...घे जगून !
गेल्या वर्षीचा फेब्रुवारी महिना. लेकाची दहावीची परीक्षा पंधरा दिवसांनी सुरु व्हायची होती. एका रविवारच्या सु-प्रभाती मी आणि मुलगा पुस्तकं आणि इतर शालेय साहित्य आवरत होतो. आठ दिवसापूर्वी शाळेतून मुलाचं परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं होतं ते मी बंदोबस्तात कपाटात ठेवलं होतं. त्याला लॅमिनेशन करायचे होते म्हणून लॉकरचा कप्पा उघडला. सगळे कागद बाहेर काढले. हॉल तिकीट त्यात सापडेना. कपाट पालथं घातलं, सगळ्या वस्तू, कपडे बाहेर काढून शोधलं, लॉफ्टवरच्या सगळ्या जिनसा खाली आल्या, कागद अन कागद विंचरून काढला. पण हॉल तिकीट मिळालं नाही. हॉल तिकीट म्हणजे परीक्षेचा प्रवेश परवाना. महत्वाचा कागद !
... मी आणि मुलगा दोघंही टेन्स !
‘आई, मी शाळेतून घरी आल्यावर तर तुझ्या हातात दिलं होतं ना ! ‘ मुलगा रडकुंडीला येऊन सांगत होता.
‘होय रे राजा, मला आठवतं. पण त्यावेळी मी बाहेर निघाले होते ना कुठंतरी ! मग आल्यावर कपाटात ठेवलेलं आठवतंय. पण नाही ना कपाटात !’
‘तू कुठं गेली होतीस त्या दिवशी, आठव... ’
डोक्याला ताण दिला. ज्या दिवशी हॉल तिकीट मिळालं त्या दिवशी इतर काही कागदपत्रांच्या कामासाठी एका झेरॉक्स आणि स्टँप व्हेंडरच्या दुकानात गेले होते. तिथे तर राहिले नाही ना ?
तातडीनं स्कूटर काढली आणि झेरॉक्सवाल्याकडे गेले. त्यानं बिचाऱ्यानं त्याच्या दोन्ही कपाटातली आणि ट्रेमधली सगळी कागदां पालथी घातली. हॉल तिकीट इल्ले !
मग स्टँप व्हेंडरकडे धाव घेतली. तो स्टँप खरडण्याच्या कामात इतका गुंग होता की वर बघायलाच तयार नाही.
‘ऑ हॅलो हॅलो...’
मी काकुळतीने तीनदा अभिवादन केल्यावर त्याने एकदाचे माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला,
‘१०० रु. चे स्टँप संपलेत.’
‘नाही हो, माझं हॉल तिकीट हरवलंय इथं परवा, ते सापडतय का बघता का जरा प्लीज ?’
‘कसलं तिकीट ? तिकीटासारखी वस्तू नीट सांभाळून ठेवायची हे तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला सांगायला लागतंय व्हय ?’
मी सगळा झंटलमनपणा गिळून गप्प ऐकून घेतले आणि रस्त्यातल्या म्हशीसारखी सुमडीत तिथंच उभी राहिले. माझा चिकटपणा बघून तो शेवटी म्हणाला,
‘अर्धा तास थांबायला पायजे. एवढी गिरायकं आटपतो आणि मग बघतो तुमचं तिकीट. बसा.’
दुकानातल्या पायमोडक्या खुर्चीवर अर्धा तास बसून राहिले.
जवळजवळ पाउण तासाने स्टँप व्हेंडरसाहेबांचं काम आटपलं. मग त्यांनी सगळी कपाटे, ड्रॉवर पालथे घातले. पण हॉल तिकीट काही मिळालं नाही.
घरी येऊन आणखी एक शोध मोहीम घेतली. शाळेत असताना कुणीतरी शिकवलेला , हरवलेल्या वस्तू सापडायचा मंत्रही जपून झाला.
‘कार्तवीर्यअर्जुन नाम राजा बाहूसहस्रवान
तस्यस्मरणमात्रेण गतं नष्टम च लभ्यते’
संध्याकाळपर्यंत या मंत्राचा जप करूनही ते बेटं तिकीट जे कुठंतरी लपून बसलं होतं, ते काही सापडलंच नाही.
अखेर दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन मी प्रिन्सिपल मॅडमना भेटून शक्य तितका चेहेरा पाडून हॉल तिकीट हरवल्याची दु:खद वार्ता सांगितली.
‘नो प्रॉब्लेम. डोंट गेन टेन्शन !’ त्या उद्गारल्या.
मग त्यांनी सुहास्य वदनाने सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईटवरून शाळेचा पासवर्ड देऊन ते तिकीट डाउनलोड केले अन त्याची प्रिंट काढून मला दिली. ‘हुश्श’ केले. मग घरी आल्यावर त्या तिकीटाला लॅमिनेशन करून बंदोबस्तात ठेवले. मुलगा अभ्यासाच्या तयारीला लागला.
पहिला पेपर होता त्याच्या आदल्या दिवशी गॅस संपला. गॅसकार्ड काढले तर त्यात एक एन्व्हलप दिसले. उघडून बघितले.
.....तेच ते हरवलेले द्वाड हॉल तिकीट त्यात आरामात पहुडले होते !!
हरवलेले उशिरा का होईना, पण गवसले. बहुतेक कार्तवीर्यअर्जुन राजाच्या दरबारात बरीच दफ्तर-दिरंगाई असावी !
पण असे नेहमीच नाही ना घडत !
जीवनात पावलोपावली कितीतरी गोष्टी हरवल्या. अगदी जिवाभावाच्या. त्यातल्या फारच थोड्या पुन्हा हाती लागल्या. पण किती एक अशा आहेत की हरवूनही कायमच्या मनात रुतून बसल्या आहेत...
....काहीतरी हरवल्यामुळे दु:ख झाल्याची पहिली आठवण आहे ती बालपणी खाऊच्या पैशातून साठवलेल्या आणि बागेत हरवलेल्या , दोन रुपये आणि चाळीस पैशांची ! ...नंतर बाबांनी आख्खे पाच रुपये हातावर ठेवले. पण ते दोन रुपये आणि चाळीस पैसे अजून मनात कुठल्याशा कोपऱ्यात अडकून राहिले आहेत.
आजीकडे सुट्टीला गेल्यावर दुपारच्या निवांत वेळी तापलेल्या रस्त्यावरून एक हेलदार आरोळी सुरात ऐकू येत असे,
‘सुयो घेsss... बिब्बो घेsss, दाभुन घेsss.....घे गोंदून !!’
‘सुयो घेsss... बिब्बो घेsss, दाभुन घेsss.....घे गोंदून !!’
रंगीबेरंगी घेरदार घागरे अन दंडापर्यंत हस्तिदंती काकणे ल्यालेल्या लमाणी बायका रस्त्यांवरून सुया, बिब्बे, दाभणे विकत फिरत. त्यांच्याकडून हात आणि कपाळ वगैरे गोंदून घेण्यासाठी पोरीसोरींची आणि त्यांच्या आयांची झुंबड उडे. गोंदलेल्या ठिकाणी औषधाचा लेप मिरवत संध्याकाळी गल्लीतल्या मैतरणी खेळायला येत तेव्हा मी ते हिरवेगार सुबक गोंदण कुतूहलानं अन कौतुकानं न्याहाळत असे.
...या सुया अन बिब्बेवाल्या, घागरा अन काकणेवाल्या लमाण बायका आणि त्यांची ती साद, ‘सुयो घेsss... बिब्बो घेsss, दाभुन घेsss.....घे गोंदून !!’ हे सगळे आज फार फार दूरच्या देशात हरवलेय !
अशाच आणि कितीक हरवलेल्या गोष्टी !
...लहानपणी उन्हाळ्यात गच्चीत झोपल्यावर आकाशात दिसणारी तारकांची झगमगणारी वेलबुट्टी..
...चिमणीच्या दातांनी मैत्रिणींना वाटून खाल्लेली चिंचेची बुटुके..
