मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रोझ अतैफ -बिल-अष्टा

सानिकास्वप्निल · · पाककृती
. अतैफ -बिल-अष्टा ही एक अरबी पाककृती आहे, काही ठिकाणी ह्या पाककृतीला कतैफ -बिल-अष्टा असे ही म्हटले जाते. ह्यात अतैफ म्हणजे यीस्ट घालून केले पॅनकेक्स, अष्टा म्हणजे पॅनकेकच्या आत भरण्यासाठी तयार केलेले मुलायम, क्रीमी फीलिंग. रमादान मध्ये खासकरुन ही गोडाची पाककृती बनवली जाते. मी ह्या पाककृतीत थोडेसेच बदल केले आहेत. साहित्य पॅनकेकसाठी १ वाटी गव्हाचे पीठ + १ वाटी मैदा एकत्र करुन घेणे १-१/४ वाटी पाणी १ वाटी दूध १/२ टीस्पून ड्राईड यीस्ट १/४ टीस्पून मीठ २ - टीस्पून साखर प्रमाण मी छोट्या वाटीचे घेतले आहे ताप्रमाणे ह्या मिश्रणाचे आठ पॅनकेक्स तयार होतात. . कृती: गव्हाचे पीठ + मैद्यात मीठ, साखर व यीस्ट एकत्र मिकस करुन घ्या. दूध + पाणी कोमट करुन घ्या. हे कोमट दूध-पाण्याचे मिश्रण पिठात घालून, गुठळ्या होऊ न देता चांगले मिक्स करुन घ्या. हे मिश्रण झाकून एक तास बाजूला ठेवा. तासाभराने मिश्रण फुगून वर आलेले असेल. . नॉन-स्टीक तवा मंद आचेवर गरम करायला ठेवा. मी नॉन-स्टीक तवा असल्यामुळे अजिबात तेलाचा वापर केलेला नाहिये. डावभर मिश्रण तव्यावर ओतावे, पसरवायचे नाही. पॅनकेकवर जाळी यायला लागली, आणि त्यावरचा ओलसरपणा पूर्ण सुकला की काढावे, उलटवायचे नाही. . अशा पद्धतीने सर्व पॅनकेक्स तयार करुन घ्यावे. साहित्य अष्टासाठी: १ वाटी दूध १ वाटी फ्रेश क्रीम (इथे मुळ पाककृतीत अरबी Qaimar क्रीमचा वापर केला जातो, ते न मिळाल्यामुळे मी फ्रेश क्रीम वापरले) २ टेस्पून कॉर्नफ्लॉर ३ टेस्पून रोझ सिरप ( मुळ पाकक्रुतीत रोझ वॉटर किंवा ऑरेंज ब्लॉसम वॉटर वापरले जाते, माझ्याकडे दोन्ही नव्हते म्हणून मी रोझ सिरप वापरले) १-२ टेस्पून साखर (सिरपच्या गोडीनुसार प्रमाण घ्यावे) सजावटीसाठी पिस्त्याची पूड . कृती: दूध व फ्रेश क्रीम एकत्र करुन गॅसवर , मंद आचेवर गरम करायला ठेवावे. कॉर्नफ्लॉरमध्ये थोडे दूध घालमु, मिक्स करुन घ्यावे. गरम झाल्य्ल्या दुधात कॉर्नफ्लॉरचे मिश्रण घालून सतत ढवळत रहावे. त्यात रोझ सिरप व साखर घालून ढवळावे. . हळू-हळू मिश्रण दाट होऊ लागेल. मिश्रणाची कंसीस्टंसी कस्टर्डप्रमाणे हवी. गॅस बंद करुन थोडे गार होऊ द्यावे. वरुन क्लिंग रॅप लावून ठेवावे म्हणजे वर मिश्रण सुकल्यासारखा थर तयार होणार नाही. आता हे रेफ्रिजरेट करावे. . अस्मेब्लिंगः तयार पॅनकेकच्या दोन्ही कडा एकत्र करुन, अर्धगोलाकारात दुमडून, हलका दाब देऊन बंद कराव्यात. एक कोपरा कस्टर्ड भरण्यसाठी मोकळा असावा. . तयार कस्टर्डला पायपींग बॅग किंवा रीक्लोझेबल बॅगमध्ये भरुन घ्यावे व बॅगेचे टोक कापावे. अर्धगोलाकार पॅनकेकमध्ये हे रोझ कस्टर्ड पाईप करुन घ्यावे. त्यावर पिस्त्याची पूड घालावी. . रोझ अतैफ -बिल-अष्टा - नाव जरी कठीण वाटत असले तरी पदार्थ चवीला अप्रतिम लागतो :) चला तर मग घ्या पटापट खायला. . लगेच सर्व्ह करणार नसाल तर फ्रीजमध्ये ठेवून द्या. फीलिंग अधिक रीच बनवण्यासाठी रिकोटा चीझचा ही वापर कस्टर्डमध्ये करत येईल. आवडत असेल तर ह्या अतैफवर मध किंवा मेपल सिरप ड्रिझल करु शकता. तसे काही वेळेला करंजीप्रमाणे पूर्ण दुमडून हे पॅनकेक तळले जातात व साखरेच्या पाकात घोळवले जातात.

वाचने 19320 वाचनखूण प्रतिक्रिया 47

स्रुजा Fri, 07/03/2015 - 22:27
लाजवाब ! एवढ्या उन्हाळ्यात मस्त वाटतंय. पण मला रोझ फ्लेवर आवडत नाही, त्यामुळे ऑरेंज किंवा तत्सम सिट्रस फ्लेवर वापरुन करेन. एक दोन फॅमिलीज ला जेवायला बोलवायचं आहे, काही तरी शाही मेनु हवाच होता. धन्यवाद गं :)

नोट मध्ये एक लिहायचे राहून गेले, आवडत असेल तर ह्या अतैफवर मध किंवा मेपल सिरप ड्रिझल करु शकता. तसे काही वेळेला करंजीप्रमाणे पूर्ण दुमडून हे पॅनकेक तळले जातात व साखरेच्या पाकात घोळवले जातात.

पद्मावति Fri, 07/03/2015 - 23:00
नेमकं कशाची तारीफ करायची? ह्या अनोख्या रेसेपीची, हा पदार्थ बनविणार्या सुगरणपणाचि की त्याच्या सादरीकरणाची? तीनही साठी एकच शब्द---लाजवाब!!!

अरे एक खाद्यकट्टा बनवा आणि सानिकास्वप्निल यांना हे आणि त्यांच्या इतर सर्व पाकृ खरंच येत आहे हे सिद्ध करायला लावा ! :) (आम्हाला हे सगळे मस्तं मस्तं पदार्थ खायला मिळाल्याशी कारण ! ;) )

मी शेवटच्या फ़ोटुत एका केक रोल मधून आत गेलेलो आहे! आता पुढच्या जन्मी भेटु रेsss! रोज खातैफ -मिळ-नाष्टा मधे दिवंगत झालेला :- आत्मु खादाड अतृप्तिवाले..

dadadarekar Sat, 07/04/2015 - 11:22
नुसती अंबोळी करुन श्रीखंड भरले जाइल

चाणक्य Sat, 07/04/2015 - 23:33
सलाम सलाम सलाम. सादरीकरणातच खपल्या गेलेलो आहे. कसं काय जमतं राव तुम्हाला!

बोका-ए-आझम Sun, 07/05/2015 - 10:13
अंमळ रोम्यांटिक वगैरे आणि कातिल आलेला आहे. अॅनिव्हर्सरी स्पेशल म्हणून पेटंट घ्यायला हरकत नाही.

पैसा Sun, 07/05/2015 - 22:01
अग्गग्गग्गग! काय जबरदस्त सादरीकरण अन फटु ते! एकदम शाही दावत दिसते आहे!