आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
15 Oct 2015 - 11:13 pm

आरोग्यशास्त्रात सतत नवे शोध लागत असतात आणि त्यामुळे पूर्वी असाध्य समजल्या जाणार्‍या अनेक व्याधींवर नवनवीन उपाय निघाले आहेत हे आपण सर्वजण जाणतोच. पण हे सर्व कसे होते याबद्दल त्या क्षेत्रातले काही शात्रज्ञ अथवा तंत्रज्ञ सोडले तर इतर लोक अनभिज्ञ असतात. हे बरेचसे संशोधन रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये (अंडर लॅबोरेटरी कंडीशन्स) रुक्ष काटेकोर नियम पाळून केले जाते. मात्र हे सर्व करण्याअगोदर, करताना आणि ते करून मिळालेल्या निष्कर्षांचा अन्वयार्थ लावताना शात्रज्ञ आणि तंत्रज्ञ किती कल्पकता वापरतात याचा इतिहासही मनोरंजक असतो. एका रोगासाठी केलेले संशोधन इतर कुठल्यातरी व्याधीसाठी उपयोगी आहे हे अपघाताने पुढे आले, असे प्रसंगही कमी नाहीत. या संशोधनांमागे शात्रज्ञ अथवा तंत्रज्ञ यांची चाकोरीबाहेर जाऊन स्वतंत्र विचार करण्याची शक्ती (आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग) वापरण्याचे कौशल्य वादातीत असते. त्यातली काही उदाहरणे युद्धशास्त्रातला अथवा हेरशास्त्रातला वस्तुपाठ ठरू शकतील अशी आहेत.

अश्याच एका संशोधनाच्या रूपाने वरील परिस्थिती अधोरेखीत झाली आहे. त्याबद्दल थोडीशी रोचक माहिती.

गरोदर महिलांमध्ये मलेरिया जीवघेणा ठरू शकतो. डेन्मार्कमधील शास्त्रज्ञ हे कसे टाळता येईल यावर संशोधन करत असता त्यांना असे आढळून आले की मलेरियाचे जंतू एक प्रोटीन अणू तयार करतात. हा अणू गरोदर मातेच्या प्लासेंटाच्या (मातेपासून बाळाकडे अन्न व प्राणवायू नेणारा अवयव) पेशींकडे आकर्षित होतो व मलेरियाच्या जंतूंना प्लासेंटाला धोका पोहोचवण्यास मदत करतो.

बाळ आणि मातेमधील अनन्य दुव्याचे काम करणार्‍या प्लासेंटाच्या पेशींची वाढ फार वेगाने होते. केवळ काही महिन्यांच्या थोड्याश्या अवधीत, केवळ थोड्याश्या पेशींपासून सुरुवात करून, हा अवयव जवळ जवळ एक किलो वजनाचा होतो. ही वाढ होण्यास पेशींच्या आवरणातील एक कार्बोहायड्रेट अणू मदत करतो. मलेरियाच्या जंतूतील प्रोटीनचा अणू याच कार्बोहायड्रेट अणूंकडे आकर्षित होऊन प्लासेंटाच्या पेशींना चिकटतो.

ट्यूमर (कॅन्सर व इतर प्रकारच्या अनियंत्रित वाढी) या व्याधीमध्येही पेशींची वाढ फार मोठ्या वेगाने होते. प्लासेंटामध्ये होणारी पेशींची वाढ नियंत्रित व उपयोगी असते तर ट्यूमर या व्याधीत पेशींची वाढ अनियंत्रित व धोकादायक असते. मात्र दोन्हीमध्ये पेशींची वाढ होण्यास तोच एक कार्बोहायड्रेट अणू कारणीभूत असतो.

संपूर्णपणे वेगळ्या व्याधींसाठी (गरोदरपणातील मलेरिया व कॅन्सर) चाललेल्या संशोधनांतील हे साम्य कल्पक शास्त्रज्ञांनी हेरले. त्यांनी मलेरियाच्या जंतूचा प्रोटीन अणू घेतला व त्याचा पेशींचा नाश करू शकेल अश्या विषाच्या अणूशी संयोग केला. हा नवीन अणू वेगाने वाढणार्‍या ट्यूमरच्या पेशीवरील कार्बोहायड्रेट अणूकडे आकर्षित होऊन पेशीला चिकटतो व तिच्यात प्रवेश करतो. पेशीमध्ये विषाचा अणू वेगळा होऊन पेशीचा नाश करतो.

