Skip to main content

स्वतः स्वयंपाक करणार्‍या विद्यार्थ्यांची (खास करुन अमेरिकेत अपार्टमेंट शेअर करणार्‍या) खास पाककृती

लेखक खालिद यांनी बुधवार, 17/12/2008 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत आलेले बहुतेक विद्यार्थी (९५%) हे अपार्टमेंट शेअर करुन राहतात. (काय करतात बिच्चारे; धीरुभाईंचा लाल अथवा तत्सम एखादाच असतो.) त्यामधे बर्‍याच गोष्टी या परस्पर सामंजस्याने कराव्या लागतात (उदा. बाथरूम वर राज्य करण्याच्या वेळा, एकमे़कांच्या झोपेच्या वेळा सांभाळणे वगैरे वगैरे). यामधे महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण करण्याच्या वेळांची वाटणी. पण कितीही सोयीस्कर वेळांची वाटणी केली तरी काही जणांना नेमक्या वेळी काम निघते (बर्‍याच वेळी आळस येतो) तर काही बिचार्‍यांच्या हातात गुणच नसतो. अशा वेळी शंभरातील नव्याण्णव वेळा केली जाणारी ही पाककृती. पाककृतीचे नाव :- आमटी कम भाजी साहित्यः -कांदा, कोणताही मसाला (अगदी गरम मसाला, चिकन मसाला ते चंकी चाट मसाला सुद्धा), आलं लसूण पेस्ट (नसल्यास हरकत नाही), टोमॅटो प्युरी, डबाबंद कडधान्ये (अत्यावश्यक: जर साधी कडधान्ये असतील तर उकडण्यात निम्मा वेळ जातो), मीठ, तिखट कृती:- प्रथम जेवणार्‍या तोंडांच्या संख्येनुसार २-३ मोठे कांदे (हव्या त्या आकारात) चिरुन घ्यावेत. कढईत अंदाजे तेल घालावे (अंदाज चुकल्यास काळजी नसावी.) (आपल्या) उपलब्ध वेळेनुसार कांदा परतून घ्यावा. (तांबूस, काळा, इ. रंगांची चिंता करु नये.) फळीवरुन जो मसाला पहिल्यांदा हाती लागेल तो तसाच भसकन ओतावा. त्यावर चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकावी. (नसल्यास उत्तम; वेळ वाचतो) भरपूर ग्रेव्ही करायची आहे या उद्देशाने टोमॅटो प्युरी टाकावी. २ मिनिटे मिश्रण हलवल्या सारखे करावे. २-३ कॅन्ड बीन्स (छोले, राजमा अथवा चवळी) त्यात रिकामे करावे. त्यात भरपूर* पाणी घालून १० मिनिटे उकळू द्यावे. चवीपुरते (पुन्हा एकदा: आपल्या हातून पडेल तितके) मीठ घालावे. *टीपः - भाजी कम आमटी रात्री केल्यास दुसर्‍या दिवशी दुपार पर्यंत राहील येवढे पाणी घालावे. अवांतरः - १. मीठ जास्त झाल्यास भात करावा; व्यवस्थित पडले तर मित्राना टॉर्टिआ भाजून घेण्यास सांगावे. २. कॅन्ड बीन्स नसल्यास/बीन्स खाउन बोअर झालेल्या रुममेटस नी बोंब मारल्यास फ्लॉवर वापरावा व फ्लॉवरचे तुकडे वेळेची उपलब्धता अथवा आलेला कंटाळा यांच्या समप्रमाणात करावेत. ज्यांना संजीव कपूर चे अनुयायी असणारे रुममेट्स मिळाले असतील ते भाग्यवान; पण लॉटरी फार कमी जणांनाच लागते ना!! बाकी ९०% जणांच्या नशीबी हीच भाजी (स्वतः केलेली अथवा दुसर्‍याने )आठवड्यातून ६ दिवस असते. (आजच राजम्याची आमटी कम भाजी खाल्लेला) खालिद आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील

वाचने 7628
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

वाह वाह, छानच आहे, आवडले पुले शु ---- सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

सहमत. बघ गटण्या स्वतःच्या हातानेच करतात की नै. तु बसलास डबा शोधत. काही झाले तरी अपना हाथ जगन्नाथ -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

