सकाळधरन पापणी फडफडत हुती.
कितीवेळा गळ्यातली साखळी पापणीला लावून म्हणलं, "जे काय हुनार आसल ग्वाड हूदे."
कावळाबी नेमका कोकलत हुता. बूटीतन भाकरीचा टुकड़ा आणून त्याला टाकला, कुणाला ठाव तो येणार म्हुन तर नसलं आला सांगायला.
दोन महिने झाले जाऊन त्याला. मागच्या टायमाला आंद्याच्या लग्नात आला हुता. औंधाच्या मुलीच वर्हाड आलंवत. लगीनभर नुसता माग पुढं करीत होता. वरातीत मागच्या माग पाण्याच्या टाकी आड नेलं हुत. हातात हात घेऊन म्हणला हुता, "आता लांब शहरात जाणार हाय. कामधंदा करून चार पैक जोडून हात तुझा मागणार हाय. राजाची राणी म्हुन नेणारे. येशील ना? " म्या लाजून तिथंच कितीवेळा मेली हुती.
दुपारनंतर सायकलवरून धापा टाकीत किश्या आला. टपली मारत ओरडला, "तायडे चल्लसाठ खेळतीस? आवर पावन आल्याती. अण्णा आणायलेत स्टॅण्डवरन."
पाट बाजूला ठेवून म्या बोलली, " कनच र? "
" औंधाच" म्हुन खिशात शेंगा भरत किश्या पळाला अन मी राजाची राणी आवराय लागले.
पावन आलं. बैठकीत बसलं. माणसं इकडच तिकडच बोलाय लागली. मुलीला आणा आता म्हणाली. म्या वाटच बगत हुती. बैठकीत जाऊन खाली मान घालून बसले. "इचार पोरा काय तुला इचारायच आसल ते." गोंदामामा बोलला. "नाव काय तुमचं?" हे कोण बोललं म्हुन म्या झरदिशी वर पायल. सगळ्या बैठकीत घाबरीघुबरी हून पायल. खाली मान घालून पदराची गाठ मारू लागली. तो आलाच न्हाय? असं कसं? सोत्ता यीन बोलला हुता. घरच्या कुणालाच पाठवलं का आधी? काय बी कळना. डोळे भरून याय लागले. आवाजच यीना भाईर. औंधासन पावन आलं पर दुसराच कुणी आला का काय ? घसा खाकरुन गोंदामामा बोलला, "लाजतीये पोरगी. आशा. आशा नाव हाय तिचं. पोरी तू बी इचार काइ मनात आसल ते."
मान हलवून म्या नुसती नाय म्हणाली.
"बरं मग जाऊ द्या आत पोरीला. काय सुनीलराव?"
सुनीलराव काय म्हणतो बगायला मी थांबली नाय. किशाला खुणेन आत बोलावल आन म्या बैठकीतून उठून आले. परसात किशा येऊन म्हणतो कसा," आवडला काय तायडे? मास्तर हे. खेळबीळ विसरा आता. आता फक्स्त अभ्यास." किशा खिंकाळला तसा म्या पाठीत त्याच्या रट्टा घातला," गाढवा नीट सांगता येत नव्हतं कोण पावना आलाय." " ए नीटच सांगितल की." पाठ चोळत किशा बोलला. म्या तिथंच डोळे पुशीत बसले. "तायडे कोण येणार हुत?" किशान जवळ बसत इचारल
अण्णा आत येऊन आईला कायतरी बोलत हुत. तीरासारखी म्या त्यांच्याकड धावली.
"पावन म्हणतात पोर पसंत हाय. यादीव शादी करून टाकू म्हणतात. कसं करायच ? "
" अण्णा नको अण्णा.. यादीव शादी नकु. " म्या कळवळली.
"गप जरा" आई रागावली. "पर त्याच घरदार, माणसं आपुन काय सुदीक पायल नाय. अशी कशी लेक पाठवायची."
"गोंदामामा तसं आशीला वाईट स्थळ आणणार नाय. तेच्या अंगाखांद्यावर खेळत मोठी झाली पोर. तुमच समाधान करायला आत बोलवतू मामासनी."
"अजून चर्चाच करतूस व्हय र अण्णा" म्हणत गोंदा मामा आत आला.
मामाच्या गळ्यात पडून म्या म्हणलं," मामा दुसरा बगुया की. मला नगं हा यादीव शादी."
मामा हसून म्हणलं, "कवा कळायच आशाबाय. अण्णाच्या डोक्याव हाय कर्जाचा डोंगुर. तू एकटी हाय का? तुज्या माग दोगी हायत अजून तेला. किशाची शाळा हाय. पोरी नशीब तुझ चांगल म्हुन असं स्थळ आलंय घरी चालून. पोरगा गुणी हाय. नोकरीत हाय. बस्तान अजून बसलं नाय पर पोरी आमची जिंदगी गेली तरी बी ते नाय बसलेलं"
"ते बी हाय खरं, पर म्या म्हणते घाई कशापाय एवढी. पोराच भाईर काय नाय नव्हं"
आई म्हणाली.
"शांते जशी म्या आशिला मोठी हुताना पायली तसा त्यो बी घातलाय डोळ्याखालन. मामीच्या नात्यांत हाय. खोट कशाला बोलू बाई, तेन्ची बी तुमच्यावाणी गत हाय. शेतात पिकत नाय लय पर पोरगं नोकरीत हाय म्हुन घरी जरा शिस्त हाय. पोरीला संभाळून घेतील माणसं. तेची आय असते आजारी. म्हुन घाई कराय लागली माउली. डोळे मिटाय आधी घरी लक्ष्मी येऊ दे म्हुन मागं लागली हाय. आणि पोरगं लय गुणी हाय. खाली मान घालून जातंय शिकवायला आन शाळेतन खाली मान घालून रानात जातंय बग. घराचा गाड़ा एकला वडतोय. तरीबी तुमच्या मनात शंका असलं तर राहू दे बाय. मर्जी तुमची."
आता मामानी एवढ कौतुक केल्याव आई ऐकते होय. माझा हात दाबत म्हणाली, "आवरतो आमी. सांगा तसं पावन्याशनी."
घाई घाईत मामा बाहेर गेला. सुपारी फुटली. कासार आला. स्वामी आला. किशान अन पोरानी मंडप घातला. माळा लावल्या. बघता बघता अंतरपाट ऊभा झाला अन् आमी एकमेका गळ्यात हार घातले. टाळ्या वाजल्या. माणसं गळाभेट घेऊन "बेस झाल" म्हणू लागली. शिरा आमटीच्या जेवणाची पंगत बसली. माझ्या घशाखाली घास उतरना.
"आलेच" म्हुन म्या परसात गेले. चुडा भरल्या हाताला बगत हुती तवर मामा आला माग, "आज तुज्यावरन मीठ मिरच्या उतरून टाकाय लावतो मामीला."
"मामा पापणी फडफडली की चांगल हुत सांगतोस ना? हे काय चांगल नाय झालं मामा."
"नको दोष देऊ पोरी. पाण्याच्या टाकीआडचा दरदिवशी नव्या लग्नात नव्या पोरीला राणी करीन म्हनीत फिरतू. कुणाच्या पोरीच असं तर कुणाचं तसं. पोरी तुझ लय चांगल झालय. वाकड पाऊल पडायच्या आधी वाट तुझी बदलली हाय. तुज्या मामाचा जाता जाता राग नकु करु पोरी."
मला मेल्याहून मेल्यासारख झालं.
"तायडे चल की भावजी थांबल्यात जेवाच." किशा सांगत आला तशी म्या उठले. मागं वळून पायल तर मामा डोळे पुशीत हुता. डोळ्यात आसू अन ओठांत हासू आणून जा पोरी म्हणत हुता.
घास भरवा घास भरवा म्हुन पोरानी गलका केला. पापणीआड साचल पाणी. पर त्या दिवशी शिरा लयच ग्वाड लागला.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5073
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! फारच आवडली कथा.
लई भारी !
मस्तच हो. झालं ते चांगलं झालं
वा! काय छान लिहता तुम्ही..
कथा आवडली. बिचार्या मुलीची
वा ! साधी, सरळ, सुखांत असलेली
किती गोड कथा. :) आवडली.
कथा आवडली.
वाह! काय मस्तं लिहिली आहे कथा
हं. मामा चोक्कस!!
सुखांत
वा!मस्त कथा!
आवडली. मस्त कथा.
मस्त लिहीलीय
सुंदर सरळ साधी गोष्ट खूपच
सर्वांचे आभार ! : )
आवडली कथा. मस्त लिहिलंय.
छान
मस्तच कथा .
छान लेखन
:)
धन्यवाद! : )
छान लेखन
+१
In reply to छान लेखन by अविनाश पांढरकर
खोटं सांगत नाय