शशी कपूर----एक अभिनेता म्हणून हे नाव कधी मला लक्ष द्यावसं वाटलच नव्हतं. लहानपणी कधीतरी टीवी वर ना ना करते प्यार तुम्हिसे कर बैठे म्हणणारा एक छान चॉकलेट हीरो म्हणून इतकीच यांची ओळख. जास्तीत जास्तं दीवार, त्रिशूल मधे अमिताभचा भाऊ किंवा मित्र म्हणून. बस, त्यापुढे या शशी कपूर या हिरोची ची ओळख असली तरीही शशी कपूर ह्या अभिनेत्याची कधीच ओळख नव्हती.
काही दिवसांपूर्वी एक झालं की एक गोड गाणं ऐकायला मिळालं. हे गाणं कशातलं असेल म्हणून शोधत होते तर एक फार छान चित्रपट हाती लागला. हा चित्रपट होता जुनून. दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि निर्माता शशी कपूर.
ह्या चित्रपटाची जी पार्श्वभूमी आहे तो काळ आहे अठराशे सत्तावन च्या स्वातंत्र्ययुद्धाचा. देशभर इंग्रजी सत्तेविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचलेला. मंगल पांडेनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाचा झेंडा उभारला होता. त्याला दिलेल्या फाशीने संपूर्ण सैन्य बिथरले होते. दिल्ली, मेरठ, रामपुर, कानपुर येथे सैनिकांचे सशस्त्र उठाव सुरू झाले होते. इंग्रजी सत्तेला आता उलथवून टाकायचेच असा निश्चय करून ठिकठीकाणून सैनिकांच्या तुकड्या एकत्र येत होत्या. अतिशय स्फोटक वातावरण निर्माण झालेले होते.
अशा पार्श्वभूमीवर ही कहाणी फिरते ती जावेद खान या नवाब आणि त्याच्या परिवाराभावती. स्वत: जावेद त्याची बायको फिर्दौस, त्याची चाची, तिचा मुलगा आणि सून. लखनौ मधे राहणारा हा परिवार. जावेद खान चा एक भाऊ सरफराझ खान हा अतिशय कडवा पठाण आहे. हा इंग्रजांविरुद्ध हिरीरीने लढत असतो. मात्र जावेद खान ला या लढाईशी काहीही देणंघेणं नाही. तो तसा आपल्या कुटुंबात आणि पाळलेली कबूतरे उडवण्यात खुश असतो. गावातच एक इंग्रज कुटुंब असतं. या कुटुंबात नवरा, बायको मिरियम त्यांची तरुण मुलगी रुथ आणि आजी असे सदस्य आहेत.
आता जावेदखां हा ह्या रुथ च्या प्रेमात पडलाय. प्रेम म्हणजे खरंतर त्याच्या या प्रेमाला अब्सेशन...जुनून हे अधिक योग्य शब्द आहेत.
एक दिवस या शहरात सुद्धा उठाव होतो. चर्च च्या प्रार्थनेच्यावेळी हिंदूस्थानी सैनिकांची एक सशस्त्र तुकडी हल्ला करते आणि तिथल्या सर्व लोकांची कत्तल करते. रुथ चे वडील सुद्धा या हल्ल्यात मारले जातात.या सगळ्या गदारोळात मरिअम, रुथ आणि आजी हे कसेबसे निसटतात. त्यांना एक हिंदू व्यापारी आसरा देतो. अशा भयानक वातावरणात खरंतर या इंग्रजांना स्वत:च्या घरी ठेवून घेणे म्हणजे मृत्युलाच आमंत्रण. पण तो भला सावकार मात्र या कुटुंबाला ठेवून घेतो.
इथे जावेद खान ला सुगावा लागतो तो की रुथ या कुटुंबाकडे कडे आहे. हा माणूस या रुथच्या प्रेमात पार वेडा झालेला असतो त्यामुळे तो त्या सावकाराच्या अनुपस्थितीत त्याच्या घरात घुसतो आणि रुथ आणि तिच्या आईला ज़बरदस्तीने आपल्या घरी घेऊन येतो. आता या तीन स्त्रिया घरी आल्यावर जावेद ची बेगम साहजिकच विरोध करते. पण तिच्या विरोधाला कोण जुमानणार? जावेद साहेब तर जाहीर करून टाकतात की मी या रुथ शी निकाह लावणार म्हणजे लावणारच.
रुथ अतिशय भेदरलेली आहे. तिने आपल्या जन्मदात्याचा खून होतांना आपल्या डोळ्यांनी बघितले असते. इथे जावेद च्या घरी कसेबसे जीव मुठीत घेऊन ही मुलगी राहात असते. संपूर्ण चित्रपटात एक दोन शब्द सोडले तर तिच्या तोंडून शब्दच फुटत नाही. हिची आई मात्र अतिशय धीराची बाई असते. आपल्या लेकीच्या पुढे ही आई अक्षरश: ढाल बनून सतत वावरत असते. ही बाई जावेद पुढे एक अट ठेवते. खरंतर अटी वगैरे टाकणे तिला परवडणारं नसतंच. परिस्थिती अशी असते की मनात आले तर जावेद कधीही हिचं डोकं उडवून तिच्या मुलीशी जबरदस्तीने निकाह लावू शकला असता. पण तरीही हि जोखीम बाई उचलते आणि यशस्वी सुद्धा होते.
कलाकारांविषयी काय बोलणार? हिंदी रंगभूमी वरचे एक से एक दिग्गज इथे वेगवेगळ्या भूमिकेत ज़बरदस्त काम करून जातात. मग ती भूमिका अगदी एका मिनिटाची का होईना त्यात पर्ल पदमसी असो की सवीता बजाज असो. सहायक भूमिकांमधे लक्षवेधक आहे कुलाभूषण खरबंदा. त्या सावकाराच्या पात्राला ते एक प्रकारचा भारदस्तपणा, खरेपणा देतात. बाकी भूमिकांमधे बेंजामीन गिलानी, दीप्ती नवल, जलाल आगा ही गुणी मंडळी छान प्रामाणिक पणे आपापले काम करतात.
आता मुख्य कलाकार. नसिरुद्दीन शहा कडव्या सरफराझ खान च्या भूमिकेत. इंग्राजंबद्दलचा तिरस्कार, त्यांच्या विरुद्ध लढण्याची ईर्शा. याचबरोबर जावेद खान सारखे आप्तजन देशासाठी लढायचे सोडून कबूतरबाजी मधे रमलेले बघून होणारी चिडचिड. शेवटी एक एक लढाई हरतांना येणारि हताशा, त्रागा सर्व भावना त्याने पडद्यावर जिवंत उभ्या केल्या आहेत.
सुषमा सेठ--अत्यंत ताकदीची ही अभिनेत्री. जावेदची चाची, जावेद आणि त्याच्या बायकोच्या वाद- भांडणात आपलेपणाने मध्यस्थी करणारी कुटुंबातील प्रमुख. आपल्या सुनेचे पोटच्या मुलीसारखे लाड करणारी प्रेमळ सासू अशी अनेक रूपं ह्यांनी फार समर्थपणे सादर केली आहेत. भाषेची खास लखनवी नझाकत, चालण्या-बोलण्यातला नवाबी तोरा सगळं मस्तं आणि सहज.
शबाना आझमी--- यांनी फिरदौस ची भूमिका अफाट जीव तोडून केली आहे. तोंडाने फटकळ पण मनाने साधी. स्वत:ला मूल नाही हे दु:ख आहेच त्यात नवरा कायम तुसड्यासारखा वागतोय. हे सगळं कमीच आहे की काय म्हणून नवर्याचं हे एकतर्फी प्रेमप्रकरण आहेच जोडीला. या सर्व गोष्टींमुळे झालेला त्रागा, मनस्ताप तिच्या देहबोलितून, डोळ्यातून आणि शाब्दिक फटकार्यातून थेट आपल्यापर्यंत पोहोचतो.
नाफिसा अली---अप्रतिम सौंदर्य, निरागस चेहरा, भेदरलेले डोळे आणि दोन चार डायलॉग्स इतकीच या भूमिकेची मागणी होती ती नाफिसा अली ने दोनशे टक्के पूर्ण केलेली आहे.
शशी कपूर----एक अभिनेता म्हणून माझ्या मते जरा बर्यापैकी मर्यादित कौशल्य असलेला हा माणूस स्वत: निर्माता असलेल्या चित्रपटांमधे अप्रतिम अभिनय करून जातो. ही जादू स्वत:च्या चित्रपटामधे काम केले म्हणून आलेल्या जबाबदारीच्या जाणिवेतून झाली असते का उत्तम दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचा परिणाम. कारण काहीही असो पण हे आहे खरं. कुठे सुहाग आणि नमक हलाल मधील शशी कपूर आणि कुठे जुनून, कलयुग आणि विजेता मधील शशी कपूर, काही तुलनाच नाही.
इथे जावेद खान चा नवाबी तोरा, कबुतरे पाळण्यात आणि उडवण्यात मश्गूल असलेला बेफिकीरपणा. स्वत:च्या बायकोशी नेहमी तिरसट पणे बोलणे. रुथविषयी वाटणारं पराकोटीचं आकर्षण. हे आकर्षण इतकं आहे की हा माणूस स्वत:च्या बायको समोर असतांना बेधडक पणे सांगतो की मला ही मुलगी आवडते आणि मी हिच्याशी लग्न करणार आहे. हे वेड, बेदरकारपणा आणि बायकोच्या मनाची किंचित सुद्धा फिकीर न करण्याची वृत्ती. जावेद खान हे पात्र शशी कपूरने अतिशय मन लावून, जीव ओतून उभं केलं आहे.
लास्ट बट नॉट द लीस्ट.....जेनिफर केंडाल. पडद्यावरची मॅडम मरिअम लॅबडॉर आणि प्रत्यक्षातली सौ. शशी कपूर.
नवरा गमावलेली कसबसा आपला आणि आपल्या मुलीचा जीव वाचवून जावेद खान च्या आश्रयाला आलेली ही स्त्री. बरं हा आसरा पण कसा? की गायीने कसायाकडे आश्रय मागावा असा. कधी कोणाची गैरमर्जी होईल आणि आपला जीव जाईल याची शाश्वती नाही अशा परिस्थितीत ही स्त्री भक्कमपणे परिस्थितीला तोंड देते.
या भूमिकेचे अनेक पैलू आहेत. जिवाच्या भितीनी पार भेदरुन गेलेली. पण अशा प्रतिकूल परिस्थितही स्वत:ची अस्मिता, स्वाभिमान आणि डिग्निटि सांभाळून राहणारी मरिअम.
वरवर राकट दिसणारा जावेद खान आपल्या मुलीच्या प्रेमात पार बुडून गेलाय आणि तो दिसतो तितका काही धोकादायक नाहीये हे एकदा लक्षात आल्यावर मग मात्र त्याच्यापुढे ठामपणे उभी ठाकणारी बाई जेनिफर केंडल यांनी फार छान उभी केली आहे.
कुठेही भारंभार संवाद नाहीत पण चेहरा आणि देहबोली सगळं काही बोलून जाते. आधी जिवाच्या भयाने थरथर कापणारी पण जरा बाजी आपल्या हातात आली आहे हे लक्षात आल्यावर चेहृयावरील, आवाजामधील आलेली एक किंचित जरब. अगदी लक्षात येईल न येईल असा सटल हा फरक या गुणी अभिनेत्रिने इतका अप्रतिम दाखविला आहे की त्याला तोड नाही.
वनराज भाटिया यांचे संगीत आहे. गाणी फारशी नाहीच आहेत. एक अप्रतिम गाणं आहे आशा भोसले यांनी गायलेलं ' सावन की आई बाहर रे'. अगदि एका कडव्याचं पण अतीगोड गाणं आहे हे.
https://www.youtube.com/watch?v=dLM-9Ds1MtY
जालावरून साभार.
जालावरून साभार.| लेखनविषय: |
|---|
वाचने
5634
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! काय छान लेख लिहिलाय!...
स्वॅप भौ.
In reply to वा! काय छान लेख लिहिलाय!... by एस
सीडी/डीव्हीडी बद्दल सांगता
In reply to स्वॅप भौ. by विजुभाऊ
जुनून चित्रपट मलाही खूप आवडला
छान लिहिलयं! जुनून खूप आवडला
खूप सुरेख लिहिले आहे, नक्की
पाहिलाय अस स्टोरीवरुन वाटत्य.
ऊत्तम रसग्रहण!!!!
छान परिचय.नाव ऐकुन होते
खूप सुंदर चित्रपट. नसिरुद्दीन
खुप छान लिहिलय.जुनून नक्की
खूप छान परिचय दिलाय. मी
खूपच सुंदर रसग्रहण केलंय.
परीक्षण आवडले. नसीरुद्दीन शहा
असा शिनेमा आहे हे माहित
सुंदर लेख.
खूप सुंदर परीक्षण..
सर्व प्रतिसादांचे मनापासून
चित्रपटाची खूप छान ओळख. नक्की
सुंदर चित्रवर्णन
फार छान परिचय. पाहण्याचा
जुनुन मला सुद्धा अतिशय
छान लिहिलंय
छान परिचय.. कालच
मधुरा, अभिरूप खूप धन्यवाद.
मस्त लिहिलाय लेख
सुन्देर परिक्षन
अप्रतिम
छान आहे.......