>>काही झाले तरी अपना हाथ जगन्नाथ सहमत (पण कधी कधी दुसर्‍याचा हात पण चांगला असतो, जरा बघा एकदा) ---- सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

>>(पण कधी कधी दुसर्‍याचा हात पण चांगला असतो, जरा बघा एकदा) दुसर्‍याच्या हातावर विसंबले की ओढाताण जास्त होते ...... जेवणाची. ---- शेखर

In reply to by शेखर

>>दुसर्‍याच्या हातावर विसंबले की ओढाताण जास्त होते ...... जेवणाची. प्रत्येकाचा/प्रत्येकीचा अदांज वेगळा असतो ना... ---- सखाराम गटणे

छान लिहितोस की रे! तुझी लिहिण्याची स्टाइल आवडली आपल्याला बाई..

आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील
दुवा के व ळ अ प्र ति म ! - टार्‍या भयंकर

In reply to by टारझन

हा अभिप्राय मिळाला असता तर आमची लेखणी धन्य झाली असती. (खरोखर चेंदामेंदा करणारा अवांतर आहे हा) कृपया वरील अभिप्रायाने पामराला उपकृत करावे खालिद आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील

In reply to by खालिद

हा अभिप्राय मिळाला असता तर आमची लेखणी धन्य झाली असती. (खरोखर चेंदामेंदा करणारा अवांतर आहे हा) कृपया वरील अभिप्रायाने पामराला उपकृत करावे खालिद आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील
६. आपल्या लेखणात पु.लं दिसले ७. मागील भागांपेक्षा हा भाग उत्तम जमला आहे

बाथरूम वर राज्य करण्याच्या वेळा>>>>> =)) =)) =)) काय जबरी शब्द प्रयोग आहे. ष्टाईल चांगली आहे लिहिण्याची.

खरच, आपण जिंकलत (आपल्या रूममेटसना) तोडलत (आमच्या मनांना) चेंदामेंदा केलात (सर्व पाककृतींचा) आपल्या कडे केवळ क्रिकेट्चे सामनेच ज्यास्त दिवस जिवंत राहू शकतील. कृपया हलकेच घ्या. हा विनोद आहे (सांगावं लागतय, काय करणार?) रेवती

ह्म्म्म्म !! लिहलेला प्रकार आवडला. गमतीचा भाग सोडला तर तुमच्या पाककृतीला मी फक्तं स्वयंपाकाचा कंटाळा म्हणेन... नेमक्या वेळी काम निघने किंवा हातात गुणच नसने ह्या गोष्टी जरी मान्य केल्या तरी तुमची पाककृती म्हणजे आपल्यावरची जबाबदारी लवकरात लवकर कशी टाळायची याचे उत्तम उदाहरण आहे असे वाटते. २-३ जणांबरोबर अपार्ट्मेंट शेअर केल्यावर स्वयंपाकाची जबाबदारीसुद्धा २-३ दिवसात एकवेळ येते, मग फक्त १०-१५ मिनीटे जास्त घालुन तोच पदार्थ व्यवस्थीत का बनवु नये? नपेक्षा बनवता येतोच (स्वानुभवावरुन)!!! (कृपया हलकेच घेणे)

In reply to by अनामिक

थोडा वेळ दिल्यास चांगला स्वयंपाक येतो. त्या आले व लसूण पेस्टमुळे फार वाईट वास येतो असे मला वाटते. त्याऐवजी आले व लसूण विकत आणून शक्यतो ठेचून घ्यावे. कांदा कोणत्या साईजमध्ये कापता त्यावर तुमच्या भाजीची चव अवलंबून असते. सांबार-डोसाभाजी वगैरे सोडल्यास शक्यतो बारीक कापावा म्हणजे चांगला परतला जातो. अमेरिकन कांद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे परतायला थोडा वेळ लागतो. (तीच गोष्ट कोबी, फ्लॉवर, बीन्स या भाज्यांची). एक प्रॉब्लेम म्हणजे अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी ग्यास शेगडी नसल्याने इलेक्ट्रिक शेगडीवर भांड्याला समप्रमाणात उष्णता मिळत नाही त्यामुळे हलवत बसणे क्रमप्राप्त होते. कडधान्ये आदल्या रात्री भिजत घालावीत म्हणजे दुसऱ्या रात्रीपर्यंत चांगली फुगतात व लवकर शिजतात. क्यान्ड पदार्थांतील प्रिझर्वेटिवांची ग्यारंटी नसते. जर कॉलेस्टेरॉलची काळजी नसेल तर किसलेल्या खोबऱ्याची पिशवी आणून ठेवा. लसणाबरोबर थोडे खोबरेही टाकले तर भाजीला खरपूस चव येते. आमटीत कोकम/ड्राय मॅंगो पावडर टाकली तर लिंबापेक्षा वेगळी आंबट चव येते. डाळीत पालक वगैरे चिरून-शिजवून टाकावा म्हणजे बरे लागते. आपला, (स्वयंपाकी) तरला आजानुकर्ण दलाल

