श्रीगणेश लेखमाला १० : कंपनी सेक्रेटरी
मी वाणिज्य शाखेत पदवी घेणार, हे मी आठवी-नववीत असताना मला कळून चुकले होते आणि सी.एस. करणार हे अकरावीमध्येच कळले होते; त्याचे कारण माझे नियोजन खूप सुबद्ध होते आणि ध्येय खूप उत्तुंग होते आणि त्याच्याकडे मी खूप आधीपासून वाटचाल सुरू केली होती, असे लिहिण्याचा मला खूप मोह होतो आहे. पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते. खरी गोष्ट अशी आहे की आठवी-नववीतच माझ्या गणितातले भ्रमांचे भोपळे फुटायला लागले (म्हणजे उत्तर पत्रिकेवर भोपळ्यांची संख्या लक्षणीय असायची) आणि पट्टीच्या साहाय्यानेसुद्धा एक सरळ रेष काढताना नाकी नऊ यायचे. त्यामुळे गणिताची गरज असणारे इंजीनियरिंग आम्ही आयुष्यातून वजा केले. अमीबाच्या आकृतीवरदेखील 'नेटकी आकृती काढावी' अशा अभिप्रायासह पाचपैकी अडीच मार्क कमावल्यावर वैद्यकीय शाखा किंवा झाडपाल्याशी संबंधित काहीही आयुष्यात झेपणार नाही हे कळले. त्याच्याही आधी वैद्यकीय शाखेच्या पहिल्या वर्गातच बेडकाची आणि उंदराची चिरफाड करावी लागते हे कळल्याने शाळेतच या शाखेवर फुली मारली होती, ते वेगळे. मी डॉक्टर व्हावे अशी माझ्या आजोबांची फार इच्छा होती. (ते स्वत: डिसेक्शन टेबलवरची डेड बॉडी बघितल्यावर तडक घरी आले होते आणि त्यानंतर वाणिज्य शाखेचे पदवीधर झाले होते.) बालवाडीत असताना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यावर मी शिक्षण पूर्ण झाले या कल्पनेने मी डॉक्टर झालो हे सगळ्यांना सांगत सुटलो होतो. माझ्या डॉक्टरकीच्या कारकिर्दीच्या जवळपास जाणारा दुसरा कुठलाही क्षण नाही.
त्यामुळे कला आणि वाणिज्य शाखा हाच काय तो पर्याय होता. कला शाखेत जाऊन काय मास्तरकी करणार का? असा प्रश्न नेहमी विचारला जायचा. त्या वेळेस हो म्हटले असते तर फार बरे झाले असते, असे बर्याच वेळा वाटते. आणि आमच्यासारख्या मख्ख चेहर्याने बसणार्या दगडांसमोर उभे राहून शिकवणे किती अवघड असावे, हे समजून तो पेशा स्वीकारला नाही हे बरे वाटते. वास्तविक कला शाखेतही किती सुसंधी असतात. पण आपल्याकडे शालेय शिक्षणात या गोष्टी समजून घ्यायची सोयच नाही. वास्तविक आज समाजाला एका डॉक्टरची जितकी गरज आहे, तितकीच गरज एका वकिलाची, एका प्राध्यापकाची, एका कंपनी सचिवाची आणि इतर अनेक व्यावसायिकांचीदेखील आहे आणि कला, वाणिज्य, विज्ञान या प्रत्येक शाखेतून शिक्षण घेणार्या प्रत्येक व्यक्तीला व्यवसाय-धंद्याच्या अनेक सुसंधी उपलब्ध आहेत. पण आपल्याला त्यांची योग्य माहिती नसल्याने आपण त्या संदर्भात सारासार विचार करून निर्णय घेऊ शकत नाही आणि मग विज्ञान शाखा म्हणजे डॉक्टर / इंजीनियर, वाणिज्य शाखा म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आणि कला शाखा म्हणजे प्राध्यापक असा सरधोपट विचार करून करियरच्या वाटा धुंडाळतो. या सरधोपट विचारांच्या पुढे जाऊन आपण इतर मार्गदेखील चोखाळले पाहिजेत. असाच एक मार्ग म्हणजे कंपनी सचिव किंवा कंपनी सेक्रेटरी.
कंपनी सेक्रेटरी नक्की काय करतो, हे समाजातल्या अनेक घटकांना अजूनही माहीत नाही. तो सी.ए.सारखाच एक कोर्स असतो असे सांगितले की या लोकांच्या डोक्यात थोडाफार प्रकाश पडतो. मग पुढचा प्रश्न लगेच विचारला जातो की "मग कुठल्या कॉलेजमधून करतो आहेस?" कंपनी सेक्रेटरी कोर्सबद्दल प्राथमिक माहिती देण्यासाठी आणि त्याबद्दल असलेले अज्ञान दूर करण्यासाठी म्हणून हा अनुभव-कम-लेखनप्रपंच.
तर मी सी.एस. करणार हे अकरावी-बारावीतच निश्चित झाले होते. त्याचेही मूळ मी आर्यभट्ट, रामानुजम आदी प्रभृतींवर सूड उगवून गणिताचे वेगळे नियम तयार करण्यात (आणि तेच ते प्रिय भोपळे पटकवण्यात) आहे. सी.ए. करण्यासाठी पूर्वी फाउंडेशन नावाचा एक अडसर दूर करायला लागायचा, ज्यात गणित अनिवार्य होते. त्याच्याशी माझा भोपळ्याचा आकडा. त्यामुळे सी.ए. माझ्या विशलिस्टमधून कटाप झाले. साधारण त्याच वेळेस सी.एस.चीदेखील माहिती मिळाली होती. थोडे हातपाय मारून आणखी माहिती मिळवली आणि मग सी.एस. फायनल केले, कारण गणितामधून पूर्ण सुट्टी मिळत होती. (नंतर स्टॅटिस्टिक्स आणी क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स करावे लागले, पण त्याचा मानसिक बागुलबुवा नव्हता, जो गणिताचा होता.)
अडचण फक्त एकच आली की सी.एस. करायला घेण्यापूर्वी फार कुणाचा सल्ला घेता आला नाही. मुळात जिथे सी.एस. म्हणजे काय हेच अजूनही लोकांना माहीत नसते, तर सतरा वर्षांपूर्वी काय कप्पाळ माहीत असणार? शिक्षकांना थोडीफार माहिती असायची. त्यांनीच प्राथमिक आणि जुजबी माहिती दिली होती. पण कोणी मातब्बर व्यक्ती मिळत नव्हती. शेवटी सी.ए. आणि सी.एस. असलेले एक गृहस्थ भेटले, त्यांनाच विचारले. ते म्हणाले, "मी दोन्ही केले आहे, पण प्रॅक्टिस मात्र सी.एस.ची करतो. याहून आणखी काय सांगू? बिनधास्त कर सी.एस." त्यानंतरच माझा सी.एस.चा प्रवास सुरू झाला. मात्र सी.एस. म्हणजे काय हे न जाणणारे इतके लोक आयुष्यात भेटले की सी.एस. अजूनही सर्वसाधारणपणे लोकांसाठी इंटेलिजन्स एजंट एवढाच गूढ आहे. काही अनुभव बघा, म्हणजे कळेलः
१. एका मैत्रिणीच्या घरी गप्पा मारत बसलेलो असताना आमच्याच (म्हणजे बी.एम.सी.सी.) कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतलेली आणी इंटीरियर डिझायनिंग करणारी तिची आणखी एक मैत्रीण आली. सगळ्यांच्या ओळखीपाळखी झाल्या. अमका एमबीए, तमका सीए अशा ओळखी करून झाल्यावर त्या ललनेने अतिशय तुच्छतेने विचारले, "सेक्रेटरी होण्यासाठीसुद्धा कोर्स असतो? काय काय शिकवतात? टाइपराइटिंग आणि शॉर्टहँड?" तिचे अगाध ज्ञान बघून भर पंख्याखाली मला घाम फुटला.
२. एक मित्र कॉम्प्युटरचा कुठलासा कोर्स करत होता. त्याची एक असाइनमेंट सी.एस.शी निगडित होती. त्या कॉम्प्युटर सेंटरच्या मंद मालकिणीने त्याला ठासून सांगितले की सी.एस. लोक बॉसचे ट्रॅव्हल प्लॅन्स ठरवतात आणि त्याच्या फाइली सांभाळतात. माझा मित्र सी.एस. करतो आहे आणि तो तर काहीतरी वेगळेच सांगतो असे म्हटल्यावर बाई वदल्या, "जाऊ देत रे, त्याला लाज वाटत असेल खरे काय ते सांगायची." बाईंना पर्सनल सेक्रेटरी आणि कंपनी सेक्रेटरी यामधला फरक उभ्या जन्मात झेपला नव्हता बहुधा.
३. मी आयात-निर्यातीचा एक पदव्युत्तर डिप्लोमा करत होतो. आमच्या एचओडी एक अतिशय हुशार इकॉनॉमिस्ट होत्या. कोर्स संपत आलेला असताना त्यांनी सगळ्यांना पुढचे प्लॅन्स विचारले. बहुतेक सगळे जण संबंधित विषयात नोकरी शोधणार होते. मला विचारल्यावर संवाद थोडाफार असा झाला:
मॅडम : तू काय करणार रे? ---- कंपनीत इंटरव्ह्यू देऊन आलास का?
मी : नाही, आधी सी.एस. पूर्ण करावे म्हणतो.
मॅडम : (अतिशय तुच्छतापूर्ण स्वरात आणि रागाने) : ते काय असते?
मी (चाचरत) : सी.एस. म्हणजे कंपनी सेक्रेटरी.
मॅडम : हे असले काहीतरी करायचे होते, तर मग पीजीडीएफटी कशाला केले? टाइपिंग शिकायचे ना?
मी : ..........
हा माझ्यासाठी प्रचंड मोठा आघात होता. त्या मॅडम उच्चविद्याविभूषित होत्या. त्यांनाच जर सी.एस. काय ते माहीत नसेल, तर इतर कुणाला काय माहीत असणार!
४. चौथा आघात जरा जास्त नाजूक होता. लग्नाच्या बाजारात उभे असताना एका सुस्वरूप मुलीचे स्थळ चालून आले. ती सॉफ्टवेयर इंजीनियर होती. माझे प्रोफाइल त्यांनी (बहुधा) वाचले असावे. त्यात मी बी.कॉम, पी.जी.डी.एफ.टी आणि लॉ केल्याचा उल्लेख होता. मी कंपनीत खूप मोठा कायदा सल्लागार असेन अशी त्यांची अपेक्षा होती. घरदार, पगार इत्यादी बाबतीत त्यांची खात्री पटल्यावर मुद्दा कंपनीतल्या हुद्द्यावर आला. मी शांतपणे डेप्युटी कंपनी सेक्रेटरी म्हणून सांगितले. बाईंच्या चेहर्यावरचे भाव इतक्या झरझर बदलले की काय सांगू तुम्हाला. नंतर बराच वेळ माझ्या बॉसबद्दल चर्चा चालली होती. (पर्सनले सेक्रेटरी आणि बॉस यांचे रिलेशन असे काहीसे बाईंच्या मनात घोळत असावे). मी पर्सनल सेक्रेटरी नाही हे तिला शेवटापर्यंत झेपणार नाही, हे झेपायला थोडा वेळ गेला. लॉ करून हा बाब्या सेक्रेटरीचे काम का करतो हा प्रश्न तिच्या चेहर्यावर साफ झळकत होता. शेवटी मी तिला झक्कत सांगितले की सी.एस. हासुद्धा सी.ए.सारखाच एक कोर्स असतो (सहजी कळावे म्हणून कुणालाही सांगण्याचे हे ब्रह्मवाक्य होते). त्यावर बाईंनी "सी.ए. म्हणजे काय?" हा प्रश्न विचारला. ती घराबाहेर पडल्या पडल्या मी जाहीर केले की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, पण हिच्याशी लग्न करणार नाही. सी.एस. म्हणजे काय हे सांगण्यातच माझे अर्धे आयुष्य जायचे.
५. हा एका वधुपित्याचा माझ्या आईबरोबर झालेला संवाद. पलीकडून फोन आला होता. पाव्हणे पंढरपूरचे होते. जुजबी माहिती विचारल्यावर (न झालेल्या) सासरेबुवांनी मी काय करतो म्हणून विचारले. तेव्हाचा हा संवाद :
न झालेले सासरेबुवा (न.झा.सा.) : मंग काय करतात तुमचे चिरंजीव?
आई (अभिमानाने) : तो सी.एस. आहे.
न.झा.सा. : म्हंजे?
आई : म्हणजे सी.एस. आहे. -------- मध्ये कामाला आहे.
नझासा : बरं बरं. पण मग काय शिकलेत?
आई : कंपनी सेक्रेटरी आहे हो.
नझासा : शेक्रेटरी आहे हो? पन शिकलेत काय? आमच्या मुलीला चांगला शिकलेला नवराच हवा.
आई (थोडा विचार करून) : लॉसुद्धा केले आहे त्याने, शिवाय एम.कॉम. केले आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाही केला आहे फॉरेन ट्रेडमध्ये.
नझासा (थोडा विचार करून) : बरेच शिकलेत म्हणायचे की मग. पन मग शेक्रेटरीचे काम का करतात?
आई : ............. (काय बोलावे हे तिलाही कळेना)
नझासा : पगार किती?
आई : ............. पगार मिळतो महिन्याला.
नझासा : आजकाल शेक्रेटरीलाही बरा पगार मिळतो म्हणायचा की मग..
त्यानंतरचा संवाद इथे महत्त्वाचा नाही. पण मी ही मुलगी न बघताच या मुलीवर काट मारली. मुलीला माहीत असले असते तरी माझ्या नोकरीच्या न्यूनगंडातून माझे नझासा कधीच बाहेर पडू शकले नसते. त्यापेक्षा नकोच.
तर सी.एस.ची ही अशी कथा असते. तुम्ही सी.एस. केले, तर सी.एस. म्हणजे काय हे तुम्हाला भेटणार्या जवळजवळ प्रत्येक नॉन-कॉमर्स व्यक्तीला तुम्हाला समजावून सांगायला लागते. त्यामुळे सी.एस. करायचे असेल, तर सी.एस. म्हणजे काय ते नीट जाणून घ्या. तुम्हाला पदोपदी लोकांना ते समजावून सांगायला लागेल.
थोडक्यात सांगायचे, तर सी.एस. म्हणजेच कंपनी सेक्रेटरीशिप हा ३ वर्षाचा (आणि फार कमी वेळा ३ वर्षात पूर्ण होणारा) एक सर्टिफिकेट कॉर्स आहे. डिग्री नसून एक सर्टिफिकेट कोर्स आहे म्हणून त्याची महती कमी होत नाही, तर तो एक अतिशय प्रतिष्ठेचा आणि अवघड अभ्यासक्रम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
सी.एस. म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे, हे प्रथम समजून घेऊ या. जर तुम्हाला भारतात एखादा व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही काय कराल आणि कुठल्या प्रकारच्या कायदेशीर संस्थेच्या माध्यमातून कराल? एक तर तुम्ही प्रोप्रायटरशिप करू शकाल. ही प्रोप्रायटरशिप त्याच्या मालकापेक्षा वेगळी नसेल किंवा तुम्हा एल.एल.पी. किंवा भागीदारी सुरू करू शकाल. यातही भागीदारी = भागीदार असेच समीकरण असेल, कारण भागीदारीला भागीदारांव्यतिरिक्त वेगळे असे अस्तित्व नसते. किंवा तुम्ही एक कंपनी उघडू शकाल. ही कंपनी हे समीकरण पूर्ण वेगळे असते. इथे कंपनीलाच कायदेशीर दर्जा असतो. कंपनी वेगळी आणि त्याचे शेअरहोल्डर्स वेगळे. त्यामुळे कंपनीची समीकरणे बदलतात. इथे कुणीही - अगदी रूढार्थाने एकाधिकारी नसतो. कंपनीसाठी सगळे कायदेशीर अस्तित्वच बदलते. शिवाय कंपनी म्हटल्यावर जगभरचे कायदे पाळावे लागतात. कंपनीत नवीन सभासद येऊ शकतात, कंपनीच्या नावे कर्जे येतात, कंपनीच्या नावे करार केले जातात. थोडक्यात, समाजातल्या अनेक व्यक्तींचे हितसंबंध गुंतलेले असतात. अशा या कंपनीचे कामकाज कंपनी कायद्यान्वये योग्यरित्या चालावे आणि सर्व संबंधित घटकांचे हितसंबंध वैध मार्गे जपले जावेत, यासाठी एक वेगळी यंत्रणा राबवणे गरजेचे असते. या सर्व प्रकाराला आपण 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' या शब्दसमूहाने ओळखतो. कंपनी सेक्रेटरी या कॉर्पोरेट गव्हर्नन्स कम्प्लायन्सचा कणा असतो.
कंपनीचे मालक जरी शेयरहोल्डर्स असले, तरी कंपनी चालवतात 'बोर्ड ऑफ डायरेक्टर्स'. सामान्यत: कंपनीचे शेयरहोल्डर्सच डायरेक्टर्स निवडतात. काही क्वचित प्रसंगी मग हेच डायरेक्टर काही काळापुरते नवीन डायरेक्टर्स निवडू शकतात, तर काही प्रसंगी हे अधिकार ठरावीक प्रमाणात वित्तपुरवठा करणार्या बँकेकडे असू शकतात. अगदी असामान्य परिस्थितीत काही सरकारी संस्थासुद्धा त्यांच्या अधिकाराचा वापर करून डायरेक्टर निवडू शकतात. हे डायरेक्टर्स त्यांच्या कौशल्यानुसार कंपनी चालवतात. अर्थात त्यांच्या अधिकारांमुळे हुकूमशाही अथवा अनागोंदी माजू नये, म्हणून त्यांचे अधिकार कंपनी कायद्याच्या रूपाने मर्यादित केलेले असतात. तसेच कंपनीच्या 'मेमोरेंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन'अंतर्गतदेखील त्यांच्या अधिकारांवर आणि कंपनीच्या कार्यरेषेवर बंधने असू शकतात. कंपनी कायदा, लिस्टिंग अॅग्रीमेंट, फेमा (Foreign Exchange Management Act) इतर कॉर्पोरेट कायदे यांचे पालन आणि कंपनीचे आणि पर्यायाने इतर स्टेकहोल्डर्सचे इतर हितसंबंध जपण्यासाठी इतर अनेक तत्सम कायद्यांसंदर्भात या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना मार्गदर्शन करणे, त्यांना सल्ला देणे आणि त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आणी त्याचे उल्लंघन होऊ न देणे आणि त्या अनुषंगाने योग्य ती पावले उचलणे हे मुख्यत्वेकरून एका कंपनी सेक्रेटरीचे काम आहे.
मग तुम्ही म्हणाल की यातले बरेच काम तर कायद्याचा पदवीधरदेखील करू शकतो की! कंपनी सेक्रेटरी कशाला हवा? कायदेविषयक तज्ज्ञ आणि कंपनी सेक्रेटरी यांच्यामधला मुख्य फरक हा की कंपनी सेक्रेटरी कोर्स करत असताना कंपनी सेक्रेटरी केवळ कायद्याचा अभ्यास करत नाही, तर अकाउंटस, टॅक्स, कामगार कायदा आणि कल्याण, कॉर्पोरेट रीस्ट्रक्चरिंग, ह्युमन रिसोर्स, बँकिंग, विमा, आंतरराष्ट्रीय व्यवसाय संबंधित कायदे, कॉस्टिंग, बिझनेस एथिक्स इत्यादी विषयांचादेखील सखोल अभ्यास करतो. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे कंपनी सेक्रेटरी कॉर्पोरेट गव्हर्नन्स कम्प्लायन्सचा कणा असतो.
तर असा हा कंपनी सेक्रेटरी तयार करण्याची जबाबदारी कायद्याने 'Institute of Company Secretaries of India' ('ICSI') या संस्थेवर आहे. ICSI ही कंपनी सेक्रेटरीज कायदा, १९८० अंतर्गत स्थापन केलेली एक सरकारी संस्था आहे, ज्याच्या मॅनेजिंग काउन्सिलवर मुख्यत्वेकरून या संस्थेतून पास आउट झालेले प्रोफेशनल कंपनी सेक्रेटरीच असतात. (सरकारी संस्था म्हटल्यावर डोळ्यासमोर जे चित्र उगाचच येते, तशी ही संस्था नाही हे ठसवण्यासाठी प्रोफेशनल कंपनी सेक्रेटरी याच्या मॅनेजिंग काउन्सिलवर मुख्यत्वेकरून असतात, हे मुद्दाम सांगितले.)
तर अशा या ICSIने 'Corporate Governance'ची खूप सुंदर आणि सोप्पी व्याख्या दिली आहे:
“Corporate Governance is the application of best management practices, compliance of law in true letter and spirit and adherence to ethical standards for effective management and distribution of wealth and discharge of social responsibility for the sustainable development of all stakeholders.”
कंपनी सेक्रेटरी या Corporate Governanceचा कणा अथवा आधारस्तंभ असतो. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सर्व निर्णय घेते आणि हे निर्णय बोर्ड मीटिंगमध्ये घेतले जाणे अपेक्षित असतात. बोर्ड मीटिंगमध्ये कंपनी सेक्रेटरी असणे अपेक्षित असते. त्यामुळे कंपनी सेक्रेटरी (जो कंपनीचा एम्प्लॉयी किंवा एक प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल असतो) हा कंपनीचे प्रशासक आणि कंपनीचे स्टेकहोल्डर्स यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा ठरतो आणि त्यामुळेच कंपनीत चालत असलेल्या कुठल्याही गैरव्यवहाराला चव्हाट्यावर आणण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. (अर्थात काही गोष्टी त्याला अंधारात ठेवून केल्या जाऊ शकतात, ज्याला त्याचा नाइलाज असतो.)
कंपनी सेक्रेटरी अथवा कंपनी सचिव घडवण्यासाठी ICSIने एक अभ्यासक्रम ठरवलेला आहे. हा अतिशय अवघड आणि कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही ICSIचे मेबर होऊ शकता आणि एक कंपनी सचिव म्हणून इंडिपेंडंट प्रॅक्टिस करू शकता (ज्यामध्ये सेक्रेटरियल ऑडिट, सर्टिफिकेशन्स, कॉर्पोरेट कन्सल्टन्सी इत्यादींचा समावेश असू शकतो) किंवा एखाद्या कंपनीचा कंपनी सेक्रेटरी म्हणून जॉब करू शकता. (याच्या कार्याचे विस्तृत वर्णन वरती आलेच आहे.). वर म्हटल्याप्रमाणे हा ३ वर्षांचा (आणि ३ वर्षात पूर्ण होण्यास अवघड असलेला) अभ्यासक्रम आहे. यात फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह (इंटरमिजिएट) आणि प्रोफेशनल (फायनल) अशा तीन सत्रांत परीक्षा होतात. प्रत्येक सत्रामध्ये साधारणपणे दोन ग्रुप्स असतात आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तीन-चार विषय असतात. काळाच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रम अधूनमधून बदलत असतो. त्यामुळे एखाद्या सत्रात दोनऐवजी तीन किंवा चार ग्रुप्स असू शकतात आणि प्रत्येकी चारऐवजी दोन किंवा तीन विषयदेखील असू शकतात. या अभ्यासक्रमात सर्वात प्रमुख कंपनी कायदा असतो. याशिवाय इतर कॉर्पोरेट कायदे, अकाउंटस, टॅक्स, कामगार कायदा आणि कल्याण, कॉर्पोरेट रीस्ट्रक्चरिंग, ह्युमन रिसोर्स, बँकिंग इत्यादी विषयांचादेखील समावेश असतो. थोडक्यात कंपनी सेक्रेटरी हा एक कायदेतज्ज्ञ + बिझनेस मॅनेजर + कॉर्पोरेट कन्सल्टंट म्हणून घडवण्याकडे कल असतो. हे तिन्ही अडसर पार केले की (किंवा करत असताना) १५ ते २४ महिन्यांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यावे लागते. हे एखाद्या मान्यताप्राप्त (ICSIची परवानगी घेतलेल्या) कंपनीमध्ये किंवा प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीकडे घ्यावे लागते. याशिवाय १५ दिवसांचा एक मॅनेजमेट स्टुडंट ओरिएंटेशन प्रॉग्रॅमदेखील पूर्ण करावा लागतो. हा ICSIतर्फेच घेतला जातो. याशिवाय वेगवेगळ्या पर्यायांवर २ ते १५ दिवसांचे इतर प्रकारांचे ट्रेनिंग घ्यावे लागते, संगणक अर्हता सिद्ध करावी लागते, २५ तासांचे शैक्षणिक कार्यक्रम अटेंड करावे लागतात आणि मग कुठे तुम्ही ICSIचे मेंबर होता. या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघणारा माणूसच कॉर्पोरेट क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो.
मी जेव्हा सी.एस. करत होतो, तेव्हा निकाल साधारणा १०-१२% लागायचा, तेसुद्धा एका वेळेस एकाच ग्रुपची परीक्षा देणार्यांसाठी. एका वेळेस दोन्ही ग्रुप देणारे लोक प्रातःस्मरणीय होते. त्यांच्याकडे भक्तिभावाने पाहिले जायचे आणि त्यापैकी पास होणारे महाभाग इहलोकातले नाहीतच, याची आमच्यापैकी प्रत्येकाला खात्री असायची. नापास होणे ही लांच्छनास्पद गोष्ट नाही, हे मला सी.एस. करायला लागल्यावर कळले. त्या आधीच्या आयुष्यात नापास होऊन सत्र वाया जाणे म्हणजे काय आहे, ते आम्हाला माहीत नव्हते. आमच्या वृथा अहंकाराच्या भिंती पहिल्या दोन वर्षातच कोसळल्या. एका ग्रुपमध्ये (४ पेपर) पास होण्यासाठी २०० मार्क लागायचे आणि प्रत्येक विषयात किमान ४०. थोडक्यात अॅग्रिगेट पासिंग ३५% नसून ५०% होते आणि ५०% मिळवणारा राजा असायचा. ८०%ची सवय असलेला माणूस लवकरच ५०%चे महत्त्व ओळखायचा आणि नसत्या अपेक्षा सोडून द्यायचा. एक काळ असा होता की ५८% मिळालेला महामानव पहिल्या क्रमांकाने पास झालेला होता. इतरांची काय अवस्था असेल याचा विचार करा. १९० मार्क मिळाल्यावर आम्ही 'सन्माननीयरित्या नापास' झाल्याचे जाहीर करायचो. ही हुरूप वाढवणारी गोष्ट असायची, कारण त्यामुळे पुढच्या अॅटेंप्टला पास होण्याची शक्यता वाढल्याचा आभास निर्माण व्हायचा. (तो बर्याचदा पुढच्या अॅटेंप्टमध्येही नापास होइपर्यंत टिकायचा.) एक वेळ अशी यायची की बहुतांश लोकांचा पेशन्स संपायचा आणि ते अभ्यासक्रम अर्धवट सोडून द्यायचे. त्यातूनही आमच्यासारखे लोक केवळ चिकाटीच्या बळावर टिकले आणि पास झाले. (शेवटी इन्स्टिट्यूट कंटाळली बहुधा.) शंभरातले अखेर केवळ चार-पाच लोक अंतिम ध्येयापर्यंत पोहोचायचे. हा खेळ चिकाटीचा होता. जे शेवटपर्यंत टिकले ते जिंकले. ज्यांनी कोर्स अर्धवट सोडला, त्यांचे ध्येय वेगळे होते. ज्यांचे ध्येय निश्चित होते, ते पास झाले. सिंपल.
पास झाल्यावर कॉर्पोरेट क्षेत्रातली मुशाफिरी सुरू झाली. पण त्याआधी तब्बल ६ महिने योग्य त्या नोकरीच्या शोधात होतो. पाहिजे तो जॉब मिळेस्तोवर जे हातात होते ते केले. पण एक खूप मोठा अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणजे कंपन्या तुमच्यामागे पळत येतात, हा भ्रमाचा भोपळा मात्र फुटला. एकदा रेसमध्ये शिरल्यावर पळतच राहावे लागते, परत परत स्वतःला सिद्ध करत राहावे लागते, हे अनुभवले. सी.एस. सुरू करण्यापूर्वी काही क्लासवाल्यांनी आम्हाला सी.एस. करण्यासाठी उद्युक्त करण्याच्या हेतूने सांगितले होते की सी.एस. झाल्या झाल्या तीन लाखाची नोकरी (हे १७ वर्षांपूर्वीचे ३ लाख, बरं का), शॉफर ड्रिव्हन कार आणि लोखंडवालामध्ये फ्लॅट दाराशी चालून येईल. पास झाल्यानंतर त्या दाव्यातला फोलपणा कळला. भारतातला एक अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला, म्हणून कुणीही हे सगळे द्यायला तयार नव्हते. स्वतःचे खणखणीत नाणे सिद्ध करून दाखवल्यावर मग हे सगळे मिळतेही, पण इतक्या सहजासहजी नाही.
सी.एस. करताना पास-नापासचा खेळ खेळताना एक काळ आम्हाला सगळ्यांनाच इतके नैराश्य आले होते की जे चिकाटीने टिकून राहिले होते, त्यांनीही इतर अभ्यासक्रम धुंडाळायला सुरुवात केली होती. मी स्वतःही सी.एस. करत असताना एम.कॉम. आणि फॉरेन ट्रेडचा एक पॉस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासुद्धा करत होतो. (सुदैवाने त्यात नापास न होता पास झालो). जर सी.एस. नाहीच झालो, तर काय? या प्रश्नाचे ते उत्तर होते. सुदैवाने झालो एकदाचा सी.एस. ३ वर्षांचा अभ्यासक्रम ५ वर्षांत पूर्ण करून.
माझा पहिला जॉब सुरू केल्यावर (जो मी आज गेली ११ वर्षे करतो आहे) 'घी देखा, लेकिन बडगा नही देखा' म्हणजे काय, हे मला कळले. तुमचा एम्प्लॉयर कशा अवघड टाइम लाइन्स सेट करतो, ते कळले. ६ महिन्यांचे काम ४ महिन्यांत पूर्ण केल्यास त्याचे बक्षीस म्हणजे पुढच्या वेळेस तेच काम ३ महिन्यांत पूर्ण करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स मिळतात. “The Reward for Good work is more work” हे कळले. एक महायोगी सांगून गेला आहे - 'Poverty is just a state of mind'.. त्याच धर्तीवर 'Time is just a state of mind' हे कळायला लागले, कारण वेळ-काळ विसरून कामे करावी लागली. एकदा सलग ४८ तास (झोप न घेता) काम करावे लागले. (नंतर एकदा ५० तास काम करून हा रेकॉर्ड मोडला. तो मात्र अजून अबाधित आहे.) नंतर सी.एस.च्या सर्टिफिकेटच्या जोरावर कंपनीने 'फायनान्स' बघण्याचे काम दिले. जगातली कुठलीही कंपनी पैशाच्या बाबतीत जराही सबुरी दाखवत नाही, त्यामुळे घड्याळ्याच्या काट्यावरच चालावे लागते. पैशांच्या बाबतीत एका दिवसाचा विलंब रामायण-महाभारत दोन्ही एका दिवसात घडवू शकतो. ही एक गोष्ट आहे जिथे कुठलाही प्रमोटर अगदी डोळ्यात तेल घालूनच बघत असतो. त्यामुळे कामातली दिरंगाई सहन होण्याचा प्रश्नच नाही.
आणि हे सगळे करताना एक सी.एस. म्हणून कॉर्पोरेट कायदे पाळणेही तितकेच महत्त्वाचे. कंपनी कायदा असो किंवा फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट किंवा इतर कॉर्पोरेट कायदे, यांच्यात सतत बदल होत असतात. रोज नवीन सर्क्युलर, रोज थोडा बदल. हे बदल समजून घेऊन मॅनेजमेंटला अपडेट करत राहण्याची आणि कालचा निर्णय आज का बदलावा लागत आहे हे सांगण्याची कसरतही कधीकधी करावी लागते. या सततच्या बदलांमुळे 'शिक्षणाची' फेज अजून संपलेली नाही, कारण रोज नवीन शिकावे लागते आणि मग ते इम्प्लिमेंट करावे लागते. त्यामुळेच मग मी नोकरी करत असतानाच कायद्याची पदवीदेखील संपादन केली. त्याचा अजून उपयोग होतो.
आज या प्रोफेशनमध्ये जवळजवळ एक तपाचा कालखंड पूर्ण केला आहे, पण तपश्चर्या काही अजून पूर्ण झालेली नाही. ती रोजच नव्याने सुरू करायला लागते. नव्याने गोष्टी शिकाव्या लागतात. रोज नवीन क्षितिजे खुणावत असतात. १२ वर्षांपूर्वी सी.एस. पास आउट होण्याच्या उंबरठ्यावर असताना सगळे सोडून एखाद्या बीपीओमध्ये जॉब घ्यावा असे वाटत होते. आज जाणवते की तो निर्णय घेतला नाही ते बरेच झाले. तिथेही करियर झालेच असते. पण आज कायदा आणि वित्ताच्या क्षेत्रात जी मुशाफिरी करतो आहे, तीच तर मला करायची होती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(माझ्या नव्या उपहारगृहांचे
धन्यवाद.
जबरद्स्त लेख. एक सी एस
अत्यंत माहितीपूर्ण लेख. सीएस
छान लेख.
मस्त आहे लेख
लेखन आवडले. सी ए, सी एस वगैरे
लेख आवडला
माझी चिकाटी जिद्द कमी पडली
मृत्युंजय राव
समजत नाही हे तरीही बरं आहे.
उत्तम लेख !!
मस्तच..
मृत्युन्जय साहेब
ही आयडीया चांगली आहे. :)
वाह.
लेख आवडला.
अप्रतिम लेख व अनुभव.
सी.एस.च्या कामाचा अंदाज होता,
घरात एक नातेवाईक सीएस
एका अज्ञात क्षेत्राची अनवट
मस्त लेख.
जबरी लेख!
लेखं खुप छान
जबराट!!! काही मित्र मंडळींनी
मस्त माहितीपुर्ण लेख,
मुंबईत ....
तपशील
वेगळेच!
मस्त लेख. य क्शेत्रत काम
ICSI च्या पुणे विभागाचे व्हाईस चेअरमन __/\__
लेख आवडला