✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

येडा गोप्या ...

व
विशाल कुलकर्णी यांनी
गुरुवार, 07/09/2015 - 11:24  ·  लेख
लेख
रंग्याने त्याच्या दप्तरातून सतरंजीची पट्टी बाहेर काढली आणि भिंतीच्या बाजुला बसलेल्या एका पोरावर खेकसला… “ए जाड्या, सर तिकडं. माझी जागा हाये ही. ” तसं ते पोरगं बाजूला सरकलं आणि रंग्याने आपली सतरंजी (पट्टी) तिथे अंथरली. अर्ध्या पट्टीवर स्वतः बसत, डोळ्यानीच मला पण बसायला सांगितलं. मी जरा घाबरतच खाली बसलो….. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी गेलो होतो. गावातल्या शाळेला अजुन सुट्टी लागलेली नव्हती. रंग्याबरोबर गावच्या शाळेत त्याच्या वर्गात येवून बसलो होतो. त्यांचे शिक्षक काय म्हणतील याची भिती होती, पण त्यावर रंग्याचे एकच उत्तर ,”पतुदेवाचा पुतण्या आहे म्हणून सांग”, मास्तर त्यांच्या खुर्चीवर सुद्धा बसवतील. पतुदेव उर्फ प्रताप प्रल्हाद कुलकर्णी, माझे काका ! गावातल्या शिवसेनेच्या शाखेचे अध्यक्ष होते…….. “एक साथ नमस्ते” चा गजर झाला. आत आलेल्या मास्तरांनी आपल्या काखेत अडकवलेली पिशवी टेबलावर टाकली. डाव्या हातातली दोन पुस्तके, एक वही आणि फळा पुसायचा लाकडी डस्टर अशी चवड तिथेच टेबलवरच मांडली आणि खुर्चीवर बसता-बसता खिशातुन एक खडू बाहेर काढून कटकन मधोमध मोडला आणि वर्गाच्या मागच्या बाजुच्या कोपर्‍याकडे जोरात भिरकावला. “उठा गोपीनाथराव, सकाळ झाली.” त्या कोपर्‍यात बसलेल्या, बसलेल्या म्हणण्यापेक्षा बसून पेंगणार्‍या त्या पोराला पटकन जाग आली. आजुबाजुला बघत, ओशाळवाणं हासत त्यानं एकट्यानेच “एक साथ नमस्ते” केलं. मी त्याच्याकडे टक लावून बघतोय तोवर माझ्या गालावर खटकन त्या खडुचा दुसरा तुकडा येवून आदळला. “काय वो रावसाहेब, कोण तुम्ही?” हातातल्या दुसर्‍या एका खडुला, त्याच्या मध्यावर, टेबलाच्या कडेवर घासत मास्तरांनी अस्मादिकांना उद्देशून विचारलं. बहुतेक खडु हा फळ्यावर लिहिण्यासाठी नसून पोरांना फेकुन मारण्यासाठीच असतो असा मास्तरांचा घट्ट समज असावा. मी काही बोलायच्या आधीच… “पतुदेवाचा पुतण्या हाये त्येनी. कुरुडवाडीला असतय, कालच आलय. हुनाळ्याच्या सुट्टीसाटनं .” मी आवाजाच्या दिशेने बघीतलं…. त्येच ते मघाच्ं कळकट पोरगं आपले पिवळेजर्द दात दाखवत मास्तरांना सांगत होतं. ” अस्सं होय्य, नाव काय बाबा तुझं? कितवीला आहेस ? कुठल्या शाळेत जातोस कुर्डुवाडीत? “विशाल विजय कुलकर्णी, सहावीची परीक्षा दिलीय, आंतरभारती प्रशालेत आहे. ” ’बरं असुदे.. बस आता. पण गपचूप बसून राहा.’ मास्तरांनी सांगितले आणि ते हातातल्या डस्टरने फळा पुसायला लागले. मलाही तेच हवे होते, त्या कळकट्ट पोराने माझी उत्सुकता चाळवली होती. याला माझ्याबद्दल एवढी माहिती कशी? माझ्या डोळ्यातलं आश्चर्य रंग्याला जाणवलं असावं. त्याने माझ्या पोटात आपलं कोपर रुतवलं, माझं लक्ष आपल्याकडे वेधत म्हणाला… “त्ये येडं गोप्या हे गायकवाडाचं, येडछाप आहे एकदम, सोड जाऊदे. ” मी मान वाकडी करून गोप्याकडे पाहीलं तर तो माझ्याकडेच बघत होता. डाव्या हातात लाकडी फुटपट्टी धरुन तिच्या साहयाने निवांतपणे पाठ खाजवीत माझ्याकडे पाहात त्याने आपले पिवळेजर्द दात पुन्हा एकदा दाखवले. “तसलंच आहे ते. खरजुळं, रोगट लेकाचं. म्हणून तर गुर्जींनी तिकडं कोपर्‍यात बसवलय त्याला. सदानकदा कुठं ना कुठं खाजवतच असतय?” रंग्या करवादला पण माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. मी टक लावून गोप्याकडे बघत होतो. त्याचं अगदी इमानदारीत पाठ खाजवणं चालू होतं. मधली सुट्टी होइपर्यंत कसाबसा दम काढला मी तिथे. त्यानंतर मी घरी जातो असे सांगून शाळेचा निरोप घेतला. इनमिन तीन – साडे तीनशे उंबरठ्याचं आमचं गाव. त्यातही म्हातारी कोतारीच जास्त. तरणीताठी माणसं रोजगाराच्या शोधात पोटासाठी दाही दिशा करत भ्रमंती करणारी. गावातली शाळा सातवीपर्यंतच, त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तेथून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘साडे’ या गावात जावे लागत असे. पहिले ते चौथीच्या