लिहिण्याची स्टाईल आवडली त्यामुळे लेख वाचूनच समाधान मानतो.... पदार्थ खायचे धाडस करायला वेळ लागेल ;)

काही प्रतिक्रियांवरून आपल्याला अंदाज आला असेलच, की आपली ट्रेड सीक्रेट्स अशी चारचौघांत जाहीर करायची नसतात. बाकी लेख छान. --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

In reply to by घाटावरचे भट

आपली ट्रेड सीक्रेट्स अशी चारचौघांत जाहीर करायची नसतात. बाकी लेख छान. असेच म्हणते! तरी बाकीचे म्हणतात त्यात तथ्य आहे असे सांगावेसे वाटते.विद्यार्थीदशेत असताना काही करणे कठीण जात असले तरी कॅन्ड फूड जरा बेतानेच. त्यापेक्षा कडधान्ये आणून घरात ठेवली, वेळेवर भिजत घातली तर महिनाभरात कमी खर्चात बरे अन्न खाता येऊ शकते. आणि चवही अधिक चांगली येते.

फरसबीच्या शेंगा, हिरवे वाटाणे, फ्लॉवर वगैरे टाकून बिशी बेळे भात करता येईल. रोज रोज तीच कडधान्याची भाजी खाण्यापेक्षा असे करुन पाहा. कमीत कमी भांडी घासायला लागतात त्यात चायनीज पदार्थही बनवायला फार सोपे आहेत. फ्राईड राईस, कुंग पाऊ वगैरे घरी बनवता येईल. इटालियन पास्ते तर खूपच सोपे आहेत. खालिदपंत लवकर असे पदार्थ करायला शिका म्हणजे लग्नानंतर फार त्रास होणार नाही. आपला, (ब्याचलर) आजानुकर्ण

छान लिहीता आहात. कदाचीत छान सैपाकही करत असाल असं वाटतं.

श्टाईल लै भारी आहे पाकृ सांगायची! कॉलेज मधे असतांना उपलब्ध साहित्यात दोन घास बनवायच्या स्मृती जाग्या झाल्या. हे प्रयोग मित्रांच्या रुमवर व्हायचे - पण अमेरिकेत नाहि तर पिंपरी येथे. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

लिहिले आहे खालिदपंत. विद्यार्थी'दशे'तले दिवस आठवले. याच मॉडेल पाककृतीवर बेतलेल्या अनेक भाज्या-कम-आमट्या पचव्यावा लागल्या आहेत :). एकदा तर रूममेटने छोल्यांच्या कॅनमधले जास्तीचे पाणी फेकून न देता या पाककृतीत वापरले. तेव्हा त्या डिशवर आलेला सुरेख फेस पाहून इतरांच्या तोंडाला फेस यायचा बाकी राहिला होता ;). [बाकी तोंडाला फेस येणे यातून उद्भवणारे पीजेज फारच अवांतर होतील, तेव्हा लिहीत नाही :).]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


अमेरिकेत रहाणार्‍या भारतीय शाकाहारी विद्यार्थ्यांना सूचना: अमेरिकेत जे बीन बरिटोज मिळतात त्यात बहुदा बेकन (डुक्कर) चा स्टॉक (चव येण्यासाठी) घातलेला असतो.... कुठल्याही बर्गर प्लेसमध्ये जे फ्रेंच फ्राईज (बटाट्याच्या सळ्या) मिळतात त्या बहुदा चिकन फ्राय केलेल्या तेलातच फ्राय केलेल्या असतात... एंजॉय!!!! ही ही ही हा हा हा... (पाताळविजयम....)

विद्यार्थी वर्गाला दिलेली शिकवण आवडली... एक नंबर ............................. :)