Skip to main content

छि _ _

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 10/10/2015 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
छि _ ल, पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता. मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून युपी-बिहारी वाटत होते, त्यातील एकाने भरपूर घेतली होती (सुवास पसरला होता), त्याला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, त्याचं विमान टेक-ऑफ करून ढगांपल्याड पोचलेलं सहज कळत होतं. हे लोक सरळ लेडिज जवळ येऊन रेलू लागले, अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय, आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती. तिथल्या एका मुलीने गोडीत त्यांना पुरूषांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले, तेवढयापुरतं सरकल्यासारखं करून पुन्हा त्यांनी तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. तो पायलट यात आघाडीवर होता. इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा त्याला समज देत होते तर तो त्यांनाच बुढ्ढा क्या बक रहा है इ. अचकट विचकट शेरे मारायला लागला. अशावेळेस स्त्रिया जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरचा चिडून काय करेल, बोलेल याचा नेम नसतो, त्यामुळे मी दुर्लक्ष करत होते, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभी राहिले होते. कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं सरळमार्गी मत. त्या मुलीलाही मी समजावत होते की सांगून सुधारणार्‍यांपैकी ते लोक नाहीत, उगीच नादी लागू नको, पण तीही हट्टाला पेटली होती. बोलता बोलताच तिने ओढणी पूर्ण चेहर्‍याला घट्ट बांधून घेतली होती, माझाही स्कार्फ होताच.( साध्याशा स्कार्फ मुळेही काहीवेळेस किती आश्वासक, सुरक्षित वाटतं ते अशा चेहर्‍यावर स्कार्फ, स्टोल इ. बांधणार्‍या मुलींना नावं ठेवणार्‍यांना कसं कळावं.) तो अजून बरळतच होता, खुदको मिस इंडिया समझती है, ये कोई लडकी है क्या.. काहीही फुटकळ कमेंट्स चालू होते. तीही चिडून त्याला धडा शिकवायच्या इराद्याने काही-बाही सुनावत होती. तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेला तो शिवी देऊन मोकळा झाला.. छि _ ल, सा _ !! ................ ................ त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता. मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी.. त्यानंतर मात्र सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कंडक्टरला त्या तिघांना खाली उतरवण्यास भाग पाडले, एवढा वेळ मजा बघणार्‍या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, एकदाची बस पुढे निघाली. ती मुलगी शेजारील मुलीला तिने अशा किती लोकांना कसं सरळ केलं त्याचे किस्से सांगू लागली होती. माझ्या कानात मात्र राहून राहून ती शिवी घुमत होती, अंगावर अ‍ॅसिड ओतल्यावर कसं वाटत असेल तसं काहीसं ते शब्द कानावर पडल्यावर वाटलं होतं.. याआधी फक्त चित्रपट, पुस्तके, टिव्ही इ.वर ऐकलेलं एवढया जवळून प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव पहिलाच. इतकी वाईट शिवी देण्यामागे तसंच काही कारण असावं तर तेही नव्हतं.. कोणासाठी होती ती शिवी ? त्याला विरोध करणार्‍या त्या मुलीसाठी, माझ्यासाठी, बसमधील इतर महिलांसाठी ? पूर्ण स्त्रीजाती साठीच कदाचित.. काय नव्हतं त्या शिवीमध्ये ? राग, तिरस्कार, विखार, वासना ? सगळंच, त्याशिवायही अजून काही.. त्याच्यात आणि बाकी लोकांत असणार्‍या सामाजिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक सर्वच बाबतीतील विषमतेमुळे आलेले, वर्षानुवर्षे साठलेले कुठले कुठले गंड त्या एका शिवीतून बाहेर पडले होते. त्या क्षणी मनात चमकून गेलं ते १६ डिसे, निर्भया प्रकरण. त्या घटनेनंतर, एक व्यक्ति दुसर्‍या व्यक्तिशी इतकं निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या कसं वागू शकते हा प्रश्न कायम पडायचा, त्याचं उत्तर थोडंफार मिळाल्यासारखं वाटलं. दोन्ही घटनांमध्ये इतर काहीही समान नाही, फक्त एकच - मनोवृत्ती. वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती टिपीकल पुरूषी मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं, मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये, जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये.. एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता. अर्थात हे सरसकटीकरण नाही. समाजातील काही ठराविक वर्गांतील ठराविक लोकांचीच अशी मनोवृत्ती असेल. त्यावेळी मला अशा समाजात राहणार्‍या स्त्रियांसाठी वाईट वाटत होतं ज्यांच्यासाठी या आणि याहून वाईट शिव्या ऐकणे रोजचेच असेल, नेहमीच्याच शिव्या आणि मारहाणीने ज्यांच्या संवेदना बधीर झाल्या असतील. त्याचवेळी या विचाराने हायसं वाटत होतं की सुदैवाने आपला जन्म एका सुशिक्षित, सुसंस्कृत परिवारात झालाय, आपण अशा समाजात वावरतो जिथे साधारणपणे अशी प्रवृत्ती लांबपर्यंत दिसून येत नाही, जिथे आपल्याला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आहे. जिथे आपल्याला बर्‍यापैकी सन्मान मिळतो, कमी लेखलं जात नाही, जिथे पुरूष स्त्रियांबद्दल टोकाचे वाईट विचार करत नाहीत, जिथे सामान्यतः नवरे-बायकांना, मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहिणींना, पुरूष स्त्रियांना रिस्पेक्ट देतात,शिव्या नाही. म्हटलं तर ही एक किरकोळ घटना, पण डोक्यात खूप सारे विचार, त्रास, मनस्ताप देऊन गेली. अर्थात हा काही एकमेव प्रसंग नाही, असे अनेक नकोसे अनुभव येतच असतात, फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही तो एक स्त्री असल्याबद्दलचा पश्चात्ताप एका क्षणापुरतं का होईना, जाणवून गेला.. इतकंच..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31410
प्रतिक्रिया 225