वर्गांना एकच कॉमन शिक्षक होते. त्यापुढच्या वर्गांसाठी मात्र स्वतंत्र व्यवस्था होती. (स्वतंत्र व्यवस्था म्हणजे प्रत्येक वर्गाला एक किंवा दोन शिक्षक स्वतंत्रपणे दिलेले. तेच सगळे विषय शिकवत. त्यात दुष्काळी भाग असल्याने सगळीच वानवा. पोरं सकाळी शाळा करुन दुपारी आई-वडीलांना शेतावर मदत करणे, गुरे राखणे असली कामे करत. गोप्या पण त्यापैकीच एक होता. गावची शाळा थोडी गावकुसाच्या बाहेरच्या बाजुला होती. मरिआईच्या देवळापाशी सुरू होणारं माझं गाव, अर्धा-पाऊण मैल अंतरावर असलेल्या मारुतीरायाच्या देवळापाशी संपतं. त्या देवळापासून मधला एक ओढा ओलांडून पाच मिनीटाच्या अंतरावर शाळा. गावातली सगळी रिकामटेकडी टाळकी मारुतीरायाच्या पारावर पडीक. आजही मी शाळेतून परत निघालो. टिवल्या-बावल्या करत मारुतीच्या पारावर पोचलो तर तिथं आधीच गोट्यांचा डाव रंगलेला ……. आणि गंमत म्हणजे तिथे गोप्या होता. आता मला त्याला नीट पाहता आलं. साधारण पावणेपाच-पाच फुट उंची, काटकुळा या वर्णनाला जास्त न्याय देणारा देह. लांबूनसुद्धा हाता-पायावरच्या जखमांचे (खाजवून -खाजवून झालेल्या) ठळकपणे होणारे दर्शन, अगदी बारीक कापलेले केस , अंगात एक ठिगळे लावलेला पण चक्क स्वच्छ गंजीफ्रॉक (शर्ट काढून तिथेच एका झुडपाला अडकवलेला ) आणि कंबरेला तशीच ठिगळे लावलेली खाकी रंगाची अर्धी चड्डी. मारुतीच्या पाराच्या भींतीपाशीच एक छोटासा खड्डा (गल) खणून गोप्याचा गोट्यांचा खेळ रंगलेला. “आन कुठली मारु रं?” तेवढ्यात गोप्याचं माझ्याकडे ल़क्ष गेलं आणि त्याने मला सरळ हात केला , जणु काही आम्ही गेली ४-५ वर्षे एकमेकाला ओळखतोय. “का रं इशुनाथ, कटाळला का आमच्या साळंला? गोट्या खेळतू का? ” खेळणारी इतर पोरं माझ्याकडे बघायला लागली. मी जरा परग्रहावरून आल्यासारखाच होतो तिथे. बहुतेकांच्या अंगात तेच कपडे पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. त्यातही बरेचजण दिवसभर तेच घालायचे कपडे आणि रात्री धुवून दुसर्‍या दिवशी पुन्हा वापरायचे असा परिस्थितीतली. त्यामुळे टीशर्ट घातलेला मी तिथे परग्रहवासी ठरलो नसतो तरच नवल. “तू शाळेत होतास ना मघाशी? मग आता इथे काय करतोय? शाळा सुटली का?” मी थोडा आश्चर्यचकीत अवस्थेत….. “हल बे, मलाबी कटाळा आला म्हुन आलु गपचिप मागल्या दारानं पळून. न्हायतरी ते मास्तर काय शिकवायलय ते हितं कुणाला कळतय? त्यापरीस म्हसरं घेवून रानाकडं गेलेलं काय वायट?” “आणि उद्या मास्तरांनी विचारलं तर काय सांगणार?” “त्येनी बी शाणे हायेत रे इशुनाथ, इच्यारत न्हायती आता. सरळ फोकानं छड्या मारत्यात न्हायतर आंगटं धरुन हुबं करत्यात. पैल्यांदी तर वर्गाच्या भायीर आंगटं धरुन हुबं करायचं मला. म्या बी लै शाणा. भायेरच्या भायेर पशार व्हयाचो. दे टाळी….” खदखदा हासत गोप्याने टाळीसाठी हात पुढं केला आणि मी टाळी देणार तेवढ्यात त्याच वेगाने मागं ही घेतला. ” का रे? टाळी का नाही घेतलीस?” गोप्याचे डोळे आणि ‘आ’ दोन्ही वासले. त्याने बिचकत हात पुढे केला मी त्यावर टाळी दिली. तसा त्याचा चेहरा फुलला. कुजकट हासत तो म्हणाला, ” आजुन नवा हायेस, म्हायती न्हाय तुला कायबी. पर उंद्याच्याला मला टाळी द्यायाला तू बी नको म्हणशील बग.” वाक्य संपताना मात्र त्याच्या चेहर्‍यावर त्या कुजकट हासण्याच्या ऐवजी रडके भाव होते. ” हे बघ गोपीनाथ, मला माहीती आहे तुझा खरजेचा रोग आणि खाजवायची सवय. पण मला नाही फरक पडत. जोपर्यंत तुझ्या जखमेला थेट स्पर्श होत नाही तोवर संसर्गाची भीती नाही. त्यामुळे मी टाळी द्यायला नाही म्हणणार नाही कधीच, किमान जोपर्यंत तुझ्या तळहाताला जखमा होत नाहीत तोवर तरी नाहीच नाही.” मी हसून सांगितलं, तसा त्याचा चेहरा आधी आश्चर्याने आणि मग आनंदाने फुलला. पोरं मात्र तोंडं लपवून हसायला लागली. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहीले. “ध्यान नगो दिवूस त्यांच्याकडं. तू मला गोपीनाथ म्हनलास, त्यांच्यावाणी गोप्या नाय म्हनलास म्हनुन हसायलेत भाडकाव.” गोपाने अगदी सहजपणे सांगीतले. “अरे हेच काय, माझी आय दिकून गोप्याच म्हनती मला. गेल्या धा-बारा सालात तू पैलाच भेटलास गोपीनाथ म्हुन हाक मारनारा. त्ये मास्तरडं बी गोप्याच म्हनतय. पर खरं सांगु इशुनाथा…. लै ग्वाड वाटलं तुज्या तोंडातुन ‘गोपीनाथ’ आइकताना. ठ्यांकु रं…” विषाद आणि आनंद दोन्हीने भरलेली अवस्था होती त्याची. पण कसं कुणास ठाऊक? माझं आणि गोपीनाथाचं (पुढे मैत्री झाल्यावर मी त्याला ‘गोपा’ म्हणायला लागलो) मैत्र आणि बहुदा गोत्रही जुळलं. गोपाचे वडील तो (गोपा) लहान असतानाच घर सोडून परागंदा झालेले. गावातली काही माणसं सांगत की म्हातारा शेजारच्याच एका गावात दुसर्‍याच बाईबरोबर राहतोय. पण गोपाच्या आईने त्याचा नाद सोडलेला. नवरा सोडून गेला तेव्हा पदरात ४ वर्षाचा गोपा आणि पोटात सहा महिन्याची चंदी अशी दोन लेकर्ं त्या मर्दिनीनी आयुष्यभर स्वत्;च्या जिवावर सांभाळली. हो .. आयुष्यभरच. गोप्या हा असा रोगट, जनावरं राखण्यापलीकडे त्याचा काहीही उपयोग नाही आणि त्याची धाकटी बहीण चंदी ती अर्धवट, गतीमंद असलेली. त्या माऊलीने हे भोग आजन्म भोगले कसलीही तक्रार न करता. गोप्याच्या रोगट शरीरामुळे त्याला कुणी जवळ करायचे नाही. पण कडब्याच्या ताटापासून खेळण्यातल्या बैलगाड्या बनवणं, जनावरं बनवणं हा त्याचा आवडता उद्योग. सगळ्या गावची पोरं त्याच्या पाठी असायची बैलगाडी करुन दे, सायकल करुन दे म्हणत. हा येडा पण आनंदाने पाहीजे ते करुन द्यायचा. पण हीच पोरं त्याच्यापासून कायम फुटभर अंतरावरच….. कुठेतरी खटकायचं त्याला. पण रडणं, खंत करणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. जन्मल्यापासून दुखणी आणि रोग यांच्याशी झगडतच मोठा झालेला. त्यामुळे झुंजणं रक्तातच होतं. शरीराने नसला तरी गोपा मनाने भक्कम होता. पुढे कधीतरी मी त्याला त्याची खेळणी तालुक्याच्या बाजारात विकता येतील हे दाखवून दिले. एकदा त्याच्याबरोबर करमाळ्याला जावून ती विकुनही दिली. ते विकून आलेले १२ रुपये आईला देताना धाय मोकलून रडलेला गोपा आजही डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा राहतो. आणि पुन्हा वर त्याचं त्ये पिवळेजर्द, किडलेले दात दाखवत ‘ठ्यांकु रं’ म्हणत जोरजोरात खिदळणं. एकदा असाच सुट्टीचा गावी गेलेलो. दोन दिवस गोपा दिसलाच नाही. रंग्याला विचारलं तर तो म्हणाला, ” येडं हाये ते. गृहपाठ केला नाही म्हणून मास्तरनी मारलं. मास्तरनी मारलं म्हणून आईनंबी मारलं. तर हे येडं पळूनच गेलय बघ.” मला धक्काच बसला. पण सुदैवाने दुसर्‍या का तिसर्‍याच दिवशी गोपा परत गावात हजर झाला. मी आलोय हे कळल्यावर घराकडं आला भेटायला. “काय रे मुर्ख, मास्तरांनी मारलं म्हणून घर सोडून पळून जात असतेत काय? त्या चंद्रभागेचा (गोपाची आई) जीव एवढासा झाला होता मुडद्या.” त्याला आज्जीने फैलावर घेतलं. ” न्हाय वो बामणीन काकी, मास्तराच्या माराचं कुणाला भ्याव वाटतय हितं. न्हानपनापास्नं सगळ्यांचा मारच खातुया, दगुड झालाय अंगाचा… काय बी वाटत न्हाय आता.” गोपा नेहमीप्रमाणेच खिदळत बोलला. “काकी आवो तकडं सापटण्याला एक बाबा लाकडाची खेळण्या कराया शिकिवतो आसं कळ्ळं म्हुन गेलतो शिकायला. पायच धरले बगा गेल्या-गेल्या त्याचे. म्हन्लं बाबा रे तुला द्यायला पैका न्हाय माझ्याकडं. पर तू म्हनशील ते काम करीन पर येवडी इद्या मला शिकीव. माझ्या असल्या रगतपितीकडं बघून आदी तयारच न्हवता त्यो. पर दोन दिस ततंच बसून र्‍हायलो दारात त्येच्या, तवा शिकीवलं बगा समदं. थोडी हत्यारं बी दिल्याती. त्येच्या बदल्यात म्या त्येला ३०-४० खेळण्या बनवून दिलो बगा. आता ह्योच धंदा कराचा. तेवढाच आवशीला आदार.” १६ वर्षाचा होता तेव्हा गोपा. पण आपल्या पदरी नियतीने काय वाढून ठेवलय याची जाणीव होती त्याला. आपली बहीण वेगळी आहे, इतरांसारखी नाही हे त्याला खुप आधीच कळलं होतं. त्यामुळे तिला फुलासारखं जपायचा गोपा. खेळणी विकून कमावलेल्या पैश्यातून चंदीवर इलाज करीन म्हणायचा. शेरगावातल्या मोट्या , भारी डाक्टरकडं घिवून जाणार चंदीला म्हणायचा. चंदीवर त्याचा खुप जीव होता. “इशुनाथा, तू बगच. येक ना येक दिस चंदी नक्की बरी व्हयील. मग म्या तिला चांगल्या