शेअरबाजारः तळनिश्चिती (Bottom Formation ) ओळखण्याचे काही आडाखे
'नदीचे मुळ आणि संन्यासाचे कुळ कधी शोधु नये'.... ही म्हण अर्थातच पुराणकालीन असावी, नाहीतर कालानुरुप मला त्यात 'नदीचे मुळ, संन्यासाचे कुळ आणि बाजाराचा तळ' अशी भर टाकायला आवडली असती. पुराणांतील कथापात्रे जशी कधी सुक्ष्म तर पळभरांत विराट रुप धारण करु शकतात,निमिषार्धात एका रुपांतुन दुसर्याव रुपांत जातात....बाजाराचे ही तसेच आहे, मुळात बाजाराच्या अंगी हजार हत्तींचे बळ असते आणि वर क्षणार्धात रुप बदलण्याची क्षमता, यामुळे त्याच्या हालचाली ह्या सर्वसामान्यांच्या कल्पनेपेक्षा वेगवान आणि अतर्क्य असतात आणि पुन्हा एकदा पुराणांतील उदाहरण द्यावयाचे तर बाजारांत नव्याने आलेल्या सामान्य गुंतवणुकदाराची अवस्था ही मयसभेत प्रवेश केलेल्या द्रौपदी सारखी होते, जेथे पाणी म्हणुन वाटते तेथे जमीन असते आणि जमीन भासते तेथे पाणी... तसे मंदी म्हणुन काही करावयास जावे तर बाजार तेजीची चिन्हे दाखवावयास लागतो आणि तेजी आहे असे मानुन काही उद्योग करावा तर लगेचच मंदी सुरु होवुन प्रकरण अंगलट येते.. बाजारात वारंवार उद्भवणार्याौ तेजी मंदीच्या लाटा अनेकदा पाहुनही तेजी संपुन मंदी नकी केंव्हा सुरु होईल(वा उलट..)याचा अंदाज बांधताना भल्याभल्यांच्या नाकातोडात पाणी गेल्याचे पहावयास मिळाले आहे.
अशा अनेक अनुभवाअंती शेवटी 'बाजाराच्या उतरणीने (वा मंदीने) तळ गाठला किंवा तेजीने शिखर गाठले हे कसे ओळखावे??' या कुट प्रश्नाच्या उत्तरार्थ एक 'सोपा' सल्ला या तथाकथित तज्ज्ञ मंडळींनी दिला आहे................... 'अशा तेजीमंदीच्या फेर्यांलचा अचुक तळ वा शिखर शोधण्याचा कधीही प्रयत्न करु नका' हाच तो मौलिक सल्ला. दुरदर्शनवरील एका सुप्रसिध्द मालिकेतील एक सहाय्यक आपल्या वरिष्ठाकडे पाहुन म्हणतो "सर,लगता है,ये जिंदा नही है" त्यावर ते वरिष्ठ अधिकारी चेहरा थोडा गंभीर, विचारमग्न करुन काही वेळाने म्हणतात "ओ हो, इसका मतलब है, ये मर गया है"... वाचकांना वरील तज्ज्ञ सल्ला याच तोडीच्या निरर्थकपणाचा वाटणार याची मला खात्री आहे.
ज्याप्रमाणे आपल्याला फायदा होण्याची शक्यता जवळजवळ शुन्य आहे असे माहित असुनही केवळ भाबड्या आशेपोटी आपल्यातला प्रत्येकजण आयुष्यांत एकदातरी लॉटरीचे तिकिट विकत घेतोच, तसेच बाजारातील घसरणीनंतर त्याचा तळ किंवा निच्चांक शोधुन नेमक्या त्याच बिंदुला खरेदी करण्याच्या मोहापासुन कोणी क्वचितच स्वतःला परावृत्त करु शकले असेल. या अशा अनेक चाचपण्यांतुन अथवा शोध मोहिमांतुन समुद्रमंथनातुन मिळालेल्या रत्नांप्रमाणेच काही आडाखे गुंतवणुकदारांना मिळाले आहेत, अशाच माझ्या पहाण्यांतील काही उपयुक्त संकेतांचा काहीं वेध घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे. चला,नमनालाच घडाभर तेल नको. मुद्द्यांकडे वळतो-
सर्वसामान्यतः बाजारात खरेदी व विक्रेचे प्रमाण हे तोडीस तोड किंवा संतुलीत असणे आवश्यक असते मात्र अनेकवेळा तेजीच्या आवेगाने वा विक्रिच्या तडाख्याने बाजार प्रमाणाबाहेर एका विषिष्ट बाजुस झुकतो. मंदीच्या आवर्तनांत बेसुमार विक्री झाल्याने तो एकाहुन एक खालच्या भावपातळ्या दाखवु लागतो व लवकरच Oversold स्थितीत पोहोचतो. ज्या प्रमाणे वातावरणांत एखादे ठिकाणी 'कमी दाबाचा पट्टा' निर्माण झाला की तेथील हे असंतुलन भरुन काढण्यासाठी आजुबाजुला असलेले ढग साचु लागुन पाउस पडण्याची स्थिती बनते, तसेच बाजाराच्या अशा Oversold स्थितीकडे खरेदीदार आकर्षित होतात व भाव वाढु लागतात... सबब Oversold स्थिती ओळखणे ही तळनिश्चिती शोधण्याची पहिली पायरी आहे.
तांत्रिक विष्लेष्कांचा अशी Oversold (किंवा Overbought) स्थिती ओळ्खण्याचा सर्वाधिक परिचित असा निर्देशांक(Indicator) आहे तो म्हणजे 'RSI' (Relative Strength Index). हा निर्देशांक समभागाच्या मागील (उदा. 14 दिवसांच्या) भावाच्या तुलनेत सध्याच्या वाढीचा/घटीचा वेग गुणोत्तर स्वरुपांत सांगतो. हे गुणोत्तर 70% पेक्षा अधिक असल्यास समभाग Overbought आणि 30% कमी असल्यास तो Oversold आहे असे मानण्यांत येते.
माझा एक अतिशय निष्णात विष्लेषक मित्र निफ्टीची Oversold स्थिती ओळखण्यासाठी त्यातील अंतर्भुत 50 समभागांची स्थिती तपासतो. दिवसअखेर तो या 50 समभागांची 42 दिवसांच्या सरासरीपेक्षा अधिक भाव असणारे(A) व या सरासरीपेक्षा कमी भाव असणारे(B) अशा दोन भागांत विभागणी करतो.(A)मधील कंपन्यांच्या संख्येतुन(B) यादीतील संख्या वजा केल्यास मिळणारे उत्तर जेंव्हा -30 पेक्षा अधीक असते म्हणजेच निफ्टीमधील अंतर्भुत 50 समभागांपैकी किमान 40 समभाग त्यांच्या गेल्या 42 दिवसांच्या सरासरीच्या खाली जातात, ही निफ्टीची Oversold वा खरेदीयोग्य स्थिती समजण्यांत येते.(कोणत्याही समभागाची अशी विषिष्ट दिवसांची दैनंदिन सरासरी, वा RSI गुणोत्तर अनेक आर्थिक विषयांवरील साईटसवर उपलब्ध आहे.) बाब मित्राच्या वैयक्तीक व्यावसायिक कौशल्याशी निगडित असल्याने मी या पद्धतीविषयी खाचखोचांसह, सविस्तर लिहिणार नाही, मात्र ही एक अत्यंत परिणामकारक पद्ध्त आहे, हे मी स्वानुभवावरुन सांगतो.
जपानी लोकांनी अनेक शतकांपुर्वी बाजाराचा भविष्यकालीन वेध घेण्यासाठी शोधलेले 'कॅडलस्टीक्स'(Candlesticks) चे तंत्र आजही या विषयांतील एक सर्वाधिक लोकप्रिय तंत्र आहे. दिवसाभरांतील (१)उघड्ताना, (२)बंद होताना,(३) सर्वोच्च व (४)निच्चांकी या चार भावपातळ्यांच्या आधारे बनलेल्या कांड्यामधील('कॅडल्स) काही विषिष्ट आकृतीबंधांच्या आधारे या तंत्रात बाजाराविषयीचे भविष्यकालीन निष्कर्ष काढले जातात.जसे हस्तरेषा सामुद्रिकानुसार हातावर सुर्य,शंखादी चिन्हे आढळल्यास त्या व्यक्तीच्या नशीबी 'राजयोग' असतो असे म्हणतात ना, काहीसे त्याप्रमाणेच.
या आकृतीबंधांना 'क्रोज,सोल्जर्स,हॅमर,स्टार...'अशी लक्षवेधक नावेही आहेत मात्र खोलांत न जाता आता आपल्या पाणबुड्याच्या भुमिकेत (तळ शोधण्याच्या) उपयुक्त अशा 'डोजी' या प्रकाराचाच आढावा आपण घेणार आहोत.
या जपानी 'Candlesticks' तंत्राप्रमाणे जेंव्हा आलेखावर (charts) (1) प्रथम एका दिवशी मोठी घसरण होवुन बाजार दिवसातल्या निच्चांकाजवळ बंद होतो(Black Candle) (2)पुढच्याच दिवशी बाजार दिवसभरांत खालच्या वा वरच्या दिशेने मोठ्या हालचाली करतो मात्र बंद होताना सकाळी उघडलेल्या भावपातळीच्या जवळपासच बंद होतो(Doji Candle) (3) आणि पुढच्याच म्हणजे तिस-या दिवशी बाजार आधल्या दिवशीच्या सर्वाधिक भावापेक्षाही वर (Gap up) उघडतो, व दिवसभर तेजीत राहुन आणखी वर बंद होतो(White Candle)...या स्थितीस 'Morning Star Doji' असे म्हणतात.
(1)मंदीच्या भावनेने बाजारात वेग घेतल्यानंतर बाजार वेगाने खाली येवु लागतो, तेजीवाल्यांचा प्रतिकार पुर्ण मोडुन तो दिवसाअखेर मोठी घट दाखवत बंद होतो... (2)मात्र या मंदीचाही जेंव्हा अतिरेक झाल्याचे जाणवते आणि आता यापेक्षा बाजार खाली जाणे अवघड आहे अशी भावना बळावते तेंव्हा आधी मंदीच्या कळपांत असलेले भिडु आपली बाजु बदलायला सुरवात करतात आणि दुसर्या दिवशी तेजी/मंदवाल्यांच्यात निकराची रस्सीखेच होवुन दिवसाच्या सुरवातीचा व बंद होतानाची भावपातळी सारखीच रहाते... याचाच अर्थ आता विक्रीचा जोर मंदावला असा घेतला जातो. (3) बाजारात 'पळा पळा, कोण पुढे पळे तो..' ही नेहमीचीच गोष्ट आहे. मंदीवाले कमकुवत होत आहेत हे पाहुन अनेक जण आपली बाजु बदलतात आणि तिसर्या दिवशी बाजार पुर्णपणे तेजीवाल्यांच्या कह्ह्यात जातो. असे या आकृतीबंधाचे ढोबळ्मानाने आकलन आहे. अभ्यासुंनी अधिक माहितीकरिता Candlestick Charting Explained हे श्रीमान ग्रेग मॉरिस (Greg Morris) यांचे पुस्तक तपासावे.
व्यावहारिक दृष्ट्या बोलावयाचे तर गेल्या चार पाच महिन्यात दोन वेळा निफ्टी आजच्याच,म्हणजे 8000च्या जवळ आला असता दोन्हीही वेळा हीच 'Morning Star Doji' ची स्थिती आलेखावर पहायला मिळाली व तेथुन निर्देशांकाने परत तेजीचा मार्ग अवलंबला आहे.
श्री, मार्क फिशर यांनी लिहीलेल्या 'दी लॉजिकल ट्रेडर' या पुस्तकांत तळनिश्चिती झाल्याचे लक्षण म्हणुन 'सुशि रोल' (Sushi Roll) नावाने एक आकृतीबंध दिला आहे. सलग 02 आठवड्यांची (05 दिवसांच्या) तुलना करुन दुसर्याळ आठवड्यांत बाजाराने सुरवातीस पहिल्या आठवड्यांतील निच्चांकापेक्षा खाली जावुन नंतर आधीच्या आठवड्यातील सर्वोच्च पातळीच्यावर साप्ताहिक बंद नोंदविला तर लेखकाच्या मते ते तळनिश्चिती (Bottom Formation) चे लक्षण आहे.
'How to Make Money in Stocks' या पुस्तकांचे लेखक विल्यम ओनिल(William O'neil) यांनी समभागाच्या गेल्या 10 दिवसांतील हालचालींवरुन ही प्रक्रिया उलगडुन दाखवली आहे.त्यांच्यामते संभाव्य तळ पातळी गाठल्यानंतर पुढील सलग तीन दिवस बजाराने त्या तळपातळीच्या वर तसेच आधल्या दिवशीच्या बंद पातळीपेक्षाही वर भाव दाखवला आणि पुढील सलग 10 सत्रांत सरासरीपेक्षा अधिक व्यवहार होवुनही पहिल्या दिवशीची तळ पातळी सुरक्षित राहिली...तर अशी भावपातळी खरेदी करण्यास सुरक्षित मानावी.
याशिवाय VIX म्हणजे (Market Volatility Index) हा ही तळनिश्चिती शोधमोहिमेतील एक उपयुक्त घटक आहे. हा निर्देशांक गुंतवणुकदारांचे व्यवहारावंवरुन त्यांचे मनांतील चलबिचल किती आहे ते ठरवतो असे ढोबळ्मानाने म्हणता येते. गुंतवणुक दारांचे मनांतील आशा निराशांचे प्रतिबिंब या निर्देशांकांत दिसतत असल्याने VIX ची अतिश्य वाढलेली पातळी म्हणजे निराशेचा परमावधी असे समजुन सर टेंपल्टन याच्या Principle Of Maximum Pessimism' च्या तत्वानुसार ही खरेदीसाठीची योग्य वेळ असु शकते. जिज्ञासुं करिता आपल्या निफ्टीबाबतच्या VIX ची माहिती येथे मिळु शकेल. http://www.nseindia.com/companytracker/charting/images/IndiaVIX/VIX.png
येथे जाताजाता बाजारस्थितीविषयक आणखी एक मजेदार संकल्पनेबद्दल मला लिहायला हवे, बाजार जर प्रमाणाबाहेर सलग खाली आला तर तेथुन तो थोडासा वर जातोच. यालाच तात्रिक परिभाषेत 'The Dead Cat Bounce' म्हणतात. अगदी मेलेले मांजरही उंचावरुन जोरात खाली आपटल्यास थोडेतरी उसळतेच (पण म्हणुन काहे ते जिवंत आहे असे समजायचे नसते) असा याचा अर्थ. तेंव्हा बाजाराने दाखविलेली सुधारणा ही खरोखर कल बदल (Trend Reversal) आहे की फक्त एक अल्पकालीन DCB.. हे ठरवावे लागते अर्थात हे ठरवणे हे सध्या चालु एका लोकप्रिय मराठी सिरियलमधील नायिकेच बाळंतपण आधी होईल की तिच्या वडिलांची वर्षानुवर्षे रखडलेली पायाची शस्त्रक्रिया?? हे सांगण्याइतकेच अवघड आहे.
या उपर, सर्वाधिक महत्वाचे म्हणजे वर उल्लेखलेलली सुत्रे ही फक्त'संकेत' देतात. 'काळ्या दगडावरची रेघ',वा 'हमखास यशाची गुरुकिल्ली' वगैरे स्वरुपातील हे तोडगे नव्हेत. बाजार खरेदीयोग्य झाला आहे का या प्रश्नाच्या उत्तराकरिता या आडाख्यांचा वापर करणे 'अंदाज पंचे दाहोदरसे' निर्णय घेण्यापेक्षा निश्चितपणे चांगले असले आणि यांचा योग्य पद्ध्तीने ऊपयोग हा यशाची शक्यता नकी वाढविणारा असला तरी केवळ एखाद्याच निष्कर्षावर विसंबुन, तारतम्य भाव न बाळगता निर्णय घेणे म्हणजे वेधशाळेच्या ईशार्याबरहुकुम पाउस वागतो असे मानण्यासारखे आहे. कोणावर किती विश्वास ठेवावा हे आपले आपणच ठरवायचे आहे, नाही का??
प्रतिक्रिया
(१)आलेखांच्या एक/दोन आकृत्या
चांगली माहीती.
सुशी रोल उदा.
यातील कोणतेही आडाखे वापरून
मस्त प्रतिक्रिया डॉक
उपयुक्त माहिती.
तळ किंवा शिखर
share market बद्दल अतिशय
मस्त उदाहरणं
धन्यवाद..