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

अनाहिता काय अन सनावृता काय
तुम्ही दिलेला अनुभव हा एक सामाजिक असहिष्णुतेचा दाखला आहे. यात अनाहितांचा काय संबंध आहे? का तुम्ही स्त्री दाक्षिण्य अनाहितांच्या बाबतीत दाखवुन थकलात असा काही तुमचा रोख आहे? आणि सनावृत्ता शब्दाचा अर्थ जरा समजावुन सांगाल का प्लीज. कुणी ही सांगावा. मला नीटसा अर्थ कळलेला नाहीये.

In reply to by स्रुजा

आणि सनावृत्ता शब्दाचा अर्थ जरा समजावुन सांगाल का प्लीज. कुणी ही सांगावा. मला नीटसा अर्थ कळलेला नाहीये.
जसा अनाहिता हा ग्रूप आहे तसाच सनावृत्ता हाही एक ग्रूप आहे असे कळते. बाकी निव्वळ अनाहिताचे नाव आले म्हणून लगेच पवित्रा घेतला गेल्याची मज्जा वाटली.

In reply to by बॅटमॅन

कुठे आहे सनावृत्ता ग्रुप? पवित्रा तुम्ही घेतलाय , मी नाही. माझा एक साधा प्रश्न आहे की या अनुभवाशी अनाहिताचा काय संबंध? यावर काही मजेमजेत उत्तर आहे तुमच्याकडे?

In reply to by स्रुजा

सनावृत्ता ग्रूप वत्सप्पवर आहे असे कळते. प्रगो यांच्या अनुभवात उल्लेख आल्याने एकदम भांडायच्या पवित्र्यात प्रश्न विचारलेला पाहून खरेतर हसूच आले तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अनाहिता ग्रूपमध्ये फक्त स्त्रिया असतात तर तूर्तास सनावृत्ता ग्रूपवर पुरुष आहेत. त्यामुळे स्त्री काय किंवा पुरुष काय असे म्हणायचे असावे असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

अहो, प्रश्न कुणाला, तुम्हाला काय कामं धामं नाहीत वाटतं ? मला आहेत त्यामुळे तुमचं पवित्रा म्हणजे काय याविषयी संबोधन करणं मला शक्य असलं तरी फारसं गरजेचं वाटत नाही. प्रगोंनी सांगावं की वरील अनुभवात अनाहितांचा काय संबंध आहे. सनावृत्ता नावाचा पुरुषांचा ग्रुप आहे का? बर बर, असेल हो असेल. पण तरी "शब्दाचा अर्थ काय" याचं "तो ग्रुप आहे" हे एक हास्यास्पद उत्तर का आलं असेल बरं? हां पवित्रा म्हणजे काय हे नेमकं सुधरत नसेल तर असं होत असावं. अजुन एक प्रश्न अनुत्तरीत आहे च, वरील अनुभवात अनाहितांचा काय संबंध? संबंध नाही तर मग अनाहिताचा उल्लेख का हा साधा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला बगल देत तुम्ही माझा पवित्रा काय, मी भांडतेच आहे असले तुमच्या भाषेत "वैयक्तिक उल्लेख" करताय. पण मुद्द्याला मुद्द्याने उत्तर नाही देता आलं की तुम्ही भांडताय, तुम्ही उसळताय, तुमचा पवित्रा पाहुन हसु आलं असे गुद्दे मारणार्‍याला काय म्हणायचं ? वैयक्तिक हल्ला नाही हा, नाही का? हां तुमचा वैचारीक पवित्रा असेल !! कशाला वाद वाढवताय? मी सरळ प्रश्न विचारला होता, तिरका सूर तुमचा लागला तो ही दुसर्‍याच कुणाला तरी विचारलेल्या प्रश्नासाठी. हां, आणि माझी काळजी तुम्ही करताय? वाह !! हसायचं असतं का अशा " पवित्र्यासाठी " ? नाही, तुम्ही एक्स्पर्ट दिसताय म्हणुन विचारते.