थोडक्यात, या संशोधनात, एका शत्रूकडून (मलेरिया) तंत्रज्ञान घेऊन शास्त्रज्ञांनी ते दुसर्‍या शत्रूविरुद्ध (कॅन्सर) वापरले आहे !

सद्या हे तंत्रज्ञान उंदरांमध्ये यशस्वीरीत्या वापरले गेले आहे. मानवात वापरण्यासाठी त्याला अजून बरेच गुंतागुंतीचे शास्त्रीय सोपस्कार पार पाडावे लागतील. मात्र, यशस्वी झाल्यास ते कॅन्सरच्या उपचारात एक क्रांतिकारक मैलाचा दगड ठरेल.

तंत्रऔषधोपचारबातमी

प्रतिक्रिया

विद्यार्थी's picture

15 Oct 2015 - 11:17 pm | विद्यार्थी

डॉक्टरसाहेब, उत्तम माहितीपूर्ण लेख आहे हा. औषधांचे संशोधन कश्याप्रकारे होते याबद्दल ढोबळ पण कोणालाही समजावी अशी माहिती यातून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

एस's picture

15 Oct 2015 - 11:22 pm | एस

अजून येऊ द्यात.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2015 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा

+++११ १

जेपी's picture

16 Oct 2015 - 10:08 am | जेपी

+११११११

जातवेद's picture

16 Oct 2015 - 11:51 am | जातवेद

+११११

द-बाहुबली's picture

15 Oct 2015 - 11:23 pm | द-बाहुबली

सुरेख माहिती. जरा विस्तार हवा होता, पण तरीही कुठेही दर्जात्मक घसरण नसल्याने लिखाण आवडले.

प्यारे१'s picture

15 Oct 2015 - 11:45 pm | प्यारे१

और भी आने दो

छान लेख. याविषयी अधिक वाचायला आवडेल.

व्यायाम न करता कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी असे काही आहे का? ;)

उगा काहितरीच's picture

16 Oct 2015 - 12:49 am | उगा काहितरीच

सापडल्यास दुवा द्यावा , दुवा मिळतील .

सच्चिदानंद's picture

16 Oct 2015 - 1:51 am | सच्चिदानंद

हा हा हा.. हे तर आमच्या देशात कधीच शोधलेलं होतं हो एक्का साहेब, फक्त ती ग्रंथालये जाळली म्हणून आत्ता पुरावे नष्ट झाले हो. पण ते हिस्ट्री चॅनलवर प्रोग्रॅम आला होता त्यात त्यांनी सांगितलं होतं बघा. ;)

सुधीर कांदळकर's picture

16 Oct 2015 - 6:27 am | सुधीर कांदळकर

विषय फारच आकर्षक, गुंग करणारा आहे. इथल्या खेडेगावातील सलूनमधल्या सकाळ - गोवा बेळगावी आवृत्तीत ढोबळ माहिती वाचल्याचे आठवले. गुगल स्कॉलरवर काही तपशील मिळतात का शोधतो.

लेख फारच आवडला. धन्यवाद.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Oct 2015 - 6:50 am | कैलासवासी सोन्याबापु

शॉर्ट स्वीट किलर!! कसलं हैपनिंग जग आहे राव!!

ईए काका माझा एक प्रश्न आहे,

हल्क ह्या इंग्लिश चित्रपटात दाखवले आहे तसे रेपिड ऑर्गन रीजनरेशन शक्य आहे का हो? नाही सिनेमा इतके क्विक तरी ऑर्गन रीजनरेशन होऊ शकते का? स्टेम सेल चा उपयोग ह्यात कसा होतो?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Oct 2015 - 7:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रॅपिड रिजनरेशनचं माहिती नाही पण ३-डी प्रिंटेड बायो ऑर्गन्स विषयीचे व्हीडीओज उपलब्ध आहेत. शिवाय विकीपेडियावरचं हे पेज वाचा.
https://en.wikipedia.org/wiki/Organ_printing

रेवती's picture

16 Oct 2015 - 6:53 am | रेवती

माहिती आवडली. बर्‍याच रुग्णांसाठी आशादायक आहे.
धन्यवाद.

