'स्थितप्रज्ञ'
काळाच्या दोरीला बांधत
अजून एका शतकाची गाठ
स्वतःशीच हसला तो पाषाणाचा पुतळा
पाषाणाचीच दाढी कुरवाळत मनातल्या मनात
अजून किती जगशील तू?
तुझी ही स्तब्ध पावले थकतील आधी
की काळाची?
अन् मग संवेदना बधीर करत
भिनेल ते विष हळूहळू
सर्वांगात?
जीर्ण देहावरच्या कातळी सुरकुत्या
साक्ष देती कशा आजही
कैक पावसाळ्यांच्या
अन् तख्तपालटांच्या!
त्याच्या नश्वर देहाची ही भव्य आठवण
पेरते का रे आजही तेच विचार
तुझ्याकडे कधीकधी वळणार्या
नजरांमध्ये?
की विझते आजही धुमसती
संघर्षाची धुनी
तुझ्या स्फूर्तीने?
आलाय वाटतं जवळ
तुझ्या निष्प्राण अस्तित्त्वाचा शेवट
ते पहा,
मदांध विजयोन्मादानं भरून गेलंय
कधीच ओसाड पडलेलं हे शहर
येताहेत तुझ्याच दिशेने
काही पावले ओळखीची
हो, तुलाच संपवायला
पुन्हा एकदा
अरे, हे काय?
का रे बाळांनो असे थबकलात किंचितसे?
की तुमच्याही दृष्टीत
नकळत जन्मलेत विचार?
बरं, जरा जपून घाला हं घाव
लागेल एखादा अवचित उडालेला टवका
दगडी ओठांवर उमललं
एक प्रेमळ स्मितहास्य.
पायांवर पडू लागलेले
घणांचे घाव
त्याला जाणवत नव्हते आज
बधीर मनांचे खेळ पाहत
तो पुन्हा गढून गेला
अखेरच्या तत्त्वचिंतनात
त्या स्थितप्रज्ञासारखाच...
वाह !
सहज सुंदर !
वाह! सुरेख.
वाह...
क्या बात!
आजच्या परिस्थितीवर भाष्य
सुरेख!
+१ !!
धन्यवाद. खरं श्रेय प्र ले चं.
सुरेख.
अगदी मस्तं.
जळजळीत भाष्य
सुंदर! समर्पक! मर्मभेदी!
सुरेख..
व्वा! छानच संदर्भ जोडलात!
+१
अतितरल !
+१
.
सुंदर !
मस्त!
मस्त !
सर्व वाचकांना मनापासून
_/\_