In reply to by स्रुजा

त्यामुळे स्त्री काय किंवा पुरुष काय असे म्हणायचे असावे असे वाटते.
हेच म्हणायचे होते !
शब्दाचा अर्थ काय
आधी हा अर्थ पाहु : http://shabdkosh.raftaar.in/Meaning-of-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A… http://dict.hinkhoj.com/words/meaning-of-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B9%E0… अनहित ह्या शब्दाचा अर्थ An ill disposed person असा होतो , शेवटी आकारान्त प्रत्यय लावल्याने त्यातुन स्त्री भाव दाखवला जातो , अर्थात अनाहिता म्हणजे कुटील वृत्तीची दुत्त दुत्त स्त्री , मला भेटलेल्या त्या बस मधील काकु ह्या अशाच कुटील वृत्तीच्या होत्या म्हणुन अनाहिता हा शब्द वापरला . प्लीज नोट : हा शब्द मी बनवलेला नाही अनेक अगदि ऐतिहासिक काळा पासुन हा शब्द वापरात आहे . अनाहिता ही एक इराणियन पर्शियन देवी होती आणि आपल्या कडे पर्शियन लोकांना असुर मानतात . https://en.wikipedia.org/wiki/Anahita अनाहिता ही एक कोळ्यांचीही एक किळसवाणी प्रजाती आहे हे पहा : Anahita punctulata https://en.wikipedia.org/wiki/Anahita_(spider) anahita त्या वाईट वागणार्‍या कुटील काकुंचा उल्लेखही मी सौजन्याने करावा अशी अपेक्षा आहे काय ? मिपा सारख्या सुसंस्कृत स्थळावर शिविगाळ करायला नको म्हणुन त्यातल्या त्यात कमी वाईट शब्द वापरला !! असो . हा प्रतिसाद उद्या पर्यंत टिकला तर सनावृता ह्या शब्दाचा अर्थ समजावुन सांगेन ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

माझ्या अल्पमतीप्रमाणे अनहित ला आकारान्त प्रत्यय लावल्यास अनहिता होते अनाहिता नाही . जाणकार कन्फर्म करतील काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि आपल्याकडे एक काना असल्याने / नसल्याने शब्दांचे अर्थ वेगळे होतात. अनाहिता ही अनाहिता ही एक इराणियन पर्शियन देवी आहे .आणि wikipedia म्हणतो Only Arədevī (a word otherwise unknown, perhaps with an original meaning "moist") is specific to the divinity. It might have been derived from Arya devi[1] The words sūra and anāhīta are generic Avestan language adjectives,[3] and respectively mean "mighty" and "pure" [4][5] (or "immaculate").[1] Both adjectives also appear as epithets of other divinities or divine concepts such as Haoma[6] and the Fravashis.[7] Both adjectives are also attested in Vedic Sanskrit.[8]

