Skip to main content

सोपी मसाला सुपारी

लेखक पद्मावति यांनी शुक्रवार, 11/09/2015 02:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य बडीशोप- ३ वाट्या ओवा- ३/४ वाटी लवंग-अर्धी वाटीच्या किंचित जास्तं वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट)- १ वाटी तीळ- १ वाटी ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी मीठ आणि साखर- चवीपुरते. . कृती शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं. . तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर सोडून बाकी सगळ्या गोष्टी मिक्सर मधे बारीक कूटून घ्याव्या. . कूटलेल्या मिश्रणात भाजलेले तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर टाकावी. चवीला किंचित साखर आणि मीठ टाकावे. यात सुपारी नसल्यामुळे लहान मुलांनी खाल्ली तरी काहीच हरकत नाही , उलट त्यांना पाचक म्हणून चांगलंच आहे. . यात रंगीत शोपेच्या गोळ्या पण टाकु शकता. मस्तं लागतात. . माहितीचा स्रोत: माझ्या सासूबाई.

वाचने 18541
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

सादरीकरण एकदम खास आहे. पाकृ आवडली. घरगुती मसाला सुपारी खाऊन जमाना झालाय.

लवंगा दिसायला जास्तं वाटतात पण त्या खूप भाजून घेतल्या असल्यामुळे त्रास नाही होत. बाकी खोबरं, ज्येष्ठ मधामुळे सुपारी अगदी सौम्य लागते. हवं तर ज्येष्ठ मध जरा जास्तं टाकावा आणि बाकी गोष्टी सुद्धा थोड्या आपल्या चवीनुसार कमी जास्ती केल्या तरीही काहीच हरकत नाही.

In reply to by रमेश आठवले

ही मसाला सुपारी नाही. मुखवास आहे. अर्थात छान आहे हेवेसांनल.

मस्त कृती आणि फोटो घरी मसाला सुपारी करायचो पण ती इतक्या पटकन संपायची की आई ओरडायची.. आम्ही येता-जाता बकाणे मारायचो, सकाळी कॉलेजला जाताना, संध्याकाळी खेळायला जाताना, थोडक्यात प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना आणि नाष्टा आणि दोन्ही जेवणांनंतर. यात मी, बहीण आणि आमचे बाबा पण सामील असायचे. नंतर मग बाकी कामात हा व्याप नको म्हणुन सुपारी घरी करणे बंदच केले. आता नुसती भाजलेली बडीशेप घरी असते किंवा कधी कधी विकतची मसाला सुपारी आणतो. आता या लेखाच्या निमित्ताने परत एकदा मसाला सुपारी करुन बघेन.

बर्याच लोकांनी प्रातिसादात सांगितल्याप्रमाणे याला खरं म्हणजे मूखवास हा शब्द हवा होता. सुपारीची पूड ( बीटल नट) या मिश्रणामधे टाकली असती तर मग तीला सुपारी म्हणणे योग्य झाले असते. आमच्याघरी मी मुलांना नको म्हणून सुपारी पूड टाकत नाही. जे काही असे मिश्रण बनवते त्यालाच सुपारी म्हणायची सवय आहे. दूसरं काही म्हणायचं लक्षातच नाही, त्यामुळे इथे लिहितांना सुद्धा मसाला सुपारी हेच नाव दिलं.

घरी बर्‍याचवेळेस अशी करण्यात येते, छोट्या भाचीला फार आवडते, येता जाता खाणं चालू असतं मग लपवून ठेवावी लागते. :)

छानच लागते ही सुपारी नसलेली सुपारी.. स्वाती

सकाळी रात्री नी दुपारी ! खावी फक्त हीच सुपारी !! कवी :जिल्ब्त्मां चोचले.

वाह अप्रतिम . आमच्या सातार्‍याच्या सुप्रसिध्द भावे सुपारीची आठवण झाली

मस्त आहे प्रकार! आणि सुपारी नाही त्यात!

मस्त. फोटो आणि सादरीकरणही छानच. माझी आई करते त्यात धनियाडाळ, बाळंतशोप आणि थोडी थंडाई घालते. बाकी अशीच पद्धत.

पेटंट खरच आपण या मसाला सुपारीचे "पेटंट" (reserved rights) घ्यायला हवे,फारच छान सादरीकरण

मस्तं कृती सांगितलीस मुखवासाची, फोटो बघूनचं चव आली तोंडात. सादरीकरण खूप आवडले खासकरुन ते गोडुले भांडे ;) मला करायचीये पण ज्येष्ठ मध पावडर आता आमच्या शेफिल्डात कुठून आणू बरे?

In reply to by सानिकास्वप्निल

अहो असं काय करता! ज्येष्ठमध म्हणजे "लिकरिश". लिकरिश रूट पावडर "हॉलंड अँड बेरे" सारख्या दुकानांत मिळते. नाहीतर इथून मागवा.

In reply to by आदूबाळ

ज्येष्ठमध म्हणजे "लिकरिश" हे मला माहित आहे पण ते हॉलंड अँड बेरेमध्ये मिळू शकेल हे माहित नव्हते. लवकरच आमच्या इथल्या हॉलंड अँड बेरेमध्ये शोधते :) धन्यवाद आदूबाळ

बकाणा नावाने एक सुपारी प्रसिध्द होती.त्याच्या जवल ही जाते.

मला फक्त लवंग कमी लागली. बाकी मस्त झालीय, गणपतीच्या गडबडीत करायची राहून गेली, म्हणून प्रतिक्रियाही दिली नव्हती.

कधी केली नाही. आता करेन.