आहे. एका शत्रूचा वापर करुन दुसर्‍या शत्रूचे उच्चाटण करणे. यावरती आणखीन विस्ताराने लिहिता येईल का?

-रंगा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Oct 2015 - 7:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फुल्टु बाउंन्सर गेला. काट्याने काटा काढला एवढं फक्तं समजलं. रच्याकने असचं काही कोलेस्ट्रॉल ला करता नाही येणार का मोदकाने विचारल्याप्रमाणे? असं काही घटकद्र्व्य सोडायचं रक्तामधे की कोलेस्ट्रॉलचं न्युट्रल लिक्वीदमधे रुपांत व्हायला हवं. अर्थात प्रमाणात नाहीतर पाणी पाणी व्हायचं सगळं.

(वैद्यक अडाणी) कॅजॅस्पॅ!!!

माझ्या समजुतीनुसार योग्य आहाराने आणि व्यायामाने शरीरातील एचडिएल म्हणजे चांगले कॉलेस्टेरॉल वाढते जे एल्डिएल म्हणजे वाईट कॉलेस्टेरॉलला धमन्यातून वाहून लिवरकडे घेऊन जाते. तिथे त्याचे विघटन होऊन पातळी नियंत्रित होते म्हणूनच व्यायामाचे महत्त्व अबाधित आहे! म्हणजे ऑलरेडी अशी व्यवस्था आपल्या शरीरात आहेच आपण फक्त त्याला जराशी मदत करायची की झाले! :)

मनीषा's picture

16 Oct 2015 - 7:43 am | मनीषा

माहितीपूर्ण लेख

... आणि शिर्षक देखिल कल्पक .

मुक्त विहारि's picture

16 Oct 2015 - 8:09 am | मुक्त विहारि

आवडला....

आरोग्यशास्त्र खरंच अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे.सोप्या शब्दातला हा लेख आवडला.

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 8:50 am | कविता१९७८

छान माहीती

मदनबाण's picture

16 Oct 2015 - 9:18 am | मदनबाण

छान माहिती... और भी आने दो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नगाड़ा संग ढोल बाजे ढोल बाजे... :- Goliyon Ki Raasleela Ram-leela

सोप्या भाषेतली माहिती आवडली.

सुधांशुनूलकर's picture

16 Oct 2015 - 9:56 am | सुधांशुनूलकर

उपयुक्त महिती सोप्या शब्दात मांडलीत.
काही अंशी 'सेरेंडिपिटी'सारखं झाल.

आरोग्यशास्त्रातल्या अशाच काही शोधांबद्दल, घडामोडींबद्दल खरंच लिहा एक्काकाका. तुमच्या लेखनशैलीमुळे ते खूप इंटरेस्टिंग होईल.

दत्ता जोशी's picture

16 Oct 2015 - 10:10 am | दत्ता जोशी

कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर जर उपाय सापडला तर एक मोठा ब्रेक थ्रू असेल. संशोधकांना विशेष शुभेच्छा.

बोका-ए-आझम's picture

16 Oct 2015 - 10:48 am | बोका-ए-आझम

तुमच्यासारख्या शिक्षकांनी जीवशास्त्र शिकवलं असतं तर मी नक्कीच मेडिकलला जायचा विचार केला असता. _/\_

पद्मावति's picture

16 Oct 2015 - 11:19 am | पद्मावति

उत्तम लेख. कठीण वैद्यकीय माहिती सोप्या शब्दात मांडल्यामुळे लगेच कळली.
कॅन्सर वर उपाय मिळाला तर फार बरं होईल.

अरे वा! या जगातही असली खणाखणी चालते हे ऐकून लय भारी वाटलं. अजून येऊद्या असेच काही लेख!!!

टवाळ कार्टा's picture

16 Oct 2015 - 12:06 pm | टवाळ कार्टा

अज्जुन ल्हिहा की....अश्या टैपच्या लेखांमुळेच मिपावर यावेसे वाटते

सुबोध खरे's picture

16 Oct 2015 - 12:17 pm | सुबोध खरे

एक्का साहेब
वैद्यकीय जगतावर असे माहितीपूर्ण लेख अजून येउद्या. तुमची लिहण्याची पद्धत आणि शैली फारच छान आहे. लोकांना नवीन संशोधनाबाबत चांगली माहिती मिळेल.
अजून येऊ द्या हि विनंती.