साळंत घालीन, करमाळ्याच्या न्हायतर सोलापूरच्या. लै शिकवीन तिला. मंग कुनीतरी शिरिमंत माणुस बगुन तिचं लगीन लावून दिन.” रिकामा असला की त्याचं स्वप्नरंजन चालु व्हायचं. मग कुणीतरी खोचकपणे विचारायचा.. “आन न्हायच झाली ती बरी, येडीच र्‍हायली. तर रं, मंग काय कर्नार?” तसा गोपा संतापाने उसळून उठायचा. “आरं म्या जित्ता हाये ना अजुन. मरं पत्तुर संबाळीन माझ्या भनीला. तुझ्या गांडीला का म्हुन खाज उठाय लागली रं. ” आणि मग अचानक त्याचे डोळे भरुन यायचे. माझ्याकडे वळुन म्हणायचा… “इशुनाथा, मला सांग म्या , माझ्या मायनं, माझ्या चंदीनं आसं काय मोटं पाप क्येलं व्हतं म्हुन ही असली जिनगानी वाट्याला आलीय?” अर्थातच त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नसायचं. मी फ़क्त शांतपणे त्याच्याकडे बघत बसुन राहायचो. पण हे क्षणभरच असायचं. काही क्षणातच त्याच्यातला खट्याळ, खोडकर ’गोप्या’ उसळी मारायचा आणि …… त्यानंतर मग माझंही गावाकडं जाणं – येणं कमी व्हायला लागलं. आधी शिक्षणाच्या आणि नंतर नोकरीच्या निमीत्ताने गावी जाण्ं कमी झालं. दोन तीन वेळेला तर सकाळी-जावून संध्याकाळी परत अशी धावती भेट झाली. या भेटीत गोपा मात्र भेटला नाही. काही वर्षांपूर्वी गावी गेलो होतो असाच. हंबीरकाकाच्या घरापाशी गाडी पार्क केली आणि बॅग घेवुन घराकडे निघालो. मध्येच समोर एक म्हातारा येवून उभा राहीला. क्षणभर माझ्या डोळ्यात रोखून बघीतलं आणि मग अचानक कुठेतरी शुन्यात बघत म्हणाला … “न्हाय… तू नसशील त्यो. तू चांगला बाबा दिसतुयास. तू कशाला मारशील माज्या चंदीला?” आणि आकाशात बघत, विचित्र हातवारे करत तो निघून गेला. आधी मला काही कळेचना. पण शेवटच्या वाक्यावरून माझी ट्युब पेटली आणि मी मागे वळत त्याला हाक मारली… “गोपा…..!” तसा तो घाबरला आणि जोरात ओरडला, ” न्हाय्…. न्हाय, म्या कायबी नाय केलं? म्या काय बी करणार नाय? मला मारु नगासा……… आणि अतिशय वेगाने तिथून पळत सुटला…. मी वेड्यासारखा त्याच्या, माझ्या बालपणीच्या मित्राच्या, गोपीनाथाच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहात वेड्यासारखा उभा राहीलो. माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठा असेल तो फारतर. पण ऐन चाळीशीत त्याला साठी आली होती. आणि वागणं …… तेवढ्यात मारुतीच्या देवळाकडून येणार्‍या हंबीरकाकांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि दूर जाणार्‍या गोपाच्या पाठमोर्‍या आक्रुतीकडे बघून बहुदा त्यांना परिस्थितीचे आकलन झाले असावे..., “तू आला नाहीस विशु बर्‍याच वर्षात गावाकडं. इथे फार काही घडून गेलय गेल्या ४-५ वर्षात. चंदी मतीमंदच होती रे. तिच्या मतीमंद असण्याचा गावातल्या टग्यांनी फायदा घेतला. गावातले काही जण आणि आजुबाजुच्या गावकुसातल्या काही जणांनी मिळुन त्या अजाण, निरागस लेकराच्या चिंध्या केल्या. महिनाभर गायबच होती पोर. लेकरानं किती दिस छळ सोसला कोण जाणं? पण महिन्याभरानंतर दुधाळ्याच्या माळावर प्रेत सापडलं तीचं. तिची अवस्था बघून चंद्रभागानं गळफास लावून घेतला. गोप्या तर वेडापिसाच झाला होता. त्यानं पोलीसात तक्रार सुद्धा केली. पण त्यानंतर अचानक एक दिवस गोप्या पण गायब झाला. परत सापडला तेव्हा कुणीतरी त्याला बेदम मारला होता. जिवंत राहीला हेच विशेष… तेव्हा पासून असाच फिरत असतो गावात, “त्यांना” शोधत. कुणालाच ओळखत नाही. फक्त अभागी चंदी तेवढी आठवते त्याला……!" मंडळी, माझा दोस्त कुणी मोठा माणुस नाहीये. त्याला लक्षात ठेवावं असं काही विशेषही नाही त्याच्यात. पण तरीसुद्धा मी त्याला कधीच विसरू शकणार नाही. आता ही गावी गेलं की कधी-मधी भेटतो मारुतीच्या पारामागं.. आकाशात डोळे लावून बसलेला गोपा. मी त्याच्या नजरेला नजर मिळवीत नाही. मला भीती वाटते. कदाचित त्याने मला ओळखलं आणि विचारलं… “इशुनाथा, मला सांग म्या , माझ्या मायनं, माझ्या चंदीनं आसं काय मोटं पाप क्येलं व्हतं म्हुन ही असली जिनगानी वाट्याला आलीय?” . तर……? पूर्वप्रकाशित विशाल कुलकर्णी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव

प्रतिक्रिया द्या
9881 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

कथा छानच आहे पण शेवट वाचून

शि बि आय
गुरुवार, 07/09/2015 - 11:53 नवीन
कथा छानच आहे पण शेवट वाचून जीव गलबलला.
  • Log in or register to post comments

सुन्न केलं राव !

उगा काहितरीच
गुरुवार, 07/09/2015 - 11:54 नवीन
सुन्न केलं राव !
  • Log in or register to post comments

सून्न

सिरुसेरि
गुरुवार, 07/09/2015 - 12:02 नवीन
सून्न करणारा अनुभव . "तिच्या मतीमंद असण्याचा गावातल्या टग्यांनी फायदा घेतला" - याला काहीच अर्थ नाही . मुठभर टगे गावात गोंधळ घालत असताना गावातील शहाणी , सुरती लोकं काय करत होती ? जो प्रसंग आज चंदीवर आला तो उद्या कोणावरही येउ शकतो . या घटनेवरुन त्या गावाचा भुतकाळ , वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याची पुर्ण कल्पना आली .
  • Log in or register to post comments

याला काहीच अर्थ नाही . मुठभर

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 07/09/2015 - 12:28 नवीन
याला काहीच अर्थ नाही . मुठभर टगे गावात गोंधळ घालत असताना गावातील शहाणी , सुरती लोकं काय करत होती ? गावाकडच्या वातावरणात अजुनही हे प्रकार सर्रास चालतात. अजुनही या छोट्या-छोट्या गावांमध्ये काही अलिखित आणि अनभिषिक्त सम्राट असतातच. त्यांना का? म्हणून विचारायची हिंमत कुणाकडेच नसते आणि असली तरी असे आवाज सहजपणे दाबले जातात. अर्थात अश्या एका घटनेवरून गावाचा भविष्यकाळ किंवा वर्तमानकाळ ठरवणे पुर्णपणे चुकीचे आहे. या गोष्टी केवळ गावातच घडतात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो फार मोठा गैरसमज आहे. या गोष्टी सगळीकडेच घडतात. फक्त शहरांचा विस्तार मोठा असल्याने आपल्यापर्यंत पोचतीलच असे नाही, तर गाव छोटेसे असल्याने कुजबुजत का होइना बातमी बाहेर येतेच. साम्य एवढेच की तिथेही कुणी आवाज उठवायचे धाडस करत नाही आणि शहरातही कुणी करत नाही. (सन्माननीय अपवादांबद्दल क्षमस्व)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

टगे

कपिलमुनी
गुरुवार, 07/09/2015 - 12:44 नवीन
गावात काय आणि शहरात काय ! सर्वत्र सारखेच ! गावात कमी उंबरे असल्याने बातमी कळते , शहरात कळत नाही एवढेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

छान कथा.

स्वलेकर
गुरुवार, 07/09/2015 - 12:09 नवीन
छान कथा.
  • Log in or register to post comments

ह्या टग्यांना गावातल्या इतर

तुडतुडी
गुरुवार, 07/09/2015 - 12:17 नवीन
ह्या टग्यांना गावातल्या इतर लोकांनी तुडवलं का नाही ? का ते सुधा त्यात सामील होते ? गावात ह्यापुढे कोणी मतीमंद मुलगी पैदाच होणार नाही का ?
  • Log in or register to post comments

ह्या टग्यांना गावातल्या इतर

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 07/09/2015 - 12:32 नवीन
ह्या टग्यांना गावातल्या इतर लोकांनी तुडवलं का नाही ? का ते सुधा त्यात सामील होते ? गावात ह्यापुढे कोणी मतीमंद मुलगी पैदाच होणार नाही का ? तुम्हाला काय वाटलं, त्या दुर्दैवी लेकराला सगळ्यांसमक्ष उचललं गेलं असेल. अहो तिचं प्रेतसुद्धा सापडलं एक महिन्याने. आणि त्यात इतरजण सुद्धा सामिल होते का? हा प्रश्न तर मला प्रचंड हास्यास्पद वाटतो. मुंबईला शक्ती मिल मध्ये जे कांड झालं होतं त्या बद्दल शक्तीमिलच्या परिसरातल्या इतर सर्वांनाच जबाबदार धरणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

काटा आला. एकदम काळजाला हात

रातराणी
गुरुवार, 07/09/2015 - 12:22 नवीन
काटा आला. एकदम काळजाला हात घालणारं लिहले आहे.
  • Log in or register to post comments

गलबलुन आलं अगदी..सत्यकथा असु

पिलीयन रायडर
गुरुवार, 07/09/2015 - 12:46 नवीन
गलबलुन आलं अगदी..सत्यकथा असु नये असं फार फार वाटतय.. फार सुरेख लिहीता हो.. चित्रदर्शी लेखनशैली आहे अगदी..
  • Log in or register to post comments

+१

मधुरा देशपांडे
गुरुवार, 07/09/2015 - 13:27 नवीन
अस्वस्थ करणारी कथा, चित्रदर्शी लिखाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

“इशुनाथा, मला सांग म्या ,

कपिलमुनी
गुरुवार, 07/09/2015 - 12:48 नवीन
“इशुनाथा, मला सांग म्या , माझ्या मायनं, माझ्या चंदीनं आसं काय मोटं पाप क्येलं व्हतं म्हुन ही असली जिनगानी वाट्याला आलीय?” .
या प्रश्नाला आपला समाज कधी पॉझिटेव्ह उत्तर देणार . अशा लोकांची टीम्गल आणि अवहेलना जास्त होते . आपलयाकडे सोशल सिक्युरीटी खुप कमी आहे.
  • Log in or register to post comments

आणि असे असूनही भारतातली छोटी

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/09/2015 - 12:56 नवीन
आणि असे असूनही भारतातली छोटी शहरे/तालुक्याच्या ठिकाणची उसगावातल्या/युरोपातल्या छोट्या खेड्याची तुलना करून दोन्हींमध्ये जवळपास काही जास्त फरक नाही असा निष्कर्ष खफवर काढला जातो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

निष्कर्ष

कपिलमुनी
गुरुवार, 07/09/2015 - 15:56 नवीन
निष्कर्ष तिथे राहून काढला जातो. ग्राउंड रीअ‍ॅलिटी वेगळी असते. कोकणामधल्या खेड्याचा सुरन्गी तैंचा अनुभव आपण वाचत आहोतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हद्द आहे

श्रीरंग_जोशी
Fri, 07/10/2015 - 09:26 नवीन
उथळ प्रसारमाध्यमांचा प्रतिनिधी शोभावास असं संदर्भ सोडून लिहिलं आहेस टका. अमेरिकेत निवृत्तीनंतर बहुतेक वेळी आर्थिक कारणांनी बरेच लोक तुलनेनी स्वस्त ठिकाणी किंवा तुलनेनी छोट्या गावाला जाऊन स्थायिक होतात. असे भारतातही व्हायला हवे असा विचार मी मांडला. मी स्वतः तालुक्याच्या ठिकाणीं लहानचा मोठा झालोय अन अजुनही जाऊन येऊन असतो. अमेरिकेतल्या ग्रामीण भागातसुद्धा आपल्या ग्रामीण भागासारख्याच जुजबी वैद्यकीय सुविधा असतात. काही कमी जास्त झालं तर रुग्णाला जवळपासच्या मोठ्या शहरातच न्यावं लागतं. तसेच अमेरिकेत गुन्हेगारी, दुबळ्यांचे शोषण होत नाही असं कुणाला वाटत असेल तर तो खूप मोठा गैरसमज आहे. माझा एक माजी स्थानिक सहकारी माझ्या फेसबुकवर मित्रयादीत आला. तो सतत अमेरिकेतल्या विविध ठिकाणच्या पोलिसांनी केलेल्या अत्याचारांच्या बातम्या, फोटोज व्हिडिओज टाकत असतो. ते पाहिल्यावर केवळ आपलेच पोलिस त्यांच्या कारनाम्यांमुळे बदनाम आहेत हा माझा गैरसमज दूर झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ती चर्चा वाचलेली...पण तुलना

टवाळ कार्टा
Sun, 07/12/2015 - 12:20 नवीन
ती चर्चा वाचलेली...पण तुलना करताना कोणीही स्थानीक लोकांची मेंटॅलिटी हा मुद्दा विचारात न घेता चाल्लीली चर्चा बघूनच ते वाक्य लिहावेसे वटलेल्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मुद्दा पटत नाही

श्रीरंग_जोशी
Sun, 07/12/2015 - 18:15 नवीन
या मुद्द्याचा रोख असा आहे की ग्रामीण भागांत असे प्रकार होण्याची शक्यता शहरी भागांपेक्षा खूप अधिक आहे. मी स्वत: ग्रामीण व शहरी भागांत राहिलो आहे. ग्रामीण भागांत जाऊन राहणे म्हणजे खूप मोठी तडजोड करणे हा विचार अजिबात पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सॉल्लीड- परिणामकारक .

खेडूत
गुरुवार, 07/09/2015 - 12:59 नवीन
सॉल्लीड- परिणामकारक . मधेच माणदेशी माणसं आठवत होती !
  • Log in or register to post comments

सुरक्षित

सिरुसेरि
गुरुवार, 07/09/2015 - 13:17 नवीन
"गावाकडच्या वातावरणात अजुनही हे प्रकार सर्रास चालतात. अजुनही या छोट्या-छोट्या गावांमध्ये काही अलिखित आणि अनभिषिक्त सम्राट असतातच. त्यांना का? म्हणून विचारायची हिंमत कुणाकडेच नसते आणि असली तरी असे आवाज सहजपणे दाबले जातात. " -- असे असेल तर गावातल्या कुठल्याही घरातली मुलगी सुरक्षित नाही असेच खेदाने म्हणावे लागेल . जो प्रसंग आज चंदीवर आला तो उद्या कोणावरही येउ शकतो . "अर्थात अश्या एका घटनेवरून गावाचा भविष्यकाळ किंवा वर्तमानकाळ ठरवणे पुर्णपणे चुकीचे आहे" --- ते टगे एकच घटना घडवून पुढे कायम शांत , स्वस्थ बसतील असे ठरवणे पुर्णपणे चुकीचे आहे . गावात जर अशा घटना घडत असतील तर ते गाव असून नसल्यासारखेच आहे .त्यामुळे अशा अस्तित्वच नसलेल्या गावाचा भविष्यकाळ किंवा वर्तमानकाळ ठरवणे पुर्णपणे चुकीचेच आहे .
  • Log in or register to post comments

काय बोलू?

स्वाती दिनेश
गुरुवार, 07/09/2015 - 13:30 नवीन
काय लिहू? सुन्न व्हायला झालं.. :( स्वाती
  • Log in or register to post comments

बरेचदा

नाखु
गुरुवार, 07/09/2015 - 13:56 नवीन
असे प्र्शन (आणि प्रश्नकर्ते) आहेत हेच गावी नसतं आपल्या इतकं समाजमन मुर्दाड आणि निबर झालयं खरं! त्याचा प्रभाव शहरी-ग्रामीण अश्या सापेक्ष भेदापलीक्डे आहे.
  • Log in or register to post comments

काय रे विशाल असले लिहावते तरी कसे रे?

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/09/2015 - 14:13 नवीन
श्या उगाच वाचली गोष्ट शेवट वाचून तर जीव गलबलला. असले भोग कोणाच्याच वाट्याला येऊ नयेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

पैजारबुवा, थोडीफर नाट्यमयता

विशाल कुलकर्णी
Fri, 07/10/2015 - 08:56 नवीन
पैजारबुवा, थोडीफर नाट्यमयता सोडली तर गोपा खराच आहे हो. आणि हे सगळं भोगतो आहे आजही. मध्ये काही दिवस आम्ही त्याला येरवड्याच्या मनोरुग्णालयातही ठेवून पाहीले पण काही फरक पडला नाही. आता गाव सांभाळतो त्याला. कुणी कपडे देतं, कुणी ना कुणी रोजचं जेवायला देतं. मला जमेल तसे हंबीरकाकांकडे (माझ्या काकांचे मित्र - माझे काका आता हयात नाहीत) पैसे पाठवत असतो त्याच्यासाठी.... तेवढेच करु शकतो मी. त्यातल्या त्यात जमेची बाजू इतकीच की गोपाला गावाने वार्‍यावर सोडलेले नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

.

पाटील हो
गुरुवार, 07/09/2015 - 14:25 नवीन
.
  • Log in or register to post comments

हम्म . . काहीच बोलू शकत नाही

अद्द्या
गुरुवार, 07/09/2015 - 16:53 नवीन
हम्म . . काहीच बोलू शकत नाही . .
  • Log in or register to post comments

विशाल कुलकर्णी हम्म ...

तुडतुडी
गुरुवार, 07/09/2015 - 17:34 नवीन
विशाल कुलकर्णी हम्म ... दुसर्याच्या वेदनेची अपमानाची जाणीव कशी होत नाही काही लोकांना . घरातले (कु)संस्कार ह्याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत असं वाटतंय . मुलांना लहानपणापासूनच हवं ते करण्याचं अति स्वातंत्र्य देणं बंद केलं पाहिजे .
  • Log in or register to post comments

दुसर्याच्या वेदनेची अपमानाची

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 07/09/2015 - 21:16 नवीन
दुसर्याच्या वेदनेची अपमानाची जाणीव कशी होत नाही काही लोकांना . घरातले (कु)संस्कार ह्याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत असं वाटतंय . जाणिव होत नाही असे नाही तुडतुडी. पण त्याचा उपयोग नसतो. इथे प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. आपण तुलनात्मक दृष्ट्या खुप सुरक्षीत आयुष्य जगतो. पण सत्ता ही कायम मुठभर लोकांच्या हातातच एकवटलेली असते. तिला विरोध करणे खुप कठीण असते छोट्या-छोट्या गावातून. आता हळुहळु फरक पडतोय. लोक सुशिक्षीत होताहेत. आपले हक्क, अधिकार याबद्दल जागरुक होताहेत. पण तरीही परिस्थिती फारशी बदललेली नाहीये. केवळ घरातले संस्कार/ कुसंस्कारच कारणीभूत नसतात अशा प्रकारांना. मुळ वृत्ती, संगत, सत्तेचे अभय, समाजाचा भित्रेपणा, एकीची भावना नसणे अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात माणसाचा पशू व्हायला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

सुन्न झालो वाचुन.

मोहनराव
गुरुवार, 07/09/2015 - 17:43 नवीन
सुन्न झालो वाचुन.
  • Log in or register to post comments

इशुनाथ

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 07/09/2015 - 20:16 नवीन
इशुनाथ
वा रे वा सोलापुरी!!! एकच नंबर!! गावगाडा असलाच असतो साला !! अगदी सेम असाच!! टगे ते चंदी! मित्रहो गावकरी आपल्यासारखेच असतात त्यांना हजार कामे असतात शिवाय कोण गुंडांच्या नादी लागेल हाच विचार आपल्यासरखा ते ही करतात, शिवाय विशाल च्या लिखाणात त्याच्यावर असलेला मंटो चा प्रभाव वाटला हा मला, मंटो लेखक म्हणुन त्याला आवडत असल्यास तोच सांगेल पण मंटो ची शैली अशीच असते तो अंगावर येणारी मानवीय विकृती (शारीरिक /मानसशास्त्रीय) फ़क्त मांडतो अन प्रश्नाचे काहुर डोक्यात उठवुन जातो!!
  • Log in or register to post comments

मंटोचे लेखन मला कायमच आकर्षित

विशाल कुलकर्णी
Fri, 07/10/2015 - 08:52 नवीन
मंटोचे लेखन मला कायमच आकर्षित, किंबहुना अस्वस्थ करत आलेले आहे. माझा अर्थातच आवडता लेखक आहे मंटो. उगाचा नाट्यमयता, अलंकारीक शब्द किंवा रुपकांचा आधार घेत न बसता मोजक्या आणि बोचणार्‍या शब्दात वास्तव मांडणे हा मंटोचा हातखंडा होता. कदाचित त्याचे पडसादही माझ्या लेखनात उमटत असतील. फरक असेल तर इतकाच की मंटोच्या लेखनातून कायम निराशावाद डोकावत राहतो. मी माझ्या लेखनातून तेवढे टाळण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

चंदी मतीमंद आहे वाचल्यावर

नूतन सावंत
गुरुवार, 07/09/2015 - 20:28 नवीन
चंदी मतीमंद आहे वाचल्यावर असेच काहीतरी होईल याची कल्पना आली होती. हम कारे सो कायदा अशाप्रकारे वागतात,छोट्या गावातले लोक. गोपानेही असे काय पाप केले होते, म्हणून त्याच्या वाट्याला ही जिनगानी आली.हा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments

सुन्न........

एक एकटा एकटाच
गुरुवार, 07/09/2015 - 22:48 नवीन
सुन्न........ विशाल दा ह्या तुझ्या लेखाला मी छान नाही म्हणणार.
  • Log in or register to post comments

संवेदनशीलतेने टिपलंय सारं...

एस
गुरुवार, 07/09/2015 - 23:03 नवीन
संवेदनशीलतेने टिपलंय सारं...
  • Log in or register to post comments

भिकारचोट लोक

अत्रन्गि पाउस
Fri, 07/10/2015 - 02:18 नवीन
आहोत आपण असे वाटते हे असे वाचले कि... काय सुरेख लिहिलंय हो ... वा बुवा !
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिले आहे.

अनन्त अवधुत
Fri, 07/10/2015 - 06:57 नवीन
फार टोचणारा शेवट आहे. असा काही शेवट असेल असे वाटले नाही. खूप छान लिहिले आहे. काल सोन्याबापूची कासरा आणि आज येडा गोप्या. जिओ मिपा जिओ :)
  • Log in or register to post comments

सून्न करणारा शेवट

श्रीरंग_जोशी
Fri, 07/10/2015 - 09:14 नवीन
कथेच्या सुरुवातीला खूप चांगलं व्यक्तिचित्रण वाचायला मिळतय म्हणून समाधान वाटत होतं. पण शेवट वाचला अन सून्न झालोय.
  • Log in or register to post comments

बाप रे सुन्न झाले वाचून....

स्वीत स्वाति
Fri, 07/10/2015 - 10:18 नवीन
कुटुंबाची वाताहत झाली त्या टग्या न मुळे...
  • Log in or register to post comments

:(

प्रीत-मोहर
Sat, 07/11/2015 - 18:04 नवीन
:(
  • Log in or register to post comments

फार भयानक आहे हे सर्व. माणसं

जडभरत
Sat, 07/11/2015 - 18:27 नवीन
फार भयानक आहे हे सर्व. माणसं का राक्षसं म्हणायची ही. हे भारतातलं खेडं म्हणायचं की सुदान, सोमालियातलं? असो पण विकुजी लेखनशैली खूप प्रगल्भ आहे. लिखाणात त्रयस्थपणा छान जमलाय.पण कौतुक ही करवत नाही कारण मग गोपा चंदी यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल.
  • Log in or register to post comments

सुन्न!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 07/11/2015 - 19:02 नवीन
सुन्न!!! गावगुंडांना जाब विचारायला गेलं तर कुठे गायब केलं जाईल असा प्रश्ण बहुतेक गावामधे असतोचं. बळी तो कान पिळी. :( :(!! ही सत्यकथा असेल तर मात्र खुप चिडचिड झाली. तो वरचा अश्या वेळेला आंधळा, बहिरा आणि क्रुर होतो हेही तेवढचं खरं.
  • Log in or register to post comments

खरंय भौ!!! प्रत्येक गावात

जडभरत
Sat, 07/11/2015 - 21:22 नवीन
खरंय भौ!!! प्रत्येक गावात असले भंगार गावगुंड आहेत, स्थानिक फुडार्याच्या आशिर्वादाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सुन्न...निशब्द....

पद्मावति
Sun, 07/12/2015 - 17:18 नवीन
सुन्न...निशब्द....
  • Log in or register to post comments

फारच विदारक सत्य कथा आहे

अरवीन्द नरहर जोशि.
Mon, 07/13/2015 - 06:49 नवीन
फारच विदारक सत्य कथा आहे अजूनही खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे . हे सत्य शहरी बाबूंना पचणार नाही .
  • Log in or register to post comments

आई ग!

पैसा
Mon, 07/13/2015 - 10:40 नवीन
आई ग!
  • Log in or register to post comments

फार वाईट वाटले कथा वाचून.

अभिजीत अवलिया
Tue, 07/14/2015 - 03:48 नवीन
फार वाईट वाटले कथा वाचून.
  • Log in or register to post comments

सुन्न करणारी कथा..

चिगो
Tue, 07/14/2015 - 17:02 नवीन
सुन्न करणारी कथा आणि शैली..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा