याआधी : भ्रमणगाथा- ७
आपल्याकडे कसे अहमदनगर,नागपूर,वडगांव.. असे नगर,पूर,गाव प्रत्यय लावून गावांची नावं बनतात ना तसे बुर्ग प्रत्यय लावून जर्मन गावांची नावं तयार होतात. हामबुर्ग,वुर्झबुर्ग,साल्झबुर्ग इ. साल्झबुर्ग! साल्झ- मीठ आणि बुर्ग- शहर म्हणजे लवणपूरच म्हणा ना.. येथील ड्युर्नबेर्ग ह्या डोंगराच्या पोटात मीठाच्या खाणी आहेत त्या पहायला अर्थातच आम्ही सारे उत्सुक होतो. वेळाचं गणित कसं जमवायचं हाच मोठ्ठा प्रश्न होता. लिखाळमंडळींची गाडी फ्राफुहून संध्याकाळी ६.३० वाजता सुटणार होती तर इरफानची ७.१५ वाजता,म्हणून मग सक्काळी लवकर निघून लाइष्टनष्टाइनइन्क्लाम हा आल्प्समधला सर्वात लांब,खोल आणि सुंदर धबधबा पहायचा आणि मग खाणी पाहून एकच्या सुमाराला परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची असं ठरलं. त्याप्रमाणे सक्काळी लवकर उठून, आवरुन योहानाचा आणि त्या सुंदर परिसराचा निरोप घेताना परत इथे यायचेच असे प्रत्येकाच्याच मनात आले.
आम्ही धबधब्याच्या एंट्री पॉइंटपाशी पोहोचलो तेव्हा तिकिटखिडकी उघडायला थोडा वेळ होता. बाजूलाच असलेल्या छोट्याशा पार्कातले झोपाळे, डुलणारे घोडे पाहून सगळे जण मूलाहून मूल होऊन तिथे धावले. तिथे एवढावेळ फक्त पक्षीरवच काय तो होता आणि अचानक आमच्या कलकलाटाची भर पडली.
बहुदा आमच्या आवाजानेच खिडकीवरच्या माणसाने लवकर दार उघडून आम्हाला तिकिटे देऊन आत पिटाळले आणि आमच्या गोंगाटातून सुटला एकदाचा..
एका बाजूला उंचच उंच आल्प्स आणि दुसर्या बाजूला खोल दरी.. हिरवी पिवळी केशरी झाडं डोंगरमाथ्यावरही होती आणि खाली दरीतही..कच्च्या रस्त्यावरुन आम्ही चढायला सुरुवात केली.थोडे वर गेल्यावर एक लाकडी साकव लागला. कुठेही कृत्रिम बांधकाम वाटणार नाही, त्या निसर्गाचा तोल बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन रस्टिक फिल देऊन तेथील दोन्ही तिन्ही पूल बांधले आहेत,तीच गोष्ट दोन्ही बोगद्यांची आणि दगडी आणि लाकडी पायर्यांची..थोडे अजून वर चढल्यावर पाण्याचा खळाळता आवाज ऐकू येऊ लागला.
ग्रोसारल नदीत उडी घेणारा,शेकडो वर्षांच्या स्थित्यंतरांनी तयार झालेला हा जलप्रपात पहायला आतुर झालेल्या पावलांचा वेग आपसूकच वाढला.लाइष्टनष्टाइनचा उमराव जॉन (दुसरा) ह्याच्या आर्थिक मदतीने पैशाअभावी बंद पडलेले येथील डोंगरातील बांधकाम इस. १८७६मध्ये पूर्ण झाले आणि कृतज्ञता म्हणून 'लाइष्टष्टाइनक्लाम' हे नाव दिले गेले.अनुपम सॄष्टिसौंदर्य लाभलेला हा प्रपात म्हणजे लवणपूराची शान आहे!
तो नजारा डोळ्यात साठवून घेत आम्ही वर चढत होतो. शेवाळंभरले दगड,पाण्याच्या आघाताने गुळगुळीत झालेले खडक त्या प्रवाहात दिसत होते.काही ठिकाणी इतके उंच आणि निमुळते डोंगरसुळके की आकाशाचा चतकोर निळा तुकडाच चुकारपणे दिसावा आणि त्या निळाईशी स्पर्धा करणारे खाली खोल वाहणारे खळाळते पाणी..
दुपारच्या वेळी सूर्यदेवांची कृपा असेल तर तेथे मनोहारी इंद्रधनुची रांगोळीही उमटते.सृष्टीचे ते सारे नवल पाहत आम्ही बोगदा ओलांडून पुढे गेलो आणि एका वळणावर त्याचे ओझरते दर्शन झाले.कितीतरी वेळ तिथेच त्या निसरड्या पायर्यांवर उभे राहून भारल्या अवस्थेत पाहतच राहिलो.
काही वेळाने त्या गारुडातून जागे होऊन पुढे चढू लागलो.खळाळत्या पाण्याखेरीज आता कसलाच आवाज नव्हता. दुसरा बोगदाही ओलांडून आम्ही पुढच्या वळणावर पोहोचलो आणि 'तो' सामोरा आला.कितीवेळ त्याच्याकडे पाहत राहिलो, मग भानावर येऊन त्याला सामोरा,पाठीशी ठेवून भरपूर फोटो काढून घेतले.
नायाग्रा किवा इग्वासुसारखा हा अतिभव्य धबधबा नाही. त्याच्या तुषारात भिजायला नेणारी धुक्याची पोर नाही. आल्प्स खोदून निमुळत्या डोंगरसुळक्यांतून निसटून खाली ग्रोसारल नदीकडे झेपावणारा हा धबधबा उंचीला उत्तुंग आणि खोलीला अथांग आहे. कधी रंगीत तरी कधी हिरव्या झाडांचा पोषाख ल्यालेला आल्प्स दुधाच्या धारा घेऊन येतो आणि आपल्याला आमोरासामोरा भेटतो,एखाद्या मित्रासारखा! हिवाळ्यात आल्प्सने बर्फाची दुलई गुरफटून घेतली की इथला मार्गही बंद. धबधबा तर गोठतोच पण ह्या चढणवाटेने त्याला भेटायला येणं अशक्य होऊन जातं. वसंतात पुन्हा पाणी खळाळू लागतं आणि ते थेट शिशिराची चाहूल लागेपर्यंत.. तेथून हलूच नये असं वाटत होतं पण लवणखाणींकडेही जायचे होते. नाईलाजाने त्याला ऑफ विडर सेझेन (पुन्हा भेटूया) म्हणून आम्ही ड्यूर्नबर्गकडे निघालो.









वाचने
16752
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला
एकूणच फोटो मस्त..
मस्त
मजा सुरू
मस्तच गं!
खरोखर मस्त निसर्ग आहे हो तिकडे
सुंदर
जबरी...
वाचनीय..
+१
In reply to वाचनीय.. by शाल्मली
सुंदर
मस्त फोटू
+१
In reply to मस्त फोटू by झकासराव
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to +१ by नंदन
आपल्याकडे
मस्त!
लवणपूरचा धबधबा आवडला!
आवडला.
मस्तच.
आयला...
अति उत्तम
मस्तच गं
झकास
मस्त वर्णन
मस्त
धन्यवाद.
वा