मला एक गोष्ट इथे सिरीयसली सांगायची आहे. स्त्री काय पुरुष काय.. नमुने सगळीकडेच असतात. चांगले वाईट अनुभव हे येणारच. अब्जावधी लोकांचे दोन सरसकट ग्रुप नाहीच करु शकत आपण. त्यामुळे सोन्याबापु किंवा अधाशी उदय ह्यांना जसे अनुभव आले, तसे अनुभवही अत्यंत सर्रास येतात. जसं पुरुषाला चटकन "आया बहिणी आहेत की नाहीते.." हा प्रश्न विचारला जातो.. तसंच स्त्रीलाही अनेकदा आपला "बाप..भाउ.." अशा प्रसंगातुन जाउ शकतो ह्याची जाणीव असते.. असायला हवी. पण आपल्या समाजात अजुन तरी स्त्रियांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. वर चतुरंग आणि पेठकर काका इ. च्या प्रतिसदातुन ते व्यवस्थित मांडलेले आहे. अशाने स्त्रिया आधीच तलवारी काढुन फिरत असतात. आणि त्याला पर्यायही नाही. कुणावर विश्वास ठेवायची सोय नाही हे खरंय. परवा मी कॅब करुन घरी आले तर एक तर सतत कुणाला तरी फोन लावला होता, बाकी वेळ हातात मोबाईल वर १०० डायलर मध्ये टाईप करुन ठेवलं होतं. त्या मनुष्यानी मला व्यवस्थित सोडलं. पण सतत सावध रहाणं ही माझीही गरज होऊन बसली आहे. आजुबाजुच्या घटनांनी माझी मनस्थिती तशी केली आहे त्याला माझ्याकडेही पर्याय नाही. पण असे असताना, समाजात चांगले पुरुषही आहेत ह्याची आम्हाला जाणीव नाही असं अजिबात नाही. पैसाताईने वर म्हणल्या प्रमाणे चुक गोष्टीला आम्ही चुकच म्हणतो. अनाहिताचा मोटो हा सरसकट स्त्रियांना विदाऊट क्वश्चन पाठिंबा देत रहाणे हा नाहीचे.. अनेकांचा असा गैरसमज असला तरीही.. ह्यानिमित्ताने मला चतुरंग, बिका, सोन्याबापु, तर्राट जोकर आणि इतर अनेक पुरुषांना धन्यवाद द्यावे वाटतात की जिथे जिथे एखाद्या स्त्रीला केवळ एखाद्या प्रसंगी मदतीचीच नाही तर एक स्त्री म्हणुन तिचे सामाजिक प्रश्न जाणुन घेण्याचीही गरज होती.. तिथे तुम्ही आम्हाला मदत केलीत. आजकाल केवळ कुणी हे मुद्दे समजुन घेतले तरी पुष्कळ झालं असं वाटतं. आम्हाला त्यावर उपाय काढायचे नाहीचे आणि केवळ कुणीतरी आमच्या व्यथा ऐकुन आम्हाला नुसता सहान्भुतीचा खांदा द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे असं कुणाला वाटत असेलही.. पण अर्थात तो त्यांचा गैरसमज आहे हे नम्रपणे नमुद करते. सर्वसाधारणपणे स्त्रिचा स्वभाव हा लहान सहान मुद्द्यांमध्ये गुंतुन रहाण्याचा असला तरी प्रश्नांना उत्तर शोधायची गरज तिला वाटत नसती तर आजही आम्ही चुल आणि मुल ह्यामध्येच अडकुन पडलो असतो. त्यामुळे अशी काही विधानं करुन प्लिस स्त्रियांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करु नका. त्यांच्या पद्धती तुमच्यहुन वेगळ्या असल्या तरी निरुपयोगी निश्चित नाहीत. इथल्या सर्वांनी मतभेद असुनही का होईना, समस्या आहे हे मान्य केलं आणि त्यावर विचार तरी केला. त्याबद्दल धन्यवाद!

माझ्या प्रतिसादांतून अनावधनाने काही चुकीचे लिहिले गेले असल्यास मनापासून क्षमस्व. कुणाच्याही बुद्धीमत्तेची, सामाजिक सन्मानाची, कष्टांची खिल्ली उडवण्याचा खरोखर उद्देश नव्हता. एखादी परिस्थिती आत्ता आहे त्यामागे शेकडो वर्षांचा इतिहास, करोडो माणसांचे कर्म कारणीभूत असते. त्या प्राप्त परिस्थितीवर तात्कालिक विनोदी संदर्भाने पाहिले तर, लगेच, तो शेकडो वर्षांचा इतिहास उकरून काढून, 'पहिले अंडं कि पहिले कोंबडी'चे वाद आरंभणे निरर्थक आहेत असं माझं मत आहे. माणुस अशाने डीनायल मोडमधे जातो, जबाबदारी घेत नाही, परिस्थिती बदलण्यास तयार होत नाही. फक्त 'ते विरुद्ध आम्ही'चे अनुत्पादक वाद उभे राहतात. आज जे असंख्य बाबतीत आपण पाहतो ते की, सतत कुणीतरी आमच्यावर अन्याय/अत्याचार केला चे पालुपद आळवत असतात. दलित-सवर्ण, बहुजन-ब्राह्मण, हिंदू-मुस्लिम इत्यादी नेहमीचे वाद. स्त्रीयांचा प्रश्नही यातलाच. या वादांना शेकडो वर्षाची पार्श्वभूमी आहे, पण हे वाद उगाळत बसायचे की वर्तमान खूपच सुधारलेल्या परिस्थितीला आधार बनवून भविष्यकालिन योजना मांडून सगळ्यांचेच आयुष्य कसे सुखी होइल यावर चर्चा-विनिमय करायचा याबद्दल एवढा बुद्धीमंत म्हणवून घेणारा मनुष्यप्राणी निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा वैषम्य वाटतंच. 'काहीच बदलणार नाही' याच्यावर बहुसंख्यांचा ठाम विश्वास दिसतो, पण त्याच बहुसंख्यांनी 'बदललेच पाहिजे'चा विश्वासही तेवढाच ठाम दाखवला तर...? कि 'काही बदलूच नये' असे बहुसंख्यांना स्वतःलाच मनातूनच वाटत असते का हा प्रश्नही मनात उभा राहतो. असे तर नाही. मग घोडे अडते कुठे? काही प्रसंगांतून लोक कच खातात, काही उदाहरणांतून, ऐकीव अनुभवांतून 'नकारात्मक परिस्थितीच कशी मेजॉरिटीमधे आहे' याचाच सतत प्रसार लोक करत असतात. ते आपल्या कमकुवतपणाचं, नाकर्तेपणाचं समर्थन करण्यासाठी तर अशी ढाल बनवत नसावेत ना असाही विचार मनात येतो. कारण तुल्यबळ सकारात्मक उदाहरणेही आजूबाजूला घडत असतातच. पण त्यापासून प्रेरणा घेऊन काही सकारात्मक करण्यापेक्षा 'न-करणे' सोपे असते. मग 'न-करण्याचे' समर्थनही आलेच. पुरुषांनी आपला दृष्टिकोन बदलणे सर्वात आवश्यक आहे हे सर्वानुमते सिद्ध झाले आहे. याची जबाबदारी दोन्ही पक्षांवर आहेच. स्त्रिया मुलांना जन्मतःच त्यादृष्टीने घडवणे सुरु करू शकतात. असे त्यांनी केले का? तर नाही. पुरुषांना स्त्रियांवर अत्याचार करण्यास पोटेन्शियल वातावरण मिळूच नये यावर दोन्ही पक्ष विचारविनिमय करून धोरण आखू शकतात. असे होते का? तर नाही. बहुसंख्य घरांतून आयाच मुलांना मुलींपेक्षा चांगले समजतांना, वागवतांना पाहिले आहे. मुलगा असणे पुरुषांसकट स्त्रियांनाही गौरवाचे वाटते हेही पाहिले आहे. सासवा स्वतःच्या नातींचा दुस्वास करतांना बघितल्यात. वैताग येतो हो हे सगळे बघून. परत यांची अशी मानसिकता 'पुरुषप्रधान व्यवस्थेमुळेच आहे' हे सिद्ध करून त्यावर सकारात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी सोयीस्करपणे टाळली जाते. हे सर्वात जास्त दु:खदायक आहे. स्त्रियांनी 'आम्ही रोजच्या कष्टाने, अत्याचाराने पिचून गेलोय, परिस्थिती बदलण्याचे आमच्यात त्राण उरले नाही, वेळ नाही' असे जर स्वतःच कबूल केले तर 'उचित सामाजिक सन्मान, सुरक्षित आयुष्य' ही तुमची प्राथमिकता नाही का? असा प्रश्न विचारावा वाटतो. नसेल तर मग ही सततची कुरबुर का? असेल तर तोच प्राधान्यक्रम रोजच्या आयुष्यात का नाही? बहुसंख्य बायकांच्या आयुष्यतला प्राधान्यक्रम आजकाल 'कुठल्या मालिकेत आज काय होइल?' हा असतो हेही बघितले आहे असो. असो. असे सगळे बघून स्त्रियांना बदल व्हावा असे 'खरंच' वाटते का असा प्रश्न उभा राहतो. उपलब्ध परिस्थिती बघता याचे उत्तर सकारात्मक येत नाही असे खेदाने म्हणावे वाटते. याच विचारातून माझा 'बायको बोलते' हा प्रतिसाद उद्भवला होता. जाता जाता: असे अजिबात नाही की काहीच बदल होत नाहीये. बदल होत आहेत, वेगाने होत आहेत. पण ज्या प्रमाणात, ज्या स्केलवर झाले पाहिजे ते होत नाही. दहा फूट पुढे शंभर फूट मागे असा प्रकार सुरू आहे. पण स्त्रियांनी जर शंभरफूट पुढे जायचे ठरवले तर कित्येक सोन्याबापुंना आपल्या इज्जतीचा फालुदा झाला तरी वाईट वाटणार नाही याचा एक पुरुष म्हणून भयंकर विश्वास आहे. माझ्या बाजूने पूर्णविराम. मिपावरच्या चर्चांचे फलित सकारात्मक, विधायक विचारांमधेच होवो अशी नेहमीच इच्छा राहील.