Skip to main content

माहिती हवी आहे - नांदेड सिटी

लेखक समीरसूर
गुरुवार, 09/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नांदेड सिटीमध्ये 3 बी एच के सदनिका राहण्यासाठी घेण्याचा विचार चालू आहे. मी रोज हिंजवडीला नोकरीनिमित्त येत असतो. साधारण 88.58 लाखांपर्यंत किंमत आहे. सदनिका तयार असून 1110 चटई क्षेत्र आहे आणि 135 बाल्कनीचे चटई क्षेत्र आहे. नांदेड सिटी विषयी प्राथमिक माहिती आहे. शहरापासूनचे अंतर, मुख्य गेटपासून सदनिकांपर्यंतचे अंतर, सिहगड रस्त्याची वाहतूक, सदनिका भाड्याने देण्यात येणार्या अडचणी, कमी असलेली पुनर्विक्री किंमत, व्यावसायिक आस्थापनांची वानवा, एकंदरीत तिथे अपेक्षेपेक्षा कमी असलेली प्रगती, ई. माहिती मिळवली आहे. तरीदेखील तेथील सदनिका आणि एकंदरित सुविधा आवडल्याने तेथे सदनिका घेण्याचे ठरत आहे. मोठा निर्णय आहे आणि पैशांची सोय करतांना दमछाक होणार आहे. बर्याच जणांकडून उलट-सुलट माहिती मिळतेय म्हणून खूप गोंधळ उडालेला आहे. मिपावर कुणाला माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी जेणेकरून निर्णय घेणे सोपे होईल. सध्या बर्याच गुंत्यांमध्ये असल्याने मिपावर मनासारखे येणे जमत नाहीये. थोडा मोकळा झाल्यावर पुन्हा येईनच. तेथे सदनिका घेऊन राहणे सगळ्या दृष्टीने योग्य ठरेल की हा व्यवहार नुकसानीचा आणि मन:स्तापाचा असेल याबाबत मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम होईल. अनेक धन्यवाद, समीर

वाचने 11989
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

सध्या कुठे राहताय? किती वर्षापासुन? घर स्वतःचे आहे की भाड्याचे? बायको-मुले आहेत का? मुले (असल्यास) शाळेत जाणारी आहेत का? पत्नी (असल्यास) नोकरी करणारी आहे का? कामाचे अंतर किती आहे? आई वडील बरोबर राह्तात का? असल्यास किती वर्षापासुन? तुम्ही स्वतः हिंजवडीमधे नोकरी करता. भविष्यात नोकरी बदलायचा विचार आहे का? (अंतराच्या दुष्टीने) इतके सगळे प्रश्न विचारायचे कारण म्हणजे आताच्या घरामुळे तुमचा कंफर्ट झोन किती आहे आणि नविन घरामुळे तो कमी / अधिक होणार का? झाल्यास किती याचा विचार करुन निर्णय घ्यावा इतकेच सांगायचे आहे. फक्त घर, सोसायटीमधील चकाचक सोयीसुविधा बघुन निर्णय घेऊ नका. तुम्हाला शुभेच्छा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्यवाद, सौंदाळा. आपले मत अगदी मान्य! सध्या 10 वर्षांपासून भुसारी कॉलनी (चांदणॆ चौकाजवळ) मध्ये राहतोय. सध्याची सदनिका स्वत:ची आहे. आई-वडील माझ्याबरोबर नसतात. मुलं नाहीत. बायको एका जवळच्या शाळेत शिक्षिका आहे. तिच्या नोकरीचा तसा फारसा प्रश्न नाही. मी हिंजवडी सोडण्याची शक्यता आता लगेच तरी नाहीच. सध्याची सदनिका लहान आहे आणि खाली अजिबात मोकळी जागा नाही. ईमारत जुनी असल्याने उद्वाहनाच्या आणि पाणीपुरवठ्याच्या कधी-कधी समस्या असतात. क्षमस्व ही माहिती द्यायला विसरलो.

In reply to by समीरसूर

निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे. पण तुमच्या वरील प्रतिसादावरुन माझे वैयक्तिक मतः नांदेड सिटीपेक्षा गुरु-गणेश नगर, शिवतीर्थनगर, महात्मा सोसायटीजवळचा भाग, रस्त्याच्या पल्याडचा वारज्याचा भाग इकडे घर घेतलेत तर चांगले. नांदेड सिटीच्या सदनिकेच्या किमतीत या भागात उत्तम २ बी.एच्.के मिळतील (काही ठिकाणी २.५/३ पण मिळतील). पुढेमागे वाटले तर घर विकले किंवा भाड्याने ताबड्तोब जाईल. दहा वर्षे कोथरुड मधे काढलेल्या माणसाला नांदेड सिटी खुपच लांब / एका बाजुला वाटु शकते. पण नांदेड सिटीसुध्दा छान आहे. दैनंदिन कामकाजासाठी (ऑफिस सोडुन) कधी गेटच्या बाहेर जायची वेळ येणार नाही. तिकडच्या किमतीसुद्धा वाढत आहेत असे दिसते. एक वर्षापुर्वी माझ्या भावाने ७५ लाखाला ३ बी.एच्.के बुक केला होता. ताबा या डिसेंबरमधे आहे.

नांदेड सिटी तुम्हाला हिन्जेवाडीपासून खूप लांब पडेल असे वाटत नाही का ? मी तिथे गेलो असताना मेन गेट पासूनच आतल्या वस्तीचे अंतर दीड ते दोन किलोमिटर मोजले होते. दैनंदिन जीवनात हे सोयीचे ठरत नाही असे माझे मत. तिथल्या मार्केटिंग कार्यालाच्या जागी भविष्यात सेझ अंतर्गत आय टी पार्क होणार आहे असं मला सांगितलं होतं. सेझ ची परवानगी इतक्या सहजासहजी मिळते का याची चौकशी करून घ्या. ८०-८५ लाखापर्यन्त्त बजेट असेल तर रावेत एरिया बघून घ्यावा. शिवाय इतल्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये नन्तर मेंटेनन्स चार्ज देता देत नाकी नऊ येऊ शकतात.

गेल्या वर्षी नवीन गाडी घेतली तेव्हा उगीच भटकताना एकदा या संकुलात '' बघू तरी म्हणून ''आत गेलो. वळून वळून साधारण चारेक कि मी गेल्यावर आठदहा इमारती झालेल्या दिसल्या. सध्या मुख्य रस्त्याजवळ असूनही तिकडून एक्सेस नाहीय. पुढे येईल म्हणतात. वाटेत दोन शाळा सामोरासमोर दिसल्या. त्या फारश्या चांगल्या नाहीत असे वाटले. अफाट मोठी योजना आहे. एकूण हा प्रकल्प मगरपट्टाच्या धर्तीवर दिसतो आहे . किमान १०-१५ वर्षे पूर्ण होणार नाही. म्हणजे तुमची इमारत होईल पण पूर्ण सोसायटी नाही. त्यामुळे बिल्डर सहकारी संस्था करून देणे टाळू शकतात. मग तुम्हालाच चार सहा (किंवा चाळीस ) सोसायट्यांची एक सोसायटी करावी लागेल. पण हे साधारण २०२५ साली! तोपर्यंत काय बदल होतील देव जाणे ! दीर्घकालीन प्लानिंग कसं आहे माहीत नाही. मग फायदा काही आहे का नाही? तर आहे. वीस वर्षांनी हा भाग अगदी पुण्यात असेल - काहीशी मूल्यवृद्धी होईल. (माझा अंदाज वार्षिक ४-५%) आणि खडकवासल्याजवळचे पहिले संकुल असल्याने आणि आयोजक मजबूत असल्याने एक वेळ प्रभात रोडला आठवड्यातून दोनदा पाणी येईल पण इथे पाणी कधी कमी पडेल असं वाटत नाही. (एक शंका : बायपासजवळ हाच मुद्दा असेल तर बावधनचा विचार का केला नाहीत? तिकडे शाळा जास्त आहेत) या प्रस्तावाला सध्या माझ्याकडून २.५/५

In reply to by खेडूत

पूर्णपणे अवांतर - >>> एकूण हा प्रकल्प मगरपट्टाच्या धर्तीवर दिसतो आहे . हा प्रकल्प चाचा-भतीजांचा आहे असे बोलले जाते. >>> खडकवासल्याजवळचे पहिले संकुल असल्याने आणि आयोजक मजबूत असल्याने एक वेळ प्रभात रोडला आठवड्यातून दोनदा पाणी येईल पण इथे पाणी कधी कमी पडेल असं वाटत नाही. या प्रकल्पासाठी थेट खडकवासला धरणातून एक वेगळी पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा केला जातो असे बोलले जाते. भतीजा पाणीविभागाचाच मंत्री असल्याने अशा तर्‍हेने पाणी पुरविले जाते असे बोलले जाते. गेल्या ५-६ वर्षांपासून पुणे शहरासाठी संध्याकाळी पाणीपुरवठा केला जात नाही. पाणी टंचाई हे कारण दिले जाते. लव्हासा व नांदेड प्रकल्पामुळे पाणीटंचाई आहे असे बोलले जाते. निदान संपूर्ण बांधकाम संपेपर्यंत तरी पाणी कमी पडणार नाही हे निश्चित. बांधकाम संपल्यावर काय होईल ते चाचा-भतीजा जाणे.

परवाच नांदेड सिटीत "आसावरी" मद्धे काही कामानिमित्त जाउन आले... आणि पहिल्याच भेटीच माझं असं मत बनलं होतं की रीटायर लोकांना आरामात रहायला चांगले आहे :-) मेन गेट पासुन गाडीने आत जायला पण बराच वे़ळ लागला...आणि रात्री ८ ते ९ नंतर खुप सुन्सान होते रस्ते.... वाटेत गाडी वगैरे बंद पडली तर फारच अवघड होईल असं वाटलं... मुख्य म्हणजे स्वताची गाडी असणे फार गरजेचे आहे तिथे.

भुसारी मध्ये राहिल्या नंतर नांदेड सिटी लांब वाटेल. वारजे चांगला पर्याय आहे. अजुन एक, घर बघताना मी तरी लोकांना आपल्या घरी यायला सोय कशी आहे हे ही पाहिलं होतं. अतिभारी घर पण कुणी माणुस घरी यायचं म्हणलं तर पत्ता अवघड, पीएम्टी / रिक्षा सोय नाही स्वतःची गाडी हवीच, चालावं लागतं बरंच असलं काही नको होतं मला. आमच्या कडे येणं जाणं असतं बरच. तुमचही तसं असेल तर नांदेड सिटीला पोहोचणं थोडं अवघड असेल लोकांसाठी.

पुणेवाल्यांनी बाल्कनी / गच्ची चं चटई क्षेत्र दिलं, इतकंच कशाला हे नाव जरी काढलं तरी आम्हा खुराड्यात रहाणा-या मुंबईकरांना विलक्षण जळजळतं.

नांदेड सिटी मस्त वाटते रिटायर लोकांसाठी. प्रशस्त बागा(च बागा), मोकळी हवा, वन टाइम मेंटेनन्स फ्लॅटच्या किमतीमधे अंतर्भुत. म्हणजे पुन्हा कसलाही मेंटेनन्स खर्च नाही. अगदी प्लंबींग , नळ गळणे, भिंतीला खिळे ठोकणे वगैरे प्रॉब्लेम आले तरी एक फोन केल्यास त्यांची माणसे येउन मोफत काम करुन जातात. झिरो कटकट. फक्त पाण्याला मात्र मिटर आहे... ...त्याचे बिल चुकते करावेच लागेल २० रुपयाला बहुतेक १००० लिटर दर आहे.(दर निटसा आठवत नाहीये त्यामुळे गणित चुकेल पण महिन्याला पाण्याचा खर्च जास्ति जास्त २२० रुपये ४ व्यक्तीच्या कुंटुंबाला येतोय). सर्व गोष्टी रिचार्जेबल आहेत पैसे देउन कार्ड रिचार्ज करायचे व पाण्याच्या मिटरला स्वॅप मारायचे की पाणी सुरु. तिथली पवार पब्लीक स्कूल ही शाळा माहितीतली आहे. उत्तम आहे. फि रु. ५०K/Anum. आतमधे मॉल जिथे कोणीही काही विकत घेत नाही. अगदी भाजि सुधा लगेचच बाहेर नांदेड गावात ज्या दराने व ताजी मिळते त्याच्या ७-८ पट जास्त किमतीत व कमी ताजेपणात उपलब्ध्द असते. आतमधे त्यांची ट्रांन्सपोर्ट सुवीधा आहे ५ रुपये तिकीट काढुन गेटपासुन फ्लॅटपर्यंत जाता येते पण अनेकदा वाहनाची वाट बघावी लागते.(स्वतःची गाडी हवीच) माझ्या माहितीतल्या इमारतीमधे प्रत्येकालाच पार्कींग अलॉटेड आहे पण गेस्ट पार्किंगचे भयानक वांदे आहेत... विरोधाभास म्हणा पण गेस्ट पार्कींगला (माहितीतल्या इमारतीमधे व लगत) जागाच दिलेली नाही. जर स्वारगेट डेक्कनकडे जाणं होत असेल तर सिंहगड रस्ता म्हणजे एक भयानक कटकट आहे... पण हिंजवडीत जायला फार त्रास नाही. त्यामुळे जरा कळ सोसायची तयारी असेल हा प्रॉब्लेम सवयीचा होतो. ८८ पेक्षा कमी किमतीत तुम्हाला सनसिटी मधे सेकंड-हँड २ BHK फ्लॅट आरामात मिळेल. तिथे सर्व सुवीधा, शेजार, बाजार, आजार, प्रवास आणी बरेच काही उत्तम आहे. हायवे टच असल्याने ट्रॅफिकही सुसह्य... बघा तुम्हाला काय आणी कसं हवं ते... खरं तर हे बजेट असताना हिंजवडी जवळ परिसरात २ BHK बघायचा सोडुन उलट नांदेडकडॅ का वळताय ? महाराष्ट्रीयबहुलता हाच एकमेव निकश आहे का ?

एका मित्रा कडे गेलो असतांना, माझी २ व्हीलर नांदेड सिटी पार्किंग मध्ये पंक्चर झाली. भरपूर घाम गाळावा लागला होता बाहेर येइपर्यंत. पण इतक्या रिझनेबल भावात दुसरी कडे flat मिळणे मात्र कठीण झाले आहे.

या रेटमध्ये आणि हिंजवडी जवळ मेगापोलिस , लाइफ रीपब्लिक यांचा विचार करू शकता.

सगळ्यांच्या मार्गदर्शनाबद्दल खरोखर मनापासून आभार! संपूर्ण विचाराअंती नांदेड सिटी येथेच सदनिका घेण्याचे ठरले आहे. शहरापासून फार लांब नाही (नळ stop पासून 8 किमी, डेक्कनपासून 9 किमी). माझ्या कार्यालयापासून थोडे लांब आहे खरे परंतु हमरस्त्याचा जवळपास 24 किमीचा सलग प्रवास असल्याने वेळ तुलनेने कमी लागतो. मुख्य सिंहगड रस्त्यापासूनदेखील फार लांब नाही. प्रश्न आहे मुख्य द्वारापासून 2.5 किमी अंतरावर असलेली रहिवासी वसाहत. पण त्यासाठी आत नांदेड सिटीच्या बसेस आहेत. रिक्षा आतपर्यंत (थोडा अधिक आकार घेऊन) सोडतात. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आत बर्यापैकी सुसज्ज असे डेस्टिनेशन सेंटर आहे. मेंटेनन्सचा अजिबात त्रास नाही. सगळा मेंटेनन्स नांदेड सिटी कंपनी बघते. त्यामुळे सोसायटी, चेअरमन, सेक्रेटरी, भांडणे, लिफ्ट बंद पडणे, पाणी बंद असणे, वगैरे त्रास अजिबातच नाहीत. शिवाय अतिशय शांत आणि सुसह्य असा तिथला अनुभव आहे असे काही तिथे राहणार्या लोकांकडून कळले. सदनिका प्रशस्त आणि हवेशीर आहे. सूर्यप्रकाश मुबलक आहे. बाग-बगीचे, खेळायला क्रीडासुविधा वगैरे भरपूर आहेत. भविष्यात अजून बर्याच सुविधा येतील. अर्थात त्यापैकी बहुतांशी सगळ्या पैसे देऊन वापरता येतील. एका दृष्टीने ते चांगले आहे. सुरक्षेची चोख व्यवस्था आहे. सध्या जरी नांदेड सिटीला तुलनेने मागणी कमी वाटत असली तरी रोज आणि विशेषकरून शनिवारी-रविवारी सदनिका खरेदी इच्छुकांची बर्यापैकी गर्दी असते. भविष्यात मगरपटा सिटी सारखी नांदेड सिटी नावलौकिकाला येण्याच्या संधी खूप आहेत (जर व्यावसायिक आस्थापनांनी नांदेड सिटीला कार्यालये थाटली तर नक्कीच). असा सगळा विचार करता तेथेच सदनिका घेण्याचे ठरले आहे. थोडे धाडस आहे खरे पण मनाचा कल तसाच असल्याने निर्णय पक्का केला आहे. बघू, ही योजना कितपत यशस्वी होतेय ती!:-)अजून पल्ला बराच मोठा आहे. पैशांची जमवाजमव हा सगळ्यात मोठा टप्पा! :-) आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद! आपल्या प्रतिसादांमुळे साधक-बाधक विचार करता आला. निर्णय घेण्यास हे सगळे प्रतिसाद निश्चितच उपयोगात आले. पुनश्च: धन्यवाद! :-) -- समीर

आपल्या नवीन घरासाठी अभिनंदन. आपले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य याचा आदर आहेच. बाकी साधक बाधक विचारांचे म्हणाल तर त्यात जास्त काही दम नसतो. आपण अगोदरच काहीतरी ठरविलेले असते आणी मग त्या निर्णयाला अनुमोदन देणारे विचार तेवढे आपण स्वीकारतो एवढेच खरे.

In reply to by धर्मराजमुटके

खरे आहे....तुमचे म्हणणे पटले पण तरी दोन्ही बाजू व्यवस्थित कळतात आणि निर्णय घेण्यासाठी अजून उपयुक्त माहिती मिळते आणि मिळवता येते.

आयला ही नांदेड सिटी पुण्यात आहे होय??? मला आधी वाटले की मराठवाड्यातील नांदेडबद्दल माहिती विचारताहेत, म्हणून आजवर धागा उघडलाच नव्हता! आजकाल कुठेही काहीही असतं बॉ!!!

In reply to by सुनील

नांदेड नव्हे, इथे नांदेडं नावाचं गाव आहे, त्यावरून अस्तित्वात आलेली ही नांदेड सिटी. बरीच प्रदीर्घ चर्चा झालेलाहा धागाही वाचनीय आहे..

In reply to by बहुगुणी

धन्यवाद, बहुगुणीसाहेब. ही चर्चा वाचली. थोडी भयावह वाटली खरी पण आता निर्णय पक्का झाला असल्याने तो बदलण्याची इच्छा नाही. आणि या चर्चेतले मुद्दे 3-4-5-6 वर्षांपूर्वी मांडलेले आहेत. आता परिस्थिती बरीच बदललेली आहे. बरेच बदल सुखावह आहेत. खरं म्हणजे मगरपट्टा सिटीविषयी सुरुवातीला अशीच मते होती. भुसारी कॉलोनीविषयी जनमत भयंकर टोकाचे नकारात्मक होते. पिंपळे सौदागरला एकेकाळी लोकं नाके मुरडायची. या ठिकाणच्या सदनिकांशी माझा जवळून संबंध आला आणि आज हे तिन्ही भाग पूर्णपणे विकसित झालेले आहेत आणि भुसारी कॉलोनी आणि मगरपटा सिटीसारख्या ठिकाणी नवीन दोन बेड सदनिका कोटींच्या घरात आहेत. मला वाटतं 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' हे अशा बाबतीत लागू पडते. नांदेड सिटी भविष्यात इतकीच यशस्वी होईलच अशी खात्री अजिबात देता येत नाही पण तशी शक्यता सध्या तरी दिसतेय. बघू या, भविष्यात काय वाढून ठेवलंय ते. :-) फार तर काय होईल? निर्णय चुकेल! ठीक आहे. काही बरोबर ठरायचे, काही चुकायाचेच! :-) त्यामुळे नो टेंशन! :-)

शुभेच्छा आणि आता एक कसलाही सिनेमा पहायला निवांत वेळ मिळो ही बाप्पाकडे प्रार्थना!!! स्वगतः एखाद्या सिनेमाचा बुकणा पाडून बरेच दिस झालेत समीर-लेखणीला !!! मुकाट वाचक नाखु

या निर्णयासाठी हार्दिक अभिनंदन व या लक्षासाठी पुढील कामगिरीस शुभेच्छा!! आता उच्चभ्रू वसाहतीत राहायला गेल्यावर कृपया आम्हा गोरगरिबांना विसरू नका.

In reply to by श्रीरंग_जोशी

धन्यवाद, जोशीसाहेब! उच्चभ्रू कसली हो, उच्चभ्रू असती तर इतक्या शिव्या खाव्या लागल्या असत्या का नांदेड सिटीला? :-) अजून तरी तिथे थोडं गावाकडचं फिलिंग आहे. उच्चभ्रू आहेत मगरपट्टा सिटी, कल्याणीनगर, औंध, प्रभात रस्ता, डेक्कन, कोरेगाव पार्क, वगैरे भाग. नांदेड सिटी एक छोटं खेडं आहे. पण मला भारीच आवडलेलं आहे. शांत आहे. आणि शहरापासून फारसं लांबदेखील नाही. बघू कसा अनुभव असेल तिथे राहण्याचा ते. अर्थात सगळं योजनेप्रमाणे पार पडलं तर!! :-) आणि अमेरिकेत वास्तव्यास असणारे गोरगरीब तर नांदेड सिटीमध्ये राहणारे तर अगदीच दारिद्र्यरेषेखाली 12-15 किमी सरपटणारे म्हणायला हवेत. ;-)

In reply to by समीरसूर

अमेरिकेतली पूर्व व पश्चिम किनार्‍यावरची संपन्न राज्ये सोडल्यास बहुतांश अमेरिकेमध्ये घर खरेदी करणे पुण्यात घर खरेदीकरण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या सोपे आहे. हेच रोजच्या जगण्यालाही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

योजनेप्रमाणे सगळे पार पडल्यास तिथली सदनिका हातात आल्यानंतरही साधारण 9-10 महिने तिकडे रहावयास जाणे जमणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या मे - जून (2016) पर्यंत आम्ही सध्या राहतोय तिथेच राहत असू.

अभिनंदन! अवांतरः प्रभात रस्त्यावर एक बंगला विकत घेऊन तिथे रहायचं माझं एक स्वप्न आहे! ;-)

In reply to by काळा पहाड

प्रभात रस्त्यावर अजूनही बरीच मराठी जनता आहे. खरं म्हणजे अजूनही तिथे मराठीच लोकांचा टक्का अधिक आहे. मराठीबहुल भाग आहे तो. माझ्या अंदाजाने साधारण 70-80% जनता मराठी आहे प्रभात रस्त्यावर. आणि मारवाडी असले तरी त्यांच्या कित्येक पिढ्या पुण्यात राहत असल्याने पुणेरी मराठीपण जपणारे मारवाडी अधिक आहेत. एक काळ होता पुण्यात राहणारा प्रत्येक माणूस अस्खलित मराठी बोलायचा. बोहरी आळीतले जुन्या पिढीतले दाढी वाढवलेले, गोल टोपी घालणारे बोहरी/मुस्लीम आजोबा अस्खलित मराठी अजूनही बोलतात. एका अशा आजोबांनी मला "सरळ रेषेत पुढे जा, आणि पुढच्या चौकात उजवीकडे वळा, तिथे एक देऊळ दिसेल डाव्या बाजूस..." असा खणखणॆत आवाजात पत्ता सांगितला होता. आता चित्र बदलले आहे हे खरे...

एवढं बजेट असेल तर रावेतचा विचार पण करा की मग. कारण हिंजवडी तिथुन अक्षरशः सायकलवर जायच्या अंतरावर आहे. हायवे ला लागुनचं आहे. सगळ्या सोयी उत्तम आहेत. सद्ध्या रावेत बास्केट ब्रिजजवळ अनेक प्रकल्प उभे झालेले दिसतात.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नांदेड सिटी शहरापासून जरा जवळ आहे हा जरा महत्वाचा मुद्दा आहे. 'नीलायम' चित्रपटगृह लाडके आहे. त्यापासून फार लांब नको हा एक निकष होताच. ;-) अर्थात रावेत जबरदस्तच झालेले आहे आता. माझे बरेच सहकारी राहतात तेथे. मी हडपसर वगैरे भागात अनेकदा जात असतो. ते ही थोडे सोयीचे आहे.

समीरसूर, अभिनंदन! काही माहिती हवी असल्यास व्यनी करा प्लीज. माझे एक - दोन कलीग्ज राहतात तिथे, त्यांना विचारुन सांगू शकेन.