला.” निशा, माझी ही शिफारस ऐकून खूप भावूक झाली. ती आपल्या पदराने आपले डोळे पुसत होती.ते अश्रू होते आनंदाचे.आणि माझ्या डोळ्यातले पण. श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
5148 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

वाह मस्तच,

कविता१९७८
Fri, 10/16/2015 - 08:56 नवीन
वाह मस्तच,
  • Log in or register to post comments

खूप छान. सुंदर!

एस
Fri, 10/16/2015 - 10:55 नवीन
खूप छान. सुंदर!
  • Log in or register to post comments

पहिल्या नजरेतलं प्रेम....

शित्रेउमेश
Fri, 10/16/2015 - 11:06 नवीन
पहिल्या नजरेतलं प्रेम.... खूपच सुंदर... मन प्रसन्न करणारा अनुभव....
  • Log in or register to post comments

आवडलं!

अत्रे
Fri, 10/16/2015 - 11:31 नवीन
आवडलं!
  • Log in or register to post comments

खूप छान

अमृत
Fri, 10/16/2015 - 15:19 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments

लिखाण पटलं. जरा आवडलं ही.

द-बाहुबली
Fri, 10/16/2015 - 20:20 नवीन
लिखाण पटलं. जरा आवडलं ही.
  • Log in or register to post comments

छानच... :)

मदनबाण
Fri, 10/16/2015 - 20:54 नवीन
छानच... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-नगाड़ा संग ढोल बाजे ढोल बाजे... :- Goliyon Ki Raasleela Ram-leela
  • Log in or register to post comments

खुप छान

बासुंदी
Sat, 10/17/2015 - 23:40 नवीन
अगदी माझ्यी मनातील लिहील आहे.... निशा सा रखेच विचार आहेत माझे...
  • Log in or register to post comments

फारच सुंदर लेख आहे हा

एक एकटा एकटाच
Sun, 10/18/2015 - 09:16 नवीन
फारच सुंदर लेख आहे हा
  • Log in or register to post comments

खूप छान कथा...

खटपट्या
Sun, 10/18/2015 - 10:30 नवीन
खूप छान कथा...
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

पाटीलअमित
Sun, 10/18/2015 - 10:50 नवीन
सुंदर लेख
  • Log in or register to post comments

मस्त .....

अभिजीत अवलिया
Sun, 10/18/2015 - 19:03 नवीन
मस्त .....
  • Log in or register to post comments

:)

रातराणी
Sun, 10/18/2015 - 21:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा