Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य : कणकेचा शिरा

लेखक मितान यांनी शुक्रवार, 25/09/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
कणकेचा शिरा साहित्य : कणीक १ वाटी तूप अर्धी वाटी गूळ पाऊण वाटी वेलचीपूड, जायफळपूड, सुकामेवा अावडीनुसार. कृती : चमचाभर तूप शिल्लक ठेवून बाकीचे कढईत गरम करावे. त्यात कणीक गुलाबी लाल होईपर्यंत भाजावी. लाडू करताना बेसन भाजतो तसे तुप्पट दिसले पाहिजे ;) एकीकडे पाणी उकळावे. आता आच कमी करून उकळते पाणी हळूहळू कणकेत घालावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कणकेचा छान गोळा व्हायला लागला की त्यात किसलेला गूळ घालावा. लगेचच वेलची जायफळ सुकामेवा घालून नीट मिसळावे. वरून चमचाभर तूप कडेने घालावे. एक वाफ आली की शिरा तयार! . हा शिरा आमच्याकडे सर्वांना आवडतो. प्रसादासाठी नेहमी केला जातो. कोणत्या तरी उपासानंतर मावशी असा शिरा न पुरी करायची. आजेसासुबाईंचा तर हा फेवरिट 'नवेद्य'! माझी लेक हा चाकलेटी शिरा रोज खाऊ शकते! . . एकदा एका सिंधी मित्राकडे दिवाळीचा प्रसाद. म्हणून हा शिरा होता. तो गरम असतानाच हातावर घ्यायचा. त्यातून तूप निथळत असतानाच तोंडात टाकायचा म्हणे! काकूंना विचारलं असं का तर उत्तर मिळालं, "बेटा, प्रशादको दात नही लगाते ना! इसलिए!! नक्की बघा हं करून हा सोपा नॆवेद्य! !

वाचने 11740
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

भन्नाटच दिसतोय! कणकेचा अजून केला नाही पण रव्याचा कायम करतो. त्यात अगदी मऊ पिकलेली वसईची केळी कुस्करुन घालतो. झक्कास फ्लेवर येतो.

ओह! माझा (अजून एक) आवडता पदार्थ. माझी आजी आणि आई (सासू-सून) हा शिरा बनविण्यात आणि मी खाण्यात एक्स्पर्ट. तुमच्या पाककृतीत 'तुप' ह्या ठिकाणी 'साजूक तुप' (त्यातून घरचे असेल तर उत्तम) असं पाहिजे, तुम्ही साजूक तुपच वापरत असणार (त्याशिवाय भन्नाट चव येत नाही) पण टंकताना 'साजूक' हा पवित्र शब्द राहून गेला असावा.

मस्त मस्त! असा तूपात निथळलेला अमृतसरच्या सुवर्णमंदिरातला द्रोणातला प्रसाद आठवला.. स्वाती

अतिशय आवडता प्रकार. पाण्यासोबत थोडे दुध घालुनही छान होतो. आमच्या घरी कणकेचा शिरा हे नवर्‍याचे पेटंट आहे, त्यामुळे मी फक्त खाते, करत नाही. :)

अतिशय आवडता शिरा आहे हा. थंडी पडायला लागली की आमच्याकडे हा तूपाने थबथबलेला कणकेचा शिरा हमखास बनतो. लहानपणी शीख मैत्रिणीसोबत अनेकदा गुरुद्वारेत गेलेय तिथे लंगर असला की हा प्रसादाचा "आटे का हलवा" देत असे, आठवणी जाग्या झाल्या. छान दिसतोय शिरा, फोटो बघून तोंपासू :)

छान दिसतोय. एकदा एका नातेवाईकांकडे खाल्ला होता. त्यावेळी फर आवडला, नंतर एकदा घरी करून बघितला होता. आता पुन्हा करायलाच हवा.

ज्या प्रसादाचा अज्जिब्बात कधी कंटाळा आला नाही..त्यापैकी एक हा. दत्तसंप्रदायातल्या काही विशिष्ट पूजांमधे हाच प्रसाद असतो.

माझाहि आवडता आहे हा शीरा. अतीशय खमंग लागतो. फोटो फारच कातील आलेत.