मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] येक रुपाया!

चांदणे संदीप · · स्पर्धा
नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी! बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२." शाळा सुटल्यावर तीन ढांगात घरी! तायला म्हन्लो, "ताये मला येक रुपाया दी, शाळत चित्रकला पर्धा हाय." धुनं वाळू घालीत म्हन्ली, "त्यान्ला न्हाय काम आन तुला नाय धंदा!" धा रोज तायच्या म्हाग लाग्लो. रडलोबी. एक दिवस शाळला जाताना तायनी रुपाया दिला. पुना तीनच ढांगा! हाजरी झाल्याझाल्या बाईन्ला म्हन्लो, "बाई, फी!" बाई म्हन्ल्या, "संदीप, मुलांची यादी कालच जिल्हा परिषदेला दिली." म्हाग फिरल्यावर बस्करपट्टीबी दिसाना!

वाचने 15713 वाचनखूण प्रतिक्रिया 65

In reply to by उगा काहितरीच

चांदणे संदीप Fri, 08/07/2015 - 23:08
ब-याच सरकारी शाळा विशेषत: ग्रामीण भागातल्या शाळांमधून बसण्यासाठी सतरंजी टाईप अंथरूण असायचे त्याला बस्कर म्हणायचे आणि लांबच्या लांब पट्ट्यांसारख्या असायच्या म्हणून 'बस्करपट्टी!' प्रतिसादासाठी धन्यवाद. अवांतर : तुमचे प्रतिसाद ब-याचदा तुमच्या आयडीचे सार्थक करतात (कृ. ह. घ्या)

In reply to by चांदणे संदीप

उगा काहितरीच Sat, 08/08/2015 - 19:13
अवांतर : तुमचे प्रतिसाद ब-याचदा तुमच्या आयडीचे सार्थक करतात (कृ. ह. घ्या)
भाऊ , त्यासाठीच तर असा आयडी घेतला आहे की . रच्याकने तुमच्या कथेसाठी +१ .

सचिन तेली Sat, 08/08/2015 - 01:30
+१ बस्करपट्टी माहीत नव्हते. कळाले आता.

नाखु Sat, 08/08/2015 - 12:38
सा सं चे विशेष आभार वाचक लिहिते झाले. साचलेपण की साच लेपण या वादात न पडणारा मुकाट वाचक नाखु.

यमन Mon, 08/10/2015 - 10:46
मस्त ...काय लिहू ? आरसा दिसला एवढेच म्हणीन .

बबन ताम्बे Mon, 08/10/2015 - 10:51
म्हाग फिरल्यावर बस्करपट्टीबी दिसाना! अरेरे ! छान कथा !