Skip to main content

..अळणी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी मंगळवार, 13/10/2015 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
..अळणी.. तसं माझं आयुष्य असं काही खास नाही.. घेतलेल्यांपैकी अनेकात चुकलेला एकही श्वास नाही.. दिवस येतो दिवस जाते..रेंगाळणारी रात नाही.. किती बोललो तरी देखील..आठवणारी बात नाही... ओळखीचे तसे बरेच जण..कुणाशी दोस्ती ..वैर नाही.. कधी देतो कधी घेतो..पण वागणे मुळीच स्वैर नाही... आभाळ तसं निरभ्रच कधी जमतात काही ढग.. उगा उगा हळवं वाटत तेव्हा मात्र सारं जग.. अगदीच भुरभुर बरसतो...कुठे कोसळणारा मेघ नाही.. संथ वाहणारं पाणी सारं..त्याला कुठे आवेग नाही... कधी कधी आयुष्य हे फार फार अळणी वाटतं. थुंकता न येणारी धरलेली..तोंडात मीठाची गुळणी वाटतं.. तेवढ्यापुरतेच..पुन्हा त्यापाण्यानेच मी गुळण्या टाकतो.. आईस्क्रीमने सुजलेला घसा पुन्हा पुन्हा शेकत राहतो.. हरलो..जिंकलो..समजत नाही..तसाच चालत जातो.. मान..अपमान..समजत नाही..उगाच बोलत राहतो.. काळजावर बसलेला खोल कधी कुठे घाव नाही... जिंकलेला वा हरलेला असा कुठलाच डाव नाही... स्वप्नात देखील मन माझं...कधी कुठे जात नाही... जागेपणी देखील मला ते कधी सुध्दा खात नाही.. तसा जगतोय की हो शहाण्यासारखा..अगदी सरळ.. पण बहुदा मी जगतोय..हे कुणालाच ज्ञात नाही... ----योगेशु
लेखनविषय:

वाचने 2125
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मस्त जमून आली आहे.. आवडली..

स्वप्नात देखील मन माझं...कधी कुठे जात नाही... जागेपणी देखील मला ते कधी सुध्दा खात नाही..
हे उच्च पाप भिरू पणाचे लक्ष्यण आहे, काही जण त्याला पुचाटपणा म्हणतील पर्वा इल्ले. रात्री "आरश्यापासून" तोंड लपवावे लागत नसेल तर तुम्ही नक्की चुकीचे वागत नाहीत असे कुठेसे वाचले होते त्याची प्रकर्षाने आठवण झाली. पुलेशु

In reply to by नाखु

खरे बोललात ना.खु साहेब. हे एका मनस्थितीचे वर्णन आहे. वर ज्योति अलवनिंनी उल्लेख केल्याप्रमाणे ह्यातील भावना/मनस्थिती हे संदीप खरेंच्या मी मोर्चा नेला नाही मधल्या भावने/मनस्थितीसारखीच आहे. ( भावना/मनस्थिती असा वेगळा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे ही कविता लिहिणार्या त्याच कवीने "नामंजूर" ह्या कवितेत सर्वस्वी वेगळी भावना/मनस्थिती व्यक्त केली आहे.) पण तरी देखील पूर्ण कविता वाचल्यानंतर ह्याला "खंत" म्हणावे कि "समाधान" हा प्रश्न मला अजुनही विचारात टाकतो.