Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] निकाल (उत्तरार्ध)

लेखक मधुरा देशपांडे यांनी सोमवार, 24/08/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
निकाल - १
दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु.
------------------------------------------------------------------------------------------------------------------ शेवटची सही करताना बघता बघता मन भूतकाळात गेले. सासरच्या त्रासाला कंटाळून परत आल्यावर मामांनी केलेले भांडण, समाजातली खोटीनाटी बदनामी, एकटी बघून लोकांनी घेतलेला गैरफायदा, कधीतरी सोबतच्या श्रीमंत मैत्रिणींचा वाटलेला हेवा, पण नशीबाने लाभलेले कायम पाठबळ देणारे मार्गदर्शक, कापड दुकानात काम करत संस्थेच्या वसतीगृहात राहून कष्टाने पूर्ण केलेले शिक्षण, काळा कोर्ट चढवून कोर्टात आले तो दिवस… आणि आज समोर होती सुनीता, डोळ्यात तीच चमक, अंगावर माराच्या त्याच खुणा. हुंड्यासाठी हिला जाळायला निघाले होते. पण पठ्ठीने पुराव्यानिशी खेचून आणले कोर्टात. इतक्या वर्षात काय बदलले असा प्रश्न पडतो कधीतरी, पण हेच बदलण्यात माझा खारीचा वाटा. आज न्यायाधीश म्हणून निकाल दिलेली ही पहिली केस. ------------------------------------------------------------------------------------------------------------------ स्पर्धा आयोजक आणि पहिल्या कथेला प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!!

वाचने 14364
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

+१ मस्त.. एक सुधारणा..
काळा कोर्ट चढवून कोर्टात आले तो दिवस…
काळा 'कोट' हवं..

In reply to by मधुरा देशपांडे

मला वाटतं की कोर्ट चं कोट बदलायला हरकत नसावी. तू काही कथा बदलत नाही आहेस..

खूप छान पॉझिटीव संदेश देणारी कथा. आवडली.

अर्थातच आवडली... कारण तेच! खूप सकारात्मकता आहे या कथेत. कथेच्या उत्तरार्धात आणखी काहितरी विलक्षण कलाटणी देण्यापेक्षा पूर्वार्धाला प्रवाहीपणे पुढे नेणारा म्हणून हा भाग आणखी आवडला.

+१ मी सगळ्या कथा वाचल्या नव्हत्या त्यामुळे कुणालाच मागच्या वेळी दिलं नाही मत. पण या कथेने द्यायला भाग पाडलं. आता सगळ्या कथा कंपल्सरी वाचते.

खूप छान! हा भागदेखील खूप आवडला. +१ सकारात्मक आणि वास्तवाच्या अगदी जवळ जाणारी कथा. अशी बरीच उदाहरणे आस-पास बघायला मिळतात. आवडेश.

+१ पहिला भाग तर आवडला होताच पण दुसरा भाग वाचताना अंगावर रोमांच उभे रहिले. निकाल हे शिर्षक तर दोन्ही भागांना पर्फेक्ट बसतय.