...वडिलांची बदली झाल्यामुळे अगणित वेळा हरवलेल्या शाळेतल्या आणि कॉलेजातल्या मैत्रिणी..
...कधीतरी बाहेरगावी जाताना, गावकुसाच्या बाहेर पडलं की गाडीच्या खिडकीतून अंगावर येणारी गच्च झाडी, बांधावर डेरेदार झाडे मिरवणारी हिरवी शेते, राने..
...बाळंतिणीच्या खोलीत गेल्यावर तन-मनाला वेढून घेणारा उदा-धुपाचा, शेकशेगडीचा आणि चिमण्याच्या जावळाचा लडिवाळ वास ..
...होस्टेलमध्ये असताना, मे महिन्यात परीक्षा असल्याने मिसलेले जवळच्या भावंडांचे लग्नसमारंभ आणि त्यातली धमाल...
...आजीने सुताराकडून स्पेशल करवून घेतलेलं आणि ओल्या हाताने घेताना निसटून खाली पडून भंगलेलं, शिसवी लाकडाचं सुरेख पोळपाट...
...मुलगा कॉलेजमध्ये गेल्यावर, अडगळ जास्त झाली म्हणून कामवालीला देऊन टाकलेली, लाडक्या आठवणींनी लगडलेली, मुलाची ट्रंकभर खेळणी...
...जमिनीच्या व्यवहारात फसगत झाल्यामुळे बुडालेले दोन लाख रुपये...
...दूर बदलीच्या ठिकाणी एकटी राहिले असताना, ना रक्ताचे ना नात्यागोत्याचे असे पाठच्या भावासारखे मदत आणि पाठराखण करणारे धना ड्रायव्हर आणि गवाणे शिपाई. ...
कुठे अन कधी हरवले हे सगळे ?
या सगळ्या गोष्टी खरंच ‘माझ्या’ होत्या का ? कुठून आल्या होत्या ? मी आणल्या होत्या का मला मिळाल्या होत्या ?
त्या काही काळासाठी माझ्याजवळ होत्या, इतकेच सांगता येते. त्यांना आज, किंवा मनात येईल तेव्हा कधीही, मी परत बोलावू शकत नाही. त्या माझ्या मालकीच्या, हक्काच्या नाहीत. त्या त्या काळात माझ्या मनाला आनंद किंवा दु:ख देण्यासाठी कुणीतरी त्या उसन्या दिल्या होत्या का ?
आणि आज दिसताहेत या रोजच्या परिचयाच्या आजूबाजूच्या वस्तू, माणसं, हीपण एक ना एक दिवस हरवणार आहेत ! पुन्हा मिळतील न मिळतील !!
...जगू शकू आपण या सगळ्यांविना ?
...अशीही वेळ येईल, एक दिवशी असेच हे आभासी आंतरजालीय अंगण, जिथे विचार जुळले, नाती जडली, मने मोकळी झाली, तेही दुरावेल, इथले सखे-सुहृद अंतरतील...!
..लागेल मन त्यांच्याविना.. ??
जग म्हणजे ‘माया’ ‘माया’ म्हणतात ती हीच का ?
...गेल्या आठवड्यात वरिष्ठ कार्यालयाकडून अचानक तातडीचे बोलावणे आले. ड्रायव्हर सुट्टीवर होता म्हणून रिक्षा करून गेले. रिक्षातून उतरले. गडबडीने रस्ता पार करताना समोरून आलेला ट्रक दिसलाच नाही. काही कळायच्या आतच मी ट्रकच्या दोन हेडलाईटसच्या समोर उभी होते ! ट्रकवाल्याने ब्रेक लावायचा तातडीने प्रयत्न केला. पण इतक्या कमी अंतरात ब्रेक लागणं कठीणच होतं.
ट्रकचा हॉर्न आणि ब्रेकचा आवाज इतक्या कर्कश्शपणे कानठळ्या बसवू लागला की मी स्तंभित झाले ! चटकन रस्ता पार करायचंही सुचेना. समोरून रोरावत भरधाव येणारा ट्रक ! मति कुंठीत ! पाय बधीर ! मन सांगत होतं, पळ ! पण शरीर आज्ञा मानायलाच तयार नव्हतं.
डोळे गच्च मिटले. अखेरच्या क्षणी काय म्हणतात बरं, वाडवडील सांगत ते ..?
‘हे राम ..!’ मनात मी ते दोन शब्द उच्चारले आणि मी झपाट्याने बाजूला खेचली गेले. भीत भीत डोळे उघडले तर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका मिशीवाल्या दणकट भय्याने अगदी शेवटच्या क्षणी मला दंडाला धरून झपकन बाजूला ओढले होते !
..ट्रक रोरावत निघून गेला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती ! भय्याला धन्यवाद द्यायला शब्दच नव्हते.
...फाटक पार करून ऑफिसात जाताना मनात येऊन गेले,
अरे, खरच एक दिवस हा देहच हरवणार आहे ! ‘मी’पण हरपणार. आणि जीवनही दुरावणार !
‘कार्तवीर्यअर्जुन..’ मंत्राचं सहस्र वेळा जरी पठण केलं तरी, पुन्हा मिळेल ..???’
...म्हणून बयो, आत्ताच मन भरून जगून घे ! समोर येतोय तो क्षण उपभोगून घे. प्रत्येक क्षणाची रंगत, लज्जत नीट चाखून घे ! येणारा प्रत्येक प्रसंग, घडणारी हर एक घटना लक्ष देऊन पहा, भोगून घे ! एक दिवस, जेव्हा जीवनच हरवेल, तेव्हा हे क्षण कुठून मिळवशील पुन्हा ?
..डोक्यात सहस्र चक्रे एकाच वेळी गर्रकन फिरल्यासारखं झालं ! एक सुन्न शांतता डोक्यात, कोऱ्या कागदावर सांडलेल्या काळ्या शाईसारखी पसरली.
आणि त्या शांततेत, मनातल्या कुठल्याशा गल्लीतून रंगीबेरंगी घागरावाली लमाण बाई हस्तिदंती काकणांच्या ठेक्यावर साद देऊ लागली....
‘बघून घे sss… भोगून घेsss, खेळून घेsss,
…घे जगून !!!
प्रतिक्रिया
आवडला आणि पटला .
सुन्दर ले़ख !!
मला
हरविलेल्या वस्तू सापडल्यावर
छान लिहिले आहे हे लिहायचे
अंगावर शहारा आला. प्रत्येक
लेख वाचल्यावर एकाच वेळी टोकाच्या दोन प्रतिक्रीया उमटल्या
नेहमीप्रमाणं हसत खेळत
छान लिहिलंय
फार छान दृष्टिकोन.
+१
" हर पल यहा जी भर जियो, जो है समा, कल हो ना हो"
लेख आवडला.
निव्वळ अ प्र ति म!
अगदी मस्त लिहीलात.
मनापासून उतरलेला लेख.मनाला
सुंदर!! बर्याच हरवून पुन्हा
छान! आवडले.
सुंदर सुंदर लिहिलंय ताई ..
स्नेहान्किता खूपच सुन्दर.
अत्यंत सुंदर..
फार सुंदर लेख ! शेवट पण छान .
लेखन आवडलं आणि काय काय आठवत
मस्त
जगून घे...
अप्रतिम, खुप आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला. खास तुझा टच !
वा ! क्या बात है लेख अतिशय
काय सुरेख!
सुरेखच!
मिपा आले परतोनी.
मस्त लेख...
आवडला...
मस्त लेख...
सुपर्ब !
सुंदर लेख ! मानसिकतेतला बदल
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद !
मस्त लिहिलय आवडलं
खूप सुंदर
अतिशय सुरेख!
लेख सुंदर जमला आहे. प्रत्येक
फार सुंदर लिहिले आहे. खूप
अप्रतिम! वा. खु साठवत आहे. हा
भोगुन घे
लहानशा प्रसंगातून मस्त
मस्त लिहिलंय...