मार्मिक गोडसे's picture

16 Oct 2015 - 12:41 pm | मार्मिक गोडसे

बीबीसी वर ह्या विषयावरचा व्हिडिओ बघितला होता, जीन थेरेपीत जिवाणू व विषाणूंचा वापर करून कँसर आटोक्यात येऊ शकतो असे त्यात अ‍ॅनिमेशनद्वारे सोप्या भाषेत दाखविले होते. शोधून लिन्क देतो.

साधा मुलगा's picture

16 Oct 2015 - 2:23 pm | साधा मुलगा

काल का परवाच ह्या संबंधीची माहिती toi मध्ये आली होती, तुम्ही सोप्या शब्दात सांगितली याबद्दल धन्यवाद.
त्याच बरोबर बाजूला आणखी एक महत्वपूर्ण बातमी आरोग्याविषयी आली होती,
http://timesofindia.indiatimes.com/home/science/Why-antibiotics-arent-ef...
या बातमीनुसार antibiotics ना resistance तयार होण्याचे कारण म्हणजे antibiotics चाचणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे आढळून आले आहे, कारण यांच्या अभ्यासानुसार antibiotics lab टेस्ट मध्ये bacteria च्या विरुद्ध उपयोगी ठरतात, तर मानवी शरीरामध्ये ती निष्प्रभ ठरतात. याचे कारण म्हणजे bacteria lab मध्ये आणि मानवी शरीरात वेगळ्या पद्धतीने 'behave ' करतात असे आढळून आले.

पदम's picture

16 Oct 2015 - 3:13 pm | पदम

अजून येऊ द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Oct 2015 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना अनेकानेक धन्यवाद !

रोचक पद्धतिने समोर आलेले एक नवीन संशोधन मिपाकरांना सांगावे असे वाटले म्हणून हा लेख लिहीला. ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी एका त्रोटक लेखाचे स्वागत केले ते मिपाकर गंभीर विषयांत किती रुची ठेवून आहेत याचेच द्योतक आहे.

============================================================

@ सोन्याबापु आणि कॅजॅस्पॅ :

सर्व जीवांची सुरुवात केवळ एका पेशीनेच होते... मानवात (आणि जीवनविकासाच्या शिडीवर वरच्या जागी असलेल्या बहुतेक सर्व जीवांमध्ये) त्या पेशीला आपण सर्वसाधारणपणे "फलित अंडे" या नावाने ओळखतो. या अंड्याचे विभाजन होऊन २, ४, ८, १६... अश्या असंख्य पेशी बनतात. एकंदरीत, मानवाचे सर्व अवयव आणि त्यातल्या सर्व पेशी त्या एकाच फलित अंड्यापासून तयार झालेल्या असतात. मानवी शरीरातल्या विकसित पेशीं असंख्य आकाराच्या असल्याने त्यांची एकूण संख्या केवळ अंदाज असू शकते. सर्वसाधारण मानवात अंदाजे १५ ट्रिलियन (१५,०००,०००,०००) पेशीं असतात तर काहींच्या मते ती संख्या ३७ ट्रिलियन इतकी मोठी असू शकते.

फलित अंडे विभाजित होताना पहिल्या काही विभाजनांतून तयार झालेल्या पेशींमध्ये शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या पेशींमध्ये परावर्तीत होण्याचे गुणधर्म शाबूत असतात. अश्या पेशींला "स्टेम सेल" म्हणतात. वृक्षाची फांदी (स्टेम) नवीन फांद्या, पाने, फुले, फळे हे वृक्षाचे विविध अवयव तयार करण्यास सक्षम असते, या रुपकावरून त्या पेशींना हे नाव दिले गेले आहे. जसजशी अधिक विभाजन व वाढ होऊन पेशींचे परावर्तन खास नेमून दिलेले काम करणार्‍या पेशींत होते, तसतसा हा गुणधर्म लुप्त होत जातो. म्हणजे, "सैंधान्तिकरित्या" स्टेम सेल पासून कोणत्याही अवयवाची निर्मीती करता येऊ शकते (अर्थातच हे काम वास्तवात तितकेसे सोपे नाही) पण पूर्ण विकसीत झालेल्या पेशीपासून इतर प्रकारच्या पेशी बनवता येऊ शकत नाही (उदा : कातडीच्या पेशीपासून मुत्रपिंड किंवा हाताच्या स्नायूच्या पेशीपासून हृदयाचे स्नायू बनवता येत नाहीत).

बाळाचा जन्म होण्याअगोदर अथवा जन्म झाल्यानंतर गर्भ, प्लासेंटा, अंबिलिकल कॉर्ड मधेले रक्त इत्यादी मधून स्टेम सेल्स जमा करता येतात. हा विषय मानव जन्माशी संबंधीत असल्याने आणि त्याला धार्मीक रंग असल्याने असल्याने खूप वादग्रस्त ठरला आहे. स्टेम सेल्स जमा कराव्या की नाही आणि केल्यास कोणत्या उगमापासून कराव्यात याबद्दल प्रत्येक देशात तेथिल परिस्थितीप्रमाणे काय कायदेशीर आहे/नाही हे ठरवले जाते... आणि हे कायदे वेळ-दरवेळ शास्त्रिय संशोधनाला उप-/अप-कारक असतिल असे बदलत राहीले आहेत.

तसेच, पूर्ण वाढ झालेल्या मानवाच्या अस्थिमज्जेत आणि तेथे तयार होऊन रक्तातून फिरणार्‍या काही पेशींतही स्टेम सेल्सचे गुणधर्म असतात. त्यांचा उपयोग काही व्याधींचा उपाय करण्यासाठी केला जातो.

***

स्टेम सेल्स वापरून ३डि प्रिंटिंग तंत्राने अवयव बनविण्याच्या दिशेने अनेक प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी युकेतील एडींबरा येथील हेरिऑट-वॉट विद्यापिठातील (Heriot-Watt University in Edinburgh) शास्त्रज्ञांनी एक खास ३डि प्रिंटर बनवलाअ आहे. पण हे तंत्र अजून बाल्यावस्थेत आहे आणि गुंतागुंतीचे अवयव बनविणे हे एक शास्त्रिय स्वप्न आहे.

आग, अपघात अथवा इतर कारणांनी नष्ट झालेल्या कातडीच्या जागी, त्याच माणसाच्या इतर ठिकाणच्या कातडीच्या पेशी स्प्रे पेंटिंग करून नवीन कातडी काही दिवसातच निर्माण करता येते हे सिद्ध झाले आहे. हा उपाय सद्याच्या कातडी रोपण तंत्रापेक्षा कमी किचकट, जास्त लवकर व उत्तम परिणाम देणारा आहे असेच दिसत आहे. हे तंत्र पुढच्या काही वर्षांत सर्वसामान्य उपचार म्हणून वापरले गेले तर आश्चर्य वाटणार नाही.

***

कोलेस्टेरॉल हा एक अत्यंत महत्वाचा पण तितकाच वैद्यकीय अर्थ-राजकारणाने बरबटलेला विषय आहे. त्याबद्दल थोडक्यात लिहीणे कदाचित अधिक गोंधळ वाढवणारे ठरेल. पण महत्वाचे मुद्दे असे:

१. शरीरातील बहुतेक सर्व पेशी कोलेस्टेरॉल तयार करतात. कोलेस्टेरॉलशिवाय मानवी (आणि बहुतेक सर्व प्राणी) जीवन अशक्य आहे.
२. कोलेस्टेरॉल हा एकच पदार्थ (अणू) नसून रसायनशास्त्रातील एकाच कुटुंबातील (समान गुणधर्माच्या) अनेक अणूंना एकत्रितपणे कोलेस्टेरॉल असे नाव दिलेले आहे.
३. शरीर कोलेस्टेरॉल वापरून अनेक संप्रेरके (हॉर्मोन्स), पिताशयातील आम्ले व ड व्हिटॅमिन तयार करते. अर्थातच, कोलेस्टॅरॉल अभावी मानवी जीवन अशक्य आहे.
४. कोलेस्टेरॉल सरसकट धोकादायक पदार्थ नाही, तर विविध प्रकारची कोलेस्टेरॉल्स योग्य तौलनिक प्रमाणात शरीरात असणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
५. खाद्यातल्या कोलेस्टेरॉलचे आणि रक्तातल्या कोलेस्टेरॉलचे तडक गुणोत्तर नाही, याबाबत शास्त्रिय वर्तुळातही अनेक प्रवाह आहेत. ते तडक गुणोत्तर आहे आणि काही औषधे त्यावर उपायकारक आहेत असे ठामपणे सांगण्यामागे औषध कंपन्यांचे अर्थ-राजकारण आहे असे म्हणणार्‍या शास्त्रज्ञांचा गटही फार लहान नाही.

============================================================

@ साधा मुलगा :

अँटिबायोटिक्सची किंवा मानवी उपचारात वापरल्या जाणार्‍या कोणत्याच औषधाची/उपकरणाची चाचणी "केवळ" प्रयोगशाळेत होत नाही.

कडक नियमबद्ध प्रणाली वापरून प्रयोगशाळा, प्राण्यांवरच्या चाचण्या, प्रत्यक्ष रुग्णांवरच्या चांचण्या यशस्वी झाल्यावरच ते संशोधन व्यवहारात येऊ शकते. याशिवाय हल्ली प्रत्येक देश, स्वतःच्या नागरिकांवर चाचण्या करून त्या यशस्वी झाल्याशिवाय, कोणतेही संशोधन आपल्या देशात वापरू देत नाही. औषधांचे परिणाम माणसांच्या जनुकीय जडणघडणीप्रमाणे वेगळे असू शकतात. म्हणजेच युरोपिय देशांतील चाचण्याचे परिणाम आशियातील नागरिकांमध्ये मिळतीलच असे नव्हे. विषेशतः औषधांच्या बाबतीत हा नियम कसोशीने पाळला जातो.

अँटिबायोटिक्सची परिणामकता कमी होण्यासाठी मुख्य कारणे अशी:
१. वैद्यकीय व्यावसायिकांनी आणि रुग्णांनी अँटिबायोटिक्सचा बेजबाबदारपणे केलेला अती/कमी प्रमाणातला उपयोग.
२. डॉक्टरच्या प्रिस्किप्शनशिवाय औषधे मिळणे आणि चुकीची (नको असलेली) औषधे वापरून रुग्णाने स्वत:चा उपचार स्वःत करणे.
वरच्या कारणाने जंतूंमध्ये त्या औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, अर्थातच, औषधांची परिणामकता कमी होते. इतरही काही कारणे आहेत. पण ही बहुदा आढळणारी व जास्त महत्वाची आहेत.

============================================================

संगणक-स्थापत्य-अभियांत्रिकी मधील अनेक तंत्रे मानवी व्याधींचे उपचार करण्यासाठी वापरणे ही गोष्ट आता वैद्यकीयशास्त्रात चांगलीच रुळू लागली आहे. आळसातून वेळ मिळाला की त्याबद्दल सविस्तर लिहायचे आहेच ;) :)

मोदक's picture

16 Oct 2015 - 8:16 pm | मोदक

रोचक माहिती. धन्यवाद.

एक सहज सुचवतो आहे.. शक्य असल्यास एकंदर व्यायामप्रकार आणि त्याचे शरिरावर होणारे चांगले परिणाम याची माहिती अशाच सोप्या पद्धतीने लिहाल का?

उदा. व्यायाम केल्याने शरिराची प्रतिकारशक्ती वाढते. मात्र शरिरामध्ये नक्की कोणते बदल होतात ज्यायोगे प्रतिकारशक्ती वाढते? असे काहीसे..

शिव कन्या's picture

17 Oct 2015 - 5:36 pm | शिव कन्या

आशादायक माहिती.

मृत्युन्जय's picture

17 Oct 2015 - 6:41 pm | मृत्युन्जय

रोचक माहिती

आतिवास's picture

17 Oct 2015 - 10:46 pm | आतिवास

सोप्या भाषेत माहितीपूर्ण लेख.
पण आटोपता घेतल्यासारखा वाटला.

पैसा's picture

17 Oct 2015 - 11:29 pm | पैसा

बर्‍याच लोकांसाठी अतिशय चांगली बातमी ठरू शकेल!

निनाद's picture

18 Oct 2015 - 10:27 am | निनाद

विषयाला धरून तांत्रिक माहिती इतक्या सुलभपणे सांगता तुम्ही, ते वाचायला आवडते.
प्रतिसादही माहितीपुर्ण आहेत. लेखन आणि मांडणी आणि त्यातून घडवलेली चर्चा सगळेच